.बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही ..

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
5 Sep 2015 - 9:27 pm

चहु दिशांत पसरे कीर्ती, जग तुझिया पायावरती
पण अवखळ गोकुळवासी, मज कृष्ण भेटला नाही
....... किती काळ उलटला राधे ,नित नवीन दिसशी तूही
....... जरी रूप बदलले त्याचे, तो कृष्ण वेगळा नाही
तो परतून आला तरीही, माझा ना उरला काही
दमले मी शोधून त्याला , मज कृष्ण भेटला नाही
....... उमगता मोल नात्याचे गेलेला परतून येई
....... समजून तयाला घे तू , तो कृष्ण वेगळा नाही
सर्वस्व वाहिले त्याला , काही ना बाकी उरले
मी स्वत:स हरवून बसले , मज कृष्ण भेटला नाही
.........इतुके न कुणाला द्यावे, की भार तयाचा व्हावा
........ बघ तुझ्यात लपला आहे , तो कृष्ण वेगळा नाही
या नात्यातील उपेक्षा मी मूक साहिली नाही
बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही
........ राधेची निर्मम प्रीती , गोपास बनविते कृष्ण
........ मिटल्या नयनांनी बघ तू , तो कृष्ण वेगळा नाही

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

राघव's picture

15 Jan 2016 - 1:18 pm | राघव

कल्पना अत्त्युत्तम! मांडणीही खास.
खूप आवडली कविता. धन्यवाद! :-)