दस रुपय
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
शतशब्दकथा स्पर्धेत मी देखील एक कथा दिली होती. त्या कथेचा पुढचा भाग शतशब्दकथा रुपात न देता संपूर्ण कथा हिते देत आहे.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
सन 1975 च्या आसपासचा काळ
संध्याकाळची ७ वाजेच्या आसपासची वेळ होती. अंधार पडू लागला होता. तिने गुरांना गावाकडे नेण्यास सुरुवात केली. डोंगरावर तीन गाई, एक म्हैस आणि त्या दहा वर्षाच्या पोरी शिवाय कोणीच नव्हते. गवताळ भाग जास्त असल्याने तिथे गुरांना पुरेस कुरण उपलब्ध होते, म्हणून मालकाने तिच्या विनवण्या मान्य न करता गावा पासून बरेच लांब असलेल्या त्या ठिकाणी जनावर घेऊन जायला भाग पाडले होते.
आकाशात दुरवर विजेचा मोठा कडकडाट झाला, गार वाऱ्याने अंगावर शहारा आणला. काही वेळातच पाऊस पडेल अशी चिन्हे दिसू लागली. तिला जास्त वेळ तिथे थांबणे शक्य नव्हते. वेळ कळण्यास काहीच मार्ग नसल्याने संध्याकाळचे किती वाजले आहेत ते कळालेच नाही आणि तिला घरी जाण्यास उशीर झाला होता. डोंगर उतरून तिने सरळ नदीचा मार्ग धरला. गावाकडे जाण्याचा तो एकच मार्ग होता. त्या लहान नदीवर पूल नव्हता म्हणून वाहत्या पाण्यात उतरण्याशिवाय पर्याय नव्हता.
तिने जनावरासहित नदीत पाय ठेवला. एकही जनावर भलतीकडे जाऊ नये म्हणून ती पोर सर्वात शेवटी होती. जनावरांपासून तिचे अंतर जास्त होते. ती मागे राहिली होती. पुन्हा एक मोठा कडकडाट झाला, विजेच्या लखलखाटाने डोळे दिपले. जवळ जवळ अर्धी नदी पार झाली असताना नदीचे पाणी वाढले. नदी ज्या काही गावांमधून वाहून येत होती त्या गावांमध्ये झालेल्या दुपारच्या जास्त पावसामुळे नदीच्या पात्रात अचानक वाढ झाली होती. चिखलाने भरलेला सारा गाळ नदीतून वाहून येऊ लागला. तिचा स्वत:वरचा ताबा सुटला. पाण्याच्या प्रचंड लाटा येऊन तिच्या अंगावर आदळू लागल्या. तिला रडू फुटले. ती नदीच्या प्रवाहाबरोबर वाहू लागली. नाका तोंडात पाणी गेले. वाहून जाताना काठावरच्या एका दगडाला पकडून ती स्वतःला सावरून अडखळत उभी राहिली, कसे बसे तिने मागे वळून बघितले, ती मनातल्या मनात समाधानी झाली, शेवटचे जनावर सुखरूप नदीपार गेले होते पण दुसर्याच मिनिटाला पायाखालचा दगड घसरला आणि तिच्या तोंडातून किंकाळी निघाली. ती पुन्हा वाहून जाऊ लागली.
नदी पल्याड एक शेख बंधारा बांधण्याचे काम करून घरी परत जात होता. त्याला ती लहान पोर वाहून जाताना दिसली. तो धावत गेला आणि त्याने नदीत उडी टाकली. पोहत जाऊन त्याने तिला एका हाताने धरले आणि आपल्या दुसऱ्या हाताने नदीकाठच्या एका बाभळीच्या झाडाला घट्ट पकडून तो तसाच पाण्यात उभा राहिला. पाण्याचा ओघ अजून कायम होता त्यातच पावसाच्या सरी कोसळू लागल्या. बऱ्याच वेळा नंतर पावसाचा मारा कमी झाला तसा शेख तिला नदी बाहेर घेऊन आला. तिची अवस्था पाहून तो रागाने म्हणाला,
“तुम्हारे माँ बाप को कूच अकल है या नही, अकेली लडकी को इतनी दूर छोड देते है.....दस रुपय के लिये क्या जान लेंगे बच्ची की.”
तिने रडतच त्याच्याकडे बघितले. त्या लहान जिवाकडे बघून तो शांत झाला. तिला महारवाड्याजवळ सोडून तो घरी निघून गेला. तो पर्यंत जनावरे गावात पोहोचली होती.
तिकडे तिचा बाप तिला शोधत फिरत होता. ती लांबून येताना दिसली तसा तिचा बाप धावत आला आणि तिला उचलून चिखल तुडवत त्याच्या अंधार्या झोपडी वजा घरात घेऊन गेला. तिचे भाऊ बहीण डोळे किलकिले करून तिच्याकडे बघत होते. आईने तिला उराशी कवटाळले आणि लुगड्याच्या कापडाने तिचे डोके पुसू लागली. बाहेर अजूनही अखंड पाऊस पडत होता. कधी नाही तो आभाळ फाटले होते.
.......आणि हे सगळा सांगत असताना माझ्या आईचे डोळे पाणावले कारण ती लहान मुलगी म्हणजेच माझी आई......
प्रतिक्रिया
खूप छान आहे ही सत्यकथा!
आई गं..
आवडली !
खूपच छान.
...
साधीशीच पण चटका लावणारी कथा !
कथा आवडली
आवडली!!!!
आवडली.
मस्त लिहीलंय. सुखांतामुळं
आवडली...
सलाम!
वा क्या बात है ! आवडली कथा ,
कथा आवडली.
फक्त कथा नाही.घडलेली कथा.
...
आभार
तुम्ही लिहिलेली कथा आवडली.
खूप खूप आवडला अनुभव.
आपल्या आईची काळजी घ्या !!!
आवडली . बिचारी मुलगी