✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काय दुखलंय...?

स
संदीप डांगे यांनी
Tue, 05/05/2015 - 06:38  ·  लेख
लेख
एका प्रश्नाचे उत्तरः प्रसंग एकः बांद्र्याचे जे जे होस्टेल. रात्रीचे २ वाजलेत. अगदी पाप्याचे पितर असलेला एक मुलगा लघुशंकेला गेला असता चक्कर येऊन तिथेच पडला. बेशुद्ध झाला नाही. पण अंगात उठण्याचे त्राण बिल्कुल नाही. त्याला उचलून रेक्टरच्या गाडीत घालून जवळच्या एकमेव उपलब्ध असलेल्या मल्टी-स्पेशॅलिटी हॉस्पीटल मधे नेले. निवासी डॉकने छातीला स्टेथो लावून तपासले. काही प्रश्न विचारले. ताबडतोब रक्त/लघवी तपासणी, छातीचा एक्स-रे वैगेरे काढायला लावला. आम्ही जाम टेंशनमधे. च्यायला, हे पोरगं आई-बापापासून हजार किमी दूर. ह्याला काय झालं अन काय नाही. डॉकने गोळी दिली. सकाळी परत बोलावले. रात्रभर आम्ही चिंतेत. तो चिंतेत. सकाळी पेशंट आणि मी मस्त चालत हॉस्पीटलला गेलो. सगळे रीपोर्ट्स नॉर्मल. डॉक म्हणतो. अरे बीअर भरपूर प्यायला, जेवला नाही. अ‍ॅसिडीटी झाली होती. बाकी काळजीचं काही कारण नाही. सर्व खर्चः २,५०० रुपये. सन २००४. प्रश्नः अ‍ॅसिडीटी होती हे कळायला एक्स-रे लागतो? काय खायला प्यायला हे रात्रीच सांगितले मग एवढ्या टेस्ट्स का? उत्तरः डॉक्टर आपल्यापेक्षा जास्त शहाणे असतात. ते बरोबर आपल्याला कापतात. प्रसंग दुसरा: आयपीएलमधे असतांना रात्रंदिवस बसून काम केल्याने उष्णता वाढून 'योग्य ठिकाणी' चांगले ७-८ गळू झाले. भयंकर वेदना. उठण्या-बसण्याची बोंब. काहीच उपाय सुचेना. जवळच्या मल्टी-स्पेशॅलिटी हॉस्पीटलमधे गेलो. बायकोची आजी तिथली कायमची पेशंट असल्याने बरीच ओळख वैगेरे. प्रथितयश सर्जन डॉकने तपासले. निदान: ऑपरेशन करावे लागेल. खर्च १५ ते २० हजार वैगेरे. लगेच करून घ्या किंवा परिस्थिती हाताबाहेर जाईल. थोडे संशयास्पद वाटले. बायको म्हणाली, आमच्या जुन्या फॅमिली डॉकचे मत घेऊया. ते योग्य काय ते सांगतील. हे ठाण्यातलेच एक वयोवृद्ध डॉक्टर, मोठं पण जुनं हॉस्पीटल. काही गुणवान, नावाजलेल्या, चांगल्या डॉक्टरांपैकी एक. त्यांच्याकडे गेलो. तपासले. म्हणाले, "अरे काय नाही, साधं गळू आहे. ४ दिवसांत ठीक होईल. गरम पाण्यात डेटॉल टाकून बस. चांगला तासभर शेक घे. गळू दाबून पू व रक्त काढून टाक. ह्या अँटीबायोटीक घे. बास. आराम कर आठ दिवस." सर्व खर्चः ३०० रुपये. सन २००९. प्रश्नः एकाच पेशंटच्या एकाच रोगाचे एकाच अवस्थेबद्दल एकसारखे शिक्षण घेतलेल्या दोन डॉक्टरांचे निदान एकच पण उपचार पद्धती वेगळ्या का? दुसर्‍या डॉकनी खर्चिक उपाय का सांगितला? त्याला खर्चिक उपायच शिकवला होता का? उत्तरः काही डॉक्टर आपल्यापेक्षा जास्त शहाणे असतात. ते बरोबर आपल्याला कापतात. काही डॉक्टर आपल्याला खरंच वाचवतात, खर्च आणि रोग दोघांपासून. प्रसंग तीसरा: ठाण्यातले प्रसिद्ध असे नर्सिंगहोम. बापाने सुरू केलेले, आता आई, मुलगा, सून सांभाळते. खुप लोकांकडे चौकशी करून इकडे नाव नोंदवले. सातव्या महिन्यात रेगुलर चेक-अप ला गेलो असता. डॉक-आईनी नेहमीप्रमाणे तपासले. तपासून झाल्यावर नेहमीच्या डिस्कशन-क्वेरीज ला बसलो. बायको म्हणाली, की तीला दोन-तीन दिवसांपासून बाळाची हालचाल, ठोके, खालच्या दिशेला जाणवतायत, खुप दुखतंय. कपाळावर काळजीच्या आठ्या आणत डॉक म्हणाल्या, जरा परत एकदा तपासू. मग हात घालून नीट तपासले. बायकोचे म्हणणे खरे निघाले. बाळ गर्भ-पिशवीच्या तोंडावर धडक मारायच्या तयारीत होते. ताबडतोब बेड-रेस्ट सांगितली. आणीबाणीची परिस्थिती असल्याने तिथेच लगेच अ‍ॅडमिट केले. ३-४ दिवस निरिक्षणाखाली होती. बाळ परत पुर्ववत झाले. आम्ही घरी आलो. सर्व खर्चः दोनदा टेबलवर घेतले म्हणून दुप्पट तपासणी फी, (हॉस्पीटलायझेशनचा खर्च वेगळा) सन २०१०. प्रश्नः पहिल्यांदाच चेक-अप ला टेबलवर घेतल्यावर ही आणीबाणीची परिस्थिती एवढ्या अनुभवी डॉकला का जाणवली नाही? मग नक्की रेगुलर-टेबल-चेक-अप काय असतो? गर्भवती 'डॉकला कळतं, तेच सांगतील काय असेल ते' असे म्हणून घरी गेली असती आणि काही कमी-जास्त झाले असते तर जबाबदारी कुणाची? उत्तरः काही डॉक्टर आपल्यापेक्षा जास्त शहाणे असतात. पण त्यांना पेशंटशी काही घेणे-देणे नसते. ठाण्यात पहिल्या बाळाच्या वेळेस ९ सोनोग्राफी झाल्यात एकूण खर्चः११,३००. नाशिकमधे दुसर्‍या बाळाच्या वेळी एकूण काळात ४ सोनोग्राफी झाल्यात. एकूण खर्चः२४००. असे का? तुम्ही कुठल्या गावात आहात यावर किती सोनोज ठरतात का? प्रसंग चौथा: नऊ महीने पुर्ण झाले. आता बाळ योग्य पद्धतीने वाढतंय. ठोके व्यवस्थित आहेत. डोके खाली आहे. आगमनाची वेळ जवळ आली आहे. कुठल्याही क्षणी कळा सुरु होतील. होणारी माता-पिता वेगवेगळ्या भावनांच्या सागरलहरींमधे हिंदकळतायत. मातेची प्रकृती उत्तम आहे. बाळाची प्रकृती उत्तम आहे. सर्व चिन्हे उत्कृष्ट बाळंतपण होईल अशीच आहेत. नववा संपल्यावर रेगुलर चेक-अप ला गेलो. डॉक-आईच्या डॉक-मुलाने तपासणी केली. पहिल्यांदाच क्लिनिकमधले सोनोग्राफी मशिन पोटावर फिरवून तपासणी केली. शांतपणे आम्ही डॉकसमोर बसलोय. आता काय काळजी घ्यावी आणि कळा सुरु झाल्यावर काय करावे याचे मार्गदर्शनाची वाट पाहू लागलो. तेव्हाच त्या थंड डॉकच्या थंड आवाजाने आमची मनं चिरली. "सिझर करावं लागेल, बाळ पायाळु आहे." त्याचे वाक्य संपायच्या आत मातेचे अश्रू सुरु. मी हजार प्रश्न विचारतोय, त्याचे एकच उत्तर. सोनोग्राफीत बाळ पायाळु दिसतंय, आम्ही रिस्क घेऊ शकत नाही. नाळ गळ्यात अडकेल, मुल डिस्ट्रेस होईल. डेट ठरवा. सिझर उत्तम राहील. आम्ही नखशिखांत हादरलो. बायकोने नॉर्मल डीलीवरीसाठी सर्व काळजी घेतली होती. तीला पोट कापून घ्यायचेच नव्हते. पण नशिबापुढे काय चालते म्हणून आम्ही सिझर साठी तयार झालो. दुसर्‍या मतासाठी कुणाला विचारावे अशी परिस्थितीच नव्हती, बायको विचार करते आहेच की मला ठोके खाली जाणवतायत. बाळाच्या ठोके मोजायचं मशीनही खालच्या बाजूलाच फायनेस्ट रिस्पॉन्स देतंय. मग बाळ पायाळू कसं? सर्व खर्चः १ लाख २५ हजार रुपये. (नॉर्मल डीलीवरी: ६५ हजार) सन २०१० प्रश्नः ५० हजारासाठी गळे कापणारे आणि ५० हजारासाठी पोट कापणारे यांच्यात फरक काय? तो आपण ठरवणारे कोण? उत्तरः काही डॉक्टर... जाऊ दे. प्रसंग पाचवा: डीलीवरीनंतर काही महिन्यांत बायकोच्या दोन्ही तळव्यांवर सूज यायला लागली, भयंकर कळा यायच्या. तिच्या खांद्याजवळ जन्मापासूनची एक बोराएवढी छोटी गाठ होती. तीही अचानक मोठी होऊ लागली. आता आम्ही अगदी ओळखीच्या व २५-३० वर्ष अनुभवी सर्जनला दाखवले. मनगटांमधे सिस्ट आहेत, ते काढल्यावर सूज यायची थांबेल असे त्याने निदान केले. खांद्याजवळच्या गाठीला ताबडतोब काढून टाकायचे ठरवले. कॉम्प्लीकेशन्स बद्दल विचारले असता काही होणार नाही असे सांगितले. दोन्ही हात व खांदा इथली ऑप्स एकाच वेळेस केली. गाठ काढल्यावर लॅबटेस्ट नुसार कॅन्सरवाली नाही असे निदान झाले. ऑप्स नंतर सूज कमी झालीच नाही. त्याबद्दल विचारले असता होईल ३-४ आठवड्यात कमी असे सांगितले. ३-४ आठवड्यांनीही कमी झाली नाही. मूळ त्रास तसाच आहे. फक्त थोडा कमी झाला, की बायकोने त्याची सवय करून घेतली माहित नाही. खांद्याजवळचे काही मज्जातंतूंना डॅमेज झालाय. थोड्या भागात नम्बनेस आहे. तोही सहा महिन्यात निघून जाईल असे सांगितले. तीन वर्षे झाली. सगळ्या समस्या तशाच आहेत. आता कुणाकडेही काहीही दाखवायची हिंमत राहीली नाही. नवा सर्जन पैसे उकळायला परत चिरफाड करेल, आराम मिळणार नाहीच अशी भीती खोलवर रुजून बसलीये. सर्व खर्चः ३५ हजार रुपये. सन २०१२. प्रश्नः आपली फसवणूक झाली हे सिद्ध कसे करायचे? कुठे? न्याय काय मिळेल? न्यायदानात शरीर ठीक होईल, एकदम ठणठणीत? उत्तरः????? प्रसंग सहावा: बहीणीला मूल नाही. लग्नाला सहा वर्षे झाली. अ‍ॅलोपॅथी डॉक्स फक्त प्रयोग करतायत असे कालांतराने लक्षात आले. त्याचे पुर्ण डीटेल्स माहित नाहीत. मी एका नामांकित सर्वोपचार डॉकला ओळखतो. प्रजननविषयक त्याचे फार कार्यक्रम टीव्हीवर येत असतात. महाराष्ट्रात किमान ३० शाखा आहेत. बहिणीला म्हटले बघ प्रयत्न करून. योग्य उपचार होतील अशी आशा आहे. त्यात त्यांनी एक अ‍ॅलोपॅथी इंजेक्शन वापरले. अजून काय काय न काय काय? जवळपास एक लाख रुपये घालवून काहीच उपयोग होत नाही म्हटल्यावर मी त्या डॉकला फैलावर घ्यायचे ठरवले. तर तो बहिणीला म्हणाला, तुम्ही सांगितलेली योगासने केलीत का? योगासने करा, फायदा होईल. लाखभर रुपयाची निरर्थक पंचकर्म ट्रीटमेंट, औषधी पचवून जर हा सांगतोय योगसनं करा, फायदा होईल. तर त्याचे डोके का फोडू नये असा विचार तिथेच आला. पण आपण त्याला कुठल्याही प्रकारे कायद्याच्या कचाट्यात पकडू शकत नाही हे ध्यानात आले. मुकाट घरी आलो. ती विशिष्ट इंजेक्शने विशिष्ट कालावधीत घ्यायची असल्याने बहिण परत सासरी निघून गेली. या आयुर्वेदिक डॉक्सनी लिहून दिलेल्या प्रीस्कवर तीचा अ‍ॅलोपॅथी डॉक तेच अ‍ॅलोपॅथी इंजेक्शन देण्यास तयार नव्हता. तो म्हणाला मी माझी प्रोसीजर वापरणार आणि नंतर ठरवणार हे कधी द्यायचे ते. इतर बर्‍याच जिवघेण्या गमती-जमती कळल्या या प्रवासात. आपलं गिर्हाईक दुसरीकडे उपाय शोधतंय म्हटल्यावर तीच्या सासरकडच्या डॉकला नवे प्रयोग करायचा उमाळा आला. दोन-तीन सर्जरी करून टाकल्या त्या भरात त्याने. एक वर्ष झाल्ंय या सगळ्या गोष्टींना. कुणीही काहीच खरं सांगत नाही आहे. कसलीही हमी देत नाही आहे. सर्वांचे उत्तर आम्ही प्रयत्न करतो, होईलच काहीतरी (तुम्ही फक्त पैसे मोजत राहा) सर्व खर्चः ५ लाख रुपये आतापर्यंत. उपयोग शून्य. प्रश्नः अशा धादांत क्वॅक्सना अशी अडलेल्या लोकांना फसवणारे धंदे करण्याची मोकळीक कशी मिळते? आम्ही अमुक इतक्या हजार घरांमधे हास्य फुलवलं अशी पेजपेजभर नियमबाह्य जाहिरात सरकारी व्यवस्था कशी खपवून घेते? अ‍ॅलोपॅथी वा आयुर्वेद किंवा अजून कोणी, यांना अशा सर्फ एक्सेलछाप जाहिराती करण्याची अजिबात लाज वाटत नाही? उत्तरः????? प्रसंग सातवा: दोघांच्याही डोळ्यात कसले तरी इन्फेक्शन झालेले. ओळखीच्या एक फॅमिली फिजीशियन बाईंचा मुलगा नुकताच आय-स्पेशालिस्ट एम.डी झालेला त्याच्या कडे गेलो. त्याने डोळे तपासून सांगितले तुम्हाला चश्मा आहे. आपण जरा व्यवस्थित टेस्ट करून योग्य नंबर काढू. पुढचे तीन दिवस त्याने रोज संध्याकाळी डोळ्यात वेगवेगळे ड्रॉप्स टाकून नंबराची ट्रायल घेतली. प्रत्येक वेळेस नंबर वेगवेगळा येत होता. प्रत्येक विझिटची फी ५०० रुपये. १५०० घालवल्यावर अक्कल आली. त्याच्याच बाजूच्या मेडीकलवरून ओटीसी आय-ड्रॉप घेतलं, दुसर्‍या दिवशी सकाळी डोळे ठीक एकदम. मग स्वच्छ दिसू लागले. तीन दिवस आम्ही दोघे आणि एक २०-२२ वर्षिय मुलगी जिला रांजणवडी झालेली अशा तिघांवर साहेबांचे मनसोक्त प्रयोग सुरु होते. फक्त १५ दिवसांआधी मी डोळे तपासून घेतले होते कंपनी आय-चेक-अप कँपमधे. कुठलाही नंबर नव्हता. आणि हा मला -१.५ ते ३.५ असे भन्नाट आकडे रोज देत होता. देवकृपेने रोज १२ ते १४ तास कॉम्पवर काम करूनही गेल्या दहा वर्षात चश्मा नाही लागला. (आठ दिवसांनी ती रांजणवडी वाली तरुणी दिसली. तीची अवस्था भयंकर झाली होती. साध्या गरम शेकाने आणि थंड मातीच्या लेपाने दोन दिवसात बरी होणारी रांजणवडी डोळाभर झाली होती.) सर्व खर्चः १५५० रुपये. प्रश्नः जीवंत माणसांना, आपल्याकडे आलेल्या रुग्णांना गिनीपिग म्हणून वापरतांना अशा डॉक्टरांना लाज लज्जा शरम काहीच वाटत नसेल काय? तेही धादांत खोटे बोलून? उत्तरः????? हे फक्त माझे अनुभव आहेत. प्रातिनिधिक आहेत. यांचे डिसेक्शन करायची काहीच गरज नाही. समाजात फिरलात तर हजारोंनी सापडतील. सुर्य उगवतोच. कोंबडं झाकून उपयोग नाही. हे सगळे रुग्णांचे गैरसमज आहेत असे म्हणाल तर यापेक्षा निर्लज्ज प्रतिसाद नसेल. इतर अनेक धाग्यांवर अनेकांनी आपापली मते मांडली आहेत. तीच परत परत इथे मांडून माझ्याच दिमागचं दही करून घेत नाही. बर्‍याच धाग्यांवर मी डॉक्टरांच्या समर्थनार्थ लिहिलंय कारण चांगले डॉक्स बघितले आहेत. सगळे बेड रिकामे पडले असून, गरज नसल्याने मुलाला अ‍ॅडमिट न करता धीर देऊन घरी परत पाठवणारा डॉक बघितलाय, एका झटक्यात तापातून उठवणारा डॉक बघितलाय, महिना दहा-वीस हजार रुपयेच मिळवणारा डॉ़क बघितलाय. कुठलाही मानसन्मान न घेता गरिबांसाठी फुकट औषधपाणी देणारा डॉक बघितलाय. पण 'डॉक्टर लोक फसवतात' हे आता 'सरकारी कर्मचारी भ्रष्ट असतो' इतके सामान्य झालेलं आहे. ज्याच्या खांद्यावर विश्वासाने डोके ठेवावे त्यानेच गळा कापावा अशी वेळ आली आहे. यात काही डॉ़क्स चांगले काही वाईट अशी सफाई नकोय. जर सगळे एकच शिक्षण घेतात, एकच प्रतिज्ञा घेतात तर हे चांगले-वाईट कुठून येतात? चांगला की वाईट, मला नेमका कुठला डॉक्टर वाट्याला येईल हे कसे सांगता येईल? माझं निदान, उपचार खात्रीपुर्वक योग्यच झाले आहेत याची कोण हमी देईल? नाही देता येत तर मग पैसे कसे खणखणीत वाजवून घेतले जातात? तुमचा रुग्ण मेला/ रोग बरा नाही झाला म्हणून आम्ही पैसे घेणार नाही असे कुणी डॉक्टर म्हणेल काय? सगळे मुसलमान अतिरेकी नसतात पण सगळे अतिरेकी मुसलमान असतात याच धर्तीवर वैद्यकक्षेत्रातले सगळे डॉक्स वाईट नसतात पण सगळे वाईट डॉक्स वैद्यकक्षेत्रातच असतात हे भयानक सत्य आहे. मला कुणा ईंशुरन्स वाल्याने कापले, माझे कुणी पाकिट मारले, कुणी घरात चोरी केली, अगदी पद्धतशीर उल्लू बनवून लुबाडले तर मला जेवढे दु:ख होणार नाही त्यापेक्षा हजारो पटीने असले डॉक्स नशिबात आले की होतं. पैसे जातात त्याचं दु:ख नाही. चुकीच्या निदान/उपचारांनी जीव जातो, माणूस आयुष्यभर कुणा दुसर्‍याच्या हलगर्जीपणा, अर्धवट ज्ञान, पैशाची लालुच याचे फळ भोगत राहतो. याचं दु:ख मोठं आहे. डॉक्टर लोकांच्या अनीती व्यवहारांवर कुणी काहीही बोलले की अंगावर धावून जाणार्‍या, मुजोरीची भाषा करणार्‍या, असल्या डॉक्टरांचे सगळे व्यवहार चुकीचे असले तरी योग्यच आहेत असे भासवणार्‍या तथाकथित उच्चशिक्षित उच्चभ्रू डॉक्टरांना माझा साधा प्रश्न. रुग्णांचे रक्त पिणारे हरामखोर डॉक्टर खरंच अस्तित्वात नाहीत असा तुमचा दावा आहे काय? ते आहेत असं जर तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही व्यवसायाला कलंक ठरणार्‍या व्यवसायबंधूंच्या विरूद्ध प्रत्यक्ष मैदानात षड्डू ठोकण्याऐवजी नागवल्या गेलेल्या रुग्णांच्या/नातेवाईकांच्या विरूद्ध मिपावर युद्ध पुकारून तुम्हाला काय मिळतं? १ ट्क्का असो वा ९९ टक्के, अशा हरामखोर डॉक्टरांना हाकलून लावणं चांगल्या डॉक्टरांचं कर्तव्य नाही काय? आपापल्या व्यवसायात नाव कमवण्यासाठी फक्त डॉक्टरच नाही, यच्चयावत सगळ्यांनाच ढोरमेहनत करावी लागते. डॉक्टर जी मेहनत करतात ती रुग्णांचे प्राण वाचावे त्यांचे रोग बरे व्हावे म्हणून. त्यांच्या मेहनतीचं, खर्चाचं, घालवलेल्या वर्षांचं, त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाचं, हल्ल्यांचं भांडवल करून कुणाही नडलेल्या, अज्ञानी रुग्णाला लुबाडण्याचा परवाना मिळतो काय? तुमच्या ज्ञानाला कुणी आव्हान देऊ शकत नाही म्हणून वाट्टेल तसे वागण्याचा परवाना मिळतो काय? मग कुणी काळजीने अथवा कशानेही तुम्हाला क्रॉस करण्याचा प्रयत्न केला तर इगो दुखावतो का? पैसे कितीही घ्या, पैशाचा आणि उपचाराच्या खात्रीचा काय संबंध? उपचार, निदान यांची खात्री वादातीत असावी. तरच ते शास्त्र म्हणवून घेण्याच्या लायकीचं ठरतं. अन्यथा 'आम्ही तुमच्या वर फक्त प्रयोग करतो' असं मान्य करून मोकळं व्हावे सगळ्या डॉक्टर्सनी. मग आमचे तेच शास्त्रीय, बाकीच्या भाकडकथा असं तुणंतुणं वाजवत फिरू नये. वैद्यकक्षेत्रात शं भ र टक्के पारदर्शकता पाहिजेच पाहिजे. देअर इज नो अदर वे अराउंड. (मी आजारी पडल्यावर अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांकडे जाऊ नये असे सुचवणार्‍यांना एक निरोप. कृपया वैद्यकक्षेत्रातले सगळे वाईट डॉक्टर हटवण्याची हिंमत आधी दाखवावी नंतर लोकांना सल्ले देत फिरावे.)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
राहणी
औषधोपचार
अर्थकारण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
28336 वाचन

💬 प्रतिसाद (130)

प्रतिक्रिया

भयानक...

क्लिंटन
Tue, 05/05/2015 - 20:54 नवीन
भयानक...
  • Log in or register to post comments

इथे येऊन लिहीण्यापलीकडे आपण

सूड
Tue, 05/05/2015 - 21:09 नवीन
इथे येऊन लिहीण्यापलीकडे आपण काही करु शकतो का? मी तरी काही करु शकत नाही. त्यामुळे आहे हे असं आहे!! चालवून घ्यायचं.
  • Log in or register to post comments

करू शकतो.

संदीप डांगे
Wed, 05/06/2015 - 00:15 नवीन
माझ्यामते, आपण फसवणार्‍या डॉक्टरांपेक्षा जास्त शहाणे होऊ शकतो. असे अनुभव नियमीत वाचनात येत राहिले तर किमान तसाच प्रसंग कुणासोबत दुर्दैवाने घडत असेल तर रुग्ण्/नातेवाईक जास्त सतर्क आणि जागरूक राहू शकतात. शेवटी कुठल्याही प्रकारच्या फसवणुकीविरूद्ध जनजागृती आणि लोकशिक्षण हीच प्रभावी आयुधे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

नक्कीच...

ब़जरबट्टू
Wed, 05/06/2015 - 16:50 नवीन
असे अनुभवच जणजागरण करतात.. सध्या डॉक्टरांवर खरच विश्वास नाहिये.. अगदी ताजा किस्सा.. बायडिला गळ्यात दुखते म्हणून जवळच्या डाक्टरला दाखवला.. त्याने पि.चिं. मधील नामवंत (?) हास्पिटलच्या अजुन एका नामजंत डाक्टरला दाखवायला सांगितले.. भेटलो तर पोर वाटत होता तो.. २ मिनिटात आजच अडमिट करा असा फरमार्न आला..शंका आली, म्हटंले आज शक्य नाही, २ दिवस वाट बघतो, त्याहिशोबाने द्या औषधे.. खुप पटवायचा प्रयत्न केला त्याने.. लिहून घेतले, आम्ही जवाबदार नाही म्हणून. आपली तर मग टरकली.. म्हंटले, हो बाई अडमिट, बायडी नाही म्हंजे नाहीच.. त्याने घाबरवत दिले प्रिस्क्रिपशन.. पण एकच चुक केली.. काय झाले हे पण लिहीले.. झाले, आमचा गुगुलु अवतार सुरु झाला.. वाचले, तर लय पाणचट आजार.. फक्त बेड रेस्ट घ्यायची होती.. जबरदस्ती आराम घ्यायला लावला... २ दिवसात टुनटुनित... :) तिस-या दिवशी बायडीने.. हास्पिटलचा खर्च वाचवला, म्हणत वाचलेले सगळे पैसे खरेदीत उडवले (स्वता:च्या हो) .. :( आता खरच वाटते, डाक्टरांची पत खाली जातेय..हास्पिटलचे प्रचंड प्रेशर असते, जास्तीत जास्त मार्गाने पैसा काढायचा..नविन डाक्टरला पण उपाय नसेल... सेकंड ओपीनियन ईज मस्ट म्हणतो मी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

Expose them

damn
Wed, 05/06/2015 - 00:37 नवीन
अशी कृत्ये करणाऱ्या ड़ॉक्टराना उघडे पाडा. ईथे काही लोकांनी आपले ऎसे फंसवणुकीचे अनुभव डॉक्टरांचे नाव न लिहिता लिहिले आहेत. त्यांनी अशा डॉक्टरांचे, त्यांच्या क्लीनिक किंवा हॉस्पिटलचे नाव लिहून त्यांना उघाड़े पाडावे म्हणजे यापुढे कमिटी कमी मिपाकर तरी अशा कसायानकडून कापाली जाणार नाहीत. मोबाइल वरुन लिहित असल्यामुळे शुद्धलेखन पारच गंडलय. तेवढे संभाळून घ्या. संभालूंअंषुद्धवासविचेजन्नन्नीप्रतिस्ठारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अशी कृत्ये करणाऱ्या ड़ॉक्टराना उघडे पाडा.

धर्मराजमुटके
Wed, 05/06/2015 - 17:36 नवीन
भीक नको पण कुत्रा आवरा एवढेच या प्रतिसादावर म्हणू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: damn

वैदयक क्षेत्रातल्या नीतिमत्तेच्या नियमांबद्धल जागृती

सुधीर
Tue, 05/05/2015 - 21:51 नवीन
डॉक्टर आणि रुग्ण यांचं नातं प्रामाणिकपणाचं, विश्वासाचं असतं. तरीही नीतिमत्ता सर्वच डॉक्टर्स पाळत असतील याची खात्री देता येत नाही हे ही तितकेच खरे असावे असे अनुभवांवरून वाटते. वैद्यक शास्त्रातले फारसं ज्ञानही नाही आणि अनुभवही (सुदैवाने) फार तोकडे आहेत त्यामुळे काय चुकीचं काय बरोबर ते अधिकारवाणीने सांगता यायचे नाही. आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत नीतिमत्तेचे सर्वसाधारण नियम असतात. त्याची वर्गवारी, यादी, नवीनीकरण बर्‍याच संस्थां करत असतात. कदाचित तशाच स्वरुपाची नियमावली वैद्यक क्षेत्रात असायला हवी (किंवा असेलही. ethics standards and code of conduct for medical) त्याबद्धल डॉक्टर्स आणि रुग्णांमध्येही जनजागृती व्हायला हवी. हा एक मार्ग असू शकतो असे मला वाटते. जसे जर डॉक्टर्स एमुक एक औषध (ब्रँड) वा अमुक एका हॉस्पिटलचाच आग्रह धरत असतील वा खर्चिक उपाय सुचवत असतील तर त्यांनी त्यात त्यांचा आर्थिक फायदा (वा भेटवस्तू वा अन्य स्वरूपातला फायदा) आहे वा नाही याची माहिती रुग्णांना दिली पाहिजे. शेवटी डॉक्टरांपरत्वे उपचार पद्धती बदलू शकते (independent judgment) त्यामुळे महागडा उपाय सुचविणार्‍या डॉक्टरांना सरसकट बोल लावण्यात अर्थ नाही असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

शेवटी डॉक्टरांपरत्वे उपचार

संदीप डांगे
Wed, 05/06/2015 - 00:06 नवीन
शेवटी डॉक्टरांपरत्वे उपचार पद्धती बदलू शकते (independent judgment) त्यामुळे महागडा उपाय सुचविणार्‍या डॉक्टरांना सरसकट बोल लावण्यात अर्थ नाही असे मला वाटते.
हे जरा वादग्रस्त विधान होऊ शकते. डॉक्टरांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी रुग्णांच्या अनावश्यक शस्त्रक्रिया होत असतील तर ते बरोबरच आहे असा अर्थ निघतो आहे. डॉक्टरांचे independent judgment हा ही एक घातक प्रकार आहे. एकिकडे आपलं ज्ञान, अनुभव शेकडो प्रयोगांवर आधारित आहे असे म्हणायचे आणि 'मला त्यावेळी तसे करणे योग्य आहे असे वाटले' असा ज्योतिषीछाप बचाव करायचा हे जरा विसंगत आहे. 'एकाच रोग्याच्या एकाच रोग-अवस्थेचे एकच निदान पण उपचारपद्धती दोन, त्यात एक फुकट दुसरी महाखर्चिक' या परिस्थितीची पाठराखण शास्त्रीय, प्रयोगसिद्ध असा अहंकार बाळगणार्‍या मॉडर्न मेडीसीनने करावी आणि इतरांना क्वॅक्स म्हणावे यात काहीच चुकीचे वाटत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

वाईट.

रेवती
Tue, 05/05/2015 - 23:53 नवीन
वाईट. असे प्रसंग कोणावर येऊ नयेत.
  • Log in or register to post comments

मला हे सगळं डेजा-वू सारखं का

काळा पहाड
Wed, 05/06/2015 - 00:04 नवीन
मला हे सगळं डेजा-वू सारखं का वाटतंय? ही चर्चा आधीच झालीय आणि त्या धाग्यावर डॉक्टर लोकांनी ज्या प्रकारे हल्ले केले होते तसे तर राजकारणीसुद्धा करत नाहीत. त्या आधीच्या धाग्यावर एका सुशिक्षित डॉक्टरांकडून मला परवडत नसेल तर ससून ला जा असा सल्ला मिळाला होता (थोडक्यात, परवडत नसेल तर खड्ड्यात जा अशा टोनमध्ये). तेव्हा अव्वाच्या सव्वा पैसे लुबाडणारे डॉक्टर आणि पेशंट बरा झाला नाही तर तोडफोड करणारे पेशंटचे नातेवाईक आपापसात पाहून घेतील. या बाबतीत मी २ सूचना केल्या होत्या. त्या अजूनही खर्‍या आहेत असं मी मानतो. १. प्रचंड प्रमाणात डॉक्टर्स ची पैदास करा (म्हणजे काँपिटिशन वाढेल) २. सवलतीतलं शिक्षण फक्त सरकारी काम करणार्‍या डॉक्टरांना द्या (खाजगी प्रॅक्टीस केली तर परवाना रद्द). खाजगी प्रॅक्टीस करणार्‍यांना विना-अनुदानीत फी भरू दे.
  • Log in or register to post comments

आप बिल्कुल सही है सर.. ये

संदीप डांगे
Wed, 05/06/2015 - 00:11 नवीन
आप बिल्कुल सही है सर.. ये देजा-वू ही है. त्या सुशिक्षित डॉक्टरांच्या सगळ्या अभिजात आणि उत्तुंग विचारी प्रतिसादांवरच हा लेख आधारित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

खूप वाईट

पैसा
Wed, 05/06/2015 - 09:18 नवीन
तुमच्यावर खूप वाईट प्रसंग आले. अए कोणावर येऊ नयेत. इथल्या चर्चेत मला कळलेल्या आणि पटलेल्या गोष्टी डॉक्टर्स चांगले असतात तसे वाईट असतात. पेशंटही सर्व प्रकारचे असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती. म्हणून कोणीच कोणाला सरसकट झोडपू नये. सरकारी हॉस्पिटल्सचा अनुभव डायग्नोसिस, खर्च इ. बाबतीत खूप चांगला आहे मात्र ओपीडीला खूप वेळ थांबावे लागते. तिथेही उडदामाजी काळेगोरे आहेच. शिक्षकांना मेडिकल रिएम्बर्समेंट मिळते म्हणून माझ्या आईच्या कॅन्सरच्या ऑपरेशनच्या बिलावर सही करण्यासाठी १०% मागणारे सिव्हिल सर्जन याची देही याची डोळा पाहिले आहेत. मग आईने ते बिल पुढे पाठवले नाही. आणि तो डॉक्टर असला तरी सरकारी नोकर आहे असे म्हणून प्रकरण सोडून दिले. त्याचवेळी तिच्यावर ऑपरेशन करणारे सर्जन देवमाणूस होते हे नमूद करणेही आवश्यक आहे. तात्पर्य काय, अशा चर्चांमधे आपण कधीही कोणतेही ठाम निष्कर्ष काढू शकणार नाही! मात्र एकूणच आरोग्याबद्दल जनजागृती अत्यंत आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments

माझ्या आईच्या कॅन्सरच्या

काळा पहाड
Wed, 05/06/2015 - 10:48 नवीन
माझ्या आईच्या कॅन्सरच्या ऑपरेशनच्या बिलावर सही करण्यासाठी १०% मागणारे सिव्हिल सर्जन याची देही याची डोळा पाहिले आहेत.
त्याचवेळी तिच्यावर ऑपरेशन करणारे सर्जन देवमाणूस होते हे नमूद करणेही आवश्यक आहे.
हे कसं काय ब्वॉ? लास्ट टाईम मी चेक केलं तेव्हा देव लाच घेत नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ऑपरेशन करणारे सर्जन आणि

मृत्युन्जय
Wed, 05/06/2015 - 10:54 नवीन
ऑपरेशन करणारे सर्जन आणि बिलावर सही करणारे सिव्हिल सर्जन हे दोन वेगवेगळे असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

अच्छा अच्छा. आय माय स्वारी.

काळा पहाड
Wed, 05/06/2015 - 11:09 नवीन
अच्छा अच्छा. आय माय स्वारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

@ संदीप डांगे - माझे तुमच्या

प्रसाद१९७१
Wed, 05/06/2015 - 10:34 नवीन
@ संदीप डांगे - माझे तुमच्या साठी ३ प्रश्न. उत्तर दिले नाहीत तरी चालेल पण स्वताच्या मनाशी विचार करा. १. हे असे वाईट अनुभव आणि ते सुद्धा इतक्या जास्त संख्येने तुम्हालाच कसे आले? मी बरीच आजारपणे बघितली आहेत वडीलांची आणि मेव्हण्याचे अपघात मुळे. पण फक्त १ वेळा आर्थोपिडीक हॉस्पिटल चा अनुभव वाईट आला आणि एकदा आयसीयु मधला. पण ते प्रमाण ३-४ टक्के असेल. बाकी जवळ जवळ सर्व वेळेला डॉक्टरांचा अनुभव चांगला आला. कोणी लुटले असे पण वाटले नाही. वडलांच्या पायाच्या अँप्युटेशन ( गुढग्याच्या खाली ) चे सर्जन नी फक्त ६००० रुपये लावले ( २००७ साली ). तेंव्हा मलाच लाज वाटली. बिचारा अ‍ॅक्टीव्हा वरुन भर दुपारी आला, ३ तास ऑपरेशन केले आणि निघुन गेला. अनेक वेळेला डॉक्टरांनी, उगाच पैसे खर्च करु नका हा मोलाचा सल्ला दिला आहे. तुमच्या साठी प्रश्न - असे सातत्यानी अनुभव तुम्हालाच येण्याचे कारण तुम्ही शोधुन बघता का? तुम्हाला डॉक्टर बद्दल काही अंदाज येत नाही का? तुम्ही नातेवाईक, मित्रमंडळी यांना विचारुन डॉक्टर कडे जात नाही का? २. एकुणच तुम्हाला डॉक्टर मंडळींचा अनुभव चांगला दिसत नाही. मग डॉक्टर कडे जाणे बंद का करत नाही तुम्ही. तसेही तुम्ही डॉक्टर कडे गेलात की तुम्हाला डॉक्टर लुटणार्/कापणार हे नक्कीच आहे. मग डॉक्टर कडे जाणे बंद करा. ३. असेच लेख तुम्ही बिल्डर, क्लास चालवणारे शिक्षक, नगरसेवक, किंवा तुमच्या स्वताबद्दल कधी लिहीणार?
  • Log in or register to post comments

काहीही ?

नेत्रेश
Wed, 05/06/2015 - 10:56 नवीन
डॉक्टरकडे जाणे बंद करा सांगणे सोपे आहे, पण पर्याय काय? पोलिसांचा वाईट अनुभव आला म्हणुन कुणाला कायदा हातात घेता येत नाही. तसेच डॉक्टरचा वाईट अनुभव आला म्हणुन स्वतःला औषधे प्रिस्क्राईब करता येत नाहीत. इथे कायद्याने त्यांना मोनोपॉली दीली आहे. सर्जरीची पदवी नसताना सर्जरी करणे गुन्हा आहे याची आपल्याला कल्पना असेलच. असे असताना पर्याय न सुचवता डॉक्टरकडे जाणे बंद करा सांगणे पोरकटपणाचे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

बाकीच्या २ प्रश्नांची उत्तरे

प्रसाद१९७१
Wed, 05/06/2015 - 10:58 नवीन
बाकीच्या २ प्रश्नांची उत्तरे द्या की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

बाकी प्रश्न

नेत्रेश
Wed, 05/06/2015 - 11:16 नवीन
बाकीचे प्रश्न तर उल्लेख कराच्याही योग्यतेचे नाहीत हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

१. तुम्हाला २ वाईट अनुभव आले.

मृत्युन्जय
Wed, 05/06/2015 - 11:07 नवीन
१. तुम्हाला २ वाईट अनुभव आले. त्यांना ६ आले. तरी एकुण तुमच्यापेक्षा प्रचड जास्त नाहित. असे अनुभव इतक्या संख्येने तुम्हालाच का आले हे म्हणजे २ वेळा पाकीट मारले गेलेल्या माणसाला कधीच पाकीट मारले गेले नसलेल्या माणसाने तुझेच पाकीट कसे काय रे हरवते अस्से विचारण्यासारखे झाले. किंवा एखाद्या विनयभंग झालेल्या मुलीला संस्कृतीरक्षकांनी तुझाच कसा काय ग विनयभंग झाला. आम्हीही कॉलेजात जातो आमचा नाही झाला कधी ते असे विचारण्यासारखे आहे. २. कालच आजोबाचा धागा वाचला. पाणी मिळाले नाही तेव्हा लेखकाने म्हशींना उठवुन डबक्यातले पाणी प्यायले. ते खराब असणार हे जाणूनही त्यांनी प्यायले. त्यांचा नाइलाज असणार. डॉक्टरांच्या बाबतीतही थोडेफार तसेच होते. अर्थात बरेच डॉक्टर चांगलेच असतात. इथेच कित्येकांनी चांगल्या डॉक्टरांची उदाहरणे दिलीच आहेत. मलाही डॉक्टरांचे बरेच चांगले अनुभव आहेतच. तसेच वाईट डॉक्टरही असतात हे काही डॉक्टरांना मान्य करायचे नसते म्हणुन कदाचित डांग्यांनी हा धागा काढला असावा. अवांतरः कधीकधी चांगले डॉक्टर सुद्धा चुकीचे वागतात. सध्या त्याचाही अनुभव घेतो आहे. पण ती वन ऑफ केस म्हणून सोडुन दिली. ३. माणूस बिल्डर कडे रोज रोज जात नाही. साधारण आयुष्यात एका किंवा दोने बिल्डरचाच अनुभव येतो. १०० पैक्की ९९ लोकांना तो वाईटच येतो. पण अजुन बिल्डरवर तसा धागा आला नसल्याने आणि कुठला बिल्डर वस्सकन इतरांच्या अंगावर धाउन गेला नसल्याने आणि सगळे बिल्डर सज्जनच असतात आमचे ग्राहकच एक एक नमुने येतात असे म्हणाला नसल्याने इतक्या धाग्यांची गरज पडली नसावी. दुसरी गोष्ट अशी की बिल्डर, क्लासवाले, नगरसेवक यांच्यामुळे कधीकधी मनस्ताप होतो पण शारीरिक नुकसान अथवा हानी होत नाही. शिवाय या सगळ्यांच्या कामामधले सगळे सगळ्यांना माहिती असते असे सगळ्यांना वाटत असते पण डॉक्टरच्या बाबत तसे नसल्याने फसवले गेल्यास फसवणूक जास्त जिव्हारी लागते. असो. या विषयावर खुप लिहिले गेले आहे. अजुन कशाला उगाच त्रास करुन घ्यायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

तुम्हाला २ वाईट अनुभव आले.

प्रसाद१९७१
Wed, 05/06/2015 - 11:11 नवीन
तुम्हाला २ वाईट अनुभव आले.
मला ५० मधले २ वाईट अनुभव आले. संदीप डांग्यांना सगळेच डॉक्टर कापतात्/लुटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

डांगे त्यांच्यासाठी आणि

मृत्युन्जय
Wed, 05/06/2015 - 11:25 नवीन
डांगे त्यांच्यासाठी आणि नातेवाईकांसाठी मिळुन केवळ ७ वेळा दवाखान्यात गेले असे म्हणणे आहे का तुमचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

बिल्डर, नगरसेवक आणि

काळा पहाड
Wed, 05/06/2015 - 11:16 नवीन
बिल्डर, नगरसेवक आणि राजकारण्यांना तर इकडे तिकडे बघून कोण बघत नसेल तर संपवून टाकावं असा मतप्रवाह आहे. डॉक्टरांसाठी (ते बहुतांशी चांगले असल्याकारणानेच!) असं टोकाचं मत नाहीये. पण वकील आणि पोलिसांची पायरी चढू नये अशी एक म्हण आहे, त्यात हॉस्पिटलांचं नाव घातलं तर ते डॉक्टर समाजाला फारसं अभिमानाचं ठरणार नाही. बाकीच्या दोघांना समाज कशा प्रकारे टाळतो ते पाहिलं तर डॉक्टर आले तर पळापळ होणं थोडंसं विचित्र दिसेल ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

@प्रसाद१९७१

संदीप डांगे
Wed, 05/06/2015 - 17:33 नवीन
@प्रसाद१९७१ कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मीच एक साधा प्रश्न विचारतो तुम्हाला: काहीही प्रतिसाद देण्याआधी तुम्ही निदान लेख काळजीपुर्वक वाचण्याचे कष्ट घेता का? असे सातत्यानी अनुभव तुम्हालाच येण्याचे कारण तुम्ही शोधुन बघता का? >> हो. मी निवडून निवडून मला कोण जास्त कापेल, माझ्यावर चुकीचे उपचार करेल अशाच डॉक्टर्स कडे जातो. तुम्हाला डॉक्टर बद्दल काही अंदाज येत नाही का? >> नाही ना. तुम्हाला काही टेक्निक, विद्या, सिद्धी माहित असेल तर मलाही सांगा. तुम्ही नातेवाईक, मित्रमंडळी यांना विचारुन डॉक्टर कडे जात नाही का? >> नाही. ते नेहमी मला चांगल्या डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देतात. मला तसे अजिबात नकोय. देव करो, तुमच्या १०० अनुभवांमधला एकच अनुभव (डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे, लोभामुळे) आयुष्यातून उठवणारा नसो. तुमचे, तुमच्या सगळ्या नातेवाईक मित्रांचे मी खरोखर मनापासून या बाबती अभिष्ट चिंततो. यात कुठलाही सॅरकॅजम नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

मग डॉक्टर कडे जाणे बंद करा.

काळा पहाड
Wed, 05/06/2015 - 10:58 नवीन
मग डॉक्टर कडे जाणे बंद करा.
असेच लेख तुम्ही बिल्डर, क्लास चालवणारे शिक्षक, नगरसेवक, किंवा तुमच्या स्वताबद्दल कधी लिहीणार?
असले चंपक प्रतिसाद वाचल्यानंतर तुम्ही डॉक्टर नसाल अशी आशा करतो.
  • Log in or register to post comments

+१

नेत्रेश
Wed, 05/06/2015 - 11:17 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

+२

ब़जरबट्टू
Wed, 05/06/2015 - 17:12 नवीन
असले चंपक प्रतिसाद वाचल्यानंतर तुम्ही डॉक्टर नसाल अशी आशा करतो. अगदी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

सही बोले मुनिवर... :)

संदीप डांगे
Wed, 05/06/2015 - 18:22 नवीन
सही बोले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

डॉक्टर फीमुळे बुडतो २० हजार कोटींचा कर - वर्तमानपत्रातील लेख

नेत्रेश
Wed, 05/06/2015 - 11:21 नवीन
मिपाच्या महान परंपरेला जागुन, विषयाशी संबंधीत नसलेला लेख
  • Log in or register to post comments

हे आत्तापर्यंत लक्षातच आलं

काळा पहाड
Wed, 05/06/2015 - 11:36 नवीन
हे आत्तापर्यंत लक्षातच आलं नव्हतं. मी पण डॉक्टर साहेबांना पैशे देवून निघायचो. बाकी त्यांची फी कमी असल्यानं पावती मागणं सुद्धा विचित्रच दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

हाफशेंच्युरी निमीत्त तमाम

जेपी
Wed, 05/06/2015 - 11:31 नवीन
हाफशेंच्युरी निमीत्त तमाम लोकांचा सत्कार एक एक पेनकिलर आणी एक एक किलो उडीद दाळ* देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक -जेपी आणी तमाम पॅनिक कार्यकर्ते. *अटी लागु
  • Log in or register to post comments

उडीद दाळ*

अत्रन्गि पाउस
Wed, 05/06/2015 - 19:28 नवीन
??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

उडदामाजी काळेगोरे,काय निवडावे

जेपी
Wed, 05/06/2015 - 20:01 नवीन
उडदामाजी काळेगोरे,काय निवडावे निवडणारे.. प्रत्येक व्यवसायात चांगले वाईट लोक असतात..निवडणे आपल्या हातात आहे.. (गोरा)जेपी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

qikwell किंवा Practo

शब्दबम्बाळ
Wed, 05/06/2015 - 19:13 नवीन
qikwell किंवा Practo App कोणी वापरलं आहे का? याचा थोडाफार फायदा होऊ शकतो ना?
  • Log in or register to post comments

डांगेसाहेब

आजानुकर्ण
Wed, 05/06/2015 - 19:21 नवीन
डांगेसाहेब, तुमचे अनुभव हे प्रातिनिधिक आहेत. कुठल्याही दवाखान्यात, किंवा हॉस्पिटलात पाहिले तर हे आणि याच स्वरुपाचे अनुभव येतात. असेच अनुभव मलाही आले आहेत. वाईट डॉक्टर भेटले तसे चांगले डॉक्टरही भेटले आहे. कितीदा तेच तेच लिहीत बसणार. मूळ मुद्दा किती डॉक्टर चांगले आणि किती वाईट असा नाही. एखादाच वाईट डॉक्टर भेटला तर त्याचा फटका आयुष्यभरासाठी कायमचा बसतो. दवाखान्यात किंवा हॉस्पिटलात जायचे म्हटल्यावर पैसे मोजूनही खात्रीशीर, प्रामाणिक सेवा मिळेल की नाही याबाबत आजकाल मनात नेहमी शंका येते. सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन, फोर्थ ओपिनियन आणि अनेकानेक चाचण्या करुनही आजकाल अनेक डॉक्टरांना रोगाचे नेमके निदान करता येत नाही. त्यामुळे बाजारात बसणारे वैदू (आयुर्वेदिक) आणि वैद्यकपदवी घेऊन रुग्णावर प्रयोग करत दवाखान्यात बसणारे डॉक्टर यांच्यात डावेउजवे कोण हा प्रश्न पडावा हे एक दुर्दैवच आहे. शिवाय नेमके निदान करता आले न आले तरी व्यावसायिक हितसंबंध जपण्यासाठी समोर आलेला रुग्ण ही एक संधी आहे असे मानून त्याप्रमाणे वागणे हाही एक नॉर्म झाला आहे. उपचारांचा आर्थिक पैलू हा वेगळा भाग झाला. विमा वगैरे काढून आर्थिक अडचण सोडवता येऊ शकते. मात्र नैतिक जबाबदारी न पाळणाऱ्या डॉक्टरांचे काय करायचे यासाठी सोपे उत्तर उपलब्ध नाही.
  • Log in or register to post comments

उत्तम प्रतिसाद.

एस
Wed, 05/06/2015 - 22:58 नवीन
उत्तम प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

+१

सूड
Wed, 05/06/2015 - 23:00 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

सही रे कर्णा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 05/08/2015 - 13:57 नवीन
मुद्दा किती डॉक्टर चांगले आणि किती वाईट असा नाही. एखादाच वाईट डॉक्टर भेटला तर त्याचा फटका आयुष्यभरासाठी कायमचा बसतो. अगदी बरोबर -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

एक लक्षात येतंय का?

स्वधर्म
गुरुवार, 05/07/2015 - 12:38 नवीन
या धाग्यावर फक्त एकदोघांशिवाय इतर कोणीच डाॅक्टर फिरकलेले नाहीत. तसे तर ते अनेक धाग्यांवर (वैद्यकीय नसलेल्यासुध्दा) भरपूर प्रतिक्रीया देत असतात.
  • Log in or register to post comments

या धाग्यावर फक्त एकदोघांशिवाय

सूड
गुरुवार, 05/07/2015 - 14:46 नवीन
या धाग्यावर फक्त एकदोघांशिवाय इतर कोणीच डाॅक्टर फिरकलेले नाहीत. तसे तर ते अनेक धाग्यांवर (वैद्यकीय नसलेल्यासुध्दा) भरपूर प्रतिक्रीया देत असतात.
असंच असेल तर तुम्ही पण शांततेत चाललेल्या धाग्यांवर प्रतिक्रिया देताना दिसत नाही, अशा ठिकाणी बरे टपकता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

जिथे अापल्याला काही स्पष्ट मत अाहे

स्वधर्म
Fri, 05/08/2015 - 12:45 नवीन
अशा ठिकाणी जरूर टपकतो. न पेक्षा प्रत्येक धाग्यावर टपकलंच पाहिजे, असं माझं मत नाही. रच्च्याकने, तुंम्ही डाॅ. अाहात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आपणास मुद्दा कळलेला नाही...

सूड
Fri, 05/08/2015 - 14:16 नवीन
आपणास मुद्दा कळलेला नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

_/\_

बॅटमॅन
Fri, 05/08/2015 - 15:36 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

भयानक आहे हे सगळ. अशा

रातराणी
Sat, 05/09/2015 - 02:10 नवीन
भयानक आहे हे सगळ. अशा डॉक्टर्सचे परवाने रद्द करून दवाखान्याला टाळं ठोकल पहिजे.
  • Log in or register to post comments

शेवटी यात कॉम्प्युटर्स

काळा पहाड
Sat, 05/09/2015 - 23:07 नवीन
शेवटी यात कॉम्प्युटर्स द्वारेच मार्ग शोधला पाहिजे. एक असं मशीन बनवता यायला हवं जे मानवी शरीराच्या सर्व टेस्ट्स करेल, एक किंवा अनेक रोग डिटेक्ट करेल, जरूर त्या सर्जरी करण्याचा निर्णय घेवून त्या सर्व अत्यंत काटेकोर पणे (उदाहरणार्थ लेझर चा वापर करून) करेल आणि रुग्णाच्या खिशात जरूर ती औषधं सरकावून त्याच्यासाठी टॅक्सी पण ऑर्डर करेल. अर्थात ही कल्पना जुनी आहे पण नुकत्याच एका विज्ञान-काल्पनिक सिनेमात असंच एक मशीन पाहिलं होतं. याच्यासाठी डिटेक्शन टेक्निक्स मध्ये संशोधन व्हायला हवं. ज्या टेस्ट्स सध्या ज्यास्त वेळ घेतात त्यांचं संशोधन करणं गरजेचं आहे. रोबोट्स सध्या अ‍ॅडव्हान्स अवस्थेत आहेतच पण मानवी शरीरावर संपूर्णपणे स्वतंत्ररित्या काम करण्यासाठी वेळ लागेल. हे कदाचित आत्ता होणार नाही पण वीस वर्षात होईल अशी आशा बाळगायला काय हरकत आहे? शेवटी ह्यूमन जीनोम मॅपिंग सारखे महत्वाकांक्षी प्रकल्प तर प्रगतीपथावर आहेतच.
  • Log in or register to post comments

इडिओक्रसी- आपला ऑलटाईम फेवरेट

संदीप डांगे
Sun, 05/10/2015 - 05:28 नवीन
इडिओक्रसी- आपला ऑलटाईम फेवरेट पिच्चर... त्यात आहे असे मशिन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

Doesn't matter how much

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 05/10/2015 - 10:26 नवीन
Doesn't matter how much robotics and relevant technologies gets advanced....it will always lack one thing....Human judgement.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

ते पूर्वीचे डॉक्टर करायचे..

काळा पहाड
Sun, 05/10/2015 - 17:15 नवीन
ते पूर्वीचे डॉक्टर करायचे.. ज्यांना निदान करण्यासाठी सगळ्या टेस्ट करायला लागायच्या नाहीत. आत्ताचे डॉक्टर रिस्क घेत नाहीत. सगळ्या टेस्ट करून मग लोएस्ट कॉमन डिनॉमिनेटर (ल.सा.वि.) शोधल्यासारखा रोग कुठला आहे हे शोधत जातात. त्यासाठी डॉक्टरच कशाला हवेत? एखादा अल्गॉरिदम तो त्यापेक्षा वेगाने शोधेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

+१०००००

संदीप डांगे
Sun, 05/10/2015 - 17:19 नवीन
आमचा फॅमिली फिजीशीयन हेच म्हणाला होता. नवे डॉक्टर्स मशीनी रीपोर्टवर अवलंबून सेफ गेम खेळतात. त्यांच्यासाठी असलेला सेफ गेम रुग्णासाठी डेथ रेस असू शकतो. हे माझे नाही फॅमडॉकचे मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

मशिन रिपोर्ट वर अवलंबुन

कानडाऊ योगेशु
Sun, 05/10/2015 - 17:27 नवीन
मशिन रिपोर्ट वर अवलंबुन राहण्याच्या बाबतीत बहुदा डॉक्टर मंडळींचाही नाईलाज होत असावा. एवीतेवी डॉक्टरांना आधीच्या काळात मिळत असलेला आदर वगैरे आजच्या काळात तितकासा उरलेला नाही व इतर व्यावसियिकाप्रमाणेच डॉक्टरही एक व्यावसायिक आहे हा ही विचार प्रबळ झालेला आहेच.तेव्हा उद्या पेशंटचे काही बरेवाईट झाले तर हाताशी असलेल्या टेस्ट रिपोर्ट डॉक्टरांच्या कामाला येत असु शकतील. जर केवळ इंस्टीक्ट वर डॉक्टरने काही निर्णय घेतला व नंतर तो अंगाशी आला तर पेशंट संबंधित मंडळीच अमुक तमुक टेस्ट का केल्या नाहीत असे म्हणु शकतात. तो जस्ट फॉर प्रिकॉशन डॉक्टर मंडळी तो मार्ग अवलंबित असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा