प्रिंटरवर छापलेल्या विमानातून प्रवास करायला तयार व्हा !

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
15 Feb 2015 - 1:12 am

डोळे चोळू नका. तुमचे डोळे ठीक आहेत... आणि इथे टंकनचूकही झालेली नाही !

तंत्रज्ञांनी विमानाचे इंजिन "छापण्याचे" तंत्र विकसित केले आहे आणि जवळच्या भविष्यात तुम्ही त्या तंत्राने बनवलेले इंजिन आणि इतर भाग वापरून बनवलेल्या विमानातून प्रवास करू शकाल !

.

त्रिमिती छपाई (3D printing) अथवा संयोगी वस्तुनिर्माण (Additive Manufacturing, AM)

तसे बघितले तर 3D छपाई ही काही नवीनं गोष्ट नाही. हे तंत्र १९८० मध्ये नागोया मुनिसिपल इंडस्ट्रियल रिसर्च इंस्टिट्यूट (जपान) मधील हिदेओ कोदामा या तंत्रज्ञाने विकसित केले. त्याने संगणक आणि इंकजेट प्रिंटर तंत्रज्ञान वापरून बनवलेल्या खास रोबोच्या साहाय्याने प्रकाश पडल्यावर घन/कडक बनणाऱ्या पॉलिमरचे अनेक थर एकमेकावर रचून मूळ त्रिमिती वस्तू निर्माण केल्या. आज हे तंत्र खूपच विकसित झाले आहे आणि पॉलिमर बरोबर एकाच वेळेस प्लास्टिक, धातू, इ अनेक पदार्थ वापरून अत्यंत किचकट जडणघडण असलेल्या वस्तू बनवता येतात.

ग्राहक उत्पादने, वाहन उत्पादने, अनेक उद्योगधंद्यात वापरली जाणारी यंत्रे; तसेच शिक्षण, ऊर्जा, जल, आर्किटेक्चर, वैद्यकीय, इ अनेक उद्योगांना पुरवठा केल्या जाणार्‍या आधुनिक यंत्रप्रणाल्या बनविण्यासाठी या तंत्राचा अधिकाधिक वापर होत आहे.

या तंत्रामध्ये प्रथम जी वस्तू छापायची आहे तिचे संगणक प्रणाली (CAD) आणि 3D स्कॅनर वापरून एक संगणकीय प्रारूप (Computer model) बनवले जाते.


संगणकीय प्रारुपाचे एक उदाहरण (Computer model)

नंतर ते प्रारूप वापरून छपाई-रोबो मूळ वस्तूप्रमाणे आपल्याला हवा असलेला पदार्थ (पॉलिमर, प्लास्टिक, धातू, इ) वापरून तिची हुबेहूब प्रतिकृती बनवतो.

.

3D छपाई करणार्‍या रोबोंचे काही नमुने

 ......

.

 ......

.

 ......

.

3D छपाई करून बनवलेल्या काही वस्तू

 ......

.

 ......

.

 ......

.

 ......

.

 ......

.

 ......

.

3D छपाई आणि विमान उद्योग

इतकी प्रगती झाल्यावर या तंत्रज्ञानाने विमानबांधणीसारख्या टोकाच्या उच्च तकनिकी उद्योगाचेही लक्ष वेधून घेतले आहे.

नोव्हेंबर २०१३ मध्ये झालेल्या "दुबई एअर शो" या जगप्रसिद्ध विमान उद्योग प्रदर्शनात GE Aviation ने दुबईच्या Emirates या विमानकंपनीबरोबर केलेल्या कराराने त्या उद्योगात खळबळ माजली. या विक्रमी कराराप्रमाणे तब्बल ११०० कोटी अमेरिकन डॉलर्स मोजून ३०० GE9X प्रकारची विमानाची इंजिने खरेदी केली जाणार आहेत आणि ती बोईंग कंपनीच्या १५० 777X प्रकारच्या विमानांत वापरली जाणार आहेत.

777X प्रकारची महाकाय विमाने ३५०-४०० प्रवासी घेऊन १५-१७००० किमी अंतर १५-१७ तासांत आणि एका दमात पार करू शकतात. अर्थातच अशी विमाने फायदेशीर होण्यासाठी त्यांची इंजिने मजबूत, अत्यंत अचूक बांधणीची, अत्यंत भरवशाची, देखभालीची कमीत कमी गरज असणारी, इंधन वाचवणारी आणि वजनाने हलकी असण्याची गरज असते.

या सर्व अटी पुर्‍या करण्यासाठी त्या इंजिनांच्या बांधणीस खास पदार्थ (मटेरियल्स) वापरण्याबरोबरच, त्यांच्या बांधणीची प्रक्रिया १००० डिग्री सेल्सियस तापमानाला धातू वितळवणार्‍या लेझर किरणांचा उपयोग (Direct Metal Laser Sintering) करणारे 3D छपाईतंत्र वापरून करण्याचे GE Aviation ने ठरवले आहे. यासाठी तिने मॉरीस टेक्नॉलोजीज ही या तंत्रज्ञानातील अग्रगण्य कंपनी खरेदी केली आहे. त्यामुळे इंजिनाचे बहुतेक सर्व सुटे भाग GE Aviation आता स्वतःच्याच मालकीच्या कारखान्यात बनवू शकेल.

या पद्धतीने बनविलेले पहिले इंजिन २०१६ मध्ये सर्वप्रथम Airbus A320neo, Boeing 737 MAX आणि Chinese COMAC C919 या विमानांत वापरले जाणार आहे. या प्रकारच्या ६००० विमानांचे साधारणपणे ६ कोटी उड्डाणतास पुरे होण्याच्या सुमारास हे नवीनं तंत्र 9X प्रकारच्या इंजिनांच्या उत्पादनात वापरले जाईल आणि Emirates ला या प्रकारचे पहिले 777X विमान २०२० साली मिळेल.

एकंदरीत हे नवीनं तंत्र विमान बांधणी आणि प्रवास उद्योगात क्रांतिकारक बदल घडवून आणेल असे दिसत आहे.


3D छपाई करून बनवलेला विमानाच्या जेट इंजिनाचा एक भाग

***
या लेखातील सर्व चित्रे जालावरील अनेक स्रोतांतून साभार घेतलेली आहेत.

***

तंत्रमाहिती

प्रतिक्रिया

३डी चपाई करुन बनवलेल्या वस्तू आणि पारंपारीक तंत्रज्ञान वापरुन बनवलेल्या वस्तू यामधे काय फरक आहे. उदा. उत्पादन खर्च, टीकाउपणा, बनवण्यासाठी लागणारा वेळ वगैरे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Feb 2015 - 9:03 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

वरती छायाचित्रांमधे विमानाचा भाग असं नावं लिहिलेला जो भाग आहे तो एक इंपेलर आहे. अश्या पद्धतीचा भाग मशिनींग ऑपरेशन्स नी बनवण्यासाठी काही तासांपासुन काही दिवसांपर्यंतचा वेळही लागु शकतो. तसचं फाईव्ह अ‍ॅक्सीस सी.एन.सी. मशिन्स चा वापर करावा लागतो. ह्या मशिनच्या अतिशय उच्च अ‍ॅक्युरसीच्या मशिन्स ची किंमत सुमारे ७२ लाख रुपयांपासुन सुरु होते. मझाक सारख्या मशिन्स ची किंमत तर चक्क १ कोटी १५ लाखं वगैरे एवढी प्रचंड असते. ह्या मशिन्स ची पर अवर रनिंग कॉस्ट, टुलिंग कॉस्ट ही अतिप्रचंड असते. ह्यामधल्या साध्या लाईव्ह टुलिंगची किंमत ५-५ लाखापासुन सुरु होते. अर्थातचं त्यामुळे उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणात असतो..तसचं लीड टाईमसुद्धा ३-डी पेक्षा जास्तं असतो.

टीकाउपणा हा काय बनवताय आणि कशापासुन बनवताय ह्याच्यावर अवलंबुन असतो. सद्द्य परिस्थितीमधे उपलब्ध असणार्‍या ३-डी प्रिंटरमधे धातु वापरण्यावर मर्यादा आहेत. अर्थातचं त्या भागासाठी लागणार्‍या हिट ट्रीटमेंट आणि हिट ट्रीटमेंटनंतर असणार्‍या फिनिशिंग ऑपरेशन्स वरती मर्यादा येतात. बाकी सवडीनी टंकीन.

यसवायजी's picture

15 Feb 2015 - 9:22 am | यसवायजी

सवड काढाच. मी Cnc commissioning engg असल्याने, ५ एक्सिस मशीन हा आवडीचा (आणि रोजच्या कामाचा) विषय आहे.
----
५ ax machining चा vdo इथे पाहता येईल.
http://youtu.be/CqePrbeAQoM

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Feb 2015 - 9:37 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

नक्की लिहिन. ५ अ‍ॅक्सीस मशिन= इंजिनिअरिंग वंडर

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Feb 2015 - 11:47 am | डॉ सुहास म्हात्रे

मॉरिस टेक्नॉलॉजिजच्या Direct Metal Laser Sintering तंत्रामध्ये १००० डिग्री सेल्सियसपर्यंत तापमान वापरून सर्व प्रकारचे धातू/मिश्रधातू वापरता येतात.

तसेच या तंत्रात धातूंचे अत्यंत लहान कण (पार्टीकल्स / पावडर) वापरून थरावर थर चढवत भाग (पार्ट्स) बनवले जात असल्याने अत्यंत महागडे धातू फुकट जाण्याचे (waste) प्रमाण नगण्य असते... आता प्रचारात असणार्‍या सर्वसाधारण प्रक्रियेत धातूचा तुकडा घासून (मिलिंग, टर्निंग, इ) भाग बनवताना लक्षणीय प्रमाणात महागडा धातू फुकट जातो.

त्यामुळे 3D छपाई प्रक्रिया वापरल्याने मोठ्या प्रमाणावर वेळ आणि पैश्याची बचत होणार आहे असे कंपनीचे म्हणणे आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Feb 2015 - 12:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पण बाकीच्या गोष्टींच काय? सिंटरिंग पोरोसिटीमुळे त्या विशिष्ट भागाची स्ट्रेंथ, स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन वगैरे गोष्टींचा सखोल अभ्यास झाल्याशिवाय ह्या गोष्टी थेट विमानासारख्या अ‍ॅप्लिकेशनमधे वापरणं मात्र थोडं धोक्याचं वाटतयं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Feb 2015 - 12:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

मी यातला तज्ञ नाही. केवळ कंपनीने दिलेल्या माहितीवरून लिहीलंय. परंतू तरीही GE Aviation सारख्या अग्रगण्य कंपनीने हे तंत्र वापरून बनवलेली इंजिने पुढच्या वर्षा-दीड वर्षात (२०१६ मध्ये) जागतिक स्तरावर कमर्शियल विमानवाहतूक करणार्‍या मोठ्या विमानांत वापरण्याचे आणि २०२० मध्ये वितरित होणार्‍या अजस्त्र 9X इंजिनांची बांधणी करण्याचे ($११ बिलियन किंमतीचे) वचन Emirates या जगातल्या सर्वात मोठ्या विमानवाहतूक करणार्‍या कंपनीला दिले आहे.

Boeing + GE Aviation ने 777X + 9X इंजिनांचे केलेले काही मोठे करार:

विमानकंपनी : 777X विमाने / 9X इंजिने / बोईंग कंपनीची विमानांची किंमत
१. Emirates Airline : १५० / ३०० / $७६ बिलियन
२. Qatar Airways : ५० / १०० / $१९ बिलियन
३. Etihad Airways : २५ / ५० / अंदाजे $१० बिलियन

इतर काही विमानकंपन्या...
Cathay Pacific Airways Ltd. व International Consolidated Airlines Group SA, parent of British Airways.

यावरून कंपनीने त्यांच्या फ्लॅगशिप विमानात वापरण्याचे हे तंत्रज्ञान पुरेसे विकसित केले असावे यावर विश्वास वाटतो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Feb 2015 - 1:02 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

छान. जी.ई. असेल तर क्वालिटी च्या बाबतीत तडजोड होणार नाही हा विश्वास आहे. तरीही थोडं अजुन संशोधन आणि अ‍ॅनालिसीस व्हायला हवं.

श्रीरंग_जोशी's picture

15 Feb 2015 - 4:26 am | श्रीरंग_जोशी

या विषयावरील उत्तम माहितीबाबत धन्यवाद. चित्रांची निवड खूप आवडली.

या निमित्ताने आठवले: 3D प्रिंटींग - म्हणजे काय रे भाऊ?

सोत्रि's picture

15 Feb 2015 - 10:10 am | सोत्रि

धागा वाचल्यावर हिच लिंक द्यायला आलो खाली तर, रंगाराव, तुम्ही मा़झे श्रम वाचवलेत असे दिसले :)
धन्यवाद!

- (आभारी) सोकाजी

http://animagraffs.com/inside-a-jet-engine/

जेट इंजिन तसेच कारचे इंजिन वगैरे कसे चालतात हे अ‍ॅनिमेशनचा वापर करून अतिशय सुरेखरित्या दाखवले आहे.

श्रीरंग_जोशी's picture

15 Feb 2015 - 10:59 am | श्रीरंग_जोशी

धन्यवाद.

पुण्यातील एका प्रदर्शनामध्ये ३ डी प्रिंटर बघितला होता. तेव्हा तर मला वाटले होते की फक्त मॉडेल बनवायला या प्रिंटरचा उपयोग होईल. आता हे वाचून तर वाटू लागलय की ३ डी प्रिंटर वापरुन बर्‍याच गोष्टी तयार करता येतील. आता त्याला मर्यादा असल्या तरी भविष्यात हे अशक्य नाही.

माहितीपूर्ण लेख आणि प्रतिसाद. जरा विस्ताराने लिहावे अशी सर्वांना विनंती.

विवेकपटाईत's picture

15 Feb 2015 - 7:10 pm | विवेकपटाईत

उद्या माणसाची हुबे हुबे प्रतिकृती छापली, मेंदू सकट. कल्पना करा काय होईल राव, तुम्ही सकाळी कामावर जातात आणि.....

मध्यंतरी आपल्या हिंदूस्थानात घडलेली घटना याच बाबतीत म्हणजे याच तंत्रज्ञाना विषयी आहे.
शाहरुख खानचा ३ डी पुतळा !
यावर अधिक इकडे :- Life-sized 3D Printed Statue of Bollywood Star, Shahrukh Khan, Created by Red Chillies VFX & Autodesk India
Shah Rukh Khan immortalised in first life size 3D printed model in the world
आता अशीच बझ एका नविन तंत्रा विषयी होइल... ते तंत्रज्ञान म्हणजे क्वांटम कंम्प्यूटर्स .

सध्या नासा , Lockheed Martin आणि गुगल यांनी डी-व्हेव { D-Wave } हा क्वांटम काँप्यूटर विकत घेतला आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कभी भुला कधी याद किया... { Sapne Saajan Ke }

थ्रीडी प्रिंटिंग इतके पसरेल हे वाटत होतेच. पण कप्तानसाहेबांनी उपस्थित केलेला पोरॉसिटीचा मुद्दा बिनतोड आहे. ते कसे मात करतील यावर हे पहायला आवडेल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Feb 2015 - 10:39 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आता वेळ मिळाला म्हणुन टंकतो.

३-डी तंत्रज्ञान नक्कीचं फायदेशिर आहे. तुम्ही दिलेल्या वापरांबरोबरचं येत्या काही वर्षांमधे "ह्युमन ऑर्गन्स" सुद्धा जैवतंत्रज्ञान, पेशी आणि माणसाचे बायोलॉगिकल स्कॅन्स घेउन तयार करता येतील. आत्ता सद्ध्याच्या काळातही जिवंत मानवी पेशी आणि रक्तनमुने वापरुन माणसाचे कानं आणि ओठं यशस्वीपणे बनवण्यात आलेले आहेत. स्वतःच्याचं शरिरामधल्या पेशी ३-डी प्रिंटर वापरुन असे अवयवं तयार केले गेल्यानी शरिर ते परपेशीप्रमाणे नाकारणारही नाही. सद्ध्या बायोस्कॅन्स वापरुन जिवंत कृत्रिम किडनी वाढवायचे प्रयत्न चालु आहेत. आणि त्यास काही प्रमाणात यशही मि़ळत आहे. तंत्रज्ञान जसं प्रगत होईल तसं ही गोष्ट शक्य होईल आणि स्वस्त होईल ह्यातही काही शंका नाही. ३-डी तंत्रज्ञानाला ह्याबाबतीत अनेक शुभेच्छा.

आता अभियांत्रिकी क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर ह्या तंत्रज्ञानावर अजुनही संशोधन व्हायला हवं असं माझं मत आहे. वरती जो विमानाचा इंपेलर आहे त्याबद्दलचं थोडं लिहितो.

कुठलही यंत्र किंवा यंत्राचा भाग डिझाईन होतं असताना त्या भागावर येणारे वेगवेगळे ताणतणाव, त्या भागाची वापरली जाण्याची वारंवारिता, लाईफसायकल, त्यामधे वापरण्यात आलेला धातु किंवा अलॉय, त्याचं शेवटच्या अवस्थेमधलं अपेक्षित मायक्रोस्ट्रक्चर, त्यावर होणार्‍या हिट ट्रीटमेंट्स, पोस्ट हिट ट्रीटमेंट प्रोसेसेस ह्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक असतं.

विमानाच्या टर्बाईनचा वेग चक्क ४०,००० ते ८०,००० आर.पी.एम. इतका प्रचंड असु शकतो. जी.ई. इंजिन बेंचमार्किंग मधे जेट विमानाचं इंजिन चक्क १,६४,००० आर.पी.एम. पर्यंत पुश करण्यात आलेलं होतं. मटेरिअल पोरस असेल तर एवढ्या जास्त वेगामधे "मटेरिअल इंटेग्रीटी" कितपत विश्वासार्ह असु शकेल? फोर्ज्ड मटेरिअल मधे अलॉय हे धागे स्वरुपात असल्यानी एकमेकांना घट्ट पकडुन राहु शकतात. तसचं हिट ट्रीटमेंटचा प्रश्णही अनुत्तरीत राहतोय. एवढ्या जास्तं वेगानी फिरणार्‍या भागामधे सॉलिड बेअरींग्ज वापरु शकतं नाहीत तर हायड्रोडायनामिक बिअरिंग्ज वापरल्या जातात. त्याचं वॉल प्रेशर हे भाग सहन कसे करु शकतील? एवढ्या वेगानी फिरणार्‍या भागामधे गॅप स्लीव्हज वापरलं जाणं हे ही धोक्याचचं आहे. कोणाकडे ह्याविषयी अधिक माहिती असेल तर कृपया इथे द्यावी. तोपर्यंत कॉलिंग गवि.

कॅजॅस्पॅच्या शेवटच्या परिच्छेदातल्याच शंका धागा वाचून मनात आल्या होत्या.

प्रचंड आरपीएम, आणि काही पार्टसबाबतीत उच्च तापमान, आणि इतर काहींबाबत रिपीटेड स्ट्रेसमुळे येणारा फटिग या गोष्टी फारच महत्वाच्या असतात. कणाकणाने जोडून बनलेला पार्ट जर योग्य त्या मटेरियलचा असेल आणि कणाकणाने जोडून बनवण्याच्या पद्धतीत तो अधिक भक्कम बनत असेल (विदाउट इंटर्नल फ्रॅक्चर्स, फिशर्स वगैरे) तर ही थ्री डी प्रिंटिंग पद्धत उजवी असू शकेल. पण नेमकं कसं बनतं ते इमॅजिन करता येत नाहीये.

प्लॅस्टिक किंवा प्लॅस्टरसारख्या मटेरियलपासून असं प्रिंटेड मॉडेल बनवणं मी समजू शकलो होतो. पण विमानाच्या इंजिनातले धातूचे पार्ट हे पार्टिकल्स जोडूनजोडून प्रिंट करायचे असतील तर प्रचंड तापमानाला हे काम केलं पाहिजे.. म्हणजे धातू हा द्रवरुपात असला तरच तो चिकटेल आधीच्या धातूला. मग लगेच थंड करुन तो घनरुपात आणला पाहिजे. या सर्व प्रक्रियेत अत्युच्च उष्णता देणे आणि त्याचवेळी थंड करणे हे तंत्र एकाच जागी कसं जमवत असतील?

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Feb 2015 - 11:49 am | डॉ सुहास म्हात्रे

या विषयातली माझी रुची टेक्निकल कमी (किंबहुना नगण्य) आणि व्यावहारीक उपयोग/व्यापारी (बिझनेस) दॄष्टीकोनातून जास्त आहे. त्यामुळे या तंत्राच्या तकनिकी दर्जाची माझी खात्री बिझनेस कारवाईवरून अनुमानित (डिराईव्हड) आहे.

मोठ्या करारांतला 'डिफॉल्ट क्लॉज' चांगलाच (अनेक बिलियन डॉलर्सचा) चटका देणारा असतो. बोईंगला ड्रिमलायनर प्रकरणात आणि एअरबसला A380 प्रकरणात (अनेक बिलियनचे) प्रसिद्ध मोठे चटके बसल्यानंतर बोईंग व एअरबस भविष्यातले कोणत्याही मोठ्या प्रकल्पाचे करार / जाहिरात "ताकही फूंकून फूंकून पीत" करतील हे नक्की. या पार्श्वभूमीवर हा नविन 3D प्रिंटिंग असलेला प्रकल्प नुसता जाहीर केलेला नाही तर त्याचे $१०० बिलियन पेक्षा जास्त किंमतीच्या विक्रीचे 'टाईट' वेळापत्रकही जाहीर केलेले आहे... पहिले मध्यम आकाराचे विमान पुढच्याच वर्षी (२०१६) मध्ये आणि 777X / 9X विमाने २०२० पासून हस्तांतरीत करण्याचे करार झाले आहेत.

पुढच्या वर्षी व्यापारी तत्वावर हस्तांतर म्हणजे या वर्षी पार्ट्स केवळ तयार नाही तर त्यांची कसून तपासणी झाली असणार... शेवटी हा केवळ तंत्राचा प्रश्न नसून तो १५०-४०० प्रवाश्यांच्या आणि कंपनीच्याही जीवनमरणाचा प्रश्न आहे.

या प्रकल्पासाठी GE Aviation ने मॉरीस टेक्नॉलॉजिज तिच्या सर्व उपकंपन्यांसह विकत घेतली आहे आणि अजून दोन नविन 3D प्रिंटिंग प्लँटस उभारले आहेत.

अर्थातच, या प्रकारच्या उच्च कोटीच्या तंत्रज्ञानाच्या (IPR) सर्व खाचाखोचा कोणतीही कंपनी एका विशिष्ट मर्यादेपलिकडे सर्वसामान्य माध्यमांत उघड करणे शक्य वाटत नाही.

वर चर्चा केलेल्या मुद्द्यातील काहींचा त्रोटक उहापोह माध्यमांत आला होता...

...The additive manufacturing process involves taking digital designs from computer aided design (CAD) software, and laying horizontal cross-sections to manufacture the part. The process creates the layered cross-sections using a laser beam to melt the raw material. These parts tend to be lighter than traditional forged parts because they don't require the same level of welding. Additive manufacturing also generates less scrap material during the fabrication process...
...Morris Technologies and Rapid Quality Manufacturing focus on the aerospace, energy, oil & gas, and medical industries.

तांत्रिक नियतकालिकांत (professional journals) कदाचित जास्त माहिती असू शकेल.

हे मोठ्या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात केलं जात आहे म्हणजे ते शक्य, तुलनेत स्वस्त, सुरक्षित, अधिक दर्जाचं असणार यात शंका नाहीच मुळात.

नेमक्या तपशिलाबद्दलच उत्सुकता आहे फक्त..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Feb 2015 - 1:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सहमतं. जनरल इल. सारखी कंपनी गुणवत्ता राखुनचं काम करणार ह्यात शंका नाही. पण कशी हे जर समजलं असतं तर बरं झालं असतं. बिझनेस ट्रेड सिक्रेट अर्थातचं एम्प्लॉयी आणि आर अँड डी वाले सोडुन कोणालाचं समजणार नाही हे ही निश्चित.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Feb 2015 - 11:20 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

जेट इंजिनाच्या थ्रस्टची ताकद बघा ह्या व्हीडीओमधे

http://youtu.be/DFP4xl0V0mk

सर्वसाक्षी's picture

16 Feb 2015 - 11:34 am | सर्वसाक्षी

चांगली माहिती.

सौंदाळा's picture

16 Feb 2015 - 11:42 am | सौंदाळा

प्रोटोटाईप बनवण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान आहे इतपत माहीती होती.
पण या तंत्रावरुन उत्पादनसुद्धा आणि ते पण विमानाचे इंजिन हे नविनच आहे.
जी. ई सारखी कंपनी हे करत आहे म्हणजे हे तंत्रज्ञान मागच्या ३-४ वर्षात प्रचंड वेगाने विकसीत झाले असेल.
कॅ.जॅ. स्पॅ चा प्रतिसाद उपयुक्त.
तुम्हाला पडलेले प्रश्नच स्पेशली हिट ट्रिटमेंट, मशिनिंग याची उत्तरे मिळवण्यास उत्सुक आहे.

विटेकर's picture

16 Feb 2015 - 12:37 pm | विटेकर

उत्तम लेख , उपयुक्त माहीती.
अजून येऊ द्या !
गुण्वत्तेच्याबाबतीत - फक्त गुणवत्ताच नव्हे तर प्रखर चाचण्या घेणे आवश्यक आहे.
गविशेट -
रस्त्यावर धावणारी वाहने भारतात ए आर ए आय प्रमणित करते , तसे विमाने कोण प्रमाणित करते ?

डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन.
-सर्टिफिकेट ऑफ एअरवर्दीनेस.

श्रीरंग_जोशी's picture

16 Feb 2015 - 8:04 pm | श्रीरंग_जोशी

हेच काम अमेरिकेत Federal Aviation Administration करतं. त्यांचे संकेतस्थळ.

नुकतेच त्यांनी अमेरिकेतील ड्रोन वापराविषयी नियमावली जाहिर केली आहे.

माझीही शॅम्पेन's picture

16 Feb 2015 - 1:04 pm | माझीही शॅम्पेन

खूप छान माहितीपूर्ण धागा , आता ह्या ३D प्रिण्टेर्स ने स्व:ताच्या प्रतिकृती बनवायला सुरुवात केली तर मानव संस्कृती सुध्धा धोक्यात येणार :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Feb 2015 - 6:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

या दिशेनेही प्रगती चालू आहे ;) जरा वेळ लागेल, पण कोणी सांगावे... जमेलही नजिकच्या भविष्यात :)

कंजूस's picture

16 Feb 2015 - 5:36 pm | कंजूस

या यंत्राचा माहितीपट DW-TV चानेलवर पाहिला होता यंत्राची जाहिरात:
"आमच्या यंत्राने काहीही छापा परंतू कृपया आमचेच यंत्र छापू नका."

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Feb 2015 - 5:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

गमतीची पण सत्य गोष्ट अशी आहे की... असे करणे वास्तवात शक्य आहे ! :)

जेपी's picture

16 Feb 2015 - 9:07 pm | जेपी

माहितीपुर्ण.

अवांतर-एक प्रश्न ,
या विमानातुन आपला नेहमीचा लेझर प्रिंटर घेऊन प्रवास करता येईल का ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Feb 2015 - 9:11 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अत्यंत माहितीपुर्ण अवांतर प्रश्ण विचारल्याबद्दल श्री.जे.पी. यांचे एक ३-डी प्रिंटरची कलर लेजर प्रिंटाऊट (२ रुपये पर्पेज वाली), तसचं एक झाडावर नैसर्गिकरित्या वाढलेला नारळ देउन करण्यात येत आहे. तसचं त्यांच्या पुढच्या प्रिंटर खरेदीवर घसघशीत २५% ची सुड...आपलं सुट देण्यात येत आहे.

(अखिल मिपा मापंकाढे समिती)

प्रियाजी's picture

16 Feb 2015 - 9:08 pm | प्रियाजी

या तंत्रामुळे जग परत एकदा पूर्ण बदलणार हे निश्चित. हे यंत्र प्रत्यक्षात बघण्याची आपण सर्वजण वाट पाहूया. ही सर्व माहिती खुपच सोप्या भाषेत दिल्याबद्दल ई.एक्का, कॅ.जॅ.स्पॅ. व ईतरान्चे मनापसून आभार.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Feb 2015 - 10:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्रिमिती छपाई व्यवहारात आणण्यासाठी होणार्‍या दिरंगाईमागे तंत्रज्ञान नाही तर निर्णयप्रक्रिया घेणार्‍या अधिकार्‍यांचे अज्ञान आणि त्यामुळे होणारी चाकढकल आहे असेच दिसते आहे.

त्याबाबतीत McKinsey & Company या जगप्रसिद्ध व्यवस्थापन संशोधन आणि सल्लागार कंपनीचे मत आणि इतर रोचक माहिती या दुव्यावर आहे... Are you ready for 3-D printing?

बबन ताम्बे's picture

24 Feb 2015 - 12:00 pm | बबन ताम्बे

पण मला एक शंका आहे. जसे यंत्रे आली त्यावेळी हस्त कौशल्य वापरून उत्पादन करणारे बेकार झाले. (जसे आपल्याकडे कापड बनवणारे, अवजारे बनवणारे), तसे ३ डी प्रिंटींग मुळे होणार तर नाही? कारण आज एखादा स्पेसिफिक मशिन पार्ट बनवायला टर्नर, मिलर पासून ड्रिलर्/रीमर पर्यंत स्पेशालिस्ट लागतात. ३डी प्रिंटींग मुळे या स्पेशालिस्ट लोकांची गरजच रहाणार नाही. आय. टी. आयची गरज कमी होईल की काय?

बनवण्याचे तंत्रज्ञान केवळ जास्त हातांना काम मिळावे म्हणून मागास राहू दिल्याने अन्य अनेक क्षेत्रांत भरभराटीचा आणि रोजगारांचा वेग मंद राहतो हे एक.. आणि आत्ताहून कमी भांडवलात वस्तू बनवता येण्याने ती वस्तू जास्त स्वस्त होऊन जास्त लोकांना परवडते हे दुसरे महत्वाचे..

भरपूर कामगार / मॅन्युअल एफर्ट लागणारी उत्पादनप्रक्रिया अधिक लोकांना रोजगार देत असली तरी अल्टिमेटली त्यातून येणारी उत्पादने तुलनेत जास्त महाग राहात असल्याने मागच्या दाराने कामगार जेव्हा एरवी उपभोक्ता ग्राहक या भूमिकेत येतो तेव्हा त्याच्या खिशाला अधिक मोठी भोके पाडतात.

उदा. विमानाचे भाग कमी मनुष्यबळात मिळाल्याने विमानाची किंमत कमी होणे.. त्यामुळे एअरलाईन्सचा भांडवली अन सुट्याभागांचा ऑपरेशनल खर्च कमी होऊन विमान प्रवास स्वस्त होणे, हातमागाऐवजी पॉवरलूमवर जास्त कापड कमी वेळात काढल्याने कापडाची किंमत कमी होणे, बैल नांगर या पद्धतीने आठवडाभर नांगरण्याऐवजी यांत्रिक नांगरवाहनाने एका दिवसात अनेक एकर नांगरुन होणे आणि धान्य स्वस्त होणे, इ या मार्गांनी उत्पादने स्वस्त होऊन जास्त लोकांना परवडतात.

एक महत्वाचं तत्वः बिनरोजगाराचे श्रम करुन घेणे जितके निरुपयोगी आणि घातक तितकेच घातक बिनश्रमाचा रोजगार देणे.. याठिकाणी कमी श्रमात गोष्ट होत असताना रोजगारासाठी श्रम निर्माण करुन ते करुन घेण्याचा आटापिटा होईल.

घाम गाळणे म्हणजे खरे अर्थशास्त्रीय श्रम नव्हेत. जे श्रम किमान त्या श्रमांच्या उत्पादनाइतकी किंवा जास्त क्रयशक्ती तयार करु शकतात ते खरे श्रम. (उदा. बाकीचे सारे अनुदानच. यंत्राने खड्डे खणणे जास्त एफिशियंट असताना रोजगाराच्या हमीसाठी खड्डे खणण्याची कामे ही सश्रम भीकच.

माझं म्हणणं क्लियर होतंय का माहीत नाही, पण प्रयत्न केला शब्दांत मांडण्याचा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Feb 2015 - 12:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

थोडक्यात म्हणजे...

अ) बैलगाडी ऐवजी चारचाक्या आल्याने गाडीची वाहतूक जास्त स्वस्त, जास्त सुखकारक आणि जास्त लोकांना (बैलगाडीच्या जमान्यात ती ठेवणे परवडत नाही म्हणून पायी चालणार्‍या लोकांनाही) सहज उपलब्ध झाली आहे.

आ) पूर्वी मशीन्स आली म्हणून हाताने वस्तू तयार करणार्‍या कामगारांचे काय होईल अशी भिती व्यक्त केली गेली. मात्र काही थोडे अपवाद वगळता इतर सर्व कारागीर मशीनचा वापर करणे अथवा आपल्या चरितार्थाच्या कामात बदल करून पहिल्यापेक्षा जास्त सधन झाले आहेत.

इ) त्रिमिती छपाईने आणि इतर काही तंत्रांनी जर विमानप्रवास अधिक सोपा, सुखकर आणि विषेश म्हणजे स्वस्त झाला तर तो केवळ विकसितच होणार नाही तर तुलनेने कमी उत्पन्न असणार्‍या लोकांच्या आवाक्यात येईल.

यालाच सर्वसाधारणपणे प्रगती म्हणतात आणि त्यामुळेच मानवाचे जीवनमान सतत उंचावर जात राहीले आहे.

संदीप डांगे's picture

27 Feb 2015 - 1:34 am | संदीप डांगे

इतर काही तंत्रांनी जर विमानप्रवास अधिक सोपा, सुखकर आणि विषेश म्हणजे स्वस्त झाला तर तो केवळ विकसितच होणार नाही तर तुलनेने कमी उत्पन्न असणार्‍या लोकांच्या आवाक्यात येईल.

नुसता सहमतच नाही तर हे वास्तवात यावे याची वाट बघतो आहे.

आत्ता ड्रोन विकसीत झाले आहेत ते छोट्या वस्तू ने-आण करु शकतात. अजून थोडे विकसीत करून एक किंवा दोन माण्सांची ने-आण शक्य झाली तर बर्‍याच नागरी सेवांवरचा ताण आणि खर्च कमी होइल.

श्रीरंग_जोशी's picture

27 Feb 2015 - 1:47 am | श्रीरंग_जोशी

यावरून पुर्वी पाहिलेला हा व्हिडिओ आठवला...

श्रीरंग_जोशी's picture

27 Feb 2015 - 1:43 am | श्रीरंग_जोशी

आत्ता ड्रोन विकसीत झाले आहेत ते छोट्या वस्तू ने-आण करु शकतात. अजून थोडे विकसीत करून एक किंवा दोन माण्सांची ने-आण शक्य झाली तर बर्‍याच नागरी सेवांवरचा ताण आणि खर्च कमी होइल.

जेव्हा अ‍ॅमेझॉनने त्यांच्या ड्रोन डिलिव्हरीबात जाहिर केले होते तेव्हा हापिसातील सहकार्‍यांबरोबर झालेल्या चर्चेत मी पण हिच संकल्पना मांडली होती. ट्रॅफिकमध्ये रोज दोन अडीच तास घालवणार्‍यांसाठी ड्रोनप्रवास हे एक वरदान ठरू शकते.

अजुनतरी सुरक्षित प्रवासाच्या बाबतीत ड्रोन्स तंत्रज्ञान बाल्यावस्थेमध्ये आहे. ड्रोन्सद्वारे वस्तुंची ने-आण नियमीतपणे सुरू व्हायला अजुन बरीच वर्षे लागू शकतात.

एरिअल फोटोग्राफी व व्हिडिओ शुटींगसाठी मात्र ड्रोन्सचा वापर बर्‍यापैकी सुरू झालेला आहे.

संदीप डांगे's picture

27 Feb 2015 - 2:13 am | संदीप डांगे

सुरक्षेच्या बाबतीत फार कठीण जाऊ नये असे वाटते कारण इतर वाहनांमधे वापरली जाणारी सुरक्षायंत्रणा इथेही जशीच्या तशी किंवा थोडी बदलून वापरता येइल. जसे:

१. गूगल कार चे तंत्रज्ञान वापरून स्वयंचलित यंत्रणेद्वारे उडणार्‍या प्रत्येक ड्रोनचा स्थळ, जमीनीपासूनची उंची आणि मार्ग यांचा विदा ठेवून इतर ड्रोनशी समन्वय करणे. त्यासाठी उपभोक्त्याने फक्त उतरायचे ठिकाण आणि वेळ नमूद करणे. बाकी मार्ग, वेग आणि प्रवास याची काळजी स्वयंचलीत यंत्रणा घेऊ शकेल.

२. मर्सिडिझ व इतर हाय-एंड कार्स मधे वापरल्या जाणारी धडक-विरोधी-यंत्रणा वापरून एकाच वेळेस एकाच मार्गावर सुरक्षीत अंतर राखून अनेक ड्रोन्सना सुरक्षीत प्रवास करता येइल. जेणेकरून रस्त्यावरची चौरसफूटाची जागा न वापरता घनफूटात मार्ग वापरता येइल.

३. अपघाताने ड्रोन कोसळले तर विशिष्ट उंचीसाठी पॅराशूट तर जमीनीलगत तत्काळ अपघातांसाठी एअरबॅग यंत्रणा वापरता येइल.

४. सौर-उर्जेचा वापर करून बॅटरी चार्ज करणे त्यामुळे वापर-खर्च कमी.

अजून इतर बर्‍याच तांत्रिक सोयी आजच्या काळात आहेत ज्या सरसकट ड्रोनसाठी वापरता येतील. बाकी तज्ञ आहेतच पुढचा विचार करायला.

फक्त एकच इच्छा आहे ती ही की हे सर्व लवकरात लवकर घडून यावे आणि तेही सर्वसामान्य माणसास परवडण्यासारखे असावे. एक्दम ४०-५० हजार तर नाही पण २ लाख रुपयांपर्यंत किंमत असल्यास इतर गोष्टींचा विचार करता परवडण्यासारखे असेल.

श्रीरंग_जोशी's picture

27 Feb 2015 - 2:23 am | श्रीरंग_जोशी

वरील मुद्द्यांशी सहमत पण मी वर मांडलेली शंका नैसर्गिक आव्हानांबाबतीत होती.

जेव्हा अ‍ॅमेझॉनने ड्रोन डिलिव्हरीबाबत प्रथम घोषणा केली तेव्हा टिव्हीवरील एका चर्चेत एव्हिएशन इंडस्ट्रीमधून निवृत्त झालेला एक तंत्रज्ञ म्हणाला होता की कित्येक वेळा अचानक आलेल्या वादळामुळे किंवा दुसर्‍या आव्हानात्मक परिस्थितीमुळे छोटी विमाने व हेलिकॉप्टर्स अपघातग्रस्त होतात.

त्या तुलनेत डिलिव्हरीसाठी वापरले जाणारे ड्रोन्स कुठेच नाहीत.

काळाबरोबर या आव्हानांवरही उपाय शोधले जातीलच.

संदीप डांगे's picture

27 Feb 2015 - 2:30 am | संदीप डांगे

हो. तेही खरे आहेच.
जसे प्रत्येक वाहनात काही ना काही उणीवा असतात आणि कालांतराने त्यावर उपाय शोधले जातात तशीच ड्रोनसोबत होईलच म्हणा.

शहरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी मात्र 'वर'दान ठरू शकतील हे ड्रोन्स.

बबन ताम्बे's picture

24 Feb 2015 - 12:24 pm | बबन ताम्बे

धन्यवाद गवि.

थोडक्यात तंत्रज्ञान बदलेल त्याप्रमाणे स्किलसेट पण बदलायला लागतील.

गवि's picture

24 Feb 2015 - 12:34 pm | गवि

हो.

प्रायमरी (उत्पादन, शेती, मॅन्युफॅक्चरिंग) प्रकारच्या उद्योगांत जितके कमी मनुष्यबळ लागेल तितकी स्वस्त उत्पादने मिळतात.. त्यामुळे ग्राहकसंख्या वाढून अनुषंगिक सेकंडरी व्यवसाय विस्तारतात आणि सेकंडरी (विक्री, सेवा, सल्ला, मार्केटिंग, वितरण) वगैरे क्षेत्रात मूळ प्रायमरीत गमावलेल्या रोजगारांपेक्षा प्रचंड जास्त पटीने रोजगार उपलब्ध होतात.

साठ किंवा पन्नास टक्के लोक एक ते पाच एकरांच्या छोट्याछोट्या तुकड्यांच्या शेतीत विखुरलेले असणे हे भूषण नसून चुकीचे आहे. दहा टक्के लोकांनी प्रत्येकी प्रचंड आकाराच्या एरियात बाकीच्या नव्वदांना पुरेल इतकी यांत्रिक शेती करणे हा फायद्याचा मार्ग आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Feb 2015 - 12:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमच्या दोन्ही प्रतिसादांशी व्यावहारिकदृष्ट्या सहमत आणि तात्विकदृष्ट्या असहमत.

मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वगैरे सगळ्या गोष्टी ठिक आहेत. आणि त्या अनुषंगानी जे सेकंडरी व्यवसाय बहरतात असं तुम्ही म्हणताय त्यामधे ज्यांच्या नोकर्‍या गेल्या त्यांना काय स्थान असेल? एखादा मनुष्य आयुष्याची वीस वर्षं शॉप फ्लोअर वर मशिनिस्ट चं काम करतोय त्याला एकतर वयोमानामुळे दुसरा जॉब मिळणं अतिशय अवघड असेल. आणि सेकंडरी उद्योगांमधे अपेक्षित असणारे स्किलसेट्स नसल्याने तो बेरोजगार होईल हा ही एक घटक विचारात घेण्यासारखा आहे.

कपिलमुनी's picture

24 Feb 2015 - 1:00 pm | कपिलमुनी

या आधी या तंत्राने सायकल , मोटार सायकल , कार , हेलिकॉप्टर ई बनवले आहे का ?
( दंबूक बनवलेली वाचले आहे.)

कार बनवताना ह्या वेळच्या डेट्रोईट ऑटो-शो मधे पाहिलं आहे. हे तंत्रज्ञान मुख्यत्वे करून अंतराळ तंत्रज्ञान म्हणून प्रथम विकसित केलं गेलं. जर स्पेसस्टेशन वर एखाद्या गोष्टीची गरज लागली, (म्हणजे दुरुस्तीसाठी लागणारी हत्यारं वगैरे) तर तिथल्या शास्त्रज्ञांना पुढचं स्पेस शटल कधी येईल त्याची वाट बघत बसण्यापेक्षा जर तिथल्या तिथे ''प्रिंट' करून त्या वापरता येतील.
(या पुढची स्टेप म्हणजे, स्पेस स्टेशनवर अन्न 'प्रिंट' करण्याचं तंत्रज्ञान सुद्धा विकसित झालेलं आहे पण अजून 'टेस्टींग' :) फेज मध्ये आहे.)

नॅनो टेक्नॉलॉजिचा वापर कोटींग करण्यासाठी केल्यावर...

बाकी paramagnetic paint ची कमाल पहा ! :)

आणि टीपी म्हणुन Water Transfer Printing सुद्धा पहा :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्टॉप दॅट ! { Gambler }

मालोजीराव's picture

26 Feb 2015 - 4:27 pm | मालोजीराव

कोणीतरी 3D प्रिंटर वापरून बंदूक बनवलेली ऐकली ते पण १००० रुपयात, या प्रिंटर चा असाही वापर होतो काय ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Feb 2015 - 10:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

अशी बंदूक छापून तिच्यातून खरी गोळ्या झाडून झालेल्या आहे. बंदूकीच्या गोळ्या छापण्याचे तंत्र मात्र अजून विकसित झालेले नाही :)

हे घ्या त्या बंदूकीबद्दलचा व्हिडिओ (World's First 3D Printed Metal Gun) ...

यु टुबमध्ये 3D printing of gun अशी विचारणा केल्यास अजून बरेच व्हिडिओ सापडतील.

मालोजीराव's picture

26 Feb 2015 - 4:33 pm | मालोजीराव

25$ Gun

“Anywhere there’s a computer and an Internet connection, there would be the promise of a gun”

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Feb 2015 - 11:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

3D Printing: Make anything you want...

या रोचक व्हिडिओत त्रिमीती छपाईचे वैद्यकशास्त्रातले (कान, नाक, मूत्रपिंड, इ इंद्रिये छापण्यासाठी); पाककलेतले (चॉकलेट, केक, इ छापण्यासाठी) आणि इतर बरेच काही उपयोग पाहता येतील...

3D मॅजिक पेन ३डी वस्तू कशा बनवू शकतो हे व्हिडीओ मधे बघा.

जेपी's picture

27 Feb 2015 - 5:24 pm | जेपी

चांगली माहिती आहे.

अवांतर-नाय मंज उगीच एक प्रश्न पडला ह्या विमानातुन आपला नेहमीचा प्रिंटर घेऊन प्रवास करता येईल का ?
उगी ईचारलेल बर ..कस्स!! *biggrin*

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Feb 2015 - 8:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

निस्तं इमानातून न्हाय, राकेटमदूनबी त्येला अवकाशात (म्हंजी अंत्राळयानात, पर्ग्रहावर, वेग्रे) न्यायचा ईचार्बी हाय. म्हंजे आसं हाय बगा. तितं एखांदा यानाचा नायतर मशिनीचा पार्ट बोंबलला तर हितून माग्वायची सोय नस्ती ना ! आनी सग्ळ्या पार्टांचा लय मोट्टा ष्टाकबी नेता येत नाय. मंग काय काडायचा प्रिंटर भाईर आणि छापायचा हवा तो पार्ट हवा तेवा ! कशी काय आयड्या हाय ?!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Feb 2015 - 9:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ब्येस हाये आयड्या. नॉर्थ पोल एक्स्पेडिशन मधे ह्या प्रिंट झालेल्या एका प्रेशर सीलने टीमचे प्राणं वाचवल्याची बातमी आहे. दुवा मिळाला की टाकतो.

अर्धवटराव's picture

27 Feb 2015 - 8:20 pm | अर्धवटराव

आता आमचा टोळ्भैरवांचा ग्रुप संसार सागरात पडुन थोडा शांत आणि सभ्य झालाय.... काहि वर्षांपुर्वी जर हि टेक्नोलॉजी आमच्य हाती लागली असती तर त्याच्या अत्यंत इनोव्हेटीव्ह उपयोगाच्या नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटा येतोय =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Feb 2015 - 8:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

उलट, आताही थंड डोक्याने इनोव्हेशन केले तर हे सहजसाध्य आणि तुलनेने स्वस्त उपकरण घेऊन पुढचा बिलियनेर भारतातही बनू शकतो ! तर, चला उठा, 3D प्रिंटरने सुसज्ज व्हा आणि...

टवाळ कार्टा's picture

28 Feb 2015 - 1:49 pm | टवाळ कार्टा

बायको/गफ/सामान आणि वस्तू यात फरक अस्तो राव ;)

पैसा's picture

27 Feb 2015 - 9:19 pm | पैसा

मस्त धागा आणि चर्चा! अशी मोठी पॅनेल्स किंवा संपूर्ण घरे छापून घरे बांधणे स्वस्त केले पाहिजे म्हणजे गरीब लोकांना परवडतील अशी घरे काही प्रमाणात तरी मिळतील.

मंदार कात्रे's picture

28 Feb 2015 - 8:08 pm | मंदार कात्रे

इस्पिकचा एक्का साहेब , कॅप्टन जॅक आणि गवि जी अतिशय आभार . सर्वच सदस्यांच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादांनी हा धागा अतिशय रोचक झाला आहे

धन्यवाद

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Apr 2016 - 11:49 am | डॉ सुहास म्हात्रे

आता प्रिंटरवर छापलेल्या इमारतीत रहायची तयारी करा !...

Dubai plans to 3D print 25% of buildings by 2030

सोनुली's picture

3 May 2016 - 12:16 am | सोनुली

पहिल्यांदाच वाचत आहे याबद्दल. आणखी लिहावे.

Ram ram's picture

3 May 2016 - 12:16 pm | Ram ram

छान माहीती, धन्यवाद

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2019 - 11:54 am | डॉ सुहास म्हात्रे

आज माध्यमांत ही बातमी दिसली.

Dubai developer Emaar to build 3D printed home in Arabian Ranches III

दुबईतील Emaar Properties ही नामवंत बांधकाम कंपनीने तिच्या एका प्रतिष्ठित गृहप्रकल्पात त्रिमीती छपाई वापरून घरे बांधणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे, घरे लवकर आणि कमी खर्चात बांधली जातील असा दावा त्या कंपनीने केला आहे. अनेक क्षेत्रांत नवकल्पनांचा सर्वप्रथम वापर करण्यात दुबई जगाच्या पुढे एक पाऊल ठेवून आहे, हे परत एकदा सिद्ध होत आहे !

"संगणकाच्या उपयोगाची सीमा फक्त मानवी विचारशक्तीच्या भरारीच्या कक्षेनेच ठरवली जाईल" असे म्हटले जात होते. आता ते त्रिमीती छपाईच्याबाबतीतहि चपखलपणे लागू होते. अर्थात, त्रिमीती छपाई हा संगणकाचाच एक अविष्कार असल्याने ते सहजपणे होणार होतेच म्हणा.

जॉनविक्क's picture

20 Jul 2019 - 1:30 pm | जॉनविक्क

पण लेबर कमी होणार ना ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2019 - 6:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

मानवाच्या आतापर्यंतच्या प्रत्येक क्रांतीकारक विकसन पायरीवर, "आता अमुक अमुक लोक बेकारीने मरणार" असा हाकारा होतो. पण, आतापर्यंत तो हाकारा दर वेळेस खोटा ठरलेला आहे. बदलणार्‍या व्यवस्थेला चालवायला माणसांची गरज लागतेच, फक्त त्यांच्याकडे जरूर असणारी कौशल्ये वेगळी असावी लागतात... आणि, स्वतःहून म्हणा की जरूरीच्या रेट्यामुळे म्हणा, जरूर ती कौशल्ये आत्मसात करून माणसाने पूर्वीपेक्षा जास्त विकसित जीवनमान साध्य केले आहे.

उदाहरणेच पहायची झाली तर खालील मोजके क्रांतीकारक कालखंड तपासून पाहता येतील...

१. मानवाच्या/प्राण्यांच्या श्रमांवर अवलंबून असलेल्या वहातूकीच्या साधनांचा वापर ---> काही दशके अगोदर कल्पनेतही नसणार्‍या यांत्रिक वाहतूकीच्या साधनांचा (दुचाकी, चारचाकी, रेल्वे, विमान, इ) वापर. आताही, विजेवर चालणार्‍या गाड्या आल्यावर, यांत्रिक गाड्या तयार करणार्‍या उद्योगधंद्यांचे (आणि त्यात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे) काय होणार अशी सार्वजनिक (!) चिंता लागून राहिली आहेच... पण, त्या उद्योगधंद्यातील विचार्वंत धुरीणांनी काही वर्षांपूर्वीच रूळ बदलायला सुरुवात करून वीजेवर चालणार्‍या गाड्यांसंबंधी संशोधन सुरू केले आहे.

२. यांत्रिक साधने व पूर्णपणे मानवी श्रम वापर करून उत्पादने तयार करणे व सेवा देणे ---> संगणकाचा वापर करून उत्पादने तयार करणे व सेवा देणे :
हा बदल तर आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर दोनेक दशकांपूर्वी सुरू झाला आहे आणि अजून होत आहे. नव्वदीच्या दशकात तर, 'संगणकांमुळे जगभरात बेकारी माजेल" असा जोरदार हाकारा झाला होता आणि संगणकांच्या उपयोगाला बराच विरोध केला गेला होता.

यामध्ये लक्षात ठेवण्याजोगी एक फार महत्वाची गोष्ट अशी की, बदलापूर्वीच्या प्रत्येक कालखंडापेक्षा बदलानंतरची लोकसंख्या बरीच मोठी होत गेलेली आहे. तरीही दर नव्या व्यवस्थेत बेकारी तर वाढली नाहीच पण प्रत्यक्षात मानवी जीवनमान सुधारले आहे. म्हणजे, दर नव्या व्यवस्थेने सतत वाढत्या नोकरी-व्यवसायाच्या संधी निर्माण केलेल्या आहेत.

जे बदलांची दिशा वेळीच (किंबहुना, वेळेआधीच) जोखतात आणि स्वतःहून त्या बदलांना अनुरुप बदल घडवून आणतात, ते बदलांमुळे निर्माण होणार्‍या संधीचा भरपूर फायदा उठवतात (The early bird gets the worm). जे त्याबाबतीत मागे राहतात, त्यांना नाईलाजाने का होईना स्वतःत बदल घडवून आणावेच लागतात. उदा: १९८०-९०च्या दशकांत ज्यांनी संगणकाचे शिक्षण घेऊन ज्यांनी तो मार्ग स्विकारला (व ज्यांनी आपला पूर्वीचा मार्ग बदलला) त्यांना संगणकक्रांतीमुळे निर्माण झालेल्या नवीन संधी पटकावल्या. ज्यांनी ते करण्यात टाळाटाळ केली ते केवळ मागेच राहीले नाही तर त्यांना अखेरीस कोणत्या ना कोणत्या प्रकारचे संगणकशिक्षण घेणे भाग पडले आहे / पडत आहे. एकंदरीत, बदलाच्या संक्रमणकालामध्ये काही लोकांना अडचणींना तोंड द्यावे लागले आहे, पण बदल मुरल्यानंतरच्या काळात सगळे बर्‍यापैकी सुरळीत झाले आहे.

ही एक प्रकारे, व्यवहारात दिसणारी डार्विनच्या सिद्धांताची पुष्टी आहे... "जो जीव बदलांना तोंड देऊ शकतो आणि / किंवा बदलांना तोंड देण्यासाठी स्वतःमध्ये आवश्यक बदल करू शकतो, तो टिकून राहतो." आतापर्यंत, वारंवार, हेच सिद्ध झाले आहे की, "दर बदलांमध्ये, आपल्या बुद्धीचातुर्याने, मानव केवळ टिकूनच राहीला नाही तर, तो अधिकाधिक समृद्ध होत गेला आहे" (Man has not only survived, but has prospered, with each change).

जॉनविक्क's picture

20 Jul 2019 - 7:13 pm | जॉनविक्क

दर बदलांमध्ये, आपल्या बुद्धीचातुर्याने, मानव केवळ टिकूनच राहीला नाही तर, तो अधिकाधिक समृद्ध होत गेला आहे" (Man has not only survived, but has prospered, with each change).

आता challange त्याच्या या बुद्धीचातुर्यालाच निर्माण होत आहे म्हणून चिंता वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2019 - 7:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

आता challange त्याच्या या बुद्धीचातुर्यालाच निर्माण होत आहे म्हणून चिंता वाटते.

चिंता नको, बुद्धीचातुर्याला सतत मिळालेल्या आव्हाना(challange)मुळेच माणसाची गेल्या दहा-वीस लाख वर्षांची प्रगती झाली आहे आणि त्या दर आव्हानाचा सामना करताना बुद्धीचातुर्याचीसुद्धा* सतत प्रगती होत आहे ! जेवढे मोठे आव्हान तेवढे बुद्धीचातुर्य जास्त जोरात धावते. :)

******

* हे जरी मी मानवी समाजाच्या एकूण बुद्धीचातुर्याबद्दल बोलत असलो तरी, 'जी टाळकी कधीच सुधारणार नाहीत' असे वाटत असते, ती सुद्धा स्वतःला चटका लागू लागला की सरळ मार्गावर येतात. जी टाळकी फारच टोकाची निर्बुद्ध असतात, ती (स्वतःच्या कर्माने) भूतकाळात जमा होतात. डार्विनचा नियम ! ;)

जॉनविक्क's picture

20 Jul 2019 - 8:27 pm | जॉनविक्क

ठिकय, सध्या जे राक्षसी यांत्रिकीकरण होतंय त्याची भीती वाटते .पण बहुदा हा वाढत्या वयाचा परिणाम असावा, माणूस थांबला नाही थांबणारही नाहीच. आता चष्मा एकदा तपासून घ्यावा म्हणतो. :)

कुमार१'s picture

20 Jul 2019 - 2:31 pm | कुमार१

अभिनव कल्पना.

कोणताही शोध लागला किंवा तंत्र शोधलं की फक्त आणि फक्त त्याच्या उपयुक्त चेची चर्चा होते आणि ही एकांगी चर्चा त्या शोधाची परिपूर्ण माहिती देत नाही .
3d प्रिंटर ची दुसरी बाजू सुद्धा असणार तर त्या विषयी सुद्धा माहिती द्यावी

कॉम्प्युटर ,इंटरनेट आले तेव्हा हे माहीत नव्हतं (असेल सुधा लपवलं असेल)की तुमचा कम्प्युटर हॅक करून त्या माहितीत हवा तो बदल तिसरी व्यक्ती करेल
एटीएम कार्ड आले तेव्हा नाहीत नव्हतं की पिन नंबर शोधून तुमच्या खात्या मधून हवी तेवढी रक्कम कोण्ही काढू शकतो .
प्रत्येक नवीन तंत्र ज्ञान हे फक्त सोयीचं नसतं तर गैर सोयीचं सुद्धा असते .
त्या मुळे ३d प्रिंटर चा गैर वापर कसा होवू शकतो ह्याची माहिती असणे गरजेचे आ

अनन्त अवधुत's picture

23 Jul 2019 - 7:05 am | अनन्त अवधुत

कसले लोक आहेत. गाड्यांचा शोध लागला तेव्हा फक्त एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे सोईचे इतकेच सांगितले. प्रदूषणाबद्दल कोणीच नाही बोलले. शिवाय गाडीच्या चाकाखाली येऊन मृत्यू होऊ शकतो असे पण कोणी नाही सांगितले.
कोठलाही शोध हा कोणत्या बाजूने वापरायचा हे वापर करणाऱ्यावर ठरते. शिवाय एखाद्या शोधाचा गैर फायदा कोणी घेऊ लागले तर त्याला प्रतिबंध करणारी नवीन प्रणाली विकसित करण्यात येते, अथवा त्या शोधाच्या नवीन आवृत्त्या दुरुपयोगाला प्रतिबंध घालतात.
उदा. एटीम बद्दलच सांगायचे तर आधी प्रत्येक व्यवहाराची माहिती खातेधारकाला एसमेएस ने कळवायचे (अजून पण कळवतात) पण त्याशिवाय २ फॅक्टर ऑथ आले. म्हणजे एखादा अनपेक्षित व्यवहार दिसला तर बँक तो व्यवहार पूर्ण होऊ देत नाही, पण ग्राहकाकडून कॉन्फीर्मशन घेते (उदा. one time पासवर्ड ).
आता 3D तंत्रज्ञान वापरून कोणी घरीच बंदुका तयार केल्या तर?

जालिम लोशन's picture

22 Jul 2019 - 12:10 am | जालिम लोशन

छान लेख, मॅकेनिकल इंजिनिअरस् ला स्कोप राहिल इंडस्ट्रीमधे?

मॅकेनिकल इंजिनिअरिंगला स्कोप असेल की नाही माहित नाही. पण त्यांनतर खुले होणारे पर्याय कमी होणार नाहीत.

सुधीर कांदळकर's picture

23 Jul 2019 - 7:00 am | सुधीर कांदळकर

लेख वाचता वाचता मनातउमटणा र्‍या शंका जोजो वाचीत गेलो तो तो दूर होत गेल्या. नंतर आलेल्या तांत्रिक तसेच वाह्यात शंका प्रतिसादात दूर झाल्या. लक्ष लक्ष धन्यवाद. अर्ध्या लेख लिहिल्याबद्दल आणि बाकीच्या त्यात आता नवीन भर टाकल्याबद्दल.

मानवाच्या प्रगती पथावरचे भाष्य मस्त, तर्कसुसंगत आणि सहज पटणारे आहे.