✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रिंटरवर छापलेल्या विमानातून प्रवास करायला तयार व्हा !

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
Sun, 02/15/2015 - 01:12  ·  लेख
लेख
डोळे चोळू नका. तुमचे डोळे ठीक आहेत... आणि इथे टंकनचूकही झालेली नाही ! तंत्रज्ञांनी विमानाचे इंजिन "छापण्याचे" तंत्र विकसित केले आहे आणि जवळच्या भविष्यात तुम्ही त्या तंत्राने बनवलेले इंजिन आणि इतर भाग वापरून बनवलेल्या विमानातून प्रवास करू शकाल ! .

त्रिमिती छपाई (3D printing) अथवा संयोगी वस्तुनिर्माण (Additive Manufacturing, AM)

तसे बघितले तर 3D छपाई ही काही नवीनं गोष्ट नाही. हे तंत्र १९८० मध्ये नागोया मुनिसिपल इंडस्ट्रियल रिसर्च इंस्टिट्यूट (जपान) मधील हिदेओ कोदामा या तंत्रज्ञाने विकसित केले. त्याने संगणक आणि इंकजेट प्रिंटर तंत्रज्ञान वापरून बनवलेल्या खास रोबोच्या साहाय्याने प्रकाश पडल्यावर घन/कडक बनणाऱ्या पॉलिमरचे अनेक थर एकमेकावर रचून मूळ त्रिमिती वस्तू निर्माण केल्या. आज हे तंत्र खूपच विकसित झाले आहे आणि पॉलिमर बरोबर एकाच वेळेस प्लास्टिक, धातू, इ अनेक पदार्थ वापरून अत्यंत किचकट जडणघडण असलेल्या वस्तू बनवता येतात. ग्राहक उत्पादने, वाहन उत्पादने, अनेक उद्योगधंद्यात वापरली जाणारी यंत्रे; तसेच शिक्षण, ऊर्जा, जल, आर्किटेक्चर, वैद्यकीय, इ अनेक उद्योगांना पुरवठा केल्या जाणार्‍या आधुनिक यंत्रप्रणाल्या बनविण्यासाठी या तंत्राचा अधिकाधिक वापर होत आहे. या तंत्रामध्ये प्रथम जी वस्तू छापायची आहे तिचे संगणक प्रणाली (CAD) आणि 3D स्कॅनर वापरून एक संगणकीय प्रारूप (Computer model) बनवले जाते.

 संगणकीय प्रारुपाचे एक उदाहरण (Computer model)

नंतर ते प्रारूप वापरून छपाई-रोबो मूळ वस्तूप्रमाणे आपल्याला हवा असलेला पदार्थ (पॉलिमर, प्लास्टिक, धातू, इ) वापरून तिची हुबेहूब प्रतिकृती बनवतो. .

3D छपाई करणार्‍या रोबोंचे काही नमुने

 ......

.

 ......

.

 ......

.

3D छपाई करून बनवलेल्या काही वस्तू

 ......

.

 ......

.

 ......

.

 ......

.

 ......

.

 ......

.

3D छपाई आणि विमान उद्योग

इतकी प्रगती झाल्यावर या तंत्रज्ञानाने विमानबांधणीसारख्या टोकाच्या उच्च तकनिकी उद्योगाचेही लक्ष वेधून घेतले आहे. नोव्हेंबर २०१३ मध्ये झालेल्या "दुबई एअर शो" या जगप्रसिद्ध विमान उद्योग प्रदर्शनात GE Aviation ने दुबईच्या Emirates या विमानकंपनीबरोबर केलेल्या कराराने त्या उद्योगात खळबळ माजली. या विक्रमी कराराप्रमाणे तब्बल ११०० कोटी अमेरिकन डॉलर्स मोजून ३०० GE9X प्रकारची विमानाची इंजिने खरेदी केली जाणार आहेत आणि ती बोईंग कंपनीच्या १५० 777X प्रकारच्या विमानांत वापरली जाणार आहेत. 777X प्रकारची महाकाय विमाने ३५०-४०० प्रवासी घेऊन १५-१७००० किमी अंतर १५-१७ तासांत आणि एका दमात पार करू शकतात. अर्थातच अशी विमाने फायदेशीर होण्यासाठी त्यांची इंजिने मजबूत, अत्यंत अचूक बांधणीची, अत्यंत भरवशाची, देखभालीची कमीत कमी गरज असणारी, इंधन वाचवणारी आणि वजनाने हलकी असण्याची गरज असते. या सर्व अटी पुर्‍या करण्यासाठी त्या इंजिनांच्या बांधणीस खास पदार्थ (मटेरियल्स) वापरण्याबरोबरच, त्यांच्या बांधणीची प्रक्रिया १००० डिग्री सेल्सियस तापमानाला धातू वितळवणार्‍या लेझर किरणांचा उपयोग (Direct Metal Laser Sintering) करणारे 3D छपाईतंत्र वापरून करण्याचे GE Aviation ने ठरवले आहे. यासाठी तिने मॉरीस टेक्नॉलोजीज ही या तंत्रज्ञानातील अग्रगण्य कंपनी खरेदी केली आहे. त्यामुळे इंजिनाचे बहुतेक सर्व सुटे भाग GE Aviation आता स्वतःच्याच मालकीच्या कारखान्यात बनवू शकेल. या पद्धतीने बनविलेले पहिले इंजिन २०१६ मध्ये सर्वप्रथम Airbus A320neo, Boeing 737 MAX आणि Chinese COMAC C919 या विमानांत वापरले जाणार आहे. या प्रकारच्या ६००० विमानांचे साधारणपणे ६ कोटी उड्डाणतास पुरे होण्याच्या सुमारास हे नवीनं तंत्र 9X प्रकारच्या इंजिनांच्या उत्पादनात वापरले जाईल आणि Emirates ला या प्रकारचे पहिले 777X विमान २०२० साली मिळेल. एकंदरीत हे नवीनं तंत्र विमान बांधणी आणि प्रवास उद्योगात क्रांतिकारक बदल घडवून आणेल असे दिसत आहे.

 3D छपाई करून बनवलेला विमानाच्या जेट इंजिनाचा एक भाग

*** या लेखातील सर्व चित्रे जालावरील अनेक स्रोतांतून साभार घेतलेली आहेत. ***
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
26463 वाचन

💬 प्रतिसाद (81)

प्रतिक्रिया

कार बनवताना ह्या वेळच्या

मराठे
Tue, 02/24/2015 - 20:58 नवीन
कार बनवताना ह्या वेळच्या डेट्रोईट ऑटो-शो मधे पाहिलं आहे. हे तंत्रज्ञान मुख्यत्वे करून अंतराळ तंत्रज्ञान म्हणून प्रथम विकसित केलं गेलं. जर स्पेसस्टेशन वर एखाद्या गोष्टीची गरज लागली, (म्हणजे दुरुस्तीसाठी लागणारी हत्यारं वगैरे) तर तिथल्या शास्त्रज्ञांना पुढचं स्पेस शटल कधी येईल त्याची वाट बघत बसण्यापेक्षा जर तिथल्या तिथे ''प्रिंट' करून त्या वापरता येतील. (या पुढची स्टेप म्हणजे, स्पेस स्टेशनवर अन्न 'प्रिंट' करण्याचं तंत्रज्ञान सुद्धा विकसित झालेलं आहे पण अजून 'टेस्टींग' :) फेज मध्ये आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

नॅनो टेक्नॉलॉजिचा वापर कोटींग

मदनबाण
Tue, 02/24/2015 - 19:51 नवीन
नॅनो टेक्नॉलॉजिचा वापर कोटींग करण्यासाठी केल्यावर... बाकी paramagnetic paint ची कमाल पहा ! :) आणि टीपी म्हणुन Water Transfer Printing सुद्धा पहा :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्टॉप दॅट ! { Gambler }
  • Log in or register to post comments

कोणीतरी 3D प्रिंटर वापरून

मालोजीराव
गुरुवार, 02/26/2015 - 16:27 नवीन
कोणीतरी 3D प्रिंटर वापरून बंदूक बनवलेली ऐकली ते पण १००० रुपयात, या प्रिंटर चा असाही वापर होतो काय ?
  • Log in or register to post comments

अशी बंदूक छापून तिच्यातून खरी

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 02/26/2015 - 22:58 नवीन
अशी बंदूक छापून तिच्यातून खरी गोळ्या झाडून झालेल्या आहे. बंदूकीच्या गोळ्या छापण्याचे तंत्र मात्र अजून विकसित झालेले नाही :) हे घ्या त्या बंदूकीबद्दलचा व्हिडिओ (World's First 3D Printed Metal Gun) ... यु टुबमध्ये 3D printing of gun अशी विचारणा केल्यास अजून बरेच व्हिडिओ सापडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

25$ Gun

मालोजीराव
गुरुवार, 02/26/2015 - 16:33 नवीन
25$ Gun “Anywhere there’s a computer and an Internet connection, there would be the promise of a gun”
  • Log in or register to post comments

3D Printing: Make anything

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 02/26/2015 - 23:10 नवीन
3D Printing: Make anything you want... या रोचक व्हिडिओत त्रिमीती छपाईचे वैद्यकशास्त्रातले (कान, नाक, मूत्रपिंड, इ इंद्रिये छापण्यासाठी); पाककलेतले (चॉकलेट, केक, इ छापण्यासाठी) आणि इतर बरेच काही उपयोग पाहता येतील...
  • Log in or register to post comments

३डी मॅजिक गोष्टी बनविणारा पेन

क्रेझी
Fri, 02/27/2015 - 16:35 नवीन
3D मॅजिक पेन ३डी वस्तू कशा बनवू शकतो हे व्हिडीओ मधे बघा.
  • Log in or register to post comments

चांगली माहिती आहे.

जेपी
Fri, 02/27/2015 - 17:24 नवीन
चांगली माहिती आहे. अवांतर-नाय मंज उगीच एक प्रश्न पडला ह्या विमानातुन आपला नेहमीचा प्रिंटर घेऊन प्रवास करता येईल का ? उगी ईचारलेल बर ..कस्स!! *biggrin*
  • Log in or register to post comments

निस्तं इमानातून न्हाय,

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 02/27/2015 - 20:03 नवीन
निस्तं इमानातून न्हाय, राकेटमदूनबी त्येला अवकाशात (म्हंजी अंत्राळयानात, पर्ग्रहावर, वेग्रे) न्यायचा ईचार्बी हाय. म्हंजे आसं हाय बगा. तितं एखांदा यानाचा नायतर मशिनीचा पार्ट बोंबलला तर हितून माग्वायची सोय नस्ती ना ! आनी सग्ळ्या पार्टांचा लय मोट्टा ष्टाकबी नेता येत नाय. मंग काय काडायचा प्रिंटर भाईर आणि छापायचा हवा तो पार्ट हवा तेवा ! कशी काय आयड्या हाय ?!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

ब्येस हाये आयड्या. नॉर्थ पोल

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/27/2015 - 21:10 नवीन
ब्येस हाये आयड्या. नॉर्थ पोल एक्स्पेडिशन मधे ह्या प्रिंट झालेल्या एका प्रेशर सीलने टीमचे प्राणं वाचवल्याची बातमी आहे. दुवा मिळाला की टाकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

कृत्रीम अवयव निर्मीती

अर्धवटराव
Fri, 02/27/2015 - 20:20 नवीन
आता आमचा टोळ्भैरवांचा ग्रुप संसार सागरात पडुन थोडा शांत आणि सभ्य झालाय.... काहि वर्षांपुर्वी जर हि टेक्नोलॉजी आमच्य हाती लागली असती तर त्याच्या अत्यंत इनोव्हेटीव्ह उपयोगाच्या नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटा येतोय =))
  • Log in or register to post comments

उलट, आताही थंड डोक्याने

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 02/27/2015 - 20:59 नवीन
उलट, आताही थंड डोक्याने इनोव्हेशन केले तर हे सहजसाध्य आणि तुलनेने स्वस्त उपकरण घेऊन पुढचा बिलियनेर भारतातही बनू शकतो ! तर, चला उठा, 3D प्रिंटरने सुसज्ज व्हा आणि...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

बायको/गफ/सामान आणि वस्तू यात

टवाळ कार्टा
Sat, 02/28/2015 - 13:49 नवीन
बायको/गफ/सामान आणि वस्तू यात फरक अस्तो राव ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

वा!

पैसा
Fri, 02/27/2015 - 21:19 नवीन
मस्त धागा आणि चर्चा! अशी मोठी पॅनेल्स किंवा संपूर्ण घरे छापून घरे बांधणे स्वस्त केले पाहिजे म्हणजे गरीब लोकांना परवडतील अशी घरे काही प्रमाणात तरी मिळतील.
  • Log in or register to post comments

अतिशय माहितीपूर्ण धागा

मंदार कात्रे
Sat, 02/28/2015 - 20:08 नवीन
इस्पिकचा एक्का साहेब , कॅप्टन जॅक आणि गवि जी अतिशय आभार . सर्वच सदस्यांच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादांनी हा धागा अतिशय रोचक झाला आहे धन्यवाद
  • Log in or register to post comments

आता प्रिंटरवर छापलेल्या

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 04/28/2016 - 11:49 नवीन
आता प्रिंटरवर छापलेल्या इमारतीत रहायची तयारी करा !... Dubai plans to 3D print 25% of buildings by 2030
  • Log in or register to post comments

अद्भुत

सोनुली
Tue, 05/03/2016 - 00:16 नवीन
पहिल्यांदाच वाचत आहे याबद्दल. आणखी लिहावे.
  • Log in or register to post comments

छान माहीती, धन्यवाद

Ram ram
Tue, 05/03/2016 - 12:16 नवीन
छान माहीती, धन्यवाद
  • Log in or register to post comments

आज माध्यमांत ही बातमी दिसली.

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 07/20/2019 - 11:54 नवीन
आज माध्यमांत ही बातमी दिसली. Dubai developer Emaar to build 3D printed home in Arabian Ranches III दुबईतील Emaar Properties ही नामवंत बांधकाम कंपनीने तिच्या एका प्रतिष्ठित गृहप्रकल्पात त्रिमीती छपाई वापरून घरे बांधणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे, घरे लवकर आणि कमी खर्चात बांधली जातील असा दावा त्या कंपनीने केला आहे. अनेक क्षेत्रांत नवकल्पनांचा सर्वप्रथम वापर करण्यात दुबई जगाच्या पुढे एक पाऊल ठेवून आहे, हे परत एकदा सिद्ध होत आहे ! "संगणकाच्या उपयोगाची सीमा फक्त मानवी विचारशक्तीच्या भरारीच्या कक्षेनेच ठरवली जाईल" असे म्हटले जात होते. आता ते त्रिमीती छपाईच्याबाबतीतहि चपखलपणे लागू होते. अर्थात, त्रिमीती छपाई हा संगणकाचाच एक अविष्कार असल्याने ते सहजपणे होणार होतेच म्हणा.
  • Log in or register to post comments

सुंदर आहेच.

जॉनविक्क
Sat, 07/20/2019 - 13:30 नवीन
पण लेबर कमी होणार ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मानवाच्या आतापर्यंतच्या

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 07/20/2019 - 18:38 नवीन
मानवाच्या आतापर्यंतच्या प्रत्येक क्रांतीकारक विकसन पायरीवर, "आता अमुक अमुक लोक बेकारीने मरणार" असा हाकारा होतो. पण, आतापर्यंत तो हाकारा दर वेळेस खोटा ठरलेला आहे. बदलणार्‍या व्यवस्थेला चालवायला माणसांची गरज लागतेच, फक्त त्यांच्याकडे जरूर असणारी कौशल्ये वेगळी असावी लागतात... आणि, स्वतःहून म्हणा की जरूरीच्या रेट्यामुळे म्हणा, जरूर ती कौशल्ये आत्मसात करून माणसाने पूर्वीपेक्षा जास्त विकसित जीवनमान साध्य केले आहे. उदाहरणेच पहायची झाली तर खालील मोजके क्रांतीकारक कालखंड तपासून पाहता येतील... १. मानवाच्या/प्राण्यांच्या श्रमांवर अवलंबून असलेल्या वहातूकीच्या साधनांचा वापर ---> काही दशके अगोदर कल्पनेतही नसणार्‍या यांत्रिक वाहतूकीच्या साधनांचा (दुचाकी, चारचाकी, रेल्वे, विमान, इ) वापर. आताही, विजेवर चालणार्‍या गाड्या आल्यावर, यांत्रिक गाड्या तयार करणार्‍या उद्योगधंद्यांचे (आणि त्यात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे) काय होणार अशी सार्वजनिक (!) चिंता लागून राहिली आहेच... पण, त्या उद्योगधंद्यातील विचार्वंत धुरीणांनी काही वर्षांपूर्वीच रूळ बदलायला सुरुवात करून वीजेवर चालणार्‍या गाड्यांसंबंधी संशोधन सुरू केले आहे. २. यांत्रिक साधने व पूर्णपणे मानवी श्रम वापर करून उत्पादने तयार करणे व सेवा देणे ---> संगणकाचा वापर करून उत्पादने तयार करणे व सेवा देणे : हा बदल तर आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर दोनेक दशकांपूर्वी सुरू झाला आहे आणि अजून होत आहे. नव्वदीच्या दशकात तर, 'संगणकांमुळे जगभरात बेकारी माजेल" असा जोरदार हाकारा झाला होता आणि संगणकांच्या उपयोगाला बराच विरोध केला गेला होता. यामध्ये लक्षात ठेवण्याजोगी एक फार महत्वाची गोष्ट अशी की, बदलापूर्वीच्या प्रत्येक कालखंडापेक्षा बदलानंतरची लोकसंख्या बरीच मोठी होत गेलेली आहे. तरीही दर नव्या व्यवस्थेत बेकारी तर वाढली नाहीच पण प्रत्यक्षात मानवी जीवनमान सुधारले आहे. म्हणजे, दर नव्या व्यवस्थेने सतत वाढत्या नोकरी-व्यवसायाच्या संधी निर्माण केलेल्या आहेत. जे बदलांची दिशा वेळीच (किंबहुना, वेळेआधीच) जोखतात आणि स्वतःहून त्या बदलांना अनुरुप बदल घडवून आणतात, ते बदलांमुळे निर्माण होणार्‍या संधीचा भरपूर फायदा उठवतात (The early bird gets the worm). जे त्याबाबतीत मागे राहतात, त्यांना नाईलाजाने का होईना स्वतःत बदल घडवून आणावेच लागतात. उदा: १९८०-९०च्या दशकांत ज्यांनी संगणकाचे शिक्षण घेऊन ज्यांनी तो मार्ग स्विकारला (व ज्यांनी आपला पूर्वीचा मार्ग बदलला) त्यांना संगणकक्रांतीमुळे निर्माण झालेल्या नवीन संधी पटकावल्या. ज्यांनी ते करण्यात टाळाटाळ केली ते केवळ मागेच राहीले नाही तर त्यांना अखेरीस कोणत्या ना कोणत्या प्रकारचे संगणकशिक्षण घेणे भाग पडले आहे / पडत आहे. एकंदरीत, बदलाच्या संक्रमणकालामध्ये काही लोकांना अडचणींना तोंड द्यावे लागले आहे, पण बदल मुरल्यानंतरच्या काळात सगळे बर्‍यापैकी सुरळीत झाले आहे. ही एक प्रकारे, व्यवहारात दिसणारी डार्विनच्या सिद्धांताची पुष्टी आहे... "जो जीव बदलांना तोंड देऊ शकतो आणि / किंवा बदलांना तोंड देण्यासाठी स्वतःमध्ये आवश्यक बदल करू शकतो, तो टिकून राहतो." आतापर्यंत, वारंवार, हेच सिद्ध झाले आहे की, "दर बदलांमध्ये, आपल्या बुद्धीचातुर्याने, मानव केवळ टिकूनच राहीला नाही तर, तो अधिकाधिक समृद्ध होत गेला आहे" (Man has not only survived, but has prospered, with each change).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

खरंय परंतु

जॉनविक्क
Sat, 07/20/2019 - 19:13 नवीन
दर बदलांमध्ये, आपल्या बुद्धीचातुर्याने, मानव केवळ टिकूनच राहीला नाही तर, तो अधिकाधिक समृद्ध होत गेला आहे" (Man has not only survived, but has prospered, with each change).
आता challange त्याच्या या बुद्धीचातुर्यालाच निर्माण होत आहे म्हणून चिंता वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आता challange त्याच्या या

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 07/20/2019 - 19:53 नवीन
आता challange त्याच्या या बुद्धीचातुर्यालाच निर्माण होत आहे म्हणून चिंता वाटते. चिंता नको, बुद्धीचातुर्याला सतत मिळालेल्या आव्हाना(challange)मुळेच माणसाची गेल्या दहा-वीस लाख वर्षांची प्रगती झाली आहे आणि त्या दर आव्हानाचा सामना करताना बुद्धीचातुर्याचीसुद्धा* सतत प्रगती होत आहे ! जेवढे मोठे आव्हान तेवढे बुद्धीचातुर्य जास्त जोरात धावते. :) ****** * हे जरी मी मानवी समाजाच्या एकूण बुद्धीचातुर्याबद्दल बोलत असलो तरी, 'जी टाळकी कधीच सुधारणार नाहीत' असे वाटत असते, ती सुद्धा स्वतःला चटका लागू लागला की सरळ मार्गावर येतात. जी टाळकी फारच टोकाची निर्बुद्ध असतात, ती (स्वतःच्या कर्माने) भूतकाळात जमा होतात. डार्विनचा नियम ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

हम्म

जॉनविक्क
Sat, 07/20/2019 - 20:27 नवीन
ठिकय, सध्या जे राक्षसी यांत्रिकीकरण होतंय त्याची भीती वाटते .पण बहुदा हा वाढत्या वयाचा परिणाम असावा, माणूस थांबला नाही थांबणारही नाहीच. आता चष्मा एकदा तपासून घ्यावा म्हणतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

छान !

हेमंतकुमार
Sat, 07/20/2019 - 14:31 नवीन
अभिनव कल्पना.
  • Log in or register to post comments

3d, प्रिंटर वापरण्यात अडचणी काय येवू शकतात

Rajesh188
Sat, 07/20/2019 - 20:29 नवीन
कोणताही शोध लागला किंवा तंत्र शोधलं की फक्त आणि फक्त त्याच्या उपयुक्त चेची चर्चा होते आणि ही एकांगी चर्चा त्या शोधाची परिपूर्ण माहिती देत नाही . 3d प्रिंटर ची दुसरी बाजू सुद्धा असणार तर त्या विषयी सुद्धा माहिती द्यावी
  • Log in or register to post comments

गैरसमज करू नये मी विरोधी मत देत नाही

Rajesh188
Sat, 07/20/2019 - 20:53 नवीन
कॉम्प्युटर ,इंटरनेट आले तेव्हा हे माहीत नव्हतं (असेल सुधा लपवलं असेल)की तुमचा कम्प्युटर हॅक करून त्या माहितीत हवा तो बदल तिसरी व्यक्ती करेल एटीएम कार्ड आले तेव्हा नाहीत नव्हतं की पिन नंबर शोधून तुमच्या खात्या मधून हवी तेवढी रक्कम कोण्ही काढू शकतो . प्रत्येक नवीन तंत्र ज्ञान हे फक्त सोयीचं नसतं तर गैर सोयीचं सुद्धा असते . त्या मुळे ३d प्रिंटर चा गैर वापर कसा होवू शकतो ह्याची माहिती असणे गरजेचे आ
  • Log in or register to post comments

खरेच ना

अनन्त अवधुत
Tue, 07/23/2019 - 07:05 नवीन
कसले लोक आहेत. गाड्यांचा शोध लागला तेव्हा फक्त एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे सोईचे इतकेच सांगितले. प्रदूषणाबद्दल कोणीच नाही बोलले. शिवाय गाडीच्या चाकाखाली येऊन मृत्यू होऊ शकतो असे पण कोणी नाही सांगितले. कोठलाही शोध हा कोणत्या बाजूने वापरायचा हे वापर करणाऱ्यावर ठरते. शिवाय एखाद्या शोधाचा गैर फायदा कोणी घेऊ लागले तर त्याला प्रतिबंध करणारी नवीन प्रणाली विकसित करण्यात येते, अथवा त्या शोधाच्या नवीन आवृत्त्या दुरुपयोगाला प्रतिबंध घालतात. उदा. एटीम बद्दलच सांगायचे तर आधी प्रत्येक व्यवहाराची माहिती खातेधारकाला एसमेएस ने कळवायचे (अजून पण कळवतात) पण त्याशिवाय २ फॅक्टर ऑथ आले. म्हणजे एखादा अनपेक्षित व्यवहार दिसला तर बँक तो व्यवहार पूर्ण होऊ देत नाही, पण ग्राहकाकडून कॉन्फीर्मशन घेते (उदा. one time पासवर्ड ). आता 3D तंत्रज्ञान वापरून कोणी घरीच बंदुका तयार केल्या तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

सुरेख लेख आणी प्रतिक्रिया

जालिम लोशन
Mon, 07/22/2019 - 00:10 नवीन
छान लेख, मॅकेनिकल इंजिनिअरस् ला स्कोप राहिल इंडस्ट्रीमधे?
  • Log in or register to post comments

मॅकेनिकल इंजिनिअरिंगला स्कोप

जॉनविक्क
Mon, 07/22/2019 - 00:22 नवीन
मॅकेनिकल इंजिनिअरिंगला स्कोप असेल की नाही माहित नाही. पण त्यांनतर खुले होणारे पर्याय कमी होणार नाहीत.
  • Log in or register to post comments

विस्मयकारक, सुंदर ......

सुधीर कांदळकर
Tue, 07/23/2019 - 07:00 नवीन
लेख वाचता वाचता मनातउमटणा र्‍या शंका जोजो वाचीत गेलो तो तो दूर होत गेल्या. नंतर आलेल्या तांत्रिक तसेच वाह्यात शंका प्रतिसादात दूर झाल्या. लक्ष लक्ष धन्यवाद. अर्ध्या लेख लिहिल्याबद्दल आणि बाकीच्या त्यात आता नवीन भर टाकल्याबद्दल. मानवाच्या प्रगती पथावरचे भाष्य मस्त, तर्कसुसंगत आणि सहज पटणारे आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा