✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

महाभारताची वेगळी कथा...

म
माधुरी विनायक यांनी
Fri, 06/27/2014 - 17:38  ·  लेख
लेख
आज थोडं वेगळं लिहू का... माझं वाचन नियमीत सुरू असतं. मुख्यत्वे मराठी आणि बऱ्यापैकी इंग्रजी. शिवा ट्रायॉलॉजी वाचल्यानंतर पौराणीक साहित्य वाचायला आवडू लागलं. पुराणातल्या माहिती नसलेल्या अनेक गोष्टी जाणून घ्यायची ओढ लागली आणि हाती लागेल तसं बरंच काही वाचत गेले. अशीच एक कथा. फार कमी लोकांना माहिती असावी, म्हणून इथे लिहावी, असं वाटलं. ही गोष्ट आहे कौरव-पांडवांची. पंडुच्या मृत्युनंतर पाच पांडवांना घेऊन कुंती हस्तिनापुरात परतलेली. वनात जन्मलेले, लहानाचे मोठे होणारे पाचही पांडव जरासे दांडगटच. युधिष्ठीर त्यातल्या त्यात शांत, सौम्य. साधारण तसेच नकुल-सहदेव. अर्जुन पितामह भिष्मांच्या कौतुकाने स्वत:च्या आणखी कौतुकात रमलेला तर भीम आपल्या अद्वितीय शक्तीच्या अहंकारात बुडालेला. कौरव-पांडव खरं तर भावंडंच. ती सुद्धा समवयस्क. एकत्र खेळ, वाद विवाद आणि भांडणंही रोजचीच ठरलेली. एके दिवशी खेळताना असंच काही भांडण झालं आणि कौरव रडत-रडत पितामह भिष्मांकडे आले. पितामहांनी मुलांना जवळ घेतलं आणि रडण्याचं कारण विचारलं. कौरवांनी उत्तर देत सांगितलं, त्या पांडवांनी आम्हाला चिडवलं... विधवेचे पुत्र म्हणून... भिष्म चकित झाले. त्यांनी विचारलं, कोण चिडवत होतं तुम्हाला? कौरव उत्तरले, ते पाचही जण. अगदी युधिष्ठीर सुद्धा... आता पितामहांच्या भुवया आक्रसल्या. मी बोलतो त्यांच्याशी, असं म्हणून कौरवांना पाठवून दिलं आणि स्वत: विचारात गढले. युधिष्ठीर सत्यच बोलणार, याची खात्री होती. काही वेळ विचार करून पितामहांनी तातडीने गुप्तहेरांना योग्य त्या सूचना देऊन गांधार देशी रवाना केलं. अल्पावधीत परतलेल्या गुप्तहेरांकडून कळलं, ते अचंबित करणारं होतं. गांधारीच्या जन्म पत्रिकेत पहिल्या पतीच्या मृत्युचा योग होता. त्यावर तोडगा म्हणून गांधारीचा विवाह एका बोकडाशी करायचा आणि नंतर त्या बोकडाचा बळी द्यायचा, असा तोडगा राज ज्योतिषाने सुचवला. अतिशय गुप्त पद्धतीने हा विधी पार पडला. यथावकाश गांधारी धृतराष्ट्राशी विवाहबद्ध झाली. मात्र तिच्या पहिल्या विचित्र विवाहाची कल्पना कुरू कुलात कोणालाही देण्यात आली नाही. हा वृत्तांत ऐकून पितामह संतापले. त्यांनी गांधारीला बोलावून घेतलं आणि विचारलं. गांधारीने घाबरत संकोचत सारं काही मान्य केलं. क्षमायाचनाही केली. चेहरा शक्यतो निर्वीकार ठेवत पितामहांनी तिला जायला सांगितलं. फसवणुकीने संतापलेल्या पितामहांनी गांधार देशी सैनिकांची तुकडी पाठवली. गांधारीचे वडील आणि तिन्ही भावांना कैद करून हस्तिनापुरात आणलं. झाल्या गोष्टीची शहानिशा केली आणि त्या चौघांनाही तळघरात डांबलं. गांधारीने खूप विनवण्या केल्या, पण पितामहांनी त्यांना मुक्त करण्यास ठाम नकार दिला. त्या चौघांनाही जेमतेम जिवंत राहता येईल, इतकंच अन्न देण्याचा पितामहांचा आदेश होता. थेट हत्येचं पातक नको होतं. ही बाब काही काळाने गांधारीच्या पित्याच्या लक्षात आली. त्याने खूप विचार केला आणि आपल्या तिन्ही मुलांशी संवाद साधला. आपल्यापैकी किमान एकाला तरी जगवायचा प्रयत्न करू. आपल्यावरच्या अन्यायाचा बदला घेण्याचा शेवटचा प्रयत्न करू. मुलांनी सहमती दर्शवली आणि सर्वानुमते धाकट्या शकुनीला जास्तीत जास्त अन्न देऊन जगवण्याचं ठरलं. कालांतराने शकुनीच्या दोन्ही भावांचे निधन झालं. प्रत्येक भावाच्या निधनानंतर गांधारीने विलाप केला, पितामहांची करूणा भाकली. पण ते द्रवले नाहीत. होता-होता गांधारीच्या पित्याचा अंत जवळ आला. त्यांनी शकुनीला जवळ बोलावलं. जवळचा एक ओंडका मागून घेतला आणि सर्व त्राण एकवटून त्या ओंडक्याने शकुनीच्या पायावर वार केला. शकुनी पंगु झाला, चिडला. पित्याने अतिव प्रेमाने पुन्हा त्याला जवळ बोलावलं. म्हणाला, आता माझा शेवट जवळ आलाय. माझ्यानंतर तुला वाचवण्यासाठी गांधारी शर्थीचे प्रयत्न करेल. तू शक्यतो जिवंत राहशील. पण तुझं उरलेलं आयुष्य आमच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी आहे, हे लक्षात असू देत. तुझा हा मोडलेला पाय, प्रत्येक पावलावर तुला या कर्तव्याची आठवण करून देत राहील... थोड्याच वेळात गांधार नरेशही मरण पावला. दोन भावांच्या मृत्युनंतर पित्याच्याही मृत्युने गांधारी कोसळली. शकुनीला अभय द्या किंवा मलाही त्याच पद्धतीने मरू द्या, असं म्हणत पितामहांच्या पावलांवर कोसळली. पितामहांना तोवर आपल्या वागण्याच्या योग्यायोग्यतेबाबत संदेह वाटू लागला होता. त्यांनी शकुनीला अभय दिलं... शकुनी हस्तिनापुरातच वाढू लागला... आणि पुढे सर्वज्ञात महाभारत घडलं... ** काही महिन्यापूर्वी कुठेशी वाचनात आलेली ही कथा. आठवली तशी लिहून काढलीय.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
21126 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

अतिरेकी प्रतिसादै ओ पैसातै.

arunjoshi123
Mon, 06/30/2014 - 18:48 नवीन
अतिरेकी प्रतिसादै ओ पैसातै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

लै फेमस मेसेज होता!

पैसा
Mon, 06/30/2014 - 19:27 नवीन
तुम्हाला कोणी पाठवला नव्हता? गांधीजींचं स्वप्न पुरं झालं टैप! पिव्वर जोक!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

नविनच कथा कळली.छान लिहिलय

इशा१२३
Sat, 06/28/2014 - 21:19 नवीन
नविनच कथा कळली.छान लिहिलय.सर्व प्रतिसादही माहितीपुर्ण.
  • Log in or register to post comments

महाभारतावरील सचित्र लेख

चित्रगुप्त
Sat, 06/28/2014 - 21:49 नवीन
ही कथा प्रथमच ऐकली. रोचक वाटली. महाभारतावरील माझे काही (सचित्र) लेख: सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १,२ ३ ) http://www.misalpav.com/node/25328 महाभारत (भाग १,२,३): http://www.misalpav.com/node/26965
  • Log in or register to post comments

कथा आवडली. पण ही अभ्यासातून

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 06/28/2014 - 22:01 नवीन
कथा आवडली. पण ही अभ्यासातून पुढे झालेली आहे की कल्पनेतून ?
  • Log in or register to post comments

चर्चाविषय व एकुणच चर्चा रोचक

कानडाऊ योगेशु
Sat, 06/28/2014 - 23:39 नवीन
चर्चाविषय व एकुणच चर्चा रोचक आहे. शकुनि व शल्य दोघेही महाभारत युध्दात एक विशिष्ठ भूमिका घेऊन आले होते. त्याकाळी ज्या राजपुरुषांचा विवाह होण्यात काही अडचणी येत असत त्या पुरुषांची राजघराणी मद्र देशातुन द्र्वय देऊन वधु मिळवित असत थोडक्यात लग्नासाठी मुली विकत घेतल्या जात असत व त्यांच्याशी ह्या पुरुषांचा विवाह लावण्यात येईल. माद्रीचा पांडुशी विवाह हा असाच प्रकार होता. गांधार देशातील राजघराण्यांवर धाकदपटशा/युध्दे लादुन तेथील स्त्रियांशी विवाह लावले जात. भीष्माने लावलेला धृतराष्ट्राचा गांधारीशी विवाह हा ह्याचे उदाहरण आहे. शकुनि कुरूवंशाचे कंबरडे मोडायच्या उद्देशानेच हस्तिनापुरात तळ ठोकुन होता.कोणाचीही बाजु घेतली असती तरी त्याला कौरवपांडवात असलेल्या भाऊबंदकीचा फायदा घेऊन दोघांत महायुध्द व्हायलाच हवे असेच त्याचे राजकारण होते. कारण महायुध्द झाल्यानंतर एकुणच आर्यावर्त इतका दुबळा झाला कि त्यानंतर गांधारांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत त्यानंतरचा आर्यावर्तातील कोणीही राजा करु शकला नाही.भीष्माला हे राजकारण कळत असुनदेखील केवळ प्रतिज्ञेच्या परिपूर्ततेपायी त्याला हा सर्व प्रकार स्वीकारावा लागला. कृष्णाला ही शकुनिचे राजकारण वेळीच लक्षात आले होते त्याने त्यातल्या त्यात एकुणच यादवांना व यादवसेनेला ह्या युध्दापासुन तशी फारशी झळ पोहोचणार नाही ह्याची काळजी घेतली.
  • Log in or register to post comments

खरी असो वा खोटी रोचक कथा,

तुमचा अभिषेक
Sun, 06/29/2014 - 11:51 नवीन
खरी असो वा खोटी रोचक कथा, बरेच प्रतिसाद मात्र अभ्यासपुर्ण !
  • Log in or register to post comments

माझ्याही माहितीत भरपूरच भर पडली.

माधुरी विनायक
Mon, 06/30/2014 - 11:00 नवीन
सर्व प्रतिसाद आत्ता वाचले. खूप अभ्यासपूर्ण आणि वेगळी माहिती मिळाली. विशेषत: उगोलिनो ची कथा. या व्यक्तिरेखेबद्दल मला काहीच माहिती नाही. हे नावही मी पहिल्यांदाच वाचलं. अधिक जाणून घ्यायला आवडेल. वल्ली, मृत्युंजय, कानडाऊ योगेशु, विकास, आगाऊ कार्टा, मराठे, स्वॅप्स, बॅटमॅन आणि आपणा सर्वांच्याच प्रतिसादांतून नवीन माहिती मिळाली. मी ही कथा वाचली, मला अचंबा वाटला. माझ्याच प्रमाणे आणखी काही जणांना ही कथा माहिती नसेल आणि जाणून घ्यायला आवडेल असं वाटलं, म्हणून इथे सादर केली. कथेच्या सत्यासत्यतेबाबत माझा काहीच दावा नाही. अशाच आणखीही काही कथा वाचनात आल्या आहेत. यापुढे जमेल तशा त्या सुद्धा इथे सादर करीत जाईन. पुन्हा एकदा सर्वांचेच आभार.
  • Log in or register to post comments

ओंडक्याने शकुनीच्या पायावर

विजुभाऊ
गुरुवार, 07/03/2014 - 14:04 नवीन
ओंडक्याने शकुनीच्या पायावर वार केला. शकुनी पंगु झाला,
हे चुकीचे आहे. चोप्रांच्या महाभारत मालीकेत गुफी पेंटल या कलकाराने तो रोल केला होता. तो एका पायाने अधू असल्यासारखा चालत असे. अन्यतः महाभारता कुठेच शकुनीच्या पंगडेपणाबद्दल उल्लेख आलेला नाही. महाभारतात प्रमुख पात्रांच्या व्याधीम्बद्दल उल्लेख आलेले आहेत उदा:पंडू हा पंडू रोगी ( अ‍ॅनिमीक , भुर्‍या ) होता. धृतराष्ट्र हा अंध होता. शिखंडी हा तृतीयपम्थी होता. इत्यादी
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा