पंडित भगवानलाल इंद्रजी
लेखनविषय (Tags)
The Asiatic Society of Bombay च्या Gallery of Excellence या नावाच्या एका प्रकाशनामध्ये पण्डित भगवानलाल इंद्रजी यांच्या विषयी एक चरित्रात्मक लेख आहे. हे लिखाण प्रताधिकाराखाली असल्याने थेट भाषांतर देता येणार नाही, पण कदाचित गोषवारा देता येईल.
पंडित भगवानलाल यांचा जन्म ७-११-१८३९ रोजी सौराष्ट्रातील जुनागढ येथे झाला. तिथे त्या काळी इंग्रजी शिक्षणाची सोय नव्हती. पण संस्कृत भाषा आणि आयुर्वेदउपचारपद्धतीचे शिक्षण मात्र त्यांना मिळाले. गिरनारच्या वाटेवरील पाषाणलेखाने लहानपणीच त्यांना या विषयी कुतूहल निर्माण झाले आणि पुढे पुराभिलेख आणि नाणकशास्त्राचा अभ्यास हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय बनले. त्यांनी मोठ्या चिकाटीने या लेखाविषयीचे सर्व प्रकाशित वाङ्मय जमा केले आणि ती लिपी आणि भाषा शिकून घेऊन लेखातील मजकुराचा उलगडाही केला. पुराभिलेख वाचनातील त्यांच्या तज्ज्ञतेची माहिती काठियावाड संस्थानचे तत्कालीन पोलिटिकल एजंट ए. के. फोर्ब्स यांच्यापर्यंत पोचली आणि त्यांनी मुंबईचे प्राच्यविद्यातज्ज्ञ डॉ. भाऊ दाजी लाड यांच्याकडे भगवानलाल यांची शिफारस केली. डॉ. भाऊ दाजींनी त्यांना आपल्याकडे बोलावून घेतले. बावीस वर्षांचे भगवानलाल मुंबईस आले आणि आयुष्यभर भाऊ दाजींचे परमशिष्य बनून राहिले. भाऊ दाजी एक नामांकित डॉक्टर होते. ग्रँट मेडिकल कॉलेजातून उत्तीर्ण झालेल्या पहिल्या आठ जणांमधले ते एक होते. वैद्यकीच्या अतिशय यशस्वी व्यवसायामुळे त्यांच्या आवडीच्या प्राच्यविद्येमध्ये लक्ष घालण्यास पुरेसा वेळ त्यांना मिळत नसे. तीक्ष्ण प्रज्ञा आणि निरीक्षणशक्ति असलेले भगवानलाल डॉ. भाऊ दाजींचे ज्ञानचक्षु बनले. त्यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन पुरावे, साधने गोळा करावीत, नोंदी काढाव्यात आणि भाऊंनी त्यांचे विश्लेषण करावे अशी कार्यविभागणी झाली. त्या काळी प्रवास अतिशय खडतर होता. रस्ते, पूल, काहीही नव्हते. तरीही ते अजिंठा, नाशिक, जुन्नर, पितळखोरा, ओडिशा,बनारस, मथुरा, अगदी नेपाळ, तिबेट, बलुचिस्तानपर्यंत हिंडले. त्यांच्या प्रवासाच्या तपशीलवार नोंदी त्यांनी गुजरातीतून लिहून ठेवल्या आहेत.
डॉ. भाऊ दाजींच्या अकाली मृत्यूनंतर त्यांचे कार्य भगवानलाल यांनी पुढे सुरू ठेवले. नाणकशास्त्र-विशेषतः क्षत्रपांची नाणी- आणि भारत व नेपाळातील पुराभिलेख यांवर त्यांनी संशोधन केले, माहिती जमवली आणि ती गुजरातीतून प्रसिद्ध केली. पुढे या लेखनाची इंग्रजीमध्ये भाषांतरे झाली आणि Indian Antiquary मध्ये प्रसिद्ध झाली.
गुजरातचे गॅझेटिअर लिहिण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. तत्पूर्वी ए.के.फोर्ब्स यांनी लिहिलेला गुजरातचा इतिहास इसवी सनाच्या दहाव्या शतकापासून सुरू होत होता. भगवानलालांचे गिरनारशिलालेखवाचन आणि इतर संशोधन यांमुळे तो मौर्यकाळापर्यंत म्हणजे इसवीसनपूर्व चौथ्या शतकापर्यंत मागे खेचला गेला. भगवानलालांनी भारतीय नाणकशास्त्राची आणि गुजरातच्या इतिहासलेखनाची पायाभरणी केली असे म्हणता येईल.
इ.स. १८८२ मध्ये वसई तालुक्यातल्या नाळा-सोपारा येथे त्यांनी केलेले उत्खनन ही प्राच्यविद्या आणि पुरातत्त्वशास्त्र यांमधील एक अत्यंत महत्त्वाची कामगिरी ठरली. तेथील स्तूपाच्या उत्खननात त्यांना एका दगडी पेटार्यात बुद्धाचे अवशेष आणि त्याभोवती अगदी वेगळे असे आसनस्थ बुद्धाचे इसवीसनाच्या आठव्या नवव्या शतकातले ब्रॉन्झचे आठ पुतळे सापडले. त्यांच्या ह्या संशोधनामुळे भारतीय आणि युरोपीय विद्वद्वर्तुळात आणि श्रीलंकेतल्या बौद्धजनांत प्रचंड खळबळ उडाली. त्यांनी या शोधावर केलेले लेखन अद्यापही प्रमाण मानले जाते आणि संदर्भासाठी वापरले जाते.
त्यांच्या विद्वत्तेचा भारतात आणि भारताबाहेरही सन्मान झाला. मुंबई सरकारने सन १८८२ मध्ये त्यांची मुंबई विश्वविद्यालयाचे फेलो म्हणून नेमणूक केली. इंडियन एपिग्राफीमधल्या त्यांच्या योगदानामुळे Royal Asiatic Society of Great Briton and Northern Ireland मध्ये ते ऑनररी फेलो म्हणून निवडले गेले. इतरही अनेक देशी परदेशी सन्मान त्यांना लाभले.
मुंबई इलाख्याच्या गॅझेटीअरमध्ये गुजरातच्या सर्वंकष इतिहासावर लिहिण्यासाठी ते अनेक वर्षे साधनसामग्री गोळा करीत होते. पण त्यांच्या अकाली मृत्यूमुळे ते काम त्यांच्या हातून पूर्ण होऊ शकले नाही. नंतर त्यांनी जमवलेल्या साधनांनिशी गुजरातचा प्राचीन इतिहास सिद्ध केला गेला.
पंडित भगवानलाल इंद्रजी हे १६-३-१८८८ रोजी वयाच्या अवघ्या एकोणपन्नासाव्या वर्षी मृत्यू पावले. त्यांनी केलेल्या मृत्युपत्रानुसार त्यांचा सर्व नाणेसंग्रह, हस्तलिखिते, पुराभिलेख ,ऐतिहासिक महत्त्वाच्या वस्तू त्यांनी निर्देशिलेल्या सामजिक संस्थांना दान करण्यात आल्या. त्यापैकी हस्तलिखिते एशियाटिक सोसायटीला मिळाली. त्यांनी असे लिहून ठेवले होते की ही हस्तलिखिते डॉ. भाऊ दाजींच्या हस्तलिखितसंग्रहाशेजारी ठेवावी आणि त्या कपाटावर 'भगवानलाल इंद्रजी, डॉ. भाऊ दाजी यांचे शिष्य' असे लिहिले जावे.
प्रतिक्रिया
कायम नाव ऐकतो पण यांच्याबद्दल
नाणकशास्त्राबद्दल काही
छान
इंद्राजी
मराठी विश्वकोशात इंद्रजी
सहमत.
छान लेख...
परिचय आवडला.
माहितीपूर्ण भर
या शिलालेखावर लेख लौकर येऊदेत
लिहिन लवकरच.
शेल्डन पोलॉकची मीमांसा
सुरेख
>>>गौतम बुद्धाचे अस्सल अवशेष
नेमकं काय होतं?
एक अतिशय महत्वाच्या पण
उत्तम माहिती
जबरदस्त आवडला
कृतज्ञता.
+१००
बापरे...त्याकाळी जवळ जवळ
सुंदर माहिती, अनेकांनी
भाषांतरे, आयुर्मर्यादा इ.
थोडी दुरुस्ती
अर्थातच ग राही. राजस्थानातील
लेख आवडला!
अप्रतिम लेख!
अप्रतिम लेख
अपरिचित व्यक्तिमत्वाच्या माहितीचा धागा