'जय हो!' आख्यान
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
तर आता असं बघा, सलमानचा 'जय हो!' चित्रपटगृहामध्ये झळकलेला आहे. सलमानच्या प्रतिमेला साजेसा चित्रपट असेल या अपेक्षेने जनतेने चित्रपटगृहाकडे पावले वळवली खरी परंतु घात झाला, पावले थिजली, नजरा स्तब्ध जाहल्या, हात शिट्ट्या मारण्यासाठी ओठांकडे न जाता गपगुमान खिशात गेले, पायाच्या बोटांनी शरमेने मान खाली घातली, चेहरे सुकले, हसू मावळलं, हळद रुसली, कु़ंकू हसलं...असे काय बरे जाहले?
चित्रपट सुरु होतो ते एका युवतीच्या अपहरणाच्या प्रसंगाने. भीषण गुंड कंपनी (कुठल्याही गुंठामंत्र्याच्या पिलावळीचं रिकामटेकडं टोळकं इमॅजिन केलंत तरी चालेल; सध्या गुंडगिरीचं भलंमोठं कंत्राट त्यांनाच मिळालयं) एका मुलीला पळवून घेऊन जाण्यासाठी तिच्या घरीच येतात. पण त्या युवतीची आई भलतीच स्मार्ट आणि धाडसी असते. तिच्या मुलीला पकडून गाडीमध्ये टाकतांना आईच्या चेहर्यावर मात्र कोलगेट स्माईल असतं. आपले ३०-३५ दात दाखवत ती आपल्या मुलीला पटकन गाडीत बसायला सांगते. आपल्याला ही बाई हुकली की काय असा संशय येतो. पण लगेच येतो एक भयंकर ट्विस्ट! ती मुलीला म्हणते, "बैठ जाओ उनकी गाडी में, वैसे भी तुम्हे गेट तक ही तो जाना हैं...". आपण सगळे हैराण, भयाण, परेशान! तिच्या गेट-कोलगेटचं गौडबंगाल आपल्या काही लक्षात येत नाही. मग ती झोकात एक फोन लावते, "जय बेटा..." असं म्हणून सुरुवात करते. मग आपल्या टाळक्यात मलैका अरोराच्या कमरेच्या नखरेल झटक्याप्रमाणे अचानक लख्खकन प्रकाश पडतो. अरे ये तो अपना सल्लू भाई होयेंगा...क्या? आणि खरोखर सलमान एखाद्या वीरयोद्ध्याप्रमाणे त्या गृहनिर्माण संस्थेच्या सीमेवर येऊन थडकतो. त्याच्या सोबत त्याचे दुय्यम कलाकार मित्र (की भाऊ? की साडू? की मेहुणे? जाऊ द्या...) पण असतात. अश्मित पटेल आणि यश टोंक असे या दुय्यम-तिय्यम कलाकारांची नावे. मग काय विचारता, ते तिघे गुंडांवर असे तुटून पडतात की काही विचारू नका. सगळे गुंड यथावकाश मरणासन्न अवस्थेला पोहोचतात. साधारण ४०-५० गुंडांना सलमान आणि त्याची दोन माकडे असे फक्त तीन जण काही क्षणांमध्ये लोळवतात. सलमान कुणाला मारतांना शोभतो तरी, पण अश्मित पटेल? यश टोंक? तेलकट, गिळगिळीत चेहर्याचे हे दोघे कुणाला मारणं तर सोडाच (अगदी माशा मारणं देखील इन्क्लुडेड), नुसत्या टाळ्या तरी जोरजोरात पिटू शकतील की नाही इतपत शंका यावी. आणि टाळ्या पिटत उड्या मारायच्या सांगीतल्या तर खल्ल्लास! एका वेळी दोन-दोन कामे? मोगलाई लागून चालली आहे की काय? असो. इथे जय अग्निहोत्री म्ह्णजेच सलमानची दमदार ओळख होते.
अशी अगदी सलमान-योग्य नोटवर चित्रपटाची सुरुवात झाल्यावर आपण जरा सरसावून बसतो. आता सुखाच्या अनेकविध लाटा आपल्यावर येऊन आदळणार असतात. तिखट-मसालेदार संवाद, खटकेबाज गाणी, एखादा मदमस्त नाच, सलमानची एकदम कडक ईष्टाईल्, स्टायलिश आणि विनोदी मारामारी...असं काहीतरी चटकदार चाखायला मिळेल या आशेने मायबाप प्रेक्षक उपाशीपोटी येऊन बसतात. धूम ३, क्रिश ३, क्लब ६० वगैरे चित्रपटांमुळे त्यांची पोटे खपाटीला गेलेली स्पष्ट दिसत असतात. आकड्यांचे हे चित्रपट बघून प्रेक्षकांना आकडी येण्याचे बाकी असते. शाहिद कपूरच्या 'राजकुमार'ने त्यातल्या त्यात भूक जस्ट भागवली असल्याचे जाणवते पण तिथे ही खुद्द शाहीद कपूर आडवा आलेला असतो. खूप भूक असली म्हणून काय झालं? साबुदाण्याची पेज चिकन मसाल्यात घोळून-घोळून तरी किती खाणार? आधीच 'फटा पोस्टर निकला हीरो' एक भयंकर दु:स्वप्न समजून प्रेक्षक कसे बसे पुढे सरकलेले असतात. एनीवे, सुरुवात तर अपेक्षेप्रमाणे झालेली असते. उकिडवे बसलेले मायबाप प्रेक्षक हळूच पाय मुडपून थोडे आरामशीर बसतांना दिसतात.
जय अग्निहोत्री हा सत्कॄत्योरीया आणि मदतकर्ण असे दोन विकार झालेला कधी-काळी सैन्यातून काढला गेलेला एक अधिकारी असतो. जिथे-तिथे लोकांना मदत करायची अशी त्याची प्रतिज्ञा असते. इथेच चित्रपटाची गोची सुरु होते. एखाद्या लहान मुलाची शी झाल्यावर त्याच्यामागे धावणारी त्याची आई आणि तिच्यामागे एक फडके, हगीजचे एक पॅक, पाणी, आणि चेहर्यावर "तुम्ही कशाला त्रास घेता काकू? पडल्या-बिडल्या तर उगीच हात पाय मोडून घ्याल. मैं हैं ना..." असे भाव घेऊन सुसाट धावणारा सलमान कुणाला बरे भावेल? पण इथे नेमके तेच घडते. म्हणजे अगदी तो काही हगीजचे पॅक घेऊन समाजाची सफाई करायला जात नाही पण त्याचे तत्व तेच असते. संपलं! "तुम्हारे बदन मे इतने छेद करुंगा की तुम कन्फ्युज हो जाओगे कि सांस कहां से ले और क्षादे कहां से" असं म्हणून धुलाई करणारा सलमान कुठे आणि हगीज घेऊन सफाई करण्यासाठी धावणारा सलमान कुठे! असं हे 'पा' ला 'क्षा' ने रिप्लेस केलं तर रसिक प्रेक्षकांची 'पां'चाईत होणारच.
पुढे अगदी ठरल्याप्रमाणे जय डायरेक्ट राज्याच्या गृहमंत्र्याला डिवचतो. महाराष्ट्राचा गृहमंत्री दशरथ सिंग आणि त्याची मुलगी कविता सिंग-पाटील हे पिसाळल्यागत जयच्या मागे लागतात. कविता सिंग-पाटील तर सुरा वगैरे घेऊन हिंडणारी फूलन असते. तिच्या नामाचा आणि तिच्या कर्माचा अर्थाअर्थी संबंध नसतो. तिच्या नवर्याचं आडनाव पाटील असतं म्हणून तिचं हे विनोदी नाव सहन करावं लागतं. डॅनी म्हणजे दशरथ सिंग आश्चर्यकारकरीत्या शांतपणे बोलतो. डॅनी, मनोज वाजपेयी, आशुतोष राणा, गोविंद नामदेव, शरद पोंक्षे, नाना पाटेकर, राजपाल यादव या मंडळींनी बहुधा एकत्र बसून तारस्वरात एक शपथ घेतलेली आहे. १४० डेसिबलपेक्षा कमी आवाज वापरून आणि चेहर्याचे कमीत कमी ८०% स्नायू तटतटून फुगवल्याशिवाय अभिनय केला तर ताबडतोब "रसिक प्रेक्षकहो, क्षमा करा!" असा नसा फुटण्याएवढा प्रचंड मोठा टाहो फोडून आजन्म श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात सेवक म्हणून नोकरी धरायची. डॅनीने थोडं टाईम-प्लीज करून ही शपथ मोडलेली आहे. त्याची लाडाची लेक कविता ही उणीव काही अंशी भरून काढते.
तर भानगड अशी होते की जय डॅनीच्या एका कुत्र्याला (म्हणजे खरा कुत्रा नाही हो; ते असतात ना दाढी आणि मान खाजवत-खाजवत हीरोची खिल्ली उडवणारे, ते!! पूर्वी मॅकमोहन, सुधीर करायचा बघा अशी कामे.) आणि नंतर जावयाला (मुकुल देव - हा कोण? विचारु नका. बहुतेक सुश्मिता सेनच्या पहिल्या चित्रपटात (दस्तक) मध्ये नायक म्हणून आला होता) बदड-बदड बदडतो. कारण हेच की त्याच्या बहिणीला (तब्बू) ते छेडतात. नंतर हा जय जो-जो दिसेल त्याला धू धू धुतो. मध्येच तब्बू डॅनीला "इस बार तुम गलत आदमी से भिड गये" असा आणि त्यावर सलमान "मेरी बहन कभी झूठ नही बोलती" अस शेरास सव्वाशेर डायलॉक मारून डॅनीला आणखी भडकवतात. जयच्या नावातच जय असते त्यामुळे तो राज्याच्या गृहमंत्र्याला अक्षरशः सळो की पळो करून सोडतो. इतकं सळो की पळो की शेवटी मुख्यमंत्र्याला मांडवलीसाठी मध्ये उतरावं लागतं. मोहनीश बहल अजून चित्रपटसृष्टीत शिल्लक आहे हे हा चित्रपट बघून कळलं. तो आपले धारदार नाक अजूनच टोकदार करत डॅनीला 'सुलह' करण्याचा सल्ला देतो आणि स्वत: जयला घेऊन डॅनीच्या घरी जातो. तिथे डॅनी तयार बसलेलाच असतो. तो गप्पकन मुख्यमंत्र्याच्या पोटात जंबिया खुपसतो. बघा हं, प्रसंगातलं काव्य बघा! नाट्य बघा! गृहमंत्री गप्पकन मुख्यमंत्र्याच्या पोटात जंबिया खुपसतो...राजकाराणातल्या कुरघोडीच्या राजकारणाच्या पोटातच जणू गप्पकन सुरा खुपसला आहे दिग्दर्शकाने! मग जय आकांत करत मुख्यमंत्र्याला वाचवण्याची धडपड करतो. रस्त्यात डॅनीचे गुंड मारायला येतात तेव्हा सुनिल शेट्टी हा आर्मी कॅप्टन मोठा रणगाडा डायरेक्ट मुंबईत घेऊन येतो. ते ही अगदी कडक गणवेश घालून! तडक सीमेवरून मुंबईमध्ये हा रणगाडा तो बरोबर सलमानला डॅनीचे गुंड झोडपून काढत असतांना घेऊन येतो. किंबहुना एका नाल्याच्या कडेला असलेल्या झुडुपांमध्ये तो रणगाडा घेऊन लपूनच बसलेला असतो. त्याचं पोस्टिंगच तिथे केलेलं असतं बहुधा. कित्येक वर्षे तो या प्रसंगाची वाट बघत तिथे नाल्याजवळ लपलेला असतो. सकाळच्या आन्हिकांसाठी नाला असतोच. सकाळी उठायचं, नाला जवळ करायचा, गणवेश घालून झुडुपात दबा धरून बसायचं, संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेला जवळच्या देवळात जाऊन शुभंकरोति म्हणून रणगाड्यात जाऊन झोपी जायचं असा त्याचा दिनक्रम असावा. देवळातल्या पुजार्याशी मैत्री करून दोन वेळचा पोटाचा प्रश्न त्याने सोडवला असावा. असो. असे कॅप्टन येती आणिक रणगाडा फिरवुनि जाती...
या आधी, जयला मदतकर्ण झाल्याचे निदान होते. तो दारू पिऊन तर्र झालेल्या समीर खक्करला घरी सोडतो. आणि अजून अशी काही-बाही मदत कुणा-कुणाला करतो. त्याला मग मदतीची खाज सुटायला लागते. मग त्याच्या घरचे निदान करतात की त्याला मदतकर्ण झालेला आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने तो त्याच्या घरच्यांनाही होतो. जिथे जातील तिथे हे मदतकार्य सुरु असते. या मदतकर्णाची महती मुख्यमंत्र्यांच्या कानावर येताच त्यांचा कान पण खाजवायला लागतो.
शेवटी मुख्यमंत्री वाचतात आणि दशरथ सिंग वनवासाला...म्हणजे कारावासाला जातात. कलयुगात दशरथ कारावासात जातो आणि राम "तुम से मिल के दिल का जो है हाल क्या कहे..." अशी कव्वाली म्हणत नाचतो. कालाय तस्मै नमः
अशा प्रकारे हा 'जय हो!' एकदाचा शेवटचा श्वास मोजतो. प्रेक्षक हुश्श करतात. महेश मांजरेकर, ट्युलिप जोशी, जेनेलिया डीसोझा, विकास भल्ला, आदित्य पांचोली, शरद कपूर, नौहीद सायरसी असे बरेच पडेल लोकं दिग्दर्शकाने उगीच घेतलेले आहेत. अर्थात सोहेल खान हा देखील एक पडेल अभिनेता होताच कधी काळी; त्यामुळे यांचं दु:ख थोडं हलकं व्हावं म्हणून त्याने हे 'मदत'कार्य केलं असावं.
रवि ठाकूर हा नेहमीचा नायकाच्या बहिणीचा गोडुला नवरा या चित्रपटामध्ये देखील आहेच आणि तो १० वर्षांपूर्वी 'हम साथ साथ है' मध्ये नीलमच्या (म्हणजे नायकाच्या बहिणीच्या) नवर्याच्या हुकुमी भूमिकेत जसा गोडुला दिसत होता तसाच या ही चित्रपटात गोडुला दिसतो. जगदीश राज जसा हुकुमी इंस्पेक्टर होता तसा रवि ठाकूर हा हुकुमी जिजाजी आहे. ही इज आलोकनाथ इन द मेकिंग!!! द पास्ट ऑफ आलोकनाथ इज रवि ठाकूर!! रवि ठाकूरचा जेव्हा जन्म झाला तेव्हा डॉक्टर म्हणाले असावेत, "बधाई हो, जिजाजी हुए है". आलोकनाथचे जोक्स मला वाटते रवि ठाकूरला देखील लागू होतील. इच्छुकांनी प्रयत्न करून बघावा.
जेनेलियाचे हात तोडून दिग्दर्शकाने काय साधले कुणास ठाऊक! नशीब डॅनीची जीभ नाही छाटली. छोटा चुहा नामक एक छोटा मुलगा इतका डोक्यात जातो की खणखणीत आवाज काढून त्याला पडद्यावरून बाहेर फेकावे की काय असे वाटते. तो तब्बूचा मुलगा म्हणजे जयचा भाचा असतो. अर्धा फूट उंची असणार्या या बालकाची जीभ मात्र मैलभर लांब असते. तो जयच्या होणार्या बायकोची खूपच 'आतल्या' गोटातली थट्टा करतो आणि जय आणि त्याची नायिका फक्त लाजून हसतात. जयची नायिका 'पिंकी' (का पिंकी ते चित्रपटात कळेल!) चित्रपटात नसती तर चित्रपटाचे नुकसान नक्कीच झाले नसते. पण एक कमरेखालचा विनोद घुसडणे शक्य व्हावे म्हणून जयला या चित्रपटात नायिका घुसडली आहे. तब्बूने आत कुठल्या भूमिका कराव्यात हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे पण ती फरीदा जलाल नामे हायवेवर आहे हे नक्की. फरीदा जलाल जशी नंतरच्या काळात हुकुमाची बहीण आणि नंतर हुकुमाची आई झाली (बिचारी कधी हुकुमाची राणी नाही होऊ शकली), तशी तब्बू आता हुकुमाची बहीण होणार असे दिसते आहे.
तर असा हा 'जय हो!'...बॉक्स ऑफीसवर फारसा चालला नाही यात नवल ते काय?
प्रतिक्रिया
अरे काय तोडलंय, समीरसूर!! अप्रतिम!
"बधाई हो, जिजाजी हुए है"तर ग्रेटच! (बाकी माचीस, अस्तित्व, द नेमसेक वगैरे भूमिकावाल्या तब्बूवर 'अशा' चित्रपटात काम करायची वेळ आली का?)तब्बूवर 'अशा' चित्रपटात काम
दणदणीत चिरफाड केलीये. सगळे
परिक्षण आवडले
येस्स्...चूक आत्ता लक्षात आली..धन्यवाद
दन्डवत
परिक्षण आवडल . खतरणाक चिरफाड
जबरा.....
=))
मस्त "शव विच्छेदन"
कसलं भयानक लिहिलय,,
ज ब री
+१११
अरारारा. बेक्कार धुलाई केली
खतरा चिरफाड!
अरे हे सुटलंच की..
अधून-मधून तो कुत्र्यासारखा
ख त र ना क !
@काही आत्महत्यांच्या बातम्या
+१
जय हो!
अरे किती चावशील सल्लूला
लैच भारी!
अरे काय हे ? भयाण __/\__
हाहाहा!
भन्नाट लिहीलंय!!
काय भयानक चिरफाड केलीय!
परीक्षण आवडले
जबरा चिरफाड..
संध्याकाळी दिवेलागणीच्या
असेच म्हणतो
भारी चि ही र फा हा ड!
खतरनाक
अत्ता परत येक डाव वाचलं! सदर
भन्नाट
भन्नाट
जबरी हो
काय मस्त पोस्ट मार्टम केल आहे
बहुतेक...
सलमान कुणाला मारतांना शोभतो
धमाल!!!
धन्यवाद
लेखाप्रमाणे हा प्रतिसाद देखील
शारूकचा एक शिनेमा मी थेट्रात
@ हात पसरून पार्श्वभाग खाली
@ हात पसरून पार्श्वभाग खाली
जबरी
'खाना'वली पैकी फकस्त सल्लूच
क्लोन?
हे जबरा आहे..
Pagination