तर आता असं बघा, सलमानचा 'जय हो!' चित्रपटगृहामध्ये झळकलेला आहे. सलमानच्या प्रतिमेला साजेसा चित्रपट असेल या अपेक्षेने जनतेने चित्रपटगृहाकडे पावले वळवली खरी परंतु घात झाला, पावले थिजली, नजरा स्तब्ध जाहल्या, हात शिट्ट्या मारण्यासाठी ओठांकडे न जाता गपगुमान खिशात गेले, पायाच्या बोटांनी शरमेने मान खाली घातली, चेहरे सुकले, हसू मावळलं, हळद रुसली, कु़ंकू हसलं...असे काय बरे जाहले?
चित्रपट सुरु होतो ते एका युवतीच्या अपहरणाच्या प्रसंगाने. भीषण गुंड कंपनी (कुठल्याही गुंठामंत्र्याच्या पिलावळीचं रिकामटेकडं टोळकं इमॅजिन केलंत तरी चालेल; सध्या गुंडगिरीचं भलंमोठं कंत्राट त्यांनाच मिळालयं) एका मुलीला पळवून घेऊन जाण्यासाठी तिच्या घरीच येतात. पण त्या युवतीची आई भलतीच स्मार्ट आणि धाडसी असते. तिच्या मुलीला पकडून गाडीमध्ये टाकतांना आईच्या चेहर्यावर मात्र कोलगेट स्माईल असतं. आपले ३०-३५ दात दाखवत ती आपल्या मुलीला पटकन गाडीत बसायला सांगते. आपल्याला ही बाई हुकली की काय असा संशय येतो. पण लगेच येतो एक भयंकर ट्विस्ट! ती मुलीला म्हणते, "बैठ जाओ उनकी गाडी में, वैसे भी तुम्हे गेट तक ही तो जाना हैं...". आपण सगळे हैराण, भयाण, परेशान! तिच्या गेट-कोलगेटचं गौडबंगाल आपल्या काही लक्षात येत नाही. मग ती झोकात एक फोन लावते, "जय बेटा..." असं म्हणून सुरुवात करते. मग आपल्या टाळक्यात मलैका अरोराच्या कमरेच्या नखरेल झटक्याप्रमाणे अचानक लख्खकन प्रकाश पडतो. अरे ये तो अपना सल्लू भाई होयेंगा...क्या? आणि खरोखर सलमान एखाद्या वीरयोद्ध्याप्रमाणे त्या गृहनिर्माण संस्थेच्या सीमेवर येऊन थडकतो. त्याच्या सोबत त्याचे दुय्यम कलाकार मित्र (की भाऊ? की साडू? की मेहुणे? जाऊ द्या...) पण असतात. अश्मित पटेल आणि यश टोंक असे या दुय्यम-तिय्यम कलाकारांची नावे. मग काय विचारता, ते तिघे गुंडांवर असे तुटून पडतात की काही विचारू नका. सगळे गुंड यथावकाश मरणासन्न अवस्थेला पोहोचतात. साधारण ४०-५० गुंडांना सलमान आणि त्याची दोन माकडे असे फक्त तीन जण काही क्षणांमध्ये लोळवतात. सलमान कुणाला मारतांना शोभतो तरी, पण अश्मित पटेल? यश टोंक? तेलकट, गिळगिळीत चेहर्याचे हे दोघे कुणाला मारणं तर सोडाच (अगदी माशा मारणं देखील इन्क्लुडेड), नुसत्या टाळ्या तरी जोरजोरात पिटू शकतील की नाही इतपत शंका यावी. आणि टाळ्या पिटत उड्या मारायच्या सांगीतल्या तर खल्ल्लास! एका वेळी दोन-दोन कामे? मोगलाई लागून चालली आहे की काय? असो. इथे जय अग्निहोत्री म्ह्णजेच सलमानची दमदार ओळख होते.
अशी अगदी सलमान-योग्य नोटवर चित्रपटाची सुरुवात झाल्यावर आपण जरा सरसावून बसतो. आता सुखाच्या अनेकविध लाटा आपल्यावर येऊन आदळणार असतात. तिखट-मसालेदार संवाद, खटकेबाज गाणी, एखादा मदमस्त नाच, सलमानची एकदम कडक ईष्टाईल्, स्टायलिश आणि विनोदी मारामारी...असं काहीतरी चटकदार चाखायला मिळेल या आशेने मायबाप प्रेक्षक उपाशीपोटी येऊन बसतात. धूम ३, क्रिश ३, क्लब ६० वगैरे चित्रपटांमुळे त्यांची पोटे खपाटीला गेलेली स्पष्ट दिसत असतात. आकड्यांचे हे चित्रपट बघून प्रेक्षकांना आकडी येण्याचे बाकी असते. शाहिद कपूरच्या 'राजकुमार'ने त्यातल्या त्यात भूक जस्ट भागवली असल्याचे जाणवते पण तिथे ही खुद्द शाहीद कपूर आडवा आलेला असतो. खूप भूक असली म्हणून काय झालं? साबुदाण्याची पेज चिकन मसाल्यात घोळून-घोळून तरी किती खाणार? आधीच 'फटा पोस्टर निकला हीरो' एक भयंकर दु:स्वप्न समजून प्रेक्षक कसे बसे पुढे सरकलेले असतात. एनीवे, सुरुवात तर अपेक्षेप्रमाणे झालेली असते. उकिडवे बसलेले मायबाप प्रेक्षक हळूच पाय मुडपून थोडे आरामशीर बसतांना दिसतात.
जय अग्निहोत्री हा सत्कॄत्योरीया आणि मदतकर्ण असे दोन विकार झालेला कधी-काळी सैन्यातून काढला गेलेला एक अधिकारी असतो. जिथे-तिथे लोकांना मदत करायची अशी त्याची प्रतिज्ञा असते. इथेच चित्रपटाची गोची सुरु होते. एखाद्या लहान मुलाची शी झाल्यावर त्याच्यामागे धावणारी त्याची आई आणि तिच्यामागे एक फडके, हगीजचे एक पॅक, पाणी, आणि चेहर्यावर "तुम्ही कशाला त्रास घेता काकू? पडल्या-बिडल्या तर उगीच हात पाय मोडून घ्याल. मैं हैं ना..." असे भाव घेऊन सुसाट धावणारा सलमान कुणाला बरे भावेल? पण इथे नेमके तेच घडते. म्हणजे अगदी तो काही हगीजचे पॅक घेऊन समाजाची सफाई करायला जात नाही पण त्याचे तत्व तेच असते. संपलं! "तुम्हारे बदन मे इतने छेद करुंगा की तुम कन्फ्युज हो जाओगे कि सांस कहां से ले और क्षादे कहां से" असं म्हणून धुलाई करणारा सलमान कुठे आणि हगीज घेऊन सफाई करण्यासाठी धावणारा सलमान कुठे! असं हे 'पा' ला 'क्षा' ने रिप्लेस केलं तर रसिक प्रेक्षकांची 'पां'चाईत होणारच.
पुढे अगदी ठरल्याप्रमाणे जय डायरेक्ट राज्याच्या गृहमंत्र्याला डिवचतो. महाराष्ट्राचा गृहमंत्री दशरथ सिंग आणि त्याची मुलगी कविता सिंग-पाटील हे पिसाळल्यागत जयच्या मागे लागतात. कविता सिंग-पाटील तर सुरा वगैरे घेऊन हिंडणारी फूलन असते. तिच्या नामाचा आणि तिच्या कर्माचा अर्थाअर्थी संबंध नसतो. तिच्या नवर्याचं आडनाव पाटील असतं म्हणून तिचं हे विनोदी नाव सहन करावं लागतं. डॅनी म्हणजे दशरथ सिंग आश्चर्यकारकरीत्या शांतपणे बोलतो. डॅनी, मनोज वाजपेयी, आशुतोष राणा, गोविंद नामदेव, शरद पोंक्षे, नाना पाटेकर, राजपाल यादव या मंडळींनी बहुधा एकत्र बसून तारस्वरात एक शपथ घेतलेली आहे. १४० डेसिबलपेक्षा कमी आवाज वापरून आणि चेहर्याचे कमीत कमी ८०% स्नायू तटतटून फुगवल्याशिवाय अभिनय केला तर ताबडतोब "रसिक प्रेक्षकहो, क्षमा करा!" असा नसा फुटण्याएवढा प्रचंड मोठा टाहो फोडून आजन्म श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात सेवक म्हणून नोकरी धरायची. डॅनीने थोडं टाईम-प्लीज करून ही शपथ मोडलेली आहे. त्याची लाडाची लेक कविता ही उणीव काही अंशी भरून काढते.
तर भानगड अशी होते की जय डॅनीच्या एका कुत्र्याला (म्हणजे खरा कुत्रा नाही हो; ते असतात ना दाढी आणि मान खाजवत-खाजवत हीरोची खिल्ली उडवणारे, ते!! पूर्वी मॅकमोहन, सुधीर करायचा बघा अशी कामे.) आणि नंतर जावयाला (मुकुल देव - हा कोण? विचारु नका. बहुतेक सुश्मिता सेनच्या पहिल्या चित्रपटात (दस्तक) मध्ये नायक म्हणून आला होता) बदड-बदड बदडतो. कारण हेच की त्याच्या बहिणीला (तब्बू) ते छेडतात. नंतर हा जय जो-जो दिसेल त्याला धू धू धुतो. मध्येच तब्बू डॅनीला "इस बार तुम गलत आदमी से भिड गये" असा आणि त्यावर सलमान "मेरी बहन कभी झूठ नही बोलती" अस शेरास सव्वाशेर डायलॉक मारून डॅनीला आणखी भडकवतात. जयच्या नावातच जय असते त्यामुळे तो राज्याच्या गृहमंत्र्याला अक्षरशः सळो की पळो करून सोडतो. इतकं सळो की पळो की शेवटी मुख्यमंत्र्याला मांडवलीसाठी मध्ये उतरावं लागतं. मोहनीश बहल अजून चित्रपटसृष्टीत शिल्लक आहे हे हा चित्रपट बघून कळलं. तो आपले धारदार नाक अजूनच टोकदार करत डॅनीला 'सुलह' करण्याचा सल्ला देतो आणि स्वत: जयला घेऊन डॅनीच्या घरी जातो. तिथे डॅनी तयार बसलेलाच असतो. तो गप्पकन मुख्यमंत्र्याच्या पोटात जंबिया खुपसतो. बघा हं, प्रसंगातलं काव्य बघा! नाट्य बघा! गृहमंत्री गप्पकन मुख्यमंत्र्याच्या पोटात जंबिया खुपसतो...राजकाराणातल्या कुरघोडीच्या राजकारणाच्या पोटातच जणू गप्पकन सुरा खुपसला आहे दिग्दर्शकाने! मग जय आकांत करत मुख्यमंत्र्याला वाचवण्याची धडपड करतो. रस्त्यात डॅनीचे गुंड मारायला येतात तेव्हा सुनिल शेट्टी हा आर्मी कॅप्टन मोठा रणगाडा डायरेक्ट मुंबईत घेऊन येतो. ते ही अगदी कडक गणवेश घालून! तडक सीमेवरून मुंबईमध्ये हा रणगाडा तो बरोबर सलमानला डॅनीचे गुंड झोडपून काढत असतांना घेऊन येतो. किंबहुना एका नाल्याच्या कडेला असलेल्या झुडुपांमध्ये तो रणगाडा घेऊन लपूनच बसलेला असतो. त्याचं पोस्टिंगच तिथे केलेलं असतं बहुधा. कित्येक वर्षे तो या प्रसंगाची वाट बघत तिथे नाल्याजवळ लपलेला असतो. सकाळच्या आन्हिकांसाठी नाला असतोच. सकाळी उठायचं, नाला जवळ करायचा, गणवेश घालून झुडुपात दबा धरून बसायचं, संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेला जवळच्या देवळात जाऊन शुभंकरोति म्हणून रणगाड्यात जाऊन झोपी जायचं असा त्याचा दिनक्रम असावा. देवळातल्या पुजार्याशी मैत्री करून दोन वेळचा पोटाचा प्रश्न त्याने सोडवला असावा. असो. असे कॅप्टन येती आणिक रणगाडा फिरवुनि जाती...
या आधी, जयला मदतकर्ण झाल्याचे निदान होते. तो दारू पिऊन तर्र झालेल्या समीर खक्करला घरी सोडतो. आणि अजून अशी काही-बाही मदत कुणा-कुणाला करतो. त्याला मग मदतीची खाज सुटायला लागते. मग त्याच्या घरचे निदान करतात की त्याला मदतकर्ण झालेला आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने तो त्याच्या घरच्यांनाही होतो. जिथे जातील तिथे हे मदतकार्य सुरु असते. या मदतकर्णाची महती मुख्यमंत्र्यांच्या कानावर येताच त्यांचा कान पण खाजवायला लागतो.
शेवटी मुख्यमंत्री वाचतात आणि दशरथ सिंग वनवासाला...म्हणजे कारावासाला जातात. कलयुगात दशरथ कारावासात जातो आणि राम "तुम से मिल के दिल का जो है हाल क्या कहे..." अशी कव्वाली म्हणत नाचतो. कालाय तस्मै नमः
अशा प्रकारे हा 'जय हो!' एकदाचा शेवटचा श्वास मोजतो. प्रेक्षक हुश्श करतात. महेश मांजरेकर, ट्युलिप जोशी, जेनेलिया डीसोझा, विकास भल्ला, आदित्य पांचोली, शरद कपूर, नौहीद सायरसी असे बरेच पडेल लोकं दिग्दर्शकाने उगीच घेतलेले आहेत. अर्थात सोहेल खान हा देखील एक पडेल अभिनेता होताच कधी काळी; त्यामुळे यांचं दु:ख थोडं हलकं व्हावं म्हणून त्याने हे 'मदत'कार्य केलं असावं.
रवि ठाकूर हा नेहमीचा नायकाच्या बहिणीचा गोडुला नवरा या चित्रपटामध्ये देखील आहेच आणि तो १० वर्षांपूर्वी 'हम साथ साथ है' मध्ये नीलमच्या (म्हणजे नायकाच्या बहिणीच्या) नवर्याच्या हुकुमी भूमिकेत जसा गोडुला दिसत होता तसाच या ही चित्रपटात गोडुला दिसतो. जगदीश राज जसा हुकुमी इंस्पेक्टर होता तसा रवि ठाकूर हा हुकुमी जिजाजी आहे. ही इज आलोकनाथ इन द मेकिंग!!! द पास्ट ऑफ आलोकनाथ इज रवि ठाकूर!! रवि ठाकूरचा जेव्हा जन्म झाला तेव्हा डॉक्टर म्हणाले असावेत, "बधाई हो, जिजाजी हुए है". आलोकनाथचे जोक्स मला वाटते रवि ठाकूरला देखील लागू होतील. इच्छुकांनी प्रयत्न करून बघावा.
जेनेलियाचे हात तोडून दिग्दर्शकाने काय साधले कुणास ठाऊक! नशीब डॅनीची जीभ नाही छाटली. छोटा चुहा नामक एक छोटा मुलगा इतका डोक्यात जातो की खणखणीत आवाज काढून त्याला पडद्यावरून बाहेर फेकावे की काय असे वाटते. तो तब्बूचा मुलगा म्हणजे जयचा भाचा असतो. अर्धा फूट उंची असणार्या या बालकाची जीभ मात्र मैलभर लांब असते. तो जयच्या होणार्या बायकोची खूपच 'आतल्या' गोटातली थट्टा करतो आणि जय आणि त्याची नायिका फक्त लाजून हसतात. जयची नायिका 'पिंकी' (का पिंकी ते चित्रपटात कळेल!) चित्रपटात नसती तर चित्रपटाचे नुकसान नक्कीच झाले नसते. पण एक कमरेखालचा विनोद घुसडणे शक्य व्हावे म्हणून जयला या चित्रपटात नायिका घुसडली आहे. तब्बूने आत कुठल्या भूमिका कराव्यात हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे पण ती फरीदा जलाल नामे हायवेवर आहे हे नक्की. फरीदा जलाल जशी नंतरच्या काळात हुकुमाची बहीण आणि नंतर हुकुमाची आई झाली (बिचारी कधी हुकुमाची राणी नाही होऊ शकली), तशी तब्बू आता हुकुमाची बहीण होणार असे दिसते आहे.
तर असा हा 'जय हो!'...बॉक्स ऑफीसवर फारसा चालला नाही यात नवल ते काय?
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे काय तोडलंय, समीरसूर!! अप्रतिम!
किती ठिकाणी उत्तम उपहास साधला आहे याची गणती करणं अशक्य आहे! वाक्या-वाक्याआड 'सिक्सर्स' आहेत. मस्त! ते
"बधाई हो, जिजाजी हुए है"तर ग्रेटच!(बाकी माचीस, अस्तित्व, द नेमसेक वगैरे भूमिकावाल्या तब्बूवर 'अशा' चित्रपटात काम करायची वेळ आली का?)
तब्बूवर 'अशा' चित्रपटात काम
In reply to अरे काय तोडलंय, समीरसूर!! अप्रतिम! by बहुगुणी
तब्बूवर 'अशा' चित्रपटात काम करायची वेळ
दोस्तीखात्यात टाकला असेल हा शिनेमा तिनं. "तुम भी क्या याद करोगे" टाईप डायलॉग मारला असेल त्यावेळी. ;)
दणदणीत चिरफाड केलीये. सगळे
दणदणीत चिरफाड केलीये. सगळे परिक्षणच आवडले.
परिक्षण आवडले
सॉल्लिड आवडले परिक्षण :)
मला तर कळत नाही लोकांना सलमानचे चित्रपट बघवतात कसे व ते पचतात तरी कसे?
प्रत्यके चित्रपटात एकसारखा अभिनय (?), तोच-तोचपणा, चार-सहा गुंडाना तुडवायचे, हवेत उडवायचे, एक भारी डायलॉग मारायचा, पाचकळ विनोद करायचे, नाच तर बघायलाच नको कधी पट्ट्याबरोबर तर कधी कॉलर पकड तर कधी खिशात हात तर कधी टॉवेल घेऊन.... वैताग येतो ह्याचे सिनेमे बघायचे म्हणजे.
जयहोबद्दल जे अपेक्षीत होते तसाच चित्रपट आहे असे परिक्षण वाचून समजते.
बाकी एक सुधारणा सुचवतेय नायकाच्या बहिणीचा गोडुला नवरा रवि ठकूर नसून महेश ठाकूर आहे आणी हो
ह्यासाठी +१११११
येस्स्...चूक आत्ता लक्षात आली..धन्यवाद
In reply to परिक्षण आवडले by सानिकास्वप्निल
सानिकास्वप्निल,
धन्यवाद! तो महेश ठाकूरच आहे. लिहिण्यात चूक झाली. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! :-)
समीर
दन्डवत
तुम्हाला या परिक्षणबद्दल दन्डवत!! काय एक एक फटके मारले आहेत.
तो सोहेल खान हे वाचून जीव देइल. आणि सुनिल शेट्टी चित्रपट सन्यास घेइल!!
परिक्षण आवडल . खतरणाक चिरफाड
परिक्षण आवडल . खतरणाक चिरफाड केलीय राव .
जबरा.....
बाकी कॉलेजच्या दिवसांत एक सिनेमा बघीतला होता, कबूतर का बदला, ह्या नावाचा.
तो सिनेमा देखील केवळ मित्राने कबूतराच्या भूमिकेसाठी बघायचा आग्रह केला, म्हणून.....
त्या सिनेमात पण हे महाशय होते.
त्या नंतर ह्या नटाचा एक पण सिनेमा बघीतला नाही.
आणि पुढेही बघणार नाही.
फालतू वेळ खर्च करायला माझ्याकडे वेळ नाही.
=))
=)) =))
एक नंबर खतरा परीक्षण.!! टोरन्ट कृपेने सिनेमा घरीच पाह्यला, पण तो ही सलग न पाहता ३ इन्स्टॉलमेंटमध्ये पहावा लागला.
मस्त "शव विच्छेदन"
पण खरं सांगू सिनेमा इतका मथ्थड्/टुकार (आठवा धूम्३)असूनही मल्टीप्लेक्स कृपेने१ आणि "चकचकाटी" भुतावळींनी २ हा सिनेमा पण कोटी उड्डाणे करेल.
१.एकाच वेळी जास्तीत जास्त शो लावून पैसा वसूल फंडा एकदा सिनेमा टुकार म्हटल्यावर कशाला दुसर्यांदा पब्लिक येतय.
२.सगळ्या सिनेमा जाहीरातीतली चांदणी वाटप मंडळी.
कसलं भयानक लिहिलय,,
कसलं भयानक लिहिलय,, =))
ज ब री
लय भारी ....... जबरदस्त पोस्ट- मॉर्टेम !
;)
+१११
In reply to ज ब री by मंदार कात्रे
+१११ सहमत
अरारारा. बेक्कार धुलाई केली
अरारारा. बेक्कार धुलाई केली आहे. जय हो :)
खतरा चिरफाड!
खतरा चिरफाड!
प्रोमोमध्ये सलमान तोंड वासून सुळे परजत अंगावर येतो त्याबद्दल काही विशेष टिप्पणी अपेक्षित होती.
सलमान, शारुक, आमीर, नाना चित्रपटभर अनुक्रमे तेच म्हणून वावरतात. एखादा अपवाद असतो नियम सिद्ध करायला.
अरे हे सुटलंच की..
In reply to खतरा चिरफाड! by प्यारे१
हो, सलमान चिडला की "व्हॉऑऑऑऑऑ" करून जोरात ओरडतो आणि गुंड त्याच्या या ओरडण्याला घाबरतात. अधून-मधून तो कुत्र्यासारखा चावतो देखील!! :-) याचा उल्लेख राहिलाच राव!
धन्यवाद, प्रशांत!
अधून-मधून तो कुत्र्यासारखा
In reply to अरे हे सुटलंच की.. by समीरसूर
अधून-मधून तो कुत्र्यासारखा चावतो देखील!! >> ईक्स!
ख त र ना क !
ख त र ना क !
सलमान, दिग्दर्शक अथवा निर्माता यांच्या दृष्टीला हे परिक्षण पडणार नाही याची काळजी घेण्यात यावी... नाहीतर दुसर्या दिवशी पेपरात काही आत्महत्यांच्या बातम्या येण्याची शक्यता आहे !!! चित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाही
@काही आत्महत्यांच्या बातम्या
In reply to ख त र ना क ! by डॉ सुहास म्हात्रे
@काही आत्महत्यांच्या बातम्या येण्याची शक्यता आहे !!! >>> +++१११ =))
+१
In reply to @काही आत्महत्यांच्या बातम्या by अत्रुप्त आत्मा
सलमान काळवीट प्रकरणात "आत" गेला नाही तर त्याला ह्या परीक्षणाची प्रत दिवसातून किमान दहा वेळा ऐकण्याची-वाचण्याची (वाचनाशी संबंध राहिला असेल तर!) शिक्षा मिळावी!
जय हो!
भारी परीक्षण.
स्वाती
अरे किती चावशील सल्लूला
मरेल ना तो =))
अर्थात, असले चित्रपट काढुन पब्लीकचा टाईम किल करण्याची शिक्षा मिळालीच पाहिजे ;)
लैच भारी!
=))
अरे काय हे ? भयाण __/\__
अरे काय हे ?
भयाण
=))
__/\__
हाहाहा!
मेले हसून! काय भयंकर फाडलाय! मात्र कोण या सिनेमाची चिरफाड करतोय त्याची वाटच बघत होते!
भन्नाट लिहीलंय!!
भन्नाट लिहीलंय!!
>> "बधाई हो, जिजाजी हुए है"
ह्या वाक्याला प्रचंड फुटलो. =))))
काय भयानक चिरफाड केलीय!
गेल्या जन्मी किंवा या जन्मी डॉक्टर होता का ओ तुम्ही?
झक्कास. चिरफाड आवडली.
परीक्षण आवडले
परीक्षण आवडले. जबरदस्त लिहिलेय. ह.ह.पु.वा.
जबरा चिरफाड..
हे हे हे..
फुटलो.. =)) =))
जबरा चिरफाड.. सोहेल खानचा पिक्चर आणि त्याने कुठलंच "गे" विनोदी (?) पात्र टाकलं नाही? कमाल आहे..
संध्याकाळी दिवेलागणीच्या
हे सगळं डोळ्यासमोर येऊन फुसकन हसू आलं!
असेच म्हणतो
In reply to संध्याकाळी दिवेलागणीच्या by आदूबाळ
असेच म्हणतो =))
बाकी पञ्चेस इतके मारलेत की 'पञ्च'नामा करावा लागणार असे दिसतेय =))
लैच खंग्री _/\_
भारी चि ही र फा हा ड!
भारी चि ही र फा हा ड! :D
खतरनाक
खतरनाक लिहीले आहे. जबरी :)
अत्ता परत येक डाव वाचलं! सदर
अत्ता परत येक डाव वाचलं! सदर परिक्षान ह्यो शिनूमा बगून निस्तेज होत भायेर पडलेल्या प्रेक्षकांना उतारा म्हणून वाटनेत यावं,अशी ब'हुजन हितार्थ मागनी करत हाये! =))
शेवटचा परिच्छेद वाचताना,अत्र्यांच्या हशा आणी टाळ्या पुस्तकातील "फडक्यां'च्या नाटकाच्या चिरफाडीची प्रचंड अठवण जाहली... =))
भन्नाट
भन्नाट चिरफाड! आवडले परिक्षण.
भन्नाट
भन्नाट चिरफाड! आवडले परिक्षण.
जबरी हो
धमाल उडवली आहे या परिक्षणात.
सदर परिक्षण लिहिण्यासाठीच या चित्रपटाला गेला असाल असा अंदाज आहे :-).
काय मस्त पोस्ट मार्टम केल आहे
काय मस्त पोस्ट मार्टम केल आहे... लयं आवडेश ! :)
सलमान कुणाला मारतांना शोभतो तरी, पण अश्मित पटेल?
हा तोच अश्मित पटेल हाय का ? ज्याचे नाव रिया सेनच्या अश्लिल क्ल्पीप {एमएमएस} मधे आल होत ? त्यावेळी हे प्रकरण बरचं गाजल होत. मला वाटत अंदाजे २०१० च्या सुमारास.
बहुतेक...
In reply to काय मस्त पोस्ट मार्टम केल आहे by मदनबाण
नक्की आठवत नाही पण बहुधा तोच असावा. काहीतरी करून पब्लिसिटी मिळवायची असा खाक्या असतो अशा लोकांचा. बाकी तर काही काम मिळत पण नाही ना. १-२ फुटकळ चित्रपटांमध्ये हा आल्याचे आठवते. बहुतेक अमिशा पटेलचा भाऊ आहे का हा?
सलमान कुणाला मारतांना शोभतो
In reply to काय मस्त पोस्ट मार्टम केल आहे by मदनबाण
फाईटक्लब नावाचा एक चित्रपट फारा वर्षांपूर्वी आला होता त्यात वळू आणी सांडसारख्या दिसणार्या बर्याच हिरोंची भरताड होती.त्यात अण्णा (सुनिल शेट्टी) विरूध्द अश्मित पटेल ला उभे केले होते. चित्रपट पाहताना अण्णाची मजेशीर किंव येत होती, बिचार्याला अ.प कडुन दणदणीत मार खावा लागला.
धमाल!!!
परिक्षण वाचुनच भरपूर करमणूक झाली.सिनेमा बघायला नकोच.भारीच लीहीलय.
धन्यवाद
आभारी आहे सर्वांचा. :-) सलमानचा चित्रपट संपूर्ण पाहणे म्हणजे किती भयंकर शिक्षा असते हे मला 'जय हो' पाहून कळले. कित्येक वर्षात त्याचे चित्रपट असे टॉकीजवर वगैरे जाऊन पाहिलेले नाहीत. मला वाटते १९९९ चा 'हम दिल दे चुके सनम' हा त्याचा मी टॉकीजवर जाऊन पाहिलेला शेवटचा चित्रपट. बाकी 'वाँटेड', 'एक था टायगर', 'बॉडीगार्ड', 'गर्व', 'रेडी', 'वीर', 'युवराज', 'मॅरीगोल्ड' वगैरे सिनेमे टॉकीजला जाऊन बघणे शक्यच नव्हते. विचार केला तरी मेंदूला झिणझिण्या येतात. :-)मात्र टीव्हीवर वगैरे कुठे कुठे तुकड्या-तुकड्यात पाहिले आहेत हे सिनेमे. आणि टॉकीजवर न पाहिल्याच्या निर्णयाचा अभिमान वाटतो. :-) शाहरुखचे 'जब तक है जान', 'रब ने बना दी जोडी', 'डॉन १, २', 'रा-वन' हे सिनेमे टॉकीजवर बघणे कसे शक्य होऊ शकते हे एक कोडेच आहे. 'जब तक है जान' तर नावावरूनच भयंकर असणार हे लक्षात येतेच. "एक लडकी थी दीवानी...जो करती हमेशा मनमानी...समझती खुद को रानी...पर असल मे हडळ जानीमानी" असले चित्रपट भयंकर पकाऊ असतात. 'मोहब्बते' त्यातलाच एक. सारखं आपलं 'एक लडकी थी दीवानी...' छाप संवाद, हात पसरून पार्श्वभाग खाली खेचून उभा राहणारा शाहरुख, उडत उडत खाली पडणारी वाळकी पाने, सतत "आआआआ आआआआ" करून अंगाई म्हणणार्या दीदी, शमिता शेट्टी आणि कीम शर्मा सारख्या ओबडधोबड मधून-मधून बॉडीबिल्डींगची प्रात्यक्षिके दाखवणार्या नायिका....अरारारारारा... नुसता वैताग्...रोमँटीकच्या नावाखाली शमिता शेट्टी बघायची? अंगाई ऐकायची? कहर...कहर...
लेखाप्रमाणे हा प्रतिसाद देखील
In reply to धन्यवाद by समीरसूर
लेखाप्रमाणे हा प्रतिसाद देखील जबरा चिरफाड आहे...खासकरुन
व
=)) =)) =))
शारूकचा एक शिनेमा मी थेट्रात
In reply to धन्यवाद by समीरसूर
शारूकचा एक शिनेमा मी थेट्रात जाऊन पाहिला व घरी येईपर्यंत तापाने फणफणले होते. पुन्हा तसलं काही नकोच!
@ हात पसरून पार्श्वभाग खाली
In reply to धन्यवाद by समीरसूर
@ हात पसरून पार्श्वभाग खाली खेचून उभा राहणारा शाहरुख, उडत उडत खाली पडणारी वाळकी पाने, "आआआआ आआआआ" करून अंगाई म्हणणार्या दीदी, शमिता शेट्टी आणि कीम शर्मा सारख्या ओबडधोबड मधून-मधून बॉडीबिल्डींगची प्रात्यक्षिके दाखवणार्या नायिका....अरारारारारा... नुसता वैताग्...रोमँटीकच्या नावाखाली शमिता शेट्टी बघायची? :-)))) अंगाई ऐकायची? कहर...कहर...>>> =)) __/\__/\__/\__ =)) वर पांडु म्हणतो तसंच >>> भयाण फाडता हो तुम्ही! =))
@ हात पसरून पार्श्वभाग खाली
In reply to धन्यवाद by समीरसूर
@ हात पसरून पार्श्वभाग खाली खेचून उभा राहणारा शाहरुख, उडत उडत खाली पडणारी वाळकी पाने, "आआआआ आआआआ" करून अंगाई म्हणणार्या दीदी, शमिता शेट्टी आणि कीम शर्मा सारख्या ओबडधोबड मधून-मधून बॉडीबिल्डींगची प्रात्यक्षिके दाखवणार्या नायिका....अरारारारारा... नुसता वैताग्...रोमँटीकच्या नावाखाली शमिता शेट्टी बघायची? :-)))) अंगाई ऐकायची? कहर...कहर...>>> =)) __/\__/\__/\__ =)) वर पांडु म्हणतो तसंच >>> भयाण फाडता हो तुम्ही! =))
जबरी
फारुन टाकलं वो तुमी त्या मा.सलमानला.
याठिकाणी 'मा'. चा अर्थ, सर्व राजकारण्यांना संबोधताना, ना.,मा,, आ. चा जो अर्थ घेतो तोच घ्यावा.
'खाना'वली पैकी फकस्त सल्लूच
'खाना'वली पैकी फकस्त सल्लूच लै आवडतो...ई लॉवे सल्लू... टोउ मऊच.... ;) ई अमं बिग्गेस्त फां / ए/सी... :) :D
परिक्षण आवडले...+ली घेतले आहे.त्याच्या फुडच्या शिनुमात दिसेल, नक्की पघा बर सूर काका :) तुमचे शारूक बद्दल चे इचार एकूण कान तृप्त जाहले... :D मी खूप वेळा अनुमोदन देयीण...आमचं प्याण्टवालं तेनला शारूकच आवडतंय.... :(
क्लोन?
In reply to 'खाना'वली पैकी फकस्त सल्लूच by दिव्यश्री
क्लोन?
हे जबरा आहे..
In reply to 'खाना'वली पैकी फकस्त सल्लूच by दिव्यश्री
हे जबरा आहे..
(स्वगत - डू आयडि डू आयडि डू आयडि)
थांक्यू नही बोलनेका , आगे तीन
थांक्यू नही बोलनेका , आगे तीन लोगो की मदत करनेका
आज मैने तीन लोगोकि एकसाथ मदत कर दि
सोहेल , अरबाज ,सलमान खान की
जय हो देख लिया
जबरी.. खत्रा परीक्षण !!
जबरी.. खत्रा परीक्षण !!
बघायची इच्छा नव्हती, पण आता परीक्षण वाचून ते सिनेमा बघताना रिलेट करत करत हसायला आवडेल :)
भन्नाट
भन्नाट :)
सिनेमा तर बघणार नव्हतेच पण सिनेमाचं असं परीक्षण वाचायला मिळणार असेल तर तुम्हाला प्रत्येक सिनेमाचं तिकीट फुकट ;)
एक चूक झालीये मात्र. तो आलोकनाथ इन मेकिंग "रवी ठाकूर" नाही तर "महेश ठाकूर" आहे :)
होय!
In reply to भन्नाट by जयवी
जयवी,
तो महेश ठाकूर आहे. माझ्या लिखाणात मिष्टेक झाली. धन्यवाद!
सानिकास्वप्नील यांनी ही चूक आणून दिली लक्षात!
समीर
जय हो!
संपुर्ण चित्रपट युटुब कृपेने येथे पहावयास मिळेल... सर्वांनी लाभ घ्यावा. :)
शेअर
तुमचे हे परीक्षण खुप फेमस झाले आहे समीरभौ
माझ्या किमान ६ फेसबुक फ्रेंड आणि ३ ग्रुप वर हा लेख बघितला गेल्या ४/५ दिवसात !
लै फेमस झाले भौ तुम्ही!
धन्यवाद!
In reply to शेअर by उडन खटोला
उडन खटोला साहेब, धन्यवाद! :-)
एक नंबर परिक्षण.....
एक नंबर परिक्षण.....
माझ्या क्लायंट ने आमच्या टीम साठी बक्षिस म्हणुन एक मुव्ही स्पॉन्सर केला होता....
ते पैसे आम्ही या बकवास मुव्ही वर उडवले...तेही फस्ट डे फस्ट शो.....याचा मला आयुष्यभर पश्चाताप होणारे....:-(
जबरदस्त... वाचून वारल्या गेले
जबरदस्त... वाचून वारल्या गेले आहे..
भारी पन्चेस...:)
आवडले गेले आहे
महेश ठाकूरचा जेव्हा जन्म झाला तेव्हा डॉक्टर म्हणाले असावेत, "बधाई हो, जिजाजी हुए है". आलोकनाथचे जोक्स मला वाटते महेश ठाकूरला देखील लागू होतील.
------------------------ हे फार आवडले .
अफलातून परीक्षण..ह.ह.पु.वा.
अफलातून परीक्षण..ह.ह.पु.वा. :D
सलमानचा मी देखील शेवटचा सिनेमा हम दिल दे चुके सनम हाच असावा.... एकदा विमान प्रवासात सिनेमांच्या यादीत बर्यापैकी सर्वच सिनेमे पहिले असल्याने, नाइलाजास्तव 'एक था टायगर' पाहण्याचा प्रयत्न केला पण नाही नाही... पहिल्या ५-१० मिनिटातच पुढे काही पाहाणं शक्यच झालं नाही... मग म्हटलं 'जब तक है जान' बघावा.. पुन्हा तेच... वाटलं विमान कोसळून जीव जावा पण देवा हे असले सिनेमे बघण्याची शिक्षा नको... ...
वाटलं विमान कोसळून जीव जावा
In reply to अफलातून परीक्षण..ह.ह.पु.वा. by उदय के'सागर
=)) =)) =))
मग म्हटलं 'जब तक है जान' बघावा..
In reply to अफलातून परीक्षण..ह.ह.पु.वा. by उदय के'सागर
तुमच्या आशावादाला सलाम !!
हो खरंच घोडचू़कच म्हणायची ती
In reply to मग म्हटलं 'जब तक है जान' बघावा.. by अर्धवटराव
हो खरंच घोडचू़कच म्हणायची ती :(
पण मी वर म्हंटल्याप्रमाणे 'नाईलाजास्तव' हे सिनेमे पाहिले... पण ह्या पुढे कानाला खडा, झोप आली नाही, बोर होत असेल, वाचन करावं वाटत नसेल आणि ह्या सगळ्याने अशक्य अस्वस्थ होत असेल तरी चालेल पण असले सिनेमे पाहण्याचा 'मुर्खपणा' करायचा नाही!