✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शिव्यांना शिव्या देऊ नये.

व
वडापाव यांनी
Sat, 11/23/2013 - 02:12  ·  लेख
लेख
अगदी खरं सांगतो, शक्यतो मी शिव्या देत नाही. पण तरी त्यांच्याबद्दल मनात एक आत्मीयता आहे. एक आपुलकीचा आणि कृतज्ञतेचा भाव आहे. विशेषतः मराठी शिव्यांबद्दल; नव्हे, फक्त मराठी शिव्यांबद्दलच. बाकी भाषांमधल्या शिव्या अतिशय नेभळट वाटतात... तर हा एक शिव्यांबद्दलचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न. [ज्या शिव्या लेखात दिसतील त्या मी स्वतः कोणाला देत नाहीये, त्यामुळे त्यांच्याकडे केवळ एक (प्रभावी आणि परिणामकारक) शब्द म्हणून पाहिलं जावं ही विनंती. रसभंग होईल या भितीने शक्य तिथे शि* असं न लिहीता शिवी असं पूर्ण लिहीलं आहे, तेव्हा थोर मनानं सांभाळून घ्या.] सुरुवात झाली 'अईला!!' पासून. कोणी 'आयला' म्हणतं, कोणी व्यवस्थित 'आईला' म्हणतं, कोणी 'च्यायला' म्हणतं. मी पहिल्यांदा ऐकलं, काही मित्रांच्या तोंडी!! पहिलीत!! 'अईल्ला!!!' आपण आईगं म्हणतो, तसं हा आईला म्हणतोय, काही विशेष फरक मला वाटला नाही. घरी प्रयोग करून पाहिला आणि पाठीत आजीचा दणका मिळाला... "ही शिवी आहे, ती आईला लागते, ही कधी द्यायची नाही. याद राख पुन्हा कधी म्हटलंस तर..." कदाचित तेव्हा शिवी म्हणजे काय हे सुद्धा तिला मला समजवावं लागलं असणार... आत्ता नेमकं आठवत नाही. मग मीसुद्धा ठरवलं, की कोणालाही शिवी घालू देता कामा नये. चौथीपर्यंत, प्रामाणिकपणे, माझ्यासमोर मला पेलवेल अशा कोणत्याही मुलाने शिवी घातली की त्याला एक वाजवून दिली आहे. वर चोंबंडेपणा नसानसांत भिनलेला, त्यामुळे त्याची शाळेच्या बाईंकडे सुद्धा 'बाई हा त्याला गांडू म्हणाला' अशा तक्रारी केलेल्या आठवतात. माझ्या या चोंबडेपणाला घाबरून (आणि माझ्यामुळे प्रेरित झालेल्या काही इतर चोंबड्यांना घाबरून) चौथीपर्यंत तरी वर्गातल्या कुणी कधी शिवी दिलेली मला आठवत नाही. निदान, माझ्या तोंडावर तरी नाही. तेव्हा आमच्या सोसायटीतले सगळे मोठे टगे, माझ्याहून किमान आठ-दहा वर्षांनी सिनिअर असलेले दादा लोक्स माझ्यावर दादागिरी करत बसायचे. मला पांडु म्हणून चिडवायचे आणि मधलं बोट दाखवायचे. मला गम्मत वाटायची. मी सुद्धा दाखवायचो. पण मला ते असं का करतात ते कळायचं नाही. घरी मी विचारलं, तर कोणी धड सांगेना. "जाऊ दे, आपण लक्ष नाही द्यायचं. ते असंच उगाच करतात. फार विचार करु नकोस." पुढे अर्थ कळला तेव्हा हे लक्षात आलं की शिव्यांना विशिष्ट भाषेचं बंधन नसतं. सांकेतिक खुणांनीही त्या देता येतात. सहावीत सोसायटी बदलली, आणि माझं शिव्यांबद्दलचं ज्ञान किती अगाध आहे, याची प्रचिती मला वेळोवेळी येऊ लागली. माझ्याहून चारेक वर्षांनी मोठ्या असलेल्या दोघांच्या गप्पांमध्ये सारखं आपलं मध्ये मध्ये चुत्या-चुत्या काहीतरी येत होतं. मी न राहवून अर्थ विचारला, तर दोघेही हसायला लागले आणि त्यांनी मला सांगितलं की चुत्या म्हणजे नाणं. माझा विश्वास बसला नाही. घरी गेलो, तरी डोक्यात या नवीन शब्दाचाच विचार चालू होता. जर चुत्याचा अर्थ नाणं असता, तर चौथी स्कॉलरशिपसाठी समानार्थी शब्दांचा अभ्यास करताना तो शब्द येऊन गेला असता. मी स्वयंपाकघरात बसलो होतो. समोर दादा सफरचंद खायच्या तयारीत होता. आई काहीतरी काम करत होती. दादाने सफरचंदाचा चावा घ्यायला आणि मी माझी शंका प्रकट करायला एकत्र तोंड उघडलं - "आई चुत्या म्हणजे काय??" दादाला ठसका बसला. आईने फक्त "आं!! असं नाही म्हणायचं" असं काहीतरी दरडावलं आणि लगेच तिथून निघून गेली. मला कळलं, ही शिवी दिसते. बास!! त्या दिवशी माझ्या लैंगिक शिक्षणाचा पाया माझ्या दादाने रचला. पाहता पाहता वर्षभरात मी त्यात एसएससीही झालो. आणि माझं शाळेतल्या शिक्षकांना ते इतिहास-भुगोल वगैरे शिकवत असताना अख्ख्या वर्गासमोर मध्येच उठून निरागसपणे "सर पूर्वी हॉस्पिटल्स नव्हती मग बायका जन्म कशा द्यायच्या?" असे प्रश्न विचारून भंडावून सोडणंही बंद झालं. अशाप्रकारे शिव्या ह्या जिज्ञासा वर्धक असतात आणि कल्पनाविश्व वाढवणा-या देखील असतात हे मला उमगलं. शिव्यांबाबतीत अगदी वेळीच मला पुरेसं ज्ञान मिळालं असं म्हणायला हवं, नाहीतर पुढच्याच वर्षी सातवीत आमच्या वर्गात नॉन-व्हेज विनोदांना जो ऊत आला, त्याला मी मुकलो असतो. साहित्याच्या या एका नव्याच प्रकाराशी माझी ओळख झाली होती, हळूहळू तिचं मैत्रीत रुपांतर झालं, आणि शेवटी मी त्याच्या प्रेमातही पडलो. आणि एकेकाळी साधं कोणी 'आयला' म्हटलं म्हणून त्याला चोपणारा मी आता स्वतः सर्रास शिव्या देत सुटलो होतो. प्रत्येक वाक्यात शिवी असायची. वयानं सिनिअर असलेल्या मित्रानं उन्हाळ्याच्या सुट्टीत मला याबद्दल बरंच झाडलं, आणि त्याच्या संगतीत राहून मी फक्त गरजेपुरतं शिव्या द्यायला शिकलो. दुस-या शब्दांत सांगायचं म्हणजे मी शिव्या टाळणं शिकलो. तरी त्या अश्लील साहित्यप्रकाराबद्दलचं माझं प्रेम कमी झालं नव्हतं. ते कमी होणारच नव्हतं. पण यामुळे शिव्या या मनोरंजकही असतात हे लक्षात आलं. नववीत असताना शाळेची फुटबॉल टीम काढावी या हेतूनं ब-याच वर्षांत कदाचित प्रथमच इंग्रजी आणि मराठी माध्यमाची पोरं एकत्र आली. आमच्या आधीच्या बॅचेसमध्ये मराठी-इंग्रजीच्या पोरांत हमखास राडा व्हायचा. आम्ही मात्र हातमिळवणी केली. आणि अजुन एका नव्या शब्दानं आयुष्यात एंट्री घेतली. 'फक!!' ही शिवी इंग्रजी माध्यमाची पोरं जाऊदेत, पोरी सुद्धा हमखास द्यायच्या. आणि प्रसंगी त्या मराठमोळ्या शिव्या सुद्धा द्यायच्या!! आम्ही चाटच पडलो. मराठी माध्यमाच्या पोरींसमोर शिव्या द्यायला आम्ही घाबरायचो, काय भरोसा पोरगी चुगली करायची. आणि इकडे बघतोय तर मुली स्वतःच शिव्या देताना दिसल्या. शिव्यांच्या मार्फत का होईना, पण स्त्री-पुरुष समानता वाढीस लागल्याचं दिसून आलं. (पुढे हिमालयाची सावली हे नाटक पाहताना रोहिणी हट्टंगडी यांना रांडेच्या, गाढवीच्या अशा शिव्या देताना पाहून अवाक् झालो होतो. आईने खुलासा केला, म्हणाली की पूर्वी बायकाच जास्त शिव्या द्यायच्या. चांगल्या, उच्च जाती-वर्णाच्या घरंदाज बायकासुद्धा अपवाद नव्हत्या म्हणे. पटलं. तेव्हा वाटलं की शिव्या द्यायला पहिल्यांदा स्त्रियांनीच सुरुवात केली असली पाहिजे. एकतर दुस-यांना नावं ठेवायची सवय पुरुषांपेक्षा त्यांना जास्त, आणि एवढ्या कल्पक शिव्या पुरुषांना कशा काय सुचतील? एक शंका आहे - शिंच्या म्हणजे नक्की 'कोणा'च्या? किंवा 'कशा'च्या?) असो. हळूहळू आमच्या वर्गातल्या मुली सुद्धा हळूच एखादी शिवी तोंडातून लाजत लाजत सोडून द्यायला शिकल्या. अशाप्रकारे, शिव्यांनी मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाणीला हातभार लावला. पण मला सगळ्यात जास्त त्रास दिला, तो फक या शिवीने.. शिवीसुद्धा म्हणणार नाही मी तिला. भ-भे-भो-चु इ शिव्या देताना जी उर्जा बोलणा-याला आणि ऐकणा-याला जाणवते, ती फक-फकर या नेभळट शिव्यांमध्ये अजिबात दिसून येत नाही. याचं उत्तम उदाहरण आहे माझ्याकडे. कॉलेजमधला एक मित्र अजिबात शिव्या द्यायचा नाही. त्याला आम्ही मंदू म्हणायचो. एकदा तो फक म्हणाला. आम्ही सगळे आश्चर्यचकित्!!! आयला आपला मंदू चक्क फक म्हणाला?? तर तो म्हणतो, "हो मी फक बोलतो, त्यात काय?" त्याला पुन्हा एकदा फक म्हणायला सांगितलं. बिनधास्त म्हणाला - फक. मग म्हटलं आता 'चोद' म्हण. "नाही ते नाही म्हणणार मी. किती घाण वाटतं ऐकायला" अरेच्चा!! अर्थ एकच ना दोघांचा!! शिवी द्यायची नाही म्हणतोस तर असा भाषेनुरुप भेदभाव का?? म्हणजे शिवी मराठीत घातलीत तर घाण, - सॉरी, ग्रोस!! आणि तिचं इंग्रजीत भाषांतर करून घातलीत तर सॉफिस्टिकेटेड?? छान!! धन्य!! या मंदू सारखी विचारसरणी ब-याच मुलींमध्येही दिसून येते. इंग्रजीत सगळ्या शिव्या घालतील, पण त्याच अर्थाच्या मराठी शिव्या यांच्यासमोर दिल्या, तर किती घाणेरडा आहे हा मुलगा असं म्हणतील. पण याबद्दल वाईट वाटून घेणं मी सोडून दिलंय. कारण अशा व्यक्तींना शिव्या इंग्रजीत देताना, आपण शिवी देतोय असं जाणवतच नसावं. तितका दमच नाही त्या भाषेत. त्यामुळे एखाद्याला शिवी हासडायचीच, म्हणून जर शिवी द्यायची असेल, तर ती मराठीतून दिल्याशिवाय परिणामकारक ठरतच नाही अशा निष्कर्षाप्रत मी आलो आहे. साधं उदाहरण देतो. एखाद्याला आपण "यू बेगर!!" असं म्हटल्यानं एवढं काही होईल असं नाही पण "अरे भिकारड्या!!" असं म्हटलं तर त्या एखाद्याची खोपडी फिरेलच ना. शिव्या देणं चांगलं, असं माझं म्हणणं नाही. पण एक मात्र आहे, की मराठी भाषेला जिवंत ठेवण्यात शिव्यांचा मोठ्ठा वाटा आहे, असेल. माणूस भले मराठीतून शिक्षण घेवो, अगर इंग्रजीतून. तो शिवी घालतो, ती मराठीतूनच. राग, मत्सर, द्वेष, कटकट, वैताग, उद्गार यांना जेव्हा उत्स्फूर्तपणे व्यक्त करायची वेळ येते तेव्हा अनाहुतपणे माणूस 'ओ फक' म्हणण्याऐवजी 'आयचा घो' म्हणण्याचीच शक्यता जास्त वाटते. कारण माणूस जेव्हा आंग्लाळलेल्या सॉफिस्टिकेटेड शिव्या देतो, तेव्हा सहसा आपण कसे सॉफिस्टिकेटेड आणि मॉडर्न आहोत हे शो ऑफ करण्याचा त्याचा प्रयत्न असतो, त्या शिव्या विचारपूर्वक दिल्या जातात. त्याउलट मनातली भावना, विचार करण्यात वेळ न दवडता उत्स्फूर्तपणे व्यक्त करताना आपसूकच मायबोलीतल्या शिव्या तोंडावाटे बाहेर निघतात, कारण त्या मनापासून दिलेल्या असतात आणि मन हे कायम मायबोलीवर प्रेम करतं. अर्थात, फुशारक्या मारण्यासाठी मराठीतूनही शिव्या देणारी मंडळी असतातच, पण मी गरजेपुरतं शिव्या देणा-यांबद्दल बोलतोय. आयला ह्या शिव्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासही मदत करतात!!!! मस्तच वाटलं जाणीव झाल्यावर!! तर अशाप्रकारे शिव्या ह्या माणसाला, त्याच्या संस्कृतीला, त्याच्या व्यक्तिमत्त्वाला, त्याच्या मनाला, घडवणा-या, फुलवणा-या चेतवणा-या असतात. शिव्या घालताना आणि त्या अंगावर घेताना मनात हलकल्लोळ उडत असतो. लोकलमध्ये सभ्य भाषेत वाद घालणा-या दोन प्रवाशांपैकी एकाने दुस-याला एक जरी शिवी घातली तरी दुसराही आपसुकच सभ्यपणा सोडून पहिल्याला उलट्या शिव्या ऐकवतो, आणि कोणी मध्यस्थी केली नाही तर दोघांचेही हात सहज एकमेकांच्या कॉलरी पकडण्यासाठी सरसावतात. माणसातला पशू बाहेर डोकावू लागतो. अशा प्रकारे शिव्या या माणसाला निसर्गाच्या जवळ नेतात. शिव्यांचे असे विविधढंगी विविधरंगी फायदे आहेत. शिव्या ह्या सर्वव्यापक आहेत. त्यामुळे शिव्या जरी आज मी उगाच देत नसलो, तरी त्यांच्याबद्दल आधी नमूद केल्याप्रमाणे मला भयंकर आदरभाव, आपुलकी आणि जिव्हाळा आहे. शिव्यांचे माझ्यावर अगणित उपकार आहेत. त्यांनी माझे आत्तापर्यंतचे आयुष्य असे रमणीय केले आहे आणि यापुढेही करत राहतील त्याबद्दल मी त्यांचा आजन्म ऋणी राहीन. शेवटी शिव्यांना याच शुभेच्छा देईन की जशी त्यांच्या मानवी जीवनातील या महाकार्याची उपरती मला झाली, तशी ती एक दिवस सगळ्यांना व्हावी आणि मग कोणीही शिव्यांना शिव्या देऊ नये. :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विनोद
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
अनुभव
मत

प्रतिक्रिया द्या
32838 वाचन

💬 प्रतिसाद (54)

प्रतिक्रिया

जबरदस्त विवेचन.मुंबईच्या

नूतन सावंत
गुरुवार, 05/28/2015 - 21:42 नवीन
जबरदस्त विवेचन.मुंबईच्या लांब पल्ल्याच्या लोकलमध्ल्या महिलांच्या डब्यातून प्रवास करताना महिनाभरात इतक्या शिव्या माहितीच्या झाल्या की पहिल्यांदा बायका अशा शिव्या देऊ शकतात का ही शंका नंतर बायकाच असल्या शिव्या देऊ शकतात या विश्वासात बदलून गेली.
  • Log in or register to post comments

माणदेश बोली भाषा

सिरुसेरि
Tue, 06/02/2015 - 13:44 नवीन
व्यंकटेश माडगुळकरांच्या अनेक पुस्तकांमध्ये माणदेश भागातील ( सांगोला ,पंढरपुर , बार्शी व अशीच सोलापुरच्या जवळपासची ठिकाणे) बोलीभाषेतील शिव्यांचे उल्लेख असतात . पण त्यांत कधी 'कडु' या शिवीचा उल्लेख दिसला नाही. कडु हा अपशब्द बहुतेक नंतर अस्तित्वात आला असावा.
  • Log in or register to post comments

मस्त आहे धागा. मजा आली

मृत्युन्जय
Tue, 06/02/2015 - 13:59 नवीन
मस्त आहे धागा. मजा आली वाचताना.
  • Log in or register to post comments

इकडे आणि पल्याड काहींनी मला

मदनबाण
गुरुवार, 10/06/2016 - 22:03 नवीन
इकडे आणि पल्याड काहींनी मला प्रश्न केला कि बाणा ठीक आहेस ना ? डोक तापलयं का ? राग आलाय का ? हो, माझं टाळकं जाम सटकल आहे... कारण ज्या पद्धतीने आपल्या सैनिकांना ठार केले जात आहे ते कुठेतरी माझ्या सहनशक्तीच्या पलिकडे आहे. जेव्हा पासुन उरी ची घटना झाली तेव्हा पासुन कुठेतरी मनात काही तरी ट्रिगर झाले आहे.शिवाय ज्या गोष्टींचा अंदाजा होता तेच आता सगळीकडे दिसत आहे, ते म्हणजे आपल्या लष्कराने केलेला सर्जिकल स्ट्राईक आणि त्यानंर मोकाट सुटलेले वायझेड राजकारणी आणि बॉलिवुड तसेच निर्बुद्धवादी त्यात आता बटाट्याची फॅक्टरी लावणारे सुद्धा भरती झाले आहेत... यांच्यासाठी माझ्या मनात असलेल्या भावना खाली एका व्हिडियोत व्यक्त झालेली आहे. या धाग्याचा आणि खालचा व्हिडियो यांचा संबंध योग्य वाटले म्हणुनच माझ्या मनातील भावना याच व्हिडियोतुन व्यक्त करत आहे. व्हिडियोतील व्यक्ती स्वतः कमांडो ट्रेनर आहे हि महत्वपूर्ण बाब लक्षात ठेवुनच हा व्हिडियो पहावा. १८ वर्ष वय पूर्ण असणारे आणि ज्यांना झेपेल त्यांनीच हा व्हिडियो पहावा हि विनंती ! व्हिडियो पहाणारच असाल तर तो पूर्ण पहा आणि मगच तुम्ही तुमचे मत बनवा ही अजुन एक नम्र विनंती. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- India asks Pakistan to 'abandon futile quest' of Kashmir at the United Nations
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा