कार्यकर्ते येती घरा...

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
9 May 2013 - 8:40 am

लेखाला शीर्षक काय द्यावं हा प्रश्न अनेकदा आ वासून उभा रहातो. हा लेख लिहिताना देखील त्याने तेच केलं. मग त्याने उघडलेल्या मोठ्ठ्या तोंडात 'माझ्या तोंडात कचरा टाका' असं म्हणत चोच वासून बागांमध्ये उभे राहिलेल्या पेंग्विनांच्या पुतळारूपी कचरापेटीच्या आजूबाजूला जितक्या सहजतेने आपण कचरा टाकतो तशी काही नावं भिरकावून बघितली. 'बिपिन कार्यकर्तेंनी अमेरिका प्रवास केला हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न', 'आंगतुक पाव्हण्याचं मोठ्या मनाने आदरातिथ्य करून अमेरिकेत जपलेली भारतीय संस्कृती', 'कार्यकर्तेंचं राजपण, आजपण, उद्यापण' वगैरे अनेक नावं लिहिली. पण कुठचीच न आवडल्यामुळे कागद चुरगाळून ती त्या पेंग्विनच्या चोचीच्या जेमतेम बाजूला जातील अशी फेकली. त्यासाठी अर्थात प्रयत्न करावा लागला नाही, कारण नेम धरून मारलेली पिंक नेहमीच जशी अनपेक्षित ठिकाणी पडते, तसेच ते कागद बरोब्बर बाजूला पडले.

आणि मग अचानक सुचलं. येस्स्स! हेच ते. याचाच मी शोध घेत होतो.... बिपिन कार्यकर्तेंच्या नावाच्या वलयाला साजेलसं नाव लेखाला सापडलं! 'कार्यकर्ते येती घरा...' आम्हा पामरांसाठी मिपाचे महनीय सल्लागार प्रत्यक्ष भेटीला आपल्या घरी येणं हे दिवाळी दसऱ्यासारखंच आहे. अमेरिकेच्या इष्ट कोष्टी तसे दिवाळी दसरेही बर्फात गुंडाळून येतात. पण मे महिन्यात गोष्ट जरा वेगळी असते. भारतात उन्हाने जेव्हा काहिली होत असते तेव्हा आमच्या भागात वसंत ऋतूचं नुकतंच आगमन झालेलं असतं. बाहेरची हवा एखाद्या हिलस्टेशनप्रमाणे आल्हाददायक झालेली असते. सूर्य सहा वाजताच उगवतो आणि साडेआठपर्यंत बाहेर छान उजेड असतो. ग्लोबल वॉर्मिंग चालू आहे तरी हिवाळा इतका वेळ चालू आहे अशी तक्रार करत घरट्यात बसलेले पक्षी इतक्या दिवसाचा वचपा काढण्यासाठी शिल्लक राहिलेल्या वसंता लुफ्त लुटवत मंजुळ किलकिलाट करत असतात. अशा मंगल, सोनेरी वेळी कार्यकर्त्यांसारखी बडी असामी आपल्याकडे येणार हे कळल्यावर त्या सोन्यावर सुहागा चढतो.

क्लिव्हलंडात कामासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी केवळ आमच्या घरी यायचं म्हणून न्यूजर्सीकडे जायचा आपला रस्ता वाकडा करण्याची तयारी दाखवली हे ऐकून तर अभिमानाने माझी छाती भरून आली. तसा ढगळच शर्ट घातला असल्यामुळे काही बटणं वगैरे तुटली नाहीत इतकंच. त्यांना त्यांच्या मित्राने रेल्वे स्टेशनवरून आमच्या ऑफिसापर्यंत सोडलं. मग तिकडून त्यांची तातडीने उचलबांगडी करून घरी नेण्यासाठी ऑफिसजवळ ते आले तिथे पोचलो. पण हाय रे दैवा. बघतो तर काय, मला कार्यकर्ते कुठेच दिसले नाहीत. इकडे शोधलं, तिकडे शोधलं, पण ते काही दिसायला तयार नाहीत. मग फोन लावला. तर शेजारूनच काहीतरी 'विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती....' असा कर्कश प्रश्न विचारणारा रिंगटोन वाजला. त्या फोनच्या मालकाकडे मी नीट निरखून पाहिलं. आवाज ओळखीचाच होता. चेहराही परिचयाचा वाटत होता. पण एकेकाळी भारदस्त आणि वजनदार असलेलं व्यक्तिमत्व पार बदलून गेलं होतं. बाळसं निघून गेल्यामुळे सुरूवातीला ओळख पटली नसली तरी त्याला पोचवायला आलेला मित्र त्याच्या पाया पडत 'गाडीत बसून गाडी पवित्र केल्याबद्दल' त्याचेच आभार मानत होता. ते पाहून हाच आपला बिपिन ही खात्री पटली.

त्याच्याशी गळाभेट घेतल्यानंतर यथोचित आम्ही घरी येऊन पोचलो. अर्थात गाडीत बसायच्या आधी मी कार्यकर्तेंच्या पाया पडायला विसरलो नाहीच. घरी आल्यावर दाराशी माझ्या बायकोनेही बिपिनची आरती केली, त्याचे पाय स्वच्छ धुवून मग त्या पायांच तीर्थ काढून घेतलं. अर्थात अशा बड्या असामीचं आदरातिथ्य करायचं म्हणजे खरंखुरं तीर्थप्राशन करावं लागतं. तर ही त्यांच्यासाठी तयार केलेली फ्रोझन स्ट्रॉबेरी डायक्वेरी. सोत्रिंनी जर हिची पाककृती आधीच टाकलेली नसेल तर लवकरच टाकण्याचा विचार आहे.

कार्यकर्ते येणार म्हणून जेवणासाठी काय करायचं याविषयी अनेक आठवडे आधीच मेनू ठरवण्यासाठी आमच्या घरी मीटिंगा झाल्या. त्यांचं पथ्य काय, शेळीचंच दूध लागतं का गायीचं चालतं, मांस खाणार की नाही वगैरे प्रश्न माझ्या सुविद्य पत्नीने विचारून घेतले. शेवटी अनेक पर्याय बाद करून एक पदार्थ निश्चित झाला - अर्थातच मिसळपाव! त्यासाठी आधल्याच दिवशी मी पाव तयार करून ठेवला. (हो, मी छान पाव करतो हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न वगैरे कोणीतरी नतद्रष्ट व्यक्ती म्हणेल याची खात्री आहे) पण आपल्या परमसज्जन मनोवृत्तीला साजेसं 'मला काहीही चालतं, तुम्ही काही त्रास घेऊ नका' असं त्यांनी सांगितलेलं असलं तरी बोलण्यातून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते गहू कमी खातात असं कळलं. प्रसंग बिका आपलं बाका होता. पण माझ्या सौभाग्यवतीने आयत्या वेळी त्यांना आवडतात म्हणून ताज्या ताज्या भाकरी भाजल्या. आणि मग मिसळ-भाकरी असं एक अनोखं कॉंबिनेशन खाऊन कार्यकर्ते तृप्त झाले हे पाहून माझ्या सहधर्मचारिणीला समाधानाचं भरतं आलं. एकनाथ का नामदेव का कोणाशा संताला आपल्या हातचं प्रत्यक्ष विठ्ठल खातो हे पाहून जसं कृतकृत्य झालं तसं काहीसं.

दरम्यान जेवणाआधी त्यांनी आमच्या पंचवर्षीय, म्हणून अजूनही लालयेत अवस्थेत असलेल्या सुपुत्राला खेळवण्यात आपलं मन रमवलं होतं. अशी दंगामस्ती करणं मुळातच त्याला आवडत असल्यामुळे त्याला बिपिन कार्यकर्ते हे रसायन आवडून गेलं. नंतर निघायच्या वेळी 'आपण बिपिनकाकाला ठेवून घेऊया' असा हट्टही केला. आमच्या चारमहिनीय कुत्र्यालाही 'हा माणूस इतके लाड करतो तसे घरचे इतर का बरं करत नाहीत?' असा प्रश्न पडून गेल्याचं त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसलं. त्याच्या डोळ्यात कार्यकर्ते गेल्यापासून आपली प्रतारणा झाल्याचा भाव कायम दिसतो आहे.

पोटं भरली, पोर झोपलं, सगळीकडे सामसूम झाली आणि मग खरी मैफल रंगली. सॉरी सॉरी मैफल नाही, प्रवचन. संस्थळमहात्म्य या विषयावर मंत्रमुग्ध करणारं प्रवचन ऐकून आमचे कान तृप्त झाले. या प्रवचनात अनेक नव्याजुन्या संस्थळांच्या जन्मदात्या मात्यापित्यांचा उल्लेख आला. जुनेजाणते आयडी येऊन गेले. त्यातले काही अजून लिहितात, काही लिहीत नाहीत, तर काहींना अपरिहार्य कारणांमुळे लिहिता येत नाही असे अनेक. अनेक संस्थळांची बालकांडं, त्यातल्या लडिवाळ खोडसाळपणाच्या कहाण्यांच्या आठवणी निघाल्या. अनेक प्राचीन, अर्वाचीन, आधुनिक, आधुनिकोत्तर घडामोडींना उजाळा मिळाला. मिपासदस्य आणि संपादक यांच्या नात्यावर खेळकर संवाद झाला. डुप्लिकेट आयडी, स्वयंसंपादन सुविधा वगैरे नाजूक बाबींचीही गहन चर्चा झाली. कोणाला, कधी व का मिपावरून कायमचा किंवा तात्पुरता डच्चु मिळाला याच्या नोंदींचा ताळा झाला. मालक, संपादक, आणि सल्लागार यांच्यातील सत्तावाटपबद्दलही काही प्रश्न उपस्थित झाले. पण त्यांना ज्या शिताफीने बगल मिळाली त्यावरून बिका हे थोर महात्मा गांधींप्रमाणे एक बॅरिस्टर महात्मा (श्रेयअव्हेर नरहर कुरुंदकर) आहेत याची प्रचिती आली. या सर्व कीर्तनात रात्रीचे तीन कसे वाजले हे कळलंही नाही.

दुसऱ्या दिवशी शेवटी त्यांना अलविदा करण्याचा क्षण आला. आम्हा दोघांच्याही डोळ्यातून अश्रूंचे पूर वहात होते. दोघांच्या म्हणजे मी आणि माझ्या बायकोच्या - कार्यकर्तेंनी प्राप्त केलेली स्थितप्रज्ञावस्था शेवटी आम्हा पामरांना कुठली साधायची? त्यांचा निरोप घेताना आमच्या डोळ्यात ते पुन्हा कधी भेटणार या दुःखाचे आसूही होते, आणि दिवाळीदसरा साजरा केल्याच्या आनंदाचं हसूही होतं.

हे ठिकाणमुक्तकराजकारणमौजमजाप्रकटनवादविरंगुळा

प्रतिक्रिया

अर्धवट's picture

9 May 2013 - 9:21 am | अर्धवट

थोर आहात,
साक्षात संतांचे पाय लागले आपल्या घरी,
पुढेमागे लोकं बिकांवर डॉक्यूमेंटरी बनवायला घेतील तेव्हा संदर्भासाठी तुमचा पत्ता देउन ठेवा. ;)

रितुश्री's picture

9 May 2013 - 9:22 am | रितुश्री

धाग्याचे नाव वाचुनचं धागा आवडला. :) फोटो पाहिले फक्त (शेवटचा फोटो दिसत नाही :().. छान आहेत. लेख सवडीने वाचेन.

आनंदी गोपाळ's picture

11 May 2013 - 1:39 pm | आनंदी गोपाळ

हा दिसत नाहिये का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 May 2013 - 9:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कार्यकर्ते परदेशात, अब नही लग रहा है दिल उनका अम्रिका मे, ने मजशी परत....., अशा बातम्या जालावर येत होत्या तेव्हा आम्हाला कळलं की कोणी मिपाकर अमेरिकेत कामानिमित्त गेले आहेत. मात्र पाहुनचाराच्या बातम्या कै अपडेट होत नव्हत्या. वृत्तांत कळला तो असा, धन्स.

>>> मालक, संपादक, आणि सल्लागार यांच्यातील सत्तावाटपबद्दलही काही प्रश्न उपस्थित झाले. पण त्यांना ज्या शिताफीने बगल मिळाली त्यावरून बिका हे थोर महात्मा गांधींप्रमाणे एक बॅरिस्टर महात्मा (श्रेयअव्हेर नरहर कुरुंदकर) आहेत याची प्रचिती आली.

लेखन वाचायला सुरुवात केली आणि काय काय मोकळया बाता झाल्या असतील अशा समीश्र भावनेने शेवटी शेवटी श्वास कोंडला होता लेखातील वरील दोन वाक्यानंतर तो मोकळा झाला. :)

-दिलीप बिरुटे

राजेश घासकडवी's picture

9 May 2013 - 9:12 pm | राजेश घासकडवी

लेखन वाचायला सुरुवात केली आणि काय काय मोकळया बाता झाल्या असतील अशा समीश्र भावनेने शेवटी शेवटी श्वास कोंडला होता लेखातील वरील दोन वाक्यानंतर तो मोकळा झाला.

आता त्यांनी जर सगळं खर्रखुर्रं सांगून टाकलं असेल, तरी मी थोडीच ते कबूल करणार आहे? मी असंच लिहिणार की. ;)

सहज's picture

9 May 2013 - 9:40 am | सहज

साधु संत येती घरा तोची दिवाळी दसरा!!!

स्ट्रॉबेरी डायक्वेरी घेउनही महानुभावांचा चेहरा ग्लासभर टोमॅटो सॉस संपवावा लागतोय असा का ते कळायला प्रवचन ऐकावे लागेल. बहुदा वेध लागले/ चित्त पलीकडे लागले असावे.

कुंदन's picture

9 May 2013 - 9:45 am | कुंदन

एकदा ते पेशल टॅक्सी करुन शारजाहुन आमच्या घरी आले होते , त्याची आठवण झाली.

रामदास's picture

9 May 2013 - 11:21 am | रामदास

ते कंपनी खात्यात होते.

अमोल खरे's picture

9 May 2013 - 10:14 am | अमोल खरे

मस्त वृत्तांत. आवडला. आणखीन डीटेल आठवले तर नक्की लिहा.

ऋषिकेश's picture

9 May 2013 - 10:26 am | ऋषिकेश

:)
छान.
त्या तीर्थाचं काय करणार आहात? सीलबंद वगैरे? ;)

प्रभाकर पेठकर's picture

9 May 2013 - 11:03 am | प्रभाकर पेठकर

बिपिन कार्यकर्त्यांसमवेत कांही घटका घालविल्या आहेत. मजा आली होती.

मुलाला खेळवताना कार्यकर्ते साहेबांनी जे त्याला वर उचलले आहे तसे मी करायला गेलो तर माझा शर्टही वर होऊन माझेही पोट दिसेल अशा विचारांनी असला अघोरी खेळ आपण खेळायचा नाही असा पक्का निश्चय केला. मुलाच्या चेहर्‍यावर, 'पाय आभाळाला टेकल्याचे', समाधान ओसंडून वाहते आहे.

सन्जोप राव's picture

9 May 2013 - 11:12 am | सन्जोप राव

कार्यकर्त्यांच्या भेटीचा वृत्तांत आवडला. आपल्याला हवी ती माणसे अमेरिकेत यायच्या सुमारास आपले बस्तान इष्ट कोष्टासारख्या वसंताल्हादी ठिकाणी ठेवायचे आणि आपल्याला नको ती माणसे (खरे तर त्यांची लायकी नसताना चुकुनमाकून) अमेरिकेत आली की दूर दुर्गम ठिकाणी पसार व्हायचे हे होष्टांचे कसबही स्पृहणीय आहे. असो. आमचाही व्हिसा दहा वर्षांचा मल्टिपल एंट्री आहे, त्यामुळे इष्ट कोष्टला अजूनी धोक्याचे वादळ घोंघावते आहेच हे सर्व गुन्हेगारांनी ध्यानात ठेवावे.
बाकी कार्यकर्यांच्या भेटीने तुम्हाला घरी एखादा सत्यनारायण किंवा लघुरुद्र केल्यासारखे वाटले असणार याबाबत शंका नाही. हा इसम अष्टसात्विकतेची पाटलूण आणि अध्यात्मिक उन्नतीचा सद्रा घालून वावरतो. त्याचा शिंपी तरी असल्या अवघड मट्रेलचे कपडे कसे शिवतो कोण जाणे! पण रावसाहेबांप्रमाणे -म्हणजे कृष्णराव हरीहर- आम्ही नव्हे!- यांचाही हस्तस्पर्शच असा की त्यांच्या हाती कण्हेरदेखील गुलाबासारखी वाटते. मग स्ट्रॉबेरी डायक्वेरी तर साक्षात अमृताहुनी गोड वाटली असणार यात नवल ते काय? बाकी 'भाकरी-मिसळ' हा मेनू आवडला. हा मेनू आणि या संकेतस्थळावर टाकलेला हा लेख यात काही बेरजेचे राजकारण नाही ना अशी शंका काही लोकांना येईल, पण त्याकडे दुर्लक्ष करावे. कार्यकर्त्यांना तुमच्याकडचे माफक का होईना पण अपेयपान चालते आणि मिसळीतली मिरचीही चालते आणि आमच्या मेल्या इंडियातल्या मैफिलीत बाकी ते लिंबूपाणी आणि बिनमसाल्याची डाळखिचडी यापुढे जात नाहीत हे आम्ही विसरणार नाही हा आमचा निरोप त्यांच्यापर्यंत पोचवावा.

राजेश घासकडवी's picture

10 May 2013 - 4:21 pm | राजेश घासकडवी

आमचाही व्हिसा दहा वर्षांचा मल्टिपल एंट्री आहे, त्यामुळे इष्ट कोष्टला अजूनी धोक्याचे वादळ घोंघावते आहेच हे सर्व गुन्हेगारांनी ध्यानात ठेवावे.

अहो, आम्हा इष्ट कोष्टियांना वादळांची सवय असते. त्यामुळे हरिकेन कट्रिनासारखंच हरिकेन सन्जोप आलं तर स्वागत करायला आमची फीमा तयार आहे.

हा इसम अष्टसात्विकतेची पाटलूण आणि अध्यात्मिक उन्नतीचा सद्रा घालून वावरतो.

हो, त्यांचे कपडे दिसायला साधे असले तरी एखाद्या स्थितप्रज्ञ योगी-महंताप्रमाणे त्यांच्या आंतरिक तेजापासून जनसामान्यांचं रक्षण करण्याची क्षमता बाळगून असतात. तळपत्या सूर्याकडे पहायचं तर लोकांना दर वेळी डोळ्यावर गॉगल चढवून का ठेवावा लागावा, या परोपकारी वृत्तीतून ते शरीरावर संरक्षक कवच घालून हिंडतात.

छोटा डॉन's picture

9 May 2013 - 11:14 am | छोटा डॉन

जोरदार वृत्तांत गुरुजी.
बाकी इतर बरेच डिटेल्स मिसिंग वाटत आहेत ;)

बादवे, एवढ्या लांब असुन कार्यकर्ते तुम्हाला भेटले ह्याचा हेवा वाटला, इथे आम्ही पुण्यात राहुन आम्हाला भेटायचे नाव नाही. ;)

- छोटा डॉन

आदिजोशी's picture

9 May 2013 - 12:41 pm | आदिजोशी

लुक हु इज टॉकिंग :)

कवितानागेश's picture

9 May 2013 - 11:22 am | कवितानागेश

तिसरा फोटो फार आवडला. :)
पण ते 'सोन्यावर सुहागा चढतो' म्हन्जे काय हो?

मुक्त विहारि's picture

9 May 2013 - 11:47 am | मुक्त विहारि

आवडला..

रामदास's picture

9 May 2013 - 11:51 am | रामदास

खास दोन बुडाचे ग्लास आणलेले दिसतायत.

प्रकाश घाटपांडे's picture

9 May 2013 - 1:39 pm | प्रकाश घाटपांडे

वा वा! कार्यकर्त्यांची पायधूळ आमच्याकडेही झडल्यामुळे धन्य धन्य वाटते!

घासुजी, तुमचं भाग्य खरच थोर आहे म्ह्णायचं. :)

(कार्यकर्त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या घरात रहाणारा) - गणा

अभ्या..'s picture

9 May 2013 - 2:28 pm | अभ्या..

श्री. कार्यकर्ते साह्यबांचा चेहरा कुठेतरी सारखा पाह्यल्यासारखा वाटतोय. ;)
अगदी लैच ओळखीचा वाटतोय.

श्रावण मोडक's picture

9 May 2013 - 5:06 pm | श्रावण मोडक

शीर्षक आणि लेखकाचे नाव पाहिल्यानंतर हे लेखन 'साधू-संत येती घरा' टाईपचे असणार नाही, तर 'दारे खिडक्या बंद करा' असे धमाल असेल, असे वाटले होते. निराशा झाली. पारच सात्वीक...
फटू पाहून मात्र एक लक्षात आलं की एखाद्याला उचलून उलटं करायचं आणि त्याचे पाय छताला लावायचे ही खोड सार्वत्रिक दिसतीये. फक्त जालापुरती नाही.

धमाल मुलगा's picture

9 May 2013 - 5:49 pm | धमाल मुलगा

अगदी येण्याच्या ऐनवक्ताला थोर बालिश्टर महात्मा बिनिपचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब ह्यांनी फोन करुन 'आम्ही राजनैतिक घडामोडी आणि निर्णयप्रक्रियेवर चर्चा करणार आहोत, तू येण्याची आवश्यकता नाही' असं सांगून माझा कांग्रेस कार्यकारिणीतून सुभाषबाबू करुन टाकला. (त्यामुळं घासुगुर्जींनी दिलेला एयरहोष्टेसला डोळा घालण्याचा चानस हुकला! :( )

>>तर शेजारूनच काहीतरी 'विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती....' असा कर्कश प्रश्न विचारणारा रिंगटोन वाजला.
आयला! एव्हढ्यातच रिंगटोन बदलेलं दिसतंय. आत्ताआत्तापर्यंत 'गोविंदा गोविंदा गोविंदा...गोऽविंऽदा' अशी होती ना?

बाकी, कट्टा जोरदार झाला असणार ह्यात काही शंका नाहीच. पण....इतकं अष्टसात्विक भावानं लिहिलंय, तर तुमचाही एक फोटू टाकायचा की राव तो स्वागत करतानाचा...नवेकोरे कपडे, डोक्याला करकरीत भट्टीची पांढरीफेक गांधीटोपी, खांद्यावर उपरणं अन जिलेबीवर पाक थबथबलेला असतो तसे चेहर्‍यावर थबथबलेला भक्तीभाव! :D

अवांतर - ह्या बिपिनदाला पोरं छताला टेकवायची काय हौस असते काय कळत नाय बॉ! :)

चिगो's picture

10 May 2013 - 5:02 pm | चिगो

माझा कांग्रेस कार्यकारिणीतून सुभाषबाबू करुन टाकला.

जबराट.. :-) लेख आवडला..

राजेश घासकडवी's picture

10 May 2013 - 7:25 pm | राजेश घासकडवी

माझा कांग्रेस कार्यकारिणीतून सुभाषबाबू करुन टाकला.

मग एक मुक्तीसेना वगैरे स्थापन करा. साठेक वर्षांनी तुमच्यावर 'आमी धॉमॉल मुलगा बोलेछी' नावाचा सिनेमा निघेल!

तर तुमचाही एक फोटू टाकायचा की राव तो स्वागत करतानाचा...

लक्ष्मणाला जसे फक्त सीतेचे पाय दिसायचे तसे माझ्या कॅमेराला केवळ बिपिनदा दिसले. माझ्याकडे बघण्याची त्याची इच्छाच झाली नाही. अर्थात एखाददोन एकत्र फोटो काढलेले आहेत, पुढेमागे पोलिटिकल कॅपिटल म्हणून वापरायला.

ढब्बू पैसा's picture

9 May 2013 - 5:49 pm | ढब्बू पैसा

थोडा कंटाळवाणा वाटला. धड उपहासही नाही आणि खरेपणाही नाही. मध्येच कुठेतरी लटकल्यासारखा झालाय. बाकी बाळसं उतरणे आणि भाकरीविषयी सहमती ;)
(स्वगतः ढब्बे, हा लेख पल्याडला का नसावा बरे ?)

राजेश घासकडवी's picture

9 May 2013 - 10:26 pm | राजेश घासकडवी

धड उपहासही नाही आणि खरेपणाही नाही. मध्येच कुठेतरी लटकल्यासारखा झालाय.

धन्यवाद. बिकांच्या भेटीच्या आठवणी ताज्या असताना काल रात्री भराभर लिहून काढला म्हणून काही गोष्टी राहून गेलेल्या आहेत. नमनालाच घडाभर तेल टाकलं, त्यामुळे कमी भजी तळली गेली असावीच. आठवतील तसे नवीन घाणे काढतो. असे लेख फार उशीरा आले तर 'बैल गेला अन् झोपा केला' सारखे होतात. (बिका गेले अन्... असं लिहायचा मोह आवरला)

इरसाल's picture

11 May 2013 - 9:49 am | इरसाल

असे लेख फार उशीरा आले तर 'बैल गेला अन् झोपा केला' सारखे होतात. (बिका गेले अन्... असं लिहायचा मोह आवरला)

म्हणजे तंबुही गेला, उंटही गेला आणी शेखही गेला..

ढालगज भवानी's picture

9 May 2013 - 6:09 pm | ढालगज भवानी

वृत्तांत फारच खुमासदार झाला आहे. बिकांची ट्रीप खूप छान झालेली दिसते. मस्त!! मस्त!!

ढालगज भवानी's picture

9 May 2013 - 6:09 pm | ढालगज भवानी

वृत्तांत फारच खुमासदार झाला आहे. बिकांची ट्रीप खूप छान झालेली दिसते. मस्त!! मस्त!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 May 2013 - 9:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>>निघायच्या वेळी 'आपण बिपिनकाकाला ठेवून घेऊया' असा हट्टही केला.<<
बिपिनचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब हा मोठा माणूस खरा! आई-वडलांना नावाने हाक मारणारा पोरगा ज्यांना काका म्हणतो तो म्हणजे कोणी महान विभूतीच असला पाहिजे.

पण अगदी साधा माणूस हो; 'तत्त्वतः सारखेच' असं साधं लोकशाही तत्त्व खरडीतूनही शिकवतो. गुर्जींच्या घरी एवढं बिझी शेड्यूल असतानाही 'सही बदल' असा सोपा सल्ला सुचवून माझी अडचण दूर केली.

(पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहू या प्रशंसेचा.)

नंदन's picture

9 May 2013 - 10:19 pm | नंदन

अमेरिकेत इष्ट कोष्ट आणि वेश्ट कोष्ट यांच्यात सतत चालू असणार्‍या चढाओढीत बिकांच्या दौर्‍यामुळे पारडे इष्ट ठिकाणी झुकले आहे, हे निरीक्षण नोंदवावेसे वाटले :)

पिवळा डांबिस's picture

10 May 2013 - 12:04 am | पिवळा डांबिस

वरील निरिक्षणाशी सहमत.
नंदन, षोकसभा कधी घेऊया?
;)

नंदन's picture

10 May 2013 - 5:36 am | नंदन

लवकरच घ्यायला हवी. आपल्या किनार्‍यावर कार्यकर्त्यांनी पायधूळ आतापर्यंत झाडली नसली, तरी एक युवा नेते (देशाचे आशास्थान, तरुणींचे स्फूर्तिस्थान, खरडींचे आश्रयस्थान इ. इ.) येणार असल्याची खबर आहे. त्यांच्या स्वागताची रंगीत तालीम म्हणून लवकरच षोकसभा आयोजित करायला हवी :)

*'षोक अनावर झाला' ही प्रसिद्ध उ. सं. डु. आठवली ;)

पिंडाकाका 'शोक' सभेचं थोळ्याच वेळात 'षौक' सभेत रुपांतर करतील याची खात्री आहे.
तुमच्या सभेचे फोटू पाठवा बरं का नंदनशेट. ;)

पिवळा डांबिस's picture

10 May 2013 - 9:22 pm | पिवळा डांबिस

एक युवा नेते (देशाचे आशास्थान, तरुणींचे स्फूर्तिस्थान, खरडींचे आश्रयस्थान इ. इ.) येणार असल्याची खबर आहे. त्यांच्या स्वागताची रंगीत तालीम म्हणून लवकरच षोकसभा आयोजित करायला हवी.

जरूर! रंगीत तालीम तो करेंगेही.
लेकिन उनको आने तो दो. षोकसभा तो क्या मोरक्कन हॉस्पिटॅलिटी भी मौजूद करेंगे!!! ;)
बिकाला देखील नेलं असतं, पण त्याच्या नशिबात घासूगुर्जी होते!
असतं एकेकाचं नशीब!!!!
:)

राजेश घासकडवी's picture

10 May 2013 - 9:57 pm | राजेश घासकडवी

बिकाला देखील नेलं असतं, पण त्याच्या नशिबात घासूगुर्जी होते!
असतं एकेकाचं नशीब!!!!

बिकांना कसली मोरक्कोची कौतुकं सांगता? त्याने आख्खा आफ्रिका पायाखाली घातलेला आहे. तिथल्या सर्व ठिकाणच्या हॉस्पिटॅलिट्यांचा लुफ्त लुटवला आहे. त्यांच्या सज्जनतेच्या बुरख्याच्या आत रसिकतेचा खूप हुस्न दडलेला आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 May 2013 - 11:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यांच्या सज्जनतेच्या बुरख्याच्या आत रसिकतेचा खूप हुस्न दडलेला आहे.

दोन थोर्थोर लोक एकदम होलसेलमधे 'उदारमतवादी' बनलेले पाहून फार्फार आनंद झाला.

पिवळा डांबिस's picture

14 May 2013 - 1:40 am | पिवळा डांबिस

बिकांना कसली मोरक्कोची कौतुकं सांगता? त्याने आख्खा आफ्रिका पायाखाली घातलेला आहे. तिथल्या सर्व ठिकाणच्या हॉस्पिटॅलिट्यांचा लुफ्त लुटवला आहे. त्यांच्या सज्जनतेच्या बुरख्याच्या आत रसिकतेचा खूप हुस्न दडलेला आहे.

होय का? अख्खा आफ्रिका का?
हे माहिती नव्हतं!!! मानलं बुवा!!!!
बाकी तुम्ही प्रतिसाद देण्याच्या उत्साहात तुमच्या बिकामित्राचं नेसूंचं भर मिपाबाजारात उलगडतांय!!!
:)
कुणीतरी म्हंटलंच आहे, "व्हेन यू हॅव फ्रेंन्डस लाईक दीज.....!!!!"
बिका, वरील ओळ पूर्ण कर पाहू!!!!!
:)

राजेश घासकडवी's picture

14 May 2013 - 2:59 am | राजेश घासकडवी

होय का? अख्खा आफ्रिका का?

अहो त्यांनी सांगितलं तेच मी रीपीट करतोय. गाडीत बसल्याबसल्या बिकांनी पहिली गोष्ट काय सांगितली असेल तर त्यांना अमेरिकेचा व्हिसा मिळण्यासाठी काय काय खटपटी कराव्या लागल्या त्या. जी काय कागदपत्रं गोळा करावी लागली ती सगळी असली तरी नक्की तिथे जाऊन काय करायचं आहे याची उत्तरं ते आदल्या रात्रभर घोकत होते. पण मुख्य पंचाइत आली ती म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत मिपावर मिरवलेल्या 'शेखी'मुळे. ते काय ते खोबार, अरबस्तान, नायजेरिया, घाना, वगैरे वगैरे ठिकाणी जाऊन राहून आलेले आहेत. मिपावर टाकलेले अनुभव काय अमेरिकन सीआयएने वाचले नसतील असं वाटतं का तुम्हाला? इतक्या टेररिस्ट देशांमध्ये जाऊन आले आहेत त्यामुळे ते नुसते साधेसुधे टेररिस्ट नाहीत, तर अनेक देशांमधल्या टेररिस्ट सेल्स कोऑर्डिनेट करणारे कोणीतरी हाय लेव्हलचे आहेत असं वाटलं. त्यात त्यांचाही काही दोष नाही, त्यांच्याकडे पाहिलं कीच हा माणूस कोणीतरी वरच्या लेव्हलचा, सरकारं चालवणारा/पाडणारा, आणि अध्यात-मध्यात नाही असं लोकांना सहज पटवून देणारा असणार असा संशय येतोच. मग आयताच हा माणूस अमेरिकन कॉन्सुलेटच्या भूमीवर म्हणजे साक्षात अमेरिकेत आला आहे हे पाहून त्यांना तिथेच ठेवून घेऊन डिप्लोमॅटिक डफल बॅगमधून अमेरिकेत आणि तिथून नंतर ग्वाटानामो बे ला पाठवण्याचा प्लॅन होता, पण कसेबसे सुटले. (त्यांना सांगितलं नाही, पण मीच आमच्या मध्यरात्री डिपार्टमेंट ऑफ स्टेट आणि होमलॅंड सिक्युरिटीमधली माझी कनेक्शनं वापरून त्यांना सोडायला लावलं होतं... बिकांसाठी काय वाटेल ते. पण म्हटलं त्यांना सांगून ओशाळं का करा?)

बाकी तुम्ही प्रतिसाद देण्याच्या उत्साहात तुमच्या बिकामित्राचं नेसूंचं भर मिपाबाजारात उलगडतांय!!!

घ्या, म्हणजे मित्रासाठी एवढं काहीतरी करायचं आणि इतरांकडून अशी दळभद्री बोलणी ऐकून घ्यायची! याचसाठी का माझा जन्म झाला? धरतीमाते, मला पोटात का घेतलं नाहीस गं, बिका यायच्या आधीच...

धरतीमाते, मला पोटात का घेतलं नाहीस गं, >> अजीर्ण होईल अशी खात्रीयुक्त भीती वाटली असेल तिला!

राजेश घासकडवी's picture

14 May 2013 - 4:24 pm | राजेश घासकडवी

आधी पिडांनी चेष्टा केली आता तुम्ही करताय. मीच म्हणायला पाहिजे 'विथ फ्रेंड्स लाइक दीज...' ;)

सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते गरजु व्यक्तींच्या मदती साठी तुमच्या घरी आले आणि मग तुम्ही त्यांची कशी काशी केली......
असो व्रुतांत आणि पिलुचा फोटो आवडला.

प्यारे१'s picture

10 May 2013 - 12:22 am | प्यारे१

चान चान!

पैसा's picture

10 May 2013 - 12:25 am | पैसा

स्वत:च स्वत:ला तार्किक, डोळस, लढाऊ आणि हुच्च समजणारे लोक वाद अंगाशी आला की फेसबुकीय लढाईतून पळ काढतात शिवाय समोरच्याला ब्लॉक करतात, हे पाहून विस्मयचकित झालो आहे.

काय रे ही सही! तू म्हणजे सह्याजीराव आहेस अगदी! त्या प्रसंगाला मी मूक साक्षीदार होते बरं! =))

जाऊ दे हो. चालायचं. मातीच्या ** गळून पडतात शेवटी.
आम्ही मूर्ख आहोत (हे त्यांचंच मत) पण ज्यांच्याकडं आशेनं पहावं असे लोक देखील असं करु लागले म्हणून विस्मयचकित झालो. खरंच.

वाचक's picture

10 May 2013 - 9:04 am | वाचक

नव्या जर्सी पर्यंत येउनही बिका शेठनी त्यांची कृपा(काक)दृष्टी बॉस्ट्न कडे न वळवल्याबद्दल जाहिर निषेध. तो धम्या रडतोच आहे 'बस ने कसा येउ' वगैरे करत, आता कार्यकर्तेच अस करायला लागल्यावर आम्ही भक्तांनी कुणाच्या तोंडाकडे पहायच ऑं ?

(अवांतरः पल्याडच्या गुर्जींना बिकाच्या आगमनाचा पत्ता आणि अल्याडच्या 'जुने अणे जाणिते' लोकांना का नसावा बुवा? ) :)

संजय क्षीरसागर's picture

10 May 2013 - 6:51 pm | संजय क्षीरसागर

आणि मस्त लेखनशैली!

सुहास झेले's picture

10 May 2013 - 9:53 pm | सुहास झेले

जबरदस्त वृत्तांत..... :) :)

शीर्षक वाचून सद्य परिस्थितीतील राजकारणाबद्दल किस्से वाचायला मिळेल असे वाटले होते ;-)

चित्रगुप्त's picture

10 May 2013 - 10:50 pm | चित्रगुप्त

भाग्यवान.

कालच संध्याकाळी कार्यकर्तेंनी मला फोन केला तरी लै आनंद झाला.
तुमच्या तर ते चक्क घरी आले की भौ :)
रच्याकने -- घासकडवी गुर्जी न्यू जर्सीत मूव्हलात का?
तसे असेल तर नक्की कधी सांगणार होता? :)

राजेश घासकडवी's picture

11 May 2013 - 2:39 am | राजेश घासकडवी

रच्याकने -- घासकडवी गुर्जी न्यू जर्सीत मूव्हलात का?

नाही हो, म्हणून तर त्यांना वाट वाकडी करावी लागली.

नंदन's picture

11 May 2013 - 3:00 am | नंदन

एम्पायर स्टेटच्या ८६व्या मजल्यावरून

'फ्रेंड्स इन हाय प्लेसेस' हे लाक्षणिक अर्थाबरोबरच आता शब्दशःदेखील ;)

राजेश घासकडवी's picture

11 May 2013 - 6:07 pm | राजेश घासकडवी

'फ्रेंड्स इन हाय प्लेसेस' हे लाक्षणिक अर्थाबरोबरच आता शब्दशःदेखील

हा हा हा... नुसतं तेवढंच नाही, 'क्लाउड नाइन' मधून फोन आला की जमिनीवरचा माणूसदेखील 'क्लाउड नाइन' मध्ये जातो.