✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ओज-शंकराची कहाणी

न
नरेंद्र गोळे यांनी
Wed, 04/03/2013 - 12:59  ·  लेख
लेख
श्री. शंकर दिनकर उपाख्य भैयाजी काणे (जन्मः ६ डिसेंबर १९२४, वरवडे, रत्नागिरी – मृत्यूः २६ ऑक्टोंबर १९९९, कोल्हापूर) हे न्यू तुसॉम, जिल्हा उख्रूल, मणीपूर राज्य, भारत, ह्या त्यांच्या कर्मभूमीत, ओज-शंकर म्हणून ओळखले जातात. तिथे, पूर्व-सीमा-विकास-प्रतिष्ठानतर्फे स्थापन करण्यात आलेल्या ओज-शंकर विद्यालयाच्या स्वरूपात, आज त्यांचे कार्य दिमाखाने उभे आहे. शिक्षणाद्वारे राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या त्यांच्या जीवनव्यापी ध्यासाचे, आज एका मोठ्या चळवळीत रूपांतरण झालेले आहे. त्या त्यांच्या भरतभूस ललामभूत ठरलेल्या कार्याची ही कहाणी आहे. भैयाजींचे प्राथमिक शिक्षण पुण्यात आणि माध्यमिक शिक्षण सातार्‍यात झाले. ते १९४० साली शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. १९४२ ते १९४४ अशी दोन वर्षे त्यांनी इंडियन एअर फोर्समध्ये ग्राऊंड इंजिनिअरिंग कोर्प्समध्ये, लाहोर, कोलकाता व सिकंदराबाद येथे नोकरी केली. १९४४ साली नोकरी सोडून त्यांनी पुण्यात सरदार परशुरामभाऊ महाविद्यालयात नाव नोंदवले. १९४६ साली ते संस्कृत विषय घेऊन, विशेष प्राविण्यासह बी.ए. झाले. पुढे बी.एड. आणि एल.एल.बी.ही झाले. १९४८ साली संघावर बंदी आली होती तेव्हा भैयाजी सहा महिने तुरूंगात गेले. १९५० मध्ये ते संघाचे पूर्णवेळ प्रचारक झाले. १९५८ पर्यंत एकूण आठ वर्षे मंगलोर, गुलबर्गा, रायचूर ह्या भागात प्रचारक राहिले. ते कुशल संघटक होते. उत्साही प्रशिक्षक होते आणि निष्ठावान स्वयंसेवक होते. उंच, गोरेपान, प्रसन्न व्यक्तीमत्त्वाचे भैयाजी जिथे जिथे गेले, तिथले लोक त्यांची आजही आठवण काढतात. १९५८ ते १९७१ भैयाजींनी, सिन्नर (नासिक), चिंचणी (ठाणे), जशपुरनगर (छत्तीसगड), वसई, निर्मळ, भुईगाव, कळंब, वाघोली (ठाणे), कोंढ्ये (तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी) इत्यादी निरनिराळ्या गावांत शिक्षकाची नोकरी करून उपजीविका चालवली. स्वतःचे पायावर उभे राहून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम केले. ते उत्तम मल्लखांबपटू, प्रशिक्षक आणि प्रणेते होते. संस्कृत साहित्याचा अपार अभ्यास आणि अनेकविध स्तोत्रांचे अफाट पाठांतर असल्याने त्यांना व्यक्तीस वश करून घेण्याची कला सुरेख साधलेली होती. आदर्श शिक्षकाचा जणू ते वस्तुपाठच होते. ह्या सार्या कौशल्याचा त्यांना संघकार्यात भरपूर उपयोग होत असे. १९७१ सालच्या जून महिन्यात, कोढ्ये येथील नोकरी सोडून ते जाणीवपूर्वक पूर्वांचलात गेले. प्रथम इंफाळमधील पंजाबी हायस्कूलमध्ये नोकरी केली. मग १९७३ च्या जूनमध्ये ते कोंढ्याच्या जयवंत कोंडविलकर ह्या बारा वर्षे वयाच्या, सातवीत शिकणार्या मुलासह, मणिपूर राज्यातील, उख्रूल जिल्ह्यातील, न्यू तुसॉम गावात एका ख्रिश्चन-उच्च-माध्यमिक-शाळेत नोकरी करू लागले. हे त्यांच्या शिक्षणाद्वारे-राष्ट्रीय-एकात्मता साधण्याच्या ध्येयास अनुसरूनच केलेले होते. उत्तम शिक्षण आणि बहिःशाल कार्यक्रमांद्वारे ते प्रथम विद्यार्थीप्रिय झाले आणि पुढे पालकांच्याही पसंतीस उतरले. मराठी, कानडी, हिंदी, इंग्रजी,संस्कृत, मैतेयी भाषांवर त्यांची उत्तम पकड असल्याने लोकांना समजून घेऊ शकले. त्यांच्याशी सुसंवाद करू शकले. शिवाय, प्रेमळ, आर्जवी, आनंदी आणि उत्साही स्वभावामुळे ते लोकांच्या मनांत प्रवेश करू शकले. शाळेचे व्यवस्थापन ख्रिश्चन मिशनर्‍यांचे असून आणि भैयाजी स्वतः हिंदू असूनही, त्यांना वसतीगृहाचे पर्यवेक्षक नेमले गेले. पूर्ण वेळ मुलांसोबत राहून, पहाटेपासून मुलांना एकात्मतेची जाण दिली. भारतीयत्वाची जाण दिली. शारीरिक शिक्षण दिले. त्यांना मल्लखांब, निरनिराळे खेळ शिकवले. भारतीय भूप्रदेशांची, संस्कृतीची आणि प्रातस्मरणीय व्यक्तीत्वांची सम्यक ओळख करून दिली. आजारपणांत पालकांप्रमाणे शुश्रुषा केली. त्यामुळे ख्रिश्चनबहुल समुदायात त्यांचे अल्पावधीतच स्नेहबंध निर्माण झाले. पूर्वांचलातील कामांत त्यांनी संघसंपर्कांचा मुळीच उपयोग केला नाही. कुठेही ते दीर्घकाळ राहिले नाहीत. त्यांना कायमस्वरूपी असे घरच नव्हते. गोळवलकर गुरूजींनी एकदा त्यांना विचारले, “भैय्या, तू सारखा फिरत असतोस, स्थिर का होत नाहीस?” तेव्हा भैय्याजी म्हणाले होते, “मी अनिकेत आहे, पण स्थिरमति!” ह्याला गीतेच्या बाराव्या अध्यायातील एकोणिसाव्या श्लोकाची पार्श्वभूमी आहे. तो श्लोक असा आहेः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी संतुष्टो येनकेनचित् । अनिकेतः स्थिरमतिः भक्तिमान् मे प्रियो नरः ॥ - भगवद्गीता-१९-१२ म्हणजेच निंदा स्तुति न घे मौनी मिळे ते गोड मानितो । स्थिर बुद्धि निराधार भक्त तो आवडे मज ॥ - गीताई-१९-१२ “अनिकेतः स्थिरमतिः” हे भैयाजींनी केलेले स्वतःचे वर्णनच त्यांचे सर्वात यथार्थ वर्णन आहे. त्यामुळे अर्थातच ते भगवंतांचे प्रिय व्यक्ती असायलाच हवेत. १९७३ च्या सप्टेंबरमध्ये त्यांच्या मातोश्री निवर्तल्याची तार आल्याने त्यांना नाईलाजानेच परतावे लागले. परंतु त्याही परिस्थितीत त्यांनी, लालमोहन शर्मा ह्या मैतेयी आणि शंकन ह्या तांगखूल नागा मुलासही जाणीवपूर्वक सोबत घेतले. जयवंतही सोबत होताच. सांगलीत आईचे दिवस पूर्ण होताच त्यांनी स्वतः शिक्षकी पेशा पत्करला आणि मुलांना सोबत घेऊन राहू लागले. पुढे ह्या मुलांना घेऊन ते जेव्हा न्यू तुसॉमला परत गेले तेव्हा त्यांची प्रगती झालेली पाहून इतर पालकही आमच्या मुलांना घेऊन जा. शिकवा. असे मागे लागले. जास्त विद्यार्थ्यांची सोय करणे त्यांना आर्थिकदृष्ट्या झेपणारे नव्हते. पण असल्या बारक्या समस्यांना दाद देतील तर ते भैय्याजी कसले! त्यांनी सांगलीतील प्रतिष्ठित व्यक्ती व संस्थांनाही ह्या चांगल्या कामास हातभार लावण्यास विनंती केली. समाजानेही त्यांचा शब्द वाया जाऊ दिला नाही. मग १९९२ पर्यंत त्यांनी शेकडो विद्यार्थी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रात आणले, शिकवून मोठे केले आणि त्यांना प्रेरित करून पुन्हा पूर्वांचलात पाठवले. आज ते विद्यार्थीच जबाबदार नागरिक झालेले आहेत. त्यांचे उद्दिष्टास पुढे नेत आहेत. १९९२ नंतर त्यांनी वानप्रस्थाश्रम पत्करला. एकाकी जीवन जगणे पसंत केले. कुठेही दीर्घकाळ राहिले नाहीत. कुणासही भारभूत झाले नाहीत. ते त्यांच्या स्वभावातच नव्हते. २६ ऑक्टोंबर १९९९ रोजी, बंधूंचे घरीच कोल्हापूरात, मेंदूतील कर्क अर्बुदा (ब्रेन ट्युमर) मुळे त्यांचा मृत्यू झाला. ही वार्ता कळली तेव्हा जागोजाग त्यांच्या विद्यार्थांना पोरके वाटू लागले. २६ ऑक्टोंबर २००० रोजी न्यू तुसॉम येथे झालेल्या श्रद्धांजली सभेत त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि गावकर्‍यांनी त्यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीचे शब्द मुळातच वाचण्यासारखे आहेत [१]. २००२ साली त्यांच्या एका मित्राने, श्री.अ.गो.कुंटे ह्यांनी त्यांचे एक चरित्र प्रकाशित केले. त्या पुस्तकात त्यांच्या कामाचे थोडक्यात वर्णन उपलब्ध आहे [२]. मात्र, भैय्याजींसारख्या प्रसिद्धीपराङगमुख व्यक्तीचा माग काढणे मुळीच सोपे नाही. तरीही त्यांच्या लाखो चाहत्यांच्या मनांत त्यांच्या आठवणी सदैव ताज्या आहेत. त्यांचे विद्यार्थी आणि पुढे दहाहून अधिक वर्षे पूर्वांचलात राहून त्यांच्या कामास पूर्णत्व देणारे श्री. जयवंत कोंडविलकर यांच्या आठवणींवर आधारित “उख्रुलचे आव्हान” [३] हे पुस्तकही मुळातच वाचनीय आहे. एवढेच सांगून ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण करतो. त्यांच्या कामाचे वर्णन करणारे ओज-शंकराष्टक आपणास सादर करतो! संदर्भः १. एका शाळामास्तरची भारत परिक्रमा, दे.कों.सातभाई, प्रकाशकः पूर्व-सीमा-विकास-प्रतिष्ठान, १६ ऑक्टोंबर २००१, पृष्ठसंख्या-१५२, किंमतः रु.६०/- फक्त. २. अलौकिक कर्मयोगी स्वयंसेवक, अ.गो.कुंटे, प्रकाशकः जयवंत गणपत कोंडविलकर, २४ जुलै २००२, पृष्ठसंख्या-१३८, किंमतः रु.६०/- फक्त. ३. जयवंत कोंडविलकर यांच्या आठवणींवर आधारित 'उख्रुलचे आव्हान', शब्दांकन पुरूषोत्तम रानडे, पृष्ठसंख्या-५७. (हे पुस्तक अजून प्रकाशित झालेले नाही. वाटेवर आहे.) ओज शंकरा तुझीच ओज-शंकरा, स्मृती मनात वाहतो । समर्थ मातृ-भूमिला, जगात पाहु चाहतो ॥ धृ ॥ प्रसार संघशक्तिचा, विचार भावला तुला । जगात आचरून प्रेममार्ग, पाय रोविला ॥ कसा मिळेल वारसा तुझा, विचार राहतो । समर्थ मातृ-भूमिला, जगात पाहु चाहतो ॥ १ ॥ कधी सुरेल बांसरी, ’प्रहार’ तू प्रशिक्षिले । कुमार, बाल, वा युवा, तुवा पुरे खुळावले ॥ व्यक्ती, व्यक्ती, शिबीर-साक्ष, तेच दीस शोधतो । समर्थ मातृ-भूमिला, जगात पाहु चाहतो ॥ २ ॥ कसा, कुठे, कधी, कुणी, विचार प्रेरिला मनी । अपूर्व-पूर्व अंतरा[१] न थोर मानले जनी ॥ तुझेच शिष्य, चाहते, तुला मनात बाहतो । समर्थ मातृ-भूमिला, जगात पाहु चाहतो ॥ ३ ॥ तळात कोकणातुनीहि नागभूमि[२] गाठली । एकात्मता धरून नेम देशभक्ति पेरिली ॥ मितेय, नाग, तांगखूल, मुंबईस जोडतो । समर्थ मातृ-भूमिला, जगात पाहु चाहतो ॥ ४ ॥ ब्रम्हचर्यी कुणास काय प्राप्त होत संतती । तुला मुले अनेक, ती तुझेच नाव सांगती ॥ न पुत्र वागला कुणी, असाच निष्ठ राहतो । समर्थ मातृ-भूमिला, जगात पाहु चाहतो ॥ ५ ॥ निवासती मुलेमुली, अशी गृहेहि राखली । मुलांस, पालकांस, ना मुळीच धास्ति वाटली ॥ जपेल पालकापरी, असे समाज मानतो । समर्थ मातृ-भूमिला, जगात पाहु चाहतो ॥ ६ ॥ मराठमोळ, कानडी असोहि तेलुगू कुणी । मितेय, नाग, तांगखूल, शिष्य सर्वही गुणी ॥ तुम्हास लोभला, खचीत ध्येय शुद्ध गाठतो । समर्थ मातृ-भूमिला, जगात पाहु चाहतो ॥ ७ ॥ असेच दीप दाखवू, अशीच रीत नांदवू । एकात्मता समस्त नागरिकांत खास जागवू ॥ पथावरून जाऊ त्याच, ब्रीद हेच सांगतो । समर्थ मातृ-भूमिला, जगात पाहु चाहतो ॥ ८ ॥ [१] मुंबई ते कोलकाता १,६६४ किमी अंतर, अधिक कोलकाता ते उख्रुल १,५७८ किमी अंतर, अधिक उख्रुल ते न्यू तुसॉम १०० किमी अंतर असे एकूण ३,३४२ किमी अंतर, भैय्याजींनी क्षुल्लक भासावे इतक्यांदा पार केले, इतक्यांदा शेकडो मुलांची तिथून इथवर ने-आण केली. [२] कोकणातील कोंढ्ये गावातून ते थेट मणिपूर राज्यातील म्यानमारच्या सीमेवरील न्यू-तुसॉम गावात, शिक्षणाद्वारे-राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याच्या आपल्या ध्येयाच्या साधनेकरता, १९७१ साली रवाना झाले होते. http://nvgole.blogspot.in/ ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
समाज
जीवनमान
राहणी
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
लेख
माहिती

प्रतिक्रिया द्या
4169 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

_/\_

मूकवाचक
Wed, 04/03/2013 - 14:07 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

मला फक्त नाव वाचल्याचे आठवतय.

कवितानागेश
Wed, 04/03/2013 - 14:15 नवीन
मला फक्त नाव वाचल्याचे आठवतय. बाकी ही माहिती नव्हती. इथे महिती दिल्याबद्दल धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments

डोंबिवलीतल्या पूर्वांचल विकास

नानबा
Wed, 04/03/2013 - 15:06 नवीन
डोंबिवलीतल्या पूर्वांचल विकास प्रकल्पाच्या विद्यार्थीगृहात भैयाजींची एक तसबीर आहे. आणि सध्या तेथे वास्तव्य असलेल्या नागालँडच्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्याबद्दल बरीच माहिती आहे. अशीच माहिती इथेही टाकलीत त्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

उल्लेखनीय कार्य. माहिती

आतिवास
Wed, 04/03/2013 - 15:25 नवीन
उल्लेखनीय कार्य. माहिती नव्हती, ती दिल्याबद्दल आभार. ओज-शंकराष्टक छान जमलं आहे.
  • Log in or register to post comments

___/\___

नि३सोलपुरकर
Wed, 04/03/2013 - 16:07 नवीन
___/\___
  • Log in or register to post comments

फारच ओजस्वी व्यक्तीमत्व.

स्पंदना
Wed, 04/03/2013 - 16:24 नवीन
फारच ओजस्वी व्यक्तीमत्व. इथे ओळख करुन दिल्याबद्दल मनःपुर्वक आभार.
  • Log in or register to post comments

सर्वच माहिती नवीन. एका

बॅटमॅन
Wed, 04/03/2013 - 17:06 नवीन
सर्वच माहिती नवीन. एका कर्तबगार व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल बहुत धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

अशा व्यक्तिमत्वांविषयी अतोनात

यशोधरा
Wed, 04/03/2013 - 17:09 नवीन
अशा व्यक्तिमत्वांविषयी अतोनात आदर वाटतो. माहितीबद्दल धन्यवाद गोळेकाका.
  • Log in or register to post comments

छान ओळख!

प्यारे१
Wed, 04/03/2013 - 18:40 नवीन
छान ओळख!
  • Log in or register to post comments

हा खरा निष्काम कर्मयोग !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 04/03/2013 - 18:48 नवीन
__/\__ __/\__ __/\__
  • Log in or register to post comments

छान..

उपास
Wed, 04/03/2013 - 19:43 नवीन
सुंदर ओळख करुन दिलीत गोळेकाका, भैय्याजी म्हणजे अतिशय आदरणीय व्यक्ती.
  • Log in or register to post comments

अभिप्रायांखातर मन:पूर्वक धन्यवाद!

नरेंद्र गोळे
गुरुवार, 04/04/2013 - 17:19 नवीन
मूकवाचक, लीमाऊजेट, प्रथम, आतिवास, नि३सोलापुरकर, अपर्णा, बॅटमन, यशोधरा, प्यारे१, इस्पिकचा एक्का आणि उपास, अभिप्रायाखातर सगळ्यांना मन:पूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments

प्रेरणादायक

लाल टोपी
Fri, 04/05/2013 - 13:19 नवीन
प्रसिध्दीच्या वलयापासून दूर राहून केलेले प्रेरणादायक काम. ओळ्ख करुन दिल्या बद्द्ल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

चांगला लेख

Dipankar
Sun, 04/07/2013 - 13:21 नवीन
चांगला लेख
  • Log in or register to post comments

भैय्याजी काणे

आशु जोग
Sun, 04/07/2013 - 13:41 नवीन
शीर्षक 'भैय्याजी काणे' दिले असते तर अधिक चांगले असते. अलिकडेच त्यांच्यावरची दोन्ही पुस्तके वाचली.
  • Log in or register to post comments

अफाट!!

इनिगोय
Sun, 04/07/2013 - 16:53 नवीन
अफाट!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा