एकत्र कुटुंब ....जबाबदारी कोणाची?
आजकाल मुलांचा आपल्या पत्नीकडे बघण्याचा द्रुष्टिकोन खूपच चांगला झाला आहे. आणि बरेचसे तरुण आपल्या बायकोला समानतेने आणि सन्मानाने वागवताना दिसतात. पण सासरच्या बाकिच्या लोकांच्या वागण्यात एवढा फरक अजून पडलेला नाही दिसत. फक्त मुलाच्या घरच्यांनीच मुलाला वाढवताना कष्ट घेतले असतात का?
आजकाल खूप जणांची पसंती लग्न झाल्यावर स्वतंत्र राहण्यासाठी असते, पण ह्यासाठी फक्त मुलींनाच दोषी ठरवले जाते हे बघून खूप दुख होते.मुलींचा असा विचार होत असेल तर त्याला काय गोष्टी जबाबदार आहेत हे पण पाहिले पाहिजे.
अनेक सासवा माझी सून म्हणजे माझी मुलगीच असा चार लोकांसमोर दिखावा करण्यासाठी बोलतात. आणि प्रत्यक्षामध्ये आपल्या सुनेबरोबर स्पर्धा आणि राजकारण करतात. त्याना फक्त आपल्या सो कॉल्ड घराण्याला सून हवी असते, तिचे स्वताचे अस्तित्व आणि तिचे स्वताचे विचार नको असतात. तिची स्वताची ओळख पण तिने पुसावी असेच त्यांना वाटते. मला जे करायला मिळाले नाही, ते सुनेलाही मिळू नये अशी बर्याच जणींची इच्छा असते.
नवीन सुनेला "सुपर वुमन" चा आदर्श दिला जातो. तिने नोकरी करावी, घर सांभाळावे, पाहुणे नातेवाईक सांभाळावे, देवधर्म सांभाळावे, सगळ्यांची सेवा करावी, सगळ्याना साग्रसंगीत खाऊ पीऊ घालावे आणि सगळे करून सदा हसत आनंदी असावे अशी अपेक्षा असते. बर जर मुलगा कधी सुनेला फिरायला नेत असेल तर तो म्हणे सुनेला खूप लाडावून ठेवतो, आणि जावई मुलीला फिरायला नेत असेल सारखा, तर आमचे जावई खूप हौशी असे कौतुक. मुलगा सुनेला कधी मदत करत असेल कामात तर तो बायकोचा गुलाम, आणि जावयाने मुलीला मदत केली तर जावई खूप काळजी घेणारा. असले वातावरण असेल तर मुली कशा तयार होतील एकत्र कुटुंबात राहिला?
एकत्र कुटुंबात राहायचे असेल तर फक्त नवीन लग्न करून आलेल्या सुनेनेच तडजोड करून चालणार नाही. बाकीच्यांनीही केलीच पाहिजे. आणि वयाने अनुभवाने मोठे म्हणून पहिले पाऊल सासूने आणि सासर्याने उचलले पाहिजे.
खूपशे सासू सासरे आपल्या नव्या सुनेशी अहंकाराने वागतात, मग तिच्या मनात त्यांच्याविषयी आईवडीलांसारखे प्रेम कुठून निर्माण होणार? पण हेच लोक सुनेने शेवटपर्यंत मुलीसारखीच आपली सेवा करावी अशी इच्छा करतात.
माझ्या मावशीच्या मुलाच्या लग्नातला एक प्रसंग सांगते. गेल्यावर्षी त्याचे लग्न झाले, मुलगी गोव्याकडची होती व तिचे कुटुंब साधेच होते. माझ्या मावशीचे कुटुंब ही जरा जुन्या विचारांचे आहे. तर झाले काय , लग्नाच्या आदल्या दिवशी जेव्हा सगळे हॉल वर गेलो तर मुलीकडच्यांचा अजून पत्ताच नव्हता व पुजेसाठी उशीर होत होता. लोक चुळबुळ, कुजबुज करत होते. शेवटी दोनतीन तास उशीराने मुलीकडचे आले, त्यावेळी मुलीने स्वताच्या लग्नासाठी येताना साडीऐवजी गुढग्यापर्यंत केपरी आणि घट्ट टिशर्ट घातला होता. ते बघून मावशीचे घरचे व नातेवाईक चिडले. मला ही ते खटकले , कारण तसे तिने मुद्दाम केल्यासारखे वाटत होते. साडी नाही निदान अशा वेळी पूर्ण कपडे तर घालावे. तर नातेवाईक मावशीकडे तक्रार करू लागले. मावशीला रडायलाच येत होते हे बघून आणि ऐकून. लोकांची अपेक्षा होती की मावशीनी जाऊन मुलीला व तिच्या आईला फैलावर घ्यावे. पण मावशी समजूतदारपणे वागली व म्हणाली ,"मी तिला असे काही बोलणार नाही, कारण अजून आमची तेवढी ओळख नाही, जवळीक नाही. त्यामुळे तिचा गैरसमजच होईल आणि मुली सासू सासरे सुरवातीला काय बोलले ते चांगलेच लक्षात ठेवतात शेवटपर्यंत. त्यापेक्षा मी माझी नाराजी प्रसाद (मावशीचा मुलगा) जवळ सांगते, तो समजावेल तिला तिच्या कलाने".
खरोखरच मला मावाशीच्या वागण्याचे खूप कौतुक वाटले, तिच्या जागी दुसर्या एखादीला सुनेला सुनवायची व सासूपणा दाखवायची ही आयतीच संधी वाटली असती.
---------------------------------------------------------------------------------
लेखात काही चुका असतील तर माफ करावे अशी विनंती.
वाचन
9956
प्रतिक्रिया
0