"श्रद्धा"
श्रद्धा
"श्रद्धा" या एका शब्दाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा सगळ्यात आधी विचार येतो तो म्हणजे हि एक देव, संत, महात्मे झालच तर अगदी अलीकडल्या काळातले अमुक अमुक बाबा, तमुक तमुक माता यांच्याशी जवळीक साधणारी काहीतरी भानगड असावी असा.
पण मग श्रद्धा म्हणजे नेमक काय असाव ? श्रद्धा म्हणजे विश्वास का ? श्रद्धा म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी किवा वस्तूविषयी वाटणारी प्रेम किवा आपुलकीची भावना का? का भीती? का श्रद्धा म्हणजे देव या संकल्पनेविषयी वाटणारा आदर ? माझ्यामते श्रद्धा म्हणजे यापैकी काहीच नसाव.
माझी देवावर श्रद्धा आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती भावना म्हणजे देवाविषयी वाटणारी कृतज्ञ भावना असते का भीती? का आपलाच स्वार्थीपणा? मला काहीतरी हवे आहे म्हणून मी देवळात जातो का मी देवाच्या पुढे नतमस्तक झालो नाही, देवाच्या पाया पडलो नाही किवा देवाला प्रदक्षिणा घातल्या नाहीत तर देवाचा कोप होईल आणि मी माझ्या इत्च्छित साध्यापासून दूर जाईन या भीतीने देवळात जातो, याचा एकदा खरच कोणीतरी शोध घ्यायला हवा आहे.
मला वाटत श्रद्धा म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी किवा वस्तूविषयी सकारात्मक दृष्टीकोनातून असणारी भावनिक बांधिलकी. हीच भावनिक बांधिलकी जेव्हा सभ्यतेचा बुरखा घालून नकारात्मक वाटेने जायला लागते तेव्हा तिची अंधश्रद्धा होत असावी. याच वेड्या श्रद्धेमुळे म्हणा किवा अंधश्रद्धेने म्हणा काही बाबा लोकांचे देव होतात, हल्ली तर सिनेसृष्टीतल्या, क्रीडाक्षेत्रातल्या काही लोकांना (यांना भाग्यवंत म्हणायचं कि नाही ते नंतर ठरवता येईल) हे देवपण लाभल आहे. असो बापड. पण या लोकांना अस देवपण दिल्याने त्यांच्या भक्तांचा काही वैचारिक किवा भावनिक फायदा झाला असेल अस वाटत नाही. आर्थिक फायदा झाला असेल तर तोही त्यांचा स्वार्थच नव्हे काय?
या निबंधाचा विषय बघितला आणि जरा सहजच बायकोला विचारलं श्रद्धा म्हणजे काय असाव अस तुला वाटत? ती म्हणते अरे आजपर्यंत याचा कधी विचारच न्हवता केला. तशी वेळच नाही आली कधी. तीच उत्तर चुकीच होतं का ? मला तरी वाटत नाही. आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजातील विविध घटकांचा विचार करता वगैरे वगैरे असले मोठ मोठे शब्द काही मी इथे वापरणार नाही, पण आपल्या घरांतील, परिवारातील, मित्र-मंडळीतील किती जणं आपल्या दैनंदिन घोड्दौडीतून वेळ काढून या गोष्टीचा विचार करीत असतील. माझ्या मते कोणीच नाही किवा फारच कमी. विचार न करण्याची शक्यता दिल्लीतल्या धूक्याइतकीच दाट वाटते. असो.
लोकमान्य टिळकांचा देखील गणशोत्सव किवा शिवजयंती उत्सव याला सार्वजनिक स्वरूप देण्याचा उद्देश सकारात्मक दृष्टीकोनातून भावनिक बांधिलकी जपताना सामाजिक प्रबोधन करणे हाच होता. या दोन्ही दैवतांबद्दल समाजात असलेली श्रद्धा किवा आदर याचा पुरेपूर अंदाज टिळकांना आला होता आणि समाजाच्या सर्व स्तरातून मिळालेली मान्यता त्यांचा हा अंदाज खराही ठरवते. आता कोणी म्हणेल कि टिळकांनी देवा-धर्माच्या नावाखाली राजकारण केलं. केल असेलही पण ती त्या काळाची गरज होती आणि त्यातून सामाहिक प्रबोधन करणं हा प्रामाणिक उद्धेशही होता.
तुम्ही म्हणाल हा माणूस श्रद्धा असावी का नसावी या विषयी काहीच का बोलत नाही. माझ्या मते एखाद्या व्यक्तीवर, वस्तूवर किवा प्रत्यक्ष देवावर एकतर श्रद्धा असावी किवा नसावी, हे दोनच पर्याय असू शकतात. मी स्वतः श्रद्धावान आहे का? मला माहित नाही. पण श्रद्धेच्या नावाखाली अमुक एक गोष्ट करायचीच किवा करायचीच नाही या मताचा मात्र मी नक्कीच नाही. काही अतिमहत्वाच्या कामामुळे एक-दोन दिवस घरची देवपूजा झाली नाही तर विशेष काही बिघडत नाही अशा मताचा मी आहे. श्रद्धावान असणं हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न असतो. हा सक्तीचा प्रांतच नाही कारण सक्ती आली कि भक्ती उरत नाही.
दररोज संध्याकाळी दिवेलागणीला शुभंकरोती म्हणून आम्ही काय कमावल आणि कार्टून नेटवर्क बघून आमची मुल काय गमावतायात हे कळण खरोखरच कठीण होऊन बसलंय.
शेवटी काय हो श्रद्धा आहे म्हटलं तर सगळंच आहे, नाही म्हटलं तर श्राद्धाचाही विचार करायची गरज नाही, कारण श्राद्ध म्हणजे तरी काय तर श्रद्धेने केलेली पूजाच ती.
माझा ललित लेखन स्पर्धेतील पारितोषिक विजेता लेख.
बज्जु
वर्गीकरण
प्रतिक्रिया
व्याख्या आवडली
श्रद्धा असावी, अगदी देवावरच
श्रद्धा - मनाची एक कार्यपद्धती !
पर्फेक्ट !!
लेख आवडला
श्रद्धा ही विश्वासाची अ॑तिम अवस्था
माझ्या मते श्रद्धा ही
लेख आवडला
मतं आवडली..