✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

"श्रद्धा"

ब
बज्जु यांनी
Sun, 02/05/2012 - 01:04  ·  लेख
लेख
श्रद्धा "श्रद्धा" या एका शब्दाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा सगळ्यात आधी विचार येतो तो म्हणजे हि एक देव, संत, महात्मे झालच तर अगदी अलीकडल्या काळातले अमुक अमुक बाबा, तमुक तमुक माता यांच्याशी जवळीक साधणारी काहीतरी भानगड असावी असा. पण मग श्रद्धा म्हणजे नेमक काय असाव ? श्रद्धा म्हणजे विश्वास का ? श्रद्धा म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी किवा वस्तूविषयी वाटणारी प्रेम किवा आपुलकीची भावना का? का भीती? का श्रद्धा म्हणजे देव या संकल्पनेविषयी वाटणारा आदर ? माझ्यामते श्रद्धा म्हणजे यापैकी काहीच नसाव. माझी देवावर श्रद्धा आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती भावना म्हणजे देवाविषयी वाटणारी कृतज्ञ भावना असते का भीती? का आपलाच स्वार्थीपणा? मला काहीतरी हवे आहे म्हणून मी देवळात जातो का मी देवाच्या पुढे नतमस्तक झालो नाही, देवाच्या पाया पडलो नाही किवा देवाला प्रदक्षिणा घातल्या नाहीत तर देवाचा कोप होईल आणि मी माझ्या इत्च्छित साध्यापासून दूर जाईन या भीतीने देवळात जातो, याचा एकदा खरच कोणीतरी शोध घ्यायला हवा आहे. मला वाटत श्रद्धा म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी किवा वस्तूविषयी सकारात्मक दृष्टीकोनातून असणारी भावनिक बांधिलकी. हीच भावनिक बांधिलकी जेव्हा सभ्यतेचा बुरखा घालून नकारात्मक वाटेने जायला लागते तेव्हा तिची अंधश्रद्धा होत असावी. याच वेड्या श्रद्धेमुळे म्हणा किवा अंधश्रद्धेने म्हणा काही बाबा लोकांचे देव होतात, हल्ली तर सिनेसृष्टीतल्या, क्रीडाक्षेत्रातल्या काही लोकांना (यांना भाग्यवंत म्हणायचं कि नाही ते नंतर ठरवता येईल) हे देवपण लाभल आहे. असो बापड. पण या लोकांना अस देवपण दिल्याने त्यांच्या भक्तांचा काही वैचारिक किवा भावनिक फायदा झाला असेल अस वाटत नाही. आर्थिक फायदा झाला असेल तर तोही त्यांचा स्वार्थच नव्हे काय? या निबंधाचा विषय बघितला आणि जरा सहजच बायकोला विचारलं श्रद्धा म्हणजे काय असाव अस तुला वाटत? ती म्हणते अरे आजपर्यंत याचा कधी विचारच न्हवता केला. तशी वेळच नाही आली कधी. तीच उत्तर चुकीच होतं का ? मला तरी वाटत नाही. आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजातील विविध घटकांचा विचार करता वगैरे वगैरे असले मोठ मोठे शब्द काही मी इथे वापरणार नाही, पण आपल्या घरांतील, परिवारातील, मित्र-मंडळीतील किती जणं आपल्या दैनंदिन घोड्दौडीतून वेळ काढून या गोष्टीचा विचार करीत असतील. माझ्या मते कोणीच नाही किवा फारच कमी. विचार न करण्याची शक्यता दिल्लीतल्या धूक्याइतकीच दाट वाटते. असो. लोकमान्य टिळकांचा देखील गणशोत्सव किवा शिवजयंती उत्सव याला सार्वजनिक स्वरूप देण्याचा उद्देश सकारात्मक दृष्टीकोनातून भावनिक बांधिलकी जपताना सामाजिक प्रबोधन करणे हाच होता. या दोन्ही दैवतांबद्दल समाजात असलेली श्रद्धा किवा आदर याचा पुरेपूर अंदाज टिळकांना आला होता आणि समाजाच्या सर्व स्तरातून मिळालेली मान्यता त्यांचा हा अंदाज खराही ठरवते. आता कोणी म्हणेल कि टिळकांनी देवा-धर्माच्या नावाखाली राजकारण केलं. केल असेलही पण ती त्या काळाची गरज होती आणि त्यातून सामाहिक प्रबोधन करणं हा प्रामाणिक उद्धेशही होता. तुम्ही म्हणाल हा माणूस श्रद्धा असावी का नसावी या विषयी काहीच का बोलत नाही. माझ्या मते एखाद्या व्यक्तीवर, वस्तूवर किवा प्रत्यक्ष देवावर एकतर श्रद्धा असावी किवा नसावी, हे दोनच पर्याय असू शकतात. मी स्वतः श्रद्धावान आहे का? मला माहित नाही. पण श्रद्धेच्या नावाखाली अमुक एक गोष्ट करायचीच किवा करायचीच नाही या मताचा मात्र मी नक्कीच नाही. काही अतिमहत्वाच्या कामामुळे एक-दोन दिवस घरची देवपूजा झाली नाही तर विशेष काही बिघडत नाही अशा मताचा मी आहे. श्रद्धावान असणं हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न असतो. हा सक्तीचा प्रांतच नाही कारण सक्ती आली कि भक्ती उरत नाही. दररोज संध्याकाळी दिवेलागणीला शुभंकरोती म्हणून आम्ही काय कमावल आणि कार्टून नेटवर्क बघून आमची मुल काय गमावतायात हे कळण खरोखरच कठीण होऊन बसलंय. शेवटी काय हो श्रद्धा आहे म्हटलं तर सगळंच आहे, नाही म्हटलं तर श्राद्धाचाही विचार करायची गरज नाही, कारण श्राद्ध म्हणजे तरी काय तर श्रद्धेने केलेली पूजाच ती. माझा ललित लेखन स्पर्धेतील पारितोषिक विजेता लेख. बज्जु
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
लेख
प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या
3473 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

व्याख्या आवडली

पैसा
Sun, 02/05/2012 - 12:05 नवीन
श्रद्धेची व्याख्या आवडली. या विषयावर आपण सहसा विचार करत नाही हे खरंच. पण मला वाटतं, कुठे श्रद्धा ठेवावी का, आणि ठेवायची तर कुठे, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.
माझ्या मते एखाद्या व्यक्तीवर, वस्तूवर किवा प्रत्यक्ष देवावर एकतर श्रद्धा असावी किवा नसावी, हे दोनच पर्याय असू शकतात.
या बाबतीत मात्र मला काहीसं वेगळं वाटतं. म्हणजे, जगात कोणत्याही प्रश्नाला किंवा गोष्टीला काळं आणि पांढरं अशा दोन रंगात विभागता येणार नाही. एक ग्रे एरिया सगळीकडे असतोच. म्हणजे "हो की नाही" याच्या सीमारेषेवर. एखादा या एरियात असेल तर तसं असण्यात काही चूक नाही.
  • Log in or register to post comments

श्रद्धा असावी, अगदी देवावरच

डॉ.श्रीराम दिवटे
Sun, 02/05/2012 - 13:02 नवीन
श्रद्धा असावी, अगदी देवावरच नाही तर एखाद्या व्यक्तीवर वा आपल्या स्वतःवरदेखील ती असावी. फक्त तिचं अवडंबर माजू नये याची काळजी घ्यावी. उत्तम लेख आहे.
  • Log in or register to post comments

श्रद्धा - मनाची एक कार्यपद्धती !

चौकटराजा
Sun, 02/05/2012 - 18:45 नवीन
जीवसृष्टीत सर्वाना मन आहे. पण मेंदूच्या विकासानुसार मनाच्या विकासाचा आवाका वाढत असावा.पण यात धोका असा असावा की मनातील द्वंद्व वाढीस लागू शकते. "टू गेट एज्युकेटेड इज टू इन्व्हाइट मोर कन्फ्युजन अ‍ॅट हायर लेव्हल ! " असे एक गमतीशीर वाक्य आहे. श्रद्धा ही निर्णय घेण्याच्या मार्गातील मनो बौद्धिक पायरी आहे. चिकित्सा ही तिच्या विरोधी असलेली पायरी. श्रद्धा व अंध श्रद्धा असे वेगळे काही नसते. श्रद्धा प्रक्रियेत थोडेफार निरिक्षण व अनुभवाची मनातील नोंद जास्त असते एवढेच. तेवढी ती अंध श्रद्धेत नसते. या सर्वांचा देव, धर्म, ज्योतिष, यांच्याशी काहीही सम्बंध नाही. कोणत्याही मन असलेल्या विशेषत: विकसित मन असलेल्या प्राण्यात श्रद्धा व चिकित्सा यांचे संयोगानेच निर्णय प्रकिया घडते. एकदा चिकित्सेतून जो अनुभव येतो तो पुढे श्रद्धा म्हणून स्वीकरण्याची " आळशी" प्रवृती मानवी मनात असते. कारण ती सोयी चीही असते. जगात मी पूर्ण श्रद्धा वादी वा पूर्ण चिकित्सावादी आहे असे प्राणी म्हणू लागला की त्याला वेड लागले आहे असे खुशाल समजा. जसे सुख दु:ख आस्तिक नास्तिक दोघांच्याही वाटयाला येते तद्वतच श्रद्धा व चिकित्सा यांच्या खेळाचे मानवी मन गुलाम असते.
  • Log in or register to post comments

पर्फेक्ट !!

अर्धवटराव
Tue, 02/07/2012 - 00:21 नवीन
उत्तम विवेचन. >> चिकित्सेतून जो अनुभव येतो तो पुढे श्रद्धा म्हणून स्वीकरण्याची " आळशी" प्रवृती मानवी मनात असते -- इथे आळसाऐवजी अनुभवसिद्ध विश्वास असावा काय?? ह्म्म्म्म्म्म... पण तो हि एक प्रकारचा आळस म्हणता येईल... अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

लेख आवडला

रणजित चितळे
Sun, 02/05/2012 - 19:38 नवीन
माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. छान वाटले वाचून.
  • Log in or register to post comments

श्रद्धा ही विश्वासाची अ॑तिम अवस्था

सस्नेह
Mon, 02/06/2012 - 10:37 नवीन
लेख उत्तमच आहे. पण सारा॑श काय ? श्रद्धा चा॑गली की वाईट ? माझ्या मते श्रद्धा ही विश्वासाची अ॑तिम अवस्था असावी. जिथे तर्क, विचार या॑ना स्थान नाही. ती विधायक गोष्टीवर असेल तर चा॑गली. विनाशक गोष्टीवर असेल तर वाईट . आणि योग्य अयोग्याच॑ म्हणाल तर ती एक सापेक्ष स्॑ज्ञा आहे. पण याबद्दल तर दुमत नाही की कशा ना कशावर श्रद्धा असावी. नाहीतर जगणे ही एक सजा होईल...
  • Log in or register to post comments

माझ्या मते श्रद्धा ही

चौकटराजा
Mon, 02/06/2012 - 12:54 नवीन
माझ्या मते श्रद्धा ही विश्वासाची अ॑तिम अवस्था असावी. जिथे तर्क, विचार या॑ना स्थान नाही. -- लीना अनुभव किंवा दुसर्‍याला आलेल्या अनुभवाचे निरिक्षण ... आपापल्या कुवती नुसार निष्कर्ष ... पुढील कारवाईसाठी नियमात रूपांतर .. व पुढच्या वेळी पटकन निर्णय ..( हा पटकन निर्णय म्हणजेच श्रद्धावस्था ) उदा. रोज ८ ५ ला गाडी प्लॉटफार्म ६ ला येते ही म्हणून घरून ७-४५ ला निघतो. ही झाली श्रद्धा व कशावरून गाडी बिफोर टाईम वा लेट येणार नाही ? असा समांतर विचार मनात येणे म्हणजे चिकित्सा. चिकित्सक आहेत म्हणूनच युवराजसिंगची गाठ कर्काची आहे हे कळले. पण जीवनात हर घडी असे सेकंड ओपीनियन घेत मनुष्य जगत नाही नव्हे कोणीही जगतच नाही. म्हणूनच शंभरटक्के श्रद्धावाला वा चिकित्सक अस्तित्वातच नाही.
  • Log in or register to post comments

लेख आवडला

गणेशा
Mon, 02/06/2012 - 14:29 नवीन
लेख आवडला ... ---------- "श्रद्धा म्हणजे विश्वासाची अंतिम अवस्था ... " मस्त वाटले वाचुन ,.
  • Log in or register to post comments

मतं आवडली..

गवि
Mon, 02/06/2012 - 14:32 नवीन
मतं आवडली..
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा