Skip to main content

वाडा

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 04/05/2011 या दिवशी प्रकाशित केले.
वाडा
जुन्या जाणत्या भल्या थोरल्या गोष्टी सार्‍या सरल्या खोबणीत पांढरे झाले डोळे, जाणीवा जणू मेल्या ||१|| काळोखाच्या गर्दीमध्ये हरवले त्याचे दिसणे कुठे पाहुनी कसे वदावे, वर्णन या मुखाने ||२|| डोळ्यांत घातले अंजन जरी, न दिसे जमीन खाली कुरकुरणार्‍या दरवाजांवर कड्याकुलूपांनी नक्षी केली ||३|| ओट्यावरचे दगड कालचे, चालले पायात खाली खांबांवरची कोरीवकामे अजगरासम सरपटली ||४|| ओलावलेल्या भिंती ल्याल्या रंगांचे उडते पोपडे कंदील नाही उजेडाला म्हणून काळवंडले कोनाडे ||६|| डुगडुगणार्‍या जिर्ण पायर्‍या जिना वर घेवून चालला निखळलेले लाकूड कधीचे आता न देई आधार हाताला ||७|| हादर्‍याने पडते खाली पाटाईतून भुरभुर माती तिलाही आता घाई झाली मातीतच जाण्याची ||८|| खोल्या असतील अनेक जरी, लागून एकमेकांना सख्या बहीणी शोभत होत्या, भिंत भिंतीच्या पाठीला ||९|| कित्येक कुटूंबे येथे आली, वेलीवर फुले फुलवून गेली आधारवड आता कोसळू पाहे, बांडगूळांची चैन झाली ||१०|| कधी काळचे वैभव थोर, गेले आज लयाला विरपुरूष जणू सैन्यातला, शर्थ केली लढायला ||११|| आता लगेच पाडतील जुन्यापान्या विस्तीर्ण वाड्याला मढ्यावरचे लोणी आयतेच मिळे इमारत बांधणार्‍याला ||१२|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०४/०५/२०११
काव्यरस

वाचने 2001
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

वाडयाच्या वर्णनात १० आणि १२ जास्त वास्तववादी वाटले.

तुमच्या प्रतिभेतील हा अनाखि एक पैलु.. लिहिण्याची पद्धत आवडली.. आधीपेक्शा खुप वेगळी लेखनपद्धत तरीही मनात घर करुन जाणारी ...

पाभे परत एकदा लिहा. एक शब्द ही न बदलता फक्त शब्दांची जागा बदलुन लिहा. अतिशय उत्तम काव्य!! थोडस काम करा यावर फिरुन.