एक ऐतिहासिक घटना: भाग ५: (नागरी) प्रशासक
लेखनप्रकार
आधीच्या भागांत आपण निवडणूका व प्रतिनिधित्त्वाचीव त्यानंतर राजकीय प्रशासकांची ओळख करून घेतली. आता या भागात नागरी प्रशासकांची ओळ्ख करून घेऊया.
आधीच्या भागात ज्या राजकीय प्रशासकांची ओळख आपण करून घेतली त्यांना अस्थायी प्रशासक असेही म्हणतात. मात्र देशातील जनतेच्या प्रतिनीधींनी (जे दर निवडणूकीनंतर बदलतात) घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे महत्त्वपूर्ण काम स्थायी विभागाकडे सोपवले आहे ज्यास नागरी प्रशासन किंवा नागरी सेवा व्यवस्थापक म्हणतात.
या अंतर्गत भारतातील अत्यंत हुशार, प्रशिक्षित व कार्यकुशल नागरीकांची निवड केली जाते ज्यांचे काम मंत्र्यांना एखादा निर्णय घेण्यासाठी आवश्यक विदा पुरविणे व मंत्रीमंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे असते. मात्र नागरी प्रशासनाकडे कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याची अनुमती नाही. मंत्रीमंडळाने नागरीप्रशासनावर ताबा ठेवणे अपेक्षित आहे. मात्र याच बरोबर नागरी अधिकार्यांनी राजकीय निरपेक्ष असणेही अपेक्षित आहे. याचे कारणे एखाद्या सरकारच्यावेळचे नागरी अधिकार्यांना नवीन सरकार आल्यावर आधीच्यापेक्षा वेगळे अथवा प्रसंगी विरुद्ध धोरणाची अंमलबजावणी करता येणे आवश्यक आहे. राजकीय सापेक्षता / एखाद्या विचारसरणीचा राजकीय प्रभाव असे करण्यास मारक ठरू शकतो.
भारतीय संघराज्याचे नागरी प्रशासन ही अत्यंत किचकट व्यवस्था आहे. यात राष्ट्रीय सेवा (All-India services), राज्यस्तरीय सेवा (State services) आणि स्थानिक प्रशासकीय समित्या, कर्मचारी आणि व्यवस्थापकांचा समावेश आहे. घटनाकारांना निरपेक्ष, नि:स्वार्थ प्रशासनाचे राज्यवस्थेतीत स्थान यांची व्यवस्थित जाण असल्याने त्यांनी याकामासाठी नागरीक निवडण्याचे निकष कठीण ठेवले आहेत. यात विविध परिक्षा/ मुलाखतीं द्वारे राष्ट्रीय तसेच राज्यास्तरावर हुशार नागरीकांची निवड केली जाते. यांची एका ठराविक कालावढीसाठी नेमणूक होते. ह्या अधिकार्यांना बरखास्त केल्यास त्यावर केवळ सर्वोच्च न्यायालय निकाल देऊ शकते. जरी मेरिट हा एकच निकष असला तरी यातही भारतातील मागासलेल्या घटकांना संधी मिळेल याची खबरदारी आरक्षणाद्वारे घेण्यात आली आहे.
-------------------------------------------------------
समांतर अवांतरः
भारतीय नागरी प्रशासन म्हटले तर त्याबरोबर "भ्रष्टाचार" हा शब्द लगेच आठवतो नाहि का? हे तुम्हा आम्हालाच नाहि तर जगभरात सगळ्यांनाच आठवते. याविषयावर पुढील लेख रोचक आहेत. सवडीने वाचा:
भारतीय विकासदर भ्रष्टाचाराने मंदावतो आहे का?
भारतीय नागरी सेवा आशियातील सर्वात वाईट नागरी सेवा.
भारतीय भ्रष्टाचारः पुस्तकपरिचय
------------------------------------------------
भारतीय नागरी प्रशासन सेवे मधे तीन विभाग आहेत.
१. राष्ट्रीय (ऑल इंडीया) सेवा विभागः
- भारतीय व्यवस्थापकीय सेवा (आय.ए.एस्)
- भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस्.)
- भारतीय वन सेवा (आय.एफ्.एस्.) (इथे एफ् = फॉरेस्ट)
- भारतीय विदेश सेवा (आय्.एफ्.एस्.) (इथे एफ्.=फॉरेन)
- भारतीय मिळकत (रेव्हेन्यु) सेवा (आय्.आर्.एस्.)
- भारतीय टपाल सेवा (आय.पी.एस्., पी=पोस्टल)
- भारतीय रेल्वे सेवा
वाचन
16864
प्रतिक्रिया
0