झटपट स्तोत्ररचना - पहिला धडा (मोफत)

Primary tabs

धनंजय's picture
धनंजय in जनातलं, मनातलं
29 Sep 2007 - 2:43 am

नमाम्यहं सरस्वतीम्

*******************
सुशुक्लवस्त्रधारिणीम् सुमन्दहासहासिनीम् ।
सुतन्तुवाद्यवादिनीम् नमाम्यहं सरस्वतीम् ॥ १ ॥

उमेशसन्निधाम् उमाम् रमेशसन्निधाम् रमाम् ।
हिरण्यगर्भयोषिताम् नमामि बुद्धिदेवताम् ॥ २ ॥

अगाधवाहिनीम् नदीम् प्रबोधतोयदायिनीम् ।
मनःसरोजवर्धिनीम् नमामि वेदवादिनीम् ॥ ३ ॥

मुनीन्द्रदेववन्दिते सुबुद्धिदे विशारदे |
जडत्वमूढसेवकं हि पाहि देवि शारदे ॥ ४ ॥

*******************

या अखंड स्फूर्ती देणार्‍या विद्यादेवीवर हे इतके स्फूर्तिशून्य गीत कसे रचले त्याचे विच्छेदन सांगतो.

झटपट स्तोत्ररचना - पहिला धडा (मोफत)

चला मुलांनो, आपण आता एक स्तोत्र लिहायला घेऊ.
कुठल्या भाषेत लिहूया. संस्कृतात लिहू. संस्कृत फार येत नाही, असे कसे म्हणता. मराठीच शब्द वापरायचे आहेत आपल्याला. तरी संस्कृत सोयीचे जाईल ते बघणारच आहोत आपण.

कुठली चाल आवडते आपल्याला, बरे ही बघू :
ललालला ललालला ललालला ललालला ।
ललालला ललालला ललालला ललालला ॥

कुठल्या देवा-देवीचे लिहूया? गुणगुणा पाहू "ललालला ललालला" "सरस्वती सरस्वती" छान.

स्तोत्राला यमक असले पाहिजे बुवा. आपण संस्कृत मराठी माणसासाठी लिहीत आहोत ना? मग शेवटी "अम्" किंवा "अ:" पाहिजे. त्यातल्या त्यात "अम्". पण देवी म्हणजे स्त्री - म्हणजे "आम्" शब्द जास्त येणार. बरे तर. तेच घेऊ यमक म्हणून. नाहीतर "ईम्". आणि शेवटी "शारदे!" अशी हाक हवीच बरे का! त्याचे ही यमक जुळवले पाहिजे.

किती कडवी करूया? हे आपले छोटेखानी आहे ना, पहिल्या धड्यासाठी? स्तोत्र ४ कडव्यांचे पुरे.

प्रत्येक कडव्यासाठी विषय काय घेऊया?

१. प्रस्तावनेसाठी ओळखीची वर्णनात्मक स्तुती असावी. म्हणजे देवी कशी दिसते वगैरे.
२. सगळे देव एकच म्हणून एक कडवे करूया, तसे म्हटले की लोकांना आवडते
३. श्लेष तर एक हवाच. सरस्वती म्हणजे नदीसुद्धा आहे - तसे दोन-अर्थी एक कडवे करूया
४. भक्त मूढ आहे, विद्या देऊन तू उद्धार कर, कळकळीची हाक असलेले असे शेवटचे

१. देवी कशी दिसते
पांढरी वस्त्रे आहेत, माळ आहे, पुस्तक आहे, पांढरा मोर आहे... ह्म्म
सुहास्य तर आहेच, खास सरस्वतीचे नाही तरी कोणत्याही देवीला चालते (काली माता सोडली तर)
"वीणा" "ललालला" मध्ये बसत नाही. नकोच ती. (तसेच वाणी, वाचा वगैरे नको). वीणेचे "तंतुवाद्य" ("लाललाल" ठेका) असा उल्लेख करू. पण पहिले अक्षर "लला..." असे छोटे हवे ना? मग "सु" असे प्रत्येक ठिकाणी सुरुवातीला घालूया. मराठीमध्ये आपल्या वाचकाला कितपत संस्कृत कळते? कारण खास संस्कृत शब्द तर आलाच पाहिजे. "ललालला ललालला" "नमाम्यहं नमाम्यहं " छान. "मी नमस्कार करतो" - बक्कळ स्तोत्रात ऐकले आहे ना आपण?

सुशुक्लवस्त्रधारिणीम् सुमन्दहासहासिनीम् ।
सुतन्तुवाद्यवादिनीम् नमाम्यहं सरस्वतीम् ॥ १ ॥

२. सगळे देव हवेत, म्हणजे कमीतकमी त्रिमूर्तींच्या देव्या आल्या पाहिजेत. लक्ष्मी, ब्रह्म "ललालला" मध्ये बसत नाही. पण रमा चालेल. जशी रमा, तशी उमा चालेल. ब्रह्माचे दुसरे कुठले नाव चालेल का? "ललालला ललालला" "हिरण्यगर्भ लालला" छान. बघितला संस्कृत निवडण्याचा फायदा? एका व्यक्तीला दोन नावे असली तर मराठीत प्रत्येक नावाची वेगळी अर्थछटा असते. "बाळू" म्हणायचे त्या ठिकाणी "बाळासाहेब" म्हणून नाही चालत. "शूरवीर" गोष्टीत "शंभूराजे" म्हटले तर अर्थ लागतो, "वाया गेलेला" अशा गोष्टीत "संभाजी" म्हणावे लागते. "हिरण्यगर्भ" आणि "ब्रह्म" शब्दाचे पूर्वी वेगवेगळे अर्थ असतीलही. पण आज त्यांचे अर्थाचे कंगोरे झिजून ते पार गुळगुळीत झाले आहेत. ठेका जमायला आपण वाटेल तो शब्द वापरू शकतो. मराठीत "पत्नी" आणि "बायको" आलटूनपालटून वापरले तर चालणार नाही - अर्थ बदलतो. इथे "हिरण्यगर्भ लालला" जुळवायला "हिरण्यगर्भ-योषिता" असा कैच्या कै प्रतिशब्द चालवून घेऊ.

उमेशसन्निधाम् उमाम् रमेशसन्निधाम् रमाम् ।
हिरण्यगर्भयोषिताम् नमामि बुद्धिदेवताम् ॥ २ ॥

३. सरस्वती नदी हा श्लेष=दुहेरी अर्थ. नाहीतर नदीचे रूपक देऊ. नदी पाणी देते आणि पोसते, देवी ज्ञान देऊन पोसते. नदी गुप्त वाहाते, ज्ञान गूढ असते. कमळे कुठेतरी घातली तर छान. मराठीतून संस्कृत वाचणार्‍यांना "कमळ"साठी सात-आठ प्रतिशब्द माहीत असतात. "कमळ" असले तर संस्कृत काव्य अधिक "ऑथेंटिक" वाटते. ते ललालला मध्ये "सरोज" बसते का बघूया.

अगाधवाहिनीम् नदीम् प्रबोधतोयदायिनीम् ।
मनःसरोजवर्धिनीम् नमामि वेदवादिनीम् ॥ ३ ॥

४. भक्त मूढ आहे, विद्या देऊन तू उद्धार कर, कळकळीची हाक असलेले असे शेवटचे. "शारदे"चे यमक जुळवायचे आहे. स्वतःसाठी "मूढ" शब्द वापरायचा आहे."पाहि माम्" वगैरे आपण दुसर्‍या कुठल्या स्तोत्रात ऐकलेच आहे. ते बघू कुठे बसेल का. बाकी जमेल ती भरणा -

मुनीन्द्रदेववन्दिते सुबुद्धिदे विशारदे |
जडत्वमूढसेवकं हि पाहि देवि शारदे ॥ ४ ॥

बघा पाहू मुलांनो! स्फूर्तीशिवाय आणि संस्कृत आल्याशिवाय आपण स्तोत्र कसे रचले. वेगवेगळ्या स्तोत्रांचे नुसते अनुकरण केले आहे असे कसे म्हणता. यातली एकतरी ओळ दुसरीकडे कुठे सापडते का? मग कसे बरे म्हणता की वाङ्मय चोरले?
पुल म्हणतात की कवितेत "काव्यगुण" हवा. मग यमक, प्रास, रूपक, वृत्त, आपण सगळे कमीतकमी कडव्याला एक असे घातले आहे ना?
नेमक्या अर्थपूर्ण शब्दांची रचना नाही असे म्हणता? तशी करायची असती तर आपण मराठीत नसती का केली? आपल्याला घाई होती म्हणून आपण एका अर्थाला डझनानी असणारे गुळगुळीत संस्कृत शब्द नाही का वापरले आपण?
कालिदासाचे शब्द नेमके अर्थपूर्ण होते, असे म्हणता? मुलांनो, कालिदासाच्या नाटकांचे प्रेक्षक संस्कृत बोलणारे होते. त्यावेळी त्या शब्दांना नेमका अर्थ होता. शब्द नेमके वापरले नसते तर थेटराच्या पिटाने पिटून नसते का काढले?
भक्तीभाव कुठे आहे? मुलांनो, धडा सांगणार्‍याचा सरस्वतीविषयी भाव काय त्याबद्दल उगाच शंका घेऊ नका. काव्याला नेमका अर्थ नाही म्हणजे स्तोत्राचा ढोबळ अर्थही खरा मानू नये काय?
आजकालच्या मराठी वाचकांसाठी संस्कृतातून काव्य लिहिण्यासाठी प्रतिभा खर्ची का घाला? काव्याची नुसती लोभस प्रतिमा दिलीत तरी पुरे. बरे मुलांनो, धडा संपला. पुढच्या धड्याची मात्र दक्षिणा द्यावी लागेल.

(असाच गझलेविषयी लेख मनोगतावर आहे. तो फारच मस्त आहे.)

कविताविनोदवाङ्मयसाहित्यिकमौजमजाविचारआस्वाद

प्रतिक्रिया

सहज's picture

29 Sep 2007 - 7:29 am | सहज

तुमचे विच्छेदन वाचायला नक्कीच गंमत वाटली. खरच किती लीलया सांगीतलेय.

>>तर थेटराच्या पिटाने

म्हणजे थिएटर मधील पिटात बसलेल्या लोकांनी म्हणायचेय काय? आमच्या मराठी शब्दकोशात सापडले नाही. का हे "हायर लेवल" संस्कृत आहे?

-----------------------------------------------
प्रतिभा आणि प्रतिमा वा वा! झाल आता काय कप्पाळ संस्कृत काव्य होणार माझ्याच्यान

धनंजय's picture

29 Sep 2007 - 8:57 pm | धनंजय

> थिएटर मधील पिटात बसलेल्या लोकांनी म्हणायचेय काय?
१००% मार्क. याला इंग्रजीत सिनेक्डकी (synechdoche) का असे काहीसे गमतीदार नाव असलेला फिगर ऑफ स्पीच मानतात. म्हणजे "अमेरिकन लोकांना असे वाटते" ऐवजी "अमेरिकेला असे वाटते", वगैरे म्हणणे.

विसोबा खेचर's picture

29 Sep 2007 - 8:54 am | विसोबा खेचर

धन्य आहे रे बाबा तुझी. स्तोत्र अगदी झकास रचलं आहेस.. :)

पुढचेही धडे येऊ द्या...

तात्या.

संदीप चित्रे's picture

23 Mar 2010 - 7:38 pm | संदीप चित्रे

असेच म्हणतो...
हा लेख पुन्हा एकदा शांतपणे वाचून काढणार आहे.
गझलेवरच्या लेखाच्या दुव्यासाठीही धन्स. तोही वाचतो.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

भडकमकर मास्तर's picture

1 Jul 2008 - 6:15 pm | भडकमकर मास्तर

हा एकदम भन्नाट प्रकार आहे...
आणि म्हणायला येतंय , अर्थ उत्तम आहे...
... आवडलं स्तोत्र...
.हे मुखपृष्ठावर आणल्याबद्दल धन्यवाद तात्या...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वरदा's picture

1 Jul 2008 - 6:25 pm | वरदा

किती सहज शिकवलय्...म्हणायला छानच वाट्टंय्...या वर्षी गणपतीत ऐकवेन लोकांना एक्दम नवीन स्तोत्र.....

गुरुजी, पुढचा धडा केव्हा घेणार?

चतुरंग

प्रकाश घाटपांडे's picture

23 Mar 2010 - 1:44 pm | प्रकाश घाटपांडे

कवितेची पाककृती हा तब्बल दोन वर्षांनी येणार आहे असे वाटले नव्हते ब्वॉ!
नमामि मोद मंगलम|
लल्ल लला लल्ल लला ||

प्रकाश घाटपांडे

लिखाळ's picture

1 Jul 2008 - 8:54 pm | लिखाळ

धनंजयराव,
कमाल आहे. स्तोत्ररचना करायला शिकवायची म्हणजे जबरदस्तच. फारच उत्तम विवेचन केलेत. मजा आली. तुम्ही खरेच सिद्धहस्त आहात.

आमच्या दारी एकदा एक विक्रेता आला होता. त्याने बहुपयोगी किसणी आणली होती. त्या तळहाताता पेक्षा थोड्या मोठ्या किसणीवर अनेक प्रकारची भोके होती. त्याने भराभर वेगवेगळ्या ठिकाणावरुन गाजर, कोबी, टोमॅटोचे काप, कांद्याचे काप इत्यादी करुन पाह़णार्‍यांस चकित केले. मग ती किसणी काहिंनी विकत सुद्धा घेतली. पण नंतर मात्र त्या सहजतेने आणि लीलेने आम्हाला कोणालाच तश्या फोडी-काप-कीस जमला नाही. 'तेथे पाहिजे जातीचे !' हेच खरे. आपण ज्या सोप्या पद्धतीने रचना करणे शिकवले आहे ते वाचताना स्फूर्ती वगैरे आली.. पण ते तुमच्या सारख्या प्रतिभावंतालाच शक्य आहे हे मी मनातून जाणून आहे.
आपल्या कल्पकतेची आणि नवे प्रयोग करण्याच्या हौशीची कमाल वाटते.
-- लिखाळ.
बाजारात उत्तम पावा वाजवणार्‍या विक्रेत्याकडुन मी अनेकदा पावा विकत आणला. पण माझ्या हाती येताच त्याने शिट्टीपेक्षा वेगळा आवज कधीच काढला नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

14 Aug 2009 - 9:37 am | प्रकाश घाटपांडे

कुठली चाल आवडते आपल्याला, बरे ही बघू :
ललालला ललालला ललालला ललालला ।
ललालला ललालला ललालला ललालला ॥

संस्कृत शिकताना अशा सोप्या चाली असतील मजेमजे संस्कृत शिकता येईल
गजानन वाटव्यांची मुलाखत एकदा टीव्हीवर पाहिली होती
"अण्णा, तुमच्या चाली किती सोप्या आहेत ना"
"त्याच अस आहे कि जेवढे शब्द तेवढ्या मात्रा, आता हे पहाना
फांद्यावर बांधिले ग मुलीनी झुले
पंचमीचा सण आला डोळे माझे ओले||"
आम्हाला एक प्रश्न पडला होता कि मुलीनी हे एकवचन कि अनेक वचन . पण नंतर लक्षात आले कि तृतीया विभक्ती नी हा जर मुलींनी/ मुलीन्नी असा उच्चार ला तर मात्रा बदलते. पण नी अगोदरचा मुली शब्द हा मात्र कवीला अनेकवचनी अभिप्रेत असावा
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

बॅटमॅन's picture

6 Jan 2013 - 3:48 pm | बॅटमॅन

स्तोत्र अतिशय आवडले आणि त्यामाअचे विश्लेषणही. साधारणतः वृत्तबद्ध कविता लिहिताना कवीच्या मनातील कॅक्ल्युलेशन्स ची अतिशय अचूक ओळख. लेखाशी पूर्ण रिलेट करू शकलो, सबब मुद्दाम वर काढत आहे.