२००५ च्या दिवाळीच्या नंतरचे दिवस. दक्षिण रेल्वेचा एक डबा. आमच्या समोर दरवाज्यापासून तिसर्या कंपार्टमेंट मध्ये ते ४ मित्र पत्ते कुटत, गाणी गात प्रवासाची मजा घेत चालले होते. बदाम सात, रमी, झब्बू जे आठवतील ते पत्त्यांचे खेळ चालले होते. आजूबाजूचे ही ३/४ जण त्यांना सामिल झाले. मस्त गट बनला होता त्यांचा. कार्यालयातील गंमतीजमती, विनोद सांगण्यात जो तो वरचढ व्हायच्या प्रयत्नात. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर उद्या पुन्हा कामावर रूजू व्हायचे म्हणून थोडा कंटाळाही आलेला दिसत होता त्यांच्या बोलण्यात. तरी आता परतीच्या प्रवासात घरून आणलेल्या दिवाळीच्या फराळावर मध्ये मध्ये हात मारणे चालू होते.