सन २०५१. नोव्हेंबरचा महिना. भारताची अभूतपूर्व प्रगती करुन दाखवणार्या महानेत्याचा सत्कार व प्रगट मुलाखत होती. वार्ताहरांचे थवे व्यासपीठाभोवती जमले होते. त्यांच्यामागे अफाट जनसागर पसरला होता. तो ट्रकने आणला नव्हता, तर उस्फूर्तपणे आला होता.
प्रारंभी दोन चार नेत्यांची भाषणे झाली. त्यानंतर प्रमुख विरोधी नेत्यातर्फे महानेत्याला नोटांचा हार घालण्यात आला. महानेत्याने सत्काराचा स्वीकार केला आणि तो भाषण द्यायला उभा राहिला.
मित्रहो, तुमच्या प्रेमाने मला भरुन आले आहे. अल्पवर्षात या देशाची झालेली प्रगती पाहून मला देखील आश्चर्य वाटत आहे. पण या सर्वाचे श्रेय आमच्या गुरुंचे आहे.