जागतिकीकरणाची कहाणी भाग ७: जागतिकीकरण: पुढे काय?
यापूर्वीचे लेखन
जागतिकीकरण म्हणजे काय?
जागतिकीकरणाचे फायदे आणि तोटे
डेव्हिड रिकार्डोचे तत्व
जागतिक व्यापार संघटना
आदर्श जागतिकीकरणातील अडथळे (पूर्वार्ध): सीमाशुल्क
आदर्श जागतिकीकरणातील अडथळे: उत्तरार्ध
जागतिकीकरणावरील लेखमालेच्या शेवटच्या भागात आता आपण पुढे काय या महत्वाच्या प्रश्नाचा विचार करू.यापूर्वीचे लेखन म्हणजे एकाप्रकारे ’थिअरी’ होती. Academicians सोडून थिअरीचा दैनंदिन जीवनात वापर फारसा कोणी करत नाही.तरीही जागतिकीकरणाच्या विविध अंगांचा परिचय व्हावा म्हणून थिअरीचा समावेश केला.पण यापुढचा भागाशी हा आपल्यापैकी सर्वांनाच कधीना कधी सामोरे जावे लागणार आहे म्हणून हा भाग महत्वाचा आहे.चर्चेचे स्वरूप ’ओपन एंडेड’ ठेऊ कारण आता जागतिकीकरणामुळे आपल्यावर होणारा परिणाम, त्याचा उपयोग कसा करून घ्यावा यासारख्या प्रश्नाचे उत्तर व्यक्तिपरत्वे बदलेल. तेव्हा मी या बाबतीत माझे मत लिहित आहे.
सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की सध्याच्या काळात आणि भविष्यात जागतिकीकरण हाच मूलमंत्र होणार आहे. सध्याच्या आर्थिक संकटामुळे समाजवाद किंवा अगदी कम्युनिझम आणा यासारख्या मागण्या होत आहेत पण त्या फार काळ टिकतील असे वाटत नाही.आर्थिक संकट दूर होताच जागतिकीकरण अधिक जोमाने होणार आहे यात शंका नाही.लेखमालेत म्हटल्याप्रमाणे मधल्या काळात अधिक त्रास होणार आहे.आणि त्याविरूध्द कितीही चर्चा केल्या तरी काळाचे चक्र थांबवता येणे खूपच कठिण आहे.तेव्हा हे शोषण आहे की नाही यावर विचार करण्यापेक्षा यापासून आपल्याला कमीतकमी त्रास आणि अधिकाधिक फायदा कसा करून घेता येईल यावर विचार करणे आणि त्या दिशेने पावले उचलणे अधिक श्रेयस्कर ठरणार आहे.
सरकारने काय करावे यावर लंबीचवडी भाषणे देता येतील.पण माझा उद्देश सरकारने काय करावे यापेक्षा आपल्यासारखे सामान्य लोक काय करू शकतो आणि काय करणे गरजेचे आहे हे लिहिणे आहे.ढोबळ मानाने मला पुढील मुद्दे सुचतात.
१. समाजाने आपला Core competence शोधून काढण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीने आपला Core competence कशात आहे हे शोधून काढणे अत्यंत गरजेचे आहे.आणि त्या क्षेत्रात आपण अधिकाधिक प्रगती कशी करू शकतो हे बघितले पाहिजे.या बाबतीत समाजाची भूमिका महत्वाची आहे असे वाटते.आजच वर्तमानपत्रात वाचले की महाराष्ट्रात २२१ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत.प्रत्येक महाविद्यालयात चारही वर्षाचे मिळून सरासरी १००० विद्यार्थी म्हटले तरी यापुढील काळात दरवर्षी महाराष्ट्रातूनच २ लाख अभियंते पदवी घेऊन बाहेर पडतील.आता या दोन लाखांपैकी किती विद्यार्थी स्वत:च्या प्रेरणेने अभियांत्रिकीला जातात आणि किती समाजाचे ’प्रेशर’ म्हणून जातात हा संशोधनाचाच विषय आहे.जर अभियांत्रिकी हा आपला Core competence नसेल तर त्या क्षेत्रात दर्जेदार काम कधीच होऊ शकणार नाही.
पूर्वी केवळ अभियांत्रिकी क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध होत्या.आज चित्र काही प्रमाणात तरी बदलत आहे.तेव्हा विद्यार्थ्यावर निर्णय घेताना समाजाचा दबाव न येता तो/ती आपल्या Core competence च्या क्षेत्रात पुढे जाऊ शकला/शकली पाहिजे.याविषयी मला एक गोष्ट सांगाविशी वाटते.हा किस्सा सांगितला होता आमच्या शाळेत बक्षिस समारंभास आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी.लोकमान्य टिळक हे प्रकांड पंडित होते आणि बुध्दीमत्तेवर अवलंबून असलेल्या अनेक क्षेत्रांमध्ये त्यांची झेप फार मोठी होती.पण त्यांच्या मुलास शिक्षणात फारशी गती नव्हती.लोकमान्य मंडालेला तुरूंगात असताना ’मी पुढे काय करू’ असा प्रश्न त्यांच्या मुलाने त्यांना विचारला त्यावर उत्तर देताना लोकमान्य एका पत्रात म्हणतात--"तू तुला जे काम आवडते आणि ज्या कामात गती आहे ते कर.तू व्यवसाय म्हणून चांभारकाम निवडलेस तरी काही हरकत नाही.पण जोडे इतके उत्तम बनव की लोकांनी आपण टिळकांनी बनविलेले जोडे वापरतो असे अभिमानाने म्हटले पाहिजे." मला वाटते वैयक्तिक पातळीवर Core competence चे अजून चपखल उदाहरण दिले जाऊ शकणार नाही. (अवांतर: आमच्या शाळेचे मुख्याध्यापक टिळक सर होते.त्यामुळे ’टिळकांनी बनविलेले जोडे’ यावर विद्यार्थ्यांमध्ये हशा पिकला होता)
समाजाची विचारधारा बदलायला वेळ लागेलच पण सुरवात आपल्यापासून करायला काय हरकत आहे?
२. जागतिकीकरणाच्या नव्या युगात बदल खूपच वेगाने घडत जाणार आहेत.तेव्हा प्रत्येकाने चार नव्या गोष्टी शिकायची तयारी ठेवलीच पाहिजे. संगणक क्षेत्रात नोकरीला असलेले मिपाकर त्यांच्या अनुभवातून सांगू शकतीलच की जावा किंवा तत्सम क्षेत्रात सहा महिन्यांची जरी ’गॅप’ पडली तरी किती बरेच मागे पडायला होईल.असेच बदल अनेकविध क्षेत्रांमध्ये होणार आहेत हे गृहित धरायलाच हवे.तसेच आपल्या क्षेत्रात दर्जेदार काम करण्यासाठी पण नव्या गोष्टी शिकणे भाग आहे.आपले काम आणि अपेक्षित मोबदला याचे गुणोत्तर इतरांपेक्षा चांगले हवे. आज नव्या संधी अमेरिकेतून भारतात येत आहेत म्हणून आपण आनंदात आहोत.पण हे गुणोत्तर चांगले राहिले नाही तर भारतातल्या नव्या संधी उठून भविष्यकाळात घाना किंवा नायजेरीयामध्ये जाऊ शकतील.
३. अमेरिकेत आलेल्या आर्थिक संकटामुळे भारतातील अनेकांच्या नोकर्या संकटात आल्या आहेत.तेव्हा एकापेक्षा जास्त मार्गाने पैसे कसे मिळतील याचा विचार करणेही गरजेचे आहे.कारण अशी आर्थिक संकटे सांगून येत नसतात.तेव्हा आपण तयारीत असलेले चांगले.
तसेच चांगल्या मार्गाने पैसे कमावता येत असतील तर त्या संधीस नाही म्हणून उपयोग नाही.नव्या जगात अनेक वेगवेगळ्या संधी निर्माण होत आहेत त्याचा फायदा करून घेता आला पाहिजे.एक उदाहरण द्यायचे झाले तर कॅट परीक्षा २००९ पासून संगणकावर होणार आहे.त्याचे कारण देताना आय.आय.एम नी म्हटले की २००३ मध्ये ९५,००० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर २००८ मध्ये २५०,००० विद्यार्थ्यांनी.सरकार नवी आय.आय.एम सुरू करणार आहे.पुढील १० वर्षात हाच आकडा १० लाखावर गेला तर त्यात नवल वाटू नये. (आता हा आकडा एवढा वाढेल की नाही मला माहित नाही.पण एक शक्यता आहेच).त्यापैकी अर्ध्या विद्यार्थ्यांनी तरी परीक्षेसाठीचे क्लासेस लावले तरी अनेक लाख विद्यार्थी या शिक्षण उद्योगाचे ’पोटेंशियल’ आहे. सध्या प्रत्येक विद्यार्थी फी म्हणून २०,००० रुपये नक्कीच मोजतो.तेव्हा पुढील १० वर्षांत या उद्योगात किती प्रचंड उलाढाल होईल याची कल्पना केलेलीच बरी.तीच गोष्ट आय.आय.टी जे.ई.ई ची.जर एखाद्याला शिकविण्याच्या पेशात गती आणि आवड असेल तर ’पार्ट टाईम’ काम करायला प्रचंड वाव आहे.जमनालाल बजाज या मुंबईतील अग्रगण्य मॅनेजमेंट संस्थेतून एम.बी.ए झालेले माझे मित्र अशा परीक्षांसाठी ’पार्ट टाईम’ मार्गदर्शन करतात.
भारताच्या १२० कोटी लोकसंख्येपैकी सध्या ३०% लोक मध्यमवर्गीय आहेत.पुढील २० वर्षांत हा आकडा ५०% जाईल असा मॅकिन्झी सारख्या संस्थांचा अंदाज आहे.तेव्हा आणखी २५ कोटी लोक तरी मध्यमवर्गात मोडले जातील.सध्याच्या काळात ४ व्यक्तींचे मध्यमवर्गीय कुटुंब महिन्याला १०-१२ हजार रुपयांची खरेदी करतेच. तेव्हा दरमहा दरडोई ३,००० रुपये गुणिले २५ कोटी लोक एवढे प्रचंड नवे potential भविष्यकाळात आहे.त्यातून प्रचंड प्रमाणावर नव्या संधी निर्माण होऊ शकतील.वर दिलेले शिक्षण उद्योगाचे एक उदाहरण झाले.अशी अनेक उदाहरणे प्रत्येक क्षेत्रात मिळतील.आता ही सगळी भाकिते सत्यात उतरतील का नाही माहित नाही पण भारतीय अर्थव्यवस्थेचा गेल्या १८ वर्षातील ६% सरासरी वाढीचा दर लक्षात घेता हे अशक्य ठरू नये. आणि हा ६% किंवा जास्त वाढीचा वेग १९९१ नंतर नवे आर्थिक धोरण स्विकारल्यानंतरचा (जागतिकीकरणासाठी प्राथमिक पावले उचलल्यानंतरचा) आहे हे अमान्य करता येणार नाही.
तेव्हा जागतिकीकरण हे शोषण आहे का असे विचार करण्यापेक्षा या सगळ्यातून मी पुढे कसा जाईन हा विचार करणे आणि त्यादिशेने पावले उचलणे श्रेयस्कर ठरेल.
४. सध्याच्या इंटरनेट आणि वेगाने होत असलेल्या संपर्काचा फायदा हा की अनेक वेगवेगळे लोक यातून एकत्र येऊ शकतात.२ आठवड्यापूर्वी माझ्याकडे मिपावरील आपले तीन मित्र भेटायला आले होते.त्यांनी मला सांगितले की मिपा हे माध्यम नसते तर ते चांगले मित्र बनायची संधी आलीच नसती.अशी अनेक माध्यमे आज आंतरजालावर आहेत.याचा योग्य पध्दतीने फायदा करून घेतल्यास खूपच चांगले होईल.आणि ’काही झाले तरी मी इतरांबरोबर सहकार्य करणार नाही मी माझे तेवढे बघेन’ अशी मनोवृत्ती नव्या जगात मागे पडण्यासाठीचा खात्रीचा मूलमंत्र आहे.आंतरजालामुळे असे अनेक वेगवेगळे लोक एकत्र यायची संधी आली आहे त्याचा लाभ करता आला तर उत्तमच.
याविषयी आपले मत काय?
वाचने
8540
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
माझे मत...
In reply to माझे मत... by श्रावण मोडक
माझे मत
In reply to माझे मत by क्लिंटन
माझी मते
In reply to माझी मते by श्रावण मोडक
शोषण
In reply to माझी मते by श्रावण मोडक
एकदम
In reply to माझे मत... by श्रावण मोडक
जागतिकीकरण-शोषण
चांगल्या लेखमालेची सांगता
लेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to लेख by नंदन
सहमत आहे
लेखमालेची सांगता
मस्त !
In reply to मस्त ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
अतिशय
मिपा क्लासिक - ९
In reply to मिपा क्लासिक - ९ by मारवा
+१