Skip to main content

डिंक म्हणजे DINK (double income no kids)

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 19/08/2022 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
डिंक डिंक म्हणजे DINK (double income no kids) दुहेरी उत्पन्न आणि मूल नसणे. हा एक चर्चेचा विषय आहे आणि याबद्दल मिपावर धागा काढण्याबद्दल चर्चा झाली होती. ते वाचूनच मी हि सुरुवात करतो आहे. सध्या बऱ्याच स्त्रिया नोकरी व्यवसाय करू लागल्या आहेत त्यामुळे आर्थिक उत्पन्नाचा आणि स्त्रियांच्या स्वावलंबित्वाचा स्तर वाढत आहे हि एक सकारात्मक बाब आहे. यामुळे काही जोडप्यांची आपल्याला मूल नको अशी मनोवृत्ती होती / होत आहे किंवा झाली आहे. पूर्वी फारशा स्त्रिया नोकरी व्यवसाय करत नव्हत्या. त्याबद्दल समाजाची मनोवृत्ती सुद्धा तयार झालेली नव्हती. चूल आणि मूल हे स्त्रीचे कार्यक्षेत्र अशी समाजाची मानसिकता होती यामुळेच आपल्याला मूल नकोच अशी धारणा किंवा धाडस करणाऱ्या स्त्रिया नगण्य होत्या. आता उत्पन्नाची साधने सुद्धा उपलब्ध झाली असल्यामुळे आपल्या करियरला वाव मिळू शकतो आणि आपणही वेगवेगळ्या क्षेत्रात चमकू शकतो याची जाणीव स्त्रियांना झाल्यामुळे मूल नको हा चॉईस (निवडण्याचा हक्क) आपल्याला उपलब्ध आहे हि जाणीव सुद्धा स्त्रियांना होते आहे हि एक सकारात्मक बाब आहे. या सर्व गोष्टी मी लिहिण्याचे कारण मूल हवे हि नैसर्गिक उर्मी स्त्रियां मध्ये जास्त असते आणि समाज सुद्धा मुलांना जन्म देणे आणि त्यांचे संगोपन करणे हि स्त्रीजन्माची इतिकर्तव्यता आहे आणि मातृत्व हा एक उच्च दर्जाचा त्याग ( आणि स्त्री हि त्यागमूर्ती) असे समजतो. या धारणेचा जबरदस्त पगडा अनेक स्त्रियांच्या डोक्यावर असतो आणि मूल नको असे म्हणणे हा स्त्रीत्वाचा अपमान होईल अशी भीती त्यांना वाटत असते. कायदा सुद्धा जाणीवपूर्वक आईला मुलांचा नैसर्गिक पालक समजतो. अशा अनेक गोष्टींमुळे आपल्याला मूल नको हे जाणीवपूर्वक ठरवणाऱ्या जोडप्यांमध्ये स्त्रियांवर मानसिक ताण सुद्धा कुटुंबाकडून आणि समाजाकडून जास्त दिला जातो. यात समाजातील आणि कुटुंबातीलच स्त्रियांचा वाटा जास्त असतो. ज्यांना मूल होत नसतं अशी जोडपी सुरुवातीला आम्ही प्लॅनिंग करतो आहोत असे सांगतात. काही काळाने आम्हाला मूल होत नाही असे सांगण्यापेक्षा आम्हाला सध्या मूल नको असे सांगणे ते पसंत करतात. त्यात आम्हाला मूलच नको असे सांगणे सुद्धा काही जणांना फॅशनेबल वाटते. येथे चर्चा मूल नको हे जाणीवपूर्वक ठरवतात त्याबद्दल आहे. मूल होत नाही म्हणून आम्हाला मूलच नको सांगणारे असतात परंतु त्यांच्या सांगण्याच्या मागे एक नैराश्याची किंवा दुःखाची किनार असते. आणि हि मनोवृत्ती आपल्या दुःखावर झाकण टाकून ते दडवण्याची आहे आणि त्यात काही चूक आहे असेही मी मानत नाही. परंतु आम्हाला मूल होत नाही आणि दत्तक घेण्याची प्रक्रिया दुर्दैवाने अत्यंत किचकट असल्याने सुरुवातील दत्तक घेण्यास तयार झालेली जोडपी प्रत्यक्ष दत्तक घेण्याच्या वेळपर्यंत या प्रकाराला विटलेली मी अनेकदा पहिली आहेत. (अनेक वर्षे वंध्यत्व शास्त्रात काम केल्यावर आलेल्या असंख्य अनुभवावर मी असे लिहित आहे अर्थात माझेच अनुभव बरोबर किंवा सर्वोत्तम असा माझा कोणताही दावा नाही) लग्न झाले कि एक दोन वर्षात आता "एखादं मूल होऊन जाऊ द्या" असा धोशा मुलीच्या आई/ सासूकडून लावला जातो. अशा वेळेस आम्हाला कधीच मूल नको आहे असे ठामपणे सांगण्याची हिम्मत करणारी जोडपी फारच विरळ आहेत. बरीचशी जोडपी सध्या तरी मूल नको असे सांगताना आढळतात. हि अर्थात पळवाट असतेच असे नाही पण उगाच आताच वाद कशाला हा विचार असतो. बऱ्याच जोडप्यांची वृत्ती अजून ठाम आणि स्थिर झालेली नसते. त्यांना काही वेळ जाऊ दे मग परत विचार करू असेहि वाटत असते. परंतु काही जोडपी आता लग्नाच्या वेळेसच आपल्याला मूल कधीच नको अशी भूमिका घेताना दिसतात हि एक सकारात्मक गोष्ट आहे. कारण अगोदर असे स्पष्टपणे सांगण्याची हिम्मत नसणे हे स्त्रियांच्या बाबतीत जास्त करून दिसते. माझ्या बरोबरच एम डी करणारी एक हुशार मुलगी असे करू शकली नाही आणी लग्न झाल्यावर तिने नवऱ्याला सांगितले. यामुळे त्यांचा घटस्फोट झाला परंतु हि प्रक्रिया दोघांना मानसिक दृष्ट्या फारच कष्टाची गेली. नवऱ्याला आपण कायम फसवले गेल्याची भावना होत होती आणि तिला आपण नवऱ्याला फसवल्याची खंत वाटत होती. परंतु घटस्फोटानंतर मात्र तिने आपल्या करियर कडे लक्ष केंद्रित केले आणि ती एका मोठ्या वैद्यकीय संस्थेत विभागप्रमुख म्हणून यशस्वीरीत्या काम करते आहे. आपल्याला मूल नको याची कारणे अशा काही जोडप्याना विचारली असता खालील कारणे त्यांनी मला सांगितली १) काही जोडप्यानी दोघांचे करियरचा आलेख चढता आहे त्यात आम्ही मुलाला वेळ देऊ शकणार नाही. मग मुलावर अन्याय करण्यापेक्षा आम्ही मूल नको असा निर्णय घेतला. यात काही जोडप्यानी सुरवातीला करियर साठी मूल लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आणि नंतर सुरळीत चाललेले करियर आणि संसार यात अडचणी आणण्यापेक्षा "आहे ते चांगले आहे" असा विचारपूर्वक निर्णय घेतला. २) एक जोडप्याने असेही सांगितले कि लोकसंख्या प्रचंड वाढलीआहे, त्यामुळे भुईला भार जास्त झाला आहे. अशात आम्ही अधिक भर घालणे आम्हाला पटत नाही ३) काही जोडप्यांमध्ये नवऱ्याला मुलांची फारशी आवड नव्हती आणि बायकोला मुलासाठी एवढे कष्ट काढणे किंवा वेळ देणे परवडणारे नव्हते. ४) काही जोडप्यांची त्यांना अध्याहृत असणाऱ्या सुखसोयी आपण मुलाला देऊ शकत नाही त्यामुळे मुलावर अन्याय करण्यापेक्षा त्याला जन्मच न देणे बरोबर वाटत होते. ५) काही लोकांना सुरुवातीला मूल हवे होते पण ते होत नव्हते. पण कालांतराने त्यांना दोघेच राहायची सवय झाली आणि आता यातून वेगळा विचार करण्यापेक्षा आहे ते चांगले आहे असेच वाटते आहे. ६) एका स्त्रीला लहान सात (रांगेने पाच बहिणी आणि नंतर दोन भाऊ) भावंडे होती आणि कळायला लागल्यापासून केवळ अपत्य( भावंड) संगोपनात आयुष्य गेल्यावर तिला आता परत त्या गोष्टीची शिसारी आली होती. हि सर्व उदाहरणे नवरा बायको दोन्ही जण नोकरी किंवा व्यवसाय करुन अर्थार्जन करत असलेल्या जोडप्यांची आहेत. आणि यातील बहुसंख्य जोडप्यांची हा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे असे जाणवले. त्यांना उद्या म्हातारपणी तुम्हाला कोण सांभाळेल याची भीती वाटत नाही का? असे विचारल्यावर बहुसंख्य जोडप्यांची हेच सांगितले कि आजूबाजूला ज्यांची मुले परदेशात आहेत किंवा दूर गावी राहत आहेत ते काय करतात? मुले असली तरी वृद्धपणी एकटेच राहाणारे असंख्य वरिष्ठ नागरिक आपण आजूबाजूला पाहतोच कि हेही सांगितले. तुम्हाला आपले स्वतःचे रक्ताचे कुणीतरी असावे असे वाटत नाही का? असे विचारल्यावर बहुतांशी लोकांनी कधीतरी वाटते पण तेवढ्यासाठी आपले स्वतःचे मूल जन्माला घालून पुढची १८-२० वर्षे त्यासाठी द्यायची तयारी नसल्याचे सांगितले. एक सकारात्मक गोष्ट म्हणजे बहुसंख्य जोडप्याचा निर्णय हा विचारपूर्वक आणि दोन्ही कडचा विचार करून घेतलेला होता आणि त्याबद्दल त्यांना वाईट वाटणे खंत वाटणे( guilty) असे वाटत नव्हते. परंतु बहुसंख्य जोडप्यांच्या आईवडिलांना हा निर्णय पसंत नसल्याचेही त्यांनी सांगितले आणि यामुळे आईवडिलांशी काही काळ विसंवाद झाल्याचे सांगितले. यात बहुसंख्य स्त्रियांच्या आई किंवा सासूने त्यांच्या निर्णयाला विरोध केल्याचे सांगितले. काही जोडप्यांची मात्र आपल्या एका पालकांनी आपल्याला सपोर्ट केल्याचे आवर्जून सांगितले. हि यादी संपूर्ण नाही किंवा परिपूर्ण आणि बिनचूक नाही. तसा माझा दावा हि नाही. पण हे मला आलेले अनुभव प्रातिनिधिक समजता येतिल

वाचने 32299
प्रतिक्रिया 136

प्रतिक्रिया

In reply to by कर्नलतपस्वी

जग जसे आहे तसेच राहणार. आपल्याला आपले जग सुंदर बनवायचे आहे.
सौ बात की एक बात कही हैं आपने कर्नल साहब 👍
हा थोडा अतिरेकी विचार वाटतो. अतुल कुळकर्णी एक प्रथितयश कलाकार आहेत. मी स्वता त्यांचा पंखा आहे.
+१ अतुल कुलकर्णी आणि प्रकाश राज हे उत्तम अभिनेते आहेत तर अनुराग कश्यप हा दर्जेदार 'वास्तववादी' सिनेमे आणि वेब सिरीज पेश करणारा उत्तम दिग्दर्शक आहे असे माझे मत आहे आणि त्यांच्या ह्या कलागुणांचा मी पण पंखा आहे! पण हीच मंडळी आपले बलस्थान असलेले कलाक्षेत्र सोडून इतरत्र लुडबुड/वादग्रस्त वक्तव्ये करताना पाहिली की त्यांची खरोखर कीव येते. त्यामागे त्यांचा प्रसिद्धीच्या झोतात किंवा चर्चेत रहण्याचा उद्देश असुदे की समाजाप्रती आपली पोकळ बांधिलकी दाखवण्याचा उद्देश असुदे किंवा कुठला राजकीय अजेंडा राबवण्याचा वा नॅरेटिव्ह सेट करण्याचा हेतू असुदे त्याचे त्यांच्याच करिअरवर होणारे दुष्परिणाम समोर येऊ लागलेत. मोदींवर टीका केल्यामुळे मला हिंदी सिनेमांत कामे मिळणे बंद झाल्याचे रडगाणे प्रकाश राजने मागे गाऊन झाले आहे. नुकताच 'बॉयकॉट' ट्रेंड मुळे डब्यात गेलेल्या वादग्रस्त 'लाल सिंग चढ्ढा' ह्या चित्रपटाचे लेखक ह्या नात्याने जाणते-अजाणतेपणी अतुल कुळकर्णीही टिकेचे धनी होताना दिसत आहेत. (मी हा चित्रपट पाहिलेला नसूनही मला ह्यात त्यांचा काही दोष असेल असे आत्तापर्यंत वाटत नव्हते पण वर प्रकाश घाटपांडे साहेबांनी दिलेल्या व्हिडीओचे' ग्रेटाची हाक' हे शिर्षक वाचल्यावर मात्र काही डॉट्स जोडले जाऊन मनात शंकेची पाल चुकचूकली आहे) आणि परवाच (१९ ऑगस्ट२०२२) प्रदर्शित झालेल्या 'दोबारा' ह्या अनुराग कश्यप दिग्दर्शीत आणि तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाचे पहिल्याच दिवशी २०० पेक्षा अधिक चित्रपटगृहात पहिल्याच खेळा नंतर पुढचे खेळ रद्द होण्याची नामुष्की ओढवल्याची बातमी काल वाचनात आली, तर आत्ताच थोड्यावेळापूर्वी आता 'गँग्स ऑफ वासेपूर ३' काढावा की नाही अशा विचारात पडल्याची प्रतिक्रिया अनुराग कश्यपने काल एका मुलाखतीत दिल्याची बातमी वाचली. वर चर्चेत २ - ३ ठिकाणी लेखनविषयाशी संबंधित मुद्द्यावर अतुल कुलकरणींचे नाव आल्याने त्या मुद्द्यावर बोलणारच होतो पण तिकडेवळण्यापूर्वी ह्या प्रतिसादात बरेच विषयांतर झाले आहे (त्यात धागा भरकटवण्याचा बिलकुल उद्देश नव्हता) त्याबद्दल आधी मी धागाकर्ते खरे साहेबांची क्षमा मागतो. तर मूळ सांगायचा मुद्दा हा होता की अतुल कुलकर्णी हे एक सेलिब्रेटी आहेत. त्यांचे आयुष्य आपल्या सर्वसामान्यांपेक्षा खूप वेगळे आहे. त्यांनी पुढे केलेल्या पर्यावरण वगैरेच्या मुद्द्यावरून/कारणामुळे विनापत्य राहणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि असल्या भंपक मुद्द्याला किंवा 'ज्या जगात मी त्याला सोडणार आहे ते जग जगण्याच्या लायकीच नसेल तर मग मी कशाला त्याला जन्माला घालू?' अशा तुमच्यालेखी (मलाही तसेच वाटते) थोडा अतिरेकी वाटणाऱ्या विचाराने भारावून जाऊन किंवा प्रभावित होऊन जर कोणी त्यांचे अंधानुकरण करणार असेल तर देव त्याचे रक्षण करो. मुळात 'मुल जन्माला न घालणं' हा अन्य कोणाचेही अनुकरण / अंधानुकरण करून वा कुठल्याही प्रकारच्या प्रचाराला बळी पडून घ्यायचा निर्णय किंवा फॅशन खचितच नाही. हा नवरा-बायकोचा अत्यंत खाजगी आणि फारतर आपल्या आप्तेष्टांशी चर्चा/विनिमय करून, आवश्यकता भासल्यास त्यांचे मन वळवून घ्यायचा निर्णय आहे आणि त्यात फक्त आणि फक्त त्या कुटुंबातील मर्यादित सदस्य वगळता अन्य कोणाला हस्तक्षेप/ढवळढवळ करण्याचा अधिकार नाही किंबहुना असा अधिकार अन्य कोणाला देऊही नये. असो... शेवटी तुम्ही म्हणाल्या प्रमाणे,
"आपल्याला आपले जग सुंदर बनवायचे आहे."
हमारे और आपके रास्ते भलेही अलग अलग क्यू न हो, मंझिल तो एक ही हैं!

In reply to by टर्मीनेटर

किमान अतुल कुलकर्णी यांचा मूल नको हा विचार जाणीवपुर्वक आहे हे तर मान्य कराल. जग पर्यावरणीय विनाशाकडे चालले आहे असे अधोरेखित करणार्‍या ग्रेटाची हाक या अतुल देउळगांवकर यांच्या पुस्तकाच्या प्रकाशना निमित्त त्यांनी तशा आशयाचे विचार व्यक्त केले.अन्यही काही कारणॅ असतील. जसे की देशाची एवढी लोकसंख्या अलरेडी आहे त्यात अजून भर कशाला? वगैरे.
पण हीच मंडळी आपले बलस्थान असलेले कलाक्षेत्र सोडून इतरत्र लुडबुड/वादग्रस्त वक्तव्ये करताना पाहिली की त्यांची खरोखर कीव येते. त्यामागे त्यांचा प्रसिद्धीच्या झोतात किंवा चर्चेत रहण्याचा उद्देश असुदे की समाजाप्रती आपली पोकळ बांधिलकी दाखवण्याचा उद्देश असुदे किंवा कुठला राजकीय अजेंडा राबवण्याचा वा नॅरेटिव्ह सेट करण्याचा हेतू असुदे त्याचे त्यांच्याच करिअरवर होणारे दुष्परिणाम समोर येऊ लागलेत.
कलाकाराचे बलस्थान कला असले तरी देशाचा संवेदनशील नागरिक आहे. मतदार आहे म्हणून त्याला आपल्या क्षेत्राव्यतिरिक्त राजकारण,समाजकारण,अर्थकारण, साहित्य ... ई. यावर मत व्यक्त करण्याचे अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहेच. त्यामुळे त्यांची काही लाभ/ हानी होत असतेच. इतरांचीही होत असते.

In reply to by टर्मीनेटर

कुटुंबातील मर्यादित सदस्य वगळता अन्य कोणाला हस्तक्षेप/ढवळढवळ करण्याचा अधिकार नाही किंबहुना असा अधिकार अन्य कोणाला देऊही नये. +१००१,सहमत आमची अवस्था तुकारामांच्या अभंग सारखी "बरे झाले देवा निघाले दिवाळे । बरी या दुष्काळे पीडा केली ।।" लवकर मेला बाप म्हणून दृष्टी झाली साफ कोण सुखाचे कोण फुकाचे कळले सारे अर्थ नात्याचे ना लोटा ना थाली सारेच कमंडल खाली नाही कुणाची साथ आपणच आपला जगन्नाथ त्यामुळेच मनातल्या जगाला वास्तवात आणण्याचा प्रयत्न केला. आम्हाला दोन मुली,तीसरा चान्स घ्या मुलगा होऊ द्या पण एक मताने ठाम नकार होता. स्त्रीरोगतज्ज्ञ जवळचा मित्र, तीनदा विचारले. निर्णय बदलला नाही. घरचे नाराज झाले पण आज मुलींची प्रगती पाहून जेलस. सेलिब्रेटीनी नकारात्मक संदेश देऊ नये असे माझे मत आहे. आणी त्यांचे मत ब्रह्मवाक्य आहे असेही मानत नाही. बाकी आपल्या व सौंच्या निर्णयाचा आदर व्यक्त करतो.

In reply to by कर्नलतपस्वी

हा थोडा अतिरेकी विचार वाटतो. अतुल कुळकर्णी एक प्रथितयश कलाकार आहेत. मी स्वता त्यांचा पंखा आहे. त्यांना या जगाने एवढे प्रेम,यश,धन,दौलत दिली त्या जगाला ते असे कसे काय म्हणू शकतात.
अतुल कुलकर्णींचे विचार अतिरेकी वाटणे वा त्याबद्दल आश्चर्य वाटणे साहजिक आहे. पण अतुल कुलकर्णीं वा तत्सम लोकांचे वाचन , त्यातून विकसित झालेल्या जाणिवा, विचारांचा विस्तारलेला परीघ यामुळे त्यांचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो. हे वाचा :
भटक्या जीवनशैलीमध्ये माणूस निसर्गाच्या व्यवहारांत सर्वात कमी हस्तक्षेप करतो. त्याचा उदरनिर्वाह सर्वस्वी परिसरात सहजी मिळणाऱ्या संसाधनांवर भागवला जातो. वैज्ञानिकांच्या मते सर्वस्वी निसर्गाच्या जोरावर जगण्यासाठी माणशी सरासरी दहा चौरस किमी जागा उपलब्ध असायला हवी. पृथ्वीवरील जमिनीच्या भूभागाचे एकूण क्षेत्रफळ पाहिले आणि त्याच्या प्रत्येक भागात- अगदी एव्हरेस्टच्या टोकावरही- माणसे राहू शकतील आणि सर्व ठिकाणी मुबलक संसाधने उपलब्ध असतील, असे गृहीत धरले तरी संपूर्ण पृथ्वीवर या पद्धतीने जास्तीत जास्त फक्त दीड कोटी माणसे राहू शकतील. आपले पूर्वज एका ठिकाणी राहून शेती करू लागले, तेव्हा त्यांनी इतर ठिकाणहून संसाधने (उदा. पाणी) आणून आपल्या ताब्यातल्या जागेची उत्पादन क्षमता वाढवली. यामुळे दहा चौरस किमी जागेत एका नाही, तर ५० माणसांच्या गरजा भागू लागल्या. पण यासाठी आपल्याला पृथ्वीवरील निसर्गचक्रात लक्षणीय हस्तक्षेप करावा लागला. मात्र असे जीवनही जास्तीत जास्त ७५ कोटी लोकसंख्येसाठी शक्य आहे. आज जगाची लोकसंख्या साडेसात अब्ज आहे
संपुर्ण लेख

In reply to by तर्कवादी

@तर्कवादी अतुल कुलकर्णीं वा तत्सम लोकांचे वाचन , त्यातून विकसित झालेल्या जाणिवा, विचारांचा विस्तारलेला परीघ यामुळे त्यांचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो. असेलही,म्हणूनच त्याच्यावर जास्त जबाबदारी. जग जगण्या लायक नाही म्हणण्या पेक्षा जग जगण्या लायक बनवू या म्हणले असते तर जास्त आवडले असते. मुळात मुल हवे नको हा वैयक्तिक विचार आहे. अतुल कुळकर्णी वा इतर मान्यवरांनी इतरांना आपले मत सांगू नये आणी सांगीतले तरी फारसा फरक पडेल असे वाटत नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

त्यांचा मुद्दा पर्यावरणीय जगाशी होता. मी त्यांच्या मतांचा आशय मांडला आहे. संपूर्ण भाषणाची लिंक दिली आहेच

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नलतपस्वीजी,
जग जगण्या लायक नाही म्हणण्या पेक्षा जग जगण्या लायक बनवू या म्हणले असते तर जास्त आवडले असते.
बरोबर आहे. पण त्यांच्या मते आणि इतर अनेक पर्यावरण तज्ञांच्या मतेही खूप जास्त वाढलेल्या लोकसंख्ये मुळे जग जगण्या लायक नाही. मग ते लायक बनवण्याकरिता लोकसंख्या कमी करणे हाच मार्ग आहे... तोच त्यांनी सुचवला.
मुळात मुल हवे नको हा वैयक्तिक विचार आहे. अतुल कुळकर्णी वा इतर मान्यवरांनी इतरांना आपले मत सांगू नये
मुल हवे की नको हा वैयक्तिक विचार व निर्णय आहे हे मान्य आणि कुणीच कुणाला याबाबत आग्रह जबरदस्ती करु शकणार नाही. पण हा निर्णय घेताना आजूबाजूच्या परिस्थितीचे ज्ञान / आकलन झाले तर अधिकच बरे. अतुल कुलकर्णींसारखे लोक तोच प्रयत्न करत आहेत. अर्थात त्यांचे विचार बरेच टोकाचे आहेत. लोकसंख्या कमी होणे गरजेचे आहे पण ती वेगाने कमी होणेही घातक ठरेल. त्याचे वेगळे दुष्परिणाम असतील. म्हणून लोकसंख्या हळूहळू कमी व्हावी लागेल. पण अतुल कुलकर्णीं म्हणालेत म्हणून लगेच काही अनेक लोक त्यांचं ऐकणार आहेत असं नाहीये. पण ज्यांच्या मनात "मूल नको" असा विचार आधीपासूनच होता, किंवा "आपल्याला मूल हवेच" अशी ज्यांना ओढ नाहीये तेच कदाचित "मूल नको" असा निर्णय घेवू शकतील. मनात एखादा विचार असणे आणि त्या विचाराचे निर्णयात रुपांतर होणे हा एक प्रवास आहे. सगळ्यांसाठीच तो सारखाच सोपा नसतो. त्यामुळे काहीजण विचार एक ,निर्णय दूसरा, कृती तिसरीच असं काहीतरी आयुष्य जगतात. प्रसिद्ध / मान्यवर लोकांच्या प्रकटनामुळे काही वेळा मनोबल वाढण्यास मदत होते आणि आपल्या विचारांनुसार निर्णय घेणे, त्यावर ठाम रहाणे हे काहीसे सोपे होते. तशीच मदत इतर समूह, आधारगट (फेसबूक वरील ग्रुप) यांपासूनही होवू शकते. मूल हवे की नको हा जसा वैयक्तिक निर्णय तसाच "किती मूल हवेत ?" हा पण वैयक्तिक म्हणता येईल.. पण तसे नाहीये तो सार्वजनिक हित लक्षात घेवून घ्यावा लागतो. त्यामुळेच अनेक लोकांनी सरकारच्या "एक किंवा दोन बस" या आवाहनाला प्रतिसाद दिला. पण जर ६०-७० वर्षापुर्वीच "चार किंवा पाच बस" असे आवाहन जर सरकारने केले असते तर आज परिस्थिती अधिक सुखकारक असती .

In reply to by तर्कवादी

जास्त वाढलेल्या लोकसंख्ये मुळे जग जगण्या लायक नाही. मग ते लायक बनवण्याकरिता लोकसंख्या कमी करणे हाच मार्ग आहे याच व्यत्यास सुद्धा तितकाच सत्य आहे. म्हणजे जग जगण्या लायक असलं (समृद्ध) तर लोकसंख्या आपोआप कमी होईल. affluence is best contraception संपन्नता हे सर्वात चांगले संतती नियमनाचे साधन आहे अशी म्हण आहे. हे जीवशास्त्रीय सत्य आहे. जेंव्हा प्रथिनांची कमतरता निर्माण होते तेंव्हा जीवांची कामेच्छा जास्त होते. ज्या प्राण्यात अपत्यांच्या जीवित राहण्याची शक्यता कमी असते तिथे संतती मोठ्या प्रमाणावर जन्माला घातली जाते. खालच्या वर्गातील प्राणी जास्तीत जास्त पिल्लाना जन्म देतात. हीच स्थिती मानवी इतिहासात आहे. सर्वात गरीब देशांची लोकसंख्या सर्वात जास्त असते आणि जेथे संतती ची जगण्याची शक्यता जास्त आणि उत्तम पालन पोषणाची सो रस्ते तेथे संतती कमी प्रमाणात निर्माण होते. तेंव्हा आर्थिक सुबत्ता हा लोकसंख्या कमी करण्याचा खात्रीचा उपाय आहे.

विषय गंभीर आणि चर्चा संतुलित. दुर्लभ योग :-) अपत्य / लग्न हवे - नको असणे हे फार पर्सनल निर्णय असतात. पण त्यामागच्या प्रेरणा काय असतात हे समजायला वरील चर्चेमुळे मदत झाली.

In reply to by हेमंतकुमार

दोन्हीकडून मांडलेले मुद्दे तर्कशुद्ध आणी ठोस आहेत. चाईल्ड फ्री हा विचार मर्यादित व ठाम असावा. अर्थात काल,समयच ठरवेल याचे भवितव्य. लिव्हिंग इन सुद्धा परस्परांच्या समंतीने घेतलेला निर्णय असतो.

केवळ मूल झाल्याने मुलासाठी जगू या साठी नवरा बायकोंनी परस्परांशी तडजोड करुन आख्ख आयुष्य व्यतित केल्याने अनेक घटस्फोट टळले असतील. याच्या नोंदी होउ शकत नाहीत. मूल होउन देखील अनेक घटस्फोट होतात ही गोष्ट वेगळी. त्याच्या नोंदी होतात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

मुलं आई वडील याच्यां मधील काॅमन धागा असल्यामुळेच कितीक घटस्फोट वाचले याची उदाहरणे जवळपास आढळतात.

मस्त चाललीय चर्चा !
विनापत्य जीवनशैली चे तोटे
१. पहिल्यांदाच आई / बाप बनल्यावर, अपत्याला पहिल्यांदाच हातावर उचलून घेताना होणारा आनंद, डोळ्यातून घळाघळ वाहणारे अश्रु . २. बाळ पहिल्यांदाच उभे राहते, पहिले पाऊल टाकते, पहिला शब्द उच्चारते, दिवसभर कितीही थकून येवो, घरात शिरल्यावर बाळाकडे पाहिल्यावर थकवा कुठल्याकुठे पळून जातो. ३. मुल शाळेत जाते तो पहिला दिवस घर खायला उठते तो अनुभव. मुल शाळेतून घरी आल्यावर त्याच्या डोळ्यात वेगळे जग पाहिल्याचा आनंद ! ४. मुलांची लग्ने झाल्यावर मुलेचे/ सुनेचे दोष आणि जावयाचे / मुलीचे गुणगाण यासारखे रम्य वेळ घालविण्याचे साधन हाती लागते. ५. आयुष्यात जेवढे जास्त दु:ख तेव्हढे परमेश्वर स्मरणाकडे जास्त लक्ष. द्रौपदीने कृष्णाकडे मागीतलेला वर आठवा. या अणि अशाच काही अनुभवांचा अभाव !
विनापत्य जीवनशैली चे फायदे
१. स्वत:चे अपत्य नसल्यामुळे तेच प्रेम भाचे, पुतणे आणि इतरांवर करता येते. २.बायकोचे बाळंतपण नीट निभावून नेले जाईल ना ? बाळ आणि बाळंतीण सुखरुप राहिल ना ही काळजी करण्यापासून पुरुषांची मुक्तता तर बाळांतपणानंतर शरीराचा सुडौलपणा गमावण्यापासून मुक्तता . ३. बाळ आजारी पडल्यावर तुम्ही अगदी स्वत: डॉक्टर असा पण बाळाचे रडणे, त्याचे दु:ख पाहून जीव कळवळणे, अनामिक काळजी वाटणे यापासून सुटका. ४. मुलांच्या जन्माचा खर्च वाचतो. (कमीतकमी २५ हजार ते जास्तीत जास्त कितीही)...... ५. मुलांचे संगोपन (शाळेचा खर्च, कॉलेजचा खर्च) - बचत सध्याच्या हिशोबाने कमीतकमी ५ लाख ते जास्तीत जास्त कितीही.... ६. मुलांचे शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे आपले वेळापत्रक बनविणे. ७. मुले कॉलेजला गेल्यावर वाईट संगतीला लागतील काय ? आजकाल काय काय बातम्या ऐकायला येतात. काळजीपासून मुक्तता. ८. मुलांचे लग्न झाल्यावर ते आईबापांना वार्‍यावर सोडून फक्त त्यांच्याच संसारात रमतात आईबाबांची हेळसांड करतात त्यापासून मुक्तता. ९. आयुष्यभर मोठ्या पदांवर काम केले, बाहेर आदर मिळविला पण म्हातारपणी सुनेच्या वचनात राहून घरात नोकर / मोलकरीण / आया बनण्यापासून सुटका. १०. मुले परदेशी गेली तर मेल्यावर अग्नी द्यायला तरी येतील की नाही याची मारामार. ११. एकापेक्षा जास्त मुले असतील तर संपत्तीवरुन कलह यापासून सुटका. एकंदरीत फायदा तोट्याचा विचार केला तर विनापत्य अपत्य राहण्याचे फायदे भरपूर दिसतात. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी !!
विनापत्य जीवनशैली अगदी स्वेच्छेने स्वीकारणारे किंवा त्याकडे ओढा असणारे लोक बहुधा निरिश्वरवादी आहेत, किंवा धार्मिक व सामाजिक पातळीवर डाव्या विचारांकडे झुकणारे आहेत.
खरे आहे. जीवनात दु:ख नसेल तर परमेश्वराची आठवण काढण्याचे प्रयोजन फार कमी उरते.

In reply to by धर्मराजमुटके

प्रतिसाद आवडला परंतु तुम्ही सांगितलेले तोटे हे ही जीवनशैली जगणार्‍यांसाठी तोटे नाहीतच. कारण त्यांना अशा अनुभवांची
पहिल्यांदाच आई / बाप बनल्यावर, अपत्याला पहिल्यांदाच हातावर उचलून घेताना होणारा आनंद, डोळ्यातून घळाघळ वाहणारे अश्रु
आस नसतेच मुळी. या व्यक्तींना मुलांशिवाय आपले जीवन अपुर्ण वाटत नाहीच.
जीवनात दु:ख नसेल तर परमेश्वराची आठवण काढण्याचे प्रयोजन फार कमी उरते.
तुमचे म्हणणे काहीसे खरे आहे. संकटे आल्यावर लोक परमेश्वराचा धावा करतात पण निरीश्वरवादी हा कायमच निरीश्वरवादी असतो - त्याचा सुख-दु:खाशी संबंध नसतो. मी गेले कित्येक वर्षांपासून खात्रीने निरीश्वरवादी आहे. जरी अपत्य नसलीच तरी दु:खाचे प्रसंग /संकटे आलीच नाहीत असे नाही.

In reply to by धर्मराजमुटके

एकंदरीत फायदा तोट्याचा विचार केला तर विनापत्य अपत्य राहण्याचे फायदे भरपूर दिसतात. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी !!
अगदी खरंय.. फायदेच फायदे आहेत.

In reply to by धर्मराजमुटके

"एकंदरीत फायदा तोट्याचा विचार केला तर विनापत्य अपत्य राहण्याचे फायदे भरपूर दिसतात."
अलबत 👍 तुम्ही सांगितलेल्या तोटयांपैकी पाहिल्या चारच्या बाबतीत वर तर्कवादींनी दिलेल्या, "तुम्ही सांगितलेले तोटे हे ही जीवनशैली जगणार्‍यांसाठी तोटे नाहीतच. कारण त्यांना अशा अनुभवांची आस नसतेच मुळी. या व्यक्तींना मुलांशिवाय आपले जीवन अपुर्ण वाटत नाहीच." ह्या प्रतिसादाशी सहमत! खालील पाचवा हा माझ्यामते तोटा नसून एक मुद्दा आहे, "आयुष्यात जेवढे जास्त दु:ख तेव्हढे परमेश्वर स्मरणाकडे जास्त लक्ष." आणि तुम्ही Quote केलेला तर्कवादींचा खालील मुद्दा/अंदाज "विनापत्य जीवनशैली अगदी स्वेच्छेने स्वीकारणारे किंवा त्याकडे ओढा असणारे लोक बहुधा निरिश्वरवादी आहेत, किंवा धार्मिक व सामाजिक पातळीवर डाव्या विचारांकडे झुकणारे आहेत." वरील दोन्ही मुद्द्यांच्या बाबतीत तुम्हा दोघांशी खालील कारणासाठी असहमत! कर्मकांडांचा विरोधक असलो आणि अध्यात्माकडे ओढा नसला तरी मी ईश्वरावर पूर्ण विश्वास असलेला एक 'अस्तिक' मनुष्य आहे. आणि शाळकरी वयापासूनच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी विचारांचा मनावर पडलेला प्रभाव (आताच्या शिवसेनेशी दुरान्वयेही संबंध नसूनही) आजही कायम असल्याने डाव्या विचारांकडे झुकण्याची कधी वेळच आली नाही. तसेच दुःखाच्या वेळी परमेश्वराचे स्मरण तर सगळेच अस्तिक लोक करतात (निरीश्वरवादी लोक काय करतात ह्याची मला कल्पना नाही) पण दुःख नसतानाही परमेश्वराचे स्मरण करण्याची संधी आणि वेळ जर आम्हाला मिळत आहे तर कमी काय नी जास्ती काय, दुःखाचे डोहाळे हवेतच कशाला 😀 बाकी तुम्ही दिलेल्या फायद्यांची यादी अजून बरीच वाढवता येईल पण तूर्तास त्यातले आमच्यासाठी महत्वाचे असलेले फायदे अधोरेखित करतो, 1. "स्वत:चे अपत्य नसल्यामुळे तेच प्रेम भाचे, पुतणे आणि इतरांवर करता येते." +१ 'आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट' असा दुजाभाव नं ठेवता सर्वच लहान मुलांवर सारखे प्रेम करता येते. 6. "मुलांचे शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे आपले वेळापत्रक बनविणे." बायकोच्या कार्यालयीन जवाबदाऱ्यांमुळे तर माझ्या व्यावसायिक कामांसाठी असो किंवा लास्ट मिनिट ठरणाऱ्या भटकंतीच्या कार्यक्रमासाठी असो, उद्या नक्की कुठल्या ठिकाणी असू ह्याची खात्री आज देता येत नाही अशी परिस्थिती असल्याने हा फायदा आमच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. 7. "मुले कॉलेजला गेल्यावर वाईट संगतीला लागतील काय ? आजकाल काय काय बातम्या ऐकायला येतात. काळजीपासून मुक्तता." हा फायदा म्हणुन नाही पण एक विचार म्हणुन आवडलेला मुद्दा आहे! जर आम्ही मूल जन्माला घातले असते आणि कर्मधर्म संयोगाने ते आईवर नं जाता बापावर म्हणजे माझ्यावर गेले असते तर मात्र ही काळजी प्रचंड सतावत राहिली असती. वाईट संगत वगैरे लागली नसूनही आई-बाबांच्या जीवाला प्रचंड घोर लावणारे बरेच प्रताप अस्मादिकांनी लहानपणापासूनच करून झाले आहेत 😀

In reply to by टर्मीनेटर

कर्मकांडांचा विरोधक असलो आणि अध्यात्माकडे ओढा नसला तरी मी ईश्वरावर पूर्ण विश्वास असलेला एक 'अस्तिक' मनुष्य आहे.
माझ्या प्रतिसादातील "विनापत्य जीवनशैली आणि निरिश्वरवाद" या मुद्द्यावरील तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघत होतो. म्हणजे माझा समज चुकीचा ठरला तर :)

In reply to by तर्कवादी

माझ्या प्रतिसादातील "विनापत्य जीवनशैली आणि निरिश्वरवाद" या मुद्द्यावरील तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघत होतो.
हो खरंतर तिथेच प्रतिसाद देणार होतो, पण तेवढा भाग मुटके साहेबांनी त्यांच्या प्रतिसादात Qoute केला होता म्हणुन सामायिक प्रतिसाद दिला 😀
म्हणजे माझा समज चुकीचा ठरला तर :)
Yup 😔

In reply to by धर्मराजमुटके

विनापत्य जीवनशैली चे फायदे यातील बरेचसे फायदे हे आंबट द्राक्षे सारखे भासतात. १. स्वत:चे अपत्य नसल्यामुळे तेच प्रेम भाचे, पुतणे आणि इतरांवर करता येते. स्वतःच्या अपत्यावरील प्रेम हे दुसऱ्याच्या अपत्यावर कधीही करता येत नाही हे जीवशास्त्रीय सत्य आहे. आपल्या मुलाने त्याचे खेळणे मोडले तर येतो त्याच्या तिप्पट राग आपल्या भाच्या पुतण्याने मोडले तर येतो. २.बायकोचे बाळंतपण नीट निभावून नेले जाईल ना ? बाळ आणि बाळंतीण सुखरुप राहिल ना ही काळजी करण्यापासून पुरुषांची मुक्तता तर बाळांतपणानंतर शरीराचा सुडौलपणा गमावण्यापासून मुक्तता . बाळंतपण नीट निभावले जाणार नाहि ही शक्यता फार कमी आहे. हे म्म्हणजे सायकल चालवताना पडायला होते म्हणून सायकल शिकायलाच नको म्हणण्यासारखे आहे. आणि सुडौलपणा बद्दल म्हणालात तर मुलं न झालेल्या किती बायका चाळीशीत सुडौल असतात? बाळंतपणाचा आणि सुडौलपणाचा संबंध नाही तर गरोदर होण्याच्या अगोदर, गरोदरपणात आणि बाळंतपणात आपण किती खातो आहोत त्यावर आहे. कालच माझ्याकडे गरोदर होण्यापूर्वी ९५ किलो आणि आता तीन महिने झाल्यावर ९८ किलो वजन झालेली स्त्री अली होती आणि बाळाचे वजन सध्या ६०० ग्राम आहे ३. बाळ आजारी पडल्यावर तुम्ही अगदी स्वत: डॉक्टर असा पण बाळाचे रडणे, त्याचे दु:ख पाहून जीव कळवळणे, अनामिक काळजी वाटणे यापासून सुटका. असं काही होत नाही. मी स्वतः डॉक्टराचे आणि बाळाच्या आजारपणाची अनामिक चिंता काही वाटत नाही. अर्थात माझ्या मुलांना गंभीर असा कोणताही आजार झाला नाही हे हि तितकेच खरे. पण गंभीर आजार काही बाळालाच व्हायला हवा असे नाही. तो तुम्हाला नि तुमच्या पत्नीला सुद्धा होऊ शकतो. ४. मुलांच्या जन्माचा खर्च वाचतो. (कमीतकमी २५ हजार ते जास्तीत जास्त कितीही)...... लग्न केले नाही तर हाही खर्च वाचतो. कामवासनेच्या शमनासाठी गणिकालये कमी नाहीत. स्वतःचे कोणी माणूस हवे, भावनिक भुकेसाठी माणूस (/ स्त्री) लग्न करतो. तसेच मुले होऊ देतात. ५. मुलांचे संगोपन (शाळेचा खर्च, कॉलेजचा खर्च) - बचत सध्याच्या हिशोबाने कमीतकमी ५ लाख ते जास्तीत जास्त कितीही.... ६. मुलांचे शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे आपले वेळापत्रक बनविणे. वरीलप्रमाणेच ७. मुले कॉलेजला गेल्यावर वाईट संगतीला लागतील काय ? आजकाल काय काय बातम्या ऐकायला येतात. काळजीपासून मुक्तता. उद्या आपली बायको / नवरा लफडं करणार नाही का? लग्नच केलं नाही तर या काळजीतूनही मुक्तता होईलच. ८. मुलांचे लग्न झाल्यावर ते आईबापांना वार्‍यावर सोडून फक्त त्यांच्याच संसारात रमतात आईबाबांची हेळसांड करतात त्यापासून मुक्तता. मुलं तुमच्या संसारात रमतील हे मूलभूत गृहितकच चूक आहे. आईबापांची हेळसांड करतील यासाठी आईबापांनी त्यांना मॅच्युअर होणारी मुदत ठेव समजणे सोडून दिले पाहिजे . ज्यांना मुलंच नाहीत त्यांची काळजी कोण घेईल हा विचार येथे येत नाही का ? ९. आयुष्यभर मोठ्या पदांवर काम केले, बाहेर आदर मिळविला पण म्हातारपणी सुनेच्या वचनात राहून घरात नोकर / मोलकरीण / आया बनण्यापासून सुटका. मोठ्या पदांवर राहिले आणि आर्थिक नियोजन केले नाही तरी ही सुनेच्या वचनात राहायलाच लागेल हि अतिशयोक्ती आहे. उलट अतिशय प्रेम करणारी सून मिळाली तर आयुष्य अधिक सुंदर होईल असा विचार का करत नाही? १०. मुले परदेशी गेली तर मेल्यावर अग्नी द्यायला तरी येतील की नाही याची मारामार. मुलं नसली च तर अग्नी कोण देणार? हा विचार नाहीच केलेला ११. एकापेक्षा जास्त मुले असतील तर संपत्तीवरुन कलह यापासून सुटका. संपत्तीचा आपल्या हयातीत सुविनयोग केल्यास असले विचार येणारच नाहीत. उलट आपल्यामागे आपल्यी सम्पत्ती आपल्या रक्तामांसाचा सोडून तिसऱ्याच माणसाच्या कामी येणार हा विचार अपत्यहीन माणसांना डाचत असेल का असा विचहर करून पहा बाकी आपल्या मनाचे असे खोटे समाधान करून घेण्यापेक्षा मला मुले नकोत या मागे माझा ठाम विचार आहे त्याचे फायदे तोटे जगाला सांगण्याची गरजच काय? असा साधा सरळ विचार का करत नाही? आय आय टी मध्ये जास्त मुले वैफल्यग्रस्त होतात किंवा अमली पदार्थांच्या आहारी जातात म्हणून मी आय आय टी मध्ये गेलो नाही यासारखी विचारसरणी नको.

In reply to by सुबोध खरे

१. स्वत:चे अपत्य नसल्यामुळे तेच प्रेम भाचे, पुतणे आणि इतरांवर करता येते. स्वतःच्या अपत्यावरील प्रेम हे दुसऱ्याच्या अपत्यावर कधीही करता येत नाही हे जीवशास्त्रीय सत्य आहे. आपल्या मुलाने त्याचे खेळणे मोडले तर येतो त्याच्या तिप्पट राग आपल्या भाच्या पुतण्याने मोडले तर येतो.
डॉ.खरेंशी सहमत. प्रेमासोबत हक्क ही सुध्दा एक भावना आहे. हक्क बजावणेतो बजावुन घेता येणे ह्या दोन्ही गोष्टी स्वतःच्या अपत्याच्या बाबतीत जितक्या सहजपणे करता येतो तितका पुतण्या/भाच्यांशी करता येत नाही. स्वतःच्या मुलावर चिडणे प्रसंगी हात ही उगारणे ह्या गोष्टी इतरांच्या मुलांबाबतीत करणे फार अवघड आहे.

In reply to by कानडाऊ योगेशु

स्वतःच्या अपत्यावरील प्रेम हे दुसऱ्याच्या अपत्यावर कधीही करता येत नाही हे जीवशास्त्रीय सत्य आहे.
आपली व सुबोध साहेबांची मुळ वाक्याचा अर्थ समजून घेण्यात गल्लत झाली आहे असे वाटते. स्वतःच्या अपत्यावरील प्रेम हे दुसऱ्याच्या अपत्यावर कधीही करता येत नाही हे जीवशास्त्रीय सत्य आहे हे बरोबर आहे पण आपण अपत्यलेस जीवनशैलीचा विचार करतोय ना ?

दिव्यांग किंवा मेंटली चेलेंज मूल झाले तर ? या भीतीने मूल नको असे विचार असलेली जोडपी आहेत . काहीजणांच्या ओळखीत किंवा घरात असे कोणी असेल तर ही भिती प्रबळ असते

In reply to by कपिलमुनी

दिव्यांग किंवा मेंटली चेलेंज मूल झाले तर ? या भीतीने मूल नको असे विचार असलेली जोडपी आहेत .
आमच्या कॉलेजच्या जुन्या ग्रुपमधली एक तामिळ भाषिक मैत्रीण आहे. ती स्वतःला जितके समजायची तितकी दिसायला कुरूप आम्हाला तरी कधी वाटली नव्हती नी अजूनही वाटत नाही. सामान्य रूपामुळे लग्न जमायला बराच उशीर झाला आणि नवराही अगदीच रूपाने बेताचा आहे. त्या दोघांनी आपल्यापोटी 'कुरूप' मूल जन्माला येऊ नये ह्या एकमेव कारणासाठी विनापत्य राहण्याचा निर्णय घेतला आहे. हे कारण आम्हाला (ग्रुप मेम्बर्सना) पटलेले नसले आणि त्यावर तिच्याकडेही कुठले स्पष्टीकरण मागितले नसले तरी लहानपणापासून त्या दोघांवर रंग आणि रूपावरून इतरांकडून झालेल्या शेरेबाजी/टोमण्यांतून दोघांच्या मनात निर्माण झालेला न्यूनगंड आणि कदाचित असे लज्जा/अपमानास्पद जीवन आपल्या अपत्याच्या वाट्याला येऊ नये ह्या भावानेतून त्यांनी हा निर्णय घेतला असावा असा आमचा अंदाज आहे.

In reply to by टर्मीनेटर

आमच्या कॉलेजच्या जुन्या ग्रुपमधली एक तामिळ भाषिक मैत्रीण आहे. ती स्वतःला जितके समजायची तितकी दिसायला कुरूप आम्हाला तरी कधी वाटली नव्हती नी अजूनही वाटत नाही. सामान्य रूपामुळे लग्न जमायला बराच उशीर झाला आणि नवराही अगदीच रूपाने बेताचा आहे. त्या दोघांनी आपल्यापोटी 'कुरूप' मूल जन्माला येऊ नये ह्या एकमेव कारणासाठी विनापत्य राहण्याचा निर्णय घेतला आहे.
कृष्णवर्गीय (रंगाने काळी / सावळी) होती का? भारतामध्ये गोर्‍या रंगाच्या लोकांना खुप प्राधान्य दिले जाते.

In reply to by Trump

कृष्णवर्गीय (रंगाने काळी / सावळी) होती का?
हो. कॉलेजमध्ये 'कलर गया तो पैसा वापीस' अशी शेरेबाजी तिच्यावर होत असे! अर्थात ती दुसऱ्या वर्षी आमच्या ग्रुपला जॉईन होई पर्यंतच, नंतर कोणाची बिषाद होती तिला काही बोलायची 👊 😀

In reply to by टर्मीनेटर

भारत आणि रंगभेद
कॉलेजमध्ये 'कलर गया तो पैसा वापीस' अशी शेरेबाजी तिच्यावर होत असे! अर्थात ती दुसऱ्या वर्षी आमच्या ग्रुपला जॉईन होई पर्यंतच, नंतर कोणाची बिषाद होती तिला काही बोलायची
धन्यवाद. तुमच्यामुळे तीला होणारा काही त्रास वाचला असेल अशी मी अपेक्षा करतो. रंगभेदी आणि रंगभेदाला प्रत्यक्ष- आणि अप्रत्यक्षमार्गे प्रोत्साहन देणार्‍या लोकांविरोधात राहायची गरज आहे. माझ्या भारतातील अनुभवावरुन भारतात अजुन रंगभेदाविषयी जाणीवा अजुन प्रगल्भ नाहीत असे मला वाटते. लग्नाच्या जाहिरातीमध्ये सरसकट गोरा वर्ण, गोरी बायको हवी अशी वर्णने असतात. सहज बोलतानाही गोरे म्हणजे सुंदर आणि काळे म्हणजे कुरुप असे समीकरण असते. दुर्देवाने ह्यामुळे रंगाने गडद पणे गुणाने चांगल्या लोकांमध्ये भयंकर असा न्युनगंड निर्माण होतो, त्यातुन कितीतरी होतकरु तरुण / तरुणी मागे पडत असतील.

In reply to by टर्मीनेटर

तुमच्या त्या बुक्कीच्या चिन्हाने आणि हसर्‍या चेहर्‍याने गडबड केली, काही केल्या पुर्ण प्रतिसादच जात नव्हता. :)

In reply to by Trump

😀

तुमच्या त्या बुक्कीच्या... मिपावर थेट स्मायली टाकता येत नाहीत. तुम्हाला ह्या लेखाचा त्यासाठी उपयोग होईल! (जाहिरात 😉)

In reply to by टर्मीनेटर

दोघांच्या मनात निर्माण झालेला न्यूनगंड ....
सहमत.. विनापत्य जीवनशैलीचा निर्णय घेण्यामागे न्यूनगंड के कारण असू शकते. याचे स्पष्टीकरण असेही देता येईल - कोणत्याही जीवाला खरे तर अमरत्वाची इच्छा असते पण ते शक्य नसते म्हणून स्वतःच्या गुणसूत्रांपासून बनलेली अपत्य जन्माला घालावेसे वाटते अशी एक थिअरी आहे. म्हणजेच कोणत्याही जीवाला स्वतः श्रेष्ठ असल्याची, कुणीतरी विशेष असल्याची किंवा गुणवंत असल्याची एक भावना असते व म्हणून स्वतःसारखी अपत्ये जन्माला घालाविशी वाटते. जर ही भावनाच लोप पावलेली असेल.. आपणही "कुणीतरी आहोत" ही भावनाच हरवली असेल तर अपत्य जन्माला घालण्याची उर्मी पण नाहीशी होईल.

श्री दादा कोंडके यांची स्वतःला मुल नसल्यामुळे त्यांच्या पुतण्याने (श्री विजय कोंडके) यांनी कसा गैरफायदा घेतला, शेवटी वय निघुन गेल्यानंतर त्यांना कशा पश्चात्ताप झाला याचे चांगले वर्णन 'एकचा जीव' या पुस्तकामध्ये मध्ये आहे. बरे प्रतिसाद हे शहरी पार्श्वभुमीतुन लिहीले आहेत, ग्रामिण भागात ते लागु होत नाहीत.

अवांतर वाटेल पण मुल नको या विचारातून पुढे लग्न तरी कशाला ? असा विचार पुढे येऊन लग्नसंस्था मोडकळीस येईल काय असे वाटते. (ती तशी मोडकळीस आली किंवा न आली मला फरक पडत नाही. जगाची चिंता वाहण्याचा भार माझ्या माथी नाही). कलियुगाच्या अंती सगळ्या जगाचा विनाश होतो असे जगातील सगळ्या धर्मग्रंथात वर्णन आहे असे म्हणतात. प्रत्यक्षात पृथ्वीची कोणत्या ग्रहाशी टक्कर होईल, सुर्याच्या उष्णतेमुळे धरतीवरील जीवन नष्ट होईल किंवा जलप्रलय होऊन पृथ्वी गिळंकृत होईल आणि मानवजात नष्ट होईल असे म्हणण्यापेक्षा मुले जन्माला घालणे बंद झाले तर एक दिवस आपोआपच मानवजात नष्ट होईल काय ? विचार जास्तच अतिरंजित वाटतात काय ?

In reply to by धर्मराजमुटके

असा विचार पुढे येऊन लग्नसंस्था मोडकळीस येईल काय असे वाटते.
लग्नसंस्था मोडकळीस येण्याचे इतरही अनेक कारण असू शकतात.
मुले जन्माला घालणे बंद झाले तर एक दिवस आपोआपच मानवजात नष्ट होईल काय ?
"मूल नको" हा विचार खरे तर "मूल हवे" या आंतरिक ओढीच्या अभावामुळे आलेले आहे (क्वचित काही अपवाद असतीलही) . अशी ओढ नसणे हे निसर्गातले हे एक विचलन (व्हेरिएशन) आहे. हे विचलनच नियम बनेल का ? जर नाही तर अशी परिस्थिती ओढवणार नाही.

In reply to by धर्मराजमुटके

अवांतर वाटेल पण मुल नको या विचारातून पुढे लग्न तरी कशाला ?
काही कारणे कायदेशीर आहेत, काही मानसिक आहेत, काही शारिरीक आहेत, काही सामाजिक आहेत.

मुले जन्माला घालणे बंद झाले तर एक दिवस आपोआपच मानवजात नष्ट होईल काय ? चर्चा प्रतिसाद आवडले अपत्य जन्माला घालणे आणि वाढवणे हि एकीकडे अतिशय नाजूक आणि वयक्तिक बाब असूनही कधी कधी ती सामाजिक म्हनण्यापेक्षा देश/ राज्या शकट चालवणे इथपर्यंत पोचते .... देश/ समाजाप्रमाणे हि बाब "सरकारी" होऊ शकते चीन = फक्त १ भारत = २ पुरे वरील दोन = मुलं = राष्ट्रीय संपत्ती आटोक्यात आणा ! खालील दोन = मुलं = राष्ट्रीय संपत्ती वाढवा ! सिंगापोरे: सरकारकी खर्चाने डेटिंग क्रूझ वर चला ( म्हणजे एक तर लग्न कराल बहुतेक आणि मग मूल होईल ) ऑस्ट्रेलिया = मूलं जन्माला आले कि ५ हजार डॉलर ( १ डॉलर = ५५ रु ) खास बोनस ,

मुले ही भानगड एकुणातच नको. मुले झाली की अनेक बम्धने येतात. आपण आपले बरेचसे व्यवसायातले/ करीयरमधले निर्णय केवळ मुले आहेत म्हणून घेऊ शकत नाही. किंवा नावडते निर्णय घ्यावे लागतात. मुलांना सांभाळणे हा ताप वाटत नाही. मात्र ती टीन एजर झाली की त्यांचे पालकांना टाकून बोलणे त्यांचे नको ते राग लोभ सांभाळणे हे करत बसावे लागते. त्यापेक्षा मुले नसलेली बरी. म्हातापणची काठी म्हणावे तर ;मुले तरुण झाली की आपण उगाच त्यांच्यावर भार तरी होतो किंवा मुलेच पालकांचे साठवलेले धन नष्ट करतात. पालकही उगाच मुलांसाठी याम्व त्याग केला , अशा बढाया मारून मुलांना हीन भावना देतात या पेक्षा जे काही होईल ते आपलया स्वतःमुळे होतेय या भावनेत राहिलेले बरे. लग्नदेखील शक्यतो न केलेले बरे. ( वपुंच्या भाषेत बोलायचे तर " एकट्या वेणीसाठी आख्खी बाई जन्मभर पत्करावी लागते " ) जन्मभर तडजोडी करत आयुष्य मारूनमुटकून जगायचे तरी कशाला

लग्न टिकेल की नाही याचीच शाश्वती वाटत नाही म्हणून मूल नको हे ही एक कारण असते. मूल असेल तर घटस्फोट घेणे अवघड जाते. मुलाचे संगोपन व जबाबदारी हा एक महत्वाचा व अतिरिक्त मुद्दा विचारात घ्यावा लागतो. तसेही मूल म्हणजे म्हातारपणाची काठी ही अंधश्रद्धा आहे हे लोकांना आता पटू लागले आहे. जन्म देताना आम्हाला विचारल होत का? असा प्रश्न आता मुलं विचारु लागली आहेत. तसेच विवाहापेक्षा लिव्ह इन हा पर्याय जरा आकर्षक वाटू लागला आहे. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली हा पर्याय जरा बरा वाटू लागला आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

लग्न टिकेल की नाही याचीच शाश्वती वाटत नाही म्हणून मूल नको हे ही एक कारण असते. मूल असेल तर घटस्फोट घेणे अवघड जाते. मुलाचे संगोपन व जबाबदारी हा एक महत्वाचा व अतिरिक्त मुद्दा विचारात घ्यावा लागतो. तसेही मूल म्हणजे म्हातारपणाची काठी ही अंधश्रद्धा आहे हे लोकांना आता पटू लागले आहे.
आता काळ खूप झपाट्याने बदलतोय.. कौटुंबिक, सामाजिक परिस्थिती खूप वेगाने बदलली/बदलते आहे. जनरेशन गॅप ही झपाट्याने वाढली आहे. म्हणजे माझे पणजोबा व माझे आजोबा यांच्यातही जनरेशन गॅप असेलच पण त्यापेक्षा माझे आजोबा व माझे वडील यांच्यात असलेली जनरेशन गॅप जास्त असेल व माझे वडील व माझ्यात असलेली जनरेशन गॅप अजूनच जास्त.

In reply to by प्रकाश घाटपांडे

तसेच विवाहापेक्षा लिव्ह इन हा पर्याय जरा आकर्षक वाटू लागला आहे. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली हा पर्याय जरा बरा वाटू लागला आहे.
लोक स्वतःशीच विवाह करु लागलेत आता तर.लिव इन ही जुने झाले कि काय असे वाटु लागलेय. म्हणजे मुले नको म्हणुन लग्न नको.पण आता काही जबाबदारीच नको म्हणुन स्वत:शीच विवाह करा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

विवाहापेक्षा लिव्ह इन हा पर्याय पुरुषासाठी आकर्षक आहे पण स्त्रियांसाठी अजिबात नाही. कारण मैत्रीणीचे वय वाढू लागले कि तिला सोडून देऊन नवी मैत्रीण करणे पुरुषाला सोपे जाते पण वय वाढणाऱ्या स्त्रीला कोणती सुरक्षितता मिळते? पुरुष स्त्रीचे रूप पाहतो तर स्त्री हि पुरुषात सुरक्षितता पाहते. मूल झाले तर त्यात स्त्रीची भावनिक गुंतवणूक पुरुषापेक्षा कितीतरी जास्त असते. त्यामुळे मुलाला टाकून जाणारी आई दुर्मिळ असते तर बायको मुलांना सोडून देणारें पुरुष कितीतरी असतात. यामुळे लिव्ह इन हा पर्याय सर्व सामान्य स्त्रियांसाठी सर्वथा गैरसोयीचा आहे. ९० वर्षांपूर्वी श्री र धों कर्वे यांनी लिहून ठेवले आहे कि बहुतांश स्त्रिया "चरितार्था"साठी लग्न करतात. १०० वर्षांपूर्वीच कशाला आजमितीला सुद्धा स्त्रियांना चरितार्थाचे मार्ग पुरुषांपेक्षा नक्कीच कमी उपलब्ध आहेत.

In reply to by सुबोध खरे

कारण मैत्रीणीचे वय वाढू लागले कि तिला सोडून देऊन नवी मैत्रीण करणे पुरुषाला सोपे जाते पण वय वाढणाऱ्या स्त्रीला कोणती सुरक्षितता मिळते?
तत्वतः असहमत. समजा पंचविशीतले स्त्री व पुरुष लिव्ह इन मध्ये एकत्र राहू लागले आणि चाळिशीमध्ये पुरुषाला ती स्त्री जोडीदार अनाकर्षक वाटू लागली तर नव्या मैत्रिणीसाठी दोन पर्याय असतील १) चाळिशीतील दुसरी स्त्री - एकतर चाळिशीतील एक स्त्री सोडून चाळिशीतीलच दुसर्‍या स्त्रीशी सख्य करण्यात काय प्रेरणा असणार ? पण तरी समजा त्याने अशी जोडी जमवलीच तर त्याचा अर्था त्या दुसर्‍या स्त्रीचेही आधीच्या एका चाळिशीतल्या पुरुषाशी नाते तुटले आहे (तिने त्याला सोडले की त्याने तिला सोडले हा भाग वेगळा) म्हणजेच आता नात्यात नसलेली चाळिशीतली पहिली स्त्री आणि दुसरा पुरुष आहेत. कदाचित ते एकत्र येवू शकतील किंवा येणारही नाहीत. पण एकूणात नात्यात असलेल्या चाळिशीतल्या पुरूषांची संख्या = नात्यात असलेल्या चाळिशीतल्या स्त्रियांची संख्या असेल आणि नात्यात नसलेल्या चाळिशीतल्या पुरूषांची संख्या = नात्यात नसलेल्या चाळिशीतल्या स्त्रियांची संख्या असेल २) पंचविशीतील दुसरी स्त्री - पंचविशीतील स्त्री चाळिशीतील पुरुषाला लाभेल ही शक्यता कमीच आणि तसे झाले तरी त्यामुळे पंचविशीतील एका पुरुषाला जोडीदार मिळणार नाही. एकतर त्याला मग चाळिशीतील स्त्रीशी जोडीदार नसलेल्या स्त्रीशी जोडी जमवावी लागेल किंवा एकटे रहावे लागेल.
मूल झाले तर त्यात स्त्रीची भावनिक गुंतवणूक पुरुषापेक्षा कितीतरी जास्त असते. त्यामुळे मुलाला टाकून जाणारी आई दुर्मिळ असते तर बायको मुलांना सोडून देणारें पुरुष कितीतरी असतात.
सहमत.
यामुळे लिव्ह इन हा पर्याय सर्व सामान्य स्त्रियांसाठी सर्वथा गैरसोयीचा आहे.
अर्थार्जन करणार्‍या स्त्रियांसाठी ठीक आहे पण कौटुंबिक व सामाजिक आघाड्यांवरचा विरोध विचारात घ्यावा लागेल. अर्थार्जन न करणार्‍या स्त्रियांकरिता बहुतांशी अयोग्य पर्याय आहे. अपत्य हवी असल्यासही बहुतांशी अयोग्य (भारतीय समाजाचा विचार करुन)

In reply to by तर्कवादी

मूलभूत फरक लक्षात घ्या पंचविशीतील तरुण केवळ पंचविशीतीलच नव्हे तर १८ पासून वरच्या वयोगटातील स्त्रीबरोबर लिव्ह इन मध्ये राहतो. जगभरात पुरुष वयाने जास्त आणि स्त्री वयाने कमी अशी बहुतांश लग्ने होतात. तेंव्हा चाळीशीच्या माणसाला चाळीशीचीच मैत्रीण असेल/असावी हा मुद्दा गैरलागू आहे. चाळीशीचा माणूस आर्थिक स्थैर्य असेल तर विशी पंचविशीच्या स्त्री बरोबर लिव्ह इन राहील? परंतु तिशीचा माणूस उगाच चाळीशी पंचेचाळिशीच्या स्त्रीबरोबर लिव्ह इन कशाला राहील? याशिवाय व्यवहारात स्त्री पुरुष १:१ हे प्रमाणच चूक आहे अन्यथा एकाच माणसाच्या चार बायका आणि बरेच पुरुष लग्नावाचून राहणे असे दिसले नसते. पुरुष एक बायको आणि अनेक अंगवस्त्रासहित सहज नांदू शकतो. उदा थायलंडचा राजा बायका आणि अंगवस्त्रांसह कोव्हीड मध्ये जर्मनीत जाऊन विलगीकरणात राहिलेला आहे. King Maha Vajiralongkorn of Thailand goes into isolation with his harem of 20 concubines in Germany, books an entire luxury hotel https://www.opindia.com/2020/03/thailand-king-isolation-20-concubine-ha… पण किती बायका एकाहून अधिक नवरे आणि अधिक "ठेवलेले" पुरुष तुम्हाला दिसतात

ज्यांना मुले नको आहेत किंवा तत्सम विचार आहे त्यांनी येथे आपले मत नोंदवायला हरकत नाही. United Nations: Save the Earth – Global Birth Stop! https://www.change.org/p/united-nations-introduce-obligatory-world-wide… अधिक जनसंख्या - दुनिया भर में जन्म नियंत्रण को तत्काल आवश्यक करे https://www.change.org/p/united-nations-overpopulation-%E0%A4%85%E0%A4%…

हा लेख वाचून आपल्या ओळखीतल्या आणि नातेवाईकांच्या परिवारांकडे पाहिले. एक गोष्ट जाणवली गेल्या प्रत्येक पिढीत राहणीमान पूर्वीपेक्षा जास्त वाढत गेले त्याच बरोबर मुले जन्म घालण्याची इच्छा कमी होत गेली. उदाहरण आमचे आजोबांची पिढी 1925 च्या आधी जन्मलेले घरात 4 ते 8 मुले सामान्य बाब. 1925 ते 50 च्या आमच्या वडिलांची पिढी घरात 2 ते 5 मुले. 1950-75 ते आमची पिढी घरात 1 ते 2. 1975... नंतर जन्मलेली 0 ते 1. अनेकांच्या घरात मूल नाही पण पाळीव कुत्रे आहेत, हे ही विशेष

In reply to by विवेकपटाईत

मुले कमी होण्याचं कारण राहणीमान वाढत गेले पेक्षा संतती नियमनाची साधने जितक्या सुलभ पणे उपलब्ध झाली तितके मुले कमी होण्याचे प्रमाण वाढले. मुले एक किंवा दोन असली कि तुम्हाला पालकत्वाचे सुख आणि अनुषंगिक फायदे मिळतात आणि त्यापेक्षा जास्त झाली कि हे फायदे त्या पटीत न मिळत उगाच भारं भार मुलांचा खर्च बोडक्यावर बसतो. लेकुरे उदंड जाहली तो ते लक्ष्मी सोडून गेली हे समर्थ रामदास स्वामींचे वाचन ३५० वर्षापूर्वोचे आहे

In reply to by सुबोध खरे

मुले कमी होण्याचं कारण राहणीमान वाढत गेले पेक्षा संतती नियमनाची साधने जितक्या सुलभ पणे उपलब्ध झाली तितके मुले कमी होण्याचे प्रमाण वाढले.
संतती नियमनाच्या साधनापैक्षा मुले जगण्याची शक्यता वाढली आणि अकाली मृत्युचे प्रमाण घटले ही कारणे जास्त कारणीभुत आहेत.

In reply to by Trump

संतती नियमनाच्या साधनापैक्षा मुले जगण्याची शक्यता वाढली आणि अकाली मृत्युचे प्रमाण घटले ही कारणे जास्त कारणीभुत आहेत.
हेच म्हणणार होतो.

In reply to by Trump

वस्तुस्थिती या उलट आहे. मुले जगण्याची शक्यता वाढली आणि अकाली मृत्युचे प्रमाण घटले यामुळे आपली लोकसंख्या काहींच्या काही वाढली. मुलांचे प्रमाण अजिबात कमी झाले नाही The main reasons for the large growth in population in India are: (i) decline in the death rates and (ii) a persistently high birth rate. The decline in the death rate has come about due to an increase in life expectancy https://www.yourarticlelibrary.com/population/reasons-for-population-gr…

डॉ. खरे साहेब
मूल होत नाही म्हणून आम्हाला मूलच नको सांगणारे असतात परंतु त्यांच्या सांगण्याच्या मागे एक नैराश्याची किंवा दुःखाची किनार असते. आणि हि मनोवृत्ती आपल्या दुःखावर झाकण टाकून ते दडवण्याची आहे आणि त्यात काही चूक आहे असेही मी मानत नाही.
ही एक शक्यता तर आहेच. पण या विरुद्ध शक्यताही अस्तित्वात असू शकते. म्हणजे "आम्हाला मूल नकोय " असे समोरच्याला सांगितले तर त्यांच्या मनात आपल्याबद्दल काय प्रतिमा निर्माण होईल ? ते आपल्याला अगदीच स्वार्थी / चंगळवादी समजतील की काय या भितीपोटी "मूल होत नाहीये / झाले नाही" असे सांगितले जाण्याची पण शक्यता आहे. अर्थात हे खोटे फक्त ज्यांच्याशी फारसा निकटचा संबंध नाही त्यांच्यापुरते.. जवळच्या लोकांना सत्य ठावूक असतेच.

In reply to by तर्कवादी

ते आपल्याला अगदीच स्वार्थी / चंगळवादी समजतील की काय या भितीपोटी "मूल होत नाहीये / झाले नाही" असे सांगितले जाण्याची पण शक्यता आहे. ज्या जोडप्यांमध्ये बेबनाव असतो ते सुद्धा आपल्या आईवडिलांना न सांगता मूल होण्याचा निर्णय लांबणीवर टाकतात आणि आईवडिलांच्या समाधानासाठी "मूल होत नाही" असे सांगताना पाहिले आहे. सासूच्या आग्रहावरून वंध्यत्वाच्या उपचारांसाठी आलेल्या मुली मी पाहिल्या आहेत. कारण स्त्रीबीज तयार होण्याच्या वेळेस "संबंध" ठेवा म्हणून सांगितले असताना मुली आम्हाला सध्या मूल नको आहे असे खाजगी मध्ये सांगतात. नवरा बायको मध्ये शरीर संबंधच नसेल तर मूल कसे होणार ? जगात सर्व तर्हेचे लोक पाहायला मिळतात.

डॉक्टर साहेब, "हिन्दी भाषेत एक म्हण आहे "99 का फेर " . एकदा राहणीमान वाढू लागले की अधिकची इच्छा होतेच. भरपूर कष्ट करून सर्व संकटांपासून मुलांना दूर ठेवणार्‍या आमच्या पिढीने संतती नियमनाची साधने वापरली. एक किंवा दोन पेक्षा जास्त मुलांना जन्म दिला नाही. अनेकांनी मुलांना उत्तम शिक्षा देण्यासाठी बंकांकडून शिक्षणासाठी कर्ज घेतले. आजची पिढीला मूल म्हणजे प्रतिष्ठेनुसार भरपूर खर्च आणि मौज मस्तीत कमी. परिणाम एक ते शून्य.

In reply to by विवेकपटाईत

आजची पिढीला मूल म्हणजे प्रतिष्ठेनुसार भरपूर खर्च आणि मौज मस्तीत कमी. हे फारच सरसकटीकरण आहे

तर्कवादी आणि धर्मराजमुटके यांचे प्रतिसाद आवडले. उत्तम चर्चा सुरु आहे. रोचक मते आणि त्याला उत्तम प्रतिवाद केला जात आहे ! ✔️ दॅट्स मिपा !

In reply to by चौथा कोनाडा

तर्कवादी आणि धर्मराजमुटके यांचे प्रतिसाद आवडले.
धन्यवाद चौथा कोनाडा जी..
उत्तम चर्चा सुरु आहे.
संपली आता बहुतांशी ..:) नवीन काही मुद्दे आलेत तर होईल पुन्हा सुरू