Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सुबोध खरे on Fri, 08/19/2022 - 12:36
डिंक डिंक म्हणजे DINK (double income no kids) दुहेरी उत्पन्न आणि मूल नसणे. हा एक चर्चेचा विषय आहे आणि याबद्दल मिपावर धागा काढण्याबद्दल चर्चा झाली होती. ते वाचूनच मी हि सुरुवात करतो आहे. सध्या बऱ्याच स्त्रिया नोकरी व्यवसाय करू लागल्या आहेत त्यामुळे आर्थिक उत्पन्नाचा आणि स्त्रियांच्या स्वावलंबित्वाचा स्तर वाढत आहे हि एक सकारात्मक बाब आहे. यामुळे काही जोडप्यांची आपल्याला मूल नको अशी मनोवृत्ती होती / होत आहे किंवा झाली आहे. पूर्वी फारशा स्त्रिया नोकरी व्यवसाय करत नव्हत्या. त्याबद्दल समाजाची मनोवृत्ती सुद्धा तयार झालेली नव्हती. चूल आणि मूल हे स्त्रीचे कार्यक्षेत्र अशी समाजाची मानसिकता होती यामुळेच आपल्याला मूल नकोच अशी धारणा किंवा धाडस करणाऱ्या स्त्रिया नगण्य होत्या. आता उत्पन्नाची साधने सुद्धा उपलब्ध झाली असल्यामुळे आपल्या करियरला वाव मिळू शकतो आणि आपणही वेगवेगळ्या क्षेत्रात चमकू शकतो याची जाणीव स्त्रियांना झाल्यामुळे मूल नको हा चॉईस (निवडण्याचा हक्क) आपल्याला उपलब्ध आहे हि जाणीव सुद्धा स्त्रियांना होते आहे हि एक सकारात्मक बाब आहे. या सर्व गोष्टी मी लिहिण्याचे कारण मूल हवे हि नैसर्गिक उर्मी स्त्रियां मध्ये जास्त असते आणि समाज सुद्धा मुलांना जन्म देणे आणि त्यांचे संगोपन करणे हि स्त्रीजन्माची इतिकर्तव्यता आहे आणि मातृत्व हा एक उच्च दर्जाचा त्याग ( आणि स्त्री हि त्यागमूर्ती) असे समजतो. या धारणेचा जबरदस्त पगडा अनेक स्त्रियांच्या डोक्यावर असतो आणि मूल नको असे म्हणणे हा स्त्रीत्वाचा अपमान होईल अशी भीती त्यांना वाटत असते. कायदा सुद्धा जाणीवपूर्वक आईला मुलांचा नैसर्गिक पालक समजतो. अशा अनेक गोष्टींमुळे आपल्याला मूल नको हे जाणीवपूर्वक ठरवणाऱ्या जोडप्यांमध्ये स्त्रियांवर मानसिक ताण सुद्धा कुटुंबाकडून आणि समाजाकडून जास्त दिला जातो. यात समाजातील आणि कुटुंबातीलच स्त्रियांचा वाटा जास्त असतो. ज्यांना मूल होत नसतं अशी जोडपी सुरुवातीला आम्ही प्लॅनिंग करतो आहोत असे सांगतात. काही काळाने आम्हाला मूल होत नाही असे सांगण्यापेक्षा आम्हाला सध्या मूल नको असे सांगणे ते पसंत करतात. त्यात आम्हाला मूलच नको असे सांगणे सुद्धा काही जणांना फॅशनेबल वाटते. येथे चर्चा मूल नको हे जाणीवपूर्वक ठरवतात त्याबद्दल आहे. मूल होत नाही म्हणून आम्हाला मूलच नको सांगणारे असतात परंतु त्यांच्या सांगण्याच्या मागे एक नैराश्याची किंवा दुःखाची किनार असते. आणि हि मनोवृत्ती आपल्या दुःखावर झाकण टाकून ते दडवण्याची आहे आणि त्यात काही चूक आहे असेही मी मानत नाही. परंतु आम्हाला मूल होत नाही आणि दत्तक घेण्याची प्रक्रिया दुर्दैवाने अत्यंत किचकट असल्याने सुरुवातील दत्तक घेण्यास तयार झालेली जोडपी प्रत्यक्ष दत्तक घेण्याच्या वेळपर्यंत या प्रकाराला विटलेली मी अनेकदा पहिली आहेत. (अनेक वर्षे वंध्यत्व शास्त्रात काम केल्यावर आलेल्या असंख्य अनुभवावर मी असे लिहित आहे अर्थात माझेच अनुभव बरोबर किंवा सर्वोत्तम असा माझा कोणताही दावा नाही) लग्न झाले कि एक दोन वर्षात आता "एखादं मूल होऊन जाऊ द्या" असा धोशा मुलीच्या आई/ सासूकडून लावला जातो. अशा वेळेस आम्हाला कधीच मूल नको आहे असे ठामपणे सांगण्याची हिम्मत करणारी जोडपी फारच विरळ आहेत. बरीचशी जोडपी सध्या तरी मूल नको असे सांगताना आढळतात. हि अर्थात पळवाट असतेच असे नाही पण उगाच आताच वाद कशाला हा विचार असतो. बऱ्याच जोडप्यांची वृत्ती अजून ठाम आणि स्थिर झालेली नसते. त्यांना काही वेळ जाऊ दे मग परत विचार करू असेहि वाटत असते. परंतु काही जोडपी आता लग्नाच्या वेळेसच आपल्याला मूल कधीच नको अशी भूमिका घेताना दिसतात हि एक सकारात्मक गोष्ट आहे. कारण अगोदर असे स्पष्टपणे सांगण्याची हिम्मत नसणे हे स्त्रियांच्या बाबतीत जास्त करून दिसते. माझ्या बरोबरच एम डी करणारी एक हुशार मुलगी असे करू शकली नाही आणी लग्न झाल्यावर तिने नवऱ्याला सांगितले. यामुळे त्यांचा घटस्फोट झाला परंतु हि प्रक्रिया दोघांना मानसिक दृष्ट्या फारच कष्टाची गेली. नवऱ्याला आपण कायम फसवले गेल्याची भावना होत होती आणि तिला आपण नवऱ्याला फसवल्याची खंत वाटत होती. परंतु घटस्फोटानंतर मात्र तिने आपल्या करियर कडे लक्ष केंद्रित केले आणि ती एका मोठ्या वैद्यकीय संस्थेत विभागप्रमुख म्हणून यशस्वीरीत्या काम करते आहे. आपल्याला मूल नको याची कारणे अशा काही जोडप्याना विचारली असता खालील कारणे त्यांनी मला सांगितली १) काही जोडप्यानी दोघांचे करियरचा आलेख चढता आहे त्यात आम्ही मुलाला वेळ देऊ शकणार नाही. मग मुलावर अन्याय करण्यापेक्षा आम्ही मूल नको असा निर्णय घेतला. यात काही जोडप्यानी सुरवातीला करियर साठी मूल लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आणि नंतर सुरळीत चाललेले करियर आणि संसार यात अडचणी आणण्यापेक्षा "आहे ते चांगले आहे" असा विचारपूर्वक निर्णय घेतला. २) एक जोडप्याने असेही सांगितले कि लोकसंख्या प्रचंड वाढलीआहे, त्यामुळे भुईला भार जास्त झाला आहे. अशात आम्ही अधिक भर घालणे आम्हाला पटत नाही ३) काही जोडप्यांमध्ये नवऱ्याला मुलांची फारशी आवड नव्हती आणि बायकोला मुलासाठी एवढे कष्ट काढणे किंवा वेळ देणे परवडणारे नव्हते. ४) काही जोडप्यांची त्यांना अध्याहृत असणाऱ्या सुखसोयी आपण मुलाला देऊ शकत नाही त्यामुळे मुलावर अन्याय करण्यापेक्षा त्याला जन्मच न देणे बरोबर वाटत होते. ५) काही लोकांना सुरुवातीला मूल हवे होते पण ते होत नव्हते. पण कालांतराने त्यांना दोघेच राहायची सवय झाली आणि आता यातून वेगळा विचार करण्यापेक्षा आहे ते चांगले आहे असेच वाटते आहे. ६) एका स्त्रीला लहान सात (रांगेने पाच बहिणी आणि नंतर दोन भाऊ) भावंडे होती आणि कळायला लागल्यापासून केवळ अपत्य( भावंड) संगोपनात आयुष्य गेल्यावर तिला आता परत त्या गोष्टीची शिसारी आली होती. हि सर्व उदाहरणे नवरा बायको दोन्ही जण नोकरी किंवा व्यवसाय करुन अर्थार्जन करत असलेल्या जोडप्यांची आहेत. आणि यातील बहुसंख्य जोडप्यांची हा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे असे जाणवले. त्यांना उद्या म्हातारपणी तुम्हाला कोण सांभाळेल याची भीती वाटत नाही का? असे विचारल्यावर बहुसंख्य जोडप्यांची हेच सांगितले कि आजूबाजूला ज्यांची मुले परदेशात आहेत किंवा दूर गावी राहत आहेत ते काय करतात? मुले असली तरी वृद्धपणी एकटेच राहाणारे असंख्य वरिष्ठ नागरिक आपण आजूबाजूला पाहतोच कि हेही सांगितले. तुम्हाला आपले स्वतःचे रक्ताचे कुणीतरी असावे असे वाटत नाही का? असे विचारल्यावर बहुतांशी लोकांनी कधीतरी वाटते पण तेवढ्यासाठी आपले स्वतःचे मूल जन्माला घालून पुढची १८-२० वर्षे त्यासाठी द्यायची तयारी नसल्याचे सांगितले. एक सकारात्मक गोष्ट म्हणजे बहुसंख्य जोडप्याचा निर्णय हा विचारपूर्वक आणि दोन्ही कडचा विचार करून घेतलेला होता आणि त्याबद्दल त्यांना वाईट वाटणे खंत वाटणे( guilty) असे वाटत नव्हते. परंतु बहुसंख्य जोडप्यांच्या आईवडिलांना हा निर्णय पसंत नसल्याचेही त्यांनी सांगितले आणि यामुळे आईवडिलांशी काही काळ विसंवाद झाल्याचे सांगितले. यात बहुसंख्य स्त्रियांच्या आई किंवा सासूने त्यांच्या निर्णयाला विरोध केल्याचे सांगितले. काही जोडप्यांची मात्र आपल्या एका पालकांनी आपल्याला सपोर्ट केल्याचे आवर्जून सांगितले. हि यादी संपूर्ण नाही किंवा परिपूर्ण आणि बिनचूक नाही. तसा माझा दावा हि नाही. पण हे मला आलेले अनुभव प्रातिनिधिक समजता येतिल
  • Log in or register to post comments
  • 32089 views

प्रतिक्रिया

Submitted by सुबोध खरे on Fri, 08/19/2022 - 19:10

Permalink

र धों कर्वे हे विसाव्या

र धों कर्वे हे विसाव्या शतकाच्या सुरुवातीस जगाच्या निदान १०० वर्षे पुढे होते. त्यांनी स्त्रियांना स्वतःला कामसुखाचा अधिकार आहे ह्या बद्दल तेंव्हा काम केलेले आहे. त्याकाळात स्त्री हि क्षणाची पत्नी आणि अनंत कालची माता आहे या विचारसरणी च्या पगड्याखाली समाज होता ( हे खरं तर आचार्या अत्रे यांच्या नाटकातील वाक्य आहे). त्यांनी लोकसंख्या नियंत्रण आणि संतती नियमनाचे महत्व "तेंव्हा" सांगायला सुरुवात केली होती जेंव्हा मुलं हि देवाघरची वरदान समजले जात होते. ज्या काळात स्त्रियांना अर्थार्जनाचे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते तेंव्हा स्त्रीच्या कामसुखाच्या अधिकारांची मागणी करणे हे अब्रम्हण्यम होते. असो. अशी विनापत्य जोडपी अनेक आहेत परंतु त्यांनी जाणीव पूर्वक मूल नको असा निर्णय घेतला होता का हे माहिती नाही. उदा. श्री पु ल देशपांडे हे विनापत्य होते. परंतु त्यांच्या पत्नीला एक गर्भपात झाला आणि नंतर मूल झाले नाही असे सुनीताबाई यांच्या आत्म चरित्रात आहे. अशी माहिती पुढे येणे सर्वांच्या बाबतीत कठीण आहे. मी सुरुवातीलाच लिहिले आहे कि मूल होत नसेल तर मला मूल नकोच असे म्हणणे सोयीस्कर असते. त्यात मानसशास्त्रीय दृष्ट्या चूक आहे असेही नाही. पण येथे चर्चा जाणीवपूर्वक मूल नको याची आहे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Sat, 08/20/2022 - 12:23

Permalink

वैयक्तिक मत

वैयक्तिक मत - हे डिंन्क वगैरे मला वैयक्तिकदृष्ट्या अजिबात पटत नाही. पोरं पाहिजेत राव . पोरं जितक्या निष्पापपणे निरपेक्षपणे प्रेम करतात तितके प्रेम तर मला आई वडीलांनीही केले नाही असे वाटते. आज्जी आजोबांनीही अगदी जीवापाड प्रेम केले पण तरीही पोरं जे प्रेम करतात त्याची सर नाही . पोरं म्हणजे अ‍ॅब्सोल्युट ब्लिस चा सोर्स असतात. आणि आमच्या सुदैवाने (किंव्वा तरुणवयातील योग्य चॉईसमुळे म्हणा ), सौं.चे ह्यावर एकमत आहे त्यामुळे त्यांनी करीयर फाट्यावर मारुन पुर्णवेळ मुलांची जबाबदारी स्विकारली आहे . अगदी स्वेछेने अन आनंदाने !! त्यामुळे आमच्या कडे SIDK सिंगल इन्कम डबल किड्स असा पॅटर्न आहे :) मला अजुनही वाटते की अजुन दोन मुले असायला हवीत , पण त्याला मात्र कडाडुन विरोध आहे . मी म्हणलं टेंशन घेऊ नका , मी "आऊटसोर्स" करतो , तर "तू करुन दाखवच " असे चॅलेंज कम धमकी मिळाली आहे, त्यामुळे तुर्तास तरी दहशतीखाली जगत आहे. =)))) पण ठीक आहे नंतर बघु , पुरुषांना एक्स्पायरी डेट नसते ;) बाकी डिंक विषयी माझ्यामनात अढी नाही. ज्याच्या त्याचा वैयक्तिक चॉईस आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Sat, 08/20/2022 - 12:58

In reply to वैयक्तिक मत by प्रसाद गोडबोले

Permalink

तू करुन दाखवच

मला अजुनही वाटते की अजुन दोन मुले असायला हवीत , पण त्याला मात्र कडाडुन विरोध आहे . मी म्हणलं टेंशन घेऊ नका , मी "आऊटसोर्स" करतो , तर "तू करुन दाखवच " असे चॅलेंज कम धमकी मिळाली आहे, त्यामुळे तुर्तास तरी दहशतीखाली जगत आहे. =)))) पण ठीक आहे नंतर बघु , पुरुषांना एक्स्पायरी डेट नसते ;)
तुला(/तुम्हाला) बाळंतपणाचा त्रास होउ नये म्हणुन मी असे केले असे तुम्ही कारण द्यायला हवे होते. तुम्ही आधीच सगळे पत्ते दाखवल्यावर आता काय होणार!!
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on Sat, 08/20/2022 - 13:18

In reply to वैयक्तिक मत by प्रसाद गोडबोले

Permalink

'कावळ्याच्या घरट्यात कोकिळेची अंडी'

मी म्हणलं टेंशन घेऊ नका , मी "आऊटसोर्स" करतो
'कावळ्याच्या घरट्यात कोकिळेची अंडी' हा निसर्गनियम आहे, फक्त मनुष्यप्राण्यांनी असे केल्यास त्याची वाच्यता करायची नसते, नाहीतर अनर्थ ओढवतो 😀 कावळे (की कावळीण) बिचारे आपलीच समजून उबवतात... चालायचंच 😜 बाकीच्या प्रतिसादातले तुमचे मत 'वैयक्तिक मत' असल्याने 'नो कॉमेंट्स' 🤫
  • Log in or register to post comments

Submitted by Bhakti on Sat, 08/20/2022 - 13:28

In reply to वैयक्तिक मत by प्रसाद गोडबोले

Permalink

मला अजुनही वाटते की अजुन दोन

मला अजुनही वाटते की अजुन दोन मुले असायला हवीत , अगदी!पण हा प्रकार नका सुचवू ओ (हे हे) मला तर डिंक म्हणजे केवळ प्रेमाच्या डिंकाने चिकटलेल्या या जोडप्यांचे कौतुकच वाटतयं :)दोन मुलं असताना घटस्फोट घेणार्या लोकांना यांचा आदर्श दाखवावा.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्कवादी on Sun, 08/21/2022 - 23:56

In reply to मला अजुनही वाटते की अजुन दोन by Bhakti

Permalink

मला तर डिंक म्हणजे केवळ

मला तर डिंक म्हणजे केवळ प्रेमाच्या डिंकाने चिकटलेल्या या जोडप्यांचे कौतुकच वाटतयं
धन्यवाद भक्ती जी खरंतर मुल नसल्याने नवरा बायकोत (तसेच सासू-सासरे -मुलगा -सुन यांच्यातही ) मतभेदाचे अनेक मुद्देही वजा होतात. मुल वाढवताना घरात अनेक मुद्द्यांवर अनेकदा कलह होतो. मूल असताना पती-पत्नी मुलांची काळजी घेताना जोडीदाराकडे काहीवेळा दुर्लक्षही करतात. घरात जेवण बनते ते जास्तकरुन मुलांच्या आवडीचे. त्याउलट मूल नसले की पती-पत्नी एकमेकांची जास्त काळजी घेतात, एकमेकांच्या आवडी-निवडीकडे लक्ष देतात.
  • Log in or register to post comments

Submitted by Bhakti on Sat, 08/20/2022 - 13:28

In reply to वैयक्तिक मत by प्रसाद गोडबोले

Permalink

मला अजुनही वाटते की अजुन दोन

मला अजुनही वाटते की अजुन दोन मुले असायला हवीत , अगदी!पण हा प्रकार नका सुचवू ओ (हे हे) मला तर डिंक म्हणजे केवळ प्रेमाच्या डिंकाने चिकटलेल्या या जोडप्यांचे कौतुकच वाटतयं :)दोन मुलं असताना घटस्फोट घेणार्या लोकांना यांचा आदर्श दाखवावा.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Sat, 08/20/2022 - 15:18

Permalink

वाचनीय धागा आणि चर्चा.

वाचनीय धागा आणि चर्चा. मला आठवतंय "अपत्य नको" अशी संस्था आहे आणि पुण्यात त्याची शाखा आहे. वेब साईट पण आहे. (नाव आठवत नाहीय) ठराविक काळाने एकत्र भेटून एकमेकांना सपोर्ट करतात, "मुल नको" मोहिमेचा चा प्रचार करतात.
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on Sat, 08/20/2022 - 16:34

In reply to वाचनीय धागा आणि चर्चा. by चौथा कोनाडा

Permalink

"अपत्य नको" अशी संस्था आहे आणि पुण्यात

"अपत्य नको" अशी संस्था आहे आणि पुण्यात त्याची शाखा आहे.
🤦‍♂️ ह्या साठी संस्था? पुणे तिथे काय उणे 😀
ठराविक काळाने एकत्र भेटून एकमेकांना सपोर्ट करतात
इंटरेस्टिंग! नक्की कसला (डोंबलाचा) सपोर्ट करतात हे जाणून घ्यायची उत्सुकता निर्माण झाली आहे 😀
"मुल नको" मोहिमेचा चा प्रचार करतात.
भयंकर प्रकार आहे मग हा! हे म्हणजे 'आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना' सारखा प्रकार झाला. मूल नको हा अत्यंत खाजगी/वैयक्तिक निर्णय असतो, त्याची मोहीम राबवतात हे लोकं? आणि असला प्रचार ही समाज विघातक कृती म्हणता येऊ शकेल. वरती तर्कवादिंनी कुठल्या तरी फेसबुक ग्रुपचा उल्लेख करून ते त्याचे सभासद असल्याचे म्हंटले आहे ते वाचून मला थोडं विचित्र वाटलं होतं, पण असल्या संस्थेबद्दल वाचल्यावर तर फारच विचित्र वाटलं!
  • Log in or register to post comments

Submitted by तर्कवादी on Mon, 08/22/2022 - 17:03

In reply to "अपत्य नको" अशी संस्था आहे आणि पुण्यात by टर्मीनेटर

Permalink

समविचारी समूह / आधार गट

टर्मीनेटरजी
आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना' सारखा प्रकार झाला. मूल नको हा अत्यंत खाजगी/वैयक्तिक निर्णय असतो, त्याची मोहीम राबवतात हे लोकं? आणि असला प्रचार ही समाज विघातक कृती म्हणता येऊ शकेल.
सहमत !! अशा कोणत्याही विचारांचा प्रचार करणे योग्य नाही. पण प्रचार म्हणजे "आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना" असा अर्थ नसेलही कदाचित. आता आपण या विषयावर व्यक्त होत आहोत. पण हे व्यक्त होणे म्हणजे प्रचार किंवा "या आमच्या कंपुत" अशी जाहिरातबाजी नाहीये तर लोकांना कळावे की हा ही विचार असतो हे ,ही पण एक जीवनशैली असू शकते .ह्याची जाणीव (अवेअरनेस) इतकाच उद्देश आहे. लोकांना हे कळणे तरी का महत्वाचे आहे ह्याबद्दल मी याच प्रतिसादात नंतर लिहितो.
नक्की कसला (डोंबलाचा) सपोर्ट करतात हे जाणून घ्यायची उत्सुकता निर्माण झाली आहे
हो .. सपोर्ट काही वेळा गरजेचा असतो. तुम्हाला , मला कदाचित हा निर्णय घेवून तो अंमलात आणणे , त्यावर ठाम राहणे फारसे कठीण गेले नसेल पण इतरांना ते तितकेच सोपे असेल असे नाही. कुटूंबाचा , समाजाचा दबाव सतत विचारले जाणारे प्रश्न यांना तोंद द्यावे लागत असल्यास समविचारी लोकांचा मानसिक / भावनिक आधार मदतीचा ठरतो..
वरती तर्कवादिंनी कुठल्या तरी फेसबुक ग्रुपचा उल्लेख करून ते त्याचे सभासद असल्याचे म्हंटले आहे ते वाचून मला थोडं विचित्र वाटलं होतं, पण असल्या संस्थेबद्दल वाचल्यावर तर फारच विचित्र वाटलं!
मनात एखादा विचार असणे (या ठिकाणी 'मूल नको' हा विचार) आणि त्या विचाराचे निर्णयात रुपांतर होणे हा एक प्रवास आहे. सगळ्यांसाठीच तो सारखाच सोपा नसतो. त्यामुळे काहीजण विचार एक ,निर्णय दूसरा, कृती तिसरीच असं काहीतरी आयुष्य जगतात काही जण विचार करतात पण ते फर्स्ट मूव्हर प्रकारातले नसतात. कुणीतरी तो मार्ग चोखाळलाय असे दिसले की त्याचे अनुकरण करणे करण्याची हिंमत येते. आजही अनेकांना असा काही निर्णय मुद्दामपणे घेतला जावू शकतो हेच माहित नसेल त्यामुळे मनात विचार आला तरी तो कृतीत उतरविण्याची हिंमत होत नाही. त्यामुळे अतुल कुलकर्णींसारख्या प्रसिद्ध व्यक्तिंनी केलेला प्रचार , फेसबूक वरचे ग्रुप, इतर संस्था, मिसळपाववरचा धागा यांमुळे आलेला अवेअरनेस निर्णय घेण्यास साहायक ठरेल. तसेच समजा हा धागा वाचणार्या कुणीही व्यक्ती (आपल्या दोघांशिवाय) असा निर्णय घेणार नाहीत ..बहुतेकांना आधीच अपत्ये असतीलही. मग त्यांनी हा धागा वाचून काय उपयोग ? आणि आपल्या दोघांना या धाग्याची काय गरज असा प्रश्न पडू शकतो. तर त्याचे उत्तर मी असे देईन की इथल्या अनेक मिपाकर वाचकांना मुले असतील. उद्द्या कदाचित त्यांच्यापैकी कुणाच्या मुलांनी वा इतर जवळचे नातेवाईकांनी असा निर्णय घेतला तर त्यांना धक्का बसणार नाही. आपल्या मुलांना ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेवू शकतील. यासाठी हा अवेअरनेस मला महत्वाचा वाटतो. म्हणून मला कुणीही मुलांबद्दल प्रश्न विचारला तर मी थेट आणि स्पष्ट उत्तर देतो. समोरचा व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करेल मला स्वार्थी वगैरे असण्याचे लेबल लावेल काय असा विचार करत नाही ( अर्थात अशा समजण्याने मला फरकही पडत नाही म्हणा !!)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 08/20/2022 - 15:47

Permalink

करिअर मध्ये अडथळा येऊ नये

करिअर मध्ये अडथळा येऊ नये यासाठी अपत्यच नको हा एक विचार झाला. माझ्या एका ओळखीच्या मुलीने लग्नानंतर काही वर्षांनंतर अपत्य झाल्यास करिअरमध्ये अडथळा येऊ शकतो या विचाराने लग्नानंतर लगेच अपत्य होऊ देण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर १० व्या महिन्यातच तिला अपत्य झाले. नंतर दुसरी संधी न घेता तिने व्यावसायिक जीवनावर लक्ष केंद्रित केले. अनेक वर्षांपासून ती आपल्या कुटुंबासहीत अमेरिकेत स्थायिक झाली असून खूप मोठ्या पोस्टवर आहे. एकंदरीत तिचा निर्णय योग्य ठरला.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्कवादी on Sat, 08/20/2022 - 17:05

In reply to करिअर मध्ये अडथळा येऊ नये by श्रीगुरुजी

Permalink

करिअर मध्ये अडथळा येऊ नये

करिअर मध्ये अडथळा येऊ नये यासाठी अपत्यच नको हा एक विचार झाला
मला वाटते करिअर मध्ये अडथळा हे एखादे कारण असू शकते. पण ते तितकेच कारण नसते. किंवा तेच कारण आहे असे नसते. हे इतरांना वाटणारे थोडेसे एकांगी मत आहे. आणि "करिअर मध्ये अडथळा" जरी म्हंटले तरी ती मानसिकता बहूधा फक्त स्त्रीची (करिअर करणार्‍या) असायला हवी, पण पुरुषांची अशी मानसिकता का असू शकते ? हे सगळं फार वेगळं आहे. जरी इतरांना दुरुन तसं वाटत असेल तरी फक्त करिअर, दुहेरी उत्पन्न यापुरतं हे सीमित नाहीये. माझ्याबद्दल म्हणेन की मी करिअर मध्ये खूप काही तरी भव्य दिव्य केलंय असं नाही. एखादा छंद खूप मेहनतीने जोपासलाय असंही नाही, ना मी "पार्टी अ‍ॅनिमल" आहे, ना खूप जास्त भटकंती करतो.. खरं तर काहीच खूप करत नाही. पण उद्द्या माझ्या खात्यात शंभर कोटी रुपये येवून पडलेत तरी माझा याबाबतचा निर्णय बदलणार नाही. मला वीस-पंचवीस वर्षे त्या एका बंधनात स्वतःला बांधून घ्यायचं नाहीये. माझे एक काका आयुष्याच्या एका टप्प्यावर अचानकपणे संसाराच्या सर्व जबाबदार्‍या त्यागून ,घर सोडून गेलेत.मध्यम/कनिष्ठ मध्यमवर्गात मोडणार्‍या त्या कुटुंबात त्यांची अर्धशिक्षित पत्नी व तीन मुले होती. सर्वात मोठी मुलगी -म्हणजे माझी चुलत बहीण त्यावेळी फक्त चौदा वर्षाची होती. काकांनी असा निर्णय का घेतला ते मला माहित नाही. पण बहुतेक त्या टप्प्यावर त्यांना नात्यांचे बंध नकोसे वाटले असावेत. जर संसाराच्या बंधनात कायम बांधलेले राहू शकतो याची स्वतःबद्दल खात्री देता येत नसेल तर अशी नवनवीन बंधने निर्माण न करणेच ईष्ट.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sun, 08/21/2022 - 11:55

In reply to करिअर मध्ये अडथळा येऊ नये by तर्कवादी

Permalink

तर्कवादी

जर संसाराच्या बंधनात कायम बांधलेले राहू शकतो याची स्वतःबद्दल खात्री देता येत नसेल तर अशी नवनवीन बंधने निर्माण न करणेच ईष्ट.
संसारातील भवतापाने आपल्यात नंतर विरक्ती निर्माण होईल हे भाकित अगोदर कसे सांगता येईल? रामदासस्वामींची गोष्ट वेगळी होती.त्यांना बळ बळ बोहल्यावर चढवले होते. अध्यात्मिक प्रेरणे ने तुमच्या काकांनी संसारत्याग केला की अन्य कारणाने केला हे जाणून घेणे महत्वाचे ठरते.आयुष्याच्या उत्तरार्धात स्वतःच्या नव्याने शोध घेण्यासाठी देखील घटस्फोट कमी संख्येने का होईना पण होतात असे जेष्ठांचे लिव्ह इन या लोकसत्तेच्या सदरात वाचले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्कवादी on Sun, 08/21/2022 - 22:26

In reply to तर्कवादी by प्रकाश घाटपांडे

Permalink

संसारातील भवतापाने आपल्यात

संसारातील भवतापाने आपल्यात नंतर विरक्ती निर्माण होईल हे भाकित अगोदर कसे सांगता येईल?
खरंय नाही करता येणार बहूधा ..पण तरीही "मला प्रदीर्घकाळ अडकवणारी बंधने नकोयत" याचा थोडा जरी अंदाज आला तर त्या वाटेने न जाणेच ईष्ट नाही का ? आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर घटस्फोट होतात हे मान्यच पण प्रोढ -परिपक्व जोडीदार स्वतःची व्यवस्था लावण्यास समर्थ असू शकतो, कायद्यानेही काही तरतूदी आहेतच (पोटगी वगैरे) पण मुलांचे काय ? मुले अर्थिक व इतरही दृष्टीने आपल्या पालकांवर अवलंबून असतात.
अध्यात्मिक प्रेरणे ने तुमच्या काकांनी संसारत्याग केला की अन्य कारणाने केला हे जाणून घेणे महत्वाचे ठरते.
अध्यात्मिक प्रेरणा तर नव्हती पण कोण प्रेरणा वा कूठली प्रेरणा होती ते माहित नाही :) पण अर्थात कारण काही असो पुढे तीन मुलांची काय परवड झाली असेल याची कल्पना केली जावू शकते. विमा कंपन्यांनी अशा विरक्तीचा विमा पण उतरवायला हवा निदान कुटुंबावी परवड होणार नाही !!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sun, 08/21/2022 - 11:42

Permalink

अतुल कुलकर्णी यांनी

अतुल कुलकर्णी यांनी जाणीवपुर्वक मूल होउ दिल नाही. ज्या जगात मी त्याला सोडणार आहे ते जग जगण्याच्या लायकीच नसेल तर मग मी कशाला त्याला जन्माला घालू? हा विचार त्यांनी एका पर्यावरणाच्या पुस्तक प्रकाशनात बोलून दाखवला.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Sun, 08/21/2022 - 11:45

In reply to अतुल कुलकर्णी यांनी by प्रकाश घाटपांडे

Permalink

नमस्कार काका, कसे आहात?

नमस्कार काका, कसे आहात? ---------
ज्या जगात मी त्याला सोडणार आहे ते जग जगण्याच्या लायकीच नसेल तर मग मी कशाला त्याला जन्माला घालू?
बाकी हे जग जगण्याचे लायकीचे कधी होते ?
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Sun, 08/21/2022 - 13:24

In reply to अतुल कुलकर्णी यांनी by प्रकाश घाटपांडे

Permalink

ओह.. असे आहे तर..

ओह.. असे आहे तर.. असो, जास्त बोलत नाही नाहीतर धाग्याचा चद्दा, आपलं काशमीर होईल..
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Sun, 08/21/2022 - 22:40

In reply to अतुल कुलकर्णी यांनी by प्रकाश घाटपांडे

Permalink

इंटरेस्टिंग! हे जग त्याला

इंटरेस्टिंग! हे जग त्याला जगायच्या लायकीचे नाही, हे ह्यांनीच ठरवले!
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Sun, 08/21/2022 - 12:13

Permalink

ज्या जगात मी त्याला सोडणार

ज्या जगात मी त्याला सोडणार आहे ते जग जगण्याच्या लायकीच नसेल तर मग मी कशाला त्याला जन्माला घालू? हा थोडा अतिरेकी विचार वाटतो. अतुल कुळकर्णी एक प्रथितयश कलाकार आहेत. मी स्वता त्यांचा पंखा आहे. त्यांना या जगाने एवढे प्रेम,यश,धन,दौलत दिली त्या जगाला ते असे कसे काय म्हणू शकतात. या जगात मानाने जगता येण्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी, गुरुजनांनी किती कष्ट घेतले असतील. आज ते या जगात नसते.जर त्यांच्या आईवडिलांनी असाच काहीसा विचार केला असता तर? जग जसे आहे तसेच राहणार. आपल्याला आपले जग सुंदर बनवायचे आहे. मुल नको हा वैयक्तिक विचार आहे,त्यावर ठाम रहाणे फार कठीण. मुल असणे म्हणजे जबाबदारी अगदी असेच काही नाही,मुल नसेल तर मी करियर,करू शकते शकतो,छंद जोपासू शकतो हे ऐकावयास खुप चांगले वाटते पण खरेच तसे असेलही पण किती जणांसाठी.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sun, 08/21/2022 - 13:42

In reply to ज्या जगात मी त्याला सोडणार by कर्नलतपस्वी

Permalink

पर्यावरणीय आशय होता तो. इथे १०.०० नंतर पहा

  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on Sun, 08/21/2022 - 20:22

In reply to ज्या जगात मी त्याला सोडणार by कर्नलतपस्वी

Permalink

जग जसे आहे तसेच राहणार.

जग जसे आहे तसेच राहणार. आपल्याला आपले जग सुंदर बनवायचे आहे.
सौ बात की एक बात कही हैं आपने कर्नल साहब 👍
हा थोडा अतिरेकी विचार वाटतो. अतुल कुळकर्णी एक प्रथितयश कलाकार आहेत. मी स्वता त्यांचा पंखा आहे.
+१ अतुल कुलकर्णी आणि प्रकाश राज हे उत्तम अभिनेते आहेत तर अनुराग कश्यप हा दर्जेदार 'वास्तववादी' सिनेमे आणि वेब सिरीज पेश करणारा उत्तम दिग्दर्शक आहे असे माझे मत आहे आणि त्यांच्या ह्या कलागुणांचा मी पण पंखा आहे! पण हीच मंडळी आपले बलस्थान असलेले कलाक्षेत्र सोडून इतरत्र लुडबुड/वादग्रस्त वक्तव्ये करताना पाहिली की त्यांची खरोखर कीव येते. त्यामागे त्यांचा प्रसिद्धीच्या झोतात किंवा चर्चेत रहण्याचा उद्देश असुदे की समाजाप्रती आपली पोकळ बांधिलकी दाखवण्याचा उद्देश असुदे किंवा कुठला राजकीय अजेंडा राबवण्याचा वा नॅरेटिव्ह सेट करण्याचा हेतू असुदे त्याचे त्यांच्याच करिअरवर होणारे दुष्परिणाम समोर येऊ लागलेत. मोदींवर टीका केल्यामुळे मला हिंदी सिनेमांत कामे मिळणे बंद झाल्याचे रडगाणे प्रकाश राजने मागे गाऊन झाले आहे. नुकताच 'बॉयकॉट' ट्रेंड मुळे डब्यात गेलेल्या वादग्रस्त 'लाल सिंग चढ्ढा' ह्या चित्रपटाचे लेखक ह्या नात्याने जाणते-अजाणतेपणी अतुल कुळकर्णीही टिकेचे धनी होताना दिसत आहेत. (मी हा चित्रपट पाहिलेला नसूनही मला ह्यात त्यांचा काही दोष असेल असे आत्तापर्यंत वाटत नव्हते पण वर प्रकाश घाटपांडे साहेबांनी दिलेल्या व्हिडीओचे' ग्रेटाची हाक' हे शिर्षक वाचल्यावर मात्र काही डॉट्स जोडले जाऊन मनात शंकेची पाल चुकचूकली आहे) आणि परवाच (१९ ऑगस्ट२०२२) प्रदर्शित झालेल्या 'दोबारा' ह्या अनुराग कश्यप दिग्दर्शीत आणि तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाचे पहिल्याच दिवशी २०० पेक्षा अधिक चित्रपटगृहात पहिल्याच खेळा नंतर पुढचे खेळ रद्द होण्याची नामुष्की ओढवल्याची बातमी काल वाचनात आली, तर आत्ताच थोड्यावेळापूर्वी आता 'गँग्स ऑफ वासेपूर ३' काढावा की नाही अशा विचारात पडल्याची प्रतिक्रिया अनुराग कश्यपने काल एका मुलाखतीत दिल्याची बातमी वाचली. वर चर्चेत २ - ३ ठिकाणी लेखनविषयाशी संबंधित मुद्द्यावर अतुल कुलकरणींचे नाव आल्याने त्या मुद्द्यावर बोलणारच होतो पण तिकडेवळण्यापूर्वी ह्या प्रतिसादात बरेच विषयांतर झाले आहे (त्यात धागा भरकटवण्याचा बिलकुल उद्देश नव्हता) त्याबद्दल आधी मी धागाकर्ते खरे साहेबांची क्षमा मागतो. तर मूळ सांगायचा मुद्दा हा होता की अतुल कुलकर्णी हे एक सेलिब्रेटी आहेत. त्यांचे आयुष्य आपल्या सर्वसामान्यांपेक्षा खूप वेगळे आहे. त्यांनी पुढे केलेल्या पर्यावरण वगैरेच्या मुद्द्यावरून/कारणामुळे विनापत्य राहणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि असल्या भंपक मुद्द्याला किंवा 'ज्या जगात मी त्याला सोडणार आहे ते जग जगण्याच्या लायकीच नसेल तर मग मी कशाला त्याला जन्माला घालू?' अशा तुमच्यालेखी (मलाही तसेच वाटते) थोडा अतिरेकी वाटणाऱ्या विचाराने भारावून जाऊन किंवा प्रभावित होऊन जर कोणी त्यांचे अंधानुकरण करणार असेल तर देव त्याचे रक्षण करो. मुळात 'मुल जन्माला न घालणं' हा अन्य कोणाचेही अनुकरण / अंधानुकरण करून वा कुठल्याही प्रकारच्या प्रचाराला बळी पडून घ्यायचा निर्णय किंवा फॅशन खचितच नाही. हा नवरा-बायकोचा अत्यंत खाजगी आणि फारतर आपल्या आप्तेष्टांशी चर्चा/विनिमय करून, आवश्यकता भासल्यास त्यांचे मन वळवून घ्यायचा निर्णय आहे आणि त्यात फक्त आणि फक्त त्या कुटुंबातील मर्यादित सदस्य वगळता अन्य कोणाला हस्तक्षेप/ढवळढवळ करण्याचा अधिकार नाही किंबहुना असा अधिकार अन्य कोणाला देऊही नये. असो... शेवटी तुम्ही म्हणाल्या प्रमाणे,
"आपल्याला आपले जग सुंदर बनवायचे आहे."
हमारे और आपके रास्ते भलेही अलग अलग क्यू न हो, मंझिल तो एक ही हैं!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Mon, 08/22/2022 - 09:24

In reply to जग जसे आहे तसेच राहणार. by टर्मीनेटर

Permalink

एवढे तर मान्य आहे की

किमान अतुल कुलकर्णी यांचा मूल नको हा विचार जाणीवपुर्वक आहे हे तर मान्य कराल. जग पर्यावरणीय विनाशाकडे चालले आहे असे अधोरेखित करणार्‍या ग्रेटाची हाक या अतुल देउळगांवकर यांच्या पुस्तकाच्या प्रकाशना निमित्त त्यांनी तशा आशयाचे विचार व्यक्त केले.अन्यही काही कारणॅ असतील. जसे की देशाची एवढी लोकसंख्या अलरेडी आहे त्यात अजून भर कशाला? वगैरे.
पण हीच मंडळी आपले बलस्थान असलेले कलाक्षेत्र सोडून इतरत्र लुडबुड/वादग्रस्त वक्तव्ये करताना पाहिली की त्यांची खरोखर कीव येते. त्यामागे त्यांचा प्रसिद्धीच्या झोतात किंवा चर्चेत रहण्याचा उद्देश असुदे की समाजाप्रती आपली पोकळ बांधिलकी दाखवण्याचा उद्देश असुदे किंवा कुठला राजकीय अजेंडा राबवण्याचा वा नॅरेटिव्ह सेट करण्याचा हेतू असुदे त्याचे त्यांच्याच करिअरवर होणारे दुष्परिणाम समोर येऊ लागलेत.
कलाकाराचे बलस्थान कला असले तरी देशाचा संवेदनशील नागरिक आहे. मतदार आहे म्हणून त्याला आपल्या क्षेत्राव्यतिरिक्त राजकारण,समाजकारण,अर्थकारण, साहित्य ... ई. यावर मत व्यक्त करण्याचे अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहेच. त्यामुळे त्यांची काही लाभ/ हानी होत असतेच. इतरांचीही होत असते.
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Mon, 08/22/2022 - 10:14

In reply to जग जसे आहे तसेच राहणार. by टर्मीनेटर

Permalink

कुटुंबातील मर्यादित सदस्य

कुटुंबातील मर्यादित सदस्य वगळता अन्य कोणाला हस्तक्षेप/ढवळढवळ करण्याचा अधिकार नाही किंबहुना असा अधिकार अन्य कोणाला देऊही नये. +१००१,सहमत आमची अवस्था तुकारामांच्या अभंग सारखी "बरे झाले देवा निघाले दिवाळे । बरी या दुष्काळे पीडा केली ।।" लवकर मेला बाप म्हणून दृष्टी झाली साफ कोण सुखाचे कोण फुकाचे कळले सारे अर्थ नात्याचे ना लोटा ना थाली सारेच कमंडल खाली नाही कुणाची साथ आपणच आपला जगन्नाथ त्यामुळेच मनातल्या जगाला वास्तवात आणण्याचा प्रयत्न केला. आम्हाला दोन मुली,तीसरा चान्स घ्या मुलगा होऊ द्या पण एक मताने ठाम नकार होता. स्त्रीरोगतज्ज्ञ जवळचा मित्र, तीनदा विचारले. निर्णय बदलला नाही. घरचे नाराज झाले पण आज मुलींची प्रगती पाहून जेलस. सेलिब्रेटीनी नकारात्मक संदेश देऊ नये असे माझे मत आहे. आणी त्यांचे मत ब्रह्मवाक्य आहे असेही मानत नाही. बाकी आपल्या व सौंच्या निर्णयाचा आदर व्यक्त करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्कवादी on Sun, 08/21/2022 - 23:39

In reply to ज्या जगात मी त्याला सोडणार by कर्नलतपस्वी

Permalink

हा थोडा अतिरेकी विचार वाटतो.

हा थोडा अतिरेकी विचार वाटतो. अतुल कुळकर्णी एक प्रथितयश कलाकार आहेत. मी स्वता त्यांचा पंखा आहे. त्यांना या जगाने एवढे प्रेम,यश,धन,दौलत दिली त्या जगाला ते असे कसे काय म्हणू शकतात.
अतुल कुलकर्णींचे विचार अतिरेकी वाटणे वा त्याबद्दल आश्चर्य वाटणे साहजिक आहे. पण अतुल कुलकर्णीं वा तत्सम लोकांचे वाचन , त्यातून विकसित झालेल्या जाणिवा, विचारांचा विस्तारलेला परीघ यामुळे त्यांचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो. हे वाचा :
भटक्या जीवनशैलीमध्ये माणूस निसर्गाच्या व्यवहारांत सर्वात कमी हस्तक्षेप करतो. त्याचा उदरनिर्वाह सर्वस्वी परिसरात सहजी मिळणाऱ्या संसाधनांवर भागवला जातो. वैज्ञानिकांच्या मते सर्वस्वी निसर्गाच्या जोरावर जगण्यासाठी माणशी सरासरी दहा चौरस किमी जागा उपलब्ध असायला हवी. पृथ्वीवरील जमिनीच्या भूभागाचे एकूण क्षेत्रफळ पाहिले आणि त्याच्या प्रत्येक भागात- अगदी एव्हरेस्टच्या टोकावरही- माणसे राहू शकतील आणि सर्व ठिकाणी मुबलक संसाधने उपलब्ध असतील, असे गृहीत धरले तरी संपूर्ण पृथ्वीवर या पद्धतीने जास्तीत जास्त फक्त दीड कोटी माणसे राहू शकतील. आपले पूर्वज एका ठिकाणी राहून शेती करू लागले, तेव्हा त्यांनी इतर ठिकाणहून संसाधने (उदा. पाणी) आणून आपल्या ताब्यातल्या जागेची उत्पादन क्षमता वाढवली. यामुळे दहा चौरस किमी जागेत एका नाही, तर ५० माणसांच्या गरजा भागू लागल्या. पण यासाठी आपल्याला पृथ्वीवरील निसर्गचक्रात लक्षणीय हस्तक्षेप करावा लागला. मात्र असे जीवनही जास्तीत जास्त ७५ कोटी लोकसंख्येसाठी शक्य आहे. आज जगाची लोकसंख्या साडेसात अब्ज आहे
संपुर्ण लेख
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Mon, 08/22/2022 - 10:26

In reply to हा थोडा अतिरेकी विचार वाटतो. by तर्कवादी

Permalink

@तर्कवादी

@तर्कवादी अतुल कुलकर्णीं वा तत्सम लोकांचे वाचन , त्यातून विकसित झालेल्या जाणिवा, विचारांचा विस्तारलेला परीघ यामुळे त्यांचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो. असेलही,म्हणूनच त्याच्यावर जास्त जबाबदारी. जग जगण्या लायक नाही म्हणण्या पेक्षा जग जगण्या लायक बनवू या म्हणले असते तर जास्त आवडले असते. मुळात मुल हवे नको हा वैयक्तिक विचार आहे. अतुल कुळकर्णी वा इतर मान्यवरांनी इतरांना आपले मत सांगू नये आणी सांगीतले तरी फारसा फरक पडेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Mon, 08/22/2022 - 10:29

In reply to @तर्कवादी by कर्नलतपस्वी

Permalink

@कर्नल तपस्वी

त्यांचा मुद्दा पर्यावरणीय जगाशी होता. मी त्यांच्या मतांचा आशय मांडला आहे. संपूर्ण भाषणाची लिंक दिली आहेच
  • Log in or register to post comments

Submitted by तर्कवादी on Mon, 08/22/2022 - 16:20

In reply to @तर्कवादी by कर्नलतपस्वी

Permalink

कर्नलतपस्वीजी,

कर्नलतपस्वीजी,
जग जगण्या लायक नाही म्हणण्या पेक्षा जग जगण्या लायक बनवू या म्हणले असते तर जास्त आवडले असते.
बरोबर आहे. पण त्यांच्या मते आणि इतर अनेक पर्यावरण तज्ञांच्या मतेही खूप जास्त वाढलेल्या लोकसंख्ये मुळे जग जगण्या लायक नाही. मग ते लायक बनवण्याकरिता लोकसंख्या कमी करणे हाच मार्ग आहे... तोच त्यांनी सुचवला.
मुळात मुल हवे नको हा वैयक्तिक विचार आहे. अतुल कुळकर्णी वा इतर मान्यवरांनी इतरांना आपले मत सांगू नये
मुल हवे की नको हा वैयक्तिक विचार व निर्णय आहे हे मान्य आणि कुणीच कुणाला याबाबत आग्रह जबरदस्ती करु शकणार नाही. पण हा निर्णय घेताना आजूबाजूच्या परिस्थितीचे ज्ञान / आकलन झाले तर अधिकच बरे. अतुल कुलकर्णींसारखे लोक तोच प्रयत्न करत आहेत. अर्थात त्यांचे विचार बरेच टोकाचे आहेत. लोकसंख्या कमी होणे गरजेचे आहे पण ती वेगाने कमी होणेही घातक ठरेल. त्याचे वेगळे दुष्परिणाम असतील. म्हणून लोकसंख्या हळूहळू कमी व्हावी लागेल. पण अतुल कुलकर्णीं म्हणालेत म्हणून लगेच काही अनेक लोक त्यांचं ऐकणार आहेत असं नाहीये. पण ज्यांच्या मनात "मूल नको" असा विचार आधीपासूनच होता, किंवा "आपल्याला मूल हवेच" अशी ज्यांना ओढ नाहीये तेच कदाचित "मूल नको" असा निर्णय घेवू शकतील. मनात एखादा विचार असणे आणि त्या विचाराचे निर्णयात रुपांतर होणे हा एक प्रवास आहे. सगळ्यांसाठीच तो सारखाच सोपा नसतो. त्यामुळे काहीजण विचार एक ,निर्णय दूसरा, कृती तिसरीच असं काहीतरी आयुष्य जगतात. प्रसिद्ध / मान्यवर लोकांच्या प्रकटनामुळे काही वेळा मनोबल वाढण्यास मदत होते आणि आपल्या विचारांनुसार निर्णय घेणे, त्यावर ठाम रहाणे हे काहीसे सोपे होते. तशीच मदत इतर समूह, आधारगट (फेसबूक वरील ग्रुप) यांपासूनही होवू शकते. मूल हवे की नको हा जसा वैयक्तिक निर्णय तसाच "किती मूल हवेत ?" हा पण वैयक्तिक म्हणता येईल.. पण तसे नाहीये तो सार्वजनिक हित लक्षात घेवून घ्यावा लागतो. त्यामुळेच अनेक लोकांनी सरकारच्या "एक किंवा दोन बस" या आवाहनाला प्रतिसाद दिला. पण जर ६०-७० वर्षापुर्वीच "चार किंवा पाच बस" असे आवाहन जर सरकारने केले असते तर आज परिस्थिती अधिक सुखकारक असती .
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 08/26/2022 - 09:41

In reply to कर्नलतपस्वीजी, by तर्कवादी

Permalink

जास्त वाढलेल्या लोकसंख्ये

जास्त वाढलेल्या लोकसंख्ये मुळे जग जगण्या लायक नाही. मग ते लायक बनवण्याकरिता लोकसंख्या कमी करणे हाच मार्ग आहे याच व्यत्यास सुद्धा तितकाच सत्य आहे. म्हणजे जग जगण्या लायक असलं (समृद्ध) तर लोकसंख्या आपोआप कमी होईल. affluence is best contraception संपन्नता हे सर्वात चांगले संतती नियमनाचे साधन आहे अशी म्हण आहे. हे जीवशास्त्रीय सत्य आहे. जेंव्हा प्रथिनांची कमतरता निर्माण होते तेंव्हा जीवांची कामेच्छा जास्त होते. ज्या प्राण्यात अपत्यांच्या जीवित राहण्याची शक्यता कमी असते तिथे संतती मोठ्या प्रमाणावर जन्माला घातली जाते. खालच्या वर्गातील प्राणी जास्तीत जास्त पिल्लाना जन्म देतात. हीच स्थिती मानवी इतिहासात आहे. सर्वात गरीब देशांची लोकसंख्या सर्वात जास्त असते आणि जेथे संतती ची जगण्याची शक्यता जास्त आणि उत्तम पालन पोषणाची सो रस्ते तेथे संतती कमी प्रमाणात निर्माण होते. तेंव्हा आर्थिक सुबत्ता हा लोकसंख्या कमी करण्याचा खात्रीचा उपाय आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिंद्य on Sun, 08/21/2022 - 17:26

Permalink

विषय गंभीर आणि चर्चा संतुलित.

विषय गंभीर आणि चर्चा संतुलित. दुर्लभ योग :-) अपत्य / लग्न हवे - नको असणे हे फार पर्सनल निर्णय असतात. पण त्यामागच्या प्रेरणा काय असतात हे समजायला वरील चर्चेमुळे मदत झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sun, 08/21/2022 - 17:56

In reply to विषय गंभीर आणि चर्चा संतुलित. by अनिंद्य

Permalink

होय,

विषय गंभीर आणि चर्चा संतुलित.
+११
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Sun, 08/21/2022 - 18:28

In reply to होय, by हेमंतकुमार

Permalink

सहमत

दोन्हीकडून मांडलेले मुद्दे तर्कशुद्ध आणी ठोस आहेत. चाईल्ड फ्री हा विचार मर्यादित व ठाम असावा. अर्थात काल,समयच ठरवेल याचे भवितव्य. लिव्हिंग इन सुद्धा परस्परांच्या समंतीने घेतलेला निर्णय असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sun, 08/21/2022 - 18:22

Permalink

केवळ मूल झाल्याने मुलासाठी

केवळ मूल झाल्याने मुलासाठी जगू या साठी नवरा बायकोंनी परस्परांशी तडजोड करुन आख्ख आयुष्य व्यतित केल्याने अनेक घटस्फोट टळले असतील. याच्या नोंदी होउ शकत नाहीत. मूल होउन देखील अनेक घटस्फोट होतात ही गोष्ट वेगळी. त्याच्या नोंदी होतात.
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Sun, 08/21/2022 - 18:31

In reply to केवळ मूल झाल्याने मुलासाठी by प्रकाश घाटपांडे

Permalink

सहमत

मुलं आई वडील याच्यां मधील काॅमन धागा असल्यामुळेच कितीक घटस्फोट वाचले याची उदाहरणे जवळपास आढळतात.
  • Log in or register to post comments

Submitted by Nitin Palkar on Sun, 08/21/2022 - 20:12

In reply to केवळ मूल झाल्याने मुलासाठी by प्रकाश घाटपांडे

Permalink

मुलासाठी जगू ...

चांगला मुद्दा.
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Sun, 08/21/2022 - 19:01

Permalink

मस्त चाललीय चर्चा !

मस्त चाललीय चर्चा !
विनापत्य जीवनशैली चे तोटे
१. पहिल्यांदाच आई / बाप बनल्यावर, अपत्याला पहिल्यांदाच हातावर उचलून घेताना होणारा आनंद, डोळ्यातून घळाघळ वाहणारे अश्रु . २. बाळ पहिल्यांदाच उभे राहते, पहिले पाऊल टाकते, पहिला शब्द उच्चारते, दिवसभर कितीही थकून येवो, घरात शिरल्यावर बाळाकडे पाहिल्यावर थकवा कुठल्याकुठे पळून जातो. ३. मुल शाळेत जाते तो पहिला दिवस घर खायला उठते तो अनुभव. मुल शाळेतून घरी आल्यावर त्याच्या डोळ्यात वेगळे जग पाहिल्याचा आनंद ! ४. मुलांची लग्ने झाल्यावर मुलेचे/ सुनेचे दोष आणि जावयाचे / मुलीचे गुणगाण यासारखे रम्य वेळ घालविण्याचे साधन हाती लागते. ५. आयुष्यात जेवढे जास्त दु:ख तेव्हढे परमेश्वर स्मरणाकडे जास्त लक्ष. द्रौपदीने कृष्णाकडे मागीतलेला वर आठवा. या अणि अशाच काही अनुभवांचा अभाव !
विनापत्य जीवनशैली चे फायदे
१. स्वत:चे अपत्य नसल्यामुळे तेच प्रेम भाचे, पुतणे आणि इतरांवर करता येते. २.बायकोचे बाळंतपण नीट निभावून नेले जाईल ना ? बाळ आणि बाळंतीण सुखरुप राहिल ना ही काळजी करण्यापासून पुरुषांची मुक्तता तर बाळांतपणानंतर शरीराचा सुडौलपणा गमावण्यापासून मुक्तता . ३. बाळ आजारी पडल्यावर तुम्ही अगदी स्वत: डॉक्टर असा पण बाळाचे रडणे, त्याचे दु:ख पाहून जीव कळवळणे, अनामिक काळजी वाटणे यापासून सुटका. ४. मुलांच्या जन्माचा खर्च वाचतो. (कमीतकमी २५ हजार ते जास्तीत जास्त कितीही)...... ५. मुलांचे संगोपन (शाळेचा खर्च, कॉलेजचा खर्च) - बचत सध्याच्या हिशोबाने कमीतकमी ५ लाख ते जास्तीत जास्त कितीही.... ६. मुलांचे शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे आपले वेळापत्रक बनविणे. ७. मुले कॉलेजला गेल्यावर वाईट संगतीला लागतील काय ? आजकाल काय काय बातम्या ऐकायला येतात. काळजीपासून मुक्तता. ८. मुलांचे लग्न झाल्यावर ते आईबापांना वार्‍यावर सोडून फक्त त्यांच्याच संसारात रमतात आईबाबांची हेळसांड करतात त्यापासून मुक्तता. ९. आयुष्यभर मोठ्या पदांवर काम केले, बाहेर आदर मिळविला पण म्हातारपणी सुनेच्या वचनात राहून घरात नोकर / मोलकरीण / आया बनण्यापासून सुटका. १०. मुले परदेशी गेली तर मेल्यावर अग्नी द्यायला तरी येतील की नाही याची मारामार. ११. एकापेक्षा जास्त मुले असतील तर संपत्तीवरुन कलह यापासून सुटका. एकंदरीत फायदा तोट्याचा विचार केला तर विनापत्य अपत्य राहण्याचे फायदे भरपूर दिसतात. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी !!
विनापत्य जीवनशैली अगदी स्वेच्छेने स्वीकारणारे किंवा त्याकडे ओढा असणारे लोक बहुधा निरिश्वरवादी आहेत, किंवा धार्मिक व सामाजिक पातळीवर डाव्या विचारांकडे झुकणारे आहेत.
खरे आहे. जीवनात दु:ख नसेल तर परमेश्वराची आठवण काढण्याचे प्रयोजन फार कमी उरते.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्कवादी on Sun, 08/21/2022 - 22:50

In reply to मस्त चाललीय चर्चा ! by धर्मराजमुटके

Permalink

प्रतिसाद आवडला

प्रतिसाद आवडला परंतु तुम्ही सांगितलेले तोटे हे ही जीवनशैली जगणार्‍यांसाठी तोटे नाहीतच. कारण त्यांना अशा अनुभवांची
पहिल्यांदाच आई / बाप बनल्यावर, अपत्याला पहिल्यांदाच हातावर उचलून घेताना होणारा आनंद, डोळ्यातून घळाघळ वाहणारे अश्रु
आस नसतेच मुळी. या व्यक्तींना मुलांशिवाय आपले जीवन अपुर्ण वाटत नाहीच.
जीवनात दु:ख नसेल तर परमेश्वराची आठवण काढण्याचे प्रयोजन फार कमी उरते.
तुमचे म्हणणे काहीसे खरे आहे. संकटे आल्यावर लोक परमेश्वराचा धावा करतात पण निरीश्वरवादी हा कायमच निरीश्वरवादी असतो - त्याचा सुख-दु:खाशी संबंध नसतो. मी गेले कित्येक वर्षांपासून खात्रीने निरीश्वरवादी आहे. जरी अपत्य नसलीच तरी दु:खाचे प्रसंग /संकटे आलीच नाहीत असे नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्कवादी on Sun, 08/21/2022 - 23:10

In reply to मस्त चाललीय चर्चा ! by धर्मराजमुटके

Permalink

एकंदरीत फायदा तोट्याचा विचार

एकंदरीत फायदा तोट्याचा विचार केला तर विनापत्य अपत्य राहण्याचे फायदे भरपूर दिसतात. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी !!
अगदी खरंय.. फायदेच फायदे आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on Mon, 08/22/2022 - 15:38

In reply to मस्त चाललीय चर्चा ! by धर्मराजमुटके

Permalink

"एकंदरीत फायदा तोट्याचा विचार केला तर

"एकंदरीत फायदा तोट्याचा विचार केला तर विनापत्य अपत्य राहण्याचे फायदे भरपूर दिसतात."
अलबत 👍 तुम्ही सांगितलेल्या तोटयांपैकी पाहिल्या चारच्या बाबतीत वर तर्कवादींनी दिलेल्या, "तुम्ही सांगितलेले तोटे हे ही जीवनशैली जगणार्‍यांसाठी तोटे नाहीतच. कारण त्यांना अशा अनुभवांची आस नसतेच मुळी. या व्यक्तींना मुलांशिवाय आपले जीवन अपुर्ण वाटत नाहीच." ह्या प्रतिसादाशी सहमत! खालील पाचवा हा माझ्यामते तोटा नसून एक मुद्दा आहे, "आयुष्यात जेवढे जास्त दु:ख तेव्हढे परमेश्वर स्मरणाकडे जास्त लक्ष." आणि तुम्ही Quote केलेला तर्कवादींचा खालील मुद्दा/अंदाज "विनापत्य जीवनशैली अगदी स्वेच्छेने स्वीकारणारे किंवा त्याकडे ओढा असणारे लोक बहुधा निरिश्वरवादी आहेत, किंवा धार्मिक व सामाजिक पातळीवर डाव्या विचारांकडे झुकणारे आहेत." वरील दोन्ही मुद्द्यांच्या बाबतीत तुम्हा दोघांशी खालील कारणासाठी असहमत! कर्मकांडांचा विरोधक असलो आणि अध्यात्माकडे ओढा नसला तरी मी ईश्वरावर पूर्ण विश्वास असलेला एक 'अस्तिक' मनुष्य आहे. आणि शाळकरी वयापासूनच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी विचारांचा मनावर पडलेला प्रभाव (आताच्या शिवसेनेशी दुरान्वयेही संबंध नसूनही) आजही कायम असल्याने डाव्या विचारांकडे झुकण्याची कधी वेळच आली नाही. तसेच दुःखाच्या वेळी परमेश्वराचे स्मरण तर सगळेच अस्तिक लोक करतात (निरीश्वरवादी लोक काय करतात ह्याची मला कल्पना नाही) पण दुःख नसतानाही परमेश्वराचे स्मरण करण्याची संधी आणि वेळ जर आम्हाला मिळत आहे तर कमी काय नी जास्ती काय, दुःखाचे डोहाळे हवेतच कशाला 😀 बाकी तुम्ही दिलेल्या फायद्यांची यादी अजून बरीच वाढवता येईल पण तूर्तास त्यातले आमच्यासाठी महत्वाचे असलेले फायदे अधोरेखित करतो, 1. "स्वत:चे अपत्य नसल्यामुळे तेच प्रेम भाचे, पुतणे आणि इतरांवर करता येते." +१ 'आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट' असा दुजाभाव नं ठेवता सर्वच लहान मुलांवर सारखे प्रेम करता येते. 6. "मुलांचे शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे आपले वेळापत्रक बनविणे." बायकोच्या कार्यालयीन जवाबदाऱ्यांमुळे तर माझ्या व्यावसायिक कामांसाठी असो किंवा लास्ट मिनिट ठरणाऱ्या भटकंतीच्या कार्यक्रमासाठी असो, उद्या नक्की कुठल्या ठिकाणी असू ह्याची खात्री आज देता येत नाही अशी परिस्थिती असल्याने हा फायदा आमच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. 7. "मुले कॉलेजला गेल्यावर वाईट संगतीला लागतील काय ? आजकाल काय काय बातम्या ऐकायला येतात. काळजीपासून मुक्तता." हा फायदा म्हणुन नाही पण एक विचार म्हणुन आवडलेला मुद्दा आहे! जर आम्ही मूल जन्माला घातले असते आणि कर्मधर्म संयोगाने ते आईवर नं जाता बापावर म्हणजे माझ्यावर गेले असते तर मात्र ही काळजी प्रचंड सतावत राहिली असती. वाईट संगत वगैरे लागली नसूनही आई-बाबांच्या जीवाला प्रचंड घोर लावणारे बरेच प्रताप अस्मादिकांनी लहानपणापासूनच करून झाले आहेत 😀
  • Log in or register to post comments

Submitted by तर्कवादी on Mon, 08/22/2022 - 18:01

In reply to "एकंदरीत फायदा तोट्याचा विचार केला तर by टर्मीनेटर

Permalink

कर्मकांडांचा विरोधक असलो आणि

कर्मकांडांचा विरोधक असलो आणि अध्यात्माकडे ओढा नसला तरी मी ईश्वरावर पूर्ण विश्वास असलेला एक 'अस्तिक' मनुष्य आहे.
माझ्या प्रतिसादातील "विनापत्य जीवनशैली आणि निरिश्वरवाद" या मुद्द्यावरील तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघत होतो. म्हणजे माझा समज चुकीचा ठरला तर :)
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on Mon, 08/22/2022 - 18:07

In reply to कर्मकांडांचा विरोधक असलो आणि by तर्कवादी

Permalink

माझ्या प्रतिसादातील "विनापत्य जीवनशैली

माझ्या प्रतिसादातील "विनापत्य जीवनशैली आणि निरिश्वरवाद" या मुद्द्यावरील तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघत होतो.
हो खरंतर तिथेच प्रतिसाद देणार होतो, पण तेवढा भाग मुटके साहेबांनी त्यांच्या प्रतिसादात Qoute केला होता म्हणुन सामायिक प्रतिसाद दिला 😀
म्हणजे माझा समज चुकीचा ठरला तर :)
Yup 😔
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 08/26/2022 - 10:06

In reply to मस्त चाललीय चर्चा ! by धर्मराजमुटके

Permalink

विनापत्य जीवनशैली चे फायदे

विनापत्य जीवनशैली चे फायदे यातील बरेचसे फायदे हे आंबट द्राक्षे सारखे भासतात. १. स्वत:चे अपत्य नसल्यामुळे तेच प्रेम भाचे, पुतणे आणि इतरांवर करता येते. स्वतःच्या अपत्यावरील प्रेम हे दुसऱ्याच्या अपत्यावर कधीही करता येत नाही हे जीवशास्त्रीय सत्य आहे. आपल्या मुलाने त्याचे खेळणे मोडले तर येतो त्याच्या तिप्पट राग आपल्या भाच्या पुतण्याने मोडले तर येतो. २.बायकोचे बाळंतपण नीट निभावून नेले जाईल ना ? बाळ आणि बाळंतीण सुखरुप राहिल ना ही काळजी करण्यापासून पुरुषांची मुक्तता तर बाळांतपणानंतर शरीराचा सुडौलपणा गमावण्यापासून मुक्तता . बाळंतपण नीट निभावले जाणार नाहि ही शक्यता फार कमी आहे. हे म्म्हणजे सायकल चालवताना पडायला होते म्हणून सायकल शिकायलाच नको म्हणण्यासारखे आहे. आणि सुडौलपणा बद्दल म्हणालात तर मुलं न झालेल्या किती बायका चाळीशीत सुडौल असतात? बाळंतपणाचा आणि सुडौलपणाचा संबंध नाही तर गरोदर होण्याच्या अगोदर, गरोदरपणात आणि बाळंतपणात आपण किती खातो आहोत त्यावर आहे. कालच माझ्याकडे गरोदर होण्यापूर्वी ९५ किलो आणि आता तीन महिने झाल्यावर ९८ किलो वजन झालेली स्त्री अली होती आणि बाळाचे वजन सध्या ६०० ग्राम आहे ३. बाळ आजारी पडल्यावर तुम्ही अगदी स्वत: डॉक्टर असा पण बाळाचे रडणे, त्याचे दु:ख पाहून जीव कळवळणे, अनामिक काळजी वाटणे यापासून सुटका. असं काही होत नाही. मी स्वतः डॉक्टराचे आणि बाळाच्या आजारपणाची अनामिक चिंता काही वाटत नाही. अर्थात माझ्या मुलांना गंभीर असा कोणताही आजार झाला नाही हे हि तितकेच खरे. पण गंभीर आजार काही बाळालाच व्हायला हवा असे नाही. तो तुम्हाला नि तुमच्या पत्नीला सुद्धा होऊ शकतो. ४. मुलांच्या जन्माचा खर्च वाचतो. (कमीतकमी २५ हजार ते जास्तीत जास्त कितीही)...... लग्न केले नाही तर हाही खर्च वाचतो. कामवासनेच्या शमनासाठी गणिकालये कमी नाहीत. स्वतःचे कोणी माणूस हवे, भावनिक भुकेसाठी माणूस (/ स्त्री) लग्न करतो. तसेच मुले होऊ देतात. ५. मुलांचे संगोपन (शाळेचा खर्च, कॉलेजचा खर्च) - बचत सध्याच्या हिशोबाने कमीतकमी ५ लाख ते जास्तीत जास्त कितीही.... ६. मुलांचे शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे आपले वेळापत्रक बनविणे. वरीलप्रमाणेच ७. मुले कॉलेजला गेल्यावर वाईट संगतीला लागतील काय ? आजकाल काय काय बातम्या ऐकायला येतात. काळजीपासून मुक्तता. उद्या आपली बायको / नवरा लफडं करणार नाही का? लग्नच केलं नाही तर या काळजीतूनही मुक्तता होईलच. ८. मुलांचे लग्न झाल्यावर ते आईबापांना वार्‍यावर सोडून फक्त त्यांच्याच संसारात रमतात आईबाबांची हेळसांड करतात त्यापासून मुक्तता. मुलं तुमच्या संसारात रमतील हे मूलभूत गृहितकच चूक आहे. आईबापांची हेळसांड करतील यासाठी आईबापांनी त्यांना मॅच्युअर होणारी मुदत ठेव समजणे सोडून दिले पाहिजे . ज्यांना मुलंच नाहीत त्यांची काळजी कोण घेईल हा विचार येथे येत नाही का ? ९. आयुष्यभर मोठ्या पदांवर काम केले, बाहेर आदर मिळविला पण म्हातारपणी सुनेच्या वचनात राहून घरात नोकर / मोलकरीण / आया बनण्यापासून सुटका. मोठ्या पदांवर राहिले आणि आर्थिक नियोजन केले नाही तरी ही सुनेच्या वचनात राहायलाच लागेल हि अतिशयोक्ती आहे. उलट अतिशय प्रेम करणारी सून मिळाली तर आयुष्य अधिक सुंदर होईल असा विचार का करत नाही? १०. मुले परदेशी गेली तर मेल्यावर अग्नी द्यायला तरी येतील की नाही याची मारामार. मुलं नसली च तर अग्नी कोण देणार? हा विचार नाहीच केलेला ११. एकापेक्षा जास्त मुले असतील तर संपत्तीवरुन कलह यापासून सुटका. संपत्तीचा आपल्या हयातीत सुविनयोग केल्यास असले विचार येणारच नाहीत. उलट आपल्यामागे आपल्यी सम्पत्ती आपल्या रक्तामांसाचा सोडून तिसऱ्याच माणसाच्या कामी येणार हा विचार अपत्यहीन माणसांना डाचत असेल का असा विचहर करून पहा बाकी आपल्या मनाचे असे खोटे समाधान करून घेण्यापेक्षा मला मुले नकोत या मागे माझा ठाम विचार आहे त्याचे फायदे तोटे जगाला सांगण्याची गरजच काय? असा साधा सरळ विचार का करत नाही? आय आय टी मध्ये जास्त मुले वैफल्यग्रस्त होतात किंवा अमली पदार्थांच्या आहारी जातात म्हणून मी आय आय टी मध्ये गेलो नाही यासारखी विचारसरणी नको.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Sat, 08/27/2022 - 17:32

In reply to विनापत्य जीवनशैली चे फायदे by सुबोध खरे

Permalink

१. स्वत:चे अपत्य नसल्यामुळे

१. स्वत:चे अपत्य नसल्यामुळे तेच प्रेम भाचे, पुतणे आणि इतरांवर करता येते. स्वतःच्या अपत्यावरील प्रेम हे दुसऱ्याच्या अपत्यावर कधीही करता येत नाही हे जीवशास्त्रीय सत्य आहे. आपल्या मुलाने त्याचे खेळणे मोडले तर येतो त्याच्या तिप्पट राग आपल्या भाच्या पुतण्याने मोडले तर येतो.
डॉ.खरेंशी सहमत. प्रेमासोबत हक्क ही सुध्दा एक भावना आहे. हक्क बजावणे व तो बजावुन घेता येणे ह्या दोन्ही गोष्टी स्वतःच्या अपत्याच्या बाबतीत जितक्या सहजपणे करता येतो तितका पुतण्या/भाच्यांशी करता येत नाही. स्वतःच्या मुलावर चिडणे प्रसंगी हात ही उगारणे ह्या गोष्टी इतरांच्या मुलांबाबतीत करणे फार अवघड आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Sat, 08/27/2022 - 23:09

In reply to १. स्वत:चे अपत्य नसल्यामुळे by कानडाऊ योगेशु

Permalink

मला वाटते

स्वतःच्या अपत्यावरील प्रेम हे दुसऱ्याच्या अपत्यावर कधीही करता येत नाही हे जीवशास्त्रीय सत्य आहे.
आपली व सुबोध साहेबांची मुळ वाक्याचा अर्थ समजून घेण्यात गल्लत झाली आहे असे वाटते. स्वतःच्या अपत्यावरील प्रेम हे दुसऱ्याच्या अपत्यावर कधीही करता येत नाही हे जीवशास्त्रीय सत्य आहे हे बरोबर आहे पण आपण अपत्यलेस जीवनशैलीचा विचार करतोय ना ?
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Sun, 08/21/2022 - 19:24

Permalink

भिती

दिव्यांग किंवा मेंटली चेलेंज मूल झाले तर ? या भीतीने मूल नको असे विचार असलेली जोडपी आहेत . काहीजणांच्या ओळखीत किंवा घरात असे कोणी असेल तर ही भिती प्रबळ असते
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on Sun, 08/21/2022 - 20:55

In reply to भिती by कपिलमुनी

Permalink

दिव्यांग किंवा मेंटली चेलेंज मूल झाले तर ?

दिव्यांग किंवा मेंटली चेलेंज मूल झाले तर ? या भीतीने मूल नको असे विचार असलेली जोडपी आहेत .
आमच्या कॉलेजच्या जुन्या ग्रुपमधली एक तामिळ भाषिक मैत्रीण आहे. ती स्वतःला जितके समजायची तितकी दिसायला कुरूप आम्हाला तरी कधी वाटली नव्हती नी अजूनही वाटत नाही. सामान्य रूपामुळे लग्न जमायला बराच उशीर झाला आणि नवराही अगदीच रूपाने बेताचा आहे. त्या दोघांनी आपल्यापोटी 'कुरूप' मूल जन्माला येऊ नये ह्या एकमेव कारणासाठी विनापत्य राहण्याचा निर्णय घेतला आहे. हे कारण आम्हाला (ग्रुप मेम्बर्सना) पटलेले नसले आणि त्यावर तिच्याकडेही कुठले स्पष्टीकरण मागितले नसले तरी लहानपणापासून त्या दोघांवर रंग आणि रूपावरून इतरांकडून झालेल्या शेरेबाजी/टोमण्यांतून दोघांच्या मनात निर्माण झालेला न्यूनगंड आणि कदाचित असे लज्जा/अपमानास्पद जीवन आपल्या अपत्याच्या वाट्याला येऊ नये ह्या भावानेतून त्यांनी हा निर्णय घेतला असावा असा आमचा अंदाज आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Sun, 08/21/2022 - 21:00

In reply to दिव्यांग किंवा मेंटली चेलेंज मूल झाले तर ? by टर्मीनेटर

Permalink

आमच्या कॉलेजच्या जुन्या

आमच्या कॉलेजच्या जुन्या ग्रुपमधली एक तामिळ भाषिक मैत्रीण आहे. ती स्वतःला जितके समजायची तितकी दिसायला कुरूप आम्हाला तरी कधी वाटली नव्हती नी अजूनही वाटत नाही. सामान्य रूपामुळे लग्न जमायला बराच उशीर झाला आणि नवराही अगदीच रूपाने बेताचा आहे. त्या दोघांनी आपल्यापोटी 'कुरूप' मूल जन्माला येऊ नये ह्या एकमेव कारणासाठी विनापत्य राहण्याचा निर्णय घेतला आहे.
कृष्णवर्गीय (रंगाने काळी / सावळी) होती का? भारतामध्ये गोर्‍या रंगाच्या लोकांना खुप प्राधान्य दिले जाते.
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on Mon, 08/22/2022 - 16:09

In reply to आमच्या कॉलेजच्या जुन्या by Trump

Permalink

कृष्णवर्गीय (रंगाने काळी / सावळी) होती का?

कृष्णवर्गीय (रंगाने काळी / सावळी) होती का?
हो. कॉलेजमध्ये 'कलर गया तो पैसा वापीस' अशी शेरेबाजी तिच्यावर होत असे! अर्थात ती दुसऱ्या वर्षी आमच्या ग्रुपला जॉईन होई पर्यंतच, नंतर कोणाची बिषाद होती तिला काही बोलायची 👊 😀
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Mon, 08/22/2022 - 17:20

In reply to कृष्णवर्गीय (रंगाने काळी / सावळी) होती का? by टर्मीनेटर

Permalink

भारत आणि रंगभेद

  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Mon, 08/22/2022 - 17:23

In reply to कृष्णवर्गीय (रंगाने काळी / सावळी) होती का? by टर्मीनेटर

Permalink

भारत आणि रंगभेद

  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Mon, 08/22/2022 - 17:31

In reply to कृष्णवर्गीय (रंगाने काळी / सावळी) होती का? by टर्मीनेटर

Permalink

भारत आणि रंगभेद

  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com