Skip to main content

विद्या बाळ यांचे अखेरचे आवाहन

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 14/10/2020 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
विद्या बाळ गेल्यानंतर त्यांच्या आदरांजली सभेत उल्लेख केलेले त्यांचे शेवटचे रेकॉर्डिंग. मार्च 2020 च्या मिळून सार्‍याजणी मधे आले आहे. स्वेच्छामरण या विषयी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांची मते काय होती हे जाणुन घेण्याची उत्सुकता होती. ------------------------------------------------------------------------- अखेरच आवाहन... मी विद्या बाळ, १०१, नचिकेत सोसायटी, प्रभात रोड, पुणे - ४, वय ८३ पूर्ण. आज मनाच्या एका अत्यंत गंभीर अशा; पण निर्णायक अवस्थेत बोलते आहे. हा विचार मी आजवर शेकडो लोकांशी बोललीये, पण कुणाला तो इतका गंभीर वाटला, कुणाला नाही, मीही कदाचित थोडी द्विधा मनस्थितीत असेन. पण आज मी अतिशय निर्णायक मनस्थितीत बोलतीये. माझे दात काढल्यामुळे थोडी अस्पष्टता येतीये ती समजून घ्या. मला असं म्हणायचंय की, मला केव्हापासूनच वाटतंय की माझ्या आयुष्याला आता अर्थ राहिलेला नाही. सगळे माझे प्रियजन सांगताहेत मला की, तुला खूप करण्यासारखं आहे, खूप आयुष्य पुढे आहे, पण मला स्वतःला प्रामाणिकपणे असं वाटतं की, त्याला अर्थ नाहीये, या पुढे बरं होणं, काम करणं, पहिल्या उमेदीनी बरं होऊन काही करणं ही माझी इच्छाही नाहीये आणि मला करायचंही नाहीये. जोशी हॉस्पिटलमध्ये मी ई.ओ.एल. फॉर्म भरलाय - ‘एण्ड ऑफ लाईफ' म्हणून. काही त्याला अर्थ नाहीये. कारण जोपर्यंत मी प्रत्यक्षात मरण्याच्या स्थितीत येत नाही. तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाहीये हे माझ्या प्रत्यक्ष अनुभवातून लक्षात आलंय. तेव्हा हा जो विचार करून, विशेषतः आज विचार करून, मी असं ठरवते आहे की, मला यातून सुटकेचा मार्ग हवा आहे. तो लीगल नाही, हे मला २००% माहितीये; पण तरी तो मला हवा आहे. मला यावर एक मार्ग सुचतो तो असा : तो ४-८ दिवसात होणारा नाही, त्यामुळे सगळ्यांना सांगण्यास, जाहीर करण्यात आता अर्थ नाही, पण मी बोलतीये. माझ्या असं लक्षात आलं की, याच्यात माणसाच्या जवळ, सज्जन माणसाजवळ, जे नाही (त्याची गरज आहे). पण मला आज एक नवा विचार सुचलाय तो असा की, जी माणसं खरोखरच सुपारी देऊन काम करतात, त्या माणसांच्याकडे कदाचित म्हणजे उदाहरणार्थ क्रूर असे किंवा उद्देश नसलेले (लोक), सर्पमित्र (ज्यांच्याविषयी मला आदर आहे) किंवा त्या प्रकारचे लोक शोधणं आणि त्यांच्या मदतीनी यावर काहीतरी उपाय काढणं शक्य आहे. त्याला वेळ लागेल, पण ते कदाचित शक्य आहे. त्याला काही काळ लागेल तो घ्यावा. आणि माझी इच्छा आहे की त्यांनी तो (मार्ग) पूर्ण करावा ज्यामुळे तशी कुणावरच आरोपाची वेळ येणार नाही. कसं, काय, याचे डिटेल्स सिरिअसली ठरवावे लागतील. आज मी मनाच्या अत्यंत निर्णायक, भावनाविवश नसलेल्या अवस्थेत बोलतीये. इथे आज या बैठकीला सविता ही माझी सध्याची सेवक, विनीता माझी मुलगी, उर्मिला माझी सून, डॉ. मंगला नाही माया (हजर आहेत). इथे हॉस्पिटलमध्ये मी आत्ता ॲडमिट आहे, तिच्याशीही (मायाशीही) मी बोलले आहे. या सगळ्यांनी कृपया याचा नीट नीट नीट विचार करावा आणि जे जे लोक मृत्युशय्येवर आहेत, किंवा लवाटे यांच्यासारखे प्रामाणिकपणे अशाच अवस्थेत मृत्यूची वाट पाहताहेत त्यांना मार्ग मोकळा करून द्यावा. कृपया तुम्ही सगळ्यांनी इथे विचार करावा. आत्ता ही गोष्ट मोठ्यांनी बोलण्याची नाहीये; पण काही महिन्यात, वर्षात, याचा विचार करावा. आत्ता ते शक्य नाही मला माहितीये. मी तोवर थांबायला तयार आहे; पण कधीच न निघणाऱ्या मार्गापेक्षा हा मार्ग खूप चांगला आहे, अनेकांसाठी चांगला आहे, तुम्ही सर्वांनी यावर विचार करावा. हे सगळे विचार ऐकून घेतलेत आणि त्यातनं सगळे जण शांत, शहाण्यासारखा विचार करतील अशी मला आशा आहे. माझ्यावर लोकांनी इतकं अपार प्रेम केलंय की, मी असा निर्णय घेणं हे एका परीने खूप क्रूर आणि कृतघ्नतेचं लक्षण आहे. मला असं वाटतं की, अनेक लोकांच्या पुढील हितासाठी हा खूपच आणि विशेषतः माझ्यासाठी उपयुक्त (मार्ग) आहे. कृपया विचार करावा. माझ्या निर्णयाचं काही भलं करावं आणि व्यापक जनतेच्यासाठी काहीतरी करावं. विद्या बाळ २९ जानेवारी २०२० संध्या. ७.३०

वाचने 65303
प्रतिक्रिया 156

प्रतिक्रिया

In reply to by गामा पैलवान

आयुर्वेदात श्वासाचे महाश्वास, उर्ध्वश्वास, छिन्नश्वास, तमकश्वास, क्षुद्रश्वास असे पाच प्रकार सांगितले आहेत. श्वासांच्या वेगाची भिन्नता व लक्षणांची तीव्रता यांच्यावरून हे प्रकार पाडले आहेत. वायूची (प्राणाची) उर्ध्वगति वेगानें होणें, हे श्वासाचे सामान्यरुप पांचहि प्रकारांना साधारण असें असतें. पैकी महाश्वास, उर्ध्वश्वास आणि छिन्नश्वास हे मृत्युशी निगडीत आहेत. महाश्वास - मृत्युच्या वेळचे नैसर्गिक शेवटचे श्वास. ह्यावर कोणाचेही अधिपत्य नाही. उर्ध्वश्वास श्वासोच्छ्वासाची गती आणि लय उर्ध्व दिशेला लागून प्राणाचा (वायूचा) सहस्त्रार चक्राकडे वेगाने प्रवास हा उर्ध्वश्वास. ह्यावर साधनेच्या बळाने कंट्रोल करता येऊन प्राण सहस्त्रारचक्रातून विलग करता येऊ शकतो. जे मुक्तावस्थेतल्या योग्यांना शक्य होते. त्यासाठी कर्मसंस्कारांचे निर्मूलन (मोक्ष) झालेले असणे अत्यंत महत्वाचे आहे! - (साधक) सोकाजी

In reply to by गामा पैलवान

परमहंस योगानंदांच्या आत्मचरित्रात त्यांनी अशा एका योग्याचा उल्लेख केला आहे. शेवटचे प्रवचन, महाप्रसाद वगैरे आटपुन त्यांनी "आता हे शेवटचं क्रियायोगाचं आवर्तन आटपुन मी देह ठेवतोय" असं डिक्लेअर करुन श्वासासंबंधी असंच काहि तरी करुन देहत्याग केला.

In reply to by गामा पैलवान

व्वा, माहितीपुर्ण +१ !
तर कलियुगात श्वास थांबला की माणूस मृत समजावा, असं वचन आहे. यानुसार श्वासोत्तेजक ( = व्हेंटिलेटर ) वापरून जीव जगवणे अनुचित आहे.
अश्या प्रकारचा युक्तिवाद इच्छामरणाच्या कायदेशीर प्रकरणात केला असावा का या बद्दल उत्सुकता !
मग मरायची वेळ आली की बरोबर ऊर्ध्व लावता येतो.
ज्यांना ऊर्ध्व लावणे ही विद्या / कला अवगत नसेल तर त्यांना मदत करावी लागणार. बाह्य यंत्रणा प्र"दान" करावी लागणार !

स्वेच्छामरणाच्या चळवळीचा भाग म्हणून काही कार्यक्रम होत असतात. एका कार्यक्रमात नंतरच्या अनौपचारिक चर्चात एकाने मुद्दा मांडला की शरीर ही माझी संपत्ती आहे . कायद्याने प्रत्येकाला आपल्या संपत्तीचा विनियोग करण्याचा अधिकार आहे. मग माझ्या शरीराचा विनियोग मी कसा करायचा हे मीच ठरवणार. माझा तो अधिकार आहे. त्यांना मी म्हटल सध्या दयामरणावर भागवून घेउ. आपला समाज इतका पुढे जायला बराच कालावधी लागेल. तत्वत: तुमचे म्हणणे मान्य आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

शरीर ही माझी संपत्ती आहे . कायद्याने प्रत्येकाला आपल्या संपत्तीचा विनियोग करण्याचा अधिकार आहे. संपत्ती दुसऱ्याला दिली आणि नंतर असे समजले कि या माणसाने अफरातफर करून हि संपत्ती मिळवली आहे तर ती संपत्ती मूळ मालकाला परत केली जाऊ शकते. परंतु एकदा प्राणज्योत मालवली तर त्या शरीरात परत प्राण फुंकणे हे सध्या तरी शक्य नाही यामुळेच फाशीची शिक्षा देण्याच्या अगोदर कायद्यातील सर्व रस्ते आणि पळवाटा बंद झाल्यावरच फाशी दिली जाते. यासाठीच अफझल गुरूला फाशी देण्याच्या अगोदर अपरात्री सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आपले दरवाजे उघडले होते. एखाद्या वस्तूचा विमा त्या वस्तूच्या वाजवी किमतीपेक्षा जास्त असू शकत नाही.किंवा एकाच वस्तूचे दोन विमे असू शकत नाहीत परंतु मानवी आयुष्याचा विमा काही अपवाद सोडले तर कितीही किमतीचा असू शकतो आणि एकाच व्यक्तीचे अनेक कंपन्यांतर्फे अनेक विमे असू शकतात. हे विमा कायद्यातील अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शक तत्व आहे. तेंव्हा हा मुद्दा गैरलागू आहे.

गर्भपातासंदर्भात पण "स्त्रियांचा आपल्या शरीरावरचा हक्क" वि. "अर्भकाचा जगायचा हक्क" वाद आठवला. इथे "शरीरावरचा हक्क" आणि "जगण्याचा हक्क" यात कॉन्फलिक्ट आहे. याबाबतीत अमेरिकेत कित्येक वर्षे हा वाद फक्त आणि फक्त अर्भक हा "मनुष्य" असतो का नाही आणि त्यामुळेच, अर्भकाला मारणे नैतिक कि अनैतिक इतपतच होता. त्यामुळे गर्भपाताकडून बोलण्यासाठी "माणूस म्हणजे काय, माणूस कोणत्या पायरीवर निर्माण होतो" इतकाच वाद चालू असे, आणि अर्भकाचे माणूस नसणे यावरच पूर्ण मुद्दा अवलंबून होता.जो कि तर्कांच्या चाचणीत खरा नव्हे, अर्भकाला माणूस न म्हणण्याचे काहीच कारण नाही, कारण ते पोटाबाहेर आल्यावर निःशंक माणूस असणार आहे. पण मुळात स्त्रीचा bodily convinience हा अर्भकाच्या जगण्याच्या हक्काला मागे टाकतो का ? जर हो, तर अर्भक मनुष्य आहे मान्य केले तरी काही फरक पडू नये. स्त्रीचे शरीरावरचे स्वातंत्र्य, अनुषंगाने गर्भपात करण्याचे, हे अर्भकाच्या जिवाच्या हक्कापेक्षा जास्त आहे हे दाखवण्यासाठी एक विचित्र परिस्थिती कल्पली जाऊ शकते. एका व्यक्तीला जर दुसऱ्या व्यक्तीशी डायलिसिस सदृश्य प्रक्रियेसाठी जोडलं, कि व्यक्ती अ च्या मूत्रपिंडाचा वापर करून व्यक्ती ब जगत आहे, व्यक्ती अ ने हे कनेक्शन तोडले तर व्यक्ती ब मरून जाईल. हि अरेंजमेंट व्यक्ती अ च्या परवानगीने किंवा परवानगी शिवाय झाली असू शकते. व्यक्ती अ प्रत्येक क्षणी व्यक्ती ब च्या खोलीतच असायला हवा, तो इतरत्र जाऊ शकत नाही. व्यक्ती ब नैसर्गिकरीत्या किंवा इतर कारणांनी मरेपर्यंत हे असेच चालेल. तर, व्यक्ती अ ला हे अर्थातच जाचक आहे. त्याला स्वतःचे शारीरिक स्वातंत्र्य गमवावे लागले आहे. तर, व्यक्ती अ ला हे कनेक्शन तोडून निघून जाण्याचा हक्क असावा का ? म्हणजेच, व्यक्ती अ चे शारीरिक स्वातंत्र्य व्यक्ती ब च्या जगण्यापेक्षा कमी, कि जास्त महत्वाचे ? यातून अर्थातच व्यक्ती अ च्या कनेक्शन तोडण्याचा हक्क मान्य आहे असे उत्तर मिळते. म्हणजेच, इतरत्र कोठेही शारीरिक स्वातंत्र्य डावलून इतरांचा जगण्याचा हक्क बजावला जात नाही. म्हणजेच गर्भपातावर बंदी आणल्यावर केवळ गर्भार स्त्रीवरच स्वतःचा bodily convinience डावलून जीवाचे रक्षण करण्याची जबाबदारी टाकली जाते, जी इतरत्र कोठेही दिसत नाही. ह्या व्हिडिओमध्ये हा मुद्दा मांडला गेला आहे-https://youtu.be/c2PAajlHbnU तसे जर गर्भपाताबद्दल मांडले जाऊ शकते, तर निःशंकपणे स्वतःला मारून टाकण्याबद्दल पण मांडले जाऊ शकते. जर bodily convinience हा सर्वोच्च हक्क असेल, तर कायद्याने स्वतःला मारण्याचा हक्क निःसंशय असावा.

In reply to by शा वि कु

अर्भकाचा जगायचं हक्क सर्वोच्च मानला तर बलात्कारातून झालेली संतती सुद्धा स्त्रीला वाढवावीच लागेल. यात पूर्ण नऊ महिने तिच्यावर मानसिक बलात्कार चालूच राहील. शिवाय आपल्या रक्त मांसा वर वाढलेले मूळ हे आपल्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाचे आहे हे रोज पाहत राहणे हा पुढची अनेक वर्षे ( कदाचित आयुष्यभर) होत राहणार मानसिक बलात्कार आहे. दुर्दैवाने अमेरिकेत काही राज्यात असा कायदा आहे कि स्त्रीने त्या राज्यातच नव्हे तर दुसऱ्या राज्यात जाऊन केलेला गर्भपात सुद्धा बेकायदेशीरआहे. https://www.amnesty.org/en/latest/news/2019/06/abortion-laws-in-the-us-… यामुळे भारतीय कायद्यात अर्भक जोवर स्वयंपूर्ण होत नाही (प्रसूती केल्यास स्वतः श्वास घेऊन जगू शकत नाही) तो वर म्हणजे साधारण २८ आठवड्यापर्यंत गर्भपातास परवानगी दिलेली आहे. यात स्त्रियांची पाळी अनियमित असली तर सुरक्षित असे अंतर ठेवून गर्भपात २० आठवडे पर्यंतच कायदेशीर आहे.

इच्छा मरणाच्या कायदेशीर परवानगीचे काय होईल माहित नाहि... पण हि चर्चा वाचुनच एखाद्याला मरायची इच्छा व्हायची.

In reply to by अर्धवटराव

तशी इच्छा झाली तर ती इच्छा सुप्तावस्थेत होती अस म्हणता येईल. तशीही डेथ इन्स्टिंक्ट असते काहींबाबत.

स्विझरलंड मध्ये इच्छा मरण कायदेशीर आहे, नव्हे ती तिथली टुरिझम नंतरची किंवा बहुतेक त्यापेक्षा ही मोठी इंडस्ट्री असावी. [ https://en.wikipedia.org/wiki/Suicide_tourism ] काही काळापूर्वी या विषयावर मी एक व्हिडियो पाहिला होता ज्यात एक कंपनी एका व्यक्तीसाठी त्याच्या मरणाची सगळी व्यवस्था करते, ती व्यक्ती आणि त्याची पत्नी यांची शेवटचा काळ एकत्र बसुन बोलण्यात घालवतात आणि याचे चित्रिकरण देखील करुन दिले जाते. बादवे... देवी सतीने आत्मदहन केल्याचे आपल्याला पुराण कथां मधुन ठावूक आहेच [ योग बळाने देहास तप्त करुन ज्वाळांची निर्मीती झाली / यज्ञकुंडात स्वतःची आहुती दिली. अशा दोन पद्धती माझ्या वाचनात आलेल्या आहेत. ] याच बरोबर जड भरत कथेत मृग जन्म मिळालेल्या मुनीनीं पाण्यात प्रवेश करुन मृग जीवन संपवल्याचा उल्लेख देखील आहे. शेवटी हे एक चक्र आहे, एक बाजु संपवली तरी दुसरीकडे परत उत्पत्ती आहेच...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pak should be blacklisted by FATF, India stands vindicated after Islamabad’s admission on Pulwama: VK Singh

In reply to by मदनबाण

स्विझरलंड मध्ये इच्छा मरण कायदेशीर आहे, पण हा कायदा तेथील नागरिक नसणार्यां पर्यटकांना कसा लागू होऊ शकेल? उद्या पाकिस्तान असा इच्छामरण कायदा करेल आणि येणाऱ्या प्रत्येक भारतीयाने इच्छामरण मागितले म्हणून सरळ इंजेक्शन देऊन मारून टाकतील.

सकाळ न्युज :- "वेलिंग्टन - इच्छामरणाच्या मुद्यावर आज न्यूझीलंडमध्ये सार्वमत घेण्यात आले. प्राथमिक निकालानुसार, देशातील जवळपास ६५ टक्के लोकांनी इच्छामरण कायद्याच्या बाजूने मतदान केले आहे. हा व्यक्तीवरील प्रेमाचा विजय आहे, अशी भावना इच्छामरणाच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे.-प इच्छामरणाचा कायदा अंमलात आल्यास सहा महिन्यांहून जास्त काळ जिवंत राहण्याची शक्यता नसलेल्या अत्यंत आजारी व्यक्तीला सहाय्यकाच्या मदतीने इच्छामरण देता येणार आहे. मात्र, यासाठी दोन डॉक्टरांची मंजुरी आवश्‍यक आहे. कोण मागू शकते इच्छामरण? . आत्यंतिक आजारामुळे सहा महिनेच आयुष्य उरलेल्या व्यक्ती त्यांची प्रकृती सातत्याने बिघडत असल्यास इच्छामरणाबाबत निर्णय घेऊ शकणाऱ्या. या देशांत परवानगी बेल्जियम, कॅनडा, कोलंबिया, लक्झेंबर्ग, नेदरलँड, अमेरिकेतील काही राज्ये, व्हीक्टोरिया राज्य (ऑस्ट्रेलिया)Edited By - Prashant Patil",

In reply to by गोंधळी

तीन मुद्द्यांवर गोंधळ संभवतो : १. सार्वमत: हे कितीही छान माध्यम वाटलं तरी त्यावर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने ही "जनमानसाची" भावना कितपत व्यवहार्य असते हा वादाचा मुद्दा आहे. जनमत घेतल्यास अनेक भावनिक मुद्द्यांना बहुमत मिळू शकतं (उदा द्यायचे झाल्यास: अमुक गुन्हा केल्यास पब्लिकने त्याला तुडवून 'ताबडतोब' न्याय करावा.. किंवा... भर चौकात दगडांनी ठेचून मारावे... अथवा ... जाहीरपणे चौकात लिंग छाटावे / सुळावर चढवावे.. आम्हाला आमच्या चार जिल्ह्यांचे / समाजाचे वेगळे राज्य काढून द्या... वगैरेलाही बहुमत मिळू शकेल..) पण हे घटनेच्या आणि सद्य लोकशाहीच्या कोणत्याच तत्वात / नियमात बसवून अंमलात आणणे शक्य नाही. किमान सोपे तर नाहीच नाही. २. खालील अधोरेखित वाक्ये अत्यंत अनिश्चित शक्यतांवर आधारित आहेत.
सहा महिन्यांहून जास्त काळ जिवंत राहण्याची शक्यता नसलेल्या अत्यंत आजारी व्यक्तीला सहाय्यकाच्या मदतीने इच्छामरण देता येणार आहे. मात्र, यासाठी दोन डॉक्टरांची मंजुरी आवश्‍यक आहे.
मानवी शरीर आणि वैद्यकीय शास्त्र हे १+१ = २ अशा सूत्रबद्ध गणिती पद्धतीने चालत नाही. एखाद्या इमारतीचे स्ट्रकचरल ऑडिट करण्यासारखे शरीराबाबत करता येत नाही. कोण दोन डॉक्टर ही खात्री देणार की सहा महिनेच आयुष्य शिल्लक आहे (जरी अनुभवाने ९०% शक्यता त्यांना वाटत असली तरीही..) ३. शिवाय डॉक्टर ज्या प्रतिज्ञेच्या नैतिक बळावर शिक्षण आणि व्यवसायकर्म करतात त्याच्या हे अत्यंत विपरीत आहे. मानसिक बैठक इतकी बदलणं डॉक्टर लोकांना जमेल का? असे निर्णय डॉक्टरांवर सोपवण्यामागे सरकारी सिस्टीम नेमकी कशातून मुक्त होऊ पाहात आहे?

दोन डॉक्टर ही खात्री देणार की सहा महिनेच आयुष्य शिल्लक आहे बाडीस असे अनेक रुग्ण मी पाहिले आहेत कि टाटा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना फार तर सहा महिने जातील असे सांगितले असताना पुढे २-३ वर्षे जगले. यात मी ज्यांच्या कडून आपले घर विकत घेतले ते सद्गृहस्थ आणि ( पुढे ४ वर्षांनी) त्यांची पत्नी असे दोघेही समाविष्ट आहेत. (कर्करोगाबाबत) मीच श्रेष्ठ हि भावना टाटा रुग्णालयात दुर्दैवाने फार वेळा पाहायला मिळाली आहे आणि आज तरी सर्वात जास्त रुग्णांचे उपचार टाटा मध्येच होतात. तेंव्हा एखादा रुग्ण सहा महिनेच जगेल असे कोणत्याही डॉक्टरने निदान रुग्णाला तरी सांगू नये. आणि त्या अभिप्रायावर एखाद्या रुग्णाने निराश होऊन आपली जीवनयात्रा संपवण्याची मागणी करणे हे सदोष मनुष्यवधच ठरेल.

या धाग्यावर झालेली चर्चा काही प्रसंगी कठोर वा उर्मट वाटली तरी त्यातील मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. यातील काही मुद्द्यांचा परामर्श विद्या बाळ यांनी त्यांच्या हयातीत घेतला आहे. त्या बाबत व्हिडीओ ची लिंक मी खाली दिली आहे. "इच्छामरण फार व्यापक आहे; एक म्हणजे दया मरण आणि दुसरं म्हणजे स्वेच्छामरण. चित्र काढता काढता आपल्याला असं वाटतं की हा शेवटचा कुंचला फिरवला की आता हे चित्र पूर्ण होईल, असं जेव्हा आयुष्याविषयी वाटतं तेव्हा मला मारायला आवडेल...!" - विद्या बाळ https://youtu.be/vEXSzXAlugw?si=anwitHjimm8M9R9y