मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आनंददायी इहलोक

यनावाला · · काथ्याकूट
आनंददायी इहलोक: यनावाला प्रश्न:- प्रत्येक जीवा एक जन्म । जो प्रथम तोचि अंतिम । नाही कोणाही पुनर्जन्म । ऐसा तुमचा विचार ॥१॥ सत्य जर तो मानियेला । अल्पसा काळ आयुष्याला । मग आनंद तो कसला। क्षणभंगुर जीवनी ? ॥२॥ ईश्वरे घातले जन्मासी । कांही हेतू असेल त्यासी । एका जन्मी पूर्तता कैसी । होईल दैवी हेतूची ?॥३॥ इहलोक हा दु:खमय । प्रत्येकासी मरणभय । येथे मुक्ततेचा उपाय । जनसामान्यां कोणता ? ॥४ ॥ उत्तर :-- मानवा देव जन्म देई । सत्य न मुळी यात काही । जनुक सातत्य राखणे ही । निसर्गऊर्मी जीवांची ॥५॥ निसर्गप्रेरणे कारणे । नर-मादींना अपत्ये होणे । घडे न कोणत्या हेतूने । संबंध नसे देवाचा ॥६॥ माता-पित्यांना होई सुख । जन्मकारण हेचि एक । उद्दिष्ट नसते कारक । कोणाच्याही जन्माचे ॥७॥ असो इहलोक कैसाही । परलोका अस्तित्व नाही । स्वर्गलोकाची कल्पनाही । भ्रामक आहे निश्चित ॥८ ॥ प्रश्न:-- कोsहं ? कोण मी ? पडे प्रश्न । कोणत्या कार्यार्थ जीवन ? । मृत्यूनंतर कोठे गमन ?। नकळे माझे होईल ॥९॥ ऐसे प्रश्न मानवा पडती । आध्यात्मिक गुरू सांगती । "मोक्ष असे परमगती । जन्मा आलिया जीवाची ॥१०॥ यास्तव अध्यात्म जाणावे । गुरु चरणी लीन व्हावे । जीव मोक्षपद तेणे पावे । चुकती फेरे जन्माचे "॥११॥ अध्यात्मज्ञान ब्रह्मज्ञान । प्राप्तकरण्या एक जीवन । अपुरे निश्चित म्हणोन । पुनर्जन्म आवश्यक ॥१२ ॥ उत्तर :-- भासती प्रश्न गूढ गंभीर । आध्यात्मिकांसी निरंतर । थोडा विचार केला तर । सारे प्रश्न फुटकळ ॥१३॥ उत्तर कोण मी? प्रश्नाचे । आधारकार्डीं असे साचे । ते जाणावे नाव तुमचे । सत्य उत्तर निश्चये ॥१४॥ कांही नसते विधिलिखित । जीवनकार्य न नियत । व्यक्ती निवडतात । कार्यक्षेत्र आपापले ॥१५॥ जाणोनि आपुली क्षमता । स्वयंमर्यादा आकळता । कार्यक्षेत्र ये निवडता । उपलब्धता देखोनी ॥१६॥ मृतदेह स्मशानी नेती । दहन वा दफन करिती । धर्मपरत्वे रक्षा, माती । उरती अस्थी केवळ ॥१७॥ अपरिहार्य असे मरण । पुनर्जन्मा न येई कोण । निश्चित हे, परी जीवन । क्षणभंगुर नव्हे हे ॥१८॥ सत्य नसे मोक्षकल्पना । आधार ना अध्यात्मज्ञाना । अध्यात्मगुरूंच्या वल्गना । फुलोरे केवळ शब्दांचे ॥१९॥ वरुषें पाउणशें आयुर्मान । लाभते सर्व साधारण । पंधरा वर्षे बालपण । साठ वर्षे काळ उरे ॥२०॥ नसे लहान कालखंड । सुख उपभोगा उदंड । कित्येक करिती प्रचंड । कार्य आपुल्या जीवनी॥२१॥ सामान्यजन जीवनात । आहे तैशा परिस्थितीत । सुख:दु:खे भोगतात । परिवाराच्या साथीने ॥ २२॥ माता, पिता, भाऊ, बहिणी । आप्तजन मित्र-मैत्रिणी । आनंदाने सारे मिळुनी । सण-सोहळे साजरे ॥२३॥ मुले लेकरे संसारात । धकाधकी ही आयुष्यात । जरी असली जगण्यात । जीवन असते मौजेचे ॥२४॥ वृत्तपत्र सकाळी नवे । उत्सुकतेने वाचन हवे । नाटक चित्रपट पाहावे । जावे संगीत कार्यक्रमा ॥२५॥ वार्ता-चर्चा-मालिका रोज । मनोरंजना टी.व्ही.सज्ज । कार्यालयीन कामकाज । त्यातही असे आनंद ॥२६॥ वाचावे ग्रंथ ज्ञानवर्धक । दृष्टी असावी वैज्ञानिक । खरेदी, सांसारिक कामे । मित्रां भेटणे नित्य नेमे । ऐशा कारणे मन रमे । चिंता, खंती नाठवती ॥२८॥ आपुली आवड जाणोनी । आर्थिक क्षमता समजोनी । कर्तव्यकर्मे न विसरोनी । शक्य आनंद जीवनीं॥२९॥ किंबहुना कर्तव्यपालन । हे समाधानाचे निधान । राहे सुखी, आनंदी मन । स्वकर्तव्ये आचरिता ॥३०॥ जीवनी समस्या अनेक । उद्भवणे हे साहजिक । दु:खद क्षण प्रासंगिक । येणार ऐसे निश्चित ॥३१॥ दैवी उपाय काही नसे । धूर्त गुरूंना मूर्ख फसे । वाया जाती आपुले पैसे । स्वकष्टार्जित कमाई ॥३२॥ संकटांना सामोरे जाणे । अटळ असे ते सोसणे । विचारे समस्या निवारणे । साथ पाहिजे आप्तांची ॥३३॥ स्वर्ग, वैकुंठ, परलोक । अस्तित्वहीन काल्पनिक । एकची सत्य इहलोक । सूर्यमालेत पृथ्वी ही ॥३४॥ सुख-दु:खाचा ताळेबंद । जीवनी मांडता सबंध । निश्चित उरतो आनंद । इहलोकीं असेचि तो ॥३५॥ सत्य मानोनी आत्मा, मोक्ष । शाश्वत आनंद हे लक्ष्य । ठेविल्या जीवन प्रत्यक्ष । दु:खी होणे क्रमप्राप्त ॥३६॥

वाचन 11938 प्रतिक्रिया 0