आनंददायी इहलोक
आनंददायी इहलोक: यनावाला
प्रश्न:- प्रत्येक जीवा एक जन्म । जो प्रथम तोचि अंतिम ।
नाही कोणाही पुनर्जन्म । ऐसा तुमचा विचार ॥१॥
सत्य जर तो मानियेला । अल्पसा काळ आयुष्याला ।
मग आनंद तो कसला। क्षणभंगुर जीवनी ? ॥२॥
ईश्वरे घातले जन्मासी । कांही हेतू असेल त्यासी ।
एका जन्मी पूर्तता कैसी । होईल दैवी हेतूची ?॥३॥
इहलोक हा दु:खमय । प्रत्येकासी मरणभय ।
येथे मुक्ततेचा उपाय । जनसामान्यां कोणता ? ॥४ ॥
उत्तर :-- मानवा देव जन्म देई । सत्य न मुळी यात काही ।
जनुक सातत्य राखणे ही । निसर्गऊर्मी जीवांची ॥५॥
निसर्गप्रेरणे कारणे । नर-मादींना अपत्ये होणे ।
घडे न कोणत्या हेतूने । संबंध नसे देवाचा ॥६॥
माता-पित्यांना होई सुख । जन्मकारण हेचि एक ।
उद्दिष्ट नसते कारक । कोणाच्याही जन्माचे ॥७॥
असो इहलोक कैसाही । परलोका अस्तित्व नाही ।
स्वर्गलोकाची कल्पनाही । भ्रामक आहे निश्चित ॥८ ॥
प्रश्न:-- कोsहं ? कोण मी ? पडे प्रश्न । कोणत्या कार्यार्थ जीवन ? ।
मृत्यूनंतर कोठे गमन ?। नकळे माझे होईल ॥९॥
ऐसे प्रश्न मानवा पडती । आध्यात्मिक गुरू सांगती ।
"मोक्ष असे परमगती । जन्मा आलिया जीवाची ॥१०॥
यास्तव अध्यात्म जाणावे । गुरु चरणी लीन व्हावे ।
जीव मोक्षपद तेणे पावे । चुकती फेरे जन्माचे "॥११॥
अध्यात्मज्ञान ब्रह्मज्ञान । प्राप्तकरण्या एक जीवन ।
अपुरे निश्चित म्हणोन । पुनर्जन्म आवश्यक ॥१२ ॥
उत्तर :-- भासती प्रश्न गूढ गंभीर । आध्यात्मिकांसी निरंतर ।
थोडा विचार केला तर । सारे प्रश्न फुटकळ ॥१३॥
उत्तर कोण मी? प्रश्नाचे । आधारकार्डीं असे साचे ।
ते जाणावे नाव तुमचे । सत्य उत्तर निश्चये ॥१४॥
कांही नसते विधिलिखित । जीवनकार्य न नियत ।
व्यक्ती निवडतात । कार्यक्षेत्र आपापले ॥१५॥
जाणोनि आपुली क्षमता । स्वयंमर्यादा आकळता ।
कार्यक्षेत्र ये निवडता । उपलब्धता देखोनी ॥१६॥
मृतदेह स्मशानी नेती । दहन वा दफन करिती ।
धर्मपरत्वे रक्षा, माती । उरती अस्थी केवळ ॥१७॥
अपरिहार्य असे मरण । पुनर्जन्मा न येई कोण ।
निश्चित हे, परी जीवन । क्षणभंगुर नव्हे हे ॥१८॥
सत्य नसे मोक्षकल्पना । आधार ना अध्यात्मज्ञाना ।
अध्यात्मगुरूंच्या वल्गना । फुलोरे केवळ शब्दांचे ॥१९॥
वरुषें पाउणशें आयुर्मान । लाभते सर्व साधारण ।
पंधरा वर्षे बालपण । साठ वर्षे काळ उरे ॥२०॥
नसे लहान कालखंड । सुख उपभोगा उदंड ।
कित्येक करिती प्रचंड । कार्य आपुल्या जीवनी॥२१॥
सामान्यजन जीवनात । आहे तैशा परिस्थितीत ।
सुख:दु:खे भोगतात । परिवाराच्या साथीने ॥ २२॥
माता, पिता, भाऊ, बहिणी । आप्तजन मित्र-मैत्रिणी ।
आनंदाने सारे मिळुनी । सण-सोहळे साजरे ॥२३॥
मुले लेकरे संसारात । धकाधकी ही आयुष्यात ।
जरी असली जगण्यात । जीवन असते मौजेचे ॥२४॥
वृत्तपत्र सकाळी नवे । उत्सुकतेने वाचन हवे ।
नाटक चित्रपट पाहावे । जावे संगीत कार्यक्रमा ॥२५॥
वार्ता-चर्चा-मालिका रोज । मनोरंजना टी.व्ही.सज्ज ।
कार्यालयीन कामकाज । त्यातही असे आनंद ॥२६॥
वाचावे ग्रंथ ज्ञानवर्धक । दृष्टी असावी वैज्ञानिक ।
खरेदी, सांसारिक कामे । मित्रां भेटणे नित्य नेमे ।
ऐशा कारणे मन रमे । चिंता, खंती नाठवती ॥२८॥
आपुली आवड जाणोनी । आर्थिक क्षमता समजोनी ।
कर्तव्यकर्मे न विसरोनी । शक्य आनंद जीवनीं॥२९॥
किंबहुना कर्तव्यपालन । हे समाधानाचे निधान ।
राहे सुखी, आनंदी मन । स्वकर्तव्ये आचरिता ॥३०॥
जीवनी समस्या अनेक । उद्भवणे हे साहजिक ।
दु:खद क्षण प्रासंगिक । येणार ऐसे निश्चित ॥३१॥
दैवी उपाय काही नसे । धूर्त गुरूंना मूर्ख फसे ।
वाया जाती आपुले पैसे । स्वकष्टार्जित कमाई ॥३२॥
संकटांना सामोरे जाणे । अटळ असे ते सोसणे ।
विचारे समस्या निवारणे । साथ पाहिजे आप्तांची ॥३३॥
स्वर्ग, वैकुंठ, परलोक । अस्तित्वहीन काल्पनिक ।
एकची सत्य इहलोक । सूर्यमालेत पृथ्वी ही ॥३४॥
सुख-दु:खाचा ताळेबंद । जीवनी मांडता सबंध ।
निश्चित उरतो आनंद । इहलोकीं असेचि तो ॥३५॥
सत्य मानोनी आत्मा, मोक्ष । शाश्वत आनंद हे लक्ष्य ।
ठेविल्या जीवन प्रत्यक्ष । दु:खी होणे क्रमप्राप्त ॥३६॥
वर्गीकरण
प्रतिक्रिया
??
हे काथ्याकूट ऐवजी कविता सदरात
आपल्याला काय निमंत्रण दिलं का ?
प्रा डॉ
एक कवी कोटी कवी !!
आमची समज थोडी कमीच आहे
प्रत्येक जीवा एक जन्म । जो
जनुक सातत्य राखणे ही ।
माता-पित्यांना होई सुख ।
परलोका अस्तित्व नाही ।
ते जाणावे नाव तुमचे
व्यक्ती निवडतात ।
जाणोनि आपुली क्षमता ।
अपरिहार्य असे मरण ।
सण-सोहळे साजरे ॥२३॥
राहे सुखी, आनंदी मन ।
शाश्वत आनंद हे लक्ष्य ।
यनावाला....
आवडले...
पुनर्जन्म आणि अध्यात्म
वालावलकर सेठ लिहित राहा.
काव्यातल्या अनेक चांगल्या
सुधारणा
यनावाला साहेब,
छान
यना जी मी तुमचा खूप मोठा
रामराम जी, मूर्खास मूर्ख
बघा यनावाला काव्यातूनही विचार
सर, आपला पुढील लेख प्लीझ लवकर
जर ... हां .. जर मृत्यूनंतर