✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आनंददायी इहलोक

य
यनावाला यांनी
Fri, 11/17/2017 - 21:20  ·  लेख
लेख
आनंददायी इहलोक: यनावाला प्रश्न:- प्रत्येक जीवा एक जन्म । जो प्रथम तोचि अंतिम । नाही कोणाही पुनर्जन्म । ऐसा तुमचा विचार ॥१॥ सत्य जर तो मानियेला । अल्पसा काळ आयुष्याला । मग आनंद तो कसला। क्षणभंगुर जीवनी ? ॥२॥ ईश्वरे घातले जन्मासी । कांही हेतू असेल त्यासी । एका जन्मी पूर्तता कैसी । होईल दैवी हेतूची ?॥३॥ इहलोक हा दु:खमय । प्रत्येकासी मरणभय । येथे मुक्ततेचा उपाय । जनसामान्यां कोणता ? ॥४ ॥ उत्तर :-- मानवा देव जन्म देई । सत्य न मुळी यात काही । जनुक सातत्य राखणे ही । निसर्गऊर्मी जीवांची ॥५॥ निसर्गप्रेरणे कारणे । नर-मादींना अपत्ये होणे । घडे न कोणत्या हेतूने । संबंध नसे देवाचा ॥६॥ माता-पित्यांना होई सुख । जन्मकारण हेचि एक । उद्दिष्ट नसते कारक । कोणाच्याही जन्माचे ॥७॥ असो इहलोक कैसाही । परलोका अस्तित्व नाही । स्वर्गलोकाची कल्पनाही । भ्रामक आहे निश्चित ॥८ ॥ प्रश्न:-- कोsहं ? कोण मी ? पडे प्रश्न । कोणत्या कार्यार्थ जीवन ? । मृत्यूनंतर कोठे गमन ?। नकळे माझे होईल ॥९॥ ऐसे प्रश्न मानवा पडती । आध्यात्मिक गुरू सांगती । "मोक्ष असे परमगती । जन्मा आलिया जीवाची ॥१०॥ यास्तव अध्यात्म जाणावे । गुरु चरणी लीन व्हावे । जीव मोक्षपद तेणे पावे । चुकती फेरे जन्माचे "॥११॥ अध्यात्मज्ञान ब्रह्मज्ञान । प्राप्तकरण्या एक जीवन । अपुरे निश्चित म्हणोन । पुनर्जन्म आवश्यक ॥१२ ॥ उत्तर :-- भासती प्रश्न गूढ गंभीर । आध्यात्मिकांसी निरंतर । थोडा विचार केला तर । सारे प्रश्न फुटकळ ॥१३॥ उत्तर कोण मी? प्रश्नाचे । आधारकार्डीं असे साचे । ते जाणावे नाव तुमचे । सत्य उत्तर निश्चये ॥१४॥ कांही नसते विधिलिखित । जीवनकार्य न नियत । व्यक्ती निवडतात । कार्यक्षेत्र आपापले ॥१५॥ जाणोनि आपुली क्षमता । स्वयंमर्यादा आकळता । कार्यक्षेत्र ये निवडता । उपलब्धता देखोनी ॥१६॥ मृतदेह स्मशानी नेती । दहन वा दफन करिती । धर्मपरत्वे रक्षा, माती । उरती अस्थी केवळ ॥१७॥ अपरिहार्य असे मरण । पुनर्जन्मा न येई कोण । निश्चित हे, परी जीवन । क्षणभंगुर नव्हे हे ॥१८॥ सत्य नसे मोक्षकल्पना । आधार ना अध्यात्मज्ञाना । अध्यात्मगुरूंच्या वल्गना । फुलोरे केवळ शब्दांचे ॥१९॥ वरुषें पाउणशें आयुर्मान । लाभते सर्व साधारण । पंधरा वर्षे बालपण । साठ वर्षे काळ उरे ॥२०॥ नसे लहान कालखंड । सुख उपभोगा उदंड । कित्येक करिती प्रचंड । कार्य आपुल्या जीवनी॥२१॥ सामान्यजन जीवनात । आहे तैशा परिस्थितीत । सुख:दु:खे भोगतात । परिवाराच्या साथीने ॥ २२॥ माता, पिता, भाऊ, बहिणी । आप्तजन मित्र-मैत्रिणी । आनंदाने सारे मिळुनी । सण-सोहळे साजरे ॥२३॥ मुले लेकरे संसारात । धकाधकी ही आयुष्यात । जरी असली जगण्यात । जीवन असते मौजेचे ॥२४॥ वृत्तपत्र सकाळी नवे । उत्सुकतेने वाचन हवे । नाटक चित्रपट पाहावे । जावे संगीत कार्यक्रमा ॥२५॥ वार्ता-चर्चा-मालिका रोज । मनोरंजना टी.व्ही.सज्ज । कार्यालयीन कामकाज । त्यातही असे आनंद ॥२६॥ वाचावे ग्रंथ ज्ञानवर्धक । दृष्टी असावी वैज्ञानिक । खरेदी, सांसारिक कामे । मित्रां भेटणे नित्य नेमे । ऐशा कारणे मन रमे । चिंता, खंती नाठवती ॥२८॥ आपुली आवड जाणोनी । आर्थिक क्षमता समजोनी । कर्तव्यकर्मे न विसरोनी । शक्य आनंद जीवनीं॥२९॥ किंबहुना कर्तव्यपालन । हे समाधानाचे निधान । राहे सुखी, आनंदी मन । स्वकर्तव्ये आचरिता ॥३०॥ जीवनी समस्या अनेक । उद्भवणे हे साहजिक । दु:खद क्षण प्रासंगिक । येणार ऐसे निश्चित ॥३१॥ दैवी उपाय काही नसे । धूर्त गुरूंना मूर्ख फसे । वाया जाती आपुले पैसे । स्वकष्टार्जित कमाई ॥३२॥ संकटांना सामोरे जाणे । अटळ असे ते सोसणे । विचारे समस्या निवारणे । साथ पाहिजे आप्तांची ॥३३॥ स्वर्ग, वैकुंठ, परलोक । अस्तित्वहीन काल्पनिक । एकची सत्य इहलोक । सूर्यमालेत पृथ्वी ही ॥३४॥ सुख-दु:खाचा ताळेबंद । जीवनी मांडता सबंध । निश्चित उरतो आनंद । इहलोकीं असेचि तो ॥३५॥ सत्य मानोनी आत्मा, मोक्ष । शाश्वत आनंद हे लक्ष्य । ठेविल्या जीवन प्रत्यक्ष । दु:खी होणे क्रमप्राप्त ॥३६॥
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11905 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

??

गॅरी ट्रुमन
Fri, 11/17/2017 - 21:28 नवीन
नाही कोणाही पुनर्जन्म
नाही कोणाही पुनर्जन्म हे छातीठोकपणे कसे म्हणता बुवा? फार तर पुनर्जन्म आहे याचा पुरावा नाही किंवा जो काही पुरावा इतरांनी मांडला आहे तो तुम्हाला मान्य नाही असे म्हणा. पुनर्जन्म नाही याचा पुरावा मागणे/देणे आणि एखाद्या माणसाचा गुन्ह्यात हात नाही याचा पुरावा मागणे/देणे यात फार फरक नाही. एखाद्या माणसाचा गुन्ह्यात हात आहे याचा पुरावा नाही हे म्हणणे ठिक आहे. पण त्याचा गुन्ह्यात हात नाही याचा पुरावा कसा काय द्यायचा बुवा? तीच गोष्ट पुनर्जन्माविषयी. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments

हे काथ्याकूट ऐवजी कविता सदरात

सुबोध खरे
Fri, 11/17/2017 - 23:55 नवीन
हे काथ्याकूट ऐवजी कविता सदरात टाकले असते तर न वाचताच फाट्यावर मारता आले असते.
  • Log in or register to post comments

आपल्याला काय निमंत्रण दिलं का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/19/2017 - 19:57 नवीन
आपल्याला काय त्यांनी माझं लेखन वाचाच न गडे असा व्य. नि. टाकला होता काय ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

प्रा डॉ

सुबोध खरे
Sun, 11/19/2017 - 20:30 नवीन
प्रा डॉ ते काव्य आहे लेख नाहीये आम्ही कवितांच्या नादाला लागत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एक कवी कोटी कवी !!

चामुंडराय
Sun, 11/19/2017 - 23:05 नवीन
काय हे खरे काका ! अहो सगळ्या मिपा-कवींचा प्रतिसादांचा धडक मोर्चा तुमच्या खरड वहीवर येईल बर्र्का असे काही म्हटलं तर. एक कवी कोटी कवी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आमची समज थोडी कमीच आहे

सुबोध खरे
Mon, 11/20/2017 - 23:24 नवीन
आमची समज थोडी कमीच आहे त्यामुळे आम्हाला सरळ असलेला अर्थ तेवढा समजतो. कवितेत आम्हाला समजलेला अर्थ कवी ला अभिप्रेतच नसतो बऱ्याच वेळेस. त्यामुळे आम्ही गदिमा शांता बाई आणि मंगेश पाडगावकर यांच्यापालिकडे जातच नाही. मिपा वरही काव्य या प्रकाराकडे पाहत नाही. उगाच कळत नाही त्यात नाक खुपसायला आम्ही काय "ते हे"नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय

प्रत्येक जीवा एक जन्म । जो

arunjoshi123
Sat, 11/18/2017 - 00:23 नवीन
प्रत्येक जीवा एक जन्म । जो प्रथम तोचि अंतिम ।
यनावाला, तुमचा जिनोम कोड कितीही किचकट असला तरी तो रिपीट व्हायची शक्यता आहेच हो. असलं गैरवैज्ञानिक बोलत नका जाऊ. कदाचित गेल्या २२ लाख वर्षांत ज्या लाखो टोळ्या होऊन गेल्या, त्यात एक यनावाला होऊनही गेला असेल.
  • Log in or register to post comments

जनुक सातत्य राखणे ही ।

arunjoshi123
Sat, 11/18/2017 - 00:25 नवीन
जनुक सातत्य राखणे ही । निसर्गऊर्मी जीवांची ॥५॥
निसर्गात जनुकसातत्य आहे, अश्मसातत्य का नाही म्हणे?
  • Log in or register to post comments

माता-पित्यांना होई सुख ।

arunjoshi123
Sat, 11/18/2017 - 00:27 नवीन
माता-पित्यांना होई सुख ।
बॅक्टेरियांना सुख झाल्याची कथा वाचली नाही.
  • Log in or register to post comments

परलोका अस्तित्व नाही ।

arunjoshi123
Sat, 11/18/2017 - 00:28 नवीन
परलोका अस्तित्व नाही ।
पृथ्विवर परग्रहावरून जीवन आले आहे ही एक अधिकृत उत्क्रांतीची थेरी आहे.
  • Log in or register to post comments

ते जाणावे नाव तुमचे

arunjoshi123
Sat, 11/18/2017 - 00:32 नवीन
ते जाणावे नाव तुमचे
मी आत्ताच माझ्या स्पिकरवर "य ना वालावलकर" असा स्टिकर चिटकावला. --------------- अहो, नाव ही एक अबस्ट्रॅक्ट संकल्पना आहे. ते कसं एका सत्याचं स्वरुप असेल?
  • Log in or register to post comments

व्यक्ती निवडतात ।

arunjoshi123
Sat, 11/18/2017 - 00:34 नवीन
व्यक्ती निवडतात । कार्यक्षेत्र आपापले ॥१५॥
जसे, बिनधास्त पाप करणे.
  • Log in or register to post comments

जाणोनि आपुली क्षमता ।

arunjoshi123
Sat, 11/18/2017 - 00:36 नवीन
जाणोनि आपुली क्षमता । स्वयंमर्यादा आकळता ।
व्यक्तींची वर्तने का भिन्न असतात? जनुकांमुळे? मग जनुके बदलून द्यावीत, तुरुंगात का टाकावे?
  • Log in or register to post comments

अपरिहार्य असे मरण ।

arunjoshi123
Sat, 11/18/2017 - 00:39 नवीन
अपरिहार्य असे मरण । पुनर्जन्मा न येई कोण ।
विज्ञानात जीवन नावाची कोनतीही संकल्पना नाही. फक्त रासायनिक, भौतिक, आण्विक, इ इ प्रक्रिया आहेत. त्यामुळे पुर्न काय, पहिला जन्म देखील नसतो.
  • Log in or register to post comments

सण-सोहळे साजरे ॥२३॥

arunjoshi123
Sat, 11/18/2017 - 00:41 नवीन
सण-सोहळे साजरे ॥२३॥
सण? डुलकी लागली होती का लिहिताना?
  • Log in or register to post comments

राहे सुखी, आनंदी मन ।

arunjoshi123
Sat, 11/18/2017 - 00:44 नवीन
राहे सुखी, आनंदी मन । स्वकर्तव्ये आचरिता ॥३०॥
साधा तुम्हाला प्रश्न करणाराविरुद्ध तुम्ही जो डुख धरता, त्याचे मानसिक स्वास्थ्य काढता नास्तिकतेचा तुमच्या व्यक्तिशः उलट परिणाम झालेला दिसतो. तीच अवस्था सर्व नास्तिकांची दिसते.
  • Log in or register to post comments

शाश्वत आनंद हे लक्ष्य ।

arunjoshi123
Sat, 11/18/2017 - 00:48 नवीन
शाश्वत आनंद हे लक्ष्य ।
चरण कुठे आहेत?
  • Log in or register to post comments

यनावाला....

चौकटराजा
Sat, 11/18/2017 - 05:35 नवीन
नेव्हर एक्सप्लेन युवर फ्रेन्ड्स डोन्ट नीड अ‍ॅन्ड एनीमीज वोन्ट बिलिव्ह !असे सत्य शोधनातही असते. माणूस संवेदनाक्षम वयात जे भले वाईट कानावर घेतो डोळ्याने पहातो. ते नंतर बदलत नाही. कोणत्याही भल्या वाईट अनुभवा॑चे आपल्या सम॑जुतीने परीशीलन करण्याची मनाला संवय लागते ती कायमची. अपवाद क्व॑चित.
  • Log in or register to post comments

आवडले...

Duishen
Sat, 11/18/2017 - 06:07 नवीन
रचना आणि विचार दोन्ही आवडले! मानवा देव जन्म देई । सत्य न मुळी यात काही । जनुक सातत्य राखणे ही । निसर्गऊर्मी जीवांची ॥५॥ निसर्गप्रेरणे कारणे । नर-मादींना अपत्ये होणे । घडे न कोणत्या हेतूने । संबंध नसे देवाचा ॥६॥ माता-पित्यांना होई सुख । जन्मकारण हेचि एक । उद्दिष्ट नसते कारक । कोणाच्याही जन्माचे ॥७॥ असो इहलोक कैसाही । परलोका अस्तित्व नाही । स्वर्गलोकाची कल्पनाही । भ्रामक आहे निश्चित ॥८ ॥
  • Log in or register to post comments

पुनर्जन्म आणि अध्यात्म

सतिश गावडे
Sat, 11/18/2017 - 21:12 नवीन
पुनर्जन्म आणि अध्यात्म (एक्स्क्लुडींग मोक्ष) हे मुद्दे सोडून इतर मुद्द्यांशी सहमत.
  • Log in or register to post comments

वालावलकर सेठ लिहित राहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/19/2017 - 20:04 नवीन
लेखन वाचतोच. पण भूतलावरील काही सुक्ष्म जिवांचा त्रास बघवत नै हो. ;) लिहित राहा....! -दिलीप बिरुटे (वालावलकरसेठचा पंखा ) :)
  • Log in or register to post comments

काव्यातल्या अनेक चांगल्या

arunjoshi123
Sun, 11/19/2017 - 22:18 नवीन
काव्यातल्या अनेक चांगल्या सल्ल्यांशी सहमती आहे.
  • Log in or register to post comments

सुधारणा

यनावाला
Mon, 11/20/2017 - 20:21 नवीन
"आनंददायी इहलोक" मधील ओवी क्र.२७ पुढीलप्रमाणे : ...... वाचावे ग्रंथ ज्ञानवर्धक । दृष्टी असावी वैज्ञानिक । चिकित्सा असे आवश्यक । स्वयंबुद्धीने करावी ॥२७॥
  • Log in or register to post comments

यनावाला साहेब,

मामाजी
Sat, 11/25/2017 - 22:23 नवीन
यनावाला साहेब, हा प्रश्न फार पुरातन आहे. कठोपनिषत् नावाचे एक उपनिषद आहे. त्यात नचिकेत नावाचा मुलगा यमा कडे जातो व त्याला सरळ प्रश्न करतो की काही लोकांच्या मते मृत्यु नंतर मनुष्याचे अस्तित्व पूर्णपणे नष्ट होते तर काही लोकांच्या मते मृत्यु नंतर काहीतरी शिल्लक रहाते तेव्हा आपल्या सारख्या अधिकारी व्यक्ति कडुन यातले सत्य काय आहे ते जाणून घ्यायची ईच्छा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला

छान

babu b
Tue, 11/21/2017 - 00:32 नवीन
छान
  • Log in or register to post comments

यना जी मी तुमचा खूप मोठा

Ram ram
Wed, 12/06/2017 - 22:05 नवीन
यना जी मी तुमचा खूप मोठा समर्थक आहे, तुमच्या लेखांवर उलट प्रतिक्रिया देणारे ममहामुर्खआहेत. तुम्ही त्यांना अनुल्लेखाने मारता हे मला खूप आवडते.
  • Log in or register to post comments

रामराम जी, मूर्खास मूर्ख

arunjoshi123
Sat, 12/09/2017 - 18:12 नवीन
रामराम जी, मूर्खास मूर्ख मूर्ख वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ram ram

बघा यनावाला काव्यातूनही विचार

प्रकाश घाटपांडे
Sat, 12/09/2017 - 13:31 नवीन
बघा यनावाला काव्यातूनही विचार मांडतात. विचारांना कवितेचे वावडे नसते. जे चार्वाका सांगतोय तेच यनावाला सांगताहेत ना? खाओ पिओ मजा करो. कुठला स्वर्ग अन कुठला नरक? भस्मिभूतस्य देहस्य पुनरा गमनः कुतः|
  • Log in or register to post comments

सर, आपला पुढील लेख प्लीझ लवकर

arunjoshi123
गुरुवार, 12/14/2017 - 17:49 नवीन
सर, आपला पुढील लेख प्लीझ लवकर टाकावा. आपल्या लेखनाच्या मजा काही औरच आहे.
  • Log in or register to post comments

जर ... हां .. जर मृत्यूनंतर

nishapari
गुरुवार, 12/14/2017 - 23:30 नवीन
जर ... हां .. जर मृत्यूनंतर दुसऱ्या जन्मआधी स्वर्ग / नरक म्हणजे हे आपण माणसांनी दिलेले शब्द झाले पण तत्सम काही ठिकाणं असतील , जिथे थोडा काळ घालवून , पाप-पुण्याचे हिशेब थोडे चुकते करून मग दुसऱ्या जन्माला जायचं असेल तर अशा ठिकाणी प्रत्यक्षच गेल्यावर यनावालांची काय बरं प्रतिक्रिया होईल ?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा