मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[शशक' १९] - ग्लास

समीरसूर · · स्पर्धा
केशवने चार ग्लास भरले. बाहेर सुंदर चांदणं पडलं होतं. "आज जेवन झाल्यावर कोल्ड्रिंग पिऊ आपन...पोरांना आवडंल बघ. आपल्या गावात पानी नाय भेटत प्यायाला पण कोल्ड्रिंग लगेच भेटतयं! तेच पिऊन पाहू; कळंल तरी नुसतं प्यायासाठी आहे की पिकाला बी चालंल..." केशव किंचित खिन्नपणे गौरीशी बोलत होता. गौरीने केशवकडे नुसतं पाहिलं आणि मुलांना हाक मारली. "आये, शुभमनं माझं सर्टिफिकेट खराब केलं." कल्याणी रडू लागली. "कसलं सर्टिफिकेट?" केशवने विचारले. “शाळेत गनिताची एक स्पर्धा झाली होती. त्याच्यात दुसरा नंबर आला माझा, बाबा!" केशव विचारात गुंतला. "गौरी, काहीतरी गोडधोड कर. ते कोल्ड्रिंग नाय प्यायचं.” गौरीने चमकून केशवकडे पाहिलं. केशव सगळे ग्लास मोरीत रिकामे करत होता.

वाचन 49489 प्रतिक्रिया 83