.... बाकी तुमचं चालू द्या।
काल एक मेसेज आला.... गुढीपाडवा साजरा करू नका... कलश म्हणजे राजाचं शिर... वगैरे वगैरे. काल मुद्दाम डेक्कनवर गेलो... आमच्या राजाला नमस्कार केला. आज गुढी उभारली... कडुनिंबाची पानं खाल्ली... श्रीखंड केलं.... बाकी तुमचं चालूद्या!
काही लोकांनी दीपिका पदुकोणचं नाक - शिर उडवण्याची मागणी केली म्हणे. तिने भारतीय संस्कृतीचा अपमान... वगैरे वगैरे... चित्रपट बघितला नाही पण ती पोरगी दृष्ट लागण्याइतकी सुंदर दिसते. तिचे काही चित्रपट आवर्जून पुन्हा पुन्हा बघतो... छान वाटतं....बाकी तुमचं चालूद्या!
फेसबुकवर पोस्ट वाचली....मुसलमानांनी नेहेमीच हिंदूंना.... वगैरे वगैरे. दिल्लीच्या उन्हाळ्यात टळटळीत दुपारी जामा मस्जिदीत गेलो... अचानक अकल्पित घुमलेल्या अजानच्या आवाजानी अंगावर सरसरून काटा आला. जागीच गुढघ्यांवर बसलो... पुढची काही मिनिटं मंत्रमुग्ध अवस्थेत गेली. मला माझा अल्ला दिसला! बाकी तुमचं चालू द्या!
मध्ये पेपरात एका नेत्याने म्हणल्याचं वाचलं... बाबासाहेबांनी मनुवाद्यांच्या विचारांवर....वगैरे वगैरे. बाबासाहेबांचं Annihilation of Caste वाचलं. त्या महामानवाच्या विचारांचा आवाका आणि अभ्यास वाचून थक्क झालो... त्यांची अजून खूप पुस्तकं वाचायची आहेत.... बाकी तुमचं चालूद्या!
मोदींनी देशाची वाट लावली... ६५ वर्षांत काँग्रेसने जितकं लुटलं नाही त्याहीपेक्षा जास्त....वगैरे वगैरे. २६ जानेवारीला परेडच्या वेळी त्या माणसाची देहबोली बघून खूप छान वाटलं. आपल्या सेनेची ताकद बघून अभिमान वाटला.... आपल्या प्रगतीचं कौतुक वाटलं.... बाकी तुमचं चालूद्या!
श्रीदेवीच्या जाण्यानंतर अपघात की घातपात... प्लास्टिक सर्जरी ... लाईफस्टाईल मेनटेन करण्यासाठीचा ताण ... तिच्या इन्श्युरन्सचे पैसे...वगैरे वगैरे. इंग्लिश विंग्लिश पुन्हा बघितला... इतक्या गुणी कलाकाराचा असा दुर्दैवी आणि अकाली अंत झाल्याचं वाईट वाटलं... डोळ्यांच्या कडा पाणावल्या.... बाकी तुमचं चालूद्या!
सगळ्या ब्राह्मणांनी एकत्र येऊन आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ह्या जातीयवादी सरकारला... वगैरे वगैरे. गेल्या वीकेंडला आमच्या शाहीनभाभीला मुद्दाम हलीम - खिचडा बनवायची फर्माईश केली. त्या माउलीनेसुद्धा प्रेमाने खाऊ घातलं. वकार बरोबर मस्त गप्पा झाल्या...खाण्याचा चट्टामट्टा झाला... बाकी तुमचं चालूद्या!
ही परप्रांतीय लोकं... बाहेरून येऊन आपल्या मराठी हक्कांची पायमल्ली... वगैरे वगैरे. गाझियाबादमधल्या माझ्या घरी मुखर्जी, सिंग, यादव, मल्लिकार्जुन, अनासपुरे, खान कुटुंबियांची गणपतीच्या आरतीला आवर्जून हजेरी असायची... अजूनही उकडीचे मोदक मिस करतो असं सांगतात... बाकी तुमचं चालूद्या!
ह्य गोर्यांनी नेहेमीच भारतीयांना हीन वागणूक... वगैरे वगैरे. आमच्या काळ्या माइकने होसेरा मॉस्टीरोला वडापावातून कच्ची हिरवी मिरची खायला घातली. होसेराला ब्रह्मांड आठवलं आणि तो माइकला अस्सल स्पॅनिशमधून शेलक्या शिव्या घालायला लागला... किम आणि मी हसून हसून लोळलो.... बाकी तुमचं चालूद्या!
आपल्याला एकमेकांपासून वेगळं करणार्या हजार गोष्टी आहेत. पण माणूस असणं ही एक गोष्ट आपल्याला एकत्र आणायला पुरेशी नाही का? आम्ही कोणी "अल्लाहू" म्हणालं की "अकबर" म्हणणार... कोणी "जो बोले सो निहाल" म्हणालं की "सत श्री अकाल" म्हणणार... कोणी "गणपती बाप्पा" असं ओरडलं की "मोssssssरया" असा प्रतिसाद देणार.. कोणी "भारत माता की" म्हणालं की "जय" म्हणणार आणि "वंदे" ला "मातरम" म्हणणार! बाकी तुमचं चालूद्या!
जे.पी.मॉर्गन
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सौ टके की बात ! आवडलीच.
असं कसं? असं कसं?
आज बगलमें छुरी मूहमें झुटी
आणि हो हे राहिलेच...
सायीची ढेकर.
धूराकडे किती लक्ष द्यावे किती देऊ नये ?
सायीची ढेकर.
निधर्मी आणि पुरोगामी
मस्त लेख
..छान चाललंय की !
.... बाकी तुमचं चालू द्या
ह्या सगळ्याची सत्यता पडताळून कशी पहाणार
मस्त लेखन
प्रिय गा,पै,गिरीजा टिक्कू
Girija Tickoo हे स्पेलिंग
जन्त राजा विषयी सविस्तर लिवा
"जन्त" राजा =))
जन्त राजा विषयी सविस्तर लिवा