✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पेशवाईतल्या गमतीजमती

म
मनो यांनी
Fri, 02/16/2018 - 06:03  ·  लेख
लेख
ही माहिती मला उल्लेखनीय वाटली म्हणून काही पुस्तकातून जवळपास जशीच्या तशी घेतली आहे. इतिहास संशोधकांना अर्थात ती आधी माहित असेलच. शक्य तिथे मूळ पुस्तकाचे उल्लेख केले आहेत. नवीन संशोधनाबद्दल वाचायचे असेल तर थोडी वाट पहा - दोन लेख नवीन माहितीसह देणार आहे काही दिवसात, एक साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्याबद्दल आणि दुसरा पुण्याच्या शनिवारवाड्याबद्दल ... :). १) श्री. यशवंत नरसिंह केळकर यांनी 'मराठी रियासत - उत्तरविभाग १ - सवाई माधवरावाच्या पूर्वायुष्यक्रम' या गो स सरदेसाई यांच्या पुस्तकात दोन पानी लेख लिहिला आहे. त्यातले गमतीशीर उतारे - काही नावांवर असा विचित्र संस्कार घडतो कि त्यावरून तो इंग्रजीतला शब्द आहे याचा संशयही येणार नाही. उदाहरणे - अँडरसन चा इंद्रसेन - नारंज चा नारद - थॉमसन चा तामसेन (तानसेनाचा जुलै भाऊ शोभावा !) - सार्टोरियस चा सरताऊस - मॅडॉक चा मंडूक - मेडोज चा मंडूस - रॉड्रिक चा रुद्रक - कारमायकेल चा कर्मखल - रॉस लॅम्बर्ट चा रासलंपट पूर्ण मूळ यादीच इथे खाली जोडली आहे. pic1 कपतान हालकी, बष्टर, कारनीदर, कालकिराफ, सिकसिपेल, जुरस फिरंगी, वगैरे शब्दांचे वा नांवांचे मूळ युरोपियन शब्द काय असावेत ते उकलत नाहीत. (मिसळ्पावकरांचे काही अंदाज? प्रतिक्रियेत टाका) २) नारायण गोविंद चापेकर यांच्या 'पेशवाईच्या सावलींत' या पुस्तकाचा उल्लेख मागे केला आहे. त्यातले काही निवडक उतारे. चिपळूणकर सावकारांविषयी (हुंडीच्या लेखात अरविंद कोल्हटकरांनी त्यांचा उल्लेख केला आहे तेच हे चिपळूणकर) ------- चिपळूणकर हे फार मोठे सावकार होते. ह्यांचं घर बुघवारांत भाजीआळीत होते, होळकर, जमाखिंडीकर, सांगलीकर, भोरकर, अक्कलकोटकर, रामदुर्गकर वगेरे सर्व संस्थामिकांस हे कर्जाऊ रकमा देत असत. दाजी गंगाघर ह्यांच्या नांवाने बहुतेक जमाखर्च आहेत. ह्यावरून हाच कुटुंबाचा पुढारी होता असें दिसतें. तो शा. १७५१ वेशाख शु. ७ रविवारी वारला. त्याच्या बायकोचें नांव रमाबाई, दार्जीचे वडील भिक्षुक असावे, कारण गंगाघर भट ह्या नांवाने ते ओळखले जात. श. १७५२ सालची कीर्द गंगाधर भटांच्या नांवाने आहे. तो निराळा राहत असावा. कारण त्याचा अन्नखर्च निराळा पडला आहे (शर. १७४७). दाजी गंगाधराला बापूजी गंगाधर नांवाचा भाऊ होता असें वाटते. गंगाधरशास्त्रयास पंढरपूर येथे देवदर्शनास येण्याविषयी श्रिंबकजी डेगळ्याने बोलावणे पाठविले त्या वेळीं बापूजी गंगाघरशास्त्र्यांच्या घरीं त्यांच्याजबळ बोलत बसला होता. ... ... कर्ज देण्याधैण्याचा व्यवहार फार मोठ्या प्रमाणावर चालत असे, खुद्द सरकार व त्यांचे सरदार दरकदार ह्यांना नेहमी कर्ज सावकारी काढावें लागत असल्यामुळे सावकारी घंदा करणाऱ्या व्यवहार पेढ्यांचे जाळें राज्यांत निर्माण झालें. ब्राह्मण सावकारही पुष्कळ होते. लाखो रुपये एका रकमेने ते कर्ज देत, रकम फार मोठी अखल्यास तीन चार सावकार मिळून समायिक कर्ज देत, हातावर कर्जाऊ रकमा देत, परंतु बहुधा खतें लिहून घेऊनच कर्ज देण्याचा प्रघात होता. वचनचिठ्ठीचा प्रकार मात्र आढळत नाही. कर्जरोखे व गहाणखते हीच मुख्यतः असत. तारण गहाण असे तर्सेंच कबजे गहाण असे. “व्याजाच्या ऐवजी मोजे मजकूरचा ऐवज गोसावी याची खासगत शेते वजा करून घ्यावा” कर्ज फेडण्याची मुदत नमूद केलेली असे, रासमाथा ( सुगीवर ), आळदीची यात्रा अशासारखी मुदत असे. हातावरील कर्जाला थोड्या महिन्यांची मुदत ठेवण्यांत येई. मुदतीत कर्जफेड न झाल्यास सावकार खतांत नमूद केलेली मिळकत आपल्या कब्जात घेई. स्थावर मिळकत व कुळकरणासारखीं वतने कर्जाकरता गहाण टाकीत. जंगम मालात सोनं, पागा, तरवार, कापड ही गहाण टाकलेली आढळतात, कुळकरण गहाण टाकल्याचे उदाहरण: ४०० रु. जमा भगवंतगव देशपांडे. . . मल्हार ब्राब्राजी तट यार्थ कुळकरण मोजे डोबले गहाण होतें ते सोडवून सीवाजी नारायण यांजकडे ठेवून वगैरे... .... सोनं गहाण ठेवल्यास आठ आणि व्याजाने पैसे मिळत. एरव्ही १, १।,१॥, १॥, २, २। स. दरमहा दर शेकडा अशा दराने व्याज द्यावें लागे. सयाजीराव गायकवाडला लाख रुपयांच्या कर्जाला १। रु. दराचे व्याज होतें. किरकोळ रकमांना व्याजादाखल धान्य देत. “बाजार निरखापेक्षा १ शेर रुपयास जाजती'. हेच व्याज, तेल्यास कर्जाऊ रक्कम दिल्यास ठरलेल्या भावाने ठरीव मुदतीपर्यंत तेल घेत. भाव उतरल्यास उतरत्या भावाने पण चढल्यास कराराच्या भावाने अशी शत घालीत , ज्या नाण्यांत कर्जाची रक्कम दिली असेल त्याच नाण्यांत ती परत करण्याचा करार कधी कधी करीत. कर्ज देतांना मनोती कापून घेत. मनोतीचा दर शेकडा १ पासून २ रुपयापर्यंत असे. कर्जफेडीच्या वेळीं सूट देण्यांत येई; तथापि बिनसुटीची शर्त असल्यास सूट देत नसत, कर्जफेडींत मामलत लावून घेण्याचाहि प्रघात होता. “दीड महिन्यांत एकोत्रा व्याजाने व्याज मुद्दलसुद्धा रुपये न फेडल्यास ९ गांवचे मामल्याची सनद द्यावी." प्रामाणिकपणा बर्‍याच प्रमाणांत होता. दंग्याच्या भीतीने दुसऱ्यापार्शी ठेव ठेवीत. अशा ठेवी तो मनुष्य मेल्यावर त्याच्या स्त्रीने कबूल करून परत दिल्याची उदाहरणे नमूद आहेत. पण कर्ज वसूल करण्यास हल्लीप्रमाणे कोर्टे नव्हर्ती, फार करून सावकारालाच वसुलीचा उपाय करावा लागे. हा उपाय म्हणजे धरणें बसणें हा होय. लोकांच्या त्या वेळच्या समजुतींवर ह्या उपायांची उभारणी केलेली दिसते. सावकार कर्ज मागण्यास कुळाकडे आपला नोकर अथवा इतर कोणी पाठवी. हा मनुष्य कुळाच्या घरांत चोवीस तास उपाशी बसून राही. ओटीच्या पुढल्या दरवाजांत बसे, घरांत कोणी उपाशी राहिल्यास घरांतील माणसांनाहि उपवास पडे. आपणांस उपोषण घडते व दुसरा उपवासाने तळतळत आहे द्याचा परिणाम आपणांस भोगावा लागेल ह्या भीतीने कूळ हरप्रयत्न करून कांही तरी वसूल देई, कधी कधी स्वतः यजमान धरणें घरून बसे, कुळाने चटकन पैसे द्यावे म्हणून घरण्याकरता परजातीच्या माणसाचा उपयोग करीत (१३०). ऋणकोस उपोषण पाडणे याला क्षेत्र करणे म्हणत. चिपळूणकर आपल्या कैफियतींत लिहितात “नंतर आम्ही कासीकर याचे दुकानी जातीनिसी (घरांतील) थोर थोर मंडळी व कारकून मंडळी मिळोन तगाद्यास तीन दिवस उपाशी बसून .. ". एका माणसाकडे चिपळूणकरानी २० क्षेत्र केलीं. "कांही वेळां उपोषित मजबरोबर बसले होते व काही वेळां जेवले?” एका भिक्षुकानी आपले पैसे वसूल होत ना हें पाहून गणपर्तांच्या देवळांत उपोषणे करण्यास सुरवात केली. ही वार्ता श्रीमंतांच्या कातावर गेली, तेव्हा “आज्ञा जाली की भट्जीचे रुपये (कुळाकडून) देववावे'' ३) प्रवासाची साधने घोडीं व डोल्या ही मनुष्याच्या प्रवासाचीं साधनें होत. मालाची ने आण उंट व बैल यावरून होई. बैलगाड्या फारशा प्रचारांत नव्हत्या. नागपुरास जाण्यास डोलीला खंडित रुपये ८५ ठरले होते, परंतु कुंभकोणमचें भाडे २० रुपयेच दिसते. गुळसुंद्यादून पुण्यास जाण्यास डोली व घोंडी मिळून ११ रु. भाडे पडलें होते. चालण्याच्या कामांत घोड्याशीं माणसें स्पर्धा करीत. पुण्याहून सातारा ७० मैल आहे. हा सत्तर मैलांचा प्रवास एका दिवसांत करणारे लोक होते. नेवाशाहून दोन दिवसांत जासूद चालत आले म्हणून त्यांना १।। रुपया इनाम मिळाले आहे. परिस्थितीमुळे गुण उत्पन्न होतात आणि परिस्थितीमुळेच नष्ट होतात. घोडा दुसऱ्याला वाहून नेतो पण मनुष्य आपल्यालाच वाहून नेतो ही गोष्ट खरी. तथापि निरोप जलद पोचावा असा हेतू असल्यास थोडक्या पैशांत मनुष्य पाठवूनच तो हेतु साध्य होतो. म्हणून डाकेवर जासुदांची योजना होत असे. सर्व हिंदुस्थानभर पेशव्यांच्या फौजा फिरत असल्यामुळे इकडून तिकडे बातमी पोचविण्याची व्यवस्था करणे भाग होतें. त्यामुळे टपाल ठिकठिकाणीं लोक ठेवून पत्रे पाठविण्याची योजना अमलात आली होती. बातम्या आणण्यापोचवण्यासाठी मुद्दाम माणसे ठेवीत त्यास डाक ठेवणें म्हणत. कोकणांत बातम्या आणण्यासाठी मचवे ठेवलेले असत त्यास बातमीचे मचवे म्हणत ( पे. रो. पुस्तक ८, पान २२० ). अमुक दिवशी मचवे परत आलेच पाहिजेत किंवा अजूरदाराने अमुक मैल चाललेंच पाहिजे असा नियम असे. सरकारच्या जरुरीकरता डाकेची पद्धति प्रथम अस्तितवात आली; खासगी खुषालीची पत्रे पाठाविण्याची अडचण तेव्हा लोकांना भासत असे, यात्रेला निघाल्यावर मात्र घरची खुशाली आपल्याला व आपली खुशाली घरच्या माणसांना कळवावी अर्सें वाटणे स्वाभाविक होते. ही गरज 'भागाविण्यासाठी आठवले ह्यांची काशी ते पुणे डाक स्थापन झाली असावी. सरकारी व सावकारी अशा दोन डाका निर्माण झाल्या. ह्या पुस्तकांत डाकेचा पहिला उल्लेख हा, १७०१ मधील आहे. ह्या पुस्तकांत कल्याण ते काशी, कल्याण ते मुंबई, पुणे ते नाशिक, ग्वाल्हेर-सातारा इतक्या डाकांचा उल्लेख आलेला आहे, पत्रे तोलून वजनावर हाशील घेत. चार आणे तोळा असे 'हाशील' असे. सावकारी डाकेत विमा उतरून जिन्नस पाठविण्याची रीत होती ही गोष्ट लक्षांत घेण्यासारखी आहे. मालाच्या किंमतीवर शेकडा दोन रुपये एक आणे हा विम्याचा दर होता. जिथे डाक नसेल अगर डाकेचें हाशील भरमसाट असेल तेथे जासूद पत्रे देऊन पाठवीत. एका जासुदाजवळ अनेक लोकांचीं पत्रें असत. ज्याला पत्रे पाठविलीं असतील तो पत्रे घेऊन येणाऱ्या जासुदाला पैसे देई. पत्रे पाठविणाराने कांही द्यावयाचे नाही. ही सवयच पुढे नाटपेड पत्रे पाठविण्यास कारणीभूत झाली असावी. पत्राचा मालक मिळाला नाही आणि त्यामुळे पत्र परत आलें तर निराळें हाशील द्यावे लागे; उदाहरणार्थ 'हशील डाकेचे, पुण्याहून लखोटा मुंबईस पाठविला होता तो तेथे स्वारी नाही म्हणून पुन्हा पुण्यास आला, त्याबद्दल देणें आठवले यास'. पत्ते लिहिण्यांत पत्र पाठविणारांना बरीच सवलत असे. थत्त्यांना पाठविलेल्या पत्राच्या लखोट्यावर 'थत्ते न मिळाल्यास चिपळूणकरांनी त्यांस ते असतील तेथे पाठवावा' असा मजकूर आहे ४) गुन्हे चोरी, मारामारी, खून, शिवीगाळी, व्यभिचार, बेअब्रू करणें, अतिक्रमण, आत्महत्या, मनुष्य पळवून नेणे, नोकरीचा करार मोडणे, मुक्या जनावरांस इजा करणें, बळत्याचीं कामे न करणें, गांव सोडून जाणे, सरकारी कायदे मोडणे (उ. परवानगीवांचून तंबाखू कापणे अगर खरीपाचा माल तयार करणें), गाय नांगराला धरणे, वजनमापांत फसवणे, दुसरे गांवची सोयरीक करणें अशा प्रकारचे गुन्हे तर होतेच परंतु खोटीं भुते घालणे अथवा भुत घातल्याचा खोटा आरोप करणें हेहि गुन्हे मानले जात. मुलाने आपल्या आईजवळ गैरसनदी कटकट केली ह्या दोषामुळे त्याला आठ आणि दंड झाला आहे. कोणाला न कळत दुसऱ्याकडून इजा झाल्यास त्याची पैसे देऊन समजूत करण्यांत येत असे, खाजगीवाल्यांचा बारगीर घोड्यावर बसून हजेरीस जात असतां एका कुणबिणीस धक्का लागला आणि ती पडली सबब तिला एक रुपया देण्यांत आला. ५) धाग्याचे नाव जरी गमतीजमती असले तरी जुन्या काळचे सगळेच तपशील मनोरंजक नाहीत. एक अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह प्रकार म्हणजे गुलामगिरी. मनुष्याची खरेदीविक्री पेशवाई अखेरपर्यंत चालू होती. बायकाप्रमाणे पुरुषांचीहि विक्री कदाचित होत असे, परंतु हे पुरुष बहुधा मुसलमान असावे. 'सिद्दी सुंबरखा ह्याला कर्जीत घेतला होता तो ९० रुपयांना विकला.' बायकांची खरेदी-विक्री फारच मोठया प्रमाणाबर होई, अर्थात ह्या अविवाहित स्त्रिया असत, पोरी थोरी कोणत्याहि वयाच्या स्त्रिया विकत मिळत. ह्या दरिद्री स्त्रिया असत. स्त्रियात हिंदूंचा भरणा जरी विशेष असला तरी मुसलमान पोरीही विकत घेत आणि ह्या मुसलमानींनासुद्धा कुणबिणी म्हणत. ५०, ७५, ९०, १०० रुपयेपर्यंत कुणबिणीची किंमत येई, घरकामाकरता तसेंच उत्तरकार्यात दासीदानाकरिता कुणबिणी उपयोगी पडत. हरिदास, भिक्षुक, पुराणिक हे सुद्धा कुणबिणी खरेदी करीत. मोठ्या अमलदारांना कमाविसात कधी कधी कुणबिणी मिळत. म्हणजे त्यांच्याकरता पैसे द्यावे लागत नसत. ज्या पदार्थाची खरेदी करतां येते तो पदार्थ गहाणहि टाकत येतो, बाळाजीपंत नातूंचा नोकर गाडेकर नांवाचा होता. त्याची गंगा कुणबीण गहाण घेऊन तिच्यावर त्याला चिपळूणकरांनी २० रु, कर्ज दिलें होतें आणि तेही इ. स. १८२२ साली म्हणजे ब्रिटिश अमदानींत. भावांमध्ये वांटणी झाली म्हणजे इतर जिनसांप्रमाणे कुणबिणीही वांटून घेत, एकच कुणबीण असल्यास तिची किंमत करून ती ज्याच्याकडे जाईल तो दुसऱ्याला तिची निम्मी किंमत देई, गुलामगिरीतून मुक्त करावयाची झाली तर तिच्यापासून नजर घेत. सणावारी कुणबिणींस पोस्त मिळे; दिवाळीची ओवाळणी मिळे. त्यांना नेसावयास लुगडी व पायांत घालण्यास जोडाहि देण्यांत येई. सरकारी कुणबिणी दुसर्यास पैसे घेऊन कामास देत. ६) इंग्रजी काळातले आर्थिक शोषण राज्य घेण्यापूर्वी इंग्रजांनी मराठ्यांचा बाजार जिंकला, हातचा व्यापार जात चालला ह्याची मराठी राज्यांत एकानेहि फिकीर केली नाही. व्यापार हस्तगत केल्याने इंग्रजांना पैसा तर मिळालाच पण शिवाय मराठ्यांमध्ये देशाभिमान नाही व दृरदृष्टीहि नाही हेहि त्यांस कळून चुकले, ह्या अनुभवाचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला, इ. स. १७४५ पासून (हया पुस्तकांतील नोंदीप्रमाणे ) आमच्या बाजारांत सर्वत्र इंग्रजी माल खेळूं लागला. कापड, कागद, लोखंडी सामान ( चुका, कुलप, मेखा वगेरे ), काचेचे सामान (आरसे, फाणस, तावदाने वगेरे), तर्सेच घड्याळे, चहादाण्या इत्यादि पदार्थ ह्यांनी बाजार फुलून गेले, ज्योतिषी पंचाग इंग्रजी कागदावर लिहू लागले; इनामपत्रे लिहिण्यास विलायती कागदांवाचून अडू लागलें; घरांतील मोडलेली विळी दुरुस्त करण्यास “इंग्रज” येऊन बसला; इंग्रजी पोलादाशिवाय तोफांचे काने भरणें अशक्य झाले; बायका व पुरुष छिटी कापडाने आपलीं शरीरे विभूषित करू लागलीं. त्याबरोबर मांजरपाट, जगन्नाथी हे शब्दहि आमच्या तोंडांत ठाणे मांडून बसले, सोप बाजारांत आलाच पण भाषेतही घुसला. ह्याप्रमाणे इंग्रजांनी आमचा बाजार काबीज केला. मूळ पुस्तक इथे मिळेल. 'पेशवाईच्या सावलीत' https://docs.google.com/file/d/0B0vwUrnl4_0dQlBfZTNaSFZzVGc/edit
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
21965 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

विंट्रे्स्टिंग

प्राची अश्विनी
Fri, 02/16/2018 - 09:22 नवीन
विंट्रे्स्टिंग
  • Log in or register to post comments

ह्याप्रमाणे इंग्रजांनी आमचा बाजार काबीज केला.

अर्धवटराव
Fri, 02/16/2018 - 09:36 नवीन
ह्म्म. काहि शतकांनी आपण चीनच्या बाबतीत देखील हेच म्हणणार असं दिसतय. बाकि तुमच्या लेखणीची तारीफ करावी तितकी कमीच.
  • Log in or register to post comments

रोचक किस्से आहेत एकेक.

प्रचेतस
Fri, 02/16/2018 - 10:19 नवीन
रोचक किस्से आहेत एकेक. गुलामगिरीची प्रथा शिवाजी महाराजांनी बंद केली होती ना? मग परत केव्हापासून सुरु झाली? संभाजी राजांनीही पोर्तुगीजांना गुलामगिरीवरुन सज्जड दम दिल्याचे एक पत्र वाचल्याचे स्मरते.
  • Log in or register to post comments

मला जेवढं आठवतंय त्याप्रमाणे

मनो
Fri, 02/16/2018 - 10:54 नवीन
मला जेवढं आठवतंय त्याप्रमाणे आपल्या मुलुखातून माणसे पकडून गुलाम बनवण्यास घेऊन जाणे यास छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठेतरी एका पत्रात मनाई केली होती. सरसकट सर्व प्रकारची गुलामगिरी बंद होती का ते मला माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

छत्रपतींनी ६० 'बटकी' स्त्रिया

अनिंद्य
Fri, 02/16/2018 - 11:32 नवीन
छत्रपतींनी ६० 'बटकी' स्त्रिया पुण्यातून 'विकत' घेऊन सातारच्या महाली पाठवाव्यात असे पत्र माधवराव पेशव्यांना धाडले असे नक्की वाचले आहे. बरेच दिवस हे काम न झाल्यामुळे रिमाइंडर सुद्धा पाठवले होते. बटकी म्हणजे दासी / स्त्री गुलाम असे असेल तर गुलाम व्यापाराची प्रथा तत्कालीन समाजात बराचकाळ असावी. संदर्भ नक्की आठवत नाही :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

अतिशय उत्तम धागा

दुर्गविहारी
Sat, 02/17/2018 - 19:00 नवीन
अतिशय उत्तम धागा. मि.पा.वर ईतिहासाचे धागे यायला लागलेत हे बघून बरे वाटले. तुमचे मागचे धागे वाचायचे राहिलेत, तेव्हा त्यावरच्या प्रतिसादासाठी रुमाल टाकून ठेवतो. बाकी गुलामगिरीविषयी लिहायचे तर शिवकालात अरबी लुटारू कोकणातल्या किनार्‍यावरच्या स्त्री-पुरुषांना पकडून एडनच्या बाजारात गुलाम म्हणून विकायचे. शिवाजी महाराजांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी मराठे पाठवून त्या अरबी चाच्यांना पकडले आणि वासोट्यावर कैदेत ठेवले. वासोट्याची हवा खाल्यानंतर त्या अरबचाच्यांची अक्कल ठिकाणावर आली आणि हा प्रकार बंद झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

रोचक किस्से

सिरुसेरि
Fri, 02/16/2018 - 11:04 नवीन
गुलामगिरीची प्रथा हि माधवराव पेशवे यांच्या काळापर्यंत चालु होती . रामशास्त्री यांच्या विनंतीवरुन श्रीमंत माधवराव पेशवे यांनी हि प्रथा बंद केली ऐसे ऐकीवात आहे .
  • Log in or register to post comments

कारमायकेल चा कर्मखल !!

अनिंद्य
Fri, 02/16/2018 - 11:22 नवीन
कारमायकेल चा कर्मखल !! आणि Achmuty चा एकमुठी ! रॉस लॅम्बर्ट चा रासलंपट :-) :-) :-) खूप हसलो. हाशील चा अर्थ नव्याने कळला. एक प्रश्न :- 'मनोती' म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments

मनोतीचा अर्थ शब्दकोशात असा

मनो
Fri, 02/16/2018 - 12:10 नवीन
मनोतीचा अर्थ शब्दकोशात असा आहे - व्याजाखेरीज दिलेला जास्त मोबदला . रक्कम घेतांनाच कापून घेतलेलें व्याज . पु ल देशपांड्याचं 'टपाल हशील निराळे' वालं माझे पौष्टिक जीवन तुम्ही वाचलेलं वा ऐकलेलं दिसत नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य

हाशील

तुषार काळभोर
Sat, 02/17/2018 - 10:37 नवीन
हाशील हा शब्द माझी आजी वापरत असे. अजूनही (किमान) पुण्याच्या ग्रामीण भागात ७०+ वय असलेल्या लोकांकडून हा शब्द सर्रास वापरला जातो. हा शब्द साधारण असा वापरला जातो:स्वारगेटहून भोरला हाशिलाला (प्रवासाचं तिकीट) 30 रुपये लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

हशील / हाशील शब्दाचे फारसी

अनिंद्य
गुरुवार, 02/22/2018 - 15:47 नवीन
हशील / हाशील शब्दाचे फारसी आणि उर्दूतील 'हासिल' शब्दाशी खूपच साम्य दिसते आहे. उर्दू हासिल चा अर्थ प्राप्ती, मोबदला असा आहे आणि तोही थोडा जुळतो आहे :-) आभार - अनिंद्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

रंजक

मराठी कथालेखक
Fri, 02/16/2018 - 11:50 नवीन
लेख आवडला
  • Log in or register to post comments

छान

manguu@mail.com
Fri, 02/16/2018 - 12:02 नवीन
इंग्रजानी बाजार काबीज केला. व्यापाराच्या परवानग्या संबंधित संस्थानिक , राजेमहाराजानी दिल्या. त्यामोबदल्यात इंग्रजांकडून पैसेही घेतले जात होते. व्यापाराच्या मोबदल्यात राजे कर्जही घेत होते. सुरुवातीला कपडे , फण्या , भांडी अशा वस्तू विक्रीस ठेवल्या जात होत्या. जनतेला त्या आकर्षकच वाटत होत्या. कालांतराने कातडी वस्तू , मांस , कत्तलखाने इ व्यवसायातही इंग्रज शिरु लागले , अन मग जनमत विरोधात गेले. https://en.m.wikipedia.org/wiki/Bundelkhand_Agency
  • Log in or register to post comments

मिपाच्या इतिहासात हा प्रतिसाद

आनन्दा
Fri, 02/16/2018 - 13:34 नवीन
मिपाच्या इतिहासात हा प्रतिसाद सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे.. जुग जुग जिओ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

खूप छान!! पुनश्च धन्यवाद!

हतोळकरांचा प्रसाद
Fri, 02/16/2018 - 12:26 नवीन
खूप छान!! पुनश्च धन्यवाद!
  • Log in or register to post comments

जबरी लेख, मजा आली वाचायला

उपेक्षित
Fri, 02/16/2018 - 12:46 नवीन
जबरी लेख, मजा आली वाचायला
  • Log in or register to post comments

वा वा!!

सुखीमाणूस
Fri, 02/16/2018 - 12:49 नवीन
खूप माहिती मिळते आहे. गुलामी प्रथेचे वाईट वाटल.
  • Log in or register to post comments

मला वाटायचं गुलामगिरी हे

आनन्दा
Fri, 02/16/2018 - 13:35 नवीन
मला वाटायचं गुलामगिरी हे प्रथा पाश्चात्य आहे.. आणि अस्पृश्यता भारतीय. पण हे काहीतरी वेगलेच..
  • Log in or register to post comments

लेख वरवरच वाचलाय पण एक शंका:

एमी
Fri, 02/16/2018 - 13:46 नवीन
लेख वरवरच वाचलाय पण एक शंका: भिक्षुकचा मुलगा सावकार कसा झाला असेल? मोठीमोठी कर्ज देण्याएवढा पैसा कुठून आला त्याच्याकडे?
  • Log in or register to post comments

अगदी.

गवि
Fri, 02/16/2018 - 14:23 नवीन
भिक्षुकचा मुलगा सावकार कसा झाला असेल? मोठीमोठी कर्ज देण्याएवढा पैसा कुठून आला त्याच्याकडे?
याला +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

+२

सस्नेह
Fri, 02/16/2018 - 15:11 नवीन
अगदी हेच मनात आले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

भिक्षुकाचा मुलगा सावकार

अरविंद कोल्हटकर
Sun, 02/18/2018 - 08:29 नवीन
भिक्षुकाचा मुलगा सावकार झाला म्हणजे शब्दश: पेशव्यांना कर्ज देण्याइतका बडा सावकार झाला असे नाही. त्या काळात ज्याच्याकडे काही थोडीफार बचत असेल ती गरजूंना व्याजावर उसनी द्यायची सर्रास पद्धत होती. आमच्या घरातील जुन्या कगदात माझ्या आजोबांच्या बहिणीने कोणासतरी छोटी रक्कम व्याजावर उसनी दिल्याची एक चिठ्ठी होती आणि ती मी लहानपणी पाहिल्याचे स्पष्ट आठवते. आता माझी ही आजी काही मोठी सावकार नव्हती. तसेच कोणा भिक्षुकाने काही किरकोळ रक्कम उसनी दिली असावी असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पण इथे हा उल्लेख

गवि
Sun, 02/18/2018 - 08:56 नवीन
पण इथे हा उल्लेख चिपळूणकारांच्या बाबतीत आल्याने ही शंका स्पेसिफिक आहे.
चिपळूणकर हे फार मोठे सावकार होते. ह्यांचं घर बुघवारांत भाजीआळीत होते, होळकर, जमाखिंडीकर, सांगलीकर, भोरकर, अक्कलकोटकर, रामदुर्गकर वगेरे सर्व संस्थामिकांस हे कर्जाऊ रकमा देत असत. दाजी गंगाघर ह्यांच्या नांवाने बहुतेक जमाखर्च आहेत. ह्यावरून हाच कुटुंबाचा पुढारी होता असें दिसतें. तो शा. १७५१ वेशाख शु. ७ रविवारी वारला. त्याच्या बायकोचें नांव रमाबाई, दार्जीचे वडील भिक्षुक असावे, कारण गंगाघर भट ह्या नांवाने ते ओळखले जात. श. १७५२ सालची कीर्द गंगाधर भटांच्या नांवाने आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरविंद कोल्हटकर

सहज शक्य आहे

पैसा
Sun, 02/18/2018 - 11:12 नवीन
पेशव्यांचे पूर्वाजसुद्धा असेच गरिबीतून वर आले होते. घरातल्या एखाद्या कोणी सरकारी नोकरी मिळवून थोडेफार पैसे कमावले की घराला ऊर्जितावस्था येत असे. मग ते जमिनी कसायला घेणे, खोती मिळवणे असे करत श्रीमंत झाले असतील. दर वेळी दुसऱ्याच्या माना मुरगळून किंवा लबाडी करून माणूस पैसे मिळवतो असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

भिक्षुक हा शब्द साधारणतः

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 02/22/2018 - 11:38 नवीन
भिक्षुक हा शब्द साधारणतः भिक्षुकी करणार्‍यांसाठी वापरला जातो. भिक्षुकी करणे म्हणजे भिक्षा मागणे नव्हे. पौरोहित्याला सुद्धा भिक्षुकी असाच शब्द वापरला जाई/अजुनही वापरला जातो. आणि त्यात बर्‍यापैकी उत्पन्न असे. त्यातुनही पेशवाईत तर भटा-ब्राह्मणांना बरेच बरे दिवस असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अन्याय

शेखर
Fri, 02/16/2018 - 17:32 नवीन
भिक्षुकचा मुलगा सावकार होणे हा समाजावर अन्याय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

माझ्या पाहण्यातला/तोंड ओळखीचे

विशुमित
Fri, 02/16/2018 - 18:47 नवीन
माझ्या पाहण्यातला/तोंड ओळखीचे मुळशीचे करोडपती गुंठा मंत्राचे वडील अजून देखील लोकल ने येऊन दुधाचा रतीब घालतात. मुलाचे काहीतरी कर्तृत्व असेल आणि वडील त्यापासून अलिप्त राहिले असतील, असे काहीतरी असेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

तो पण सावकारच असावा. हौस

परिंदा
Fri, 02/16/2018 - 20:09 नवीन
तो पण सावकारच असावा. हौस म्हणून भिक्षुकी करत असेल. आताच्या काळात पण चांगले मोठ्या हुद्द्यावरचे लोक भिक्षुकी करतात पार्टटाईम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

दाजींच्या भट या नावावरून लेखक

मनो
Sun, 02/18/2018 - 00:41 नवीन
दाजींच्या भट या नावावरून लेखक चापेकर यांनी भिक्षुक असावेत असा अंदाज केला आहे, ती काही पक्की माहिती नाही. पेशवाईत अनेक कुटुंबे उच्चपदास चढली, श्रीमंत झाली, त्यामुळे भिक्षुकाचा मुलगा सावकार झाला असेल तर त्यात फार काही आश्चर्य नाही. पेशवाईतल्या तुळशीच्या लग्नाला आजच्या खऱ्या लग्नापेक्षा थाटमाट आणि खर्च केल्याचे उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

मस्त!

पैसा
Fri, 02/16/2018 - 14:06 नवीन
खूपच मनोरंजक प्रकरण आहे. शिवाजी आणि संभाजी महाराजांनी आपल्या प्रजाजनाना गुलाम म्हणून पकडून नेऊ नये अशी पत्रे बहुधा पोर्तुगिज आणि सिद्दी यांना लिहिली होती. नेमका संदर्भ शोधावा लागेल. परंतु नातेवाईक लोकांनी गुलाम म्हणून विकणे हा प्रकार थांबला होता का याबद्दल कल्पना नाही. कदाचित त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशात गुलामगिरी बंद झाली असेल पण इतर भारतभर चालूच असणार. हे दोघे गेल्यानंतर वतने चालू झाली तशी गुलामगिरी पुन्हा सुरू झालेली असू शकते. माधवराव पेशव्यांनी वेठ पद्धत बंद केली असे नुकतेच वाचले. पुन्हा संदर्भ हाताशी नाही. >>> कपतान हालकी, बष्टर, कारनीदर, कालकिराफ, सिकसिपेल, जुरस फिरंगी>>> कॅप्टन halley, बॅक्स्टर, कॅलिगरी, सॅक्स्पेल, जॉर्जेस असू शकतील. कारानिदार जरा विचार करते. :)
  • Log in or register to post comments

रोचक आणि रंजक लेख.

सस्नेह
Fri, 02/16/2018 - 15:12 नवीन
रोचक आणि रंजक लेख. बटकी किंवा कुणबीण ही प्रथा इंग्रजांच्या काळातही होती असे दिसते.
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच मस्त लेख..

पुंबा
Fri, 02/16/2018 - 15:23 नवीन
नेहमीप्रमाणेच मस्त लेख.. पेशवाईच्या सावलीत पुस्तक वाचलेच पाहिजे असे दिसते..
  • Log in or register to post comments

फारच रोचक माहिती ! असेच लिहित

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 02/16/2018 - 15:23 नवीन
फारच रोचक माहिती ! असेच लिहित रहा. तुमच्या लेखांची प्रतिक्षा असते.
  • Log in or register to post comments

अगदी अगदी.

गवि
Fri, 02/16/2018 - 15:33 नवीन
अगदी अगदी. मनोजी आणि अकोजी ही नावंही अगदी शिवरायकालीन, पेशवेकालीन म्हणून शोभतात. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

छान!

कंजूस
Fri, 02/16/2018 - 18:22 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

रोचक ससंदर्भ आणि माहितीपूर्ण

माहितगार
Fri, 02/16/2018 - 19:56 नवीन
रोचक ससंदर्भ आणि माहितीपूर्ण लेख .
  • Log in or register to post comments

खूप छान माहिती.

प्रमोद देर्देकर
Fri, 02/16/2018 - 20:32 नवीन
खूप छान माहिती.
  • Log in or register to post comments

कपतान हालकी, बष्टर, कारनीदर,

आदूबाळ
Fri, 02/16/2018 - 20:34 नवीन
कपतान हालकी, बष्टर, कारनीदर, कालकिराफ, सिकसिपेल, जुरस फिरंगी, वगैरे शब्दांचे वा नांवांचे मूळ युरोपियन शब्द काय असावेत ते उकलत नाहीत. (मिसळ्पावकरांचे काही अंदाज? प्रतिक्रियेत टाका)
हालकी = Halkirk (एक गेलिक आडनाव) बष्टर = Buster कारनीदर = Cornelian कालकिराफ = ? सिकसिपेल = ? जुरस फिरंगी = jours fériés (हा फ्रेंच होता का?)
  • Log in or register to post comments

कालकिराफ: मला कार्कारॉफ आठवला

पिशी अबोली
Sat, 02/17/2018 - 01:48 नवीन
कालकिराफ: मला कार्कारॉफ आठवला हॅरी पॉटरमधला... पण हे 'कार्ल क्रॉफ्ट' वगैरे असू शकेल. सिकसिपेल हा कुणीतरी 'बेल' असेल. ही सगळी नावं मराठी भाषेतील उपलब्ध ध्वनी, आणि इंग्रजी लोकांचे उच्चार याचा ताळमेळ घालत बनली आहेत. त्या काळात मराठी लोकांना इंग्रजीची गरज नव्हती हे जाणवून वेगळंच वाटलं... बाकी लेख रोचक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

फारच रोचक माहिती

मंदार कात्रे
Fri, 02/16/2018 - 20:50 नवीन
फारच रोचक माहिती
  • Log in or register to post comments

मी जेम्स स्टुअर्ट = इस्तूर

वीणा३
Fri, 02/16/2018 - 21:42 नवीन
मी जेम्स स्टुअर्ट = इस्तूर फाकडा असं ओळखीच्या काही लोकांकडून ऐकलंय (बाकी काहीच माहिती नाही )
  • Log in or register to post comments

मस्त लेख.

अभिजीत अवलिया
Fri, 02/16/2018 - 22:27 नवीन
मस्त लेख.
  • Log in or register to post comments

सरदार अण्णा खासगीवाले

रमेश आठवले
Sat, 02/17/2018 - 23:11 नवीन
पेशव्यांचे सरदार अण्णा खासगीवाले यांच्या विषयी हा किस्सा ऐकला आहे. त्यांना व्यायामाचा शोक होता. खासगीवाले एकदा पेशव्यांच्या कडच्या पंगतीत जेवायला बसले होते . त्यांना खूप भूक लागली होती, पण वाढायला उशीर होत होता. शेवटी वाढप्या साखरभाताची परात घेऊन त्यांच्या पर्यंत पोहोचला. त्यांनी त्याच्या हातातील परात खेचून घेऊन सगळा साखरभात आपल्या ताटात वाढून घेतला. जेवण सम्पल्यावर त्यांनी त्यांच्या डाव्या हाताने पाणी प्यायचे चांदीचे भांडे दाबून त्याचे मुटकुळे करून ठेवले.
  • Log in or register to post comments

....

manguu@mail.com
Tue, 02/20/2018 - 02:19 नवीन
परातीतला सर्व माल ताटात बसला , तर ते ताट केवढे असेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

वाढप्या साखरभाताची परात घेऊन

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 02/20/2018 - 11:05 नवीन
वाढप्या साखरभाताची परात घेऊन त्यांच्या पर्यंत पोहोचला तेव्हा ताटात मावण्याइतकाच (किंवा त्यापेक्षा कमी) माल परातीत उरला असेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

धन्यवाद

रमेश आठवले
गुरुवार, 02/22/2018 - 11:20 नवीन
धन्यवाद डॉ. म्हात्रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

खाजगीवाले या नावाबद्द्ल खूप

खटपट्या
Sun, 02/18/2018 - 23:50 नवीन
खाजगीवाले या नावाबद्द्ल खूप कुतुहल आहे. हे आडनाव का पडले असावे? खाजगीवाले म्हणजे नक्की कोण?
  • Log in or register to post comments

असेच अजून

पैसा
Tue, 02/20/2018 - 10:34 नवीन
असेच अजून जिनसीवाले हे एक नाव आहे. राजेलोकांचे सरकारचे आणि खाजगी हिशेब (अकौटिंग) वेगळे असत. आता कंपनीचा आणि त्या कंपनीच्या मालकाचा एक individual म्हणून वेगळा अकाउंट असतो तसे. खाजगी खात्याचा हिशेब बघणारे ते खाजगीवाले असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

जप्तीवाले हेही नाव ऐकलं आहे.

गवि
Tue, 02/20/2018 - 12:36 नवीन
जप्तीवाले हेही नाव ऐकलं आहे. बिनिवाले हे आणखी एक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सैन्यातली आघाडीची तुकडी ==

मनो
Tue, 02/20/2018 - 22:14 नवीन
सैन्यातली आघाडीची तुकडी == बिनी, बिनीची फळी असा शब्दप्रयोग आहे. त्यानुसार सैन्यांत आघाडीस राहणारे ते बिनीवाले. जप्तीवाले हे नांव मी इतिहासात वाचलेलं नाही त्यामुळे माहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा