Skip to main content

बाजीराव अ‍ॅट बिठूर

लेखक मनो यांनी शुक्रवार, 02/02/2018 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभूमी हे किस्से म्हणजे पुराव्यासकट सिद्ध करता येण्यासारखा इतिहास नव्हे. कुणी पाहिलेल्या, ऐकलेल्या, त्यात स्वतःची भर घालून सांगितलेल्या अश्या या दंतकथा आहेत. त्यामुळे त्यांना फार गंभीरपणे घेऊ नये अशी एक सूचना. यातले काही 'मंत्रावेगळा' कादंबरीकार ना. स. इनामदार यांनी लिहिले आहेत. काही विंचूरकरांच्या इतिहासात आहेत. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामांत लढलेल्या नानासाहेब पेशवे यांच्या चरित्रात काही सापडते. प्रतुलचंद्र गुप्ता या माणसाने दुसऱ्या बाजीरावावर ईस्ट इंडिया कंपनीचा पत्रव्यवहार वाचून जे अनमोल संशोधन केले आहे त्यात काही सापडते. मला सगळी पुस्तके एकत्र मिळाली नाहीत, त्यामुळे काही बाबी स्मरणशक्तीवर विसंबून टाकल्या आहेत, त्यात किरकोळ चुका नक्कीच असतील. (पुढला भाग 'मागणी तसा पुरवठा' या तत्वावर लिहिला जाईल, तेंव्हा लेख आवडल्यास प्रतिक्रिया जरूर टाका) दुसरे बाजीराव पेशवे (बहुदा शिळा प्रेस चित्र) bajirao ३ जून १८१८ पेशवे दुसरे बाजीराव अखेर अशीरगडाजवळ धूळकोट येथे माल्कम साहेबाबरोबर वाटाघाटी करून त्याला शरण गेले. तहातील अटीनुसार बाजीरावास लगेच एका दिवसाच्या आत इंग्रजांच्या स्वाधीन होऊन महाराष्ट्राबाहेर उत्तरेत जावे लागले. या वेळीसुद्धा बाजीरावासोबत बापू गोडबोले बक्षी, हुजुरातीच्या पागा आणि स्वार, बापू गोखले यांच्या निसबतीतील रामचंद्र वेंकटेश, बाळाजीपंत मराठे, भिकाजी जगताप, विंचूरकरांचे दिवाण बाळोबा सालकाढे, ढमढेर्यांचे सरदार श्रीधर बापू दामले यांची पागा अशी काही नावे सापडतात. बुंदेलखंडात अजूनही शांतता प्रस्थापित झाली नसल्यामुळे पेशव्यास राजपुताना मार्गे अजमेर, मथुरा या दिशेस जावे लागले. हा प्रवास चालू असतानाच उत्तरेत नक्की कुठे बाजीरावास ठेवायचे याचा निर्णय ठरत होता. सुरुवातीस काशी ही जागा सर्वांस पसंत होती, पण नंतर इतर पर्याय पुढे आले. त्यापैकी मुंघेर, गोरखपूर हे पर्याय तिथल्या गरम हवामानामुळे बाजीरावास मान्य झाले नाहीत. शेवटी गव्हर्नर जनरलच्या निर्णयानुसार गंगेकाठचे बिठूर म्हणजे ब्रह्मावर्त (कानपूरपासून १४ मैल) ही जागा बाजीरावास मान्य करावी लागली. बाजीरावाचा आग्रह असा होता कि त्याला पंतप्रधान अथवा पेशवे असाच संबोधले जावे. पण इंग्रजांनी त्यास 'महाराजा' बाजीराव अशी नवीनच पदवी लावली. एका अर्थे बाजीराव १८१८ साली पेशवाईच्या 'मंत्रा'वेगळा झाला, त्यामुळे इनामदारांनी कादंबरीस दिलेले शीर्षक अगदी समर्पक आहे. पेशव्यांना भरपूर वार्षिक तनखा मंजूर करण्यात इंग्रजांची अशी अटकळ होती की बाजीराव फार काळ जगणार नाही, कारण पेशवे घराण्यातले पुरुष या आधी फार जगले नव्हते. पण इंग्रजांची अपेक्षा खोटी ठरवत बाजीराव पेशवे ७६ वर्षे जगले. त्यामुळे पेशव्यांना मिळणार्या वार्षिक रकमेचा एकूण एकदा प्रचंड मोठा झाला. त्याबद्दल इंग्रज अधिकाऱ्यांनी एकदुसर्याला दोष दिलेला सापडतो. पेशव्यांचे उत्पन्न मोठे असले तरी त्यांनी ते सर्व खर्चही करून टाकले. त्यामुळे त्यांचा मुलगा नानासाहेब पेशवे यांची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक होती. १८५७ नंतर तर पेशव्यांच्या खुणा सांगणाऱ्या साऱ्या वास्तू मुद्दाम जमीनदोस्त करण्यात आल्या. त्यामुळे आज आपल्याला त्यातले फार थोडे पाहायला मिळते. उध्वस्त पेशवे वाडा wada इंग्रजांनी बाजीराव पेशव्यास दक्षिणेबरोबर कोणताही पत्रव्यवहार करण्यास बंदी घातली होती. कोणीही महाराष्ट्रातून त्यांना भेटू नये असा इंग्रज सरकारचा आदेश होता. बाजीरावाचे दत्तक पुत्र धोंडोपंत उर्फ नानासाहेब पेशवे यांच्या मुंजीची आमंत्रणेसुद्धा इंग्रज सरकारने बाजीरावास पाठवू दिली नाहीत. सरकारचा असा संशय होता की बाजीरावास शिंदे, होळकर, गायकवाड आणि भोसले हे सामील होतील आणि मग सर्व मराठे एक झाले तर त्यांना हरवणे फार कठीण होईल. बिठूरच्या ककमिशनरच्या अहवालात आपल्याला अनेक कारस्थाने, गुप्त पत्रव्यवहार याचे वारंवार उल्लेख सापडतात. बहुतेक सगळ्या वेळी पेशवे सैन्यासह दक्षिणेत पुण्यास जाणार अशी अफवा उठलेली दिसते. पेशवे जसे वृद्ध होत गेले तसे या अफवा कमी होत गेल्या. अशीरगड https://www.youtube.com/watch?v=AXJEgR1VA-I बऱ्हाणपूर जवळचा अशीरगडाचा किल्ला त्या वेळी शिंद्यांच्या ताब्यात होता. इंग्रजांनी शिंद्यावर दडपण आणून तो किल्ला आपल्या ताब्यात घेतला. शिंद्यांचे तसे हुकूम घेऊन इंग्रज सेनाधिकारी अशीरगडावर किल्ला ताब्यात घेण्यासाठी गेले. किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्या वेळी किल्लेदाराबरोबर झालेला इंग्रज सेनाधिकाऱ्याचा संवाद मोठा वैशिष्ट्यपूर्ण आहे. किल्लेदार लाड असे म्हणतात की माझे धनी शिंदे यांची माझ्यावर आता खास इतराजी (म्हणजे नाखुषी, नाराजी) होणार हे नक्की. इंग्रज सेनाधिकाऱ्यास काही कळेना - तो म्हणतो की तुमचे धनी शिंदे यांनीच तुला किल्ला ताब्यात दिल्याचा हुकूम केला आहे, मग हुकुमाचे पालन केल्यावर शिंद्यांची इतराजी का होईल? किल्लेदार म्हणतांत, तुम्हा युरोपिअन लोकात असे कागदी हुकूम मानायची पद्धत असेल. (किल्ल्याकडे हात करून) हा असा बलदंड किल्ला इतक्या सहज शत्रूच्या ताब्यात द्यायचा नसतो. त्यापेक्षा लढून मरून का गेला नाहीस असं धनी मला विचारतील. ============= हा प्रसंग विंचूरकरांच्या घराण्यातील एकाने ना. स. इनामदार याना मंत्रावेगळा कादंबरी प्रकाशित झाल्यावर सांगितला. सरदार विंचूरकरांच्या घराण्याचा राघोबादादांच्या काळापासून पेशव्याच्या या शाखेशी घनिष्ट संबंध होता. विठ्ठल शिवदेव विंचूरकर हे राघोबादादांच्या गोटातले समजले जात. त्यांचे वंशज रघुनाथ विठ्ठल विंचूरकर यांनी उत्तरेस तीर्थयात्रेच्या निमित्ताने बराच प्रवास केला. अश्या एका यात्रेत ते १८५० साली काशीच्या वाटेवर असताना ब्रह्मवर्तास येऊन पेशवे बाजीराव यांना मुद्दाम भेटले. त्या वेळी पुण्यात लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी त्यांच्या शतपत्रात पेशवाईवर सडकून टीका केली होती. अखेरच्या दुसऱ्या बाजीराव पेशव्याने राज्य घालवले, तो विलासी, स्त्रीलंपट होता, पराक्रम गाजवणाऱ्यापेक्षा त्याचे व्यक्तिगत विलास पुरवणार्यांना तो जवळ करत होता असा त्यातून अर्थ निघत होता. सरदार विंचूरकर यांनी आपल्या धन्याला म्हणजे पेशव्याला ह्या बातम्या दाखवल्या. लोकहितवादींचे वडील हरी देशमुख गोखल्यांच्या पदरी कारकून होते ही गोष्ट पेशव्यांना स्मरली. पेशवे विषादाने म्हणाले - 'हरीच्या मुलाने असं लिहावं?'. मग काही काळ पेशवे गप्प होते. पेशव्याचे नंतरचे उद्गार असे होते - 'हरी देशमुखांना आम्ही एक वाडा बांधून दिला होता. त्यांच्यावर आम्ही कृपा केली आहे ती याच कारणासाठी असं त्याला म्हणायचे आहे का?' ============= ब्रह्मवर्ताचा शनिवारवाडा प्रवेशद्वार wada1 नंतर बांधलेल्या बिठूर रेल्वेस्टेशन जवळ पेशव्यांचा दोन चौकी, दोन मजली वाडा होता. पण पेशव्यांना तो त्यांचा मान-मरातबास साजेसा नाही, लहान आहे असे वाटले. म्हणून त्यांनी एक नवा वाडा बांधला. तो कित्येक एकर जमिनीवर पसरला होता. त्याला 'शनिवार वाडा' असच नाव दिले होते. गालिचे, आरसे, चिनी वस्तू, हस्तिदंत यांनी तो वाडा सजवलेला होता. काचेची सुंदर झुंबरे टांगली होती. पेशव्यांच्या सर्व पूर्वजांची चित्रे भिंतीवर टांगलेली होती. ओवरी wada2 वाड्याला बाहेरून तट बांधलेला होता. आत ७ मोठ्या विहिरी होत्या. एक मोठे देऊळ होते. उध्वस्त दालने wada3 wada4 ब्रिटिशांनी या साऱ्याचा विध्वंस केला. फक्त ७ विहिरी काय त्या आज वाचल्या आहेत - त्या ही का तर त्यात खजिना दडवला आहे या अफवेमुळे त्या वाचल्या. ============= सरस्वतेश्वर महादेव मंदिर mahadev हे मंदिर स्थानिक लोक पेशव्याचे मंदिर म्हणून ओळखतात. महाराष्ट्रातून येताना पेशव्यांबरोबर वाराणसीबाई आणि सरस्वतीबाई अश्या दोन बायका होत्या. सरस्वतीबाईंचे निधन ब्रह्मावर्त इथे झाल्यावर गंगेकाठी त्यांना अग्नी देण्यात आला. त्या जागेवर पेशव्यांनी घाट आणि एक महादेवाचे मंदिर बांधले. त्याला सरस्वतेश्वर महादेव मंदिर असे नाव दिले. मला या मंदिराचे नवीन छायाचित्र सापडले नाही. कुणाला हा भाग माहित असल्यास नवीन छायाचित्र मिळाले तर इथे जोडता येईल. पेशव्याचे सर्व वाडे आणि मंदिरे १८५८ साली इंग्रजांनी कानपूरच्या हत्याकांडाचा नानासाहेब पेशव्यांवर सूड म्हणून सुरुंग लावून जमीनदोस्त केली. हे एकमेव मंदिर लखनौचे नवाब यांनी स्थानिक जनतेच्या वतीने मध्यस्ती केल्यामुळे वाचले. ============= पेशव्यांच्या पूजेतील गणेश बिठूरमध्ये 'दूबे' नावाचे घराणे फार दिवसांपासून आहे. त्यांच्या देवघरातला गणेश पाहण्यासाठी लोक येतात (निदान १९६१ साली येत होते). पांढऱ्या संगमरवराची माध्यम आकाराची ही मूर्ती आहे. पेशव्यांच्या खाजगी देवघरात ही मूर्ती होती. १८५८ च्या विध्वंसात वाडाच नष्ट झाला पण ही सुंदर मूर्ती कशीतरी वाचली आणि दुबे यांच्या पूर्वजांकडे आली. तेंव्हापासून दुबे आपल्या देवघरात तिची रोज पूजा करतात. बाजीरावाची या गणेशावर फार श्रद्धा होती आणि पेशवे रोज एक सोन्याची मोहोर गणपतीच्या पायाशी अर्पण करत असत अशी आख्यायिका आहे. मला या गणेशाचे अथवा दुबे यांचे काहीच संदर्भ इंटरनेटवर सापडले नाहीत. त्यामुळे आज या गणेशाची काय अवस्था आहे याची काहीच कल्पना नाही. ============= राजा शिवप्रसाद पेशव्यांच्या भेटीस राजा शिवप्रसाद हा मुर्शिदाबाद इथल्या राजघराण्याशी संबंधित परिवारात जन्मला होता. नंतर १८८३ साली तो व्हॉइसरॉयच्या कौन्सिलमध्ये मेम्बर बनला. तो एक प्रसिद्ध लेखक होता. त्याचे आत्मचरित्र 'सावन ए उमरी' मध्ये त्याने पेशव्यांशी संबंधित एक किस्सा दिला आहे. शिवप्रसाद दिल्लीहून काशीस निघाला होता. त्या काळातली एक सामान्य समजूत होती की बाजीराव पेशव्यांकडे एके काळी एकूण ३ लाख स्वार होते. चार महाराजे - शिंदे, होळकर, नागपूरचे भोसले, बडोद्याचे गायकवाड हे त्याच्या सिंहासनाचे चार खांब. कानपुर जवळ पोचल्यानंतर त्याला आतून एक उत्कट इच्छा झाली की अश्या प्रख्यात पेशव्यास जाऊन भेटावे. मग शिवप्रसाद बिठूरला गेला आणि एका पंड्याच्या मदतीने तो पेशव्याचे दिवाण यांच्या घरी गेला. दिवाण महादेवाची पूजा करण्यात गुंतले होते, पण त्यांनी पटकन पेशव्यांच्या भेटीची व्यवस्था केली. शिवप्रसाद शर्ट-पॅंट या कपड्यात असल्यामुळे त्याला असे कपडे घालून आदरणीय पेशव्यासमोर जाता येणार नव्हते. म्हणून दिवाणसाहेबानी एका धोतराची व्यवस्था केली. पेशव्यासमोर पोचल्यावर त्याला एका आसनावर बसवण्यात आले. पेशवे स्वतः एका रेशमी दोर्यांनी बांधलेल्या झोपाळयावर एक फूट जाड गादीवर बसले होते. झोपाळा इतरांचा पेशव्यांना स्पर्श होणार नाही अश्या पद्धतीने पुरेसा दूर बांधला होता. शिवप्रसादने त्याचे पेशव्यांबरोबर काय बोलणे झाले त्याची नोंद केलेली नाही, पण त्याला वाड्याच्या भिंतीवर टांगलेली २५ घड्याळे मात्र नोंद घेण्याजोगी वाटली. ही फार मौल्यवान होती. ब्रिटिश अधिकाऱयांकडून पेशव्यास वेळोवेळी ही घड्याळे भेट म्हणून मिळाली होती. पण इतकी घड्याळे असूनही पेशव्यांना त्यांचा वेळ पाहण्यासाठी काहीच उपयोग नव्हता, कारण पेशव्यांकडे वेळ सांगण्यासाठी ठराविक वेळी एक घड्याळजी नेमला होता. ती सारी घड्याळे भिंतीवर डेकोरेशन म्हणून वापरली होती! ============= तनखा गंगार्पण इंग्रज सरकारकडून पेशव्यांना मिळणारा तनखा हा अनेक हप्त्यांमध्ये मिळत असे. पण तो योग्य पद्धतीने पेशव्यांचा मान राखून दिला गेला पाहिजे असा पेशव्यांचा कटाक्ष असे . अश्या एका प्रसंगी बाजीराव पेशवे गंगास्नान करून पूजेनंतर गंगेस प्रसाद अर्पण करत होते. कंपनीं सरकारच्या माणसांना दम धरवला नाही. त्यांनी घाईघाईने नाण्यांची पोती असलेली बैलगाडी गंगाकिनारी जात पेशवे होते तिथे नेली. तिथे पेशव्यांजवळ जाऊन त्यांना तनखा आल्याचे सांगण्यात आले. पेशव्यांनी एक क्षणाचाही विलंब न करता सर्व नाणी गंगार्पण करा असा हुकूम सोडला. त्यांच्या हुकुमाची अंमलबजावणी करण्यात आली. आपल्या दैन्यावस्थेतही पेशवा आपल्या पदाचा असा अभिमान बाळगून होता.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 44220
प्रतिक्रिया 94

प्रतिक्रिया

In reply to by माहितगार

सिंह हा सर्वांमध्ये शूर प्राणी अशी समजूत असल्याने राजा = सिंह आणि राजाचे आसन = सिंहासन असा अर्थ आपोआपच निर्माण झाला. आपटे ह्यांच्या इंग्लिश-संस्कृत कोशातहि Throne ह्याला समानार्थी म्हणून सिंहासन हाच शब्द दर्शविला आहे, यद्यपि भद्रासन - शुभ आसन - असाहि एक अन्य शब्द दर्शविला आहे. तख्त, गादी, गद्दी असे शब्द जरी वापरात असले तरी ते बाहेरून आलेले आहेत. Throne आणि गद्दी ह्यावरून एक मजेदार गोष्ट आठवली. सत्ताधारी इंग्रज त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या नेटिव प्रजेमध्ये लहानलहान गोष्टींतून उच्च-नीच भाव दर्शवीत असत. His Majesty केवळ इंग्रज राजाच असे, सर्व नेटिव Princes हे His Highness असत. ते कधीहि King नसत, तर त्यांना Prince म्हणण्याची रीत होती. Throne वर केवळ इंग्रज राजा बसे, सगळे native princess गद्दीवर बसत. हिंदुस्थानातील लोकांना 'नेटिव' असे ओळखले जाई. नेटिवांनाहि कधीकधी लॉर्ड अथवा सर होता यायचे पण बहुतांशी ते राव साहेब/राव बहादुर (दक्षिणेतील हिंदु नेटिवांसाठी), राय साहिब/राय बहादुर (उत्तरेतील हिंदु नेटिवांसाठी) खान साहेब/खान बहादुर (मुस्लिम/पारसी/ज्यू नेटिवांसाठी) ह्या पलीकडे जाऊ शकत नसत.

In reply to by अरविंद कोल्हटकर

भद्रासन - शुभ आसन... असे संबोधन नक्कीच असावे, उदा. जयपूर राज्याच्या सिंहासनाला आणि ते ठेवण्याच्या शोभिवंत दरबाराला 'सर्वतोभद्र' असे नाव आहे.

In reply to by अरविंद कोल्हटकर

इंग्रजांत मुकुट फक्त ब्रिटनचा राजा किंवा राणीच घालु शकत असे. भारतातील मांडलिक राजांना पगडी (turban) घालायची अनुमती होती, म्हणून भारतातले ब्रिटीशांचे मांडलिक राजे रत्नजडित फेटे, पागोटे, पगड्या घालत असत.

In reply to by परिंदा

अरेरे , काय वेळ आली मांडलीक राजांवर ,त्यांनी काय घालायचे हे ब्रिटीशांनी ठरवायचे

In reply to by मराठी_माणूस

मांडलिक म्हटला म्हणजे हे आलेच... आपल्या अंकीत असलेल्या मांडलिकाला आपली बरोबरी कोणत्या काळातला/प्रदेशातला कोण सम्राट करू देईल ? "आजच्या जगातले सम्राट" पण काय फार वेगळे वागत आहेत काय ? :)

छान लेख. प्रतिसादांमधूनही भरपूर माहिती मिळाली.

रोचक लेख आणि प्रतिसाद ! वस्तुनिष्ठ इतिहासापेक्षा कथारूप किस्से गोड लागतात ,खरे.

@ मनो, वाचतोय. थोडे अवांतर होईल पण बिठूर भागात नानासाहेब पेशव्याचा उल्लेख 'नाना राव' असा असतो. बिठूरमध्ये रमेल, चौधरीपुरा, बिठूर खुर्द हा भाग मिळून एकूण ३००-३५० एकर जमिनीवर परागंदा पेशव्यांची व्यक्तिगत मालकी होती. १८५७ चा उठाव शमल्यानंतर बिठूरमधील पेशव्यांच्या सर्व मिळकती इंग्रजांनी ताब्यात घेतल्या किंवा नष्ट केल्या ते तुम्ही लेखात लिहिले आहेच. ही सर्व जमीन 'आराजी लष्कर' नावाने ओळखली जाते. पुढे १८९५ मध्ये ह्या जमिनीवर पेशवे कुटुंबीयांपैकी कोणी दूरस्थ नातेवाईकांनी दावा केला, अचानक हे नवीनच मालक प्रकटल्यामुळे इंग्रज सरकारने त्यांना ७००० रुपये मोबदला देऊन जमीन रीतसर सरकारच्या ताब्यात घेतली अशी माहिती कानपुर परगण्याच्या महसुली पत्रकात आहे. पेशव्यांच्या ताब्यात असलेल्या जवळच्याच 'किला' भागात मात्र कोणतीही तोडफोड न करता १८५९ साली इंग्रजांनी 'हार्नेस अँड सॅन्डलरी फॅक्टरी' सुरु केली. जवळच १५ किलोमीटरवर असलेले कानपुर आधीपासून चामडे कमावण्याच्या उद्योगाबद्दल प्रसिद्ध होतेच, म्हणून बिठूरच्या किल्ल्यात इंग्रज फौजांच्या घोडदळासाठी खोगीर आणि अन्य चामडी सामान बनवण्यासाठी ही 'हार्नेस अँड सॅन्डलरी फॅक्टरी' कार्यरत होती, आजही आहे. फक्त आता त्याचे नाव बदलून OEF - ऑर्डीनन्स इक्विपमेंट फॅक्टरी असे करण्यात आले आहे. बिठूर महर्षी वाल्मीकींच्या आश्रमासाठी आणि रामपुत्र लव-कुश यांची जन्मस्थळी म्हणूनही प्रसिद्ध आहे. अनिंद्य

खूपच रोचक किस्से आहेत. फोटोही मस्तच. एक-दोन फोटो दिसत नाहीयेत. या लेखासाठी धन्यवाद. प्रतिसादांमधूनही छान माहिती मिळाली.

बयाबाई/ कुसुमाबाई यांच्याबद्दल इथे काही माहिती आहे. पण इथल्या प्रतिसादांपेक्षा थोडी वेगळी आहे. त्यात लिहिले आहे की त्या बाजीराव पेशव्यांचा दत्तक मुलगा बाळासाहेब यांच्या कन्या होत्या. आणखी एक परिच्छेद तिथून साभार : "कुसुमाबाई यांचें लग्न नानासाहेबानीं लाविलें. त्यानां लष्करचे रावसाहेब आपटे यानां दिलें होतें. त्यांचें सासरचें नांव सरस्वतीबाई असून त्यानां बंडाची सर्व हकीकत आठवत असे. कानपूरच्या बिबिखाना कत्तलीशी नानासाहेबांचा मुळीच संबंध नव्हता असें त्यानीं सांगितलें आहे. बंडाची स्थिरस्थावर झाल्यावर कुसुमाबाईनां त्यांच्या श्वशुरानें ग्वाल्हेरीस नेलें. त्यांचे पति वारल्यावर त्या काशीवास करून असत. त्यानां इंदूर व ग्वाल्हेर या संस्थानांकडून कांहीं तैनात असे; इंग्रज सरकार मात्र कांहीहि देत नसे. बाई निस्पृह, धैर्यशाली व अभिजात होत्या. त्या स. १९१७ च्या आगष्टांत वारल्या. आतां पेशवे घराण्याचा औरस वंश मुळींच राहिला नाहीं."

पेशवे घराण्याचा औरस वंश मुळींच राहिला नाहीं
पेशवे घराण्याचा औरस वंश नक्कीच आहे मस्तानी पुत्र समशेरबहादूर कडून

कपिलमुनी,
एवढे सगळे घडत असताना छत्रपती घराणे कुठे होते ? युद्धात त्यांच्या वंशजांचा काही सहभाग असल्याची नोंद मिळते का ? कारण राजे पेशवे नसून छत्रपती होते. छत्रपती शाहू (पहिले ) नंतर पुढे फार उल्लेख येत नाहीत म्हणून पृच्छा .
उत्तम प्रश्न. याच्या अनुषंगाने बरंच (अवांतर) लिहायचं आहे. दुसऱ्या बाजीरावाच्या वेळेस जे छत्रपती होते ते पहिल्या शाहूंचे थेट वंशज नव्हते. शंभूपुत्र अर्थात पहिले शाहू महाराज निपुत्रिक वारले (इ.स. १७४९). औरंग्याच्या कैदेपायी त्यांना सैनिकी व/व राजनैतिक शिक्षण मिळालं नव्हतं. औरंग्या गचकल्यावर अकस्मात छत्रपती झाले. शिवाय ताराबाईंच्या रुपात प्रतिस्पर्धी होतेच. ताराबाईंनी कुठून तरी पकडून आणून उभा केलेल्या एका पुरुषास दुसरा राजाराम म्हणून मृत्युपूर्वी काही वर्षं अगोदर शाहूंनी दत्तक घेतलं. शाहू सैनिकी दृष्ट्या निर्बळ व निपुत्रिक वारल्याने त्याचे पुढील वंशज केवळ नामधारी राहिले. दुसरे राजाराम महाराज १७७७ साली वारले. त्यावेळेस पेशवाईत सवाई माधवरावाचा जन्मून दोनतीन वर्षंच झाली होती. भाऊबंदकी ऐन भरांत होती. सवाई माधवरावाच्या नवे बारभाई (किंवा नाना फडणीस) राज्यकारभार हाकीत होते. साधारण त्याच वयाचे दुसरे बाजीराव धारच्या कैदेत होते. अशा प्रसंगी दुसरे शाहू १७७७ साली वयाच्या चौदापंधराव्या वर्षी छत्रपती झाले. तेसुद्धा नामधारीच होते. सैनिकी व राजनैतिक शिक्षणाची त्यांचीही तीच रड होती. पुढे १७९४ च्या आसपास सवाई माधवराव आत्महत्येपायी मृत्यू पावले आणि दुसरे बाजीराव अकस्मात पेशवे झाले. सैनिकी व राजनैतिक शिक्षणाची बोंब होतीच. १८०२ चा इंग्रजांशी केलेला तह याच दुसऱ्या शाहूंच्या कारकिर्दीत घडला. पुढे १८०८ साली दुसरे शाहू वारले आणि प्रतापसिंह पित्याप्रमाणे चौदापंधराव्या वर्षी छत्रपती झाले. शिक्षण तसं यथातथाच होतं. हाताशी शिबंदी होती ती फक्त सातारच्या रक्षणापुरतीच होती. तिचा आक्रमणासाठी काडीमात्र उपयोग नव्हता. १८०३ च्या तहानंतर सुमारे पंधराएक वर्षे दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांना हूल द्यायचा प्रयत्न केला. पण कुठलीच मसलत जमली नाही. १८०८ नंतर प्रतापसिंह छत्रपती झाले खरे, पण जाणत्या वयांत येईस्तोवर १८१३/१४ साल उजाडले. तोवर इंग्रज बरेच सबळ झाले होते. बाकी मराठा सरदारांचे कडून सहाय्य मिळंत नसल्याने छत्रपतींनीही इंग्रजांशी स्वतंत्रपणे बोलणी चालवली होती. पुढे १८१८ साली दुसऱ्या बाजीरावांनी इंग्रजांशी तह केल्यावर प्रतापसिंहांनी इंग्रजांचं मांडलिकत्व पत्करलं. या सर्व घडामोडींमध्ये सर्वोच्च नेत्याच्या शिक्षणाची वानवा दिसून येते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीतही असाच प्रसंग ओढवला होता. वडील दूर बंगळुरात आणि हे गाढवाचा नांगर फिरलेल्या पुण्यांस. कशाचा कशास पत्ता नाही. शहाजीमहाराजांनी आपली विश्वासू माणसं फक्त पुण्यांस पाठवली होती. अशा परिस्थितीत जिजाबाई व दादाजी कोंडदेवांनी बालशिवबाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. राजशिक्षणाची आबाळ झाल्याने राज्यं कशी खिळखिळी होतात ते उत्तर पेशवाईच्या उदाहरणांतून स्पष्ट दिसतं. सांगायचा मुद्दा काये की दादाजी कोंडदेवांना हलकं लेखणाऱ्या दंभाजी ब्रिगेडला शिवाजीमहाराजांच्या शिक्षणाप्रती काडीमात्र आदर नाही. त्यांच्या दंभापासनं सावधान. आ.न., -गा.पै.

सातार्‍याच्या छत्रपतींचा उत्तर इतिहास असा आहे: २० फेब्रुअरी १८१८च्या अष्ट्याच्या लढाईत मराठा पक्षाचा पूर्ण पराभव झाला, सेनापति बापू गोखले लढाईत पडले आणि प्रारंभी मराठा बाजूला असलेले तत्कालीन छत्रपति प्रतापसिंह, त्यांच्या मातोश्री आणि त्यांचे कुटुंबीय इंग्रजांच्या स्वाधीन झाले. तदनंतर इंग्रजांनी फार लोकक्षोभ होऊ नये म्हणून ज्या अनेक योजना केल्या त्यांपैकी एक म्हणजे छत्रपतींना सातार्‍यात परत स्थानापन्न करून वारणेच्या उत्तरेकडील भाग कृष्णा-भीमासंगमापावेतोचा हा स्वराज्य म्हणून त्यांच्या स्वाधीन केला. त्याच वेळी त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी म्हणून कॅ.ग्रँटला रेसिडेंट म्हणून सातार्‍यात नेमले, अशा रीतीने सातारचे १८१८ नंतरचे तथाकथित राज्य हे केवळ इंग्रजी मेहेरबानीने निर्माण झालेले संस्थान होते. त्याचा शिवाजीने स्वपराक्रमाने स्थापन केलेल्या राज्याशी काडीमात्र संबंध नव्हता. तेहि राज्य इंग्रजांना सोयीस्कर वाटले तोपर्यंत चालले. प्रतापसिंहास तो गैरसोयीचा वाटल्यामुळे इंग्रजांनी ४ सप्टेंबर १८३९ ह्या दिवशी पदच्युत करून बनारसला पेन्शनीवर पाठवले आणि त्याचे धाकटे भाऊ आप्पासाहेब ह्यास छत्रपतिपदावर बसविले. ते निपुत्रिक होते. त्यांव्या १८४८ मधील मृत्यूनंतर त्यांनी घेतलेला दत्तक नामंजूर करून इंग्रजांनी अखेर सातारचे संस्थान आणि शिवाजीच्या स्वनिर्मित राज्याचा अखेरचा दुवा १६ मे १८४९च्या जाहीरनाम्याने अखेरचा नष्ट केला आणि सातारा ब्रिटिश इंडियाचा भाग बनला. ईंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी निर्मिलेले हे राज्य त्यांना वाटले तोवर टिकले आणि नंतर त्यांच्याच इच्छेने विलयास गेले.

In reply to by अरविंद कोल्हटकर

धन्यवाद . बऱ्याच शंका दूर करणारी माहिती. रंगो बापूजी याच प्रताप सिंहांसाठी लंडनला गेले होते का त्यावेळी ? मूठभर इंग्रज खूपच धूर्त होते न काय.

रोचक माहिती, चित्राबद्दल मला असे वाटते की चित्रकाराला जरी वास्तववादी चित्रे काढायची असतील तरी काढता येत नसावीत, एखादा राजा कुरूप असेल आणि त्याचे चित्र कुरूप काढले तर जीवास मुकावे लागले तर. :)

कानपुर हुन बिठूर २३ किलोमिटर आहे. १८१८ ला मराठा साम्राज्याचा पाडाव झाल्यावर दुसरे बाजीराव पेशवे ह्याना महाराष्ट्रा पासुन दुर गंगाकिनारी बिठूर ह्या ठिकाणी वार्षिक ५ लाख तनखा देऊन ठेवण्यात आले. फोटोत दाखवल्या प्रमाणे “नानाराव” (नानासाहेब नाही) पार्क बनवलंय. जे कि पेशव्यांच्या अनेक एकर जागेतील काही एकरवर बनवलंय. २५ रूपये तिकीट काढून मी आत गेलो. मला वाटलं होतं कोरोना मुळे पार्क बंद असेल पण सुदैवाने तसं नव्हतं. पार्क ईतकं ऊत्तम मेंटेन केलंय की माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. पार्क मध्ये घुसताच राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा आहे आणी मधोमध नानासाहेब पेशव्यांचा. आत बोटींगची सोय देखील आहे. आत संग्रहासलय देखील आहे पण छोटे आणी रटाळ आहे. पा आपल्या शनिवार वाड्या सारखे आत भरपुर जोडपे बसलेले होते. पण संग्रहालयात मी सोडलो तर कुणीही नव्हतं. पार्क ला लागुनच भिंतीला खेटून पेशव्यांचा वाडा आहे जो की खुप मोठा आहे. जो वाडा १८५८ मध्ये ईंग्रजानी सुरूंग लावून तोडून टाकला होता.पण बरेच भरभक्कम अवशेष शिल्लक आहेत. बिठूर मधल्या कुणातरी बाहुबली चा त्यावर ताबा आहे. ऊत्तर प्रदेश सरकार आणी त्याबाहुबलीची कोर्टात केस सुरूय. त्या वाड्याला मोठं कुंपन आहे. आत मोर ही आहेत. मला आवाज येत होता. त्या आवारातच त्या बाहुबलीचं घर आहे. मी त्याच्या घरी गेलो होतो. बाहुबली भेटला नाही पण त्याचा मॅनेजर भेटला. त्याला सांगीतलं की मला अवशेष पहायचेत जाऊदे. पण बर्याच वेळ विनंती करूनही त्याने जाऊ दिले नाही. मग मी पुढे गंगा नदीवरील ब्रम्हावर्त घाटावर गेलो. घाट सुंदर बांधलाय. पाणी भरपुर वाढलंय अनेक छोट्या मंदीरांचे शेंडे दिसत होते. गावात लवकुश ह्यांचा जन्म झाला होता अशा अख्यायीका आहे. तिथे लवकुशचे मंदीर ही आहेत. तिकडे जाणं झालं नाही. स्थानीक लोकाना बाजीराव पेशव्यांबद्दल काहीच माहीती नाही. फक्त “नानाराव” आणी राणी लक्ष्मीबाई ईतकंच माहीतीय.

सरस्वतीबाईंचे निधन ब्रह्मावर्त इथे झाल्यावर गंगेकाठी त्यांना अग्नी देण्यात आला. त्या जागेवर पेशव्यांनी घाट आणि एक महादेवाचे मंदिर बांधले. त्याला सरस्वतेश्वर महादेव मंदिर असे नाव दिले. मला या मंदिराचे नवीन छायाचित्र सापडले नाही. "बाज़ीराव पेशवा द्वारा निर्मित शिव मंदिर वर्ष1819" या शीर्षकासह एक छायाचित्र पहा: https://www.google.com/maps/place/Maharaja+Peshwa+ghat/@26.6019922,80.2…