वी आर नॉट मेड फॉर ईच आदर

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
7 Feb 2018 - 7:52 am

आत्ता आला आहेस? कुठे होतास इतके दिवस, इतके महिने , इतके पावसाळे? आला आहेस इथपर्यन्त ठीक आहे पण सांग का आला आहेस? मला न्यायला की असाच?
मी प्रश्न विचारतेय खरी पण आहेत त्याची उत्तरे तुझ्याकडे? नसतीलच. कारण हे प्रश्न तू स्वतःला कधी विचारलेच नसतील. हे प्रश्न तुला पडलेही नसतील. तुझ्याकडे वेळ कुठे आहे त्यासाठी?
मला आठवतोय तो दिवस जेंव्हा तुला पहिल्यांदा पाहिले होते तो. विश्वामित्र ऋषींच्या सोबत त राजवाड्यात आला होतास. तुला पाहिले आणि पटकन मोहीत झाले असं काही नाही झालं पण इतर सर्व राजे राजकुमारांमधे तू वेगळा वाटत होतास. त्यांच्या भरजरी थाटामाटासमोर तू अगदी साधा वाटत होतास. राजमुकूट सोनसळी पिताम्बर असला बडेजाव नसणारे तुम्ही तिघेच होतात. विश्वामित्र ऋषी , लक्ष्मण आणि तू. धोतर आणि साधेसं सूती उत्तरीय खांद्यावर धनुष्य आणि पाठीवर बाणांचा भाता.
शिवधनुष्य पेलून त्याला प्रत्यंचा लावायची हा पण बाबांनी स्वयंवरासाठी ठेवला होता. एकामागून एक राजे राजकुमार पण हरत गेले. तू पुढे झालास त्यावेळेस नीट दिसलास.
सावळा पण प्रसन्न सुकूमार चेहेरा, काळेभोर बोलके मोठे डोळे , आणि मानेपर्यंत रुळणारे ते छान रेशमी केस. मला त्या क्षणीच आवडलास. मी तसे उर्मीलेला म्हंटले देखील. तू तो शिवधनुष्याला प्रत्यंचा लावण्याचा पण जिंकावास म्हणून मनोमन प्रार्थनाही करायला लागले. तू पण जिंकलास . तुझ्यापेक्षा मीच आनंदी झाले. हर्षातिरेक झाला म्हण ना.
मला तोच काय पण तुझ्यासोबत व्यतीत केलेला प्रत्येक क्षण आठवतो.
लग्नात गळ्यात हार घालताना तू माझ्या डोळ्यात पाहिले होतंस. मी मोहोरून गेले होते. तुझे ते एकाच वेळेस तलावाप्रमाणे शांत आणि झर्‍याप्रमाणे खट्याळ अवखळ वाटणारे डोळे कित्ती काही सांगुन गेले.त्या एका नजरेवर आख्खं आयूष्य ओवाळून टाकावेसे वाटलं.
लग्नानंतर तू मला अयोद्धेला नेलंस. युवराजाची पत्नी म्हणून मी छान मिरवले. आपण आलो त्या आठवड्यात खास राजवाड्यात स्वागत समारंभ आयोजित केला होता कौसल्या आईनी. मोठ्या आईनी.
प्रजाजनांच्या शुभेच्छा घ्यायला मी तुझ्या शेजारी सिंहासनावर होते. समोरच्या भल्या थोरल्या आरशात आपलं प्रतिबीम्ब दिसत होतं. मी त्याच्याकडेच पहात होते. केशरी उत्तरीय गळ्यात मोत्याची लड आणो डोक्यावर तो रत्नजडीत मुकूट. काय राजबिंडा दिसत होतास तू! एकदम चिकणा. तू जर लहान बाल असतास ना तर तिथल्या तिथे तुला खांड्यावर घेवून नाचले असते. तुला दृष्ट लागू नये म्हणून डोळ्यातल्या काजळाने तीट लावावी असं एक क्षण वाटलं.
पन दुसर्‍याच क्षणी तुझं ते प्रतिबींब एकदम परकं वाटायला लागलं. वाटलं की हा रत्नजडीत सिंहासनावर बसलेला तो कोणीतरी वेगळा आहे . ज्यानं स्वयंवरात धनुष्याला प्रत्यंचा लावून पण जिंकला तो साधासा तरुण कोठेतरी हरवलाय. मी प्रेम त्याच्यावर केलं होतं.
नव्या सुनांच्या कौतुकात राजमातांना वेळ पुरत नव्हता. मला सोबतीला खेळायला बहिणीच होत्या पण त्यांच्याशी खेळण्यात मला रस नव्हता. तुला माझ्याशी बोलायला वेळ नसायचा. दिवसाच्या पहिल्या प्रहरापासून सायंकाळपर्यन्त दिवसभर तू अमात्यांसोबत राज्यशास्त्राचे आणि न्यायशास्त्राचे धडे घेत चर्चा करत असायचास. संध्याकाळ युद्ध शास्त्राच्या सरावात जायची. मी अल्लड होते. साधीभोळी होते. मिथीला नगरीत माहेरात हे सगळं होतं तरीही मला कुठेच बंधने नव्हती. माझे बाबा जनक महाराजांशी मी कधीही बोलु शकायचे, अगदी दरबार चालू असतानासुद्धा.
शयन महालाच्या गवाक्षातून तुझी वाट पहात मी थकून जायचे. तशीच झोपुन जायचे. रात्रीच्या दुसर्‍या प्रहरा नंतर कधी तू यायचास ते मला कळायचं ही नाही.
एकदा आपण सगळे मिळून राजवाड्यात मृगयेसाठी गेलो होतो. मृगयेपेक्षाही दिवसभर तुझ्या सोबत रहायला मिळणार याचेच मला वाटत होते. दरबारातलं तुझे ते गंभीर रूप , ती गंभीरपणाची वस्त्रे कुठेतरी लांब ठेवून तू तुझ्या खर्‍या रुपात आला होतास. अल्लड खेळकर आनंदी. अगदी माझ्या मनातला अवतरला होतास.
मग तो दिवस आला. खरं तर त्याच्या पुढल्या आठवड्यात राज्याभिषेक होणार होता. दशरथ महाराजानी तसे आदेशही नगरजनाना दिले होते. सगळी अयोध्या नगरी सज्ज झाली होती राज्याभिषेकासाठी. रस्ते, बागा, चौक कसे छान सुषोभित केले होते. अचानक काय झाले कळेना. सगळा परीसर उदास उदास वाटायला लागला. काहीतरी खटकायला लागले. चुकल्याचुकल्या सारखं, रितं रितं वाटायला लागलं. शाल्मली नं सांगेपर्यन्त मला उमगतंच नव्हतं की काय होतय ते. कुण्या मंथरेनं राजमाता कैकयींचे कान भरले, कुब्जेच्या सांगण्यावरून. तुझ्या ऐवजी भरतभावजींना राज्याभिषेक करण्याचे ठरले. आणि तुला चौदा वर्षे वनवासात धाडायचा निर्णय घेतला गेला.
मला वाटले की हे मला तू सांगशील म्हणून. पुढे काय करायचे म्हणून विचारशील. पण तुला आदर्श पुत्राचे नाते निभावायचे होते. मी तुझी अर्धांगिनी आहे हे तुझ्या ध्यानीमनीही नव्हते.. तुझ्यासाठी मी गृहितच धरली गेले होते. चालायचं. शरीराने घेतलेला निर्णय हा डाव्या आणि उजव्या दोन्ही अंगांसाठी तितकाच बंधनकारक असतो असे म्हणून मी मनाची समजूत काढली. तू काही बोलतच नव्हतास. शेवटी मीच पुढाकार घेवून तुला विचारले कुठे जाणार आहेस म्हणून. तुझ्याबरोबर दंडकारण्यात वनवासाला यायचे ठरवले. राजवाड्यात फुलांच्या ताटव्यात वाढलेली माझी सुकूमार नाजूक पावले निबीड अशा दंडकारण्याच्या खडबडीत कठीण वाटेवरुन चालणार होती. मला त्या वनवासापेक्षाही तुझ्या सोबत रहायला मिळणार याचाच आनंद झाला होता. राज्यकारभाराच्या व्यस्ततेपासून शतयोजने दूर पूर्ण वेळ आपण सोबत असणार होतो. ज्याला आपलं मानलं त्याला पूर्णपणे जाणून घ्यायला मिळणार होते.
दंडकारण्यात गोदावरीच्या तीरावर आणि त्या नंतर चित्रकुट पर्वतावरच्या पर्णकुटीतले ते दिवस माझ्यासाठी आयुष्यातले सर्वात सुखाचे दिवस होते. तू सकाळी आन्हीके उरकून फिरून लाकुडफाटा शिकार फळे आणायचास. मी पाने फुले गोळा करुन स्वयंपाक करायचे. कच्चं अर्ध कच्चं कसही शिजलेलं , कधी तर मीठ विसरलेले ते जेवण आपल्याला अमृत वाटायचं. जेवणानंतर दुपारी तू तुझ्या शिकारीच्या , राक्षसां लढायांच्या गोष्टी किंवा मग तुमच्या आश्रमशाळेतील गमती जमती सांगायचास.
एकेका गोष्टीनी मी भारावून जायचे. आनंदून जायचे. तू माझ्याशी बोलतोस. सुखदु:खे वाटतोस हेच माझ्यासाठी स्वर्गसूख होते. काय हवं असते रे स्त्रीला या हून आणखी.
तीचा सहचर तीला समजून घेतो तिच्याशी आजच्या अडी अडचणीं बाबत, भविष्यातील योजनांबाबत ब विचार विनीमय करतो, तीला योग्य सन्मान देतो हे स्त्री साठी स्वप्न असतं. त्या क्षणी तरी मी जगातली सर्वात सुखी स्त्री असायचे./ होते
चित्रकूट पर्वतारील त्या ऋषीपत्नीनी मला न्हाऊमाखू घालून कसलीशी उटी लावली होती. माझी वेणीफणी करून मला फुलांच्या माळांनी सजवले होते त्या क्षणी तू माझ्याकडे जे पहात होतास त्या नजरेतून मला अनभिषीक्त राणी झाल्यासारखे वाटले. एकाच वेळेस प्रेम आदर कौतूक गाड विश्वास सगळं काही सांगून गेलं ते पहाणं.
कितीही संकटं आली तरी तुझी ही भक्कम समजूतदार साथ मला आयूष्यभर सोबत करणार होती. आणि मी तुझ्या प्रत्येक आनंद दु:खाच्या क्षणात तितक्याच आवेगाने साथ देणार होते. एखाद्या अवघड वाटेवर आपण दोघे एकमेकांचे वाटाडे म्हणून उभे रहाणार होतो.
चित्रकूट पर्वतावरच्या त्या नितांत रमणीय वातावरणात मी सुखावले. तेथून माझा पायच निघत नव्हता. पण पुढे जायचा तुझा आग्रह होता. मी ही विचार केला हे आयूष्य तुझ्या सोबत तर जगायचं आहे. तू सोबत आहेस या विचाराने मी ही पुढे पाऊन टाकले. आणि आपण गंधमादन पर्वताच्या दिशेने चालू लागलो.
हे जग नवे होते. तुला ही आणि मला ही.
रानावनातली फुलं फळं पशु पक्षी वार्‍याच्या लहरीवर हिरव्या लाटा उठवणारं गवत , खळाळतं पाणी घेवून धावणारे ते झरे , सकाळी पूर्वेकडे कुंकूं तीलका प्रमाणे दिसणारे केशरी सूर्यबिंब आणि संयांकाळी गाईंच्या हंबरणा नंतर उगवणारी ती लखलखती शुक्राची चांदणी , रात्री पडणारं ते टिप्पूर चांदणं, ती टिमटिमणारी नक्षत्रं,.....
कधीतरी नजरेस पडणारे ससे , माना उचलून उसळणारी अल्लड हरणे, केवढं निरागस जग होतं माझं. शंका , कपट , वैरभाव , हे असले शब्दही नव्हते तेथे वस्तीला.
मग तो दिवस आला. सोनेरी हरीण दिसलं म्हणून तुला उत्साहानं सांगितलं. मी तुला प्रथमंच काहितरी मागितलं होतं. मला काय माहीत की मी काझं प्रक्तन मागितलं होतं. तू त्या कांचनमृगाच्या मागे गेलास. तुझ्या पाठोपाठ लक्ष्मण भावजी ही गेले माझ्या रक्षणाची लक्ष्मणरेखा आखून. मी ती ओलांडली. इतकीच काय ती चूक पण त्या क्षणी संपूर्ण स्त्रीजातीला एक धडा मिळाला.
जेंव्हा जेंव्हा मर्यादा ओलांडली गेली आहे तेंव्हा तेंव्हा केवळ "स्त्री " लंकेत ढकलली गेली आहे.
लंकेत मी तू येशील या आशेवर दिवस काढत होते. आपण कुठे आहोत हेही मला कळत नव्हते. त्रातीका , त्रिजटा तापसी , शलभा यांच्या पहार्‍यात त्या अशोकवनात राहीले. त्याच नम्तर माझ्या सख्या बनल्या. त्याना मी तुझ्या गोष्टी सांगत तुझी आठवण तेवत ठेवत राहीले .
रावण कपटी होता पण तुझ्या धाकाने तो माझ्याशी अदबीने वागायचा. बोलताना मर्यादा राखायचा. कित्ती अभिमान वाटायचा मला तेंव्हा म्हणून सांगू. अशोकवनात मी एकटी कधीच नव्हते. तुझ्या आठवणी सदैव धावून यायच्या. तुझं हसणं तुझं बोलणं , बाण सोडताना एकाग्र चित्तानं लक्ष्याचा वेध घेणं, लक्ष्यभेद केल्या नंतर ते मान डोलावणं सगळं सगळं आठवायचं. जणू तू माझ्या समोर बसला आहेस असंच भासायचं.
एक दिवस रणभेरी ऐकू आली. हनुमानानं तुझी मुद्रीका मला दाखवली. काय आनंद झाला होता म्हणून सांगू! रणरणत्या उन्हात तृषार्त अवस्थेत तहानेने जीव कासावीस झाला असताना अचानक गार सावलीत मातीच्या घड्यातलं थंडगार पाणी मिळावं तसं वाटलं. हनुमानाच्या सोबत तुझाकडे धावत यावसं वाटलं. पण पुन्हा मर्यादेची जाणीव झाली. दुधाने पोळलेला ताकही फुंकून पितो. हनुमानाने तू येणार याची ग्वाही दिली . लंकेतली रणदुंदूभी मला सनईचौघड्या सारखी भासली.
तू रावणाला हरवलेस , लंका जिंकून तत्क्षणी अशोकवनात आलास. युधातले घाव जखमा तुझ्या अंगावर पदकांप्रमाणे शिभून दिसत होत्या. तुझी पत्नी म्हणून माझा ऊर अभिमानाने भरून आला होता. तू माझ्या समोर उभा होतास. कितीतरी कालावधी नंतर तुला प्रत्यक्ष पहात होते. वाटलं धावत जाऊन तुला घट्ट मिठी मारावी.
तुलाही कदाचित तसेच वाटत असावे. पण ....... कुलमर्यादेची जाणीव झाली.
अयोद्धेला तुझ्या बरोबर जायला मी आतूर होते. राजवैभवासाठी नव्हे तर तुझ्या सोबत रहाण्यासाठी मी आसूसले होते.
तू अयोद्धेला प्रस्थान करण्यासाठी निघालास. रावणाने मला हात लावणे दूर पण वासनाभरल्या नजरेने पाहीले नसेल याची तुला खात्री होती. पण तरिही माझे शीलभ्रष्ट झाले नाही ना याची खात्री करण्यासाठी तू मला अग्निदिव्य करायला लावलेस. मी क्षणभर विचलीत झाले. इतका सुद्धा विश्वास नव्हता तुझा माझ्यावर? एक क्षणभरंच.पण पुढच्याच क्षणी सावरले.
तू जन्मभर सोबत आहेस या विश्वासावर मी इथवर आले. एखादं अग्निदिव्य ही काही फर मोठी गोष्ट नाही. सुवर्णालाही स्वतःची शुद्धता सिद्ध करण्यासाठी अग्निदिव्य करावं लागतं धगधगत्या ज्वाळां मधून जात असताना सुवर्ण जेवढं ताउवून सुलाखून निघतं तेवढी त्याची झळाळी वाढते. हे ऐकलं होतं.
काहिही झालं तरी तू मला वाचवायला येशीलच या विश्वासावर मी अग्नीत प्रवेश केला. आणि शांतपणे बाहेर आले. प्रेमभावनेपुढे अग्नीशलाकाही शीतल वाटल्या. त्यांची दाहकता तुझ्या प्रेमापुढे क्षूद्र होती. आपण अग्निदिव्य केलंय म्हणजे काही मोट्ठं केलंय अशी जाणीवही झाली नाही.
आपण अयोद्धेला निघालो. वाटेत जाताना तू फारसा बोलत नव्हतास. कदाचित युद्धामुळे दमला असवास. बिभीषणाने आपल्याला अयोद्धेला जाण्यासाठे पुष्पक विमान दिले होते. विमान ढगातून जात होतं खाली विहंगम दृष्य दिसत होतं माझं त्या कडे लक्षंच नव्हते. मी अनिमीष नेत्राने तुझ्याकडेच पहात होते.
आपण अयोद्धेला पोहोचलो. भरतानं तुला राजसिंहासनावर बसवलं. मला राज्ञीचा सन्मान दिला. तू समर्थपणे राज्यकारभार पाहू लागलास.
अधूनमधून माझ्याशी राज्यकारभाराबाबत काही विचारविनीमय करू लागलास. तुझं हे रूप मला नवं होतं. पत्नी म्हणून केवळ भोज्येषु माता शयनेषु रंभा इतक्या पुरतं मर्यादीत न राखता तू मला कार्येषु मंत्री मानलंस. सखी होतेच. तू मला सहचरी बनवलंस.
एक दिवस कोण्या ब्राम्हणाच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला. दरबारातल्या न्यायपीठाने त्याबद्दल शंबूकाला जबाबदार ठरवेले. एका शूद्राने वेदाध्ययन ऐकले म्हणून ब्राम्हणपुत्राचा अपमृत्यू झाला या तर्कावरून शंबूकाच्या कानात तप्त शिसे ओतले गेले. माझा विरोध होता या निर्णयाला. कदाचित तुलाही तो पटला नव्हता. पण लोकानुनय म्हणून तू विरोध केला नाहीस. तू आदर्श राजा ठरलास. शंबूकाचा हकनाक बळी गेला. त्या नंतर आठवडाभर तू माझ्या नजरेला नजर मिल्वू शकला नव्हतास.
राज्यकारभार करताना असे प्रसंग यायचेच.
तू आणि मी या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहोत. दोन स्वतंत्र शरीरे आहोत. स्वतंत्र मने आहोत. मतभेद हे व्हायचेच. मतभेदानाच कवताळुन बसलो तर मते बाजूला पडतात आणि केवळ भेद वाढत जातात. मतांचा आदर करायला शिकलो तर भेद आपोआप लहान होत जातात हे मला बाबांनी शिकवले होते. मी तेच आचरायचे ठरवले.
तुझ्या सहवासातला प्रत्येक क्षण मला सुगंधी करायचा होता.. दरबारात मंत्र्यांशी विचार विनीमय करताना मी ही तुझ्या बरोबरीने पोक्त व्हायचे. राजबागेतल्या तलावात विहरताना तुझ्या इतकीच अल्लड असायचे. राजमातांशी बोलतानी तुझ्या इतकीच नम्र व्हायचे. प्रजाजनांत मिसळताना तुझ्या प्रमाणे मी ही त्यांची पालक व्हायचे.
मी पुन्हा एकदा आनंदात होते. एका पुरुषोत्तमाची सहचरी असण्याचं सूख मी भरभरून अनुभवत होते.
आणि तो दिवस आला. एका स्त्रीचे आयूष्य सार्थक ठरवणारा क्षण. मला दिवस राहीले होते. राजवैद्यानी निदान केलं होतं. तू कुठेतरी बाहेर गेला होतास. आपल्याला बाल होणार आहे हे आनंदाचे वृत्त इतर कोणाकडून कळण्या अगोदर मलाच तुला सांगायचं होतं ते थेट. तुझी प्रतिक्रीया पहायची होती. मोहोरला असतास , लाजला असतास तू बाप होणार आहेस हे ऐकताना होणारा तुझा आनंदी चेहेरा डोळे भरून साठवायचा होता.
तू राजवाड्यात आल्याचं समजलं तेंव्हा तुझ्यावर वर्षाव करण्यासाठी मी तुझी आवडती पारीजातकाची फुले दासी करवी मागवून ठेवली होती. पण तू महालात आलाच नाहीस. थेट सल्लागार कक्षात गेलास. मला दासीकरवी बोलावणे पाठवलेस. मी तेथे आले तेंव्हा तुझा उतरलेला चेहेरा न बोलताही बरेच काही सांगत होता. काहितरी आक्रीत घडले होते. त्या शंबूक प्रकरणासारखे किंवा त्याहूनही महाभयंकर असे . कदाचित मृगये दरम्यान तुझ्याकडून श्रावणासारख्या कोण्या निरागसाची हत्या घडली की काय या शंकेने मी भयभीत झाले . तु काहीच बोलत नव्हतास. माझ्यापासून दृष्टी चोरत होतास. तुझे मन काहीतरी खात होते. तू लक्ष्मण भावजीना बोलावलेस. आणि जे सांगीतलेस त्यावर माझा विश्वास बसत नव्हता. कानात तप्त शिसे ओतल्यासारखे ते शब्द बोचत होते.
तू माझा त्याग केला होतास.
का? कशा साठी? माझं काय चुकलं होतं? कशाचं ही स्पष्टीकरण न देता.
तू सांगितलेस तेही लक्ष्मण भावजीना. ते शब्द मला सांगण्याचं तुझं धाडस नव्हतं.
लक्ष्मण भावजीनी मला वनात वाल्मिकी ऋषींच्या आश्रमासमोर सोडलं. वाटेत संपूर्ण प्रवासभर आम्ही दोघेही नि:शब्द . मूक होतो.. रथाच्या घोड्यांच्या टापांचाच काय तो आवाज होता.
मला तेथे सोडुन येताना मात्र त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला असावा. रथाचा सारथी दारूक तातडीने रथ घेवुन गेला.अणि लक्ष्मण भावजी रथात गुडघ्यात डोके खुपसुन बसले होते.
मी मात्र वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाच्या दारात शिळा होऊन उभी होते. हतबद्ध. काहीच सुचत नव्हतं.
ज्या दिवशी सकाळी आपण आई होणार ही अत्यानंदाची चाहूल लागली त्याच दिवशी सायंकाळी आपल्या सहचराने आपला त्याग हे पण समजते इतके दोन टोकांचे अनुभव ज्याला येतात त्याला गार आणि कढत यातला फरकच संपलेला असतो.
माझं तसेच काहीसे झाले होते. कोणीतरी मला आश्रमात घेवुन गेले.
हे माझ्या सोबत काय होतंय मला कळंतच नव्हते. परमोच्च सूख आणि दु:खाचा कडेलोट एकाच वेळेस अनुभवत होते. तीन चार दिवस आश्रमातही माझा जणू दगडी पुतळा झाला होता. मला कसलीच संवेदना जाणवत नव्हती. अंधार उजेड रात्र दिवस ऊन सावली सगळं सारखंच वाटत होतं. हे असं का होत होतं ते ही फक्त माझ्या सोबत? माझं काय चुकलं होतं तेही न सांगता तू पाला पाचोळा दूर लोटावा त्या प्रमाणे मला तुझ्या आयुष्यातून बाजूला केलंस अगदी सहजपणे. कसलंही स्पष्टीकरण न देता. अट्टल गुन्हेगारालाही त्याची बाजु मांडायची संधी हा त्याचा हक्क असतो हा तर न्यायशास्त्राचा प्राथमीक नियम. माझा गुन्हा काय होता ते ही मला समजले नव्हते.
खरे तर मला तुला ती आनंदाची बातमी सांगायची होती . तेवढीही संधी दिली नाहीस.
चारपाच दिवसानी मी भानावर आले. आश्रमातलं कोणी स्पष्ट बोलत नव्हतं पण त्यांच्या नजरांतून ते जाणवत होतं. मला त्या सहानुभूतीच्या नजरांची शिसारी येत होती. अरेरे... बिच्चारी..... . श्शी..... लहापणी क्रीडांगणात खेळताना पडले तरी कधी रडले नव्हते. ... आणि आज...
कधीतरी नंतर मला कोणाच्या तरी बोलण्यातून समजले की अयोद्धेत एका धोब्याने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर शंका घेताना तुझ्याशी तूलना केली होती. त्याच एम्हणणे होते की तो कोणी राम नाही की परक्या घरी राहिलेल्या पत्नीला क्षमा करुन पुन्हा घरात घेईल.
त्याला कुथे माहीत होते की रामाच्या सोबत रहाता यावे म्हणून सीतेला अग्निदिव्य करावं लागलं होतं. त्याला नसेल माहीत . पण ते तुला तर माहीत होते ना !
तू सोबत आहेस या विश्वासावर मी घरदार नातेवाईक आप्तेष्ट सोडून आले . माझं परिचयाचं सगळं जग सोडून मी तुझ्या सोबत संसार मांडला. तू सोबत आहेस मग मल कशाचीही भीती नाही या विश्वासावर वनवासातही आनंदी राहिले. तू येशील या आशेवर लंकेतही अढळ राहिले.
तू बरोबर असताना माझे कोणीही काही बिघडवू शकणार नाही या ठाम विश्वासावर अगदी सहज धगधगत्या अग्नी कुंडात अग्निदिव्याला सामोरी गेले.
आज समजलं की मी ज्याला पुरुषोत्तम मानलंय तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. आदर्श पुत्र, आदर्श राजा आणि त्या साठीचा लोकानुनय या ही मर्यादा.
आदर्श सहचर आदर्श मित्र हे तुझ्या ध्यानीमनीही नसावं बहुतेक.
पोटात वाढणार्‍या जीवासाठी मी जगायचं ठरवलं. तुझी आठवण पूर्ण विसरायची ठरवलं. माझे डोहाळे वाल्मिकी आश्रमातल्या गुरू पत्नीनी पुरवले, सख्ख्या मुलीचे पुरवावेत ना तस्से. तू कधीतरी माझी खबरबात घेशील असे वाटले होते ..पण.... असो.
यथावकाश मी प्रसूत झाले. जुळी मुले झाले. निसर्गाचा न्याय मला अचंभीत करून गेला. पहा ना. ज्याला विसरायचे ठरवले होते त्याच्याच हुबेहूब प्रतीमा माझ्या पोटी आल्या होत्या. मी हरखून गेले. त्यांच्या बाललीलांत तुला शोधत राहीले. त्या दोघांचं ते रेषमी जावंळ, त्यांचे ते हुंकार , दुडुदुडू धावणं , बोबडं बोलणं,... सगळं मी मनात साठवत होते. दोघेही तुझीच प्रतीरूपं होते . लव आणि कुश. तुझ्यासारखेच कुशाग्र बुद्धीचे , वेदाभ्यासात , धनुर्वुद्येत तुझ्या इतकेच पारंगत.
वाटायचं की कधीतरी हे तुझ्या कानी पडेल तू त्याना पहायला येशील. त्यांचं कौतूक करशील.
तुझ्या शिवाय जण्याची सवय झाली आहे. पण तुझ्या विचारांशिवाय जगायची सवय अजून झाली नाहिय्ये.
तू अश्वमेध केल्याचे समजले. यज्ञात पूजेला बसताना पत्नीचे स्थान रिक्त ठेवले होते हे ही समजले. यज्ञाचा अश्व लव कुशानी अडवला तेंव्हा मी काळजीत पडले. मुलांच्या युद्ध कौशल्याची खात्री होती आश्रमात वाढले म्हणून काय झाले ती तुझीच मुले होती . तुझे क्षात्रतेज त्याच्यातही होते. मला काळजी होती की ती तुझी मुले आहेत हे समजल्यावर लक्ष्मणभावजींचे काय होईल. भावनेपोती लक्ष्मणभावजी हरतील आणि अश्वमेध असफल होईल. झालेही तेच.
महर्शी वाल्मिकी नी सुचवले म्हणून मुलांना अयोद्धेला दरबारात पाठवले. ऋषीकुमार म्हणून मुलांनी तुझीच कथा गायली. आणि त्यांच्या मागोमाग तू येथे आलास.
का? मला परत नेण्यासाठी?
मग ऐक निक्षुन सांगते. मला येतेस का विचारू नकोस, सोबत चल असेही म्हणून नकोस. तुझ्या सोबत रहायची मला अजूनही आस आहे. आदर्श पुत्र आदर्श राजा या सोबतच मुलांचे संगोपन करणारा आदर्श पिता पहायला आवडेल मला. तू चल म्हणालास तर मी तयार होईन याचीच मला भीती वाततेय.
मनात एक अनामीक भय आहे. तू सोबत आहेस काहिही झालं तरी मला साथ देशील या विश्वासाने मी तुझ्या संसार सागरात बुडी मारली. अग्नी परीक्षाही दिली.
आता आणखी कोणती परीक्षा देणार मी? हरलेय मी आता. मला पुन्हा एकदा मोडून पडायचं नाहिय्ये.
मुलांना सोबत घेवून जा. त्याना खंबीर पित्याची गरज आहे.
तुझ्या सोबत राहिले तर कितीही विसरायचे ठरवले तरीही तो नकोसा इतिहास पुन्हा पुन्हा आठवत राहील. तुलाही आणि मलाही. मनातले सल जागवत राहील सतत.
पुन्हा कोणी प्रजाजन विवाद मांडेल. जुन्या जखमांच्या खपल्या उकरून काढेल
आता आणखी परीक्षा नाही द्यायची आयुष्यात.
मला तुझ्या सोबत रहायचं नाहिय्ये. पुन्हा नव्याने मोडुन पडायचं नाहिय्ये. आत्तापर्यंतचे सगळे निर्णय तू घेतलेस. हा एक निर्णय मला घेवू दे. मला दूर जाऊ दे पुन्हा तुझ्या आयुष्यात न येण्यासाठी. माझ्या आईकडे धरणीमाते कडे निघतेय मी.
धरणी माते तुझ्या लेकीला यायचंय तुझ्याकडे. मला पोटात घे. धरणी माते मला पोटात घे.
............. आणि धरणी दुभंगली. सीतेला तीने पोटात घेतले. कायमचेच.

कथालेख

प्रतिक्रिया

सुमित्रा's picture

7 Feb 2018 - 3:25 pm | सुमित्रा

विजूभाऊ ...तुम्ही भाऊ नसून बहीण आहात अशी दाट शंका येतेय मला...एका स्त्री चं भावविश्व इतकं परफेक्ट कसं समजवून घेऊ शकलात?
अशक्य सुंदर लेख.

स्मिता.'s picture

7 Feb 2018 - 7:34 pm | स्मिता.

लेख वाचत असतांना लेखक नक्की विजूभाऊच (म्हणजे कोणी पुरुषच) आहेत ना हे स्क्रोल-अप करून खात्री करून पाहिलं. स्त्रीचं भावविश्व इतक्या खोलवर क्वचितच कोणी पुरुष समजू शकत असेल.
हॅट्स ऑफ टू विजूभाऊ!

सुखीमाणूस's picture

8 Feb 2018 - 9:15 am | सुखीमाणूस

+१११

कपिलमुनी's picture

7 Feb 2018 - 3:35 pm | कपिलमुनी

जबरदस्त लेख !
खूप अफाट लिहिले आहे.

आज प्रथमच रामायण सीतेच्या नजरेतून वाचलेला मिळालं .फारच सुंदर....
लेखाचा शीर्षक वाचून आत्ताच्या काळातील कथा असेल वाटलं होतं, पण सहीच....
एक नेहमीचीच रामकथा पण वेगळ्या रूपात पाहून पुन्हा विचार करायला लावणारी आहे.....
असेच नवीन नवीन लेख/अनुभव /कथा वाचायला मिळोत हीच मिसळपाव चरणी पार्थना.....

प्रचेतस's picture

7 Feb 2018 - 8:22 pm | प्रचेतस

क्या बात है विजुभाऊ....!!!

नितांत सुंदर लेखन.
एकच त्रुटी, राम, लक्ष्मण, सीता वनवासास जाताना आधी चित्रकूटावर जातात आणि मग दंडकारण्यात. चित्रकूट पर्वत अयोध्येच्या सीमेबाहेर, यमुनेच्या पलीकडे.

manguu@mail.com's picture

7 Feb 2018 - 8:34 pm | manguu@mail.com

दंडकारण्य म्हणजे नाशिकचा भाग ना ?

प्रचेतस's picture

7 Feb 2018 - 8:37 pm | प्रचेतस

नाशिक म्हणजे जनस्थान, दंडकारण्य म्हणजे गडचिरोली, छत्तीसगडचा आजचा नक्षलयुक्त प्रदेश. थोडक्यात विंध्य पर्वताच्या खालचा प्रदेश.

तिमा's picture

8 Feb 2018 - 3:10 am | तिमा

असं रामायण पहिल्यांदाच वाचलं. परकाया प्रवेश केल्यासारखं लिहिलंय!

रुपी's picture

8 Feb 2018 - 4:28 am | रुपी

सुरेख!

खूप सुंदर लेखन! सीतेचं मनोगत आवडलं.
याच दृष्टिकोनातून कंबोडियन रामायणातील सीता भावली होती. तिकडच्या आवृत्तीत अयोध्येला परतल्यावर रामाने संशय घेतल्याने सीता रामाला सोडून आश्रमात जाते.

अवांतरः शेवटी अयोध्या काय आणि रोम काय, Caesar's wife must be above suspicion!

हे सगळं माहित असूनही रामाची पुजा होते. उपेक्षितांचा वाली कोण?

प्राची अश्विनी's picture

8 Feb 2018 - 9:22 am | प्राची अश्विनी

मनोगत आवडलं. फक्त त्या "चिकणा" शब्दापाशी जरा अडकले.:)

विजुभाऊ's picture

8 Feb 2018 - 12:09 pm | विजुभाऊ

_/\_

शित्रेउमेश's picture

7 Dec 2018 - 8:49 am | शित्रेउमेश

खूप सुंदर लिहिलय......

NAKSHATRA's picture

23 Dec 2020 - 7:57 pm | NAKSHATRA

सुंदर लेख.