✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काही चित्रपटीय व्याख्या

फ
फारएन्ड यांनी
Mon, 01/29/2018 - 21:22  ·  लेख
लेख
हे एक आमचे संशोधन, खास जनहितार्थ. गाणी, संवाद वगैरे ऐकताना लोकांना असे प्रश्न पडतात की तेरी मैफिल मे म्हणजे नक्की कोठे. तेथे ही माहिती उपयोगी पडेल. गेल्या काही दिवसांत वाचकांनी "प्रेमात पडल्यावर सजदे नक्की कधी करतात?", "तिच्या मैफिलीत जायचे आहे. काय तयारी करून जाऊ?", "जानेजा जास्त भारी की जानेजहॉ?" असे अनेक प्रश्न विचारले. म्हणूनच हा लेखप्रपंच. तर काही गाण्यांमधून व डॉयलॉग्ज मधून नेहमी ऐकू येणार्‍या शब्दांच्या व्याख्या. फूटी कौडी: प्रत्यक्षात जी देणार्‍याकडे नसते. घेणार्‍याला नको असते. तरीही ती मिळणार नाही अशी देणारा धमकी देतो, अशी जगातील एकमेव गोष्ट. लोक एकतर फूटी कौडीही देत नाहीत, नाहीतर सगळी जायदाद देतात. पण जायदाद पैकी फूटी कौडीही न दिल्याने गेली अनेक द्शके पिक्चर्स मधे झालेला झालेला हिंसाचार केवळ एखादी फुटकी का होईना कवडी देऊन थांबवता आला असता का यावर संशोधन व्हावे. म्हणजे जाउ दे त्याच्या/तिच्या बापाने किमान एक फुटी कौडी तरी दिली आहे तेव्हा आपण जायदाद हस्तगत करण्याचे प्रयत्न शांततामय/संवैधानिक मार्गाने करू असे ते चित्रपटातील व्हिलन-मामा वगैरे म्हंटले असते का वगैरे. त्रिशूल मधे संजीवकुमार ने रिसेप्शनिस्ट ला कोणी चिडलेला चेहरा घेउन भेटायला आला तर जरा त्याला आधीच ४-५ फूटी कौडियाँ देउन मगच आत पाठव अशी एक जनरल प्रोसेस सेट करून ठेवली असती, तर तो त्या भारी सीन ला अमिताभची 'आज मै आपसे पाँच लाख का सौदा कर रहा हूँ, और मेरे जेब मे पाँच फूटी कौडियाँ भी नहीं है' वगैरे डॉयलॉगबाजी टोटली नलीफाय करू शकला असता. तेव्हा भावी जायदाद होल्डर लोकांनी हे लक्षात ठेवावे की घरात लॉजिकल कारण नसताना बायकोचा भाऊ, मामा किंवा भाचा उगाच ये-जा करत असेल तर त्यांना अधूनमधून काही फूटी कौडिया देत राहावे. मौला: हे लोक प्रेमात पडलेल्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करतात."ती" ने एकदा हसून बघितल्यावर जर पुढच्या वेळी तिने बघितले नाही तर डायरेक्ट एकदम "मेरे मौला मेरे मौला, देदे कोई जान..." वगैरे विव्हळणारे प्रेमी जीव असतात त्यांच्यासाठी फॅमिली मौला नावाची संस्था आस्तित्वात येणे आवश्यक आहे अशा प्रसंगी कन्सल्ट करायला. प्रत्येक जण "मेरे मौला" म्हणत असल्याने प्रत्येकाचा एक स्वतंत्र मौला असावा. फॅमिली डॉक्टर, टॅक्स कन्सल्टंट, लीगल अॅडव्हायजर असतात तसे. मग लग्नाच्या आदल्या दिवशी याचा मामा तिच्या मामाला भेटून ओळख करून घेतात तशी दोघांकडचे मौला एकमेकांना भेटवत असतील. तसेच सगळे मौला या कामाला लागले तर जागतिक शांतताही होउ शकते हा दुसरा फायदा. मात्र यांनी अनेक शतके धर्माच्या बाबतीत जे केले त्यावरून आता प्रेम ही संस्था धोक्यात आहे हे नक्की सजदे: अस्सल मराठी लोक प्रेमात पडले की "ती"ला मिळवण्याकरिता हे करतात. उदा: 'खट्टा मीठा' मधे टिचकुले आडनावाचा मुलगा व गणपुले आडनावाची मुलगी प्रेमात पडतात तेव्हा सजदे करतात, दुवाँ मागतात. मात्र प्रदक्षिणा जशी एखादी घालून चालते तसे याचे नाही. हे एखाद्या किंमत कोसळलेल्या चलनाप्रमाणे एकदम लाखो मधे करावे लागतात. दुनियावाले: सरकारच्या 'वजने व मापे' विभागाकरता प्रेम मोजण्याचे काम हे लोक करतात. कसे कोणास ठाउक पण जगात सर्वात जास्त प्रेम कोणी केले हे यांना कळते. एरव्ही हे प्रेमी लोकांना विरोध करणे, त्यांच्यावर जळणे, त्यांची अनावश्यक खाजगी चौकशी करणे ई. कामे करतात. गजलयुक्त गाण्यांमधे 'वो'/'उनको' वगैरे उल्लेख आले आणि ते लीड पेअर पैकी कोणाला चपखल बसले नाहीत, तर नक्कीच यांच्याबद्दल असतात. बाजा: राजा लोकांचे अत्यंत नावडते वाद्य. प्रेमाच्या तीन लेव्हल्सः या लेव्हलच्या नावात जितके "जा" व "ने/ना" येतील तितक्या जास्त असतात. जा चा उच्चार ज्या सारखा. उदा: १. जा २. जानेजा ३. जानेजाना अजून तीन च्या पुढची लेव्हल कोणी गाठलेली नसावी. पुस्तकः बापाने 'जी ले अपनी जिंदगी' म्हंटल्यावर ट्रेन ने फिरायला निघाल्यावर गाडी पकडल्या पकडल्या जराही खिडकीबाहेर सुद्धा न पाहता पहिल्यांदा उघडतात ती वस्तू. किंवा कोणाला आपले शहर दाखवायला नेताना सुद्धा बाजूला वाचत बसतात - लहान मुलाला पार्क मधे घसरगुंडी वर सोडून आपण बाकड्यावर वाचत बसावे तसे. जज किंवा प्रोफेसर चे घर असेल तर जितकी पुस्तके असतील तितकी सर्वांना सारखे कव्हर घालून मागच्या शेल्फ मधे बरोब्बर बसली पाहिजेत. पुस्तके कशाचीही असू शकतात. हीरो इंजिनिअरिंग करत असेल तर 'इंजिनिअरिंग' चे पुस्तक असते. तो शेर मारत असेल तर त्याच्या शायरीचे असते. जरा आणखी गहन काहीतरी असेल तर उपन्यास असतो. हीरो चा "कारोबार" असेल तर एकाच शेल्फ वर Principles of Physiology, Thesaurus आणि Advertising Management शेजारी शेजारी असावीत. पियानो: कीबोर्ड वरच्या साधारण मधल्या १०-१५ कीज वर बोटे फिरवून कोणत्याही ताला-सुरातील गाणे वाजवता येणारे वाद्य मैफिल: मैफिल हे साधेसुधे काम नव्हे. सर्वसाधारण मराठी स्त्रियांचे मंगळागौर, हळदीकुंकू जशा रिच्युअल असतात तशा बडे खानदान की लडकीयोंकी अशी एक रिच्युअल असते. उसकी मैफिल. "तेरी मैफिल मे..." असे स्पष्ट उल्लेख असलेली अनेक गाणी अभ्यासून हेच लक्षात येते. लोकेशनः एक मोठा हॉल. मागे दोन्ही बाजूने वरती जाणारे जिने असतील तर उत्तम, नाहीतर किमान मधे एक मोठा जिना असावा. हॉल च्या मध्यभागी एक पियानो. पात्रयोजना अशी हवी: हीरॉइनः कालानुसार मेकअप, किंवा विसंगतही चालेल. गाणार्‍या व्यक्तीच्या समोर गाणे कळत असल्याची अॅक्टिंग करावी लागते. तसे दिग्गज गीतलेखक कधीकधी फेल-सेफ ओळी लिहीतात, म्हणजे "न जाहिर हो, तुम्हारी कश्मकश का राज नजरोंसे" यात अभिनय करू शकणारी हीरॉइन ते बरोबर दाखवेल, तर न करू शकणार्‍या हीरॉइनला या ओळीला वेगळे काही करावेच लागणार नाही. त्यामुळे एक साधारण रडका चेहरा इतपत तयारी पुरते. दुसरे महत्त्वाचे कौशल्य म्हणजे आधी कसमे वगैरे खाउन मग लाथाडलेल्या गरीब हीरोला स्वतःच्या मंगनीच्या मैफिलीत बोलावून त्यालाच गायला सांगणे इतकी "आ बैल" गिरी करता यायला हवी. गरीब हीरो: हा गरीब असल्याने हीरॉइन त्याला पूर्वी दिलेल्या शपथा वगैरे विसरून दुसर्‍याबरोबर लग्न करणार आहे, असा त्याचा समज असतो. हा रोल करायचा असेल तर तीन गुण अत्यावश्यकः १. गरीब असणे २. पियानो फिल्मी स्टाईलने वाजवता येणे (वरती पियानोची व्याख्या पाहा) व ३. एक रडके गाणे अचानक म्हणता येणे. मैफिलीत अचानक गाण्याची ऑर्डर मिळून सुद्धा एक विरहगीत एकदम तयार असायला हवे. पेपरवाले जसे कोणी आजारी पडले की एक श्रद्धांजलीपर लेख तयार ठेवतात तसे मैफिल चे आमंत्रण आले की विरहगीत खिशात ठेवूनच निघावे. दुसरे म्हणजे "Dude, this occasion is not about you" याची अजिबात फिकीर न करता हिरॉइन चा वाढदिवस असेल किंवा मंगनी किंवा लग्न, तेथे आपली रडकथा सादर करता यायला हवी. ती कधी अगम्य भाषेत, कधी सभ्य पण थेट, तर कधी थेट आणि अपमानास्पद अशा कोणत्याही भाषेत करता यायला हवी. हीरॉइनचा बापः या मैफिलीचा निर्माता. कारण ही अवस्था त्याच्यामुळेच निर्माण झालेली असते. चिरूट ओढत इकडेइकडे गर्वाने बघत फिरणे हे मुख्य काम श्रीमंत बकरा: तो श्रीमंत आहे हे दाखवायला सूट घातला की झाले. अधूनमधून हीरॉइन वर हक्क दाखवणार्‍या हालचाली करणे. चालू असलेले गाणे कोणाबद्दल आहे कोणास ठाऊक असे एक्स्प्रेशन्स पाहिजेत. हीरॉइनच्या व याच्या अगदी in your face येउन बेवफाई, मेरे आँसू, गरिबी, चाँदी सोना विरूद्ध प्यार भरा दिल वगैरे गाणारा हा हिचा नक्की कोण आहे. इतक्या चांगल्या प्रसंगात हा हे काय गातोय वगैरे प्रश्न डोक्यात जराही आलेले दिसलेले चालणार नाहीत. मैफिलीतील हुशार स्त्री: हे गाणे कोणाला उद्देशून आहे हे (फक्त) हिला समजले आहे, हे सतत चेहर्‍यावर दिसले पाहिजे. त्यामुळे गूढ हास्य करत एकदा हीरो कडे व एकदा हीरॉइन कडे आलटून पालटून पाहणे आवश्यक. बाकी उपस्थित जनता: पूर्वीच्या डबल डेकर सिंहगड एक्स्प्रेस सारखे जागा मिळेल तेथे बसलेले किंवा उभे. दोन बोटांत वाईन किंवा इतर दारूचे ग्लास धरलेले, मठ्ठपणा हा मुख्य गुण. म्हणजे गरीब हीरो ने "तेरी बेवफाई का शिकवा करू तो..." हे हॉल च्या मध्यावर रडका चेहरा करून उभ्या असलेल्या हीरॉइनकडे बघत म्हण्टले तरी त्याला "कोण बरे ती इतक्या यशस्वी असलेल्या तुला दुखावणारी?" असे विचारण्याइतके अज्ञान पाहिजे. येथे हा ही लॉजिकल प्रश्न पडू नये की जर ते या हीरॉइन बद्दल असेल तर थेट बोल की. आणि या हीरॉइन बद्दल नसेल, तर तिच्या मैफिलीमधे मधेच तुझी कहाणी कशाला? तसेच आपल्या मागच्या तीन पिढ्यांमधले टोटल उर्दू नॉलेज हे पुलं म्हणतात तसे "हमारे बगीचे मे पैदा हुआ फुलदणाणा" च्या पुढे गेलेले नसेल तरी "खयाल-ए-दिल-ए-नाशाद आया", किंवा " एक यही मेरा इलाज-ए-गम-ए-तनहाई है" सारखी डबल-ए बॅटरी पॉवर्ड उर्दू वाक्ये आपल्याला समजली आहेत अशा थाटात माना डोलावता आल्या पाहिजेत. यातली कोणतीही गोष्ट जमणार नसेल तर मैफिलीच्या नादी लागू नका.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
समीक्षा

प्रतिक्रिया द्या
13821 वाचन

💬 प्रतिसाद (39)

प्रतिक्रिया

खुसखुशीत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 01/29/2018 - 21:55 नवीन
झकास ....! संशोधन आवडलं. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मस्त!

यशोधरा
Mon, 01/29/2018 - 22:18 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

सगळी

नाखु
Mon, 01/29/2018 - 22:23 नवीन
(रडकी) गाणी डोळ्यांसमोर फेर धरून नाचू लागली. मुळात धूर(काढे), धुवट (चेहरे), घोडनवरे हि अश्या सिनेमातील आवश्यक जंगम मालमत्ता असावी असा आमचा प्राथमिक अंदाज आहे नितवाचक नाखु शिनेमावाला
  • Log in or register to post comments

फारेंडराव द ग्रेट..

गवि
Mon, 01/29/2018 - 22:35 नवीन
फारेंडराव द ग्रेट..
  • Log in or register to post comments

=))

पैसा
Mon, 01/29/2018 - 22:40 नवीन
=)) चिरफाड!
  • Log in or register to post comments

मस्त...

पगला गजोधर
Tue, 01/30/2018 - 09:14 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments

हलकाफुलका लेख

सुखीमाणूस
Tue, 01/30/2018 - 09:16 नवीन
मज्जा आली वाचताना
  • Log in or register to post comments

मस्त... फूटी कौडी तर लाजवाब.

अभिजीत अवलिया
Tue, 01/30/2018 - 09:42 नवीन
मस्त... फूटी कौडी तर लाजवाब.
  • Log in or register to post comments

झकास फारएन्ड....

ss_sameer
Tue, 01/30/2018 - 11:02 नवीन
  • Log in or register to post comments

झकास फारएन्ड....

ss_sameer
Tue, 01/30/2018 - 11:02 नवीन
  • Log in or register to post comments

झकास फारएन्ड....

ss_sameer
Tue, 01/30/2018 - 11:02 नवीन
.
  • Log in or register to post comments

बोले तो एकदम झकास.

चित्रगुप्त
Tue, 01/30/2018 - 11:30 नवीन
वाहवा.
  • Log in or register to post comments

@ फारएन्ड

अनिंद्य
Tue, 01/30/2018 - 11:49 नवीन
@ फारएन्ड काय तो व्यासंग :-) :-) गीतकरांच्या फेल-सेफ ओळी पियानो (याचा उच्चार 'प्यानो' असाच करावा लागतो - उदा. ये मेरी माँ का प्यानो है) वजने व मापे विभागाचे प्रेम मोजणारे, दोन्ही बाजूने वरती जाणारे जिने असलेला मैफिलीचा हॉल आणि ते बत्थड चेहऱ्याचे मैफिलवाले .... खूप हसलो. अब ऐसी फिल्मे क्यों नही बनती यार?
  • Log in or register to post comments

जबरी राव फारेण्डा ;)

विशाल कुलकर्णी
Tue, 01/30/2018 - 12:27 नवीन
जबरी राव फारेण्डा ;) उदा: १. जा २. जानेजा ३. जानेजाना अजून तीन च्या पुढची लेव्हल कोणी गाठलेली नसावी. यापुढची लेव्हल बहुदा "जानेजाना, जा बाई एकदाची" ही असावी. ;)
  • Log in or register to post comments

जाने-जनाना कसं वाटतं?

आनन्दा
Tue, 01/30/2018 - 13:08 नवीन
जाने-जनाना कसं वाटतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

जबराट

SHASHANKPARAB
Tue, 01/30/2018 - 12:59 नवीन
जबराट एक्दम
  • Log in or register to post comments

ही ही ही

चांदणे संदीप
Tue, 01/30/2018 - 12:59 नवीन
फिदीफिदि हसून घेतलं. बऱ्याच दिवसांनी. Sandy
  • Log in or register to post comments

मौल्यांविषयी वाचूनच वारलो.

पुंबा
Tue, 01/30/2018 - 13:10 नवीन
मौल्यांविषयी वाचूनच वारलो. तसंच प्यार मे जोगी/जोगन बननार्‍यांविषयीसुद्धा लिहा.
  • Log in or register to post comments

कहर आहे =))

टवाळ कार्टा
Tue, 01/30/2018 - 13:57 नवीन
कहर आहे =))
  • Log in or register to post comments

लगी, दिल्लगी, दिल की लगी..

गवि
Tue, 01/30/2018 - 14:15 नवीन
लगी, दिल्लगी, दिल की लगी.. फर्क है बहुधा. १. लगी लगी है ये दिलकी लगी, न समझो इसे दिल्लगी. २. चाहने जब लगे दिल किसीकी खुशी दिल्लगी है नही है ये दिल की लगी.
  • Log in or register to post comments

मस्त

मित्रहो
Tue, 01/30/2018 - 15:12 नवीन
मस्त खुशखुशीत लेख ते मैफिल प्रकरण जुन झाल आता, हल्लीची मैफिल सरळ व्यासापीठावर असते तेही हातात गिटार घेउन. सारा राग गिटारच्या तारांवर काढला जातो. केस लांब असेल तर राग त्याच्यावरही निघतो. मला पडलेला प्रश्न लांब केस नसतील गिटारच्या क्लासला प्रवेश मिळत नाही काय. गाणे ऐकायला आलेले अशा रडगाण्यालाही हात डोलवत असतात. एक हसीना थी किंवा क्या हुवा तेरा वादा किंवा अब तेरे बिन जी लेंगे हम. मला वाटत हेही थोड जुनच झाल. गाणे शोधतो पण हल्लीच्या चित्रपटात सार आउटसोर्स असत म्हणजे ब्रेकअप झाला तरी हिरो किंवा हिरोइन नाही तर कोणी भलता तिसराच गळे फाडत असतो.
  • Log in or register to post comments

गाणे शोधतो पण हल्लीच्या

मराठी कथालेखक
Tue, 01/30/2018 - 17:20 नवीन
गाणे शोधतो पण हल्लीच्या चित्रपटात सार आउटसोर्स असत म्हणजे ब्रेकअप झाला तरी हिरो किंवा हिरोइन नाही तर कोणी भलता तिसराच गळे फाडत असतो.
पण हे जास्त योग्य वाटत नाही का ? प्रत्येक काम हीरो हीरोईननेच केलं पाहिजे वा त्यांना करता आलं पाहिजे असं नाही. गाता न येणारा नायकही प्रेमात पडू शकतो आणि त्याचंही ब्रेकाप होवू शकतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो

आवडेश

ज्योति अळवणी
Tue, 01/30/2018 - 15:36 नवीन
आवडेश
  • Log in or register to post comments

तारिफ-ए-काबिल धागा-ए-मिसळपाव

मराठी कथालेखक
Tue, 01/30/2018 - 16:26 नवीन
भरपूर मालमसाला जमवून एक संशोधनपर लेख लिहिला आहे...लय भारी..
  • Log in or register to post comments

मस्तच!

निशाचर
Tue, 01/30/2018 - 17:38 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

आणखी जाने लेव्हला

चित्रगुप्त
Tue, 01/30/2018 - 22:18 नवीन
जाने चमन (ओ जानेचमन तेरा गोरा बदन) जाने तमन्ना (जाने तमन्ना क्या कर डाला आचल मे मुस्का के) जाने जिगर (दिल जाने जिगर तुझ पे निसार) जाने बहार (... हुस्न तेरा बेमिसाल है) जाने मन (जाने मन तेरे दो नयन चोरी चोरी)
  • Log in or register to post comments

धमाल लेख. ओ फारएंड दादा, जरा

वीणा३
Wed, 01/31/2018 - 02:03 नवीन
धमाल लेख. ओ फारएंड दादा, जरा जास्त लिहीत जा की ओ . सगळ्या मारामारीवाल्या राजकारणी लेखांपासून तेवढीच सुटका.
  • Log in or register to post comments

हा हा.. मस्तच :)

रुपी
Wed, 01/31/2018 - 02:12 नवीन
हा हा.. मस्तच :)
  • Log in or register to post comments

लेख आवडला....

मुक्त विहारि
Wed, 01/31/2018 - 04:03 नवीन
"पियानो" वर फक्त रडकीच गाणी नाही आहेत. http://www.misalpav.com/node/40067
  • Log in or register to post comments

आपकी महेफिलमे मझा आने लगा है.

शेखरमोघे
Wed, 01/31/2018 - 09:09 नवीन
आपकी महेफिलमे मझा आने लगा है..... आणखी काही नमुने: प्रकार १: हिरोच्या (किन्वा हिरवीणीच्या पण चालेल) हातात एक गलास द्या, त्यात कोरा च्या भरा, त्याना जरा अस्थिर चालत नश, बिशा असले शब्द असलेली गाणी म्हणू द्यात. प्रकार २: हिरोच्या (किन्वा हिरवीणीच्या किन्वा दोघान्च्याही) सन्गतीने कसलेही शब्द असलेली गाणी म्हणत १००-१५० लोक एकासारखे एक उड्या मारत, हात पाय हलवत इकडे तिकडे पळू द्यात. मागे बाग, रस्ता, समुद्र किनारा, काहीही चालेल.
  • Log in or register to post comments

फारएन्ड,

गामा पैलवान
Wed, 01/31/2018 - 13:45 नवीन
फारएन्ड, मस्त संकलन आहे. फक्त तो गाजरका हलवा / बैंगनका भरता राहिला. त्यावर अनेकांनी बरंच लिहिलंय, पण तुमच्या लेखणीतनं वाचायला आवडेल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

स्त लेख

अमर विश्वास
Wed, 01/31/2018 - 15:35 नवीन
स्त लेख १. जा २. जानेजा ३. जानेजाना ... ही चढती भाजणी असलेली मुळ ग़ज़ल रफ्ता रफ्ता वो मेरे हस्ती का सामां हो गये पहले जां, फिर जानेजां, फिर जानेजाना हो गये दिन-ब-दिन बढती गईं इस हुस्न की रानाइयां पहले गुल, फिर गुल-बदन, फिर गुल-बदामां हो गए रफ्ता रफ्ता वो मेरे... आप तो नज़दीक से नज़दीक-तर आते गए पहले दिल, फिर दिलरुबा, फिर दिल के मेहमां हो गए रफ्ता रफ्ता वो मेरे... प्यार जब हद से बढ़ा सारे तकल्लुफ मिट गए आप से, फिर तुम हुए, फिर तू का उनवाँ हो गए रफ्ता रफ्ता वो मेरे...
  • Log in or register to post comments

जबरा..

चिगो
Wed, 01/31/2018 - 16:09 नवीन
काय तो जबरा अभ्यास आणि व्यासंग.. मजा आली, फारएन्डराव..
  • Log in or register to post comments

जबरी !

सस्नेह
Wed, 01/31/2018 - 16:31 नवीन
दिलकी गली, जिंदगीका सफर, रास्तेका हमसफर, रातकी तनहाईया, गम-ए-दिल, आवारा दिल ये भी आंदो !
  • Log in or register to post comments

भारी

रीडर
Wed, 01/31/2018 - 17:49 नवीन
  • Log in or register to post comments

भारी

रीडर
Wed, 01/31/2018 - 17:49 नवीन
  • Log in or register to post comments

भारी

रीडर
Wed, 01/31/2018 - 17:50 नवीन
  • Log in or register to post comments

लै भारी...

रंगीला रतन
गुरुवार, 02/01/2018 - 20:26 नवीन
लै भारी... जरा ते जुस्तजुं, बेवफाई, शिकवां, जमिर, दीवार, इन्तेहान, ईश्क, धडकन वगैरेंवर पण येउद्यात...मज्जा आली वचायला.
  • Log in or register to post comments

खूप मस्त लिहिलेय

Prajakta२१
Wed, 05/20/2020 - 00:29 नवीन
खूप मस्त लिहिलेय पु ले शु अवांतर - गाण्यातील शब्दांबाबत - आपकी कसम मधील करवटे बदलते रहें आणि मेरे मेहबूब मधील याद में सारी रात करवटे -ह्या दोन्ही गाण्यात डोळ्यासमोर नारळाच्या करवंट्या बदलणारी माणसे यायची आणि हिरो हिरोईन हे काय गात आहेत असे वाटायचे कधी कधी हिरो हिरोईन करवंट्या बदलण्याचा खेळ खेळत आहेत असे वाटायचे तसेच कटी पतंग मधील ये शाम मस्तानी बघताना कोई डोर मुझे खिंचे तेरी ओर लिये जा च्या पुढे बादशाह मसाला$$$$$$$$$ अशीच ओळ आठवते (बादशाह मसाल्याच्या जाहिरातीमुळे)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा