जुळ्यांचं दुखणं!
'जुळ्यांचं दुखणं' हा शब्दप्रयोग आधी खूप वेळा ऐकला होता पण त्याचा अर्थ समजू लागला ते आमच्या जुळ्या मुलींच्या जन्मानंतर.
त्या अनुषंगाने मला लक्षात आलं की जुळ्या मुलांच्या बाबतीत आपल्याकडे बहुतांश लोकांना काही कल्पना नाही आहे, त्यामुळे आम्हाला आलेले अनुभव तुम्हा समोर मांडण्याचा प्रयत्न.
माझ्या मते, आजकाल जुळ्यांचं प्रमाण वाढलं आहे ते वंध्यत्व(infertility) साठी घेतल्या जाणाऱ्या थोड्या आक्रमक(!) उपचार पद्धतीमुळे. बऱ्याच डॉक्टर लोकांशी झालेल्या बोलण्यातून असं समजलं की हे उपचार चालू असतील तर २-३ गर्भ राहणं खूप कॉमन आहे. आमच्या बाबतीत तेच झालं असावं. मला असं वाटत की आम्ही सुरुवातीला काही कारणांमुळे स्त्री-रोगतज्ञाकडे गेलो आणि विनाकारण पुढचे उपचार घेतले. कदाचित थोडी वाट बघून थोडे इतर उपचार घेता आले असते. असो!
गरोदरपण
तर, आम्हाला तिसऱ्या महिन्याच्या आसपास सोनोग्राफी नंतर सांगितलं की जुळी गर्भ-धारणा आहे. त्यामुळे मग आमच्या दुसऱ्या डॉक्टर मित्राने सल्ला दिला की शक्यतो पूर्ण विश्रांती घ्या. नंतर मग खूप उत्साह, उत्कंठा, हुरहूर इ. सुरु झालं.
जुळ्या गरोदरपणाच्या काळात स्त्रियांना खूप सांभाळावं लागत, गर्भाशयाचा आकार साधारण एका पूर्ण वाढीच्या गर्भासाठीच पुरेसा असल्याने दोन्ही गर्भाचं मिळून वजन ३ किलोच्या वरती झालं की तिथून पुढे खरा कस लागतो. त्यामुळे सातव्या महिन्यापासून प्रसव-कळा सुरु होण्याची खूप शक्यता असते; आणि मग कमी दिवसाचे बाळ जन्माला आले तर साहजिकच अजून जास्त धोका! (हि माहिती मला एका डॉक्टरने सांगितली, चुभुद्याघ्या!)
नियमित तपासणीमध्ये प्रसव-कळा रोखण्यासाठी गोळ्या सुरु केल्या होत्या, तरीपण सातव्या महिन्यात ८ दिवस ऍडमिट करून घेतलं होत, कळा थांबवण्यासाठी. तेही पूर्ण वेळ डोके थोड्या खालच्या पातळीत ठेवून झोपलेल्या अवस्थेत.
ह्या दरम्यान पोट खूप वाढत त्यामुळे अगदी उठबस करणंसुद्धा जिकिरीचं झालं होत. शेवटी शेवटी तर रक्तदाब खूप वाढत होता, आणि मग ३७ आठवड्यानंतर रक्तदाबामुळेच तातडीची सिझेरियन डिलिव्हरी करण्यात आली आणि आमच्या दोन गोंडस पऱ्यांचा जन्म झाला :) सुदैवाने त्यांना नवजात अतिदक्षता विभागात ठेवावं लागलं नाही ही खूप मोठी गोष्ट आहे.
पण बायकोला प्रचंड रक्तस्त्राव झाला आणि त्याची गुंतागुंत पुढचे २ महिने राहिली. (ह्याबाबतीत त्या डॉक्टरांनी अक्षम्य निष्काळजीपणा केला होता असं आमचं मत आहे; अक्षरशः जीवावर बेतलं होत, जे दुसऱ्या डॉक्टरनी निस्तरलं. प्रथितयश, गोल्ड-मेडलिस्ट डॉक्टर कडून आम्हाला हि अपेक्षा नव्हती. त्या डॉक्टर/दवाखान्या विषयी तर मोठ्ठा लेख लिहिता येईल, पण ते नंतर बघू.)
बादवे, आमच्या पाहण्यात असं पण एक उदाहरण आहे की त्यांना पूर्ण दिवस भरून नैसर्गिक प्रसूती झाली, कमीत-कमी त्रासात. पण बहुधा असे अपवादच असावेत. प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेवर पण अवलंबून असेल.
पहिले दिवस
मुलींच्या जन्मापर्यंत बायको दररोज म्हणायची की सांभाळणं कठीण होतंय, कधी एकदा डिलिव्हरी होतेय आणि सुटका होतेय. पण खरी कसरत तर जन्मा-नंतर सुरु झाली आणि वाटलं पोटात होत्या तोवर बरं होत :)
जुळी मुलं असतील तर मनुष्यबळ खूप लागत. एका मुलाला सांभाळताना लागणारे कष्ट हे फक्त दुप्पट नाही होत तर ते exponentially वाढतात :)
जर आईच दूध पुरत नसेल तर शक्यतो फॉर्मुला वालं दूध द्यायला लावतात, आणि त्यासाठी बाटल्या, गरम-पाणी यांची सोय करताना नाकी नऊ येतात.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे झोप - दोन बाळांना एकत्र झोपवायचं म्हटलं की कोणाचीच झोप होत नाही. त्यामुळे वेगळ्या ठिकाणी झोपवणे आलं, म्हणजे एका बाळाला आईपासून वेगळं करणं आलं. आम्हाला तरी त्याचा बॅलेन्स साधणं जमल नाही याची टोचणी नेहमी लागतेय.
पहिले ४-५ महिने आई आणि घरातील इतर मंडळींना जेमतेम २-३ तास झोप मिळाली तरी पुष्कळ म्हणायचं :) ह्या सगळ्याचा प्रचंड ताण येऊ शकतो आणि त्यावेळी त्यांना सांभाळून घेणं खूप गरजेचं आहे.
वाढणे - एक आनंददायी क्रिया
जुळ्या मुलींना एकत्र वाढताना बघणं हा एक वेगळा अनुभव आहे. सुरुवातीला त्रास होतो खूप, पण नंतर त्यांची इतकी सवय होते की एकटी झोपली असेल तर आम्हाला करमत नाही. दोन इतके भिन्न स्वभाव(दोघी non-identical आहेत), त्यांच्यात सुरुवातील काहीच नसणारे बंध, नंतर मग काहीतरी आपल्यासारखच दिसतंय याची जाणीव, मग बरीचशी भांडण आणि कधी-मधी समजूतदारपणे खेळणं! एकाच गोष्टीसाठी केला जाणारा हट्ट(आता ह्यात आई-बाबा पण आले :) ) - कदाचित लहान मोठ्या भावंडात मोट्ठ्याला समजावता येत असेल किंवा लहान भावंडं माघार घेत असेल, पण दोन्ही सारख्या वयाची असल्यामुळे बरीच तारांबळ उडते!
अजून एक मोठी गोष्ट म्हणजे, आर्थिक बाजू. बहुतेक प्रत्येक गोष्ट 'दोन' वेळा घ्यावी लागते. एकाचं दुसऱ्याला वापरता नाही येत. एकंदरीतच गरोदरपण आणि आमच्या अनुभव नुसार किमान पहिले काही वर्षे, आर्थिक बाजू थोडी भक्कम असावी लागते. मला तर '२-३ आठवडे' अति-दक्षता विभागात ठेवण्याची आर्थिक तरतूद/विमा याचा सल्ला दिला गेला होता, सुदैवाने तेवढी गरज नाही पडली. पण आजकालच्या शहरी, धकाधकीच्या जीवनात आधीच्या काळात ज्या गोष्टी सहज होऊन जायच्या त्या सगळ्यासाठी आता सपोर्ट लागतो. (म्हणजे दवाखाना, कामवाली बाई इ.च्या अनुषंगाने होणारे खर्च ह्या संदर्भात म्हणतोय मी). इथून पुढे पण शाळेसाठी वगैरे एकदम खर्चाची तरतूद करावी लागेल.
बऱ्याच वेळेला आम्ही त्रासून म्हणतो की एकचं बाळ असत तर बरं झालं असत, पण तो तात्पुरता त्रागा असतो.
आम्हाला जन्मा-नंतर काही लोकांनी विचारलं की तुम्ही जुळी गर्भ-धारणा आहे म्हटल्यावर लगेच एक गर्भ कमी का नाही केला??? बरेच डॉक्टर पेशंट ना असं सांगत असावेत.
पण मी सांगेन की आम्हाला जरी तसा पर्याय असतो हे माहित असत तरी आम्ही तो निर्णय कधीच घेतला नसता. कुठल्याच दृष्टीने मला ते पटत नाही. पण काही लोकांकडे त्यासाठी सबळ कारण असू शकत. असो!
एकंदरीत हा खूप आनंददायी अनुभव आहे. आता कुठे दीड वर्षाच्या झाल्यात, अजून बराच पल्ला गाठायचा आहे! पण हा कालावधी खूप छान आहे. हे दिवस परत अनुभवता येणार नाहीत. एक गंमत म्हणजे जुळी मुलं असली की कुठे जाल तिथे प्रचंड attention मिळत. मोठ्या झाल्या की ह्या पण आनंदाला मुकू! ;-)
(हे लिहावं की नाही असा विचार बरेच दिवस चालू होता, कारण बऱ्याचशा गोष्टी खाजगी आहेत आणि लोकांना कितपत रुचेल/उपयोगी पडेल माहित नव्हतं.
तरीपण काही गोष्टी इतरांना माहित असलेल्या बरं असं वाटल्यानं शेअर करतोय. यामधल्या वैद्यकीय बाबींमध्ये काही त्रुटी असल्या तर जाणकारांनी दुरुस्त कराव्यात आणि इतर काही सूचना असल्यास त्यांचही स्वागत. कृपया वैयक्तिक टिपण्णी टाळा.)
प्रतिक्रिया
खूप मस्त मला पण जुळी आहेत
छान अनुभव .
अगदी हेच सध्या आमच्या आयुष्यात सुरु आहे :-)
मज्जा! सानिकास्वप्नीलची आठवण
काही गोष्टी लक्षात घ्या.
धन्यवाद!
लई भारी साहेब
पुढे चालू--
सर्वात आधी, तुम्हां उभयतांचे
मस्तच हो! एक लेकरू सांभाळताना
फार छान लिहिलंय
सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद!
welcome to the club !!!
काही गैरसमज--गर्भाशयाचा आकार
छान चर्चा!! बरीच माहिती कळली.
मी आणि माझा भाउ जुळे आहोत
छान अनुभव! मला दोन मुली आहेत
वा ! उत्तम