कालच 'स्लमडॉग मिलिएनिअर' हा चित्रपट पाहिला. बरीच उलट-सुलट मते, नावावरून झालेले वादंग, गोल्डन ग्लोब, बाफ्टा, ऑस्कर इत्यादी पुरस्कारांची लयलूट, भारताच्या ओंगळ आणि हिडीस चेहर्याची केलेली वारेमाप प्रसिद्धी इत्यादी बाबींमुळे हा चित्रपट गेले कित्येक आठवडे कायम चर्चेत राहिला आहे. उत्सुकता होतीच की या चित्रपटात असे नेमके काय असेल ज्यामुळे सर्वत्र याचीच चर्चा होत आहे. अखेर तो योग काल आला. अर्थात बरेच पूर्वग्रह मनात ठेवून हा चित्रपट पाहिला. आस-पास घडणार्या घटनांचा, जनमानसात दिल्या गेलेल्या प्रतिक्रियांचा आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा मनावरचा प्रभाव पूर्णपणे काढून टाकून अगदी कोर्या मनाने हा चित्रपट पाहणे अवघड होते हे मान्य! तरीही मी शक्य तितक्या त्रयस्थपणे या चित्रपटाकडे पाहण्याचा प्रयत्न केला.
चित्रपटाची निर्मितीमुल्ये अत्युच्च दर्जाची होती यात शंकाच नाही. छायालेखन तर उत्कृष्ट होतेच पण इतर तांत्रिक बाबी खूपच सरस होत्या. कॅमेराचा वापर अगदी परिणामकारकरीत्या केला गेला आहे. पात्रांना ओळख देतांना, त्यांच्या व्यक्तीरेखा घडवतांना आणि गोष्ट उलगडून सांगतांना आस-पासच्या परिसराचा, प्रकाशयोजनेचा, गडबड-गोंधळाचा पात्र म्हणून उपयोग करून घेण्यात कॅमेरा यशस्वी ठरलाय. छायालेखकाने प्रत्येक निर्जीव गोष्टीला एक व्यक्तिमत्व दिलेले आहे आणि त्यातूनच चित्रपटाचा संदर्भ आणि एकूण चेहरा स्पष्ट होतो. झोपडपट्टीचे आणि मोठ्या इमारतींचे एका चौकटीत घडणारे दर्शन, लहान पोरे पोलीस आल्यानंतर सैरावैरा पळतांना कव्हर केलेला घाणीचा आणि झोपडपट्टीचा भाग इत्यादी प्रसंगांमुळे चित्रपटाचा संदर्भ अगदी पहिल्या १-२ फ्रेम्समध्ये स्पष्ट होतो आणि पुढचा प्रवास दाखविण्यात चित्रपटाची आणखी रीळे आणि संवादाची भेंडोळी खर्ची पडत नाहीत.
पटकथा मात्र मला तितकीशी रुचली नाही. जमाल पोलीस स्टेशनमध्ये बसून चित्रपट उलगडून दाखवतो ही कल्पना थोडी गुंतागुंतीची वाटली. इरफानच्या प्रश्नांना जमाल उत्तरे देतांना शोमधला प्रसंग आणि मग त्याला प्रश्नाचे उत्तर कशामुळे माहित होते तो प्रसंग असा हा एक कोटी पर्यंतचा प्रवास एक-एक प्रश्नागणिक पुढे सरकतो. अनिल कपूर पोलीसांना बोलावून जमालला त्यांच्या ताब्यात देतो. कुठल्याही लेखी तक्रारीशिवाय पोलीस जमालला कसे काय घेऊन जातात? एक सूत्रसंचालक म्हणून अनिल कपूर स्वतः असा निर्णय कसा काय घेऊ शकतो? शोचे निर्माते, प्रायोजक, दिग्दर्शक इत्यादींना या निर्णयाशी काहीच घेणे-देणे नसते का? चौकशी करून इरफानला जमालच्या सांगण्यातली सत्यता पटते आणि तो त्याला शेवटच्या प्रश्नासाठी शोमध्ये जाण्याची परवानगी देतो. हा भाग खूपच बाळबोध वाटला. अचानक सलीमचे हृदयपरिवर्तन कशामुळे होते? स्वतः मरणार आहे ही खात्री असून देखील तो पळून जाण्याचा प्रयत्न का करत नाही? पापाचे परिमार्जन करण्यासाठी म्हणून तो मरणे पसंत करतो असे घटकाभर मानले तरी त्याच्यात इतका बदल अचानक कसा काय घडतो? लतिकासोबत पळून जाऊन तो जमालच्या प्रेमातला काटा होऊ नये म्हणून दुसरी वाट का पकडत नाही? जावेदला मारणे खरोखर आवश्यक होते का? एक स्पर्धक खेळतांना फसवतो आहे या एका क्षुल्लक शंकेने पोलीस त्याला इतका त्रास देतात तर नायिका मिळाल्यानंतर आणि दोन कोटी मिळाल्यानंतर जावेदविषयी जमालने केलेली तक्रार पोलीसांनी ऐकून घेतली नसती का? किंवा जावेदला मारून सलीम पळून जातो असे दाखवणे शक्य झाले नसते का? की तो पापी आहे म्हणून त्याने मेलेच पाहिजे हा गुळगुळीत चित्रपटीय सिद्धांत वापरून त्याला मारले आहे? एक सरळ पटकथा लिहिली असती तर उत्कंठा वाढली नसती का? पहिल्या भागात चित्रपट थोडा रटाळ वाटतो. लहान मुलांचा भाग थोडा ताणलेला वाटला. शौचालयाच्या टाकीत उडी टाकून अमिताभला भेटायला जाणारा जमाल हा भाग खरच खूप हिडीस आणि अनावश्यक वाटला. त्या प्रसंगाची गरज लक्षात आली नाही. जमालला उत्तरे कशी माहित असतात हे दाखविणारे प्रसंग देखील ओढून्-ताणून घुसडल्यासारखे वाटतात. एक तासानंतर चित्रपट खूप प्रेडीक्टेबल होतो आणि हिंदी चित्रपटाच्या वळणावर जातो. एकंदरीत पटकथेत उत्कंठा मुल्य खूप कमी वाटले.
अभिनयाच्या बाबतीत अनिल कपूरने बाजी मारलेली आहे. शूटींग सुरु होण्या आधीचा धुसफुसत असलेला अनिल आणि लाईट्स ऑनचा आदेश आल्यानंतरचा हसतमुख अनिल हे अक्षरशः पाच ते सात सेकंदात बदलणारे भाव त्याने खूप सुंदर दाखवले आहेत. एका उत्तुंग व्यक्तिमत्वाला शोच्या सूत्रसंचालकाची भूमिका करताना जो बाज आवश्यक आहे तो त्याने योग्यरीत्या पकडला आहे. अधून्-मधून जमालला टोचणारे प्रश्न विचारून त्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रयत्न त्याने फार सुंदररीत्या दाखवले आहेत. लहानपणीचा जमाल, सलीम, लतिका यांची कामे अव्वल झाली आहेत. रुबिनाने लहानपणीची लतिका खूप सुंदर साकरली आहे. आयुष खेडेकरचा जमाल खूपच खरा आणि अप्रतिम! तन्वी लोणकरची थोडी मोठी लतिका पण छान! आंधळ्या भिकार्याची भूमिका करणारा मुलगा पण अभिनयात बाजी मारतो. देव पटेल ठीक वाटला. त्याचे भाव योग्य होते पण बोलण्यातला ब्रिटीश उच्चार त्याच्या व्यक्तिरेखेला खटकतो. इरफान एकच भाव घेऊन वावरतो आणि संवाद नीट म्हणत नाही. त्याचे काम एकसूरी आणि कंटाळवाणे वाटते, सौरभ शुक्ला ठीक. महेश मांजरेकर छोट्याश्या भूमिकेत भाव खाऊन जातो. लतिका आणि जमालच्या सँडविच बनवतांना होणार्या संवादाकडे त्याचे लक्ष गेले तर तो त्यांना गोळ्या घालेल की काय अशी भीती वाटते यातच महेशच्या अभिनयाचे यश दडलेले आहे. फ्रिदा पिंटोने काम चांगले केले आहे. भिकार्यांचा ठेकेदार खूपच मस्त रंगला आहे. लहान मुलांशी प्रेमाने वागून त्यांना भीक मागायला लावणारा क्रूर ठेकेदार त्याने खूप मस्त रंगवला आहे. बाकी श्रुती सेठ (कॉल सेंटरमधली मुलगी), राज झुत्शी (शोच्या टीमचा सदस्य) इत्यादींची कामे योग्य झाली आहेत.
पार्श्वसंगीत सामान्य आहे. 'जय हो' आणि 'रिंगा रिंगा' रहमानच्या इतर उत्कृष्ट गाण्यांपेक्षा कमी उत्कृष्ट आहेत. संवादलेखन अगदीच सामान्य आहे. मसाला चित्रपटाची फोडणी देतांना संवाद अजून खटकेबाज असायला हवे होते. उत्तरे शोधण्यासाठी जमालला जे आयुष्यातले प्रसंग आठवतात त्यांची लांबी कमी करून टोकदारपणा वाढवता आला असता. सरळ पटकथा ठेवली असती तर उत्कंठामुल्य वाढले असते असे मला वाटले. आताच्या पटकथेत चित्रपट तुकड्या-तुकड्यांनी जोडल्यावर होतो तसा कोलाजसदृष्य झाला आहे आणि त्यामुळे कथनामध्ये सुसुत्रता वाटत नाही.
एकंदरीत 'स्लमडॉग मिलिएनिअर' ठीक्-ठाक चित्रपट वाटला. बघायला मिळाला तर ठीक आणि बघायला नाही मिळाला तर काही तरी चांगले न बघितल्याचा पश्चाताप न वाटायला लावणारा वाटला. आपल्याकडचा 'जॉनी गद्दार' आठवा. उत्कृष्ट पटकथा, क्षणोक्षणी वाढत जाणारी उत्कंठा आणि आटोपशीर मांडणी यामुळे हा चित्रपट पुन्हा-पुन्हा बघितला तरी कंटाळा येत नाही. 'आमीर' देखील थोड्या-फार प्रमाणात तसाच वाटला. याहून खूप काही वेगळा "स्लमडॉग..." निश्चितच नाही. पण हॉलीवूडचा परीसस्पर्श झाल्यानंतर यशाच्या आणि जागतिक स्तरावर वाखाणले जाण्याच्या आणि पर्यायाने प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळण्याच्या शक्यता कैकपटीने वाढतात हे खरे!
--समीर
वाचने
5605
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुप छान
+१
In reply to खुप छान by अमोल केळकर
<माझे ३.१४ पैसे>
:-)
In reply to <माझे ३.१४ पैसे> by ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त
नाही हो!
In reply to मस्त by भडकमकर मास्तर
बक्षिस
अगदी हेच
वेन्सडे
In reply to अगदी हेच by भास्कर केन्डे
परिक्षण आवडलं.
छान परिक्षण..
१.
प्रगती-नकारात्मक आणि उपहासात्मक अर्थ आहे
In reply to १. by अनामिक
त्या
In reply to प्रगती-नकारात्मक आणि उपहासात्मक अर्थ आहे by समीरसूर
(विषय दिलेला नाही)
गुड!
In reply to (विषय दिलेला नाही) by प्रसाद लेले
जय हो.........जय हो......
बदनामी
In reply to जय हो.........जय हो...... by वेताळ
बदनामी?
In reply to बदनामी by समीरसूर
एकदम बेकार
समीरराव,
धन्यवाद!
चला धारावीला...
अरे विकास,
In reply to चला धारावीला... by विकास
अहो पण
In reply to अरे विकास, by विसोबा खेचर
भंकस पिक्चर
वैचारीक दिवाळखोरी का धंद्यातील स्मार्टनेस?
जे