नितीन बनतो डॉक्टर
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
नितीन बनतो डॉक्टर ----- ( या काल्पनीक लेखातील घटनाकाळ हा १९८५च्या आसपासचा धरला आहे . )
आंबेवाडीतल्या आपल्या रुममधे आज सकाळी संजु , सोनाची दुक्कल टपकलेली पाहुन नितीन थोडा चकीतच झाला . या दोघांचेही चेहरे त्याला जरा उदासवाणे वाटले . पण लगेच स्व:ताला सावरुन त्याने हसत या बच्चे कंपनीचे स्वागत केले .
"अरे वा . अलभ्य लाभ . आज सकाळीच शेरलॉक होम्स आणी वॅटसन यांची जोडगोळी या पामराकडे कशी काय उगवली ? "
"आम्ही आलो आमच्या सर आर्थर कॉनन डाईलला भेटायला " संजुनेही त्याला किंचीत हसत टोला मारला . त्या तिघांनीही एकमेकांना पाडलेली ही टोपण नावे होती . संजु , सोना या दोघांनाही मनातुन आपल्याला होम्स आणी वॅटसन म्हणलेले आवडत असे . दोघांनीही नेहमीच्या सवयीनुसार रुममधल्या एकुलत्या एक कॉटवर बसकण मारली .
"बसुन घ्यावं स्कॉलर मंडळींनी . आणी हा गरीबाचा पाहुणचार गोड मानुन घ्यावा . " नितीनने थोड्याच वेळापुर्वी जवळच्या रॉयल बेकरीमधुन ताजे गरम पॅटीस आणले होते . ते एका डिशमधे काढुन त्याने या पोरांपुढे ठेवले . पॅटीस बघताच संजु , सोनाची कळी खुलली . दोघेही खाउचा समाचार घेण्यात मग्न झाली . आपले लाड करणारा , आपल्याला नेहमी शेरलॉक होम्स , ज्युल व्हर्न यांच्या आणी अशा अनेक सुरस , चमत्कारीक , साहसकथा सांगणारा नितीनदादा त्यांचा आवडता होता . कधी गप्पा मारायला , तर कधी दंगा करायला , कधी काही अभ्यासातली किंवा दुसरी कुठलीही शंका असेल तर हि मुले हक्काने आपल्या जवळच राहत असलेल्या या नितीनदादाकडे येत असत . या मुलांमुळे नितीनचाही वेळ चांगला जात असे .
"बोला मंडळी , आज कशी काय आमची आठवण झाली ? " मुलांचे खाणेपिणे आटोपताच नितीनने विचारले . पण यावर संजु , सोनाचे चेहरे परत गंभीर झाल्याचे त्याच्या लक्षात आले . दोघांनाही काय बोलावे ते सुचत नव्हते . तेव्हा मुलांना थोडे बोलते करण्यासाठी नितीनने परत विषय बदलुन विचारले .
"मग काय , तुमच्या वार्षीक परिक्षा संपल्या ना ? उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली असेल ना ?" दोन्ही मुलांनी नुसतीच होकारार्थी मान डोलावली .
"अरे वा .. आता काय नुसती मजा ..धमाल . बरोबर ना ? काय काय केलं आतापर्यंत सुट्टीमधे " नितीनने विचारले .
"मागच्याच आठवड्यापासुन स्विमिंग टँक जॉइन केला . या सुट्टीत आम्ही दोघंही पोहणं शिकणार आहोत . " सोनाने माहिती दिली .
"आणी पुढल्या आठवड्यात आम्ही शाळेतल्या ग्रुपबरोबर ट्रेकींगला जाणार आहोत ... नागफणी .. ड्युकस नोजला " संजुनेही माहितीमधे भर घातली .
" मस्तच प्लॅन आहे . " नितीन म्हणाला . या मुलांचे नक्की काय बिनसले आहे हे त्याला अजुनही समजत नव्हते . तरीही त्याने परत चिकाटीने विचारले .
"आणी काय , सुट्टीमधे पिक्चर वगैरे काय बघितले का नाही ? " या प्रश्नावर संजुने थोडेसे नाखुशीने उत्तर दिले .
"हो . कालच आम्ही प्लाझाला 'अमर अकबर अॅन्थनी ' बघितला . " दोन्ही मुलांनी तुटकपणे उत्तर दिले . त्यांचा चेहरा अजुनही पडलेलाच होता .
"अरे मग छान चाललीय की तुमची सुट्टी . 'अमर अकबर अॅन्थनी ' एकदम धमाल फिल्म आहे . मग तुमचे चेहरे असे का पडलेले ? काय घडलंय काय ? " शेवटी न राहवुन नितीनने चक्रावुन विचारलेच . कारण आता त्याचा धीर संपला होता . हा प्रश्न विचारल्यावर त्यालाही आता मोकळे वाटु लागले . तो या मुलांकडे बघत हलक्या आवाजात गुणगुणु लागला .
"होनीको अनहोनी कर दे , अनहोनीको होनी , एक जगह जब जमा हो तीनो , अमर .. अकबर .... अॅन्थनी.........."
संजु , सोनाने एक दोन मिनीटे एकमेकांकडे बघितले . शेवटी अडखळत संजु बोलला .
"पिक्चर तसा चांगला होता . पण एक सीन आम्हाला नाही आवडला . तो .. तो विनोद खन्ना ... अमिताभची पिटाई करतो . अमिताभची ....? हे कसं शक्य आहे ? "
आता कुठे नितीनच्या डोक्यात प्रकाश पडला . संजु हा एक नंबरचा अमिताभ बच्चनचा पंखा . शोलेमधे कर्दनकाळ गब्बरसिंग जेव्हा सगळ्या रामगढ गावाला बंदुकीच्या धाकावर बंदी बनवतो , तेव्हा धिटाईने पुढे येउन गब्बरच्या डोळ्यांत धुळ उडवुन बाजी पलटवणारा अमिताभ , दिवारमधे हप्तेबाज पीटर आणी त्याच्या गुंडांना त्यांच्याच गोडाउनमधे एकट्याने बुकलुन काढणारा अमिताभ , शक्तीमधे रस्त्यातल्या डबड्याला लाथ मारताना जणु मनात खदखदणारा राग दाखवणारा अमिताभ म्हणजे संजुचा जीव की प्राण . आपल्या मोठ्या भावाचे अमिताभ प्रेम पाहुन सोनाही तिला फारसे कळत नसले तरी अमिताभ फॅन बनली होती .
आणी असा हा सुपरमॅन , अँग्री यंग मॅन अमिताभ 'अमर अकबर अॅन्थनी ' मधे अगदीच एकतर्फी मार खातो . तेसुद्धा विनोद खन्ना कडुन . हे काही या मुलांना पटत नव्हते . त्यामुळे त्यांची कालच काही शत्रुपक्षातील / विनोद खन्ना पक्षातील मुलांशी बोलाचालीही झाली होती . खरं तर अमिताभची आणी विनोद खन्नाची झटापट "जमीर " , "खुन पसिना " , "हेराफेरी" या फिल्म्समधेही झाली होती . आणी प्रत्येक वेळेला अमिताभने विनोद खन्नाला तोडीस तोड उत्तर दिले होते . त्यामुळे संजु , सोनाची कॉलर ताठ होती . पण इथे .. छे ..इथे सगळाच मामला २ विरुद्ध १० असा धक्कादायक होता . आणी म्हणुनच संजु , सोनाचे तोंड उतरले होते .
शेवटी न राहवुन हि मुलं नितीनकडे आली होती . आपला नितीनदादा आपल्याला या दु:खातुन काही मार्ग दाखवेल अशी आशा त्यांना होती .
नितीनच्या हा सगळा प्रकार चटकन लक्षात आला . नितीन हा खरं तर अमिताभ इतकाच विनोद खन्नाचाही फॅन होता . "मेरे अपने"मधे जेव्हा शत्रुभैय्याचा खोडसाळ चैनो "शाम , पिस्तोल मेरे पास भी है . बडी किस्मत है तेरी कि वो अभी मेरे साथ नही ." अशी फुशारकी मारतो , तेव्हा आपली भेदक नजर रोखुन त्याला तितक्याच थंडपणे "आईंदा अपने पास रखना " असे उत्तर देणारा विनोद खन्ना , "इन्कार" मधे जीवाची बाजी लावुन गुन्हेगारांना शोधुन काढणारा तगडा विनोद खन्ना नितीनला आवडत असे . आपणही आता विनोद खन्नासारखीच बॉडी बनवायची असे त्याने ठरवलेही होते . पण हे या मुलांसमोर आत्ता बोलुन काही उपयोग नव्हता . नितीन हा काही कुणी डॉक्टर , कौन्सिलर नव्हता . पण आपण मुलांची समजुत काढली नाही तर निदान चार पाच दिवस तरी हि मुले अशीच उदास राहतील हे त्याने ओळखले .
शेवटी एक प्रयत्न करायचे त्याने ठरवले . मनातल्या मनात वाक्यांची जुळवा जुळव करत तो मुलांशी बोलु लागला .
"मला एक सांगा , 'अमर अकबर अॅन्थनी ' मधे विनोद खन्ना म्हणजेच अमर हा कोण आहे ? "
"इन्स्पेक्टर "
"आणी अमिताभ म्हणजे अॅन्थनी ... तो कोण आहे ? "
"अं...?" मुले जरा विचारात पडली . त्यांना नक्की ठरवता येईना .
" अॅन्थनी आहे इकडचे तिकडचे उद्योग करणारा , चोरीचे सोने लपवुन ठेवणारा म्हणजेच थोडक्यात एक गुन्हेगार . काय बरोबर ना ? "
"हो ..बरोबर.." मुलांनी गोंधळुन उत्तर दिले .
"मग मला सांगा , या अॅन्थनीला .. गुन्हेगाराला शिक्षा हि झाली पाहिजे का नको ? मग भले तो रोल अमिताभ करत असला तरीही ? खरे ना ? "
"हो .. शिक्षा झाली पाहिजे . " मुलांनी लगेच उत्तर दिले . त्यांच्या चेह-यावरचा ताण आता थोडा कमी होउ लागला होता .
"अरे मग त्या फाईट सीनमधे हेच दाखवले आहे . तेही विनोदी पद्धतीने . तुम्ही खरं तर तो सीन एन्जॉय करायला हवा होता . ते सोडुन हे काय भलतंच डोक्यांत पकडुन बसलात ."
"काहितरी चुकतं आहे हे समजत होतं . पण काय ते आता समजलं . आता परत एकदा हा पिक्चर बघायला पाहिजे . " संजु आता सैलावुन हसत हसत बोलला . आपला दादा हसतोय म्हणल्यावर सोनानेही हसत हसत मान डोलावली . दोघांचीही उदासी आता निघुन गेली होती . नितीनने मनातल्या मनात हुश्श केले .
"बरं झालं नितीनदादा आम्ही तुझ्याकडे आलो ते . आमचा मुड परत आला . सध्या प्लाझाला अमिताभच्या फिल्म्सचा रिपीट रन चालु आहे . आता आज आपण सगळे "शक्ती " बघायला जाउ ." संजुने उत्साहाने सुचवले . पण नितीन हे ऐकल्यावर परत थोडा विचारात पडला .
"नको रे बाबा . शक्तीमधे शेवटची १५ मिनीटे खुप रडकी आहेत . तुमचा हा मुड परत अपसेट होईल . " नितीनने शंका काढली .
"नाही होणार . नक्की . चल ना, खुप मजा येईल . " सोनाने आग्रह केला .
"आणी जरी आमचा मुड गेला तरी , आमची समजुत काढायला प्रसिद्ध डॉक्टर प्रोफेसर नितीन नुकलवार आमच्या सोबत आहेत की .." संजुने हसत उत्तर दिले .
आपले हे कौतुक ऐकुन नितीनला मनात गुदगुल्या होत होत्या . आपल्या नाकाखाली डॉक्टर आर्थर कॉनन डाईलसारख्या गलमिशा फुटल्याचा त्याला भास झाला . आणी तो त्या नसलेल्या मिशांतल्या मिशांत हसु लागला . तेवढ्यात संजु , सोनाचे लक्ष जवळच्या खुर्चीवर पडलेल्या बॉक्सिंग ग्लोव्हसकडे गेले .
"अरे वा .. बॉक्सिंग ग्लोव्हस ." म्हणत दोघेही तिकडे झेपावले . आपापल्या हातात एक एक ग्लोव्ह्स चढवु लागले .
"अरे ते बॉक्सिंग ग्लोव्हस मला मित्राने दिले आहेत प्रॅक्टीसला . पण अजुन पंचिंग बॉक्स मिळायची आहे . " नितीन त्यांना सांगत होता .
संजु , सोनाचे आता बॉक्सिंग ग्लोव्हस चढवुन झाले होते . त्यांचे हात आता पंच मारायला शिवशिवत होते . पंचिंग बॉक्स नाही म्हणल्यावर त्यांची नजर इकडे तिकडे भिरभिरत शेवटी नितीनवर स्थिरावली . त्यांच्या नजरेतला धोका नितीनने ओळखला . तो घाबरुन म्हणाला .
"संजु , सोना ... तुमचा बेत काय आहे ? स्वता:ला विनोद खन्ना समजुन माझी त्या अॅन्थनीसारखी धुलाई करण्याचा विचार आहे कि काय ? "
पण तो हे बोलेपर्यंत खुप उशीर झाला होता . हातातले बॉक्सिंग ग्लोव्हस परजवत , विकट हास्य करत संजु , सोनाची जोडगोळी त्याच्या दिशेने सरकु लागली होती .
------------------------------ समाप्त ---------------------------- काल्पनीक -------------------------------------------
-- या लेखातील संजु , सोना , नितीन नुकलवार , आंबेवाडी हि नावे प्रसिद्ध लेखक कै. भा . रा. भागवत यांच्या गाजलेल्या कथांतील विजु , मोना , बिपीन बुकलवार , फणसवाडी या आवडत्या नावांवरुन बेतलेली आहेत .
प्रतिक्रिया
आवडली
हाहाहा! छान कथुकली आहे. आवडली
हा हा.. मजेशीर कथा :)
;-) मस्तच लिहीली आहे तुम्ही
@दुर्गविहारी - कॄपया पुन्हा एकदा अशीच एखादी कथा लिहा.
छान आहे कथा. आवडली
सर्वांचे धन्यवाद
मस्त!
२७ एप्रिल या तारखेच्या