Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by उपयोजक on Wed, 07/26/2017 - 17:34
सध्या काही मित्रांनी त्यांच्यासाठी वधुसंशोधनाच्या कामात मलाही सामील करुन घेतलंय.बरेचसे मित्र हे ब्राह्मण समाजातील आहेत.त्यानिमित्याने विविध वधुवरसंशोधन संस्थांना भेटी देणं सुरु आहे.बहुतेक मित्र हे पौरोहित्य करणारे किंवा अल्पउत्पन्न गटातील आहेत.शिक्षणही आर्टस किंवा कॉमर्स शाखेतून पदवी,पदव्युत्तर असेच आहे.वयंही साधारण २८ ते ३५-३६ या गटातील आहेत.सगळे दक्षिण महाराष्ट्रातील म्हणजे सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर,सिंधुदुर्ग या जिल्ह्यातले आहेत. वधुवरसंशोधन संस्थांमधील बर्‍याचशा मुली या पुणे,मुंबई,अौरंगाबाद,नाशिक अशा ठिकाणी चांगल्या पोस्टवर,चांगल्या पगारावर नोकर्‍या करणार्‍या आहेत.फार थोड्या मुली या १२ वी किंवा फक्त BA,B.com अशा आहेत. जी समस्या सध्या सगळीकडे आहे तीच इथेही जाणवली.मुलींच्या अवाजवी अपेक्षा! मुलगी नको मुलगा हवा या हट्टाचे दुष्परिणाम हे आता असे समोर येत आहेत. मुलगा इंजिनियर किंवा तसंच शिक्षण असणारा,मुंबई किंवा पुणे,बंगळूर अशा मोठ्या शहरात राहणारा,महिना किमान ४० हजारांवर पगार असणारा,स्वत:चा फ्लॅट असणारा हवा.अशा अपेक्षा आहेत या मुलींच्या! चांगल्या पोस्टवर असणार्‍या,बर्‍यापैकी मिळवणार्‍या मुलींच्या अपेक्षा समजण्यासारख्या आहेत,पण १२ वी किंवा BA असं शिक्षण असणार्‍या जेमतेम पगार मिळवणार्‍या मुलींनादेखील लग्नासाठीचा मुलगा इंजिनियर किंवा तसंच एखादं ग्लॅमरस शिक्षण असणारा किंवा सरकारी नोकरी असणारा हवा आहे. मुलींची वयं २९,३२,३४ झाली तरीही या अपेक्षा कमी होत नाहीत. आपल्या जातीत कमी शिकलेल्या मुली मिळत नसतील तर दुसर्‍या जातीतील मुली करुन घ्या, हा ही सल्ला मुलांना देऊन झालाय.पण पौरोहित्य करणार्‍या किंवा छोट्या गावांमधे नोकरी करणार्‍या मुलांना किंबहुना त्यांच्या पालकांना पटणारा,रुचणारा नाही.कदाचित यामुळे त्यांच्या व्यवसायावर किंवा कुटूंबातील अन्य सदस्यांच्या विवाहात अडचणी येऊ शकतात.आंतरजातीय विवाहासाठी खरंतर प्रबोधन करायला लागेल पण सध्या तेवढा वेळ देणं शक्य नाही.कारण आधीच या मुलांची लग्नाची वयं उलटून चाललेत. मग यावर बरंच डोकं खाजवून काही उपाय सापडले आहेत. ते असे, १) भारतातल्या अन्य राज्यांमधेही ब्राह्मण समाज आहे.या राज्यांमधे भौगोलिकदृष्ट्या मागासलेले असे काही भाग आहेत.तेथील पालकांना आपल्या मुलींना फार खर्चिक शिक्षण देणं किंवा त्यांच्या विवाहावर फार खर्च करणं शक्य होत नाही.अशा भागातल्या या पालकांशी संपर्क साधून त्यांना अशा आंतरराज्यीय विवाहासाठी राजी करणे.अर्थात भाषा आणि काही प्रमाणात संस्कार वेगळे असणारंच पण हा काही फार मोठा इश्यु नसावा! २) हल्ली नोकरीच्या निमित्ताने किंवा बदललेल्या जीवनशैलीमुळे रोजचं जीवन हे खुप दगदगीचं झालेलं आहे.बर्‍याचदा प्रसारमाध्यमांतून असं वाचायला,ऐकायला मिळतं की तिशीनंतर मुलींसाठी अपत्यप्राप्ती ही सहजसाध्य नसते.मग काही वेळा खर्चिक डॉक्टरी उपायांनंतर हे साध्य होतं. तर यात कितपत तथ्य आहे? हे जर सरसकट होत असेल,अपत्यप्राप्तीला असा विलंब हमखास होतंच असेल तर यासंबंधी शास्त्रीय माहिती मुलींना देऊन योग्य वयात विवाह करण्यासंबंधी त्यांचं प्रबोधन करावं.मतपरिवर्तन करावं (यासंबंधी शास्त्रीय माहिती,लिंका इथे कोणी दिल्या तर आभारच!) ३) होणार्‍या नवर्‍याला तिशीच्या आतच गलेलठ्ठ पगार असावा अशी बर्‍याच मुलींची किंबहुना त्यांच्या आईवडीलांची तशी अपेक्षा असते.वाढलेली महागाई हे कारण त्यांच्याकडून पुढे केलं जातं. आता ही महागाई कुठे भेडसावते?तर काही मुख्य गोष्टींमधे म्हणजे, * मुलानं घर/फ्लॅट घेतला असेल तर त्याचा हप्ता, * हल्ली प्रत्येक घरात किमान दुचाकी तरी असतेच त्यासाठी लागणारं पेट्रोल,किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास केल्यास होणारा खर्च. * घरखर्च. * होणार्‍या अपत्याच्या इंग्रजी माध्यामातल्या शिक्षणाचा खर्च.(त्यासाठी हल्ली खुप आधीपासून बचत करावी लागते!) या सगळ्या खर्चांबाबत फक्त मुली त्यांचे पालक आणि एकुणच समाजाचं काही प्रमाणात प्रबोधनाचा प्रयत्न करणे.कारण बर्‍याचदा आपण आंधळेपणाने दुसरा तसं करतो म्हणजे आपणही(ऐपत,क्षमता नसताना) असं असंच केलं पाहिजे या सामाजिक दबावाला बळी पडतो. ४) काही असे कोर्सेस किंवा व्यवसाय ज्यांमधे आर्थिक प्राप्ती चांगली आहे पण त्यांना तितकसं ग्लॅमर नाही.उदा. ITI किंवा पौरोहित्य. माझे पती ITI आहेत किंवा भटजी आहेत हे सांगण्यात मुलींना कमीपणा वाटतो. दुर्दैवाने आताशा या ग्लॅमरस शिक्षणालाच जास्त महत्व आलंय. काहीवेळा ITI झालेल्या व्यक्तीच्या नोकरीची स्थिरता अधिक असू शकते. हा गैरसमज दूर करुन अशा कोर्सेसना,पौरोहित्याला ग्लॅमर यावं म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. ५) पती-पत्नी दोघांनी मिळून कष्ट केले,विश्वास ठेवला,लग्नानंतरही सुरुवातीची काही वर्षे दोन्हीकडच्या पालकांनी थोडाफार आर्थिक,मानसिक पाठींबा या जोडप्याला मिळाल्यास पुढील वाटचाल सुसह्य होईल असा विश्वास निर्माण केला पाहिजे. आता हे सगळे उपाय प्रत्यक्षात आणण्यासाठी काय काय करता येईल? किंवा अजून काही उपाय असतील तर तेही सुचवले जावेत. आज हा प्रश्न ब्राह्मण समाजात प्रकर्षाने जाणवत असला तरी काही वर्षांनी इतर समाजातही जाणवू लागेल किंवा लागलाही असेल.इथे पुरोहितांना नाकारलं जातंय,इतर समाजात कदाचित शेतकरी मुलगा नाकारला जाईल. एकंदरीत या प्रश्नाचा काही निकाल लागावा, परिस्थिती बदलण्यास मदत मिळावी यासाठी हा लेखनप्रपंच!
  • Log in or register to post comments
  • 41177 views

प्रतिक्रिया

Submitted by अप्पा जोगळेकर on Fri, 07/28/2017 - 13:08

In reply to अर्रर्रर्र by सुबोध खरे

Permalink

हाऊस वाईफ असण्यात किंवा तसे

हाऊस वाईफ असण्यात किंवा तसे म्हणण्यात चुकीचे काय आहे ?
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Fri, 07/28/2017 - 13:10

In reply to अर्रर्रर्र by सुबोध खरे

Permalink

मी हे फार पूर्वीपासून करतेय.

मी हे फार पूर्वीपासून करतेय. खरंतर याबाबतीत मी अगदी स्वतःला mcp म्हणावनार्यांपेक्षा जास्त harshly बोलत असते. तरी मला स्त्रीवाद्यामधे टाकून देतात लोक :) === एनिवे मुलांनो लग्न करायचे असेल तर थोडं गणितबिणित शिकून घ्या आणि नागीण डान्स अजिबात करू नका http://www.independent.co.uk/news/world/asia/indian-woman-cancel-arranged-marriage-wedding-drunk-groom-dancing-drunk-bride-priyanka-tripathi-a7816241.html
  • Log in or register to post comments

Submitted by उदय on Sun, 07/30/2017 - 11:07

In reply to मी हे फार पूर्वीपासून करतेय. by एमी

Permalink

थोडं गणितबिणित शिकून घ्या >>>

थोडं गणितबिणित शिकून घ्या >>> ती केस तर सरळसरळ फसवणुकीची होती. ते लग्न मोडलं तर त्यात विशेष काय?
  • Log in or register to post comments

Submitted by उदय on Sun, 07/30/2017 - 10:18

In reply to आश्चर्य हे आहे की सगळीकडे by अप्पा जोगळेकर

Permalink

अट की अपेक्षा

माझे लग्न झाले ३ वर्षांपूर्वी तेंव्हा मुलीला अमुक इतका पगार हवाच अशी माझी स्वतःची पण अट होती कारण घराचे डाउन पेमेंट, लोन काढणे वगैरे उपद्व्याप मी एकट्यानेच केले होते. त्यामुळे लग्न झालेल्या मुलीने इएमायची दमडी सुद्धा न देता माझ्याबरोबर फुकट राहावे हे मला मान्यच नव्हते. ही अट आठवली की आजही बायको टिंगल करते तो भाग वेगळा.
अशी अट होती की अपेक्षा? अपेक्षा काहीही असावी, त्याला ना नाही कारण शेवटी हा बाजार आहे. पण 'अट' ठेवणे जरा विचित्र वाटले. नॉर्मली मुलाचा/मुलीचा पगार हा माहिती वाचून कळतोच. जर पगार कमी वाटला तर स्थळ जुळत नाही/पसंत नाही असे सरळ सांगावे. त्याच्यासाठी मुलाची ही अशी 'अट' आहे, हे सांगायची गरज काय? आणि अशी अट असताना मुलगी लग्नाला तयार झाली हे अजूनच आश्चर्यकारक वाटले. उद्या मुलीने 'अट' ठेवली की मला मुलगा xx किलोपेक्षा कमी वजनाचाच हवा कारण तो बकाबका खूप खाईल, मग कसे वाटेल ही 'अट' ऐकून? माझे तर मत आहे की लग्नाच्या बाजारात काय पाहिजे त्या अपेक्षा ठेवा, पण मग लग्न जमत नसेल तर त्रागा करू नका. (बसा बोंबलत असे म्हणायचे होते खरंतर, पण उगीच inflammatory वाटेल म्हणून तसे लिहिले नाही. कृपया प्रतिसाद वैयक्तिक समजू नये.)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रे on Sun, 07/30/2017 - 10:47

In reply to अट की अपेक्षा by उदय

Permalink

+१

+१ अट आणि अपेक्षा हे शब्द समानार्थी वाटत असले तरी त्यातला फरक समजून घ्यायला पाहिजे. अपेक्षा म्हणजे दुसरी व्यक्ती ऑलरेडी तसा विचार करणारी असणे आणि अट म्हणजे दुसऱ्या व्यक्तीने आपल्यासाठी बदलणे.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन५८८ on Fri, 07/28/2017 - 13:06

Permalink

माझा स्वतःचा अनुभव,

माझा स्वतःचा अनुभव, आम्ही दोघे एकाच ऑफिस मध्ये जॉब करतो, (मुलगी अमरावतीची मी पुण्यातला )२ वर्षांपासून relation मध्ये होतो. मुलगी एकटीच भाडे तत्वावर फ्लॅट घेऊन राहत असे. मुलीच्या घरचे अमरावतीला असतात. आम्ही दोघांनी घरी सांगितले माझ्या घरचे लग्नाला तयार होते. मुलीची आई तयार, बहीण तयार, मुलीचे वडील पण तयार झाले. वडील मला भेटण्यासाठी पुण्याला येणार होते पण येण्याआधी मोठ्या भावाला माझा परिचय पत्र दाखवावे असे वाटले म्हणून दाखवले. मोठया भावाचे म्हणणे असे कि तू जर तुझी मुलगी दुसऱ्या जातीच्या मुलाशी करून दिली तर माझ्या मुलींना कसे स्थळ येणार. मोठया भावाचा नकार, लगेच मुलीच्या पण वडिलांचा नकार, आईचा नकार, बहिणीचा नकार मुलीचा पण नकार (मुलीचे कारण मी वडिलांच्या शब्दाबाहेर नाही जाणार ). दुसऱ्या दिवशी पासून माझा फोन ब्लॉक नंतर फोन नंबर बदलला. फेसबुक, skype सगळीकडे ब्लॉक. मी मुलीच्या वडिलांना फोन करून कारण विचारले त्यांनी सांगितले १. मुलगा आमच्या जातीचा नाही २. आमच्या घरच्यांना पसंत नाही आणि ३. मुलाकडे शेती नाही. मी व मुलीने तिच्या आवडीचे दागिने घेऊन ठेवले जे लग्नात उपयोगी येणार होते ते तिच्याकडेच ठेवले होते, शिवाय तिच्या बँक अकाउंट मध्ये दर महिना जमेल तसे २०-२५ हजार जमा करत होतो कारण मुलीच्या घरच्यांची परिस्थिती विशेष चांगली नाहीये असे मुली कडून कळले होते. (पैसे का टाकत होतो तर आमच्या लग्नात तिने ते घरी द्यावे म्हणजे लग्नाचा भार तिच्या घरच्यांवर येणार नाही ) लग्नाच्या बाबतीत माझी कोणतीच अट नाही. कसे हि कुठे हि तयार (Court Marriage, देवळात लग्न, मुलीच्या गावाला, पुण्यात ) जसे तिच्या घरचे म्हणतील तसे आता माझा परिचय: मी open category मधला मुलगी obc, माझा वार्षिक पगार ७ लाख, पुण्यात स्वतःचे घर , २ फ्लॅट औंध मध्ये तसेच ६ दुकाने (गावी). घरी आई (Government Servant), मोठा भाऊ (job in private company) वाहिनी (working). टीप: मुलीचे लग्न दुसऱ्या मुलाशी झाले आहे, तिने सर्व दागिने आणि पैसे परत केलेत त्या पैश्यातून मी माझी बाली ट्रिप सुद्दा करून आलो.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 07/28/2017 - 14:53

In reply to माझा स्वतःचा अनुभव, by नितिन५८८

Permalink

सॅड, त्या चुलत बहिणीचे लग्न

सॅड, त्या चुलत बहिणीचे लग्न आधी होऊन जाण्याचा आणि तो पर्यंत थांबण्याचा पर्याय मुलीने निवडावयास हवा होता. मुलगा ओपन कॅटेगरीतील आहे तर का चालू नये ? पण समाज विचीत्र असतो. पण हे जातीभेद लवकरात लवकर संपावयास हवे हे खरे.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन५८८ on Fri, 07/28/2017 - 15:06

In reply to सॅड, त्या चुलत बहिणीचे लग्न by माहितगार

Permalink

विशेष म्हणजे

विशेष म्हणजे ज्या मुलाबरोबर तिचे लग्न झाले आहे त्या मुलाला पण हे सर्व ठाऊक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Sat, 07/29/2017 - 10:48

In reply to माझा स्वतःचा अनुभव, by नितिन५८८

Permalink

दागिने आणि पैसे परत केले हे

दागिने आणि पैसे परत केले हे चांगले झाले. आणि तुम्ही बाली ट्रिप करून आलात हे तर झक्कास झाले :D
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास२९ on Fri, 07/28/2017 - 14:07

Permalink

माझ्या नातेवाइकान्पैकी एका

माझ्या नातेवाइकान्पैकी एका मुलाच्या बायकोने तर लग्न झाल्यावर विदेशातून सासरच्यान्च्या नकळत पैसे पाठविणे सुरू केले.. त्यावरून त्या वरून त्यान्चे सम्बध बिघडले ..
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Sat, 07/29/2017 - 10:38

In reply to माझ्या नातेवाइकान्पैकी एका by रामदास२९

Permalink

कोणाचे पैसे? स्वतःचे कि

कोणाचे पैसे? स्वतःचे कि नवर्याचे? बाकी अशी कित्येक उदा असतात जिथे मुलीचा पूर्ण पगार सासरीच वापरला जातो. स्वतःचा, नवर्याचा, मुलांच्या खर्चात भागीदारी करणे ठीक आहे. पण सासुसासऱ्यांवर का खर्च करायचा तिने?
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन५८८ on Fri, 07/28/2017 - 15:43

Permalink

माझ्या मित्राच्या बाबतीत घडलेला किस्सा.

मित्र सॉफ्टवेअर मध्ये कामाला दरमहा पगार ८०,००० रुपये, मुलगी BA पास घरीच असते, मुलीचे वडील LIC agent, मुलीची आई घरीच असते. तर मित्राला मुलगी बघायचा कार्यक्रम झाला, मुलगी पसंत आहे असे कळवले, मुलीच्या आई चा मित्राला फोन कि माझ्या भावाला तुम्हाला भेटायचे आहे. मित्र ठीक आहे बोलला आणी मुलीच्या मामला भेटून आला. त्यानंतर मुलीच्या आईचा मित्राला पुन्हा फोन. मुलीची आई: माझ्या भावाला वाटतंय कि तुम्ही काही तरी व्यसन करता. मित्र: मी कधी तरी बिअर घेतो ते पण ऑफिसचे काही program असेल तर किंवा १५ दिवसातून कधी तरी मित्रांबरोबर. मुलीची आई: पण तुमच्या आई ने तर असे काही सांगितले नाही मित्र: आहो कोणती आई सांगेल कि माझ्या मुला मध्ये हा दोष आहे किंवा तो कधी तरी बिअर घेतो म्हणून . मुलीची आई: ठीक आहे आता पर्यंत जर तुम्ही घेत असाल तर जाऊद्या पण ह्यापुढे तुम्ही कोणतेही व्यसन करणार नाही याची गॅरंटी हवीये. मित्र: मला थोडा वेळ द्या विचार करायला आणि फोने ठेवून देतो. ह्या फोन चालू असताना आम्ही सर्व मित्र एका कार मधून प्रवास करत होतो. तेव्हा हे सगळे समजले... त्यावर मी त्याला एक सल्ला दिला कि हो म्हणून सांग कि मी गॅरंटी देतो पण तुम्ही पण मला एक गॅरंटी द्या ती म्हणजे मी एक तर सॉफ्टवेअर क्षेत्रात आहे आणि इथे जॉबची काही गॅरंटी नसते. जर लग्नानंतर माझा जॉब गेला तर तुम्ही मला दरमहा ८०००० रुपये द्यायला हवे ह्याची गॅरंटी द्या. मित्राने लगेच फोन करून तसे ऐकवले . . . . . . . मुलीची आई शांतच मग काय शेवटी मित्रानेच नकार दिला.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Fri, 07/28/2017 - 17:47

Permalink

देवा आभारी आहे रे तुझा ....

खरे तर आमच्या पिढीला मुलींपेक्षा त्यांच्या " वाय झेड " आईवडींलाचा त्रास जास्त होता. दिवसेंदिवस आपले जीवन आपले छंद,मित्रपरिवार ई नी विकसित करण्यापेक्षा मोबाईल , कार, अनेक घरे यानी करायचा खुळचटपणा वाढला आहे. याना फक्त तीन गोष्टीच अपडेट करण्यासाठी मजबूत पैसा हवा आहे. व्यवस्थापन प्रमोशन यांचे बाहेर यांचे वाचन जायला तयार नाही. माझ्याही पिढीतील माझे काही मित्र आजही उपभोगापेक्षा पैशाच्या उत्पादनातच रमले आहेत. आयुष्य मानमरातब, करीयर पैसा यापेक्षा मोठा असलेला एक कॅनव्हास आहे हे माझ्या पिढीतीलही काहीना कळायला तयार नाही तर नव्या पिढीचे काय बोलावे. मी अशा कोणत्याही खुळचत पणात रमलो नाही याचा मला विलक्षण अभिमान आहे. पैसा उत्तरोत्तर अनेक मार्गानी मिळत जातो हे सत्य आहे पण गेलेले वय पुन्हा येत नाही . माझ्या मुलीने माझ्या उदाहरणावरून आयुष्य कसे जगायचे हे ठरवावे हे मी तिच्या पचनी पाडण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. माझ्या मित्रपरिवारातील एक मिपाकर काही तडजोडी स्वीकारून सुखाच्या मार्ग आपल्या वैवाहिक जीवनात क्रमित आहे. लग्न हा एक बाजारच पण आयुष्य हा नाही. या बाजारात आपला शेअर किती ताणून विकण्यापासून दूर ठेवायचा याची अक्कल ज्याला वा जिला आहे तिचे सर्व भले होते. माझ्या मिपाकर मित्राने ती वापरली . अशी सदबुद्धी सर्वाना मिळो. वर डॉ खरे यानी आपला खर्च सांगितला आहे. त्यापेक्षाही कमी खर्चात मस्त मजेने जीवन जगता येते. ज्याच्या अस्तित्वावर माझा विश्वासच नाही त्या देवाचा मी खरोखरीच आभारी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Fri, 07/28/2017 - 19:48

In reply to देवा आभारी आहे रे तुझा .... by चौकटराजा

Permalink

सहमत.

सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on Sat, 07/29/2017 - 19:19

In reply to देवा आभारी आहे रे तुझा .... by चौकटराजा

Permalink

अामच्याच एका नातलगांबद्दल!

मुलगा इंजिनियर, MNC मधे! मुलगी MSEB त इंजिनियर. लग्नाला ३ वर्षे झाली. मुलगा मुंबईत(Accenture)पण बायको कणकवलीत! शनिवारी किंवा रविवारी एकत्र भेटतात. "अरे आता मुलाचा/मुलीचा विचार करा" "एवढ्यात नाही.थोडं पैशांचं गणित जमू दे!" मुलीचं वय ३१ मुलाचं ३४ मुलाचे वडील स्टेट बँकेत मॅनेजर होते,आई जिल्हापरिषदेतून निवृत्त.हा एकुलता एक. मोजा किती पैसे घरात येत असतील! अजून कोणतं गणित जमवताहेत देव जाणे!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sun, 07/30/2017 - 07:17

In reply to अामच्याच एका नातलगांबद्दल! by उपयोजक

Permalink

मुलाचे आईवडील मुलाच्या नव्या

मुलाचे आईवडील मुलाच्या नव्या संसारामध्ये किती पैसे इनव्हेस्ट करायला तयार आहेत? ;) एकतर तो त्यांचा पैसा आहे. मुलाचं किंवा मुलीचं लग्न करून देणारेत ना? त्यासाठी खर्च करणारेत ना? श्ब्द देऊन लग्नानंतर फिरवला तर? कितीतरी उदाहरणे दिसतील की मुलाने, मुलीने, साबासबूने (दोन्हीकडील) शब्द बदलणे, नकार, घरातून बाहेर काढणे टाईप. कोणीही यातील एखादी किंवा सर्व गोष्टी करू शकतो. याचे इतके अनुभव मागील पिढ्यांनी घेतलेत की आपण मिळवलेला पैसा किंवा निदान नवर्‍याचा पैसा थोडेफार तारून नेईल.
  • Log in or register to post comments

Submitted by उदय on Sun, 07/30/2017 - 10:23

In reply to अामच्याच एका नातलगांबद्दल! by उपयोजक

Permalink

"अरे आता मुलाचा/मुलीचा विचार

"अरे आता मुलाचा/मुलीचा विचार करा" >>> हीच चूक आहे. आपण कशाला सल्ले द्यायला जायचं आणि भोचकपणा करायचा? त्यांचं-ते बघून घेतील.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Fri, 07/28/2017 - 18:32

Permalink

धाग्यावर वाचनीय चर्चा झाली

धाग्यावर वाचनीय चर्चा झाली आहे. ====================================== नाती आणि हिशेब मिक्स करू नयेत असं माझं मत आहे. कोणत्याही व्यक्तिची कोणत्या एका बिंदूवरची परिस्थिती कितीही पालटू शकते. सहसा नातं परिस्थिंतींशी अतीत असलेलं बरं. हे सूत्र पाळल्यानं माझं लग्न फार यशस्वी आहे असं मी म्हणेन. ======================================= लोक पगार क्ष आहे म्हणतात तेव्हा तो टेक होम असतो कि ग्रॉस? त्यात व्हेरिएबल सॅलरी येते का?
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Fri, 07/28/2017 - 23:53

In reply to धाग्यावर वाचनीय चर्चा झाली by arunjoshi123

Permalink

नाती आणि हिशेब मिक्स करू नयेत

नाती आणि हिशेब मिक्स करू नयेत असं माझं मत आहे. कोणत्याही व्यक्तिची कोणत्या एका बिंदूवरची परिस्थिती कितीही पालटू शकते. हे पटले. फक्त नाते तयार होताना थोडा वेळ जावा लागतो. त्याआधी तर सगळे हिशोबच असतात.
  • Log in or register to post comments

Submitted by उदय on Sun, 07/30/2017 - 10:25

In reply to धाग्यावर वाचनीय चर्चा झाली by arunjoshi123

Permalink

+१

नाती आणि हिशेब मिक्स करू नयेत असं माझं मत आहे. कोणत्याही व्यक्तिची कोणत्या एका बिंदूवरची परिस्थिती कितीही पालटू शकते. एकदम मस्त. सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 07/28/2017 - 18:56

Permalink

चांगला धागा.

चांगला धागा. मुलाची आर्थिक स्थिती उत्तम नाही म्हणून स्थळे नाकारलेल्या अनेक मुलींचे किस्से वर आले आहेत. आता माझ्या माहितीतील एका मुलीच्या त्यागाचा हा अनुभव: ती उच्चशिक्षित असून तिला चांगल्या पगाराची सुरक्षित नोकरी होती. लग्न करताना तिने तिच्यापेक्षा अधिक कमावणारा मुलगा बघावा अशी तिच्या पालकांची पारंपरिक अपेक्षा. पण घडायचे होते वेगळेच. ती छंद म्हणून संगीत शिकण्यासाठी एका अंध तरुणाकडे जात असे. त्या सहवासात त्यांच्या मैत्रीचे धागे जुळले. ती त्याच्या कलेवर बेहद्द खूश होती तर तो तिच्या सहृदय अंतःकरणावर. कळत नकळत मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. जन्मांध असलेल्या त्या तरुणाला स्वतःच्या आई-वडिलांबद्दल काही माहिती नव्हती. तो अनाथालयात वाढलेला होता. पण जिद्दीने त्याने संगीतात प्रावीण्य मिळवले होते. एके दिवशी तो तिला म्हणाला, “तू मला खूप प्रेम दिलेस. पण आता लवकरच तुझे पालक तुझे लग्न ठरवतील व आपली ताटातूट होईल. मग माझ्यापाशी उरतील त्या फक्त आपल्या निखळ प्रेमाच्या आठवणी. त्यांच्या आधारावर मी माझे आयुष्य काढेन”. हे ऐकल्यावर तिला गलबलून आले. पूर्ण २४ तास तिने खूप विचार केला आणि एक धाडशी निर्णय घेतला, तो म्हणजे त्याच्याशी लग्न करण्याचा. प्रथम त्यानेही तिला वेड्यात काढले. “आपली भेट हा एक अपघात होता असे समजू, पण माझ्याशी लग्न करून तू तुझ्या सुंदर आयुष्याची माती करू नकोस,” त्याने तिला विनविले. परंतु, आपल्या निर्णयामुळे तो मनोमन सुखावला आहे आहे हे तिने ताडले. जेव्हा तिने हा निर्णय घरी सांगितला तेव्हा अर्थातच तिला तीव्र विरोध झाला. कुटुंबीयांनी विनवणीपासून ते धमकावणीपर्यंत सर्व प्रकारांनी तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या या मुलीने विरोधाला न जुमानता तिचा निर्णय अमलात आणला. पांढऱ्या काठीच्या आधाराने धडपडणाऱ्या जिद्दी तरुणाला तिने आपलाच भक्कम आधार कायमचा दिला. त्यागाचे याहून चांगले उदाहरण माझ्यातरी पाहण्यात नाही. धडधाकट, निरोगी, उच्चशिक्षित व कमावत्या या तरुणीने एका अंधाला आपला जीवनसाथी केल्याची घटना माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहे. सदर जोडपे हे आमचे कुटुंबं-मित्र आहे. त्याना एक छानशी मुलगी असून ती एक उत्तम गायिका झालेली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रे on Fri, 07/28/2017 - 19:07

In reply to चांगला धागा. by हेमंतकुमार

Permalink

सुंदर. महाबळेश्वर वॅक्स

सुंदर. महाबळेश्वर वॅक्स म्युझिअमचे भावेश भाटिया यांची पण गोष्ट काहीशी अशीच आहे. https://www.youtube.com/watch?v=onS1-fZgLgk http://www.themetrognome.in/lifestyle/achieve/love-candle-light
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Fri, 07/28/2017 - 21:28

In reply to चांगला धागा. by हेमंतकुमार

Permalink

जमल्यास॑ ...

जमल्यास "पानगळीचे झाड " हे पुस्तक जरूर वाचावे. एका मुलीचा विवाह ठरलेला आहे पण त्याचवेळी तिला कुष्ठरोग झाल्याचे समजते. ,मग काय .... विवाह मोडतो. ती मोठ्या धीराने विकाराला सामोरी जाते. बरी होते. व तिच्याच ओफिसातील एक तिला लग्नाची मागणी घालतो अशी काहीशी " सत्यकथा" आहे ती.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 07/28/2017 - 22:07

In reply to चांगला धागा. by हेमंतकुमार

Permalink

छान वाटतय वाचायला पण

छान वाटतय वाचायला पण आपल्यापैकी कितीजणांना हे जमलं असतं ही विचार करण्याची गोष्ट! माझ्या सासर्‍यांच्या आतेभावाचाही किस्सा आहे त्यामुळे जवळून पाहण्यातला आहे. आता ते काका व त्यांच्या पत्नी हयात नाहीत. काका जन्मापासून अधू होते. त्या विकाराला काय म्हणतात हे माहित नाही. विचारायचे धाडस कधी झाले नाही. बुद्धी मात्र तल्लख! चांगली सरकारी नोकरी होती. काकूंनी काकांच्या हुषारीवर भुलून त्यांच्याशी लग्न केले. पुढे मुले होवून संसार सुखाचा केला. मुलांचे सर्व नीट होईस्तोवर काकूंना ताण असणारच. त्या कधी दाखवत नसत पण असणार असे वाटते. दोन्ही मुलांचे लग्न कार्य झाल्यावर अचानक हृदयविकाराने गेल्या. एक दोन मिनिटात सगळे संपले. पुढे काकांचे त्यांच्या मुलांनी सगळे केले पण वर्षभरात ते गेले. सगळे व्यवस्थित असताना लग्न कोणीही करेल पण नेहमीपेक्षा थोडा धाडसी, वेगळा निर्णय घेण्यास हरकत नसते. माझ्या मुलाने असा निर्णय घेतला तर एक पालक म्हणून मी काय करेन, कोणता सल्ला देईन हा विचार करतिये.
  • Log in or register to post comments

Submitted by उदय on Sun, 07/30/2017 - 10:27

In reply to चांगला धागा. by हेमंतकुमार

Permalink

अपवाद

हे उदाहरण अपवाद म्हणूनच बघावे लागेल, प्रातिनिधीक म्हणून नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Sat, 07/29/2017 - 10:51

Permalink

मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत

मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत असे म्हणणार्‍यांसाठी ! आजच्या लोकसत्ता ठाणे चतुरंग पुरवणीत "गावातल्या मुली" हा अरविंद जगताप यांचा लेख वाचावा. मुलींच्या काही समस्या असतील ज्या आपल्या ध्यानात येत नसतील किंवा आपण कदाचित त्याकडे दुर्लक्ष करीत असु तर त्यावर प्रकाश टाकणारा हा लेख आहे. चला हवा येऊद्या मधील पोस्टमन काका वाचून दाखवत असलेले 'पत्र' लेखक म्हणजे अरविंद जगताप. या लेखाची फेसबुक लिंक आहे पण ती ओपन होत नाहिये. लिंक : कुणी हा लेख वाचला असेल तर आपल्या प्रतिक्रिया जरुर नोंदवा.
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on Sat, 07/29/2017 - 19:32

Permalink

आज व्यंगचित्रकार शि.द फडणीस यांचा वाढदिवस!

त्यांचं या विषयाला साजेसं व्यंगचित्र!Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by उदय on Sun, 07/30/2017 - 10:49

In reply to आज व्यंगचित्रकार शि.द फडणीस यांचा वाढदिवस! by उपयोजक

Permalink

एकदम सुयोग्य

एकदम सुयोग्य. परफेक्ट.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sat, 07/29/2017 - 22:42

Permalink

मी धड दहावी पास नाही, त्यात

मी धड दहावी पास नाही, त्यात सतत अपयशी व्यवसायामध्ये, जाती धर्माचा जवळचा सोडा लांबाचा पण संबध नाही. 7 वर्षे झाली लग्नाला, प्रेम विवाह होता, नन्तर त्याचे अरेंज मॅरेज मध्ये पण रूपांतर झाले. तडजोड नाही, समजूतदारपणा असेल दोन्ही कडे तर सर्व उत्तम होते.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Mon, 07/31/2017 - 12:05

In reply to मी धड दहावी पास नाही, त्यात by दशानन

Permalink

समजूतदारपणा असेल दोन्ही कडे

समजूतदारपणा असेल दोन्ही कडे तर
व्यक्ति म्हणून तुम्ही समजूतदार आहात, पण त्यापेक्षा भाग्यवान जास्त आहात. आजूबाजूला एकगठ्ठा समजूतदार लोक असणं महत्भाग्याचं लक्षण आहे, एखादा स्वतः समजूतदार असो नैतर नसो. आणि फरक जितके जास्त तितक समजूतदारपणा कमी. त्या काँट्रास्टमधे तुम्ही अजूनच लकी वाटातायत. जियो.
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Sat, 07/29/2017 - 23:26

Permalink

वरती एका प्रतिसादात

वरती एका प्रतिसादात डॉ. खरे यांनी २५ हजारांत महिन्याचा खर्च बसतो असा अंदाज दिला आहे तो खूपच नीचीच्या बाजूचा (लोअर साइड्}चा वाटतो. कामवाल्या बाया, गाड्या धुणारे लोक यांचा पगार (हे ऑप्शनल)धरलेला दिसत नाही. शिवाय घराची, घरातील वस्तूंची देखभाल/डेप्रीसिएशन तसेच सोसायटीची पंचवार्षिक दुरुस्ती/रंगरंगोटी यासाठी बचत आवश्यक असते. घरात वडीलधारे कोणी असतील तर त्यांची देखभाल, औषधे, शिशुवर्गातील मुलांच्या फिया, त्यांचे शाळेत नेण्या-आणण्याचे खर्च हे सर्व लग्न झाल्यापासून लगेच एका वर्षात जरी सुरू झाले नाहीत तरी नजीकच्या भविष्यकाळात सुरू होणारे असतात. किराणा, वाणसामान, भाजीपाला,फळफळावळ, दूधदुभते, (पनीर, चीझ, बटर वगैरे) गृहोपयोगी वस्तू, (वेगवेगळे साबण, फिनाइल,डेटॉल, झुरळ/डासनाशके वगैरे. ) वरचा खाऊ हे सर्व 'वाणसामान' या शीर्षकाखाली धरले आहे का? वैद्यकीय खर्चातला मोठा भाग वैद्यकीय विम्यातून मिळत असला तरी काही थोडा भाग (हा बराच मोठा असू शकतो,) आपल्याला भरावा लागतो. दंतविमा नसेल तर अकस्मात बर्‍याच खर्चाला सामोरे जावे लागते. यातले काही खर्च अगोदर म्हटल्याप्रमाणे लगेच सुरू होणारे नसले तरी नवीन संसारात काही तातडीने करण्याच्या, निकडीच्या गोष्टी असतात त्यामुळे सुरुवातीचा खर्च वाढतो. उदा विजेचा लपंडाव असलेल्या ठिकाणी इन्वर्टर वगैरे. किंवा सुरुवातीच्या बादल्या, टब, स्वयंपाकाची शेगडी, गॅस सिलेन्डर वगैरे. मला तरी ४०,००० हा आकडा योग्य वाटतो.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Mon, 07/31/2017 - 11:56

In reply to वरती एका प्रतिसादात by राही

Permalink

मिडलक्लास

भारतात मिडलक्लास लाइफ जगायला मासिक खर्च किमान ०.७५ ते १.२५ लाख रु प्रतिमाह लागत असावा. भाडे (किंवा ई एम आय/२) -२५००० युटिलिटि बिल्स - ४००० टेलिकॉम बिल्स - २००० कारचा इ एम आय - ५००० ऑफिसला प्रवास - २अप अअ‍ॅम्ड डौन *२५ दिवस* १५ किमी * ५ रु प्रति किमि = ४००० इंशुरन्सेस (/१२२) = २००० शाळेची फी - ५००० शालेचा इतर खर्च - २००० कपडे (१/१२) - २००० समारंभ - २००० टूरिझम (१/१२) - २००० हॉटेलींग - २००० ग्रॉसरी अँड टॉयलेट्रिज - १०००० फ्रूट्स - २००० व्हेजिटेबल्स - १५०० पेपर नि पुस्तके - ५०० कामवाली - २००० गॅझेट्स (१/१२)- २००० फर्मिचर (१/१२) - १००० औषधे, इ - २००० इतर - ५००० ===================== यात "फार कै म्हणावासा" एकही आयटम नाही. सगळं बेसिक आहे. मंजे दारु, सिगारेट, सिंगापूरची ट्रीप, ड्रायवर, एस यू व्ही, इइ नाही. ========================== बचत एक्सक्लूडेड इनवेस्टमेंट एक्सक्लूडेड या दोन गोष्टि डिसेंट प्रमाणात करायच्या म्हणजे अजून पैसे लागतील. ===================================================== १० लोवर क्लास माणसांमागे १ मिडलक्लास, १० मिडलक्लासांमागे १ अप्परक्लास, इ इ गृहीत धरलं आहे. क्लास म्हणताना शुद्ध आर्थिक निकष. सामाजिक, शैक्षणिक नाही. =============================== तर अशा प्रकारच्या मिडलक्लास लोकांना पाहून किमान असं आपलं जीवन असलं पाहिजे अशी इच्छा एकिकडे होणे आणि दुसरीकडे सरासरी उत्पन्न अत्यंत कमी ( तिसरि कडे लग्नावेळेच्या अपेक्षापूर्तीच्या नवस्वातंत्र्यामुळे) अशा केसेस वाढत असाव्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Mon, 07/31/2017 - 22:24

In reply to वरती एका प्रतिसादात by राही

Permalink

यस आजही भागते...

काही मिपाकर माझ्या घरी येउन गेलेले आहेत. चिवडा पोहे चहा तरी त्याना मिळाला आहे. आम्ही चार आहोत. चिंचवड येथे रहातो. २५००० मधे मस्त भागते. मुळात मी सुखी आहे असे वाटले पाहिजे. माझ्या ऑफीस मधे एक मुलगी होती. म्हणली " पैसा,,,,, पैसा सगळा महत्वाचा असतो आयुष्यात . बाकी सारं फालतू आहे. दुसर्‍यादिवशी मी तिला " पैशा शिवाय भोगायचे ५१ आनंद " अशी एक यादीच दिली. केवळ स्त्री- पुरूष मर्यादा म्हणून काही " आनंद " त्यातून वगळले होते. अशी वृत्ती मिळणे फार भाग्याचे असते.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Mon, 07/31/2017 - 22:36

In reply to यस आजही भागते... by चौकटराजा

Permalink

आणखी काही...

मी काश्मीर ते कन्याकुमारी जेसलमेर ते पुरी असा रग्ग्गड प्रवास सहकुटंब केला आहे. नुकताच युरोप प्रवासही झाला . १९७० पासून जवल जवळ ३००० सिनेमे पाहिलेत. भरपूर पुस्तकेही वाचली. म्हणजे अगदीच भाकरी चटणी जीवन जगलो नाही. बस .. आता इथे मस्त कसे जगावे असा क्लास काढण्यात अर्थ नाही. प्रणव मुकर्जी एकदा म्हणाले होते. " मी ५० वर्षात बायकोला आपणहून एकही साडी घेतली नाही ... पण पन्नात वर्षात चुकुनही आमचे भांडण झाले नाही. " अशीही जोडपी मी सामन्य लोकात पाहिली आहेत. अर्थात आमचे जोडपे असेच आहे असा मी दावा करीत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sun, 07/30/2017 - 07:29

Permalink

राही यांनी दिलेला प्रतिसाद

राही यांनी दिलेला प्रतिसाद आवडला. तो माझ्या मनातील आकड्याशी जुळतोय म्हणून नाही तर त्या त्या गावाशहरातील राहणीमानाशी जुळणारा आहे. लग्न करताना कदाचित मुलीला माहेरी प्रगतीस वाव मिळाला नसेल तर काही शिकणे, व्यवसाय सुरु करणे यासाठी थोडाफार पैसा लागू शकतो. संसार हा एकसुरी कधीच नसतो. तो रूप बदलत राहतो, मार्ग शोधत राहतो. मनुष्यप्राणीही एक गोष्ट अचीव्ह केली की दुसरीकडे लक्ष वळवतो. जे चांगल्या अर्थी म्हणायचे आहे. नवरा मुलगा जीवनसाथी शोधत असेल, आनंद शोधत असेल, भविष्याची स्वप्ने पहात असेल तर मुलगीही तेच करत असते. त्यात नवीन घरासाठी रक्क्म जमवणे हे लक्ष्य असणे कॉमन आहे. नवर्‍याच्या आणि आपल्या (किंवा गाव बदलल्यास फक्त नवर्याच्या) आमदनीत प्रगतीस वाव नसून फक्त दोनवेळ जेवण व दोन धड कपडे हे खूप बेसिक विचार आहेत व ते करणाराही एक वर्ग असतोच. तुम्हाला काय हवेय? हा विचार करण्याचा हक्क सर्व मुलामुलींना आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Mon, 07/31/2017 - 11:14

In reply to राही यांनी दिलेला प्रतिसाद by रेवती

Permalink

भारतात दरडोई उत्पन्न

भारतात दरडोई उत्पन्न प्रतिवर्ष १ लाख रु सरासरी आहे. म्हणजे ८००० रु प्रतिमाह. यातही उत्पन्नाचा श्रीमंत आणि गरीब लोकांचा स्क्यूनेस आहे तो ध्यानात घेतला तर सरासरी उत्पन्न अजूनच कमी (आणि प्रचंडच, पण ते असो.) आहे. असं असेल तर ४०००० प्रतिमाहची अपेक्षा कितपत योग्य आहे? ======================================================= आर्थिक परिस्थिती पित्यापेक्षा उत्तमच असावी असा मुलींचा आग्रह का असतो? मुलांमधे पिता कर्तृत्ववान असेल आणि मुलगा तितका नसेल तर तशा खालावलेल्या स्थितीत जगायला मुले तयार असतात. मुलींना सहसा "स्वतःपेक्षा" तसेच "पित्यापेक्षा" अधिक उत्तम परिस्थितील पती हवा असतो. ========================================================== आपल्या स्वतःची चालू परिस्थीती म्हणजे पित्याची सेवाकालातील शेवटची वर्षे असतात. कोणाच्या शेवटच्या वर्षांच्या परिस्थितीचे कोणाच्या प्रारंभिच्या स्थितीशी तुलना कशी होऊ शकते. ======================================================= (हे सर्व तुम्हाला म्हणायचे होते असं नाही. असं काही तुम्ही लिहिलेलं नाहि. पण एक संवाद म्हणून...)
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Mon, 07/31/2017 - 11:23

In reply to भारतात दरडोई उत्पन्न by arunjoshi123

Permalink

दोन आणि तीन लोकांच्या

दोन आणि तीन लोकांच्या कुटुंबाला सरासरीपेक्षा उत्तम जीवन जगायला २(वा ३)*८०००*१.४ (४०% ब्लॅक इकॉनॉमी मानू.) अनुक्रमे २२,००० आणि ३४,००० रु लागतात. म्हणून आरंभिचं उत्पन्न २५००० आणि २-३ वर्षांनी ३५००० होणार असेल तर पर्याप्त असावं. ==================== अर्थातच निवृत्तीवेतन नसणारे अवलंबी पालक इ असतील तर अधिकची अपेक्षा योग्य आहे. शहरी भागात मात्र अजूनच जास्त अपेक्षा हवी. मेट्रोंत अजूनच जास्त. घर नसणाराचं अजूनच जास्त.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Mon, 07/31/2017 - 12:41

Permalink

लग्न न जमण्याचं पाप

हे पाप आपल्या संस्कृतीला आणि संस्कृतीतील विद्यमान बदलांना एकत्रित दिलं जाऊ शकतं. लेखातल्या ब्राह्मण मुलाचं काय होतं? उदाहरण पाहू - देशाची लोकसंख्या - १२५ कोटी (पहीला निकष मराठी) - उरले १२ कोटी (दुसरा निकष - स्त्री) - ६ कोटी (तिसरा निकष - वय - (० ते ४ वर्षे कमी) - ६*५५%( २५ च्या वरचे लोक) * ४/५० (सरासरी ७५ आयु) * २ (कमी वयाचे लोक डबल मानू) = ०.५ कोटी (चौथा निकष - जात) = ०.५% * २.५% = १ लाख ३२ हजार (पाचवा निकष - गोत्र), एकच असण्याची २०% शक्यता = १ लाख ५ हजार (सहावा निकष - कूंडली) = न जुळण्याची ५० % शक्यता = ५२८०० (सातवा निकष - उपजात) न जुळायची २०% शक्यता =४२,००० मॅचमेकिंग इनेफिसियन्सी (संपर्क, ओळख, मोठा भूभाग, कम्यूनिकेशन गॅप्स, इ ) ९०% ऑप्शन्स गळाले = ४२०० ग्रामीण नको, शेतकरी नको, व्यावसायिक नको = १४०० ================== इथून पुढे आर्थिक स्थिती, सिक्षण, शरीरस्थिती, स्वभाव, घरी कोण कोण आहे, साम्स्कृतिक फरक, आवडिनिवडिंतील फरक, आणि असले बरेच कंसिडरेशन्स येऊन फायल उत्तर १ पेक्षा कमी येतं बर्‍याच केसेमधे =================== आकडे अस्सेच आहेत, जस्ट बेंचमार्क्स वापरले आहेत. फार सिरियसली घ्यायचे नाहीत.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com