✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शब्दकोशांच्या मनोरंजक विश्वात

ह
हेमंतकुमार यांनी
Fri, 06/30/2017 - 19:00  ·  लेख
लेख
माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश! सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात. महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची. मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई. बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो. एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील. आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे. ‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण. गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो. आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही. वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो: १. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो! २. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला. मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी. आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की! शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही! आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल? एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे. ***************************************************************************** ( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
भाषा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
93680 वाचन

💬 प्रतिसाद (177)

प्रतिक्रिया

मस्त ! वेगळ्याच विषयावर

उगा काहितरीच
Fri, 06/30/2017 - 19:12 नवीन
मस्त ! वेगळ्याच विषयावर मनोरंजक लिखाण .
  • Log in or register to post comments

मस्त ! वेगळ्याच विषयावर

उगा काहितरीच
Fri, 06/30/2017 - 19:12 नवीन
मस्त ! वेगळ्याच विषयावर मनोरंजक लिखाण .
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

दशानन
Fri, 06/30/2017 - 22:59 नवीन
जबरदस्त! सविस्तर प्रतिसाद नन्तर देतो, ही फक्त पोच!
  • Log in or register to post comments

मस्त.. लेखन आवडले..

रुपी
Fri, 06/30/2017 - 23:12 नवीन
मस्त.. लेखन आवडले.. foolscap बद्दल नवीनच माहिती समजली.
  • Log in or register to post comments

मस्त हो....

मुक्त विहारि
Fri, 06/30/2017 - 23:24 नवीन
शब्दकोशांची सवय मला पण होती, आमची धाव "वीरकरां" पर्यंतच आणि तरखडकर ह्यांच्या पर्यंतच. (स्वगत : शब्दकोश आणि ज्ञानकोशांची खूपच गरज असेल तर लग्न करणे.)
  • Log in or register to post comments

मस्त माहिती आहे.

ज्योति अळवणी
Sat, 07/01/2017 - 00:18 नवीन
मस्त माहिती आहे.
  • Log in or register to post comments

खूप छान माहिती.

पद्मावति
Sat, 07/01/2017 - 01:39 नवीन
खूप छान माहिती.
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादकांचे आभार !आमची

हेमंतकुमार
Sat, 07/01/2017 - 07:41 नवीन
सर्व प्रतिसादकांचे आभार ! आमची धाव "वीरकरां" पर्यंतच आणि तरखडकर ह्यांच्या पर्यंतच. >>> अहो, हेही नसे थोडके ! कोश वापरणे महत्वाचे.
  • Log in or register to post comments

हॅरी पॉटर वाचतांना बराच उपयोग झाला.

मुक्त विहारि
Sat, 07/01/2017 - 08:37 नवीन
पण सध्या तरी इंग्रजी शिकायचे बंद केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

जबरदस्त

गॅरी ट्रुमन
Sat, 07/01/2017 - 09:15 नवीन
  • Log in or register to post comments

जबरदस्त

गॅरी ट्रुमन
Sat, 07/01/2017 - 09:16 नवीन
लेख खूपच आवडला. असा शब्दांचा अभ्यास कधीतरी करावा असे नेहमी वाटते.
  • Log in or register to post comments

लेख खूपच आवडला. असा शब्दांचा

हेमंतकुमार
Sat, 07/01/2017 - 09:41 नवीन
लेख खूपच आवडला. असा शब्दांचा अभ्यास कधीतरी करावा असे नेहमी वाटते. >>> आभार ! जरूर करा. त्यासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

छान माहिती......

माम्लेदारचा पन्खा
Sat, 07/01/2017 - 10:34 नवीन
आज माहितीत भर पडली !
  • Log in or register to post comments

छान माहिती......

माम्लेदारचा पन्खा
Sat, 07/01/2017 - 10:34 नवीन
आज माहितीत भर पडली !
  • Log in or register to post comments

हा लेख बहुदा मी वाचला आहे

वरुण मोहिते
Sat, 07/01/2017 - 10:38 नवीन
आपण भानू काळे ह्यांच्या अंतर्नाद मध्ये लिहिता का ??लेख आवडला .
  • Log in or register to post comments

इंटरेस्टींग,

नीलमोहर
Sat, 07/01/2017 - 11:41 नवीन
मस्त लिहिलाय लेख, रिकाम्या वेळात शब्दकोश वाचत बसणं हा एक इंटरेस्टिंग तसेच माहितीत भर घालणारा उद्योग असतो, शब्दांचा अफाट खजिना समोर असतो, त्यातून नवीन शब्द शोधण्यात, त्यांचे अर्थ जाणून घेण्यात वेगळाच आनंद मिळतो. आता सर्रास गुगल सर्च वापरले जाते, पण शब्दकोशांची मजा निराळीच.
  • Log in or register to post comments

सर्व नवीन प्रतिसादकांचे

हेमंतकुमार
Sat, 07/01/2017 - 12:06 नवीन
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार ! वरुण, होय. तो मीच ! अंतर्नाद मधील साहित्य येथे पुन्हा प्रकाशित करताना मी तशी तळटीप देत असतो. हा लेख येथे लिहीताना त्यात जालकोशांबद्दलचा परिच्छेद वाढवला आहे. कालानुरुप बदल केलेले बरे असते. नीलमोहोर , सहमत.
  • Log in or register to post comments

खुपच माहितीपुर्ण लेख.

दुर्गविहारी
Sat, 07/01/2017 - 12:44 नवीन
खुपच माहितीपुर्ण लेख. मात्र अंतर्नादच्या कोणत्या महिन्याच्या आवॄत्तीत हा लेख आलाय ते सांगितले तर बरे होईल.
  • Log in or register to post comments

दुर्गाविहारी, आभार.मात्र

हेमंतकुमार
Sat, 07/01/2017 - 13:15 नवीन
दुर्गाविहारी, आभार. मात्र अंतर्नादच्या कोणत्या महिन्याच्या आवॄत्तीत हा लेख आलाय ते सांगितले तर बरे होईल. >>>> ९/२००६.
  • Log in or register to post comments

त्रोटक ? काय म्हणता काय ?

शरद
Sun, 07/02/2017 - 07:48 नवीन
मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. अर्थात इंग्लिश-इंग्लिशच्या तुलनेत या कोशाचे स्वरूप त्रोटक वाटते, हे कबूल करावे लागेल दाते-कर्वे यांचा ९ खंडांचा शब्दकोश " त्रोटक " वाटतो? गंमतच आहे. शरद
  • Log in or register to post comments

वेगळा विषय.

जुइ
Mon, 07/03/2017 - 02:26 नवीन
वेगळ्या विषयावरील रजंक लेख आवडला.
  • Log in or register to post comments

जुइ, आभारी आहे.

हेमंतकुमार
Mon, 07/03/2017 - 05:58 नवीन
जुइ, आभारी आहे.
  • Log in or register to post comments

चांगल्याप्रकारे विषय फुलवला

दशानन
Mon, 07/03/2017 - 08:15 नवीन
चांगल्याप्रकारे विषय फुलवला आहे, आवडलं.
  • Log in or register to post comments

दशानन, तुमच्यासारख्या सुजाण

हेमंतकुमार
Mon, 07/03/2017 - 14:23 नवीन
दशानन, तुमच्यासारख्या सुजाण वाचकांच्या प्रतिसादांमुळे हा लेख फुलला आहे ! आभार.
  • Log in or register to post comments

लेख खूप आवडला..

सानझरी
Mon, 07/03/2017 - 15:02 नवीन
लेख खूप आवडला..
  • Log in or register to post comments

सानझरी,आभारी आहे.

हेमंतकुमार
Mon, 07/03/2017 - 20:21 नवीन
सानझरी,आभारी आहे.
  • Log in or register to post comments

>>दिवसाकाठी निदान एकतरी नवीन

कंजूस
Mon, 07/03/2017 - 20:38 नवीन
>>दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. >> ! दांडगी चिकाटी आहे. २००९ नंतर काय वेगळी शब्दकोश ,इतर साधने वापरलीत? ललित छान!
  • Log in or register to post comments

कंजूस, आभारी आहे.

हेमंतकुमार
Mon, 07/03/2017 - 21:18 नवीन
कंजूस, आभारी आहे. २००९ चा संदर्भ कळाला नाही. सध्या इंग्लिश च्या संदर्भात online dict & thesaurus, 'Dictionary.com' s 'Word Facts', wordsmith.org इ. अभ्यासतो. मराठीसाठी घरी शब्दरत्नाकर आहे. जालावर 'मोल्सवर्थ' बघतो. मध्यम आकाराचा एखादा चांगला छापील कोणीतरी सुचवा. प्र.न.जोशींचा ऐकून आहे. अर्थात फार छापील आता घेण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments

छान!!

सचिन काळे
Wed, 07/05/2017 - 08:28 नवीन
@ कुमार१, आपल्याकडील ज्ञानाला माझा नमस्कार!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

सचिन, आभार ! आपण सतत अभ्यास

हेमंतकुमार
Wed, 07/05/2017 - 11:58 नवीन
सचिन, आभार ! आपण सतत अभ्यास करीत राहायचे आणि ज्ञान वाढवायचे. बस्स एवढेच खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन काळे

जालावरचे इंग्लिश- मराठी

हेमंतकुमार
Tue, 07/04/2017 - 10:21 नवीन
जालावरचे इंग्लिश- मराठी शब्दकोश तितकेसे समाधानकारक नसतात असे मला बरेचदा जाणवले आहे. विशेषतः, अर्थाने जवळपास असणाऱ्या परंतु, सूक्ष्म फरक असणाऱ्या दोन इंग्लिश शब्दांचा मराठीत एकच अर्थ दिलेला असतो. दोन उदाहरणे देतो: • moral & ethical या दोघांचा अर्थ ‘नैतिक’ असा दिला आहे. • ludicrous & ridiculous या दोघांचा अर्थ ‘हास्यास्पद’ असा दिला आहे. माझ्या मते ही जालिय शब्दकोशांची मर्यादा असावी. इथल्या अभ्यासकांचे काय मत आहे ?
  • Log in or register to post comments

ridiculous शब्दाचा मराठी अर्थ

सतिश गावडे
Tue, 07/04/2017 - 11:56 नवीन
ridiculous शब्दाचा मराठी अर्थ काय आहे? मला या शब्दाचा मराठी अर्थही ridiculous हाच माहिती आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

किंवा मग ridiculous म्हणजे

सतिश गावडे
Tue, 07/04/2017 - 11:58 नवीन
किंवा मग ridiculous म्हणजे disgusting =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

'कैच्या कै' कसा वाटतो?

रुपी
गुरुवार, 07/06/2017 - 01:20 नवीन
'कैच्या कै' कसा वाटतो? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

'कैच्या कै' कसा वाटतो? >>> लै

सचिन काळे
गुरुवार, 07/06/2017 - 10:56 नवीन
'कैच्या कै' कसा वाटतो? >>> लै भारी!!! *lol* मला तो जोक आठवला ज्यात एक व्यक्ती "मला तुमचे म्हणणे समजले नाही, कृपया आपण मला पुन्हा सांगाल का?" असं इंग्रजीत म्हणते. त्या वाक्याला मराठीत पर्यायी वाक्य काय असेल? तर उत्तर होतं "आँ!?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

छान माहिती

अभिजीत अवलिया
Wed, 07/05/2017 - 12:33 नवीन
छान माहिती
  • Log in or register to post comments

अभिजित, आभार !

हेमंतकुमार
गुरुवार, 07/06/2017 - 07:26 नवीन
अभिजित, आभार ! @रुपी : ridiculous = उपहासात्मक ( वीरकर कोशानुसार)
  • Log in or register to post comments

गभीर चा अर्थ काय आहे ? (हा

मराठी_माणूस
Fri, 07/07/2017 - 11:58 नवीन
गभीर चा अर्थ काय आहे ? (हा शब्द "तिन्ही सांजा सखे मिळल्या" ह्या गाण्यात आहे )
  • Log in or register to post comments

अखेर सापडला !

हेमंतकुमार
Sun, 09/13/2020 - 12:34 नवीन
म मा, इथे (https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%97%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B0) असे दिले आहे : गभीर, गंभीर वि. १ खोल; अगाध (समुद्र, नदी) दोन्ही शब्दांचा अर्थ एकच दिसतो आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

आठवण ठेउन माहीती दिल्याबद्दल

मराठी_माणूस
Mon, 09/14/2020 - 18:44 नवीन
आठवण ठेउन माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

गभीर चा अर्थ काय आहे ? >>>

हेमंतकुमार
Sat, 07/08/2017 - 09:52 नवीन
गभीर चा अर्थ काय आहे ? >>> प्रयत्न करुनही अजून अर्थ सापडला नाही. क्षमस्व. आता थोडी 'punch' शब्दाची गंमत बघा. त्याचा नेहमीच्या वापरातील अर्थ 'ठोसा' आपल्याला अगदी परिचित. त्याचे अन्य काही अर्थही आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'फळांच्या रसात वाइन घालून बनवलेले पेय'. या अर्थाची व्युत्पत्ती चक्क आपल्या संस्कृत मधून आहे! 'पंच', म्हणजेच 'पाच' हे त्याचे मूळ रुप. जसे आपले 'पंचामृत' तसा त्यांचा 'फळांचा पंच' !
  • Log in or register to post comments

इंग्लिशमध्ये नावाआधी लावायची

हेमंतकुमार
Mon, 07/24/2017 - 11:02 नवीन
इंग्लिशमध्ये नावाआधी लावायची जी आदरार्थी संबोधने आहेत त्यापैकी Mr, Mrs & Ms ही सर्वांनाच परिचित आहेत. गेल्या काही वर्षात या यादीत अजून एकाची भर पडली आह. ते संबोधन आहे Mx. आता Mxचा वापर दोन ठिकाणी करता येतो: १. तृतीयपंथी व्यक्तीच्या नावाआधी किंवा २. जेव्हा आपल्याला एखाद्याच्या नाव/ आडनावावरून त्याच्या लिंगाबद्दल काहीच कल्पना येत नाही तेव्हा. अशी अडचण विशेषतः परदेशी व्यक्तीना पत्र लिहिताना येते. गेल्या काही वर्षात तृतीयपंथीयांचे सामाजिक स्थान उंचावत आहे. तसेच त्यांना समाजव्यवहारात जबाबदारीची पदेही दिली जात आहेत. तेव्हा अशा वेळेस Mx चा वापर वाढता राहील.
  • Log in or register to post comments

कुमार१,

कंजूस
Mon, 07/24/2017 - 12:05 नवीन
कुमार१, एकूण तुमचा शब्दकोशांचा अभ्यास पाहता आता तुम्ही अडवान्सट पातळीवर गेला आहात. शब्दकोश उपयोगाचे नाहीत. या इंग्रजी अथवा इतर कोणत्याही भाषेतले साहित्य वाचून त्या विशेष शब्दांची वाक्येच आत्मसात करावी लागणार आहेत. *२००९ चा लेख आहे,त्यानंतर नवीन काय असं विचारायचं होतं. *ludicrous: हसू आणणारं वर्तन कृती इत्यादी -balancing her umbrella,new dress in the heavy rain was ludicrous. *ridiculous: हास्यास्पद,टर उडवावी असे. -The politicians were ridiculed in the drama. -Some of the Android games demand ridiculously large RAM.
  • Log in or register to post comments

कंजूस, अभिप्रायाबद्दल आभारी

हेमंतकुमार
Mon, 07/24/2017 - 12:48 नवीन
कंजूस, अभिप्रायाबद्दल आभारी आहे. तुमचा प्रतिसाद आवडला. सल्ला ही उपयुक्त आहे.
  • Log in or register to post comments

आपण जेव्हा समाजाची आर्थिक

हेमंतकुमार
Sat, 07/29/2017 - 11:28 नवीन
आपण जेव्हा समाजाची आर्थिक परिस्थितीनुसार दोन ढोबळ गटांत विभागणी करतो तेव्हा त्या गटांना 'आहेरे' व 'नाहीरे' असे शब्द वापरतो. इंग्लिश् मध्ये त्यांना 'haves' & 'have-nots' असे म्हणतात. यातील 'haves' ला एक मजेशीर समानार्थी शब्द अमेरिकन इंग्लिशमध्ये आहे तो म्हणजे 'fat cats'. जास्ती करून हा शब्द राजकीय पक्षांना मदत करणार्‍या धनदांडग्यांना उद्देशून वापरतात.
  • Log in or register to post comments

अजून एक well fed people (

कंजूस
Sat, 07/29/2017 - 14:04 नवीन
अजून एक well fed people ( बहुतेक george orwell ने वापरलाय 'down and out in London'मध्ये ) पेपर कोणता वाचता?
  • Log in or register to post comments

कंजूस, बरोबर. मी सकाळ व

हेमंतकुमार
Sat, 07/29/2017 - 16:33 नवीन
कंजूस, बरोबर. मी सकाळ व Deccan Herald वाचतो.
  • Log in or register to post comments

चर्चिलचे सेकंड वल्ड वॅार

कंजूस
Sat, 07/29/2017 - 19:43 नवीन
चर्चिलचे सेकंड वल्ड वॅार,चांगले आहे.मी हल्ली एशिअन एज पेपर घेतो.
  • Log in or register to post comments

माहीती बद्दल आभार

हेमंतकुमार
Sat, 07/29/2017 - 20:55 नवीन
माहीती बद्दल आभार
  • Log in or register to post comments

सुंदर, माहितीपूर्ण आणि रोचक

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 07/29/2017 - 21:15 नवीन
सुंदर, माहितीपूर्ण आणि रोचक मनोगत !
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा