✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

'हमेशा तुमको चहा'

स
सरनौबत यांनी
Sat, 06/24/2017 - 11:52  ·  लेख
लेख
'हमेशा तुमको चहा' रविवार दुपार. जेवण करून वामकुक्षी साठी आदर्श वेळ. अचानक आपल्या पत्रिकेतील ग्रह फिरतात आणि ओळखीच्या कोणाचं तरी पुढच्या आठवड्यात 'कार्य निघतं'. 'आहेर म्हणून आपण पाकिटात पैसे घालून देऊ' असं ओठांवर आलेलं वाक्य पूर्वानुभवामुळे गिळावं लागतं. "फक्त मित्रांबरोबर बाहेर हिंडायला आवडतं, देण्याघेण्याचे व्यवहार अजिबात कळत नाहीत" वगैरे वाक्यं आपलीच वाट बघत असतात. लक्ष्मी रोड वर दुपारी (त्यातल्या त्यात) गर्दी कमी म्हणून दुपारी २ ला आपण अर्धांगिनी बरोबर 'आहेर म्हणून बाहेर' पडतो. पहिल्या २-३ दुकानात काहीच पसंत पडत नाही. मग 'हस्तकला' मध्ये पंजाबी ड्रेस मटेरियल चा नवीन स्टॉक आलाय तर तिकडे जाऊ, असं ठरतं. दुपारी ३:३० ची वेळ. डोळ्यावर झोप आणि 'ह्यामध्ये अजून कुठले कलर आहेत?' हे ऐकून विटलेले कान. अश्या वेळी तळमजल्यावरील अमृततुल्य च्या दिशेने 'चहाचा वास' येतो. 'तू बघ तोपर्यंत मी जरा चहा (आणि माझी अनावर झोप!) मारून येतो" असं म्हणून आपण खाली सटकतो. पांढऱ्या जाड कपात तो (देवदूत) चहा ओततो. पहिल्या घोटातच सगळा शीण नाहीसा होऊन तरतरी येते. ह्या चहाच्या दुकानांना 'अमृततुल्य' इतकं समर्पक नाव दुसरं नाही! देव-दानवांना बायकोबरोबर दुपारी खरेदीला बाहेर पडायची वेळ आली नसावी. नाहीतर चहा सारखं पेय असताना अमृतमंथनाच्या भानगडीत ते कधीच पडले नसते. पुण्याच्या मध्यवस्तीतील ही अमृततुल्ये केवळ चहाची दुकाने नाहीत. तिथला धगधगता स्टोव्ह चहा रुपी देवाची साधना करण्यासाठी मांडलेला यज्ञ आहे. मोठ्या पातेल्यात चहा पावडर, साखर ह्याची आहुती टाकली जाते. पितळेच्या खलबत्त्यात आलं-वेलदोडे कुटून घंटानाद होतो. सराईत पुजाऱ्याप्रमाणे सगळ्या कृती सुरु असतात. कापडातून चहा गाळून भक्तांना ‘Tea-र्थ’ वाटप करण्यात येते. दिवसाच्या कुठल्याही वेळेला 'चहा घेणार का?' ह्या प्रश्नाला जर “घोटभर चालेल” अशी तुमची प्रतिक्रिया असेल तर समजा की तुम्ही (माझ्यासारखेच) चहाबाज आहात. पुण्यातच ऐकलेलं वाक्य नेहमी आठवतं- ‘बायकांनी कुंकवाला आणि पुरुषांनी चहाला कधी नाही म्हणू नये’. दारू न पिणाऱ्यास teetotaler म्हणतात. तर मग चहा न पिणाऱ्या लोकांना tea-totaler म्हणायला काय हरकत आहे? डिक्शनरी बनवणाऱ्या ऑक्सफर्ड, केम्ब्रिज वगैरे मंडळींनी ह्याची कृपया दखल घ्यावी. गोर-गरिबांपासून अतिश्रीमंतापर्यंत सर्वत्र संचार करणारं हे एक महान द्रव्य आहे. हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या 'चहा-पोळी' नाश्त्यापासून ते अगदी श्रीमंतांच्या 'High Tea’ पर्यंत ह्याचा वावर असतो. एकाच माणसाच्या व्यक्तिमत्वाचे विविध प्रसंगात अनेक पैलू समजतात तसंच चहाचं देखील आहे. सुट्टीच्या दिवशी सकाळी पेपर वाचत चहा एखाद्या निवांत माणसासारखा वाटतो. तर तोच चहा ऑफिस ला जाण्याच्या घाईगडबडीत 'लवकर मला पिऊन टाका' असा म्हणत असतो. ऑफिस मधला मशीन चा चहा रोजच्या रुटीन सारखा बेचव लागतो. तोच ऑफिसच्या रटाळ मीटिंग मध्ये 'करमणुकीचा आधार' वाटतो. हॉस्पिटल मध्ये रात्रभर जागरण झाल्यावर सकाळी येणारा चहा हवाहवासा वाटतो. त्याचप्रमाणे रेल्वेप्रवासात येणारा 'चाय गरम'. टपरीवरचा ‘कटिंग’ चहा, सर्दी-खोकला झाल्यावर 'गवती चहा', कॉलेज कँटीनला मित्रांबरोबर 'चाय पे चर्चा', पाऊस न्याहाळत खिडकीतला चहा, ट्रेकिंग ला चूल मांडून केलेला चहा. मस्का-पाव बरोबरचा इराणी चहा, स्पेशल 'मलई मारके' चहा, उन्हाळ्यातला 'Ice Tea' अशी अनेक रूपे. सगळीच त्या-त्या वेळी हवी-हवीशी वाटणारी. 'फुकट ते पौष्टिक' हे बऱ्याच वेळा खरं असलं तरी दर वेळी फुकटात मिळणारा चहा चांगला असेलंच असं नाही. लांबच्या विमानप्रवासात रात्रीच्या जेवणानंतर मिळणारा चहा ह्याचं उत्तम उदाहरण आहे. रात्री १:३० ची फ्लाईट. विमानातील जेवण होईपर्यंत ३ वाजतात. आता ही वेळ काही चहाची आहे का हो? अश्या (अ)वेळी 'कोरा चहा' घेऊन तितक्याच कोऱ्या चेहेऱ्याची हवाई सुंदरी येते. कोरा चहा कपात ओतून कृत्रिम हसून निघून जाते. मग आपणच त्यात साखर आणि दुधाची पावडर घालून 'चहा(सदृश पदार्थ) बनवायचा. चहा ह्या पेयाचा इतका अपमान दुसऱ्या कोणीच केला नसेल! चहाचा अजून एक अपमान म्हणजे authentic चायनीज रेस्टारंटसमध्ये जेवणानंतर मिळणारा 'जस्मिन टी'. चिनी लोकांनी एकही प्राणी आणि भाजीपाला सोडला नाही खायचा. सगळे प्राणी आणि भाज्या संपल्यावर फुलांकडे त्यांची (मिचमिची) दृष्टी पडली असावी. मोगरा, शेवंतीचा वास चांगला म्हणून त्याचा चहा? 'च्या'यला! ज्या देशात चहाचा शोध लागला त्याच लोकांनी असं करावं ह्यापेक्षा दुर्दैव कुठलं? कटिंग चहा आणि फूल चहा माहिती होतं. पण फुलं घातलेला चहा 'Is not my Cup of Tea'! चहा कसा करायचा हे समजत नसल्याने देशाचं नाव 'चाय'ना पडलं असावं. चहाची कधी तलफ येते, कधी सवय होते, कधी शिष्टाचार म्हणून, तर कधी कंटाळा आला म्हणूनही चहा घेतला जातो. पूर्वी स्मार्ट-फोन्स नव्हते तेव्हा चहा हे उत्तम वेळ घालवण्याचं साधन होतं. जीवन सुरक्षेसाठी LIC ला आणि एखाद्या ठिकाणी अर्धा-पाऊण तास काढायचा असेल तर चहाला पर्याय नाही. प्रवासात पाय मोकळे करायला उतरतो तेव्हा भूक नसेल तर टाइम पास म्हणून चहा. भूक लागली असेल पण खायला नसेल तरी चहा. आयत्या वेळी येणाऱ्या पाहुण्यांसाठी चहा. लग्नाची बोलणी करायला देखील 'इसीलिये मम्मी ने मेरे तुझे चाय पे बुलाया हैं'. सहज घरी भेटायला या सांगायचं असेल तर 'चहाला या ना' असंच म्हणतो. 'चहाला आलंच पाहिजे' असं आग्रहाचं निमंत्रण मोडवत नाही म्हणून आपण जातो. मात्र चहात ‘आलंच’ नसेल तर हिरमोड होतो. सरकारी ऑफिसातली आपली कामे करून घेण्यासाठी जी चिरीमिरी द्यावी लागते त्यालाही 'चायपानी'चे आवरण मिळते. शुल्लक भांडणांना 'चहाच्या पेल्यातील वादळ' म्हणतात. जेम्स वॅट ला चहाची आवड नसती तर वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लागायला अजून 'वॅट' पहावी लागली असती. चहा उत्तम साथीदार आहे. कंटाळवाण्या प्रवासात जसा साथ देतो तसा बिस्किटापासून वडापाव पर्यंत सगळ्या पदार्थांना देखील उत्कृष्ट साथ देतो. मूळ पदार्थाच्या चवीवर कुरघोडी न करता. असा बहुगुणी आहे (च)हा. केरळ, तामिळनाडू भागांत एका कपातून उंचावरून दुसऱ्या कपात ओतून ‘फेसाळता’ चहा देतात. कापडाच्या दुकानात गजाने कापड मोजताना जेवढा लांब हात नेतात तितक्या उंचीवरून चहा ओततात. बहुधा 'मिलीलीटर' ऐवजी 'मीटर' वर चहा विकत असावेत. कालानुरूप चहा बनवायची पद्धत बदलली तशी चहा द्यायची देखील. अमृततुल्य मध्ये पांढऱ्या जाड कपात चहा. टपरीवर काचेच्या छोट्या ग्लास मध्ये 'कटिंग' चहा. दाक्षिणात्य हॉटेलात स्टीलचा ग्लास आणि वाटी. लग्नकार्यात आणि ऑफिसात चॉकलेटी रंगाच्या कपात चहा. असा सुटसुटीत प्रकार असायचा. आधुनिकतेच्या जमान्यात चहाचा कान उपटला गेला आणि प्लास्टिकच्या छोट्या ग्लासात चहा देऊ लागले. हायवे वरील फूड मॉल्स वर तर इतक्या लहान कपात चहा देतात कि 'चहा कपात' चा चुकीचा अर्थ त्यांनी लावला असावा बहुधा. Middle East ला नोकरी निमित्त स्थायिक झालो तेव्हा 'कडक चहा' च्या दुकानांवर चहाचे विविध प्रकार प्यायला मिळाले. दालचिनी आणि काळी मिरी वाला 'येमेनी' चहा जबरदस्त. Turkish रेस्टारंट मध्ये कोऱ्या चहात पुदिन्याचं पान घातलेला Turkish Tea देखील आवडला. इस्तंबूल (टर्की) ला तर चहा-कॉफी चे मोठे शौकीन आहेत. तिथल्या इस्तिकलाल स्ट्रीट वर तिथल्या स्पेशल कप-बशीत चहा पिणे एक सोहळा होतो. चहाला इतका मान देणारे 'चहा'ते बघून धन्यता वाटते. 'हमेशा तुमको चहा' ह्या गाण्याचा गर्भितार्थ देवदासच्या आई ने लक्षात घेतला नाही. नाहीतर तिने पारो ला टाकण्याऐवजी पोराला 'चहा टाकला' असता. देवदास ला ब्लॅक लेबल ऐवजी (ब्रुक बॉण्ड) रेड लेबल चा नाद लागला असता. चहाची एवढी महती कळल्यावर एका अमृततुल्य बाहेर लिहिलेलं वाक्य मला अगदी पुरेपूर पटतं - 'चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा लागतो'.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
37168 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

हमेशा तुमको चहा' ह्या

कायरा
गुरुवार, 06/29/2017 - 14:48 नवीन
हमेशा तुमको चहा' ह्या गाण्याचा गर्भितार्थ देवदासच्या आई ने लक्षात घेतला नाही. नाहीतर तिने पारो ला टाकण्याऐवजी पोराला 'चहा टाकला' व्वा व्वा काय जबरदस्त लिखाण! लेख वाचताना पुलं. ची आठवण आली. पट्टीचे लिहीणारे.मजा आली वाचताना.
  • Log in or register to post comments

अट्टल चहाबाज

गामा पैलवान
गुरुवार, 06/29/2017 - 18:41 नवीन
जगप्रवासी,
मीपण तुमच्यासारखा चहा चा चहाता आहे. अगदी रात्री बेरात्री कधीही दिला तरी तय्यार.
अट्टल चहाबाज तर ऐन वैशाखाच्या रणरणत्या उन्हात डांबरी सडकेवरच्या टपरीत दुपारी एक वाजता देखील चहा प्यायला एका पायावर तय्यार असतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

चहापुराण आवडलं !

अजया
गुरुवार, 06/29/2017 - 22:26 नवीन
चहापुराण आवडलं !
  • Log in or register to post comments

काय योगायोग म्हनायचा... :)

विखि
गुरुवार, 06/29/2017 - 22:50 नवीन
आज दुपारी पासुन च ' हमेशा तुमको चहा चहा चहा...मुझको कॉफी कॉफी कॉफी' असलं कायतरी पिजे गाणं डोक्यात फिरत होतं, २/३ लोक्काना म्हणुन दाखवुन बिचार्‍याना चावलो पण , :) आणी इकडं आलो तर इकडं पण तेच, च्या' मारी काय चाललय काय आज :) मी पण बेक्कार चहाबाज माणुस, पण दातांचा बाजार उठ्ल्यापासुन कमी केलाय. चाहा तो बहुत न चाहे तुझे चाहत पे मगर कोई जोर नही....
  • Log in or register to post comments

मस्त...

रुपी
Fri, 06/30/2017 - 01:19 नवीन
मात्र चहात ‘आलंच’ नसेल तर हिरमोड होतो. >> अगदी खरं. त्या कारणामुळे मी कित्येकांकडे चहा घ्यायचा टाळते. जरा जास्त मोकळेपणाने सांगता येत असेल तर 'आलं घालणार असशील तर चहा घेईन' असंसुद्धा सांगते :) कमी गोड वाटला तर आणखी साखरसुद्धा मागून घेते. भारतात आपण बनवतो तो चहा 'कडक, मिठा, खुशबूदार' असा हवा असतो.. पण इतर प्रकारांमधला 'जस्मिन टी' एकदाच घेतला, पण मला फार आवडला. थंडीतल्या एके दिवशी थाई जेवण आणि त्या छोट्या छोट्या कपांत दिलेला जस्मिन टी भुरके मारत मारत गप्पांचा फड असा भारी जमला होता, की तो चहा भरपूर रिचवला!
  • Log in or register to post comments

चहा उत्तम शिजला आहे

वकील साहेब
Fri, 06/30/2017 - 13:22 नवीन
चहा उत्तम शिजला आहे. अगदी घोट घोट चवीने पिला. मजा आली. अप्रतिम पण तलफ काही गेली नाही अजून. यासाठी दुसरा भाग येऊ द्या. त्यात आपल्या चहा चे अजून एक भावंड ग्रीन टी पासून तर चहा वाला, त्यांचे प्रकार तेथील गप्पांचे अड्डे, लोकल मधल्या चहा वाल्याची आवाज देण्याची पद्धत, चहाचे स्थानकाल परत्वे बदलनारे दर, वैगरे वैगरे विषय पण येऊ द्या पु भा प्र
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Sat, 07/01/2017 - 10:40 नवीन
चहापुराण आवडले.
  • Log in or register to post comments

मस्तच.

मयुरेश फडके
Sun, 07/02/2017 - 19:56 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments

खुमासदार शैली..

चिगो
Mon, 07/03/2017 - 18:08 नवीन
अत्यंत खुमासदार शैलीत लिहीलेलं कोटीबाज चहापुराण आवडले.. आणखी येऊ द्या..
  • Log in or register to post comments

मस्त लघुनिबंध

चौकटराजा
Tue, 07/04/2017 - 06:22 नवीन
नव्या पिढीला जवळ जवळ माहीत नसणारा हा लेखन प्रकार इथे आणल्याबद्द्ल धन्यवाद. असे लेखन लिहायला एक विशिष्ट मिस्किल स्वभाव व त्याच बरोबर अत्यंत गंभीर निरिक्षण यांचा मिलाफ असावा लागतो. तो दिसत आहे. वा ! आता एक उणीव चहाची. बर्‍याच वर्षानी "तो" तिला अचानक भेटल्यास ते दोघे "समोरच्या" कॅफेत जाउन कॉफी घेतात चहा नाही. कारण प्रेम प्रकरणात कधी "चल चहा घेउ" असे म्हणायचे नसते. ती प्रतिष्ठा चहाला नाही. " चला चहा घेउ ! " हे वाक्य सचिवालयातच शोभून दिसते.
  • Log in or register to post comments

कॉफी ला जसं एक प्रकारचं 'रोमँटिक वलय' आहे ते चहा ला नाही

सरनौबत
Tue, 07/04/2017 - 18:38 नवीन
खरंय तुमचं. कॉफी ला जसं एक प्रकारचं 'रोमँटिक वलय' आहे ते चहा ला नाही. रोज चहा पीत असल्यामुळे बदल म्हणून कॉफी प्यावीशी वाटत असेल अश्या वेळी. शिवाय बरिस्ता वगैरे मध्ये जसं वातावरण असतं तसे 'टी लाऊंज' तितकेसे नाहीत. ते चालू झाल्यास चहा देखील आताच्या 'ओपन कॅटेगरी' मधून VIP कॅटेगरीत येऊ शकेल.
  • Log in or register to post comments

‘बायकांनी कुंकवाला आणि

सूड
Wed, 07/05/2017 - 01:20 नवीन
‘बायकांनी कुंकवाला आणि पुरुषांनी चहाला कधी नाही म्हणू नये’
‘बायकांनी कुंकवाच्या आणि पुरुषांनं चहाच्या घोटाला कधी नाही म्हणू नये’
  • Log in or register to post comments

‘बायकांनी कुंकवाच्या बोटाला*

सूड
Wed, 07/05/2017 - 01:21 नवीन
‘बायकांनी कुंकवाच्या बोटाला* आणि पुरुषांनं चहाच्या घोटाला कधी नाही म्हणू नये’
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

चहा

नारायण नाड्कणि
Wed, 07/05/2017 - 11:25 नवीन
चहा हा तसा आमचा आवडीचा. चहाबद्दल सुंदर लघु लेखा बद्दल धन्यवाद. चहा चा उगम बहुदा ऑस्ट्रेलिया मध्ये झाला असावा.
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेख

विटेकर
Wed, 07/05/2017 - 11:29 नवीन
आवडला ! खूप च छान पन्चेस ! उत्तम लेखन ! मी चहाबाज आहे पण मला चहाचे पथ्थ्य आहे .. विटुकाकूचा डोळा चुकवून मी कधी कधी चहा पितो. कधी कधी - जानेवारीच्या सरत्या दुपारी / एखद्या पावसाळी सकाळी तिला येते माझी दया . पण आता मी चहाला मुकलोच आहे ! - शनवारातला मोतीबागेच्या समोरचे अमृत घेतले आहे का कधी ? ह्लली मिसळवाले बेदेकर ही बरा चहा देतात. - परदेशी प्रवासात चहा वर्ज्य करावा ... काल्या चहात गार ढोण चहा पिण्यापेक्षा काडेचिरईताचा काढा बरा ! - पुने - मुम्बईप्रवासात गाडी जिथे थांबते .. तिथे भंकस चहा मिळतो .. अगदी द्त्तचा चहा पण फालतू ! - पुण्याहून विट्याला जाताना विरन्गुळा चा चहा बरा असतो पण भय्न्कर महाग , त्यपेक्षा सातारा सोडताना घाटाच्या उतारावर एक ट्परी आहे , तिथला वडापाव आणि चहा बेष्ट ! - तसेच कराडचा पूल ओलांडण्यापूर्वी डाव्या बाजूला एका गाड्यावर मस्त चहा मिळतो ! - जोतिबाच्या डोनगरावर , मदिरात आत जाण्यापूर्वी एका गाड्यावर अफलातून चहा मिळतो - केरळ मध्ये बम्बातले पाणी वापरुन बनवलेले चहा हाय्क्लास ! - तसेच बन्गाली बिनदुधाचा चहा मसाला घातलेला चहा - लैच भारी हा एकदा मी उत्तरेत सरहिन्द स्टेशन वर पिला होता. - भटिण्दा मधे एक्दा खडा चम्मच दूध - मलई चहा घेतला होता .. अजून चव विसरलो नाही ! पण सगळ्यात सुन्दर .. मैय्याच्या किनारी चूल पेट्वून , गुळ घालून केलेला बिन दुधाचा चहा .. ज्या माऊलीला तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा पाहिले आहे आणि पुन्हा आयुष्यात पहाण्याची शक्यता नाही .. तिच्या सुग्रण हातानी बनवलेला आप्ल्याच स्तील्च्या ग्लासात पिलेला चहा ... साक्षात मैय्याचे दूध ते.. त्याला तोडच नाही ! -
  • Log in or register to post comments

क्षमा

विटेकर
Wed, 07/05/2017 - 11:33 नवीन
अफाट शुद्धलेखनाच्या चुकांबद्दल ! खूप दिवसानी मिपावर लिहिले , हल्ली गुगल कळफलकाची सवय लागली आहे .. त्यामुळे इथे वेगात लिहिताना चुका होतात. कृपया बाजार उठवू नये !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

तुम्हीसुद्धा!

गामा पैलवान
Wed, 07/05/2017 - 11:43 नवीन
विटेकर, तुम्हीसुद्धा गूगल वापरता तर! मला वाटलं की गौगल्याचं लौल्य केवळ मलाच जडलं आहे. :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

धन्यवाद विटेकर

सरनौबत
Wed, 07/05/2017 - 16:08 नवीन
अमूल्य माहितीबद्दल धन्यवाद विटेकर. सातारा, कराड, जोतिबा इथला चहा प्यायला आहे. दत्त चा देखील आवडत नाही. कमला नेहरू पार्क बाहेर छान मिळतो चहा. नळस्टॉप ला मनोज चा चहा चांगला आहे. मैया किनारी गुळाचा प्यायला नाही कधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

चहा

नारायण नाड्कणि
Fri, 07/07/2017 - 07:49 नवीन
नळस्टॉप ला कुथे.
  • Log in or register to post comments

मस्त लेख.

सौन्दर्य
Sat, 07/08/2017 - 05:33 नवीन
अगदी चहासारखाच मस्त कडकडीत लेख. आवडला. मला कधीही चहा चालतो. झोपेतून उठल्यावर ते झोपायला जायच्या आधी, कधीही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा