✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

'हमेशा तुमको चहा'

स
सरनौबत यांनी
Sat, 06/24/2017 - 11:52  ·  लेख
लेख
'हमेशा तुमको चहा' रविवार दुपार. जेवण करून वामकुक्षी साठी आदर्श वेळ. अचानक आपल्या पत्रिकेतील ग्रह फिरतात आणि ओळखीच्या कोणाचं तरी पुढच्या आठवड्यात 'कार्य निघतं'. 'आहेर म्हणून आपण पाकिटात पैसे घालून देऊ' असं ओठांवर आलेलं वाक्य पूर्वानुभवामुळे गिळावं लागतं. "फक्त मित्रांबरोबर बाहेर हिंडायला आवडतं, देण्याघेण्याचे व्यवहार अजिबात कळत नाहीत" वगैरे वाक्यं आपलीच वाट बघत असतात. लक्ष्मी रोड वर दुपारी (त्यातल्या त्यात) गर्दी कमी म्हणून दुपारी २ ला आपण अर्धांगिनी बरोबर 'आहेर म्हणून बाहेर' पडतो. पहिल्या २-३ दुकानात काहीच पसंत पडत नाही. मग 'हस्तकला' मध्ये पंजाबी ड्रेस मटेरियल चा नवीन स्टॉक आलाय तर तिकडे जाऊ, असं ठरतं. दुपारी ३:३० ची वेळ. डोळ्यावर झोप आणि 'ह्यामध्ये अजून कुठले कलर आहेत?' हे ऐकून विटलेले कान. अश्या वेळी तळमजल्यावरील अमृततुल्य च्या दिशेने 'चहाचा वास' येतो. 'तू बघ तोपर्यंत मी जरा चहा (आणि माझी अनावर झोप!) मारून येतो" असं म्हणून आपण खाली सटकतो. पांढऱ्या जाड कपात तो (देवदूत) चहा ओततो. पहिल्या घोटातच सगळा शीण नाहीसा होऊन तरतरी येते. ह्या चहाच्या दुकानांना 'अमृततुल्य' इतकं समर्पक नाव दुसरं नाही! देव-दानवांना बायकोबरोबर दुपारी खरेदीला बाहेर पडायची वेळ आली नसावी. नाहीतर चहा सारखं पेय असताना अमृतमंथनाच्या भानगडीत ते कधीच पडले नसते. पुण्याच्या मध्यवस्तीतील ही अमृततुल्ये केवळ चहाची दुकाने नाहीत. तिथला धगधगता स्टोव्ह चहा रुपी देवाची साधना करण्यासाठी मांडलेला यज्ञ आहे. मोठ्या पातेल्यात चहा पावडर, साखर ह्याची आहुती टाकली जाते. पितळेच्या खलबत्त्यात आलं-वेलदोडे कुटून घंटानाद होतो. सराईत पुजाऱ्याप्रमाणे सगळ्या कृती सुरु असतात. कापडातून चहा गाळून भक्तांना ‘Tea-र्थ’ वाटप करण्यात येते. दिवसाच्या कुठल्याही वेळेला 'चहा घेणार का?' ह्या प्रश्नाला जर “घोटभर चालेल” अशी तुमची प्रतिक्रिया असेल तर समजा की तुम्ही (माझ्यासारखेच) चहाबाज आहात. पुण्यातच ऐकलेलं वाक्य नेहमी आठवतं- ‘बायकांनी कुंकवाला आणि पुरुषांनी चहाला कधी नाही म्हणू नये’. दारू न पिणाऱ्यास teetotaler म्हणतात. तर मग चहा न पिणाऱ्या लोकांना tea-totaler म्हणायला काय हरकत आहे? डिक्शनरी बनवणाऱ्या ऑक्सफर्ड, केम्ब्रिज वगैरे मंडळींनी ह्याची कृपया दखल घ्यावी. गोर-गरिबांपासून अतिश्रीमंतापर्यंत सर्वत्र संचार करणारं हे एक महान द्रव्य आहे. हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या 'चहा-पोळी' नाश्त्यापासून ते अगदी श्रीमंतांच्या 'High Tea’ पर्यंत ह्याचा वावर असतो. एकाच माणसाच्या व्यक्तिमत्वाचे विविध प्रसंगात अनेक पैलू समजतात तसंच चहाचं देखील आहे. सुट्टीच्या दिवशी सकाळी पेपर वाचत चहा एखाद्या निवांत माणसासारखा वाटतो. तर तोच चहा ऑफिस ला जाण्याच्या घाईगडबडीत 'लवकर मला पिऊन टाका' असा म्हणत असतो. ऑफिस मधला मशीन चा चहा रोजच्या रुटीन सारखा बेचव लागतो. तोच ऑफिसच्या रटाळ मीटिंग मध्ये 'करमणुकीचा आधार' वाटतो. हॉस्पिटल मध्ये रात्रभर जागरण झाल्यावर सकाळी येणारा चहा हवाहवासा वाटतो. त्याचप्रमाणे रेल्वेप्रवासात येणारा 'चाय गरम'. टपरीवरचा ‘कटिंग’ चहा, सर्दी-खोकला झाल्यावर 'गवती चहा', कॉलेज कँटीनला मित्रांबरोबर 'चाय पे चर्चा', पाऊस न्याहाळत खिडकीतला चहा, ट्रेकिंग ला चूल मांडून केलेला चहा. मस्का-पाव बरोबरचा इराणी चहा, स्पेशल 'मलई मारके' चहा, उन्हाळ्यातला 'Ice Tea' अशी अनेक रूपे. सगळीच त्या-त्या वेळी हवी-हवीशी वाटणारी. 'फुकट ते पौष्टिक' हे बऱ्याच वेळा खरं असलं तरी दर वेळी फुकटात मिळणारा चहा चांगला असेलंच असं नाही. लांबच्या विमानप्रवासात रात्रीच्या जेवणानंतर मिळणारा चहा ह्याचं उत्तम उदाहरण आहे. रात्री १:३० ची फ्लाईट. विमानातील जेवण होईपर्यंत ३ वाजतात. आता ही वेळ काही चहाची आहे का हो? अश्या (अ)वेळी 'कोरा चहा' घेऊन तितक्याच कोऱ्या चेहेऱ्याची हवाई सुंदरी येते. कोरा चहा कपात ओतून कृत्रिम हसून निघून जाते. मग आपणच त्यात साखर आणि दुधाची पावडर घालून 'चहा(सदृश पदार्थ) बनवायचा. चहा ह्या पेयाचा इतका अपमान दुसऱ्या कोणीच केला नसेल! चहाचा अजून एक अपमान म्हणजे authentic चायनीज रेस्टारंटसमध्ये जेवणानंतर मिळणारा 'जस्मिन टी'. चिनी लोकांनी एकही प्राणी आणि भाजीपाला सोडला नाही खायचा. सगळे प्राणी आणि भाज्या संपल्यावर फुलांकडे त्यांची (मिचमिची) दृष्टी पडली असावी. मोगरा, शेवंतीचा वास चांगला म्हणून त्याचा चहा? 'च्या'यला! ज्या देशात चहाचा शोध लागला त्याच लोकांनी असं करावं ह्यापेक्षा दुर्दैव कुठलं? कटिंग चहा आणि फूल चहा माहिती होतं. पण फुलं घातलेला चहा 'Is not my Cup of Tea'! चहा कसा करायचा हे समजत नसल्याने देशाचं नाव 'चाय'ना पडलं असावं. चहाची कधी तलफ येते, कधी सवय होते, कधी शिष्टाचार म्हणून, तर कधी कंटाळा आला म्हणूनही चहा घेतला जातो. पूर्वी स्मार्ट-फोन्स नव्हते तेव्हा चहा हे उत्तम वेळ घालवण्याचं साधन होतं. जीवन सुरक्षेसाठी LIC ला आणि एखाद्या ठिकाणी अर्धा-पाऊण तास काढायचा असेल तर चहाला पर्याय नाही. प्रवासात पाय मोकळे करायला उतरतो तेव्हा भूक नसेल तर टाइम पास म्हणून चहा. भूक लागली असेल पण खायला नसेल तरी चहा. आयत्या वेळी येणाऱ्या पाहुण्यांसाठी चहा. लग्नाची बोलणी करायला देखील 'इसीलिये मम्मी ने मेरे तुझे चाय पे बुलाया हैं'. सहज घरी भेटायला या सांगायचं असेल तर 'चहाला या ना' असंच म्हणतो. 'चहाला आलंच पाहिजे' असं आग्रहाचं निमंत्रण मोडवत नाही म्हणून आपण जातो. मात्र चहात ‘आलंच’ नसेल तर हिरमोड होतो. सरकारी ऑफिसातली आपली कामे करून घेण्यासाठी जी चिरीमिरी द्यावी लागते त्यालाही 'चायपानी'चे आवरण मिळते. शुल्लक भांडणांना 'चहाच्या पेल्यातील वादळ' म्हणतात. जेम्स वॅट ला चहाची आवड नसती तर वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लागायला अजून 'वॅट' पहावी लागली असती. चहा उत्तम साथीदार आहे. कंटाळवाण्या प्रवासात जसा साथ देतो तसा बिस्किटापासून वडापाव पर्यंत सगळ्या पदार्थांना देखील उत्कृष्ट साथ देतो. मूळ पदार्थाच्या चवीवर कुरघोडी न करता. असा बहुगुणी आहे (च)हा. केरळ, तामिळनाडू भागांत एका कपातून उंचावरून दुसऱ्या कपात ओतून ‘फेसाळता’ चहा देतात. कापडाच्या दुकानात गजाने कापड मोजताना जेवढा लांब हात नेतात तितक्या उंचीवरून चहा ओततात. बहुधा 'मिलीलीटर' ऐवजी 'मीटर' वर चहा विकत असावेत. कालानुरूप चहा बनवायची पद्धत बदलली तशी चहा द्यायची देखील. अमृततुल्य मध्ये पांढऱ्या जाड कपात चहा. टपरीवर काचेच्या छोट्या ग्लास मध्ये 'कटिंग' चहा. दाक्षिणात्य हॉटेलात स्टीलचा ग्लास आणि वाटी. लग्नकार्यात आणि ऑफिसात चॉकलेटी रंगाच्या कपात चहा. असा सुटसुटीत प्रकार असायचा. आधुनिकतेच्या जमान्यात चहाचा कान उपटला गेला आणि प्लास्टिकच्या छोट्या ग्लासात चहा देऊ लागले. हायवे वरील फूड मॉल्स वर तर इतक्या लहान कपात चहा देतात कि 'चहा कपात' चा चुकीचा अर्थ त्यांनी लावला असावा बहुधा. Middle East ला नोकरी निमित्त स्थायिक झालो तेव्हा 'कडक चहा' च्या दुकानांवर चहाचे विविध प्रकार प्यायला मिळाले. दालचिनी आणि काळी मिरी वाला 'येमेनी' चहा जबरदस्त. Turkish रेस्टारंट मध्ये कोऱ्या चहात पुदिन्याचं पान घातलेला Turkish Tea देखील आवडला. इस्तंबूल (टर्की) ला तर चहा-कॉफी चे मोठे शौकीन आहेत. तिथल्या इस्तिकलाल स्ट्रीट वर तिथल्या स्पेशल कप-बशीत चहा पिणे एक सोहळा होतो. चहाला इतका मान देणारे 'चहा'ते बघून धन्यता वाटते. 'हमेशा तुमको चहा' ह्या गाण्याचा गर्भितार्थ देवदासच्या आई ने लक्षात घेतला नाही. नाहीतर तिने पारो ला टाकण्याऐवजी पोराला 'चहा टाकला' असता. देवदास ला ब्लॅक लेबल ऐवजी (ब्रुक बॉण्ड) रेड लेबल चा नाद लागला असता. चहाची एवढी महती कळल्यावर एका अमृततुल्य बाहेर लिहिलेलं वाक्य मला अगदी पुरेपूर पटतं - 'चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा लागतो'.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
37168 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

चहाबाज लेख! छान लघुनिबंधशैली.

एस
Sat, 06/24/2017 - 12:33 नवीन
चहाबाज लेख! छान लघुनिबंधशैली. अजून लिहा.
  • Log in or register to post comments

http://misalpav.com/node/1354

विजुभाऊ
Tue, 06/27/2017 - 23:39 नवीन
हा घ्या आणखी एक चहा. http://misalpav.com/node/1354
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

http://misalpav.com/node/1354

विजुभाऊ
Tue, 06/27/2017 - 23:43 नवीन
हा घ्या आणखी एक चहा. http://misalpav.com/node/1354
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

आता पियुष येऊ द्या,

अभ्या..
Sat, 06/24/2017 - 12:46 नवीन
आता पियुष येऊ द्या, मग पर्वती, सारसबाग, तुळशीबाग, बादशाही, दुर्वांकुर, मानकर, ट्राफिक सिग्नल आहेच.
  • Log in or register to post comments

अभ्या भाऊ!

सरनौबत
Sat, 06/24/2017 - 19:13 नवीन
अभ्या भाऊ! कटाक्षाने पुण्यातील अमृतुल्यांची नावे, पुण्याच्या पाण्याचा चहा इ. गोष्टी लिहिल्या नाहीत मी. लेखाच्या ओघात कमीत कमी पुण्याचं वर्णन येईल आणि इतर ठिकाणच्या (मी प्यायलेल्या) चहाचं वर्णन करूनदेखील तुम्हाला फक्त एवढीच गोष्ट दिसली? एवढा विशेष लोभ का हो पुण्यावर तुमचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

लोभ वगैरे म्हणाल तर पुणे आहे

अभ्या..
Sun, 06/25/2017 - 11:00 नवीन
लोभ वगैरे म्हणाल तर पुणे आहे ते. असनारच. बाकी बसबस केलेय सगळीकडे आंजावर. उगी चार चांगले मित्र आहेत त्याना वाइट वाटू नये म्हणून बोलत नाही. पण झेडगव्याचा कारभार आहे सगळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सरनौबत

सहमत आहे.

एमी
Fri, 07/07/2017 - 08:23 नवीन
:D सहमत आहे. === बाकी आपण काय रोज चहा पिणाऱ्यातले नाई. हिवाळापावसाळ्यात आठवड्यातून एकदाच ब्रेड - संत्रा मर्मालेड आणि भरपूर दूध घालून बनवलेला फिका चहा मात्र आवडीने पिते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

चहा'पुराण आवडलं!

दशानन
Sat, 06/24/2017 - 13:32 नवीन
चहा'पुराण आवडलं!
  • Log in or register to post comments

मस्त!! आवडलं!!

सचिन काळे
Sat, 06/24/2017 - 14:19 नवीन
आणि कोट्या तर काय एकसे एक भारी केल्यात. मी तर पुन्हा पुन्हा वाचल्या. झकास!!!!
  • Log in or register to post comments

छान!!

सचिन काळे
Sat, 06/24/2017 - 14:21 नवीन
कोट्या वाचताना पुलंची आठवण आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन काळे

ज्ञानेश्वर पादुका चौकातील

जेम्स वांड
Sat, 06/24/2017 - 15:59 नवीन
ज्ञानेश्वर पादुका चौकातील आमचा ठरलेला अमृततुल्य आठवला एकदम. चिंचेच्या झाडाबुडी हाती सिगरेट अन कडक मारामारी (चहाचा एक प्रकार) मारताना (म्हणजे पिताना) आलेला स्वर्गीय आनंद आठवतोय
  • Log in or register to post comments

तृप्ती का ?

विटेकर
Wed, 07/05/2017 - 11:09 नवीन
माझे पन ते आवदते थिकान होते , उम्मेदचा सामोसा आणि तृप्तीचा चहा .. समितीत रहात असताना यान्च्या जीवावर जगून निघालो ! आज अहि त्या भागात गेलो तर चहा घेतो तृप्ती ला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

एक नंबर

सरनौबत
Wed, 07/05/2017 - 16:11 नवीन
तृप्ती टी सेंटर चा एक नंबर असतो चहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

सुरेख! मजा आली वाचतांना

विनिता००२
Sat, 06/24/2017 - 16:05 नवीन
सुरेख! मजा आली वाचतांना :)
  • Log in or register to post comments

+१

प्रमोद देर्देकर
Sat, 06/24/2017 - 16:06 नवीन
+१ मस्त. आपके चहा पुराण को हमने चाहा है !
  • Log in or register to post comments

छान खुसखुशीत लेख! आणि पंचेस

संजय पाटिल
Sat, 06/24/2017 - 16:16 नवीन
छान खुसखुशीत लेख! आणि पंचेस पण जबरदस्त!
  • Log in or register to post comments

फक्कड चहा !!

बबन ताम्बे
Sat, 06/24/2017 - 16:26 नवीन
मस्त लेख!! "चहा"टळ कोट्या खूप आवडल्या.
  • Log in or register to post comments

आवडलं

अभिजीत अवलिया
Sat, 06/24/2017 - 21:17 नवीन
आवडलं
  • Log in or register to post comments

मस्तं लिहिलयं ! तुम्हाला

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 06/25/2017 - 02:12 नवीन
मस्तं लिहिलयं ! तुम्हाला मिपावरील "चहा'टळ कोट्याधिश" असं म्हणायला हरकत नाही. ;) अजून काही वाचायला जरूर आवडेल.
  • Log in or register to post comments

मस्त

मुक्त विहारि
Sun, 06/25/2017 - 03:46 नवीन
लेख आवडला...
  • Log in or register to post comments

चहा अजीबात आवडत नाही. कधीही

ज्योति अळवणी
Sun, 06/25/2017 - 06:51 नवीन
चहा अजीबात आवडत नाही. कधीही नाही प्यायले.पण तुमचा लेख वाचून तुमच्या लेखनाची 'चाह'ती झाले. खरच खूपच छान.असच लिहा. वाचायला आवडेल
  • Log in or register to post comments

एक गाणं आठवलं

Ranapratap
Sun, 06/25/2017 - 10:26 नवीन
चहा एके चहा, चहा दुणे बशी, दुनिया झाली कशी या चणे हो. लेख आवडला.
  • Log in or register to post comments

अतिशय खुमासदार !

संजय क्षीरसागर
Sun, 06/25/2017 - 18:39 नवीन
लगे रहो .
  • Log in or register to post comments

छान ...

जेनी...
Sun, 06/25/2017 - 18:49 नवीन
छान ...
  • Log in or register to post comments

मस्त

चाणक्य
Mon, 06/26/2017 - 07:30 नवीन
मजा आली वाचताना.
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलय !!

चिनार
Mon, 06/26/2017 - 10:18 नवीन
मस्त लिहिलय !!
  • Log in or register to post comments

भारी जमलाय

जगप्रवासी
Mon, 06/26/2017 - 14:29 नवीन
मीपण तुमच्यासारखा चहा चा चहाता आहे. अगदी रात्री बेरात्री कधीही दिला तरी तय्यार. आणि हो आमच्याकडे म्हण आहे "बाईच्या ओठाला आणि चहाच्या घोटाला नाही म्हणू नये."
  • Log in or register to post comments

चहांबाज आहात

गामा पैलवान
Mon, 06/26/2017 - 23:35 नवीन
सरनौबत, तुम्ही पक्के चहांबाज दिसता. लेख आवडला. निपुणचहा (अर्थत जपानी चहा) विषयी वाचायला आवडलं असतं. मात्र तिथे चहा पिणे हे धार्मिक कृत्य आहे. ते अतिशय गांभीर्याने, सन्मानपूर्वक आणि रीतीभाती पाळून केलं जातं. बहुधा एक स्वतंत्र लेख सहज होऊ शकेल. जमल्यास त्यावरही लिहा. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

चहा

निमिष ध.
Mon, 06/26/2017 - 23:37 नवीन
चहा हे अतिशय आवडते पेय. तुमचा लेख आवडला. पुण्यातल्या अमृततुल्यांची तुलना तर उत्तम. पण त्या जास्मीन आणि ग्रीन टी ची गम्मत तुम्हाला अजून कळली नाहीये असे वाटते.
  • Log in or register to post comments

खरंय तुमचं.

सरनौबत
Tue, 06/27/2017 - 09:39 नवीन
खरंय तुमचं. पुन्हा एकदा हिम्मत केली पाहिजे जास्मिन चहा पिण्याची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष ध.

एक नंबर

अभिदेश
Tue, 06/27/2017 - 00:42 नवीन
तुमच्या लेखाचा 'चहा'ता झालो आहे...
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलयं

धर्मराजमुटके
Tue, 06/27/2017 - 09:46 नवीन
मस्त लिहिलयं. आवडलं!
  • Log in or register to post comments

छान लिहिलय .

सिरुसेरि
Tue, 06/27/2017 - 10:20 नवीन
छान लिहिलय . त्रिवेणी , तुलसी , तिलक असे अनेक अमृततुल्य डोळ्यासमोर आले . कपाळाला गंध लाउन , खांद्यावर उपरणे वजा फडके ठेउन , स्पेशल बैठकीवर बसुन चहाकडे लक्ष ठेवणारे ते दुकानदार . चहा मुरल्यावर एका ओगराळ्याने पातेल्यामधुन किंचीत चहा हातात घेउन , त्याचा भुरका मारुन चहाची अमृततुल्य चव जमली आहे का हे पारखुन बघणारे ते लोकोत्तर दुकानदार कायम लक्षात राहतील .
  • Log in or register to post comments

अगदी हुबेहूब वर्णन केलंय

सरनौबत
Tue, 06/27/2017 - 19:17 नवीन
क्या बात हैं! अगदी हुबेहूब वर्णन केलंय. इतकं उत्तम की 'हमेशा तुमको चहा Part २ किंवा the Conclusion' असा अजून एक भाग लिहून तुमचं लिखाण समाविष्ट करावसं वाटतंय. अर्थात तुमची हरकत नसेल तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

छान लेख

सुबोध खरे
Tue, 06/27/2017 - 10:34 नवीन
छान लेख
  • Log in or register to post comments

अप्रतिम लिहिलय. खूप आवडल.

निनाद आचार्य
Tue, 06/27/2017 - 14:52 नवीन
अप्रतिम लिहिलय. खूप आवडल.
  • Log in or register to post comments

मस्त

भीडस्त
Tue, 06/27/2017 - 17:24 नवीन
एकदमच 'चहा'टळ लेख उकळलाय.....
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलंय! हस्तकलापाशीच

यशोधरा
Tue, 06/27/2017 - 19:27 नवीन
मस्त लिहिलंय! हस्तकलापाशीच बॅंकेच्या दरवाजाजवळ जे अमृततुल्य आहे, तेही अहाहा आहे!
  • Log in or register to post comments

मस्तच

इडली डोसा
Wed, 06/28/2017 - 02:19 नवीन
जिव्हाळ्याचा विषय,
मोगरा, शेवंतीचा वास चांगला म्हणून त्याचा चहा? 'च्या'यला! ज्या देशात चहाचा शोध लागला त्याच लोकांनी असं करावं ह्यापेक्षा दुर्दैव कुठलं? कटिंग चहा आणि फूल चहा माहिती होतं. पण फुलं घातलेला चहा 'Is not my Cup of Tea'! चहा कसा करायचा हे समजत नसल्याने देशाचं नाव 'चाय'ना पडलं असावं.
हा परिच्छेद तर कहर आहे आता लगेच उठुन रोजचा 'रोज' चा पिऊन येते.
  • Log in or register to post comments

हा हा! नावात 'रोज' असलं तरी रोज प्यायला तर मजा नाही येत रोज ची

सरनौबत
Fri, 06/30/2017 - 11:23 नवीन
हा हा! नावात 'रोज' असलं तरी रोज प्यायला तर मजा नाही येत रोज ची :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इडली डोसा

आवड्या

आगाऊ म्हादया......
Wed, 06/28/2017 - 06:57 नवीन
छान लिहिलंयत, मित्रांमध्ये चहा नको, मी फक्त कॉफी पितो असं म्हणणाऱ्याकडे मी केवळ भूतदयेने पाहत असतो.
  • Log in or register to post comments

लै भारी!

Nitin Palkar
Wed, 06/28/2017 - 20:54 नवीन
आपुलिया जातीचा भेटल्याची जाणीव झाली. ये दिल तुमको 'चहा'ने लागा!
  • Log in or register to post comments

षटकार

ज्ञाना
Wed, 06/28/2017 - 21:45 नवीन
मस्त लिहिलंय. Tea Totaler आणि Not my cup of Tea वगैरे कोट्यांनी तर षटकार मारले आहेत.
  • Log in or register to post comments

तुमचा लेख व्हॉटसॅपवर फिरू

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 06/29/2017 - 01:04 नवीन
तुमचा लेख व्हॉटसॅपवर फिरू लागला आहे हे तुम्हाला माहीत आहे का ?
  • Log in or register to post comments

हो.मला देखील ४-५ लोकांकडून आला.

सरनौबत
Fri, 06/30/2017 - 11:20 नवीन
हो.मला देखील ४-५ लोकांकडून आला. सुदैवाने माझं नाव काढून न टाकता तसाच्या-तसाच पाठवला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मस्त..

__विक्रम__
गुरुवार, 06/29/2017 - 10:46 नवीन
छान लिहिलंय !!
  • Log in or register to post comments

कोट्याधीश सरनौबत असे

राघव
गुरुवार, 06/29/2017 - 12:08 नवीन
कोट्याधीश सरनौबत असे म्हणण्यास हरकत नसावी! ;-) बादवे, चहापत्तीची स्वपत्तीचव कायम ठेवून दुधाळ चहा कसा करायचा हे मला अजूनही शिकायचे आहे. दूध आणि साखर घातली की छॅ: छॅ : छॅ: व्हायला होतं! यावर काही माहिती कुणी देवू शकेल काय?
  • Log in or register to post comments

किती "चहा"टळपणा करावा माणसाने

सतिश गावडे
गुरुवार, 06/29/2017 - 12:13 नवीन
किती "चहा"टळपणा करावा माणसाने :)
  • Log in or register to post comments

फक्कड

एकविरा
गुरुवार, 06/29/2017 - 12:22 नवीन
हम तुम्हें चहा ते है ऐसे मरने वाला कोई जिदंगी चाहता है जैसे . मस्त लेख . काय एकेक कोट्या आहेत. मलाही चहा नको म्हणणार्यांचि दयाच येते .आणि चहाला आल पहिजेच हे 100 टक्के खरय .
  • Log in or register to post comments

इतक्या लहान कपात चहा देतात कि

पुंबा
गुरुवार, 06/29/2017 - 13:20 नवीन
इतक्या लहान कपात चहा देतात कि 'चहा कपात' चा चुकीचा अर्थ त्यांनी लावला असावा बहुधा.
हाहाहा.. मस्त आहे लेख.. पुलेशु
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा