✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अगरीयांच्या शोधात

अ
अमृता गंगातीरकर यांनी
Wed, 06/14/2017 - 12:22  ·  लेख
लेख

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका डॉक्युमेंटरी फिल्मच्या संदर्भात मध्य प्रदेश आणि छत्तीसगढच्या आदिवासींचा रहिवास असलेल्या जंगलात भटकण्याचा अनुभव मिळाला. खनिज वितळवून लोह मिळवणाऱ्या अगरीया नावाच्या आदिवासी जमातीला हुडकून त्यांच्या ह्या पुरातनकालापासून चालत आलेल्या पद्धतीवर फिल्म बनवण्याचा घाट आम्ही घातला होता. पूर्णपणे शहरात जगलेल्या वाढलेल्या मला ह्या आदिवासींकडून आणि त्यांच्या जगावेगळ्या लोखंड गाळण्याचा पद्धतीकडून काय अपेक्षा ठेवावी हेच कळत नव्हते. ह्या फिल्मची रिसर्चर आणि असिस्टन्ट डिरेक्टर असलेल्या मला माझा रिसर्च मला खूप वेगवेगळ्या प्रकारचे परस्परविरोधी पुरावे देत होता. तिथे गेल्यावर काय वाढून ठेवलय ह्याची फारशी कल्पना नसल्याने फिल्मचा दिग्दर्शक आणि मी, आम्ही दोघे काहीश्या साशंक मनानेच रेकी करण्यासाठी निघालो. प्रवासात ट्रेनच्या खिडकीशी बसून मी आणि माझ्या दिग्दर्शक मित्राने एक सुंदर कथाच लिहून काढली होती. आमच्या शंका कुशंकांना फाटा देऊन एक अतिशय सरधोपट गोष्ट आम्ही लिहिली. ह्या गोष्टीत आम्ही दोघं अगदी विनासायास जंगलात पोहोचतो. अगरिया आदिवासींना भेटतो आणि त्यांच्याबरोबर अगदी स्क्रीप्टबरहुकूम शूट संपवून घरी सुद्धा परततो. कोणत्याही प्रकारच्या अस्मानी वा सुलतानी संकटांचा मागमूसही नव्हता त्या स्क्रिप्ट मध्ये. स्वतःवर खूष होऊन, शहरी शहाणपणाची झापड लावून इतरांना कमी लेखून आपली कॉलर टाईट करण्याची सवय असतेच आपल्यासारख्या लोकांना.

मुंबई ते जबलपूर असा ट्रेन प्रवास आणि त्यापुढचा मांडलापर्यन्तचा जीपचा प्रवास आटोपून आम्ही गेस्ट हाउसमध्ये पोहोचलो तेव्हा नर्मदेच्या संध्याकाळच्या आरतीची वेळ झाली होती. नर्मदेचं विशाल पात्र डोळे भरून पाहिलं आणि त्यापल्याड दिसणारं गर्द जंगल आम्हाला खुणावू लागलं. नर्मदा सहस्रधारांनी जणू आम्हाला बोलवत होती. ज्यांनी नर्मदेचं दर्शन घेतलं आहे त्यांना नद्यांना मानवी दर्जा आणि मानवाचे अधिकार देण्यास पुढाकार घेणाऱ्या सुप्रीम कोर्टाचं कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. नर्मदेकडे एकटक बघत असतांना एका बाजूला मनात विचारांची गर्दी झाली तर दुसरीकडे आत कुठेतरी खूप शांत शांत वाटलं. युगानुयुगांपासून नर्मदातीरी राहणाऱ्या आदिवासींचा राहून राहून हेवा वाटला आणि त्यांच्याशी एकरूप होऊन त्यांच्या जीवनावर रिसर्च करून त्यांच्यासमवेत आयुष्य घालवणाऱ्या वेरीयर एल्वि्नबद्दलच्या कुतुहलानी मन भरून आलं.

नर्मदातीराच्या आदिवासींबद्दल अभ्यास करतांना एक नांव सतत कानावर पडते ते म्हणजे वेरीयर एल्विन. धर्मप्रसाराच्या कार्यासाठी एकोणीसशे सत्तावीस साली भारत गाठलेला एल्विन नर्मदातीरी येतो काय आणि इथल्या एका आदिवासी मुलीशी लग्न करतो काय. सगळाच अजब. एल्विनबद्दलच्या अनेक चांगल्या वाईट गोष्टी इथे कानावर पडतात. पण त्याबद्दल पुन्हा कधी तरी सांगेन.

दुसऱ्या दिवशी सकाळी रेकी साठी निघताना मन खूप शांत झालं होतं. नर्मदेच्या आशीर्वादाचा तर परिणाम नव्हता ना! शहरापासून दूर जसजसं जंगलात आत आत जायला लागलो तसातसा जंगलाचा मूड सुद्धा बदलत गेला. मानवी वर्चस्वाच्या पाऊलखुणा मागे राहिल्या आणि निसर्गाचं आधिपत्य आम्ही स्वीकारलं. अशा ह्या जंगलात एक इंग्रज येऊन आदिवासी बायकोबरोबर राहतो ह्याचं आश्चर्य वाटत होतं. त्याच्या जोडीला आमच्या वाटाड्याचं अखंड जंगलपुराणही चालू होतं. हा वाटाड्या म्हणजे मांडलाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खास आमच्या सोबतीला दिलेला गाईड. जंगलातल्या आदिवासींपासून ते तिथे येणाऱ्या चित्रविचित्र अनुभवांपर्यंत अनेक विषयांवर अस्खलित हिंदीत तो मनुष्य बोलू शकत होता. “आप समझ रही है ना मैडमजी” अशा प्रश्नाने सुरु होणाऱ्या त्याच्या सुरस व चमत्कारिक कथा व माझ्या उत्तराची वाट न पाहता त्याचं चाललेलं पुराण ह्या सगळ्यामध्ये खिडकीबाहेरच दृश्य मात्र खूप काही सांगत होतं.

शहर काय छोटी छोटी गावंदेखील आता मागे पडली होती. त्यांची जागा आता गर्द झाडांनी घेतली होती. कच्चा लाल मातीचा एकपदरी रस्ता तोसुद्धा कुठे कुठे गायब होत होता. शर्ट आणि पान्त घातलेले गावकरी जाऊन भडक रंगाच्या सुंदर साड्या नेसलेल्या, अंगभर गोन्दलेल्या, शिडशिडीत बायका आणि उंच, काटक, डोक्याच्या एका बाजूला केसांचा अंबाडा घातलेले हंड्सम पुरुष जागोजागी दिसू लागले. त्यांना अगदी आवर्जून हंड्सम म्हणावे इतके ते तुकतुकीत आणि चपळ. आमच्या गप्पिष्ट वाटाड्याने आमची ओळख करून दिली एका अत्यंत इंटरेस्टिंग आदिवासी जमातीशी ती म्हणजे बैगा. बैगा स्त्री-पुरुषांचे जंगलाविषयीचे ज्ञान, त्यांचे डोळ्याचे पाते लवते न लवते तेच जंगलात गायब होण्याची कला ह्यामुळे दंतकथांना पोषक वातावरण निर्माण झाले नसते तर नवलंच. अशा दंतकथांच वलय लाभलेली ही सुंदर (खऱ्या अर्थाने) जमात आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे हे आपलं केवढं दुर्भाग्य.

आमच्या सुंदर प्रवासात मिठाचा खडा पडला जेव्हा आम्ही अगारिया लोकांच्या पाड्यावर एकदाचे पोहोचलो. बाजारात लोखंड, स्टील सहज विकत मिळत असतांना आम्ही कशाला बुवा काबाड कष्ट करून वितळवून लोखंड काढू असा खडा सवाल आम्हाला विचारला गेला आणि आमची बोलती बंद झाली. आमच्या प्रोड्युसरचा रागीट चेहरा माझ्या डोळ्यासमोर तरळला. भाषा कळत नसूनही आमच्या उतरलेल्या चेहऱ्यावरून एका म्हताराबांनी आमचा काहीतरी बिनसलंय असं ताडलं. मग चार पाच म्हातारबांना पाचारण करण्यात आले. मोहाच्या फुलांची दारू पिऊन तर्र झालेल्या त्या सगळ्यांनी काहीतरी खलबत केलं. म्हातारबा नंबर १ आमच्या जवळ येउन काहीतरी सांगू लागले. गप्पिष्ट वाटाड्यानी म्हातारबाच्या आदिवासी बोलीच हिंदीत भाषांतर केला आणि आमच्या जिवात जीव आला.

म्हाताराबाच्या मते अगरिया जमातीने मोठ्या प्रमाणावर लोखंड निर्मिती थांबविली असली तरी छोट्या प्रमाणात लोखंड विताळवण आजही चालू आहे. हे लोखंड वापरल जातं लहान बाळांना दृष्ट लागू नये म्हणून, आजारी माणसाला बरा करण्यासाठी. हे लोखंड घराच्या उंबऱ्यावर ठोकल जातं वाईट प्रवृत्तींना घराच्या बाहेर ठेवण्यासाठी. आणि असं लहान प्रमाणावर लोखंड वितळवण्याचं काम करणारे अगारिया अजूनही आहेत असं म्हातारबा ठासून म्हणाले. म्हातारबांनासुद्धा नक्कीच कुठेतरी कधीतरी बॉस असावा. त्यांची ही मौलिक माहिती ऐकून आमचा आनंद गगनात मावेना. आता एकच काम करायचे होते ते म्हणजे लोखंड वितळवण्याचं काम करणाऱ्या ह्या अगरीयाला शोधून काढायचे होते. ट्रेनमध्ये लिहिलेल्या कपोलकल्पित स्क्रिप्टला नर्मदेत विसर्जित करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो.

बुडणाऱ्याला काडीचा आधार असतो हे खरे आहे. कोणत्यातरी एका पाड्यावर कुणीतरी एक अगारिया तुमची मदत करू शकेल अशा अत्यंत जुजबी माहितीवर आम्ही पुढे कूच केलं. देवासारख्या धावून आलेल्या त्या म्हतारबांनाही आम्ही आमच्या गाडीत बसवलं. आपल्या व्याह्यांकडे लग्नानिमित्त मुक्कामासाठी आलेल्या म्हतारबांनीसुद्धा क्षणाचाही विचार न करता आमच्याबरोबर यायची तयारी दाखवली हे आमचा नशीब. पण हा निर्णय मोहाच्या फुलाच्या दारूच्या नशेत घेतलेला नसावा आणि नशा उतरल्यावर त्यांनी आपला विचार बदलला नाही म्हणजे मिळवली असा देवाचा धावा करत आम्ही निघालो. जसजसं आम्ही जंगलाचे रस्ते गाडीच्या चाकाखाली तुडवले तसतशा वाटा अजून निमुळत्या होत गेल्या. मुंबईत फिल्म इंडस्ट्री पावसाळ्यात जरा सुस्त असते. पण आमच्या रेकी साठी मात्र आम्ही पावसाळा का निवडला असा प्रश्न मनात येऊनही आम्ही तो एकमेकांना विचारायची हिम्मत केली नाही. अधून मधून पडणारा पाऊस, जंगलातल्या दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, निसरडे रस्ते आणि त्यात सतत अडकणारी आमची छोटी गाडी ह्यासर्वांमध्ये अगरीयाचं अस्तित्व आम्हाला जाणवत होत हे नक्की. कधी रस्ता दाखवण्यासाठी तर कधी लिफ्ट घेण्यासाठी हे अगारिया सतत आजूबाजूला वावरत होते. पण अजूनही लोखंड वितळवण्यचं काम करणारे कुठे दृष्टीपथात नव्हते.

अगारीयाच्या शोधात आम्ही सीमा ओलांडून मध्य प्रदेशमधून छत्तीसगढमध्ये आलो. जंगलाची आता चांगली ओळख झाली होती. रस्त्यावरच्या टपऱ्यांवर मिळणाऱ्या सामोसे, पोहे आणि जलेबी बरोबरच पेट्रोल विकत घेण्यात काही विशेष वावगं वाटत नव्हतं. एक रात्र वाटाड्याच्या घरात म्हताराबांबरोबर काढली. फिल्म प्रोडक्शनच्या रोखठोक सवयीमुळे दुसऱ्या दिवशी तत्परतेने एका रात्रीच्या राहण्याचे आणि जेवणाचे पैसे देऊ केले तर आमच्या गप्पिष्ट यजमानांनी ते चक्क नाकारले. “मैडम आप समझ रही है ना, बहुत रात हो गयी थी तोह आप हमारे घर ठेहेर गये तोह इसमे क्या बडी बात है?” इति वाटाड्या
रात्री बारा वाजता उठून पाच माणसांसाठी स्वयंपाक करणाऱ्या त्याच्या बायकोला त्रिवार नमन करून आम्ही पुढे निघालो.

छत्तीसगढमध्ये आपला भ्रमनिरास होणार नाही अस उगीचच वाटत होतं. वाटाड्यानं ऐकवलेल्या जंगलातल्या चमत्कारिक गोष्टींमुळे म्हणा किंवा जंगली प्राण्यांच्या सहवासामुळे जागृत झालेल्या सिक्स्थ सेंसमुळे म्हणा आपण आपल्या ध्येयाच्या खूप जवळ पोहोचलो आहोत असा सारखं वाटत होतं.

प्रकाश परतेच्या दाराशी आमची गाडी थांबली तेव्हा टिपिकल आदिवासीच्या घरी आलोय असं वाटलंच नाही. विटांनी बांधलेलं घर, आजूबाजूला थोडीशी शेती. हातात मोबाईल मिरवणारा, शर्ट पान्ट घातलेला, तीन मुलांचा बाप असलेला २३ वर्षांचा पोरगेलासा प्रकाश जेव्हा समोर आला तेव्हा हे प्रकरण काही तरी वेगळच आहे असा मला जाणवलं. प्रकाशचा कॉन्फिडन्स आणि त्याची समज ही आम्ही आतापर्यंत भेटलेल्या कोणत्याही अगरिया पेक्षा वेगळी होती. आणि ह्याचं कारण समजायला आम्हाला फारसा वेळ लागला नाही. पिकाची कापणी झाल्यावर प्रकाश गावातल्या त्याच्यासारख्याच इतर तरुण मुलांबरोबर ट्रेन पकडतो, विना तिकीट प्रवास करून थेट मुंबई गाठतो. मुंबईत कामाठीपुरातल्या दहा बाय दहाच्या पत्र्याच्या झोपडीत आठ दहा इतर मुलांबरोबर राहून, गवंडी काम करून, जीवाची मुंबई करून पाच सहा महिन्यांनी पेरणीसाठी परत गावी येतो. प्रकाशच्या आई वडिलांना आणि तीन लहान मुलांमागे पाळणाऱ्या लहानश्या बायकोला ना कामाठीपुऱ्याची काही माहिती व ना प्रकाशच्या मुंबईतल्या कामाची काही कल्पना. त्यांना अप्रूप मुंबईच्या उंच बिल्डीन्गांचे आणि तिथे मिळणाऱ्या पैशाचे.

प्रकाशच्या डोक्यात "प्रकाश" पडायला फार वेळ लागलं नाही. आम्हाला नक्की काय हवय हे त्याला पटकन समजलं. “आप शुटींग के लिये आजाओ मैडम. मै सब कुछ करवा दूंगा.” असं तो अगदी आत्मविश्वसानी म्हणत राहिला. पण लोह वितळवण्याची प्रोसेस याची डोळी बघता येईल का असा प्रश्न विचारल्यावर मात्र त्याने नन्नाचा पाढा सुरु केला. एव्हढ्या जवळ येऊनही हाती काहीच न लागल्याची खंत करावी कि ह्या पोरागेल्याश्या मुलाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मुंबईला जाऊन अख्ख्या क्रूला घेवून यावं ह्या गोंधळात त्याच्याशी पैशाचं काहीही न बोलता आम्ही मुकाट परत यायला निघालो. परतीच्या प्रवासात माझा मित्र व मी एकमेकांशी एकही शब्द बोललो नसू. पावसापाण्यात, अख्खं जंगल तुडवून अगरीयांना शोधून काढल्याबद्दल आनंद मानायचा कि सरतेशेवटी कोणत्याही पुराव्याशिवाय परत आल्याबद्दल दुख: व्यक्त करायचं ह्या विचारातच आम्ही मुंबई गाठली.

मुंबईत आमचं जंगी स्वागत करण्यात आलं. आम्ही घालवलेला वेळ आणि केलेला खर्च बघता आम्ही नक्कीच खूप मोठा तीर मारून आलोय असं गृहीतच धरून “आता शूटची पटकन तयारी करा आणि निघा” असा सज्जड दम प्रोड्युसरने दिला आणि आम्ही परत कामाला लागलो. सगळ्यात आधी प्रकाशला फोन लावला. फोन लागेल कि नाही अशी धाक धुक तर होतीच मनात. प्रकाशकडून निघताना घाई घाईने टिपून घेतलेला नंबर बरोबर आहे कि नाही ह्याची खात्री करण्याची तसदही मी घेतली नव्हती. जंगलात भटकून सरतेशेवटी मिळालेला एकमेव नंबर सुद्धा नीट लिहिता येऊ नये ही एखाद्या असिस्टंट डायरेक्टर ची किती गंभीर चूक आहे हे समजायला काही कोणी ज्ञानी पुरुष असणे गरजेचे नाही. मोबाईल नंबर लिहून घेताना फक्त नऊ अंक लिहिले गेले होते हे मला कळल तेव्हा माझ्या पायाखालची जमीन हादरली.

दहावा आकडा काय असेल ह्या विवंचनेत दहा मिनिटे काढल्यावर मी पुढची दहा मिनिटे दहा वेगवेगळे नंबर लावले. ० ते ९ पर्यंतचे सगळे नंबर लावून दहा वेगवेगळ्या राँग नंबरवर बोलल्यावर मग मात्र माझा धीर सुटला. आता आपल्या खर्चानी परत जाऊन प्रकाशचा नंबर घेवून यावं कि काय असा विचार मनात आला आणि डोळे भरून आले. डोळ्यात अश्रूंची आणि डोक्यात विचारांची गर्दी झाली कि त्यावर एक रामबाण उपाय माझ्याकडे आहे. चहा. चहाचा एक घोट घश्याखाली गेल्यावर जरा हुशारी वाटू लागली आणि तेवढ्यात माझा फोन वाजला. हा नक्की आईचा असणार. आज काय जेवलीस असा रोजचा प्रश्न विचारायला फोन केलं असणार. तिरमिरीतच मी फोन उचलला.
“हेल्लो मैडमजी. वोह आपके लिए जो शूटिंग करवाना है ना उसका पच्चीस हजार रुपिया होगा.” प्रकाश बोलत होता
त्याने केलेल्या अव्वाच्या सव्वा मागणीवरून त्याचे कान उपटू कि त्याच्याशी संपर्काचं कोणतही साधन माझ्याकडे नसताना त्याने फोन केल्याबद्दल त्याचे आभार मानू हे कळत नव्हतं. पण त्यापुढचे दोन दिवस मात्र मला खूप शिकवून गेले. कोणत्याही प्रकारचा मोबदला, पैशांचा व्यवहार, पगार, प्रमोशन ह्याबद्दल कधीही बार्गेन न करू शकणारी मी प्रकाशसारख्या एका आदिवासी मुलाची बार्गेनिंग स्कील बघून स्तिमित झाले. हा पठ्ठा आमच्या खमक्या प्रोड्युसरलाही पुरून उरला. त्या दोन दिवसात प्रकाशच्या बुद्धिमत्तेची चुणूक आम्हा सर्वांनाच दिसली. शेवटी लोह वितळवण्याचा तामझाम करायचे, त्यासाठी अख्ख्या गावाला बोलावून जेवू घालायचे २५००० आणि हे करण्यापूर्वीच्या भट्टीच्या आणि अग्निदेवतेच्या करावयाच्या पूजेच्या प्रसादासाठी एक शेळी कापायचे २००० असा सौदा पटला.

पण स्क्रिप्टचे काय? प्रकाशबरोबर झालेल्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होती कि आदिवासींचा पारंपारिक समारंभ ज्यात त्यांचे गाणे नाचणे असते तो तर होणार होता पण ज्यासाठी हा सगळा समारंभ आयोजित करण्यात आला होता त्या लोह वितळवण्याच्या विधीचे काय? लोहाच्या खनिजाचे दगड भट्टीत टाकून खरंच निघेल का लोखंड? ह्या कशाचीच उत्तरं आमच्याकडे नव्हती. आमच्या आधीच्या स्क्रिप्टचे तर तीन तेरा आधीच वाजले होते. मग आता कोणाची गोष्ट सांगायची? आधुनिक जीवन जगायला उत्सुक असलेल्या आदिवासींची की त्यांच्या जवळजवळ नष्ट झालेल्या निरुपयोगी पद्धतीची. की आपण गोष्ट सांगावी आपल्या प्रवासाची? अगरीयांना शोधून काढतांना आपल्याला आलेल्या अनुभवांची? ठरलं तर मग. हि फिल्म असणार होती एका दिग्दर्शकाच्या आणि त्याच्या टीम च्या शोधकार्याची. त्यांना आलेल्या अनुभवांची आणि त्यातून त्यांनी शोधलेल्या वाटेची! नाव ठरलं “In search of the Agaria” म्हणजे अगारियाच्या शोधात.

ठरलं तर मग. आम्ही ज्या मार्गाने जाऊन प्रकाशाचं घर शोधलं होतं तोच मार्ग कॅमेऱ्यात पकडायचा असा ठरलं. वाटेत आलेले आदिवासी, मोहाची उंच झाडं, जंगलातल्या नदया, प्रकाश, म्हातारबा सगळेच आता आमच्या गोष्टीतली पात्रं होती. कॅमेऱ्याच्या मागे राहणारा दिग्दर्शकच आता कॅमेऱ्यापुढे आला आणि अगरीयांच्या शोधात निघाला. पण ह्यावेळी हि सगळी मंडळी एव्हढ्या सहजासहजी आमचं सगळं ऐकणार होती असा तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची चूक आहे. आता पावसाने चांगलाच जोर धरला होता. ह्याआधी तुडवलेले रस्ते चिखल आणि डबक्यांच्या रांगोळीने भरले होते. अनेक रानवाटा नाहीश्या झाल्या होत्या. जंगलातले कितीतरी छोटे छोटे पूल धो धो वाहणाऱ्या नद्यांखाली दिसेनासे झाले होते. एका महिन्यापूर्वी आम्ही ह्याच भागात येऊन यशस्वीरीत्या रेकी करून गेलोय हे आमच्या क्रूलासुद्धा अविश्वसनीय वाटत असावं. पण कुणी काही बोललं नाही. गप्पिष्ट वाटाड्यालासुद्धा आपण कुठे ह्या मुंबईच्या वेड्या लोकांसोबत फसलो असं वाटत असावं. एका रात्री मोहाच्या दारूच्या नशेत त्याने आम्हाला जंगलातल्या एका शोर्ट कट ने थेट आमच्या गेस्ट हाउसच्या दारात नेऊन सोडलं. ज्या अंतरासाठी आम्ही अख्खी दुपार खर्च केली होती ते अंतर केवळ अर्ध्या तासात पार करून. वरून तो आम्हाला म्हणतो काय तर,
“क्या है न मैडमजी, यह जंगले है न, इसे आप अपना बनालो तोह वह खुदही आपको राह दिखायेगा. समझ रही है न आप”

वाटाड्याने नशेत बरळलेल्या त्या वाक्याने कसं काय माहित पण एक जादूच झाली. इतका वेळ हातचं राखून वावरणाऱ्या क्रूमध्ये एकदम आकस्मिक परिवर्तन झालं. साध्या शब्दात सांगायच झालं तर त्यांची भीड चेपली. जंगलाला आणि जंगलातल्या लाल मातीला त्यांनी आपलसं केलं. ज्या जंगलात बसून सर रुडयार्ड किप्लिंग ह्यांनी मोगलीला कागदावर उतरवला त्या जंगलाला आम्ही आमच्या कॅमेऱ्यात बंदिस्त केलं. उंच खडकांमधून खळाळत वाहणाऱ्या नद्या, लाल मातीत प्राण्यांच्या पावलांचे उमटलेले ठसे, आमच्या कॅमेऱ्याकडे कुतूहलानी बघत खुदुखुदू हसणारे आदिवासी, त्यांची घरे, त्यांचा रंगीबेरंगी आठवडी बाजार असं शूट करत करत आम्ही त्यांच्यातलेच एक होऊन गेलो.

अशाच एका बाजारात आम्हाला सुदेश भेटला. इतर अनेक अगरीयांप्रमाणेच सुदेशाही आता लोहाराचं काम करत होता. त्यासाठी लागणार लोखंड घ्यायला तो बाजारात आला होता. गावातल्या देवीच्या मूर्तीची शस्त्रास्त्र त्याच्याच घरून बनवून घेतली जायची. अशा ह्या सुदेशाने आमच्या समोर पेटत्या ज्वाळातून काढलेल्या लाल लाल लोखंडी सळईला आपल्या जीभेनी चाटून दाखवलं. आमची मात्र ते सर्व बघून दातखीळ बसली.

मोटारसायकल चालवणारा, घरी डिश टीवी असलेला सुदेश मला आदिवासींच्या नव्या पिढीचा आरसा वाटला. आपला व्यवसाय चालवणारा, नव्या जगाच्या बरोबरीनं नवीन स्वप्नं बघणाऱ्या सुदेशला भेटून एक वेगळाच आदिवासी आम्हाला दिसला. अगरीयांनी ह्याआधीच नाकारलेल्या, आजच्या जगाशी विसंगत असलेल्या त्यांच्या लोखंड वितळवण्याच्या कालबाह्य झालेल्या पद्धतीला आपण का शोधत फिरतोय असही मनात आलं. पण आपल्या शहरी मनाला आदिवासींच्या आदिवासी असण्याचं फार अप्रूप वाटतं. आपण कितीही प्रगत असलो तरीही आपल्याला आदिवासींना अजूनही शरीर गोंदवून, रंगीबेरंगी कपडे घालून, शेकोटीभोवती नृत्य करत डिस्कवरी चानेल वर बघायलाच आवडतं हेसुद्धा तेवढच खरं आहे.

मजल दरमजल करत आम्ही प्रकाशच्या गावी पोहोचलो. संध्याकाळचे ५ वाजले होते. मातीच्या छोट्या भट्टीची सगळी तयारी केली गेली होती. एक काळी शेळीसुद्धा आणून बांधून ठेवली होती. आपल्या डॉक्युमेंटरीमुळे हिचा हकनाक जीव जात आहे असा काहीसा विचार माझ्या मनात येऊन गेला. पण मी तो अंगावरची पाल झटकावी तसा झटकून टाकला. जसजसा सूर्य मावळायला लागला तसा अख्खा गाव भट्टीभोवती जमा झाला. आम्ही आमचा कॅमेरा आणि लाईट्स नीट सेट केले. माईक नीट चेक केला आणि शूटिंग सुरु करायला सज्ज झालो. बरोब्बर मावळतीला प्रकाशच्या वडिलांनी आणि काकांनी भट्टीची पूजा केली. त्यानंतर मग त्या शेळीचं कोकरण बंद झालं. तिच्या रक्तानं भरलेल्या थाळीत तिचं मुंडकं ठेवून भट्टीला तिचा प्रसाद चढवण्यात आला. कोळसे पेटवून प्रकाशच्या काकाने पायांनी भाता हलवायला सुरुवात केली. काकांनी भट्टीत टाकलेले दगड बघता ह्यातून अजून काही वेळानी लोखंड खरच बाहेर येणार आहे असं सांगितलं असतं तर त्यावर माझा काही विश्वास बसला नसता. पण आम्ही सर्वांनीच थोडा संयम दाखवून काय होतंय ते बघायचं ठरवलं.

काकांनी जसे भात्यावर पाय चालवायला सुरुवात केली, तसा आजूबाजूला बसलेल्या आदिवासी बायकांनी आपला सूर लावला. जशीजशी रात्रं चढत गेली, म्हाताऱ्या कोताऱ्यांनी आपल्या बिडया काढल्या आणि मोहाच्या दारूचे घोट घ्यायला सुरुवात केली. आदिवासींच्या गाण्यात असलेला एक प्रकारचा करकरीतपणा आणि मोहाच्या दारूमुळे चढलेली झिंग ह्याचं अफलातून मिश्रण आम्ही अनुभवत होतो. कोणतीही दारू न पिता आणि चिलीम न ओढता आम्हालाही ती नशा अनुभवयला मिळाली.

इकडे काकांचा भाता जोरात चालू होता. सहा फुटाचा तो माणूस एकहाती जवळ जवळ गेले ८ तास भाता चालवत होता. भात्याच्या तालावर गात होता, नाचत होता.
दोन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर, शेकडो किलोमीटर्सच्या प्रवासानंतर, आज अखेर ती वेळ आली होती ज्याची आम्ही अधीरतेनी वात पाहत होतो. रात्री २ वाजता अखेर काकांनी भाता थांबवला. एक थेंबभर वितळलेल लोखंड बाहेर आलं. ह्याला भ्रमनिरास म्हणायचा कि मिळालेलं यश साजरं करायचं ह्याचा विचार करण्याचही त्राण आमच्यात नव्हतं. रोख २७००० रुपये प्रकाशच्या हाती सोपवून, आमचा संसार आवरून आम्ही तेथून जे निघालो ते हॉटेलच्या पलंगावर जाऊन कोसळलो.

मुंबईला परत आल्यावर मी फायनल स्क्रिप्ट लिहून काढली. लोखंड वितळवण्याचं हे पुरातनकालीन क्राफ्ट कसं नामशेष झालाय आणि ते आजच्या जगात किती विसंगत आहे अशा आशयाची माझी स्क्रिप्ट माझ्या प्रोड्युसरनी अक्षरशः भिरकावून दिली. तिच्या मते माझ्या स्क्रिप्टला गोड शेवट (HAPPY ENDING) हवा होता. नामशेष होणारं क्राफ्ट आपण जगवायला पाहिजे अशा आशयाचं काहीतरी तिला हवं होतं. फिल्मच्या प्रेक्षकांना सकारात्मक फिलिंग यावी म्हणून. मी अर्थातच माझ्या अन्नादात्याच्या शब्दाबाहेर नव्हते. हे क्राफ्ट कसं सुंदर आहे आणि ते कसं टिकवलं पाहिजे, आदिवासींना आदिवासीच कसं ठेवलं पाहिजे अशा आशयाची स्क्रिप्ट लिहून मी प्रोड्युसरला सुपूर्द केली. आपल्या रिसर्चचं बाड फाईलमध्ये कोंबून मी नव्या फिल्मच्या कामाला लागले.

टीप: काही दिवसांनी कुणीतरी आम्हाला फोन करून सांगितलं की प्रकाशनं ८ तास जीवाचं रान करून भाता चालवणाऱ्या आपल्या काकांची फक्त ८०० रुपयांवर भलामण केली होती. उरलेले सगळे पैसे स्वतःकडे ठेवून त्यानं काकांना हाकलून लावलं होतं.

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
लेख
अनुभव

प्रतिक्रिया द्या
27476 वाचन

💬 प्रतिसाद (88)

प्रतिक्रिया

रोचक आणि माहितीपूर्ण लेख.

ज्ञाना
गुरुवार, 06/15/2017 - 01:20 नवीन
रोचक आणि माहितीपूर्ण लेख. वाचकाला खिळवून ठेवणारी सहज सुंदर आणि ओघवती लेखन शैली. कृपया अजून लिहा आणि लिहीत राहा.
  • Log in or register to post comments

खूप छान आणि सहजपणे केलेले

रुपी
गुरुवार, 06/15/2017 - 01:44 नवीन
खूप छान आणि सहजपणे केलेले लेखन.. फार आवडले.
  • Log in or register to post comments

लेख आवडला!

अत्रे
गुरुवार, 06/15/2017 - 06:47 नवीन
लेख आवडला! आदिवासींसोबतचे शूटिंगचे अनुभव वाचताना वाचताना डेव्हीड अटेनबरोच्या Life on Air पुस्तकाची आठवण आली. फरक एवढाच की त्यांना शूटिंग साठी पैसे द्यावे लागले नाहीत.
  • Log in or register to post comments

फार छान...

योगी९००
गुरुवार, 06/15/2017 - 09:21 नवीन
अमृता गंगातीरकर, तुमचा अनुभव खरंच भन्नाट आहे. फार छान शब्दात मांडला आहे. युट्युब वर तुमची डॉक्युमेंटरी पाहीली आणि मला आवडली सुद्धा...
  • Log in or register to post comments

लेख प्रचंड आवडला.

पिशी अबोली
गुरुवार, 06/15/2017 - 09:34 नवीन
लेख प्रचंड आवडला.
  • Log in or register to post comments

मस्त अनुभव, जबरदस्त लेख!

स्मिता चौगुले
गुरुवार, 06/15/2017 - 09:51 नवीन
मस्त अनुभव, जबरदस्त लेख! लिहीत राहा, आणखी वाचायला आवडेल
  • Log in or register to post comments

डो॑गर पोखरून....

अनन्त्_यात्री
गुरुवार, 06/15/2017 - 11:17 नवीन
...उ॓दीर बाहेर आला त्याची कहाणी !
  • Log in or register to post comments

सुंदर लेख

लोनली प्लॅनेट
गुरुवार, 06/15/2017 - 11:45 नवीन
अतिशय छान लेख मला लहानपणी पासून माहितीपटाची जबरदस्त आवड आहे त्यामुळे वाचताना एक सेकंदही लक्ष विचलित झाले नाही बाकी माहितीपट निर्माते सुद्धा वास्तव वर्णन करण्यापेक्षा करमणुकी लाच प्राधान्य देतात
  • Log in or register to post comments

लोहा मानना

नंदन
गुरुवार, 06/15/2017 - 11:56 नवीन
शब्दशः वेगळ्या वाटेवरचा लेख. अतिशय आवडला. अनुभवांची मांडणी, वेळोवेळी स्वतःच्या प्रतिक्रिया तपासून पाहणे आणि कुठल्याही अभिनिवेशाशिवाय हे सारे वाचकापर्यंत नेमकेपणाने पोचवणे - हे सारे खासच.
  • Log in or register to post comments

लेख आवडला

सुज्ञ माणुस
गुरुवार, 06/15/2017 - 16:08 नवीन
लेख आवडला..जबरदस्त अनुभव!
  • Log in or register to post comments

@ अमृता गंगातीरकर,

अनिंद्य
गुरुवार, 06/15/2017 - 17:56 नवीन
@ अमृता गंगातीरकर, एका वेगळ्या दुनियेची सफर घडवली तुम्ही. जबलपूर-मंडला, नर्मदा ही नावे वाचून खूप आनंद झाला - माझे जन्मगाव आहे जबलपूर. आणि त्या लोखंड वितळवण्याच्या रात्रीची खुमारी तुमच्या शब्दांवरून ओघळून वाचकांपर्यंत बरोबर पोचली आहे, बेस्ट, अनिंद्य
  • Log in or register to post comments

भारतातली पारंपरिक स्टील निर्माण पद्धती

गामा पैलवान
गुरुवार, 06/15/2017 - 19:51 नवीन
आदूबाळ, भारतात पारंपरिक पद्धतीने जे स्टील बनवण्यात येत असे त्याच्यासंबंधी इथे माहिती आहे. त्यानुसार सर रिचर्ड बर्टन नामक व्यक्तीने नोंद केलीये की १८६६ च्या सुमारास इंग्रजांनी या स्टीलच्या व्याप्रावर बंदी घातली. यावरून तर्क बांधता येतो की ब्रिटीश स्टीलचा खप अबाधित ठेवण्यासाठी ही बंदी लागू केली असणार. मी ऐकलंय त्यावरून आजही भारतात पारंपरिक पद्धतीने स्टील बनवणे अनधिकृत आहे. हे जर खरं असेल तर ब्रिटीशांची बंदी आजतागायत चालू आहे असं म्हणता येईल. भारतात पूर्वी जे उच्च दर्जाचं स्टील निर्माण होत असे, त्यासाठी मंत्रसंस्कारित असं उच्च दर्जाचं लोखंड उपलब्ध असायला हवं. हा लेख वाचून जाणवलं की प्रस्तुत वनवासी पद्धतीत मंत्रसंस्कार आहेच. तसेच वनस्पतीदेखील टाकल्या आहेत. म्हणजेच निर्माण होणारं लोह संस्कारित असावं. कदाचित हेच लोह पुढे स्टील बनवण्यात कामी येत असेल. विकी वगळता बाकी सर्व माहिती माझे अंदाज आहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

तसेच वनस्पतीदेखील टाकल्या

दशानन
Fri, 06/16/2017 - 21:46 नवीन
तसेच वनस्पतीदेखील टाकल्या आहेत. म्हणजेच निर्माण होणारं लोह संस्कारित असावं
संस्कारित =)) बाबाजीची कृपा! बाय द वे, तुम्हाला ते "माझे" विमान मिळाले का? इकडे ट्रॅफिक खूप आहे हो!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

लेख

मंजूताई
गुरुवार, 06/15/2017 - 20:00 नवीन
तुमची लेखनशैली आवडली!
  • Log in or register to post comments

आपल्याला वाटतात तितके आदिवसी

palambar
Fri, 06/16/2017 - 17:10 नवीन
आपल्याला वाटतात तितके आदिवसी किंवा ग्रामिण भागातिल लोकं एवढि भोळि नसतात, एवढे खरे.
  • Log in or register to post comments

लेख खूप आवडला. सहजसुंदर लेखन!

निशाचर
Sat, 06/17/2017 - 03:13 नवीन
लेख खूप आवडला. सहजसुंदर लेखन!
  • Log in or register to post comments

भन्नाट लिहिलंय, खूप आवडला हा

शैलेन्द्र
Sat, 06/17/2017 - 10:21 नवीन
भन्नाट लिहिलंय, खूप आवडला हा प्रवास
  • Log in or register to post comments

लेखन रोचक आहे

माहितगार
Sat, 06/17/2017 - 18:30 नवीन
लेखन रोचक आहे
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अमृता गंगातीरकर
Sun, 06/18/2017 - 18:14 नवीन
माझ्या पहिल्याच पोस्टला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप आभार. मराठीत लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे आणि तुमच्या उत्तेजनामुळे तो पुढे चालू ठेवायचा विचार आहे. मिसळ पावच्या सगळ्या वाचकांचे आणि प्रमुखांचे आभार.
  • Log in or register to post comments

इतर लेखन

गामा पैलवान
Mon, 06/19/2017 - 01:51 नवीन
अमृता गंगातीरकर, तुम्ही इतर भाषांतही लिहिता का? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृता गंगातीरकर

इंग्रजी मध्ये. पण कामासाठी.

अमृता गंगातीरकर
Tue, 06/20/2017 - 05:56 नवीन
इंग्रजी मध्ये. पण कामासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

फार वेगळा

मनिमौ
Mon, 06/19/2017 - 12:12 नवीन
अनुभव. तुमचा लेख आल्यावर अशी काही माणसे आहेत हे समजले. अनवट माहिती आवडली
  • Log in or register to post comments

माणसे

अमृता गंगातीरकर
Tue, 06/20/2017 - 06:27 नवीन
जगात खरंच खूपच चित्र विचित्र प्रकारची मानसं आहेत हे कळल्यावर आपण त्याच त्याच लोकांबरोबर, त्याच विषयांवर, त्याच त्याच गप्पा मारत आला दिवस ढकलत असतो ह्या विचारान जरा अस्वस्थ होतं. पण मग बर सुद्धा वाटत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिमौ

मस्त लेख. प्रकाशच्या

पुंबा
Mon, 06/19/2017 - 16:10 नवीन
मस्त लेख. प्रकाशच्या वागण्याचे आश्चर्य वाटले नाही. पण त्या भाता चालवणार्‍या गृहस्थाचे वाईट वाटले.
  • Log in or register to post comments

मलापण खूप वाईट वाटले. त्या

अमृता गंगातीरकर
Tue, 06/20/2017 - 05:57 नवीन
मलापण खूप वाईट वाटले. त्या प्रसंगानंतर दोघा भावात काय घडले माहित नाही आणि जाणून घ्यायची भिती वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

खूप आवडला अनुभव..

माधुरी विनायक
Tue, 06/20/2017 - 00:20 नवीन
अम्रुता, भन्नाटच आहेत तुमचे अनुभव. आणि तुम्ही इतकं सहज, ओघवतं लिहिलंय की तुमचे आणखी अनुभव वाचावेसं वाटू लागलंय.. लिहित्या राहा...
  • Log in or register to post comments

बढिया!

प्राची अश्विनी
Tue, 06/20/2017 - 08:22 नवीन
बढिया!
  • Log in or register to post comments

उत्तम लेख.

अरूण गंगाधर कोर्डे
Fri, 06/23/2017 - 12:42 नवीन
प्रतिसादाला शब्द नाहीत. एकूण वर्णन सुंदरच , एवढेच म्हणता येईल. वाचताना कुठेही कंटाळा येत नाही.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख.

Anand More
Fri, 06/23/2017 - 13:11 नवीन
सुंदर लेख. काकांना प्रकाशने दिलेला मोबदला वाचून वाटाण्याच्या अक्षता लावण्याची प्रथा आदिवासींमध्येदेखील आहे हे कळले.
  • Log in or register to post comments

अगरियांचा इतिहास

रमेश आठवले
Tue, 07/04/2017 - 23:19 नवीन
http://bharatkalyan97.blogspot.com/2017/07/itihasa-of-bharatam-janam-of-agaria-of.html
  • Log in or register to post comments

तुम्ही दिलेली लिंक छान आहे.

प्रसाद प्रसाद
गुरुवार, 07/06/2017 - 16:07 नवीन
तुम्ही दिलेली लिंक छान आहे. अमृताजींच्या माहितीपटाची लिंक पण आहे त्यात. अमृताजी खूपच छान लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

जबरदस्त लेख. तुमची लेखनशैली

पद्मावति
Wed, 07/05/2017 - 02:11 नवीन
जबरदस्त लेख. तुमची लेखनशैली फार छान ओघवती आहे. अजुन लिहीत जा मिपावर प्लीज.
  • Log in or register to post comments

खूप छान लेख !!!

वीणा३
गुरुवार, 07/06/2017 - 22:43 नवीन
खूप छान लेख !!!
  • Log in or register to post comments

बर्याच दिवसांनी इथे

शिव कन्या
Tue, 07/11/2017 - 20:48 नवीन
बर्याच दिवसांनी इथे वाचण्यासारखं मिळालं. नवी माहीती. नवी परिभाषा. लिहीलंय पण सुरेख डिटेलवार. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

कसला सुंदर लेख आहे राव. लयच

बॅटमॅन
Fri, 05/11/2018 - 00:45 नवीन
कसला सुंदर लेख आहे राव. लयच भारी, कडक सलाम. _/\_
  • Log in or register to post comments

खूप छान लेख

diggi12
Mon, 08/26/2024 - 12:16 नवीन
खूप छान लेख
  • Log in or register to post comments

लेख पुन्हा एकदा वाचून छान वाटले.

धर्मराजमुटके
Mon, 08/26/2024 - 19:25 नवीन
लेख पुन्हा एकदा वाचून छान वाटले. असले लिखाण आताशा मिपावर दुर्मिळ झाले आहे. "जाने कहा गये वो दिन" असे म्हणण्याची पाळी आली आहे. ज्याप्रमाणे भाजपात मुळ भाजपेयी दिसत नाहीत किंवा काँग्रेसमधे गांधींच्या म्हणण्याबाहेर वागणारे नेते दिसत नाहित, राष्ट्रवादीत बिजनेसमन नसलेला नेता दिसत नाही, सेनेत डरकाळी फोडणारा नेता राहिला नाही तद्वतच मिपावर कसदार लेखन आताशा नजरेस पडत नाही. उपमा पण राजकीय द्यावा लागत आहेत आता :)
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

कंजूस
Mon, 08/26/2024 - 19:52 नवीन
लेख आवडला. यावरून आठवलं. भारतात पूर्वी नीळ बनत असे ती व निर्यात होई. मग कृत्रिम रंग बनू लागल्यावर ती प्रक्रिया मागे पडली तरी एक दोन कुटुंबे अजूनही ती करत आहेत. महाग पडते पण चालू आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा