Skip to main content

#मिपाफिटनेस - मी आज केलेला व्यायाम - मे २०१७ - #व्यायामविडा

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 01/05/2017 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही आपल्या समोर एक मिपाकर आपली व्यायामगाथा सांगणार आहेत. ह्या महिन्याचे मानकरी आहेत "वेल्लाभट"! मुंबईसारख्या ठिकाणी अत्यंत धावपळीच्या दिनचर्येतही रात्री उशीरा का होईना पण ठरवलेला व्यायाम केल्याशिवाय न झोपणारे हे मिपाकर! नोकरी, जाण्या येण्यात जाणारा वेळ, लहान मुल अशा आपल्याकडे असणार्‍यशासर्व सबबी त्यांच्याही आयुष्यात आहेतच. पण त्याचा बाऊ न करता नित्य नियमाने व्यायाम तर करतातच पण सोबतच मिपाफिटनेसच्या धाग्यावरही त्यांचे प्रतिसाद अत्यंत वाचनीय असतात. ह्या महिन्याचा मिपाफिटनेसचा धागाही असाच वाचनीय असेल ह्यात शंकाच नाही. आपल्यालाही आपले अनुभव मांडायचे असतील तर आम्हाला जरुर व्यनि करा. टीम #मिपाफिटनेस - मोदक, प्रशांत, डॉ श्रीहास. ------------------------------------------------------------------------------------------- वरच्या परिच्छेदात 'व्यायामगाथा' असा उल्लेख आहे. माझी काही व्यायाम्गाथा वगैरे नाही; पण व्यायामबाता बर्‍याच आहेत. म्हणजे की एक किडा असल्यासारखा व्यायामाचा, फिटनेसचा विचार सतत डोक्यात वळवळत असतो आणि त्यामुळे पुस्तक किंवा बरेचदा जालावर आरोग्यविषयक वाचन चालू असतं. आणि त्या वाचनातून मिळालेलं ज्ञान मी पदोपदी वाटत असतो. म्हणून व्यायाम'बाता'. बाकी फिटनेस विषयात फार काही झेंडे मी स्वतः रोवलेले नाहीत. किंवा मग व्यायाम'बाधा' म्हणता येईल. कारण व्यायाम म्हणजे एक व्यसन असल्यासारखं झालंय. त्यातल्या त्यात आधुनिक व्यायामपद्धती जास्त भावते त्यामुळे जिममधे वजनं, उपकरणं घेऊन केले जाणारे व्यायाम, आणि आता ते जमत नसल्यामुळे बॉडीवेट म्हणजेच कुठलंही अतिरिक्त वजन न घेता केले जाणारे व्यायाम करायचा आणि पर्यायाने फिट रहायचा प्रयत्न नेहमी चालू असतो. ही व्यायामबाधा मला बरेच वर्षांपूर्वी झाली. एका मित्राची सोबत मिळाली आणि सुरुवातीची तीन सव्वा तीन वर्ष दणकून व्यायाम झाला. प्रोटीन ऑब्सेशन झालं, मग सोयाबीन आणून स्वतःसाठी वेगळी भाजी बनवणं इथपासून ते व्हे प्रोटीन शेक ऑफिसमधे घेऊन जाणं इथपर्यंत सगळं केलं. त्या दरम्यान शरीरयष्टीत झालेला बदल आल्हाददायक होता. पुढे एक एक व्याप आले आणि जिम वरून घरचेघरी व्यायाम आणि पुढे मिळेल तसा व्यायाम असा प्रवास होत गेला. वरती म्हटल्याप्रमाणे मला जिममधे जायला नेहमीच आवडतं. स्ट्रेंग्थ ट्रेनिंग विषयी विशेष आस्था आहे आणि ते करून चांगले परिणाम स्वतःमधे दिसतात, त्यामुळे ते आवडतं. मिपाफिटनेस सुरू होण्याआधीही व्यायाम जमेल तसा, जमेल तितका सुरु असायचा. घरचेघरी असल्याने बॉडीवेट व्यायामांवर भर होता. बॉडीवेट असो किंवा जिममधे वजन घेऊन, उपकरण वापरून असो, व्यायामाच्या या प्रकाराला रेजिस्टन्स ट्रेनिंग म्हणतात. रेजिस्टन्स म्हणजे स्नायू आकुंचित करताना तुम्ही वजन/उलट दिशेचा फोर्स वापरता. असं केल्याने स्नायूंची झीज होते (मसल ब्रेकडाऊन) आणि पुढे विश्रांती+आहार यातून ती भरून काढली जाते ज्याने स्नायूंची वाढ होते, ते बळकट होतात व फॅट बर्न होतात. रेजिस्टन्स ट्रेनिंग का? वयानुसार स्नायूंमधील तंतू कमी होत जातात. ३० वयापुढे तर दर दहा वर्षाला अडीच किलो स्नायू शरीरातून वजा होतात असं एका अभ्यासात म्हटलेलं आहे. रेजिस्टन्स ट्रेनिंग ने स्नायूंची वाढ होते, परिणामी ते कमी होण्याच्या प्रक्रियेचा वेग कमी होतो. रेजिस्टन्स ट्रेनिंग मुळे मेटॅबोलिजम वाढतो ज्याने वजन व त्याबरोबर येणारे इतर अनेक आजार नियंत्रणात राहतात. यानिमित्ताने काही संकल्पना थोडक्यात उलगडून सांगतो. व्यायामाचे मुख्यतः चार प्रकार पडतात. १) अ‍ॅरोबिक - अ‍ॅरोबिक व्यायामप्रकारात ठराविक हालचाल लयबद्ध व निरंतर केली जाते. याचा मूळ उद्देश ह्रदयाचं आरोग्य, स्टॅमिना सुधारणे हा असतो. उदा: धावणे, पोहणे, सायकल चालवणे २) अ‍ॅनारोबिक - अ‍ॅनारोबिक म्हणजेच स्ट्रेंग्थ ट्रेनिंग किंवा रेजिस्टन्स ट्रेनिंग. याचा मूळ उद्देश स्नायूंची शक्ती व आकार वाढवणे हा असतो. यातील हालचाली कमी आवर्तनात व हळू केल्या जातात ज्यात स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणावर भर असतो. ३) फ्लेक्झिबिलिटी - योगासने, स्ट्रेचिंग ही याची उदाहरणे. या व्यायामप्रकारांचा मुख्य उद्देश शरीराची लवचिकता वाढवणे असून यात स्नायूंना ताण देऊन ती अवस्था धरून ठेवण्यावर भर असतो. ४) स्टॅबिलिटी - यात मुख्यत्वे शरीराचा तोल सांभाळणारे स्नायू बळकट करणे हा उद्देश असून यातील हालचालीही संथ व कमी असतात. ताई-ची हे याचं उदाहरण म्हणता येईल. प्लँक हा व्यायाम स्टॅबिलिटी प्रकारात मोडतो. आपल्या व्यायामात या चारही प्रकारातल्या व्यायामांचा अंतर्भाव असणं केंव्हाही सरस. कुठलाही व्यायाम करत असाल तर काही गोष्टींची काळजी घ्या. १) प्री वर्काउट मील - व्यायामाआधी किमान २०-२५ मिनिटे एखादं फळ किंवा चटकन उर्जा देणारा आहार घेतलेला चांगला, तोही मोजकाच. २) वॉर्म अप - अत्यंत गरजेचा. अन्यथा दुखापतीची शक्यता बळावते. वॉर्म अप मधे विशेषत्वाने अशा मूव्हमेंट्स असतात ज्या तुम्ही पुढे वर्काउटमधे करणार असता. आणि म्हणूनच प्रत्येक व्यायामप्रकाराचा वॉर्म अप वेगळा असतो. धावण्या आधी करायचा वॉर्म अप वेगळा, आणि अपर बॉडी आगोदर करायचा वॉर्म अप वेगळा. सूर्यनमस्कारालाही वॉर्म अप लागतो. वॉर्म अप मधे सामान्यतः स्लो जॉग, जंपिंग जॅक्स किंवा तुम्ही पुढे करणार्‍या व्यायामाचं कमी तीव्रतेचं व्हर्जन असू शकतं. जसं की बॉडी वेट पुश अप्स हा बेन्च प्रेस साठी वॉर्म अप आहे. बॉडीवेट स्क्वॉट हा वेटेड स्क्वॉटचा वॉर्म अप आहे. ३) फॉर्म - कुठलाही व्यायाम करत असताना फॉर्म किंवा पद्धतीकडे बारीक लक्ष द्या. फॉर्म चुकला तर फायद्या ऐवजी तोटा होऊ शकतो, गंभीर दुखापत होऊ शकते. मग ते योगासन असेल किंवा हेवीवेट स्क्वॉट. ४) व्यायाम किती करावा? - वेट ट्रेनिंग पुरतं म्हणायचं तर ग्रोथ साठी - ८-१० रिपिटिशन, २ सेट, ५-७ व्यायामप्रकार मेंटेनन्स साठी - १२-१५ रिपिटिशन, २-३ सेट, ८-१० व्यायामप्रकार स्नायूंच्या आखीव रेखीव पणा साठी - १५-२० रिपिटिशन, २-३ सेट, ८-१० व्यायामप्रकार. हे नियम नव्हेत, ठोकताळे आहेत त्यामुळे हे डिबेटेबल आहेत. ओव्हरट्रेनिंग मात्र टाळणं गरजेचं. उदा. वेट ट्रेनिंग रोज करणं चूक. त्यातही रोज वेगवेगळ्या स्नायूगटांचा व्यायाम होत असेल तर ठीक, पण एकाच स्नायूला ४८ तासाच्या आत पुन्हा व्यायाम देणे हे तितकंसं योग्य मानलं जात नाही. स्नायूची झीज भरून यायला ४८ तासांचा अवधी जावा लागतो. ५) स्ट्रेचिंग आणि कूलडाऊन - व्यायामानंतर स्नायूंना ताण देणे गरजेचे असते. वॉर्म अप आणि स्ट्रेचिंग/कूलडाऊन यात बरेचदा गल्लत केली जाते. मागे मिपाफिटनेस धाग्यावरच एक याबद्दलचा प्रतिसाद दिला होता. अनेकदा वॉर्मअप म्हणून स्ट्रेचिंग केलं जातं. स्टॅटिक स्ट्रेचिंग हे जर व्यायामाच्या किंवा एखाद्या फिजिकल अ‍ॅक्टिविटीच्या आगोदर केलं तर मसल स्ट्रेंग्थ, पर्फॉर्मन्स कमी होतो अशी अनेक निरीक्षणं नोंदवलेली आहेत. याउलट, व्यायामानंतरचं स्ट्रेचिंग हे मसल फटीग कमी करायला मदत करतं, ब्लड सर्क्युलेशन वाढवून सोअरनेस कमी करायला मदत करतं. व्यायामादरम्यान मसल्स मधे लॅक्टिक अ‍ॅसिड तयार होतं, जे पोस्ट वर्काउट स्ट्रेचेस ने एलिमिनेट व्हायला मदत होते. क्रेंप्स येत नाहीत. मसलचा टोन चांगला होतो. स्ट्रेचेस चे असे अनेक फायदे आहेत. पण; व्यायामानंतर. थोडक्यात, वॉर्म अप शुड इन्क्लूड 'मूव्हमेंट्स' आणि स्ट्रेचिंग शुड इन्क्लूड 'होल्ड्स' ६) आहार - प्रथम पोस्ट वर्काउट मील बद्द्ल. पोस्ट वर्काउट मील हे व्यायामा नंतरचं लगेचचं खाणं असावं. व्यायामानंतर २० मिनिटाच्या आत शरीरात पटकन पचणारी प्रथिनं, जीवनसत्व जाणं अतिशय उत्तम. हे काम प्रोटीन शेक चांगलं करु शकतात. सर्वसाधारण आहाराबद्दल इथे डॉक्टर लोक सांगतीलच. पण तरीही प्रथिनं, कॉम्प्लेक्स कार्ब्स, विटॅमिन्स, फायबर हे घटक महत्वाचे. ७) आराम - दिवसाला ६-८ तास झोप खरं तर प्रत्येकानेच घेतली पाहिजे. पण व्यायाम करत असाल तर मात्र तिचं महत्व जास्त असतं. स्नायूंची खरी वाढ, फॅटची खरी घट ही व्यायाम करत 'नसता' त्या वेळी होत असते. ८) प्रोग्रेसिव ओव्हरलोड - व्यायामाचीही शरीराला कालांतराने सवय होते व शरीरावर त्याचा परिणाम होईनासा होतो. हे होऊ नये म्हणून प्रोग्रेसिव ओव्हरलोड गरजेचं आहे. म्हणजेच व्यायामाच्या काठिण्य पातळीत होत असलेली वाढ. उदा. बैठका मारत असाल तर तुम्हाला १५ रिपिटिशन आरामात जमत असतील तर बारवरचं वजन वाढवणं गरजेचं आहे; किती याला महत्व नाही पण वाढवणं गरजेचं. धावत असाल आणि ३ किमी सहज्ज जात असतील तर त्या ३ चे एक तर ४ व्हावेत किंवा सपाट रस्त्याऐवजी चढ असलेला रस्ता निवडावा. व्यायामात प्रगती झाली कीच परिणामात आणि तुमच्यात प्रगती होते. तसं सांगण्यासारखं बरंच आहे. सर्वात जास्त आढळणारा एक स्वभाव म्हणजे धरसोड. व्यायामाचं एक सांगणं असतं, डोन्ट एक्स्पेक्ट टू मच टू सून. जिम लावलं की ३ महिन्यात रिप्ड होता येत नाही. मॅरेथॉन धावायची असेल तर आठवड्याभराचा सराव पुरेसा नाही. टीव्हीवर, यूट्यूबवर बघितलं आणि चार दिवस झपाझप श्वासोच्छ्वास केला की सगळी टॉक्झिन्स बाहेर फेक्कली वगैरे जात नाहीत. त्याला वेळ द्यावा लागतो, सातत्य लागतं आणि निष्ठा लागते. असो. मिपाफिटनेसकडे येतो. तर, #मिपाफिटनेस या उत्तम उपक्रमाला मोदकभाऊंनी सुरुवात केली आणि आगोदरच चालू असलेल्या व्यायामाला नवा जोर मिळाला. पहिले दोन महिने घेतलेले चॅलेंज काही जमले नाहीत. म्हणजे पाच पन्नास जोर मारून आम्ही व्यायामबाता मारल्याच तरीही, पण विशेष गांभीर्याने नव्हे. दिवसाचे १३ तास घराबाहेर, त्यातले ४ तास बेक्कार प्रवास, आल्यावर फॅमिली ड्यूटी, मुलाशी खेळणं, जेवणं इत्यादी; या सगळ्यात रात्रीचे बारा वाजणं, मग सकाळी लवकर उठता न येणं, आणि रिपीट; असं थोडक्यात चक्र असल्याने व्यायाम मागेच पडत होता. पण एप्रिल महिन्यात 'फुल' सिरियस व्हायचं ठरवलं आणि स्टेअर्स / हाय स्टेप अप्स चा चॅलेंज घेतला. स्टेअर्स हा व्यायाम कार्डियो सारखाही काम करतो व स्ट्रेंग्थ ट्रेनिंगसारखाही. गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध तुम्ही तुमचं शरीर उचलता त्यामुळे मांड्या, पोठर्‍या, व संपूर्णच लोअर बॉडीसाठी ते रेजिस्टन्स ट्रेनिंग होतं, आणि त्याचबरोबर शरीराचा तोल सांभाळता त्यात कोअर मसल्स चा व्यायाम होतो. गती वाढवलीत तर हा कार्डियो व्यायाम होतो, गती कमी ठेवून काठिण्य पातळी वाढवलीत (एक पायरी सोडून चढणे किंवा स्टेप अप असेल तर स्टेप ची उंची वाढवणे, पाठीवर वजन घेणे इत्यादी) तर लोअर बॉडीसाठी उत्तम स्ट्रेन्ग्थ बिल्डर. या शिवाय स्टेअर्स च्या व्यायामप्रकारात इतकं नाविन्य तुम्ही आणू शकता, की रोज नव्या प्रकारेही व्यायाम होऊ शकेल. - स्टेअर्स हा जगात अनेक तज्ञांनी 'व्हिगरस' एक्सरसाइझ म्हणून गणलेला व्यायाम आहे, जो चालणे/धावणे या आणि इतर काही व्यायामांपेक्षा अधिक कॅलरी दर मिनिटाला बर्न करतो. - याला विशेष प्रशिक्षण लागत नाही. - पायांना दुखापत होऊ नये म्हणून उत्तम बसणारे बूट असले की त्याव्यतिरिक्त कुठलंही साधन याला लागत नाही. - हा व्यायाम कुठेही करता येतो. माझ्या घराजवळ एक पादचारी पूल असल्याने मी तिथे केला. पण निव्वळ इमारतीच्या जिन्यावर किंवा तितकंही बाहेर जायचं नसेल तर घरी स्टुलावर (स्टेप अप्स) हा व्यायाम होऊ शकतो. - कुवतीनुसार, इच्छेनुसार याची काठिण्यपातळी बदलता येते. मी केलेला व्यायाम: मी प्रामुख्याने स्ट्रेंग्थ ट्रेनिंगच्या दृष्टिकोनातून हा व्यायाम केला. वॉर्म अप म्हणून सामान्य पद्धतीने १०० पायर्‍या झाल्यावर एक एक पायरी सोडून जिना चढला. एका जिन्याला ५० पायर्‍या या प्रमाणे ४-६ सेट केले. एक पायरी सोडून जिना चढताना जवळजवळ लंजेस हा व्यायामप्रकार होतो, किंवा तसाच परिणाम होतो. वरती म्हटल्यानुसार यात विविधता आणता येते आणि तीही आणायचा प्रयत्न मी केला; उदा. दोनही पायांनी जिना चढणे किंवा आडव्या दिशेने चढणे इत्यादी. ही लिंक बघावी: https://www.bodybuilding.com/fun/givstrength1.htm ओव्हरट्रेन होणार नाही याची काळजी घेतली व किमान एक दिवसाच्या अंतराने व्यायाम केला. अनेकदा ऑफिसमधून आल्यावर घरी न जाता त्याच कपड्यानिशी थेट तसाच जिन्यावर जाऊन व्यायाम करून घरी गेलो. लॅपटॉपचं २ किलोचं वजन त्यावेळी उपयोगाचं वाटलं. त्यासाठी वाटेत असताना अर्धा तास आधी केळं खाल्लं वगैरे वगैरे. थोडक्यात चंग बांधला होता. हा चॅलेंज सुरू करत असताना शरीराचं मोजमाप करणं विसरलो त्यामुळे तुलना करायला शेवटी फक्त वजन हाच एक निकष उरला. बाकी सगळे निकष सापेक्ष असल्याने ते नमूद करण्यात तथ्य नाही. पण मला स्वतःला ताकद, स्टॅमिना यात बरीच वाढ जाणवत आहे. सुरुवातीच्या दिवशी १५० पायर्‍यांमधे धापा टाकत होतो ते पंधराव्या दिवशी २५० नंतर लगेच फोन आला तरीही समोरच्या व्यक्तीला मी व्यायाम करतोय, किंवा दमलोय असं माझ्या आवाजावरून जाणवलं नाही. वजन अर्थातच कमी झालंय पण बीएमआय वगैरे गोष्टी न बघता त्याने हुरळून जाण्यात अर्थ नाही. तरीही विशेष म्हणजे इतर वेळी बसून बसून किंवा गाडी चालवून दुखणारा गुडघा गेल्या महिन्याभरात दुखलेला नाही. आहार. आहारात तसा काहीच बदल नाही. मी एरवीही तीन तासाने काहीतरी खाल्लं जाईल याची काळजी घेतो, शीतपेय पीत नाही, वेफर्स इत्यादी जाणीवपूर्वक टाळतो. पण वडापाव, समोसा, मिसळ, भेळ; मुळात खादाड असल्याने सगळंच खायला आवडतं आणि जे आवडतं ते मनसोक्त खाणं हे तत्व आहे जे मी या चॅलेंजदरम्यानही पाळलं. नसतं पाळलं तर कदाचित थोडा जास्त फायदा झाला असता पण दिल दा मामला है; मन मारून काही केलं की शरीरातल्या कॅलरीज वाढतात म्हणे :) तुम्ही पण स्टेअर्स चा व्यायाम करावा का? हो हरकत नाही. पण गुडघ्याची काही तक्रार आगोदर असेल, तर नको. किंवा मग डॉक्टरांना विचारून. फक्त स्टेअर्स करून चालेल का? चालेलही, पण तितकंसं स्वागतार्ह नाही. व्यायामात विविधता लागते शरीराला. शिवाय स्टेअर्स चा अतिरेक केलात तर सांध्यांसाठी वाईट. स्टेअर्स ने फक्त लोअर बॉडीचा व्यायाम झाला, बाकी नाही. तेंव्हा फक्त स्टेअर्स अयोग्य. मी चॅलेंज पुरत्या केल्या असल्या तरी मधल्या दिवशी जोर, पुश अप्स, इत्यादी व्यायाम किरकोळ प्रमाणात चालू होते. हे माझं महिन्याभराचं प्रगतीपुस्तकः थोडं अजून शिस्तशीर होऊ शकलं असतं, पण वेळ! :) असो. a आता पुढे: माझा मे महिन्याचा चॅलेंज : बर्पी चॅलेंज ! ----------------------------------------------------------------------------------------- आणि हो, या महिन्यापासून #मिपाफिटनेस मधे एक नवीन प्रथा सुरू करायची आहे. यात आपण एक #व्यायामविडा समोर ठेवायचा व तीन सदस्यांना तो उचलण्यासाठी नामांकित करायचं. त्या तिघांपैकी कुणीही किंवा सगळ्यांनी तो विडा दिलेल्या अटींसकट पूर्ण करून पुढे त्यांच्या मनानुसार नवीन #व्यायामविडा ठेवायचा, आणि तीन मिपाकरांना नामांकित करायचं. अशाप्रकारे ही #आरोग्यसाखळी गुंफत जायची आणि #मिपाफिटनेस चा झेंडा उंच फडकवत ठेवायचा. चला तर, मी ठेवतोय हा #व्यायामविडा: रनिंग/धावणे: ७ दिवसात एकूण १० किमी धावायचं. रोज १ धावा किंवा एका दिवसात १०, हरकत नाही. १० पेक्षा जास्त धावताय? अतिउतम. आणि ७ दिवसांनंतर तुम्ही एक चॅलेंज/विडा ठेवून ३ मिपाकरांना नामांकित करायचं. मी नामांकित करत असलेले सदस्यः टवाळ कार्टा, सृजा, हेमंत८२ व्यायामविडा ठेवायची कल्पना सुचवणारे मिपाकरः Sagarpdy
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 43477
प्रतिक्रिया 94

प्रतिक्रिया

वेल्लाभाऊंचा धागा अत्यंत अपेक्षेने उघडला, आणि अपेक्षापूर्ती झालीच... प्रतिसादांप्रमाणेच अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरक धागा.. विड्याची कल्पना अत्यंत आवडली आहे...

#व्यायामविडा हा प्रकार आवडला! मी ही प्रयत्न करतो :)

स्टेपर आणि स्टेप्स वापरुन काही ट्रेक्ससाठी तयारी करताना व्यायाम केला आहे. शिवाय जीम मधे सुद्धा बर्‍याच चकरा झाल्यात. सध्या काही न काही कारण निघुन नियमीत व्यायाम होत नाही. तुम्ही लिहिलेल्या बर्‍याच गोष्टी रिलेट करता आल्या. मला इथे नॉमीनेट केलं नसलं तरीही मला हे चॅलेंज पूर्ण करायला आवडेल. धावण्याच्या ट्रॅकिंगसाठी कोणतं अ‍ॅप इथे सगळे वापरतात?

मी पयला challenge accepted

In reply to by टवाळ कार्टा

बाकी "टवाळ कार्टा, सृजा, हेमंत८२" हेच्च आयडी का आणि आयडींचा क्रम कोणत्या निकषांवर लावलाय त्याबाबतीत उत्सुकता आहे ;)

In reply to by टवाळ कार्टा

तिघांचे प्रतिसाद बघितले आजवरचे. टकाशी कायप्पावरूनही बोलणं होतं. कारणं आणि क्रम टका - करू शकतो म्हणून सृजा - करते म्हणून हेमंत - सध्या करू शकत नाहीये म्हणून हे जस्ट वाटलं म्हणून बरं का. :) मी जज करत नाहीये कुणाला.

In reply to by वेल्लाभट

हे अगदी बरोबर आहे. तरीपण तुम्ही नॉमिनेटे केला हेच खूप छान आहे प्रयत्न करायला हरकत नाही पण या दोन आठवड्यामध्ये जमेल हे काही सांगता येत नाही.. कारण २ दिवस मुंबई दौरा आहे, ३ दिवस शेगाव आहे.. शेवटच्या २ आठवड्यात नक्क्की प्रयत्न करेन आणि कुणाला तरी नॉमिनेटे करेन हे नक्की.

काय सुंदर लेख लिहीला आहेस!! वाखु म्हणून साठवलाय. शक्यतो ह्या धाग्यावर येणारा प्रत्येक #व्यायामविडा उचलणारच! १० किमीचाही उचलत आहे. कुणी तरी मला नॉमिनेट करा रे पटकन. म्हणजे मी पण लगोलग ते चॅलेंज पूर्ण करुन कुणाला तरी नॉमिनेट करेन. (हे वाक्य लिहीताना मागे उगाच हिहीहॉहॉहॉ असा आसुरी आनंदाचा आवाज का येतोय?!) मिपावर लोकांना टारगेट करायचंच आहे तर हे असं करुया ना =))

In reply to by वेल्लाभट

सुरुवात केली. १ किमी पळणे झाले. गॅप पडल्याने दम लागतोय चटकन पण १-२ दिवसात परत सवय होईलच. शिवाय आजवर जिममध्ये पळत होते, आता बाहेर जातेय पळायला. त्याची सवय नाही. चढ उतार तीव्र आहेत इथे जरा. पण उलट चांगलय!

सातत्याने व्यायाम करणाऱ्यांबद्दल खरंच खूप आदर वाटतो, आणि त्यात हे असे मिपा फिटनेसचे धागे वाचून आपण नक्की काय करतोय (स्टेअर्स चढणे उतरणे, घरकाम सोडून) असं वाटतं, पण ते असो, मस्त लिहिलेय,

धागे निघाल्यापासून एप्रिल पर्यंत व्यायामाचे धागे उघडले पण नाही. विटेकर काकांचे स्टेप्स चॅलेंज मागील महिण्यात वाचले आणि आत्ता वेल्ला भट यांचा अनुभव वाचला. बघू कसे जमते ते ? एप्रिल महिन्यात दर सोमवार ते शुक्रवार सकाळी २ मिनिटे असे प्लॅन्क चॅलेंज पूर्ण केले. २ चे ३ मिनिटे करणे खूप अवघड वाटत आहे. मे अखेरीस अपडेट करेल.

रनिंग/धावणे: ७ दिवसात एकूण १० किमी धावायचं. --- याचे पुढल्या रविवारी निकाल टाकतो. ही लिंक बघा कशी वाटते आहे. धावण्याचा विडा झाला कि ह्याचा विडा उचलावा म्हणतो.

In reply to by साधा मुलगा

#व्यायामविडा उचलत आहे.
शाबास! होऊन जाऊदे. आणि हो, तुम्ही दिलेली लिंक पण छान आहे. पुश अप चॅलेंजही कराच. शुभेच्छा!

विड्याची कल्पना भारीच. मी पण उचलतो हा विडा. 7 दिवसात 15 किमी पळणे. अवांतर - मिपाकर कुठला स्मार्टबँड वापरतात? ऑफिसमधे सध्या सगळे फिट्बीट वापरतात.

अतिशय मुद्देसूदपणे लिहिलं आहे. आवडलं. व्यायामामध्ये जिन्यांचा उपयोग अनुभवला आहे. जिने चढताना पायऱ्या उलट्या चढल्यावर सुद्धा अधिक चांगला फायदा होतो. तसंच चार पायऱ्या धावत चढून आपल्या शक्ती नुसार चार पुशअप्स, पुन्हा ४ पायऱ्या धावत चढणे असं कॉम्बिनेशन करू शकतो.

धन्यवाद! सुंदर धागा आणि उत्तम माहिती!

बाब्बो !!वेल्ला दंडवत घे. मला वाचायला जरा उशिर झाला पण वेळ काढूनच वाचल्याचं सार्थक झालं. इतकं प्रेरणादायी लिहील्यावर चॅलेंज न घेणं म्हणजे लानत च ! फक्त एक आहे, मी काही कारणामुळे अजुन एखाद महिना धावू शकणार नाही पण मी रोज ३ कीमी चं चॅलेंज घेते - चालायचं. चालेल का? आणि टका, तूच आहेस आळशी गोळा :P

१ मे - १० बर्पी २ मे - १५ बर्पी ३ मे - २० बर्पी (१८-२० करताना कठीण गेलं, आता उद्या २५ करणं खरी कसोटी ठरणारंय)

In reply to by राघवेंद्र

knee पुश-अप चालायला हरकत नाही पण एक स्टेप वाढेल ना? करून बघा, ते सोपं वाटल्यास ते करा ! मी पुश अप वालं व्हर्जन करतो. यात पण बरेच फेरफार होऊ शकतात.

१ मे - १० बर्पी २ मे - १५ बर्पी ३ मे - २० बर्पी (१८-२० करताना कठीण गेलं, आता उद्या २५ करणं खरी कसोटी ठरणारंय) ४ मे - २५ बर्पी (जमल्या! दम निघाला पण जमल्या.)

१ मे - १० बर्पी २ मे - १५ बर्पी ३ मे - २० बर्पी (१८-२० करताना कठीण गेलं, आता उद्या २५ करणं खरी कसोटी ठरणारंय) ४ मे - २५ बर्पी (जमल्या! दम निघाला पण जमल्या.) ५ मे - ३० बर्पी

रनिंग/धावणे: ७ दिवसात एकूण १० किमी धावायचं. रोज १ धावा किंवा एका दिवसात १०, हरकत नाही. १० पेक्षा जास्त धावताय? अतिउतम. आणि ७ दिवसांनंतर तुम्ही एक चॅलेंज/विडा ठेवून ३ मिपाकरांना नामांकित करायचं.
१० किमी = ७.५ मैल ना? मग माझे झालेय्त ह्या आठवड्यात आत्ता पर्यंत - उद्या अजून ५ मैल होतील. कुणाला नॉमिनेट करायचं?

In reply to by विंजिनेर

ग्रेट की मग... आता तुम्ही नामांकित करा एखाद्याला, 'तुमच्या' मनाने एखादा #व्यायामविडा ठेवून! रनिंगच पाहिजे असं काही नाही.

१ मे - १० बर्पी २ मे - १५ बर्पी ३ मे - २० बर्पी (१८-२० करताना कठीण गेलं, आता उद्या २५ करणं खरी कसोटी ठरणारंय) ४ मे - २५ बर्पी (जमल्या! दम निघाला पण जमल्या.) ५ मे - ३० बर्पी ६ मे - ३५ बर्पी (१० नंतर १० सेकंद गॅप घेतली पण त्या दहा सेकंदात इतर वॉर्म अप सदृश व्यायाम केले, सो अ‍ॅज टू कीप मूव्हिंग कॉन्स्टंटली.)


मी केलेला व्यायाम खालील प्रमाणे- नकाशा, आकडे, ट्रेल चा काही भाग
challenge

In reply to by वेल्लाभट

टबाटा दहा दिवस - एक आड एक दिवस पळणे (दर दिवशी २ किमी) आणि टबाटा करु शकतो. मी हा व्यायाम करताना रिपिटिशन्स आणि विश्रांतीचा वेळ मोजण्यासाठी मनातल्य मनात आकडे मोजते. बोला कोण आहे तयार?

१ मे - १० बर्पी २ मे - १५ बर्पी ३ मे - २० बर्पी (१८-२० करताना कठीण गेलं, आता उद्या २५ करणं खरी कसोटी ठरणारंय) ४ मे - २५ बर्पी (जमल्या! दम निघाला पण जमल्या.) ५ मे - ३० बर्पी ६ मे - ३५ बर्पी (१० नंतर १० सेकंद गॅप घेतली पण त्या दहा सेकंदात इतर वॉर्म अप सदृश व्यायाम केले, सो अ‍ॅज टू कीप मूव्हिंग कॉन्स्टंटली.) ७ मे - आराम ८ मे - ४० बर्पी

१ मे - १० बर्पी २ मे - १५ बर्पी ३ मे - २० बर्पी (१८-२० करताना कठीण गेलं, आता उद्या २५ करणं खरी कसोटी ठरणारंय) ४ मे - २५ बर्पी (जमल्या! दम निघाला पण जमल्या.) ५ मे - ३० बर्पी ६ मे - ३५ बर्पी (१० नंतर १० सेकंद गॅप घेतली पण त्या दहा सेकंदात इतर वॉर्म अप सदृश व्यायाम केले, सो अ‍ॅज टू कीप मूव्हिंग कॉन्स्टंटली.) ७ मे - आराम ८ मे - ४० बर्पी ९ मे - ६० जोर, ३ मिनिट प्लँक, बुलवर्कर (हे एक उपकरण असतं ज्याने आयसोमेट्रिक प्रकारातला व्यायाम करता येतो)

फायनली, काल जिम मध्ये ऍडमिशन रिन्यू केली.. गेले २ महिने या ना त्या कारणाने राहत होतं (टाळाटाळ).. म्हटलं, बेटर लेट द्यान सॉरी आता आज पासून रोज वर्कआउट करायलाच हवा

घरात वातावरणच नाही व्यायामाचं. आई येतेय, बहीण आली आहे. अजुन १ महिना काही विचारु नका आता! (I am not even sorry! )

काल जवळपास २.५ महिन्यानंतर जिम मध्ये गेलो. ट्रेडमिल - १५ मिनिटे क्रॉस-ट्रेनर - ११ मिनिटे इनडोअर सायकल - ५ किमी/११ मिनिटे स्टेप-अप - १०*२ बर्पी - ५*२ एकूण कॅलरी बर्न - ४४५ फिलिंग एनर्जेटिक इट्स गुड टू बी बॅक आज सकाळी १० बर्पी वेल्लाभाऊ, तुम्ही ४०-४० बर्पीस कश्या मारता राव... इथे १० मारताना घामट्या निघाला

बेस्ट .......like the way this is introduced..... Will also love to take it....I have not nominated though...

१ मे - १० बर्पी २ मे - १५ बर्पी ३ मे - २० बर्पी (१८-२० करताना कठीण गेलं, आता उद्या २५ करणं खरी कसोटी ठरणारंय) ४ मे - २५ बर्पी (जमल्या! दम निघाला पण जमल्या.) ५ मे - ३० बर्पी ६ मे - ३५ बर्पी (१० नंतर १० सेकंद गॅप घेतली पण त्या दहा सेकंदात इतर वॉर्म अप सदृश व्यायाम केले, सो अ‍ॅज टू कीप मूव्हिंग कॉन्स्टंटली.) ७ मे - आराम ८ मे - ४० बर्पी ९ मे - ६० जोर, ३ मिनिट प्लँक, बुलवर्कर (हे एक उपकरण असतं ज्याने आयसोमेट्रिक प्रकारातला व्यायाम करता येतो) १० मे - काहीही नाही ११ मे - काहीही नाही १२ मे - ४५ बर्पी (हापसातून घरी यायला ११ वाजले. नो एक्स्क्यूज)

११ मे २०१७ ट्रेडमिल - १५ मिनिटे क्रॉस-ट्रेनर - ११ मिनिटे इनडोअर सायकल - ५ किमी/११ मिनिटे स्टेप-अप - १०*२ बर्पी - ५*२ एकूण कॅलरी बर्न - ४४५ १२ मे २०१७ बर्पी - ५*२ १३ मे २०१७ ट्रेडमिल - १५ मिनिटे क्रॉस-ट्रेनर - १२ मिनिटे इनडोअर सायकल - १२ मिनिटे इनडोअर रोईंग - ३०*३ स्टेप-अप - १५*२ बर्पी - ५*२ एकूण कॅलरी बर्न - ६००

बऱ्याच दिवसांपासुन काही कारणांनी मिपा पासुन लांब असल्याने प्रतिसाद देऊ शकलो नाही. तसे सायकलींग पण अधे मधे दांड्या मारत का होईना चालूच आहे. पहिल्याप्रमाणे दररोज सायकल फेरी होत नाही. साधारण एक महिन्यापुर्वी, गेल्या दोन वर्षांपासुन बंद पडलेले चालणे आणि धावणे पुन्हा एकदा चालू केले. सुरुवात अगदी तीन किमी चालण्यापासुन केली. हळुहळु अंतर एक-एक किमी ने वाढवत पाच किमी पर्यंत वाढवले. नंतर पळायला चालू केले. साडे तीन ते चार किमी चालणे व एक किमी पळणे. आठवडाभरात धावण्याचे अंतर पण वाढवले आणि सध्या तीन किमी चालणे व दोन किमी धावणे असा क्रम चालु आहे. रोज सकाळी चालणे, धावणे व दोन दिवसाआड संध्याकाळी २६ किमीची सायकल फेरी असा क्रम होता. चार दिवसांपुर्वी याला व्यायामशाळेची (जीम) जोड दिली. खरे तर व्यायामशाळेची सवय पाच वर्षांपुर्वी लागली पण यात सुद्धा दोन वर्षांपासुन खंड पडला होता. त्याआधी तीन वर्षे नियमितपणे व्यायामशाळेत जात होतो. आता पुन्हा लातूर क्रिडासंकुलवरच्या त्याच व्यायामशाळेत दाखल झालो. सुरुवात पुशअप्स, अर्धबैठका व मल्टीजिम मशीनवर हलकी वजने लावून केली आहे. यामुळे चार दिवसांपासुन सकाळी पाच वाजता उठुन साडेपाचला क्रिडासंकुलवर हजर होणे, ३ किमी चालणे, २ किमी धावणे, २२ पायऱ्यांच्या जिन्यावर चढणे उतरणे, १५ ते २० मिनिट स्ट्रेचिंग पद्धतीचे व्यायाम व साधारण अर्धा ते पाऊण तास मल्टीजिम वर सर्व अवयवांचे व्यायाम असा दिनक्रम आहे. यात दोन दिवस संध्याकाळी २६ किमी सायकल फेरी पण झाली. आता मात्र या दिनक्रमात सातत्य राखण्याचे जोरदार प्रयत्न करणार हे नक्की. अजुन एक सांगायचे म्हणजे मध्यंतरी आपले मिपाकर श्री चंबा मुतनाळ यांनी त्यांचे छायाचित्र सायकल समुहावर टाकुन एकच धूम उडवुन दिली. त्यांचे दणदणीत व्यक्तीमत्व बघून आम्ही सगळेच हबकुन गेलो. त्यामुळे सध्या आमच्या सायकल समुहाची प्रेरणा चंबा मुतनाळ सरांकडे गेली आहे व ती बहुतेक कायमची तिकडेच राहणार अशीच चिन्हे आहेत. इथुन पुढे माझ्या व्यायामाबद्दल नियमितपणे प्रतिसाद टाकत राहीन.

In reply to by चंबा मुतनाळ

तुम्ही इथे पण तुमचा फोटो टाका अन् बघा कशी खळबळ उडते. पण एक गोष्ट प्रामाणिक पणे सांगतो, तुमच्याकडे बघुन खरंच उत्साह वाढला, प्रेरणा मिळाली.

आज ३ किमी वॉकींग, २ किमी रनिंग, स्टेप्स (२२×५), स्ट्रेचिंग वगैरे १५ मिनीट, पुशअप्स ३० (५×६), दंड जाम अकडल्यामुळे ५-५ चे ६ सेट मारावे लागले. स्क्वाट्स ३० (१०×३), मल्टीजिम वर चेस्ट, बॅक, लॅटरल्स, शोल्डर्स, थाईज, काव्ह्ज, बायसेप्स, ट्रायसेप्स, आणि बारबेल्स वापरुन फोरआर्म & रीस्ट.

माझं काही मोठं शेडुल नाही हो चंबा मुतनाळ भाऊ. तुमचा 'तो' फोटो बघायची मात्र उत्सुकता आहे. १३ मे - काहीही नाही १४ मे - काहीही नाही १५ मे - ५० स्क्वॉट्स १६ मे - बुलवर्कर, ३० जोर, १*१० डंबेल वन-आर्म प्रेस, १*१० ट्रायसेप ओव्हरहेड एक्स्टेन्शन, १*१० बायसेप कर्ल , १०० स्किपिंग

In reply to by वेल्लाभट

ते ६० वर्षांचे आहेत आणि दररोज ५० पुशप, १०० स्क्वॅट, १०० सीटअप आणि बरेच काय काय करतात. सेम टू सेम हुल्क हॉगन.

१४ मे २०१७ बर्पी - ६*२ स्प्रिंट वॉक - ५.८५ किमी / १ तास, १८ मिनिटे एकूण कॅलरी बर्न - ३१४ १५ मे २०१७ स्प्रिंट वॉक - १.७२ किमी / २३ मिनिटे ओव्हरहेड पुली - १५*२ लॅटरल पुली - १५*२ फ्लॅट बेंच प्रेस - २०*२ चेस्ट फ्लाय - २०*२ शोल्डर प्रेस - १५*२ शोल्डर फ्लाय - १५*२ बायसेप्स कर्ल - २०*२ ट्रायसेप्स - २०*२ श्रग्स - २०*२ क्रॉस-ट्रेनर - ११ मिनिटे स्टेप-अप - १५*१ बर्पी - ५*१ एकूण कॅलरी बर्न - ४२७

सायकल - १६ कीमी स्क्वॅट्स - १०० पुश अप्स - ६५ (३५; ३०) प्लॅंक्स - १०५ सेकंद सिट अप्स - ११५ बर्पीज पण चालू केल्या आहेत - १० मारल्या