✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

खिडकी पलीकडचं जग भाग ७ (शेवटचा)

ज
ज्योति अळवणी यांनी
Wed, 03/22/2017 - 00:07  ·  लेख
लेख
भाग १ : http://www.misalpav.com/node/39159 भाग 2: http://www.misalpav.com/node/39179 भाग 3: http://www.misalpav.com/node/39196 भाग 4 : http://www.misalpav.com/node/39212 भाग 5: http://www.misalpav.com/node/39222 भाग 6: http://www.misalpav.com/node/39230 भाग ७ लांबच लांब बोळ होता तो. दुतर्फा दरवाजे असलेला. काळयाभोर सागवानी लाकडाचे मजबूत दरवाजे होते ते. एकूण त्या बोळात देखील मंद गुलाबी-नीळा उजेड होता. मात्र ते तिघे जसजसे पुढे जात होते तसे बोळाच्या दुतर्फा असलेले दिवे जास्त प्रज्वलित होत होते आणि ते पुढे सरकले की मंद होत होते. ते बघुन गौरीला गम्मत वाटली. तिने दादाजिंकडे बघितल. ते मात्र शांतपणे पुढे सरकत होते. तिच लक्ष पुढुन चालणा-या दादाजिंकडे गेल. त्यांची पाठच फ़क्त दिसत होती. तिची नजर सरकत सरकत खाली गेली आणि ती दचकली. त्यांच्या झग्याच्या खालूनही निळसर प्रकाश येत होता मात्र त्यांचे पायच दिसत नव्हते. ते पायाला चाकं लावल्यासारखे सरकत होते. ते पाहून ती दचकली आणि तिच लक्ष स्वाभाविकपणे ओरस च्या दादाजिंकडे गेल. तिच्या लक्षात आल की ते पण निळ्या उजेडात फ़क्त सरकत होते. तिला आठवल की तिने तिच्या खिड़कीतून जेव्हा दादाजिंना बघितल होत तेव्हासुद्धा तिला तो उजेड दिसला होता. त्यानंतर एका मागून एक घटना घडत गेल्या. तिला दादाजींनी उभ केल; त्यावेळी ती उभी राहू शकते आणि चालू शकते या आनंदात तिने दादाजींच्या चालण्याकडे लक्षच दिल नव्हत हे आता तिच्या लक्षात आल. याचा अर्थ दादाजी तिच्या सारखे किंवा ओरस सारखे चालत नव्हते... त्यांना पायाच नव्हते. फक्त होता तो निळा प्रकाश. तिला हे लक्षात आल आणि दादाजिंबद्दल मनात एक आदरयुक्त भिती निर्माण झाली. ती दादाजिंकडे वळली आणि तिने विचारल,"दादाजी तुमचे पाय असे कसे?" "गौरी मी तुला म्हंटल ना आम्ही अनेक प्रवाह बघितलेले जे आहोत ते थोड़े वेगळे आहोत. किंवा अस म्हणू की आम्ही मुद्दाम आमच्यात थोड़े बदल करुन घेतले आहेत. येणाऱ्या प्रत्येक पिढीला पूर्ण तयार करायची जवाबदारी आमची आहे. त्यासाठी आम्ही असण आवश्यक आहे. म्हणून हे बदल आवश्यक होते." दादाजीनी तिच्याकडे न बघताच पुढे सरकत तिला उत्तर दिल. त्यांच्या उत्तराने तिच समाधान झाल. मग मात्र तिने काही विचारल नाही. थोड़ चालून पुढे गेल्यावर ते तिघे थांबले. तिला आणि दादाजीना वाड्याच दार उघडणा-या दादाजीनी उजविकडे हात करून उजवा बोळ दाखवला आणि हसून हात हलवून ते निघुन गेले. गौरी आणि ओरसचे दादाजी त्या बोळात शिरले आणि दादाजिंनी समोरच्या दरवाजाची कड़ी वाजवली. दार उघडले गेले आणि दारात ओरस उभा होता. खिड़कीतून दिसायचा त्यामानाने जास्तच उंच होता तो. दिसायला मोहक होता. मजबूत बांधा आणि नुकतीच फुटलेली मिसरूड; यामुळे त्याच मुळातलं राजबिंड रूप अजूनच खुलून दिसत होतं. 'तो खिडकीतून दिसत होता त्याहून जास्त समंजस आणि मोठा वाटतो आहे,' गौरीच्या मनात विचार चमकून गेला. मात्र आत्ता तो बराच वाळला होता. किंबहुना आजारीच वाटत होता. नुकतीच फुटायला लागलेली दाढ़ी-मिशी आणि डोक्यावरचे केस सगळच् अस्ताव्यस्त होत. गौरीला बघुन त्याचे खोल गेलेले डोळे मोठ्ठे झाले. "तू???" त्याचा आवाज खोल गेला होता पण आवाजात प्रचंड आनंद होता. तिला बघुन तो खुश झाला. तिचे दोन्ही हात धरून त्याने तिला खोलीत नेल आणि समोरच्या पलंगावर बसवल. "ग...व...रि...मला माहीत होत तू येशिल. नक्की येशिल." गौरी हसली. तो ही तिच्याकडे बघून हसला. त्याचे डोळे आनंदाने चमकत होते. त्याने गौरीचे दोन्ही हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवले होते. जणूकाही त्याने हात सोडले तर ती त्याला न सांगता पळून जाईल. आणि अचानक म्हणाला,"अग पण तू म्हणाली होतीस की तू चालत नाहीस. पण मग तू इथे कशी आलीस? आणी तू तर चालते आहेस." काय उत्तर द्याव ते न सुचुन गौरी परत फ़क्त हसली आणि म्हणाली,"चालता येत मला इथे. बर ते जाऊ दे. तुला काय झाल आहे नक्की? तू असा का दिसतो आहेस? तब्बेत ठिक नाही का?" क्षणभर शांत राहून मग ओरस म्हणाला,"तुझी वाट बघत होतो ग. अग आता काही दिवसात मी पुढच शिक्षण घेण्यासाठी जाणार आहे. मग मला तुझ्या खिड़कीपर्यंत नाही येता येणार. तू अचानक त्या खिडकीत यायची बंद झालीस. मला कळेना तुला हाक तरी अशी मारू? तुझ्यापर्यंत माझा आवाज पोहोचणार नाही याची मला कल्पना होती. एकदा मी इथून गेलो की मग मी परत कधी येणार याची मला कल्पना नव्हती. जाण्या अगोदर मला एकदा तरी तुला भेटायचं होतच. पण ते कस जमेल याचाच मी विचार करत होतो. त्यामुळे थोड खाण्याकडे दुर्लक्ष झाल आणि म्हणून मी असा दिसतो आहे इतकच! मी दादाजीशी पण बोललो होतो तुला भेटायच आहे त्याबद्दल. ते तर म्हणाले तुझी इच्छा असेल तर तू पण माझ्याच बरोबर येऊ शकशील; जिथे मी जाणार आहे तिथेच.... आमच्या प्रवाहात. त्याचं बोलण एकून तर मी खूपच खुश झालो होतो ग...व....री. ते म्हणतात की तू तशीच एक एकक आहेस; माझ्यासारखि! त्यामुळे तू देखील माझ्याप्रमाणे शिक्षण घेऊन इथेच राहू शकतेस. ग...व...री.... येतेस इथे? कायमची?" ओरसच बोलण एकूण गौरी एकदम गोंधळली. तिने प्रश्नार्थक नजरेने दादाजिंकडे बघितले. दादाजी हसले. ओरसकड़े वळून ते म्हणाले,"ओरस गौरीला निघाल पाहिजे. तिने अजुन काही निर्णय घेतलेला नाही. तोपर्यंत तरी तिला तिच्या खिडकीतून परत जायला हव न." आणि दोघानाही काही जास्त बोलायची संधी न देता त्यांनी गौरीला हाताला धरून उठवल आणि ते दाराच्या दिशेने चालु लागले. गौरीला देखिल जाणिव झाली की तिला देखील आत्ता तरी नक्कीच निघायला हव. जर चुकून आई किंवा बाबा खोलीत आले आणि ती खोलीत दिसली नाही तर घाबरतील. त्यामुळे ती देखील दादाजिबरोबर निघाली. मात्र तिने मनातच ठरवलं की परतीच्या प्रवासात दादाजींकडून सगळाच खुलासा करून घ्यायचा. दाराबाहेर पड़ताना तिने ओरस कड़े वळून बघितल आणि हसत म्हंटल,"निघते ह आत्ता ओरस. पण आपण नक्की परत भेटणार आहोत. स्वतःची काळजी घे. अच्छा!" ओरस जणूकाही ती मागे वळून बघण्याचीच वाट बघत होता. तो तिच्या जवळ आला आणि अच्छा म्हणतांना तिचा हात हातात धरायच्या निमित्ताने त्याने दादाजींच्या नकळत तिच्या हातावर काहीतरी ठेवल. तिनेही दादाजींच्या नकळत ते जे काही होत ते पटकन खिशात टाकल आणि दार ओढुन घेतल. दादाजी आणि गौरी परतीच्या वाटेला लागले. गौरी सुरवात कशी करायची याच विचारात होती; पण तिने काही विचारायच्या अगोदरच दादाजी बोलायला लागले. "गौरी मला माहीत आहे तूझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाच् उत्तर देईन. प्रत्येक शंकेच निरसन करेन. पण अगोदर मी जे सांगतो ते नीट ऐक. कदाचित् मग तुला प्रश्नच पडणार नाहीत." गौरीने डोळे मोठ्ठे केले. पण काहीच बोलली नाही. दादाजी खोट बोलणार नाहीत किंवा तिला चुकीच काही सांगणार नाहीत याची आतापावेतो तिला खात्री झाली होती. ती दादाजींच् बोलण मन लावून ऐकायला लागली. "गौरी ओरस जे म्हणाला ते खर आहे. तू इथे आमच्या जगात जर आलीस तर तू त्याच्या बरोबरीने एक वेगळ्या प्रकारच शिक्षण घेऊ शकाशील. मी तुला थोड्या वेळापूर्वी सांगितल्या प्रमाणे आम्ही हे जग चालवण्यासाठीच शिक्षण काही ठराविक मुलांना देतो. त्या समूहाचा एक भाग तू देखिल असशील. मी नंतर तुझ्याशी हे बोलणारच होतो; परंतु ओरसने उल्लेख केला आहेच तर मग आत्ताच बोलण योग्य अस मला वाटत. ऐक.... मी तुला जे म्हंटल की काही प्रवाहांपूर्वी त्या जगातुन या जगात काही आले होते. मी त्यांच्यातीलच एक आहे गौरी. म्हणूनच मी तुझी भाषा इतक्या चांगल्या प्रकारे बोलू शकतो. ओरस किंवा ते दुसरे दादाजी तुझ नाव ग..व..री... अस घेतात पण तुझ्या लक्षात आल असेल की मी तुझ्या नावाचा योग्य उच्चार करू शकतो. मीच आपली भाषा इथल्या जगात जागृत केली आणि शिकवली. त्यागोदर इथे मनाच्या जोडणीतून एकमेकांशी संवाद होत असे. परंतु ही जोडणी एकाच वेळी जर दोघांशी झाली तर त्यातून अनेक गोंधळ होत असत. त्यामुळे मग मी इथे ही बोली भाषा शिकवली. आता जर तशी गरज पडली तरच मनाची जोडणी करून संवाद साधला जातो. बाकी आपल्याप्रमाणे बोली भाषाच वापरली जाते इथे देखील." अस म्हणून दादाजिंनी तिच्याकडे बघुन एक मंद हास्य केल. हे ऐकून मात्र गौरीच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. "पण मग......" गौरीने बोलायचा प्रयत्न केला. दादाजींनी हात वर करून तिला थांबवल. "माझ पूर्ण बोलण ऐकून घे गौरी मग तुझे प्रश्न विचार. कारण आपल्याकडे तसा वेळ कमी आहे. तुला तुझ्या जगात तिकडच्या पहाटेच्या अगोदर पोहोचणे आवश्यक आहे; हे विसरु नकोस." गौरीला दादाजींचे म्हणणे पटले. ती त्यांचे बोलणे एकु लागली. "तर.... मी तुमच्याच जगातला एक वैदज्ञानिक होतो. आम्ही दोन मित्र मिळून आपल्या व्यतिरिक्त जग असत का या शोधावर काम करत होतो आणि खूप मेहेनतीने आम्हाला या जगाचा शोध लागला. हे जग त्यावेळी देखील जास्त प्रगत होत. आम्ही त्यावेळी इथे अनेकदा येऊन गेलो. त्यावेळच्या इथल्या प्रगती टप्प्यावर विविध देश एकत्र करून एकसंघत्व करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. लढाया, वाद, एकमेकांचा नाश हे सर्व त्यांनी संपवून टाकायला सुरवात केली होती. आमच्या नशिबाने आमची ओळख इथल्या सरवोच्च पदस्थांशी झाली. आमची बुद्धि आणि योग्यता बघुन त्यांनी आम्हाला या जगात येण्यासाठी विचारले. कारण त्यांनादेखील त्यावेळी अशा लोकांची खूप गरज होती. त्याना हे जग शांतता प्रिय आणि भय रहित जगण्यायोग्य करायचं होत. आम्हाला दोघांनाही या सर्वच गोष्टींबद्दल उत्सुकता होती आणि अभ्यास करण्याची इच्छा होती. त्या जगात आमची भावनिक गुंतवणूक अशी नव्हती. त्यामुळे आम्ही दोघेही इथे आलो. ही झाली माझी इथे येण्याची कहाणी. आता तुझ्या मनात येणा-या प्रश्नांची उत्तरं. त्या जगातील काळापेक्षा इथला काळ दीड पटीने पुढे आहे. त्यामुळे मी इथे जन्मणा-या लोकांपेक्षा जास्त काळ जगलो. त्यामुळे जास्त शोधांमद्धे भाग घेऊ शकलो. मग मी प्रयत्न पूर्वक हळूहळू आयुष्य मर्यादा वाढवली. म्हणून मी इथले अनेक प्रवाह..... त्या जगातला काळ..... बघितला आहे. हे झाल माझ्या या जगातल्या आयुष्याबद्दल. तुझ्या मनात हा प्रश्न नक्की असेल की ओरस अस का म्हणाला की तूसुद्धा इथे येऊ शकतेस. गौरी नीट ऐक. मी शोध करत होतो; अभ्यास करत होतो. मला आणि माझ्याबरोबर काम करणा-या माझ्या मित्राला दोघांना मिळून हे जग प्रयत्न करून सापडले. त्यानंतर या जगाशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आम्हाला खूप मेहेनत घ्यावी लागली. पण तुला खूप लहान वयात अगदी सहज हे जग दिसल. आणि त्याहुनही महत्वाच् म्हणजे संपर्क तू नाही केलास; तर इथून तुझ्याशी झाला. म्हणूनच जेव्हा ओरसने मला तुझ्याबद्दल सांगितले तेव्हा मला आश्चर्य तर वाटलच पण त्याहुनही जास्त कुतूहल वाटल. मी तुझा अभ्यास केला आणि माझ्या लक्षात आल की तुझ्यात एक वेगळेपण आहे; म्हणूनच तू हे जग बघू शकते आहेस आणि तुला इथे संपर्क साधणे सहज शक्य होते आहे. गौरी ओरस म्हणाला ते खर आहे. तू वेगळी आहेस आणि तू या जगात आलीस तर त्याचा फायदा जसा तुला होईल तसाच या जगाला देखील होईल. तू जर इथे आलीस तर तुझ्या आयुष्याला एक खूप वेगळ वळण लागेल यात शंकाच नाही. परंतु हे देखिल तेवढच खर की मी इथे येण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी बराच मोठा होतो आणि माझी कुठलीही भावनिक गुंतवणूक त्या जगात उरली नव्हती. शिवाय मुळात मला असा काही शोध लागावा अशी इच्छा होती; पण माझ्या प्रयत्नांना फळ आल आणि फ़क्त शोध लागला अस नाही तर या वेगळ्या जगात येण्याची संधी मिळाली आणि ती मी घेतली. मला माहित आहे की तुझ्या वयाची त्या जगातली मूलं अजुन स्वतंत्र विचार करुन निर्णय घेतातच अस नाही. त्यात तू त्या जगात असताना तुझ्या आई-वडिलांवर पूर्णपणे अवलंबून आहेस. त्यामुळे तू नीट विचार कर. हव तर तुझ्या आई-वडिलांशी बोल. फ़क्त एकच विनंती अशी; खूप उशीर करू नकोस निर्णय घेताना. त्या जगाच्या कालमानाप्रमाणे तू ओरसशी बहुतेक फ़क्त दोन आठवडे बोलली नाहीस. पण इथे प्रवाह जवळ-जवळ चार आठवाड़े पुढे गेला आहे. हे लक्षात असू दे. दुसरी महत्वाची गोष्ट; जर तू इथे न येण्याचा निर्णय घेतलास तर माझी तुला विनंती आहे की या जगाबद्दल कधीच कुठेही वाच्यता करू नकोस. याबद्दलची माहिती फक्त तुझ्याचकडे ठेव. अजून ते जग इतकं प्रगत नाही की या जगाचा ते स्वीकार करू शकतील. त्यामुळे कदाचित् दोन्ही जागांचा ऱ्हास होईल. एवढ करशील ना गौरी?" शेवटचा प्रश्न विचारून दादाजींनी गौरीकडे बघितले. गौरीने देखील त्यांच्याकडे बघितले आणि एक मंद स्मित केले. ती दादाजीना म्हणाली,"दादाजी मी काय निर्णय घेईन ते मला देखील माहित नाही. पण मी तुम्हाला वचन देते की जर मी न येण्याचा निर्णय घेतला तर ही खिडकी मी कायमसाठी बंद करून इथून निघून जाईन आणि कधीच कोणालाही याबद्दल माहिती देणार नाही. मला तुमच म्हणण पटल आहे." बोलता बोलता दोघेही गौरीच्या घराच्या खिड़कीजवळ पोहोचले. दादाजींनी गौरीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हाणाले,"गौरी आता ओरस इथे येऊ शकणार नाही. त्याची पुढील शिक्षणाला जाण्याअगोदारची तयारी सुरु होईल. पण तू जो काही निर्णय घेशील तो मला सांग. मला हाक मार; मी लगेच तुझ्याशी संपर्क साधेन. अच्छा. तुमच्याकड़ची पहाट व्हायला लागली आहे. चल, तुला परत जायला हव." दादाजिनी गौरीला उचलून घेतल आणि एखाद फूल सहज ठेवाव तस तिला खिड़कीच्या कडेवर बसवून ते मागे सरकले. गौरीला मात्र त्या जगात जाताना जशी एक खेच जाणवली होती; तशीच काहीशी जाणीव झाली; पण आता तिला तिच्या खिडकीकडे ढकलल्यासारखे वाटले. तिने खिड़कीच्या कट्यावर बसून दादाजींच्या दिशेने पाहिले. ते खूप लांब उभे आहेत असे वाटत होते. ती घरात जाण्यासाठी वळली आणि तिच्या लक्षात आल की परत तिचे पाय निकामी झाले आहेत. तिला मोठा धक्का बसला. एव्हाना ती हे विसरून गेली होती की ती अधू झाली आहे. खूप मजेत ती दादाजिंबरोबर चालत होती. त्यामुळे क्षणभर हा बदल स्वीकारणे तिला खूप अवघड गेले. पण मग स्वतःला सावरून ती घरात तिच्या बेडवर उतरून बसली. तिने वळून खिड़कीतून बाहेर बघितल. दादाजी तिथेच उभे होते. त्यांनी हात हलवून तिचा निरोप घेतला आणि मागे वळले. गौरी बेडवर आडवी पडली. ती मनाने आणि शरीराने खूप थकुन गेली होती. त्यामुळे तिला लगेच झोप लागली. सकाळी गौरी खूप उशिरा उठली. बाबा कामावर जायला निघतच होते. आईदेखिल स्वयंपाकाला लागली होती. गौरी विचार करत होती, काल जे काही तिने अनुभवल होत ते खरच होत की स्वप्न! विचार करता करता तिचा हात सहज तिच्या खिशाकडे गेला आणि तिच्या हाताला काहीतरी कड़क दगडा सारख लागल. तिने तो गोळा बाहेर काढला. काळाभोर आणि तरीही स्वतःचा असा एक निळसर रंगाचा प्रकाश असलेला चमकणारा दगड होता तो. तो दिसता क्षणी तिला आठवलं की ओरसने ती निघत असताना जे काहीतरी तिच्या हातात ठेवलं होत ते म्हणजे हाच दगड. मग मात्र रात्रीच्या सर्व घटना ख-या होत्या याची तिला खात्री पटली. 'काय कराव? ते जग खरच आहे. दादाजी स्वतः म्हणाले की ते आपल्याच जगतले आहेत. अर्थात आपल्या जगात ते कोणत्या काळात होते ते मात्र आपल्याला माहित नाही. आता ते तिथलेच झाले आहेत; कदाचित् गेली अगणित वर्ष.' विचार करत असताना गौरीच्या लक्षात आल,'तिथे मी चालु शकते, अजुन खूप शिकु शकते.... पण तिथे आई-बाबा नसतील माझे. ते आयुष्य कस असेल ते सांगता येण अशक्य आहे. इठी माझे आई-बाबा कायम असणार आहेत माझ्याबरोबर. पण इथे या जगात मी आयुष्यभर अधुच रहाणाऱ आहे. मी रोज व्यायाम करतेच की. ते आईच् समाधान म्हणून. त्याचा फारसा उपयोग आजवर झालेला नाही. याची मला कल्पना आहे.' गौरी विचार करत बसली होती. "अग बेटा उठलीस? रात्रि झोप नव्हती का लागली? आणि अशी इतकी दमलेली का दिसते आहेस? बर नाही का वाटत तुला?" आई तिच्या जवळ बसत तिला विचारत होती. ऑफिसला निघालेले बाबा देखिल तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिथेच बसले. "मी एकदम ठिक आहे आई-बाबा. इतकी ठिक तर मी गेल्या कित्येक महिन्यात नव्हते." गौरी हसत म्हणाली. तिला हसताना पाहुन त्या दोघांना बर वाटल. "आई जर मला चालता यायला लागल तर तुला काय वाटेल ग?" अचानक गौरीने तिच्या आईला विचारल. आईच्या डोळ्यात टचकन पाणी आल. "म्हणजे? हां काय प्रश्न झाला राणी? जगातली सर्वात आनंदी व्यक्ति असेन मी. आणि मीच का तुझे बाबा देखील. अग देवाने जर मला म्हंटल की तू चल माझ्याबरोबर तुझे पाय देतो मी गौरीला; तर मी हसत जाईन त्याच्याबरोबर त्याच क्षणी."आईने उत्तर दिल. "काय ग आई काहीतरीच बोलतेस ह. बर आणि जर तुम्हाला कोणी सांगितल की तुमच्या गौरीला चालता येईल इतकंच नाही तर पुढे खूप शिकता येईल. फ़क्त त्यासाठी तुम्हाला तिला कायमच दूर पाठवाव लागेल; तर मग तूम्ही काय कराल बाबा?" गौरीने बाबांना विचारल. "बेटा, आज तू असे प्रश्न का विचारते आहेस ते मला खरच कळत नाही. पण विषय निघालाच आहे तर सांगतो. आपण जरी इथे नाशिकला आलो असलो तरी मी मुंबईच्या डॉक्टर्सच्या संपर्कात सतत आहे. त्यांच् म्हणण आहे की एक ऑप्रेशन आहे; ते केल तर कदाचित् तू चालु शकाशील. पण त्याचा ख़र्च खूप जास्त आहे. परदेशात न्याव लागेल तुला. मी पैसे जमवायला सुरुवात केली आहे. खर तर मुंबईहून इथे आलो त्याचवेळी मी आपल मुंबईच घर विकून टाकल होत आणि ते सगळे पैसे तुझ्या नावाने गुंतवून ठेवले होते. तुझे पाय कदाचित ठीक होतील अस मला डॉ बर्वेनी त्यावेळी म्हंटल होत. ज्यानी तुझी सगळी ट्रीटमेंट केली होती; त्यांना तेव्हाच थोड़ी आशा आहे अस वाटल होत.पण सगळ ठरलं तर मात्र त्यावेळी तुला एकटिलाच जाव लागणार आहे. आम्ही नसु तुझ्याबरोबर. कारण तुझ्या बरोबर येणाऱ्या व्यक्तीचा देखील खर्च असेलच न. तेवढी सोय नाही करता येणार मला. गौरी एक सांगू? बेटा आम्ही काही तुला आयुष्यभर नाही पुरणार आहोत. कधी ना कधी तुला स्वतःची काळजी घ्यावीच लागणार आहे. त्यावेळी तुला कोणाची मदत घ्यावी लागू नये किंवा तू कोणावर अवलंबून राहू नयेस म्हणून तर हे सगळे प्रयत्न करतो आहे मी. जर तुझ्या आयुष्याच् भल होत असेल न बेटा तर आम्ही तुला कधीच अडवणार नाही." बाबा बोलत होते. बाबा खूप मनापासून बोलत होते. त्याक्षणी गौरीला वाटल आपणही सर्वकाही सांगून टाकाव. पण तिने मनाला आवरल. कितीही झाल तरी दुस-या जगाच असणार अस्तित्व, तिचे तिथले अनुभव यावर कोणाचाही विश्वास बसला नसता; आणि जरी तिच्या आई-बाबांनी तिच्यावर विश्वास ठेवलाच असता तरी तिने दादाजीना शब्द दिला होता की ती त्या जगाबद्दल इथे कोणालाही काहीही सांगणार नाही. म्हणून मग तिने विषय बदलला. थोडावेळ तिच्या सोबत बसून बाबा कामाला गेले आणि आई देखील तिच्या रोजच्या कामाला लागली. पण काही केल्या गौरीच्या मनातले विचार जात नव्हते. एकीकडे एका उत्तम सुदृढ़ सक्षम आयुष्य त्या जगात तिची वाट बघत होत आणि दुसरीकडे या जगात आई-बाबांची भावनिक गुंतवणूक होती. काय कराव काही केल्या तिला सुचत नव्हतं. गौरी सतत विचार करत होती. ती दिवसभर अस्वस्थ आहे हे आईच्या लक्षात आले. मग त्या दिवशी ती शेजारच्या काकुंकडे नाही गेली. मुद्दाम गौरीला घेऊन त्यांच्या पुढील दाराजवळच्या गॅलरीमद्दे बसली. दोघीजणी गप्पा मारत होत्या. समोरच्या झाडावर एक माकडीण तिच्या पिल्लाबरोबर बसली होती. ती पिल्लच लक्ष नसताना अचानक कुठेतरी गेली. आई जवळ नाही हे पाहुन ते पिल्लू कावर-बावर झाल. ते बघुन गौरीला वाईट वाटल. ती आईला म्हणाली,"बघ ग आई, बिचा-या पिल्लाला एकट सोडून ती माकड़ीण निघुन गेली." ते ऐकून गौरीची आई हसली. म्हणाली,"बेटा कोणी कोणाला आयुष्यभर पुरत नसत. ज्याने-त्याने आपापला मार्ग शोधायचा असतो. चिंता करु नकोस. थोडावेळ ते पिल्लू गोंधळेल; पण मग आपला मार्ग बरोबर शोधेलच. हा निसर्ग नियमच आहे गौरी." "आई, म्हणजे हा नियम सर्वानाच् लागू होत असेल का?" गौरीने आईकडे बघत विचारले. तिच्या मनात काय चालु आहे याची अजिबात कल्पना नसलेल्या आईने सहज शब्दात उत्तर दिले,"हो बेटा. हे जग असच चालत. ती कविता आहे न.... जन पळभर म्हणतील हाय हाय.... किती योग्य शब्दात त्यांनी सत्य मांडल आहे. या जगात कोणीही कोणासाठी थांबत नाही बेटा. आज सकाळी बाबांनी देखील हेच सांगितल न तुला. तू तुझ्या पायावर उभं रहावस ही आमची मनापासूनची इच्छा आहे. कारण आमच्या नंतर देखील तुला तुझ आयुष्य जगायचं आहेच न बेटा." आई जे सांगत होती ते गौरी मन लावून एकत होती. त्यावर ती काहीच बोलली नाही. थोड्या वेळाने बाबा आले. सगळ विसरून गौरी बाबांच्या गळ्यात पडली. तिघानी नेहेमीप्रमाणे एकत्र जेवण घेतल. खूप वेळ गपा मारत बसले होते ते. रात्र वाढत होती पण गौरीच्या गप्पा संपत नव्हत्या. शेवटी बाबा म्हणाले,"गौरी बेटी झोप आता. काल रात्रिदेखिल तू नीट झोपली नव्हतीस न." गौरीने हसून बर म्हंटल. आई दिवा मालवण्यासाठी उठली. गौरीने आईचा हात धरला आणि तिला जवळ बोलावून तिच्या गालावर ओठ टेकवले. आईने तिला कुशीत घेतल आणि कुरवाळल. "झोप ह बेटा स्वस्थ." अस म्हणून आणि तिला कपाळाच चुंबन घेतल. बाबा देखिल उठले आणि गौरीच्या डोक्यावरून हात फिरवून त्यांच्या खोलीत गेले. "आज वारा चांगलाच सुटला आहे नाही हो? कधीची वा-यावरून एक वेगळीच अशी शीळ एकु येते आहे. अगदी कोणीतरी सतत साद घालत असल्यासारखी." गौरीची आई खोलीत येत म्हणाली आणि तिने दिवा मालवला. दिवा मालवताना एक क्षण तिला वाटल की गौरीच्या खोलीत काहीतरी हालचाल झाली आहे, पण मग वाऱ्यामुळे झाडांची सावली हलत असेल अस मनात येऊन ती स्वतःशीच हसली आणि आडवी पडली. ........ सकाळी बराच वेळ झाला तरी गौरीच्या खोलीतून काहीच हालचाल जाणवली नाही."बर नाही की काय पोरीला..." अस म्हणून गौरीचे बाबा तिच्या खोलीत शिरले. परंतु गौरी तिच्या पलंगावर नव्हती. तिची व्हील चेअर देखील तिथेच होती. ते बघून बाबा गोंधळले आणि तिच्या पलंगाजवळ गेले......... तिच्या पलंगावर एक काळाभोर दगड आपल्या निळसर तेजाने चमकत असलेला बाबांना दिसला. बाबांनी तो दगड हातात घेतला आणि गौरीला हाक मारली...."गौरी..... बाळा......" पण गौरीच्या बाबांना कल्पना नव्हती पण गौरी तिच्या खोलीतच काय .... या जगातच नव्हती..... तिने तिचा निर्णय घेतला होता! एका सुदृढ आणि सक्षम आयुष्याचा!!!!! समाप्त ----------------------------------------

Book traversal links for खिडकी पलीकडचं जग भाग ७ (शेवटचा)

  • ‹ खिडकी पलीकडचं जग भाग 6
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा

प्रतिक्रिया द्या
4118 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

गौरीचे नवीन जगातले अनुभव आणि

ज्योति अळवणी
Wed, 03/22/2017 - 00:11 नवीन
गौरीचे नवीन जगातले अनुभव आणि पुढे तिच्यात आणि तिच्या आयुष्यात होणारे बदल, ती तिच्या आई-वडिलांकडे परतते का? तिने घेतलेले निर्णय... ही कथा लिहिण्याचा मानस आहे. तुमचं याविषयीचं मत जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments

<!--break-->येस प्लीझ. <!-

आनन्दा
Wed, 03/22/2017 - 09:25 नवीन
येस प्लीझ. तसाही हा शेवट अर्धवट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी

हो हो.. नक्कीच लिहा.. शिवाय

मराठी कथालेखक
Wed, 03/22/2017 - 12:15 नवीन
हो हो.. नक्कीच लिहा.. शिवाय त्यावेळी तुम्हाला त्या जगाचे अधिक तपशील रंगवावे लागतील जे वाचायला नक्कीच आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी

गौरीचे आईबाबा जर इतके समंजस

विनिता००२
Wed, 03/22/2017 - 09:51 नवीन
गौरीचे आईबाबा जर इतके समंजस आहेत, तर गौरीने त्यांना विश्वासात घेवून मग जायला हवे होते. असे मला वाटते. कथा छान :)
  • Log in or register to post comments

गौरीने त्यांना विश्वासात घेवून मग जायला हवे होते. असे

सुचेता
Wed, 03/22/2017 - 13:02 नवीन
मलाही वाटले, अचानक गौरी दिसेनाशी झाल्यावर त्यांचे काय होइल याचा विचार कराय्ला हव्वा तिन
  • Log in or register to post comments

कथा छान आहे. थोडी रेंगाळली,

एस
Wed, 03/22/2017 - 13:05 नवीन
कथा छान आहे. थोडी रेंगाळली, पण लिहीत रहा. पुलेशु.
  • Log in or register to post comments

पुढची गोष्ट वाचायला आवडेल

बरखा
Wed, 03/22/2017 - 13:33 नवीन
गौरीचे नवीन जगातले अनुभव आणि पुढे तिच्यात आणि तिच्या आयुष्यात होणारे बदल, ती तिच्या आई-वडिलांकडे परतते का? तिने घेतलेले निर्णय... ही कथा लिहिण्याचा मानस आहे. तुमचं याविषयीचं मत जाणून घ्यायला आवडेल. या पुढे काय घडल हे जाणुन घ्यायला आवडेल. जस गौरी पण आई बाबांना अधुन मधुन दिसते. त्या जगातील गौरीच कार्य...
  • Log in or register to post comments

उत्कंठा वाढत गेली

सिरुसेरि
Sat, 03/25/2017 - 12:42 नवीन
पहिला भाग वाचताना या http://www.misalpav.com/node/34780 कथेची आठवण आली . अर्थात , पुढच्या भागांपासुन उत्कंठा वाढत गेली . छान कथामाला .
  • Log in or register to post comments

भन्नाट कथा.....

Jabberwocky
Wed, 03/29/2017 - 10:28 नवीन
भन्नाट कथा. तुम्ही पुढेही या कथेचे अनेक भाग लिहावेत असं वाटत आहे. एक छानशी sci-fi कथा निर्मिती होऊ शकेल. अगदी गौरीलाच ते जग का दिसलं ?, तीच वेगळेपण, त्या जगात गेल्यानंतर चे तिचे अनुभव, पुन्हा तीच घरी येन, दोन मितीमधलं जग, त्या जगाचे एकमेकांच्या संपर्कात येन, त्यातून निर्माण होणार संघर्ष आणि गौरीच नायिकेच्या कॅरॅक्टर मध्ये हे सगळं हाताळणे. कथेला सायन्सची उत्तम जोड दिलीत तर हि कथा मराठीमधली एक वाचनीय कादंबरीची मालिका होऊ शकेल. पहा प्रयत्न करून बाकी सगळा मी. पा. परिवार तुम्हाला मदत करेलच.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा