डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे ‘प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती’
‘प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती’
डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे ‘प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती’ हे पुस्तक नुकतेच वाचले. भारतासारख्या देशाचा मोहेंजोदडो - हडप्पा काळापासून मुसलमान आक्रमक भारतात येईपर्यंतच्या विशाल कालखंडाचा अतिशय अभ्यासपूर्ण इतिहास सरांनी या पुस्तकात मांडलाय. विशेषतः अतिशय तुटपुंज्या ऐतिहासिक साधनांची उपलब्धता आणि ऐतिहासिक काळापासूनच एकंदरीत भारतीय समाज इतिहासाविषयी आणि त्याच्या नोंदी करण्याविषयी उदासीन असताना परिश्रमपूर्वक, विविध संशोधनातील तुकडे जोडत जोडत, शक्य तेवढा एकसंध इतिहास मांडायचा हे फार महान काम आहे.
पुस्तक वाचल्यानंतर काही गोष्टी मांडाव्याशा वटतात. यामध्ये काही नवीन विचार मांडतोय असे नाही, केवळ नोंद घ्यावी एवढेच आहे. ज्याला रस असेल त्याने घ्यावे, नाही त्यांनी सोडून द्यावे.
1. भारतीय संस्कृती (सध्याच्या प्रचारकी अर्थाने हिंदू संस्कृती) फार महान होती, पुढारलेली होती, अतिप्रगत होती असे दावे आजचे अतिराष्ट्रवादी करतांना दिसतात. या विषयी असे म्हणता येईल की अध्यात्मिक विचार, तत्वज्ञान आणि आरोग्य (आयुर्वेद आणि योग) या क्षेत्रात भारतीय संस्कृती तत्कालीन जगाच्या तुलनेत नक्कीच महान होती, एवढेच ऐतिहासिक पुराव्यांवर मान्य करता येईल.
2. या व्यतिरिक्त विज्ञान, शास्त्र, तंत्रज्ञान इत्यादी बाबतीत पुढारलेपणाचे, प्रगतीचे काहीच विशेष पुरावे सापडत नाहीत. धातूशास्त्र महान होते आणि अशोक स्तंभ अजूनही न गंजता (२३०० वर्षे) उभा आहे हे जरी खरे असले तरी ती धातुविद्या इतरत्र कुठेही दिसत नाही, आढळून येत नाही, पुढे अजून प्रगत झाली नाही अथवा कोणतेही लिखित पुरावेही नाहीत. या उलट अधिक चांगल्या धातूंच्या शस्त्रास्त्रांनी युक्त परकीय आक्रमकांनी हलक्या धातूंच्या शस्त्रास्त्रांनी लढणाऱ्या भारतीयांचा पराभव केला असाच मागील बाराशे वर्षांचा इतिहास आहे.
3. मुसलमान आक्रमकांनी सगळे ज्ञान नष्ट केले असे सांगितले जाते. तरीही सदर आक्रमणाच्या आधीच्या महत्वाच्या विद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या विषयांची तपशीलवार माहित अनेक ग्रंथात उपलब्ध आहे, त्यामध्येही महान ज्ञानाचे पुरावे सापडत नाहीत. मूळ संस्कृत ग्रंथ अनेक भाषांमध्ये भाषांतरित होत होते आणि शेकडो वर्षे दक्षिण भारतात आणि जावा सुमात्रा वैगेरे पूर्व आशियात नेले जात त्यामध्ये देखील असे पुरावे सापडत नाहीत.
4. आधुनिक शास्त्रांपैकी खगोल आणि गणित एवढीच महत्वाची शास्त्रे शिकवली जायची (आयुर्वेद सुद्धा). परंतु मानवी जीवन ज्या क्रांतिकारी शोधांमुळे झपाट्याने मध्ययुगातून आधुनिक युगात प्रगत झाले त्या वाफेचे इंजिन, वीज, भौतिकशास्त्र, यंत्रशास्त्र, जंतूसंसर्ग आणि आरोग्य शास्त्र यांचा भारताला ना तेव्हा शोध लागला होता ना नंतर लागला. बाकी महान ज्ञानाचे इतर सर्व विषय म्हणजे वेद-पुराणे-उपनिषदे-महाकाव्ये-मीमांसा, धर्मचर्चा, वेदपाठशाळेतील शिक्षण आणि थोडे भाषा व्याकरण आणि कला विषय एवढेच होते.
5. तक्षशिला हे वैदिक धर्माचे मोठे विद्यापीठ आणि ग्रंथालय होते (सध्याच्या पाकिस्तानात) आणि ते हुण आक्रमकांनी नष्ट केले, मुसलमानांनी नाही.
6. नालंदा हे बौद्ध धर्म आणि तत्वज्ञानाचे विद्यापीठ होते, वैदिक हिंदूंचे नव्हे. ते मुसलमान (बखत्यार खिलजी) आक्रमकांनी नष्ट केले, जाळून टाकले.
7. भारतीय संस्कृतीवर बौद्ध धर्माचा आणि बौद्ध तत्वज्ञानाचा खूप मोठा प्रभाव आहे. किंबहुना सध्याची भारतीय म्हणवली जाणारी संस्कृती ही वैदिक, इस्लाम, जैन आणि बौद्ध संस्कृतीचा मिलाफ आहे.
8. शिल्लक प्राचीन मंदिरे, धर्म, चातुर्वर्ण्य आणि जातिसंस्था एवढेच आपल्या महान संस्कृतीचे अवशेष आज शिल्लक आहेत.
9. महानतेचा केवळ बाता करत राहणे ही स्वतःशीच नव्हे तर राष्ट्राशी केलेली प्रतारणा आहे. तुटपुंज्या, क्षूद्र आणि तात्कालिक स्वार्थासाठी असा प्रचार करत रहाणे म्हणजे पुढच्या पिढीची ठरवून केलेली दिशाभूल आहे, फसवणूक आहे. या उलट खरे मानवतावादी आचार-विचार काय, त्यापैकी आपल्याकडे काय आहे आणि आपल्याला कुठे जायचे आहे याची जाणीव पुढील पिढीला करून देणे जास्त महत्वाचे वाटते.
PS: - बाकी सर्व राजवंश आणि घराण्यांचा तपशीलवार इतिहास पुस्तकात आहे पण ज्या 'भोज राजाने' महाराष्ट्रातील सगळे किल्ले बांधले असे सांगितले जाते त्याचा मात्र कुठेच उल्लेख नाही हे खटकते.
याद्या
3345
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
वृत्तीही बदलायला हवी. सगळ्या
खरे आहे...
In reply to वृत्तीही बदलायला हवी. सगळ्या by कंजूस
निसटत्या बाजू
सांस्कृतीक परंपरा
In reply to निसटत्या बाजू by माहितगार
आधुनिक शास्त्रांपैकी खगोल आणि
संस्कृत ग्रंथ हे
वाचून भाष्य करणे अधिक संयुक्तिक होईल
वाचून भाष्य करणे अधिक संयुक्तिक होईल
प्राचीन संस्कृतीचे अवशेष
गा. पै.
In reply to प्राचीन संस्कृतीचे अवशेष by गामा पैलवान
===== बाकी सर्व राजवंश आणि
1. भारतीय संस्कृती (सध्याच्या