Skip to main content

कधी थांबणार हा क्रूरपणा???????

लेखक श्रीगुरुजी यांनी शुक्रवार, 20/01/2017 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
काय वेडेपणा चाललाय! सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली जालिकट्टू नावाची क्रूर प्रथा पुन्हा एकदा सुरू करावी यासाठी तामिळींचा जीव चाललाय. काही ठिकाणी बंदी झुगारून जालिकट्टू आयोजित करण्याचे प्रयत्न झाले. पण पोलिसांनी ते हाणून पाडले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम् यांनी तर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झुगारून जालिकट्टू पुन्हा सुरू करण्याचा अध्यादेश काढावा अशी विनंती करण्यासाठी थेट दिल्ली गाठून पंतप्रधान मोदींची भेट घेतली. सर्वात वाईट भाग म्हणजे संगीतकार रहमान, माजी जागतिक बुद्धीबळ विश्वविजेता विश्वनाथन् आनंद याने सुद्धा जालिकट्टू पुन्हा सुरु करण्यासाठी पाठिंबा दिलाय. ही आमची अत्यंत जुनी परंपरा आहे, आम्ही ती चालू ठेवणारच, आमच्या परंपरेवर बंदी घालण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला कोणी दिला अश्या आविर्भावात निदर्शने सुरू आहेत. जालिकट्टू तामिळींच्या जीवनमरणाचा प्रश्न झाला आहे. जुनी परंपरा, प्रथा इ. गोष्टी खर्‍या असल्या तरी असल्या प्रथेत मुक्या प्राण्याचा छळ होतोय त्याचं काय? ते बैल काय स्वतः यातना सहन करून तुमची करमणू़क करण्याकरता या जगात आलेत का? एका वाहिनीवर दाखवित होते. एका बैलाभोवती सातआठ लुंगीधारी उभे होते. त्यातला एकजण बैलाची शेपटी ओढून जोरात पिरगाळत होता. दुसरा एकजण शेपटी दाताखाली धरून चावत होता. अरे कशासाठी त्या बैलाला यातना देता? परंपरा आणि प्रथा म्हणून? ही कसली क्रूर परंपरा? मुक्या प्राण्याला यातना देऊन कसली आलीय करमणू़क आणि प्रथा? अंगात एवढी मस्ती असेल तर एकमेकांशी फ्रीस्टाईल कुस्त्या खेळा की. प्राण्यांचा छळ का करता? स्वतःच्या जिव्हालौल्यासाठी व करमणुकीसाठी मुक्या प्राण्यांना यातना देऊन त्यांचा छळ करण्याची प्रथा व परंपरा खूप जुनी आहे व जगात अनेक देशात ती अजून जिवंत आहे. स्पेनमध्ये बुलफाईट प्रकारात एका बैलाला गल्लीबोळातून पळविले जाते. अनेक जण बैलाच्या मागे पळून त्याला जखमी करायचा प्रयत्न करीत असतात. बैल पळताना बाजूला उभे असलेले बघ्ये बैलाला छोटे बाणाच्या आकाराचे लोखंडी भाले फेकून मारतात. अंगात ठिकठिकाणी भाले घुसलेला तो बैल शेवटी बुलफाईटच्या मैदानात येतो. तिथे तलवारी घेऊन तीनचार जण त्याला तलवारीने जखमी करतात. शेवटी मुख्य मॅटॅडोर येतो व जीवाच्या भीतिने आकांताने धावून थकलेल्या, तलवारीच्या वारांमुळे व अंगात घुसलेल्या भाल्यांच्या जखमांच्या यातनांनी कळवळणार्‍या बैलाचे मस्तक तो तलवारीच्या एका घावात घडावेगळे करतो. जमलेले हजारो प्रेक्षक या मुक्या प्राण्याच्या यातनामय कत्तलीचा आनंद लुटत असतात. मुक्या प्राण्याला इतक्या यातना देताना आनंद कसा मिळू शकतो? वेदनांनी कळवणार्‍या बैलाच्या वेदनांनी करमणूक कशी होऊ शकते? भारत देखील या घॄणास्पद प्रकारापासून दूर नाही. शेतीसाठी बैल वापरण्याआधी मोठ्या दांडक्याने बैलाचे वृषण चेचून भुगा करून टाकतात जेणेकरून तो गायीबरोबर आपले नैसर्गिक कृत्य करू शकणार नाही. माणूस त्याची नैसर्गिक उर्मीसुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी नष्ट करतो व तीसुद्धा अत्यंत वेदनादायक पद्धतीने. उर्मिला पवार यांच्या 'आयदान' पुस्तकात बैलाच्या खच्चीकरणाचे वर्णन दिले आहे. दांडक्याने वृषण चेचले जात असताना बैलाला किती यातना होत असतील. माणूस त्याला एवढ्या यातना का देतो? बैलाचे वृषण खच्ची करण्याचे काम करणार्‍या नराधमाचे वृषणही असेच चेचून काढले पाहिजेत म्हणजे त्याला त्या यातना कशा असतील ते कळेल. बैलगाडीला जोडण्यासाठी बैलांच्या तळपायात खिळे ठोकून नाल बसवितात. नाल बसविण्यासाठी आधी बैलाला खाली बसवून आडवे पाडतात व त्याचे चारही पाय बांधून मग खिळे ठोकून नाल बसवितात. नाल बसविताना बैलाच्या डोळ्यातून वेदनांनी पाणी वाहत असते. कशासाठी हा क्रूरपणा? मला कधी कधी वाटते की बैलांच्या तळतळाटामुळेच कदाचित शेतकर्‍यांची हलाखीची परिस्थिती असावी. आपल्याला यातना देणार्‍याला बैलांचे शिव्याशाप भोवत असतील. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये झालेली'पारंपारिक' मेंढ्यांची टक्कर दाखवित होते. जमलेले प्रेक्षक दोन मेंढ्यांच्या आपापसातील टकरीचा आनंद लुटत होते. दोन्ही मेंढे आपल्या पूर्ण ताकदीनिशी दुसर्‍याच्या कपाळावर जोरदार धडक मारत होते. दोघांनाही वेदना होत असणारच. कदाचित कपाळाची हाडेही मोडत असतील. आणि असल्या क्रूर प्रकाराचा प्रेक्षक आनंद लुटत होते. काही ठिकाणी कोंबड्यांची झुंज सुद्द्धा लावतात. या झुंजीत कोंबड्याच्या एका पायाला ब्लेडचा अर्धा तुकडा बांधलेला असतो जेणेकरून समोरच्या कोंबड्याचे रक्त निघेल. दोन्ही कोंबडे मूर्खासारखे एकमेकांशी लढाई करून जखमी होतात व माणसे आपली करमणूक करून घेतात. बैलगाडी शर्यत हा असाच एक क्रूर प्रकार. सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराला सुद्धा बंदी घातली आहे. तरीसुद्धा बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करावी यासाठी महाराष्ट्रात जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या शर्यतीतही बैलांना जोरात पळविण्यासाठी शेपटी पिरगाळणे, खिळा लावलेल्या चाबकाचे फटकारे लावणे असे क्रूर प्रकार केले जातात आणि वेदना होत असताना भीतिने बैल जोरात गाडी पळवितात कारण आपली उच्च प्रथा आणि परंपरा! नवसासाठी व धार्मिक परंपरेसाठी कोंबड्या, बकर्‍या कापणे हा प्राण्यांना यातना देण्याचाच एक प्रकार. हे बळी थांबावेत म्हणून संत गाडगेबाबांनी प्रबोधन करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु अजूनही हा प्रकार सुरूच आहे. मांग जातीत एखाद्याचे लग्न ठरताना किंवा त्याआधी काही वर्षे लग्नासाठी नवर्‍यामुलाच्या नावाने एक डुक्कर सोडले जाते. ऐन लग्नाच्या वेळी हे डुक्कर पकडून त्याला जिवंत जाळून त्याचे मांस खाल्ले जाते. जिवंत जळताना त्या डुकराला किती भयानक वेदना होत असतील. प्रथा व परंपरा या नावाखाली हे क्रूर प्रकार कायमच सुरू राहणार का? जिव्हालौल्यासाठी जिवंत प्राणी क्रूर पद्धतीने मारणे हे जगभर सर्वत्र केले जाते. कासव, शिंपले, बेडूक, खेकडे इ. प्राण्यांना जिवंतपणीच उकळत्या पाण्यात टाकणे, बदक/हंस इ. प्राण्यांची आत असलेली मान बाहेर काढण्यासाठी त्याच्या तोंडासमोर खाणे धरणे व खाणे खाण्यासाठी त्याने मान सरळ केल्यावर मानेवर घाव घालून त्यांना मारणे अशा क्रूर पद्धतीने हे प्राणी जिभेचे चोचले पुरविण्यासाठी मारले जातात. अरे प्राणी मारायचा असेल तर निदान त्या प्राण्याला भूल देऊन वीजेचा शॉक देऊन वेदनारहीत मरण तरी द्या. हालहाल कशाला करता? मुक्या प्राण्यांना प्रथा व परंपरेच्या नावाखाली आपल्या करमणुकीसाठी व जिव्हालौल्यासाठी वेदना, यातना देऊन त्यांचा छळ करणे व नंतर मारून टाकणे हे अत्यंत क्रूरकर्म आहे व या प्रकाराचा मला अतिशय संताप येतो. हे सर्व प्रकार तातडीने कायमस्वरूपी बंद व्हायला हवेत. सुदैवाने सर्वोच्च न्यायालय याविषयी सक्रीय असून या प्रकाराला कायद्याने बंदी घालण्यात येत आहे ही समाधानाची गोष्ट आहे.

वाचने 74908
प्रतिक्रिया 282

प्रतिक्रिया

In reply to by अस्वस्थामा

माझ्या प्रतिसादात कोणताही विरोधाभास नाही. हेल्मेट वापरणे किंवा न वापरणे, क्रिकेट खेळणे किंवा न खेळणे याचा निर्णय घेण्याची बुद्धी व तो घेण्याचा हक्क मानवाला आहे. अशी बुद्धी व निर्णय घेण्याचा हक्क बैलाला किंवा इतर प्राण्यांना दिलेला नाही. त्यामुळेच माणसांनी हेल्मेट वापरणे किंवा न वापरणे आणि जालिकट्टूमध्ये बैलांना पळविणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. या प्रकारात बैलांना न पळण्याचा पर्यायच दिलेला नसतो आणि त्यांनी पळावे यासाठी त्यांचा छळ केला जातो. त्यात जमलेल्या प्रेक्षकांचा किंवा बैलांना लोंबकळणार्‍या माणसांचा मृत्यु होणे किंवा ते जखमी होणे हे जालिकट्टू बैलांप्रमाणेच माणसांसाठीही धोकादायक आहे याचे निदर्शक आहे.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी, कधी कधी हद्द करता राव. म्हन्जे इथे प्रतिसाद वाचत नाही आहात की वेड पांघरुन पेडगावला जायचे बघत आहात ? तरी आता एक शेवटचा प्रयत्न, १. (परत एकदा : बैल, पेटा, मोदी मध्ये आणू नयेत. तुमच्या व्यक्तींच्या निर्णयस्वातंत्र्यासंदर्भातल्या कॉन्ट्रॅडिक्टरी मतांबद्दल हे दोन्ही प्रतिसाद होते. ) इथे व्यक्ती हे मानव म्हणून अपेक्षित असताना तुम्ही सलग दुसर्‍या प्रतिसादात बैलांबद्दल परत परत तेच सांगण्याचं काय प्रयोजन ? २. बैलांना चॉइस नसणं, त्यांचा छळ होणं आणि म्हणून तुमचा विरोध समजून घेतलाय तो दहावेळा सांगून नवीन काहीही सिद्ध होत नाही. तेव्हा परत एकदा "बैल, पेटा, मोदी मध्ये आणू नयेत. तुमच्या व्यक्तींच्या निर्णयस्वातंत्र्यासंदर्भातल्या कॉन्ट्रॅडिक्टरी मतांबद्दल हे दोन्ही प्रतिसाद होते." ३. आता धोके माहित असून आणि दर वर्षी अमुक इतके लोक जखमी होतात, मरतात हे माहित असून जर व्यक्ती हेल्मेट घालत नसेल, क्रिकेट खेळत असेल अथवा इतर कुठला साहसी खेळ प्रथा-परंपरेच्या नावावर खेळत असेल तर त्या व्यक्तीला तो निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार व स्वातंत्र्य असावे, हे तुमचे म्हणणे नाही का ? की इथेच तुमच्या नव्या मताच्या आड येतंय म्हणून थोडक्यात 'हो बाबा, असं मत होतं पण आता बदललंय' हे असं कबूल करावंसं वाटत नाहीय ? अजून काही मला विस्कटून सांगता येणार नाही तेव्हा या नंतर जरी तुम्हाला मुद्दा लक्षात आला नसेल तर तुमचे बैल-बैल चालू द्यात. आमचा नमस्कार.

In reply to by अस्वस्थामा

पुन्हा तेच. इथे मुख्य मुद्दा बैलांवर होणार्‍या अत्याचाराचा आहे.
३. आता धोके माहित असून आणि दर वर्षी अमुक इतके लोक जखमी होतात, मरतात हे माहित असून जर व्यक्ती हेल्मेट घालत नसेल, क्रिकेट खेळत असेल अथवा इतर कुठला साहसी खेळ प्रथा-परंपरेच्या नावावर खेळत असेल तर त्या व्यक्तीला तो निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार व स्वातंत्र्य असावे, हे तुमचे म्हणणे नाही का ? की इथेच तुमच्या नव्या मताच्या आड येतंय म्हणून थोडक्यात 'हो बाबा, असं मत होतं पण आता बदललंय' हे असं कबूल करावंसं वाटत नाहीय ?
जालिकट्टूत भाग घ्यायचा का नाही हा त्यात भाग घेणार्‍या माणसांचा वैयक्तिक निर्णय आहे. आपली तारतम्य बुद्धी वापरून त्यांनी तो निर्णय घ्यावा. तो निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार व सातंत्र्य आहे. माझे हेल्मेट परिधान करण्याबद्दल जे मत आहे तेच इथे सुद्धा आहे. त्यात बदल नाही. परंतु तो दुय्यम मुद्दा आहे. मुख्य मुद्दा बैलांवर होणार्‍या अत्याचाराचा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

तसं असेल तर या प्रतिसादात किती मेले आणि किती जखमी झाले याबद्दल लिहिण्याचं प्रयोजन उरत नाही. तो तुमचा दांभिकपणा ठरतो असं वाटतं.. (हेल्मेटसक्तीच्या वेळेस आकडेवारी बजूस ठेवायची, आत्ता मात्र वापरायची ) तुमच्या वरच्या प्रतिसादात सिद्ध झालेल्या मतानुसार व्यक्तींना सहभागाचे निर्णयस्वातंत्र्य असेल तर किती माणसं मेली अथवा जखमी झाली याचा तुम्हाला फरक पडू नये (हेच हेल्मेट विना जखमी/मृत होणार्‍यांबद्दल तुमचे मत आहे ). तुम्ही फक्त बैलांची काळजी करावी आणि त्यासंदर्भातलीच आकडेवारी मांडून हळहळ व्यक्त करावी अथवा मुद्दे मांडावेत, तेच तुमच्या आत्तापर्यंतच्या भुमिकेशी आणि म्हणण्याशी सुसंगत राहील असं वाटतं. अजूनही तुम्हाला विरोधाभास स्पष्ट झाला नसेल तर ते झोपेचे सोंग ठरेल. असो. आमचा पूर्णविराम.

In reply to by अस्वस्थामा

जालिकट्टू हे फक्त बैलांसाठी हानिकारक नसून ते माणसांसाठी सुद्धा हानिकारक आहे हे सांगण्यासाठी ती माहिती दिली होती. त्यात दांभिकपणा किंवा विरोधाभास अजिबात नाही.

In reply to by श्रीगुरुजी

http://www.thehindu.com/news/cities/chennai/Jallikattu-Police-crackdown… जालिकट्टूमुळे आज अजून एकाचा मृत्यु झाला (कालपासून ३ जणांचा मृत्यु झाला आहे). हरकत नाही. कितीही मेले तरी चालतील. आपली उच्च संस्कृती व परंपरा जिवंत राहिली पाहिजे.

गुरुजी, दूध व्यवसायाबद्दल आपला काय विचार आहे? त्यातही क्रौर्य आहेच की... गाई कुठे लिहून देतात काय आमचे दूध काढा म्हणून..? प्राण्यांसोबतचे मनुष्याचे व्यवहार हे मनोरंजन, जिव्हालौल्य यासाठी नको आणि भुकेल्या पोटासाठी मात्र चालेल अशी काही रेषा आपण आखली आहे काय?

In reply to by संदीप डांगे

प्रश्न बरोबर आहे. याविषयी जरा अधिक माहिती घेऊन नंतर उत्तर देईन. पूर्वी वाचण्यात आले होते की दुभत्या जनावरांचे दूध नियमित काढले नाही तर त्यांना काही विशिष्ट प्रकारचे आजार होतात. यात तथ्य आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

दुभत्या जनावरांचे दूध नियमित काढले नाही तर त्यांना काही विशिष्ट प्रकारचे आजार होतात. यात तथ्य आहे का?
कोलमडलेल्या युक्तीवादासाठी असल्या ठिसूळ तर्काचा आधार घ्यायची गरज नाही गुरुजी. नियमित दूध काढण्याची पद्धत सुरू होऊन दोन-पाच हजार वर्षे झाली असतील त्या आधी कोण नियमित दूध काढत असेल जेणेकरुन आजार न होता ही जनावरे धष्टपुष्ट राहून मनुष्याच्या हाती पडलीत... दोन-पाच हजार वर्षे कशाला राना-जंगलात अजूनही लाखोच्या संख्येने सस्तन प्राणी आहेत की... त्यापैकी कोणाला कसले आजार होत असतील तर प्राणीजगत असेच नष्ट होऊन जाईल.. हां, एक मात्र खरे, 'भूतदया' हा सोयीचा आजार आहे मनुष्याचा... :-)

In reply to by संदीप डांगे

खरं तर विषय भरकटतोय. पण इथे काहीतरी लिहिलंय या विषयावर. https://www.google.co.in/amp/s/pghvegan.wordpress.com/2012/04/25/cows-h…

In reply to by श्रीगुरुजी

सॉरी गुरुजी, पण परत एकदा गडबड दर्शवून देतो. दूधासाठी गाईंवर एकामागे एक जबरदस्तीने लादलेली मातृत्वं (आणि त्यासाठीचे जबरदस्तीचे संग इ.इ.) तुम्हाला मान्य आहेत आणि बैलाना चाप लावलेला (आजकाल पशुवैद्यकाद्वारे आयुष्यात एकदाच होणारं अनैच्छिक नसबंदीचं कार्य) मात्र तुम्हाला इतक्या वेदना देतो ? भूतदयेत पण सोईनुसार होणारे भुमिकाबदल गमतीशीर असतेत इन जनरल .. त्या लेखातली ही दोन वाक्ये पाहिली असतीलच,
If we truly care about the welfare of the cow, the best way to alleviate their pain is not to milk them, but rather to not continue breeding them.
आणि हे पण,
If one is buying milk with the belief that they need to be milked and this contributes to the cow’s welfare, one must also recognize that they are condemning a male calf to a beef, or more likely, veal farm. As previously stated, all animals in this system are economic commodities. When that cow stops producing milk, it is slaughtered. When the father of the calf stops producing sperm, it is slaughtered.
मोठमोठ्या डेरी फार्मवर गाईंना होणारे गोर्‍हे (खोडं) कुठं जातात आणि फक्त गाई म्हशीच कशा राहतात याचा कधी प्रश्न पडला असेल तर हे वरचं वाक्य त्याचं उत्तर आहे. (अरे हो, गाईंसारखे म्हशी आणि रेड्यांना पशुअधिकार नाहीत नै का. ते फक्त गाई असंच वाचावे मग. ;) )

In reply to by संदीप डांगे

एक मात्र खरे, 'भूतदया' हा सोयीचा आजार आहे मनुष्याचा... :-)
सहमत ! पण गुर्जी त्यातले नव्हे...लवकरच ते मिल्क पावडर वापरून तयार केलेले दूध वापरतील बहुतेक ..:-)

मी वाट पाहतोय कधी भारताचा सिरीया, इराक अफगानिस्तान होइल अराजक येउन सिस्टीम उलथून पडेल. आर्थिक निकषावर नको तर जातीवर आधारितच आरक्षण यांना हवे आहे. मांसाहाराचे समर्थन करता तर प्राणी कापायला मुसलमान लागतो तुम्हाला, गाय विकणारा हिंदूच असतो कसायाला, दोष देतात मुसलमानांना. सगळे xx दुटप्पी.

In reply to by Ram ram

च्यामारी! धागा लईच विंटरेस्टींग आहे! प्राण्यांवर क्रूरता, मांसाहार, जोडप्यांचे पुनरुत्पादन, गोवंश टिकवणे, कीटक नाशक फवारणी, PETA सदस्यत्व, चिंकी ची व्याख्या, पेस्ट कंट्रोल, चाप देणे या सारख्या गोष्टींवर चर्चा होऊन आता पार सीरिया, आरक्षण आणि जातीभेद अशा हक्काच्या गोष्टीपर्यंत आलीये कि!! :D माझा पण एक प्रश्न, मेलडी इतनी चॉकलेटी क्यू है??

In reply to by शब्दबम्बाळ

=)) =)) माझाही एक प्रश्न जोडून घ्या... काहे दिया परदेस...

In reply to by Ram ram

आमचा कसाई हिंदू आहे, मुसलमान कसाई हलाल पद्धतीने कापते, आम्ही ते खात नसतो शीख,हिंदू लोक खटका मटण खातात. ह्या पद्धतीत एका घावात शीर धडावेगळे होते. आता बोला. उगाच अकलेचा पिसारा फुलवू नये, नेमके अवयव उघडे पडतात.

In reply to by श्रीगुरुजी

ए गुर्जी, दक्षिणेकडे डोक्यावर क्विंटल क्विंटल वजन ठेऊन ज्या मंदिरांच्या अन देवांच्या मिरवणुकी काढल्या जातात हत्तींवरून, त्या बाबतीत तुझं मत काय आहे रे भावसाहेब?

http://www.loksatta.com/agralekh-news/supreme-court-on-tamil-nadu-jalli… अत्यंत उत्कॄष्ट अग्रलेख! या अग्रलेखातील शब्दाशब्दाशी पूर्ण सहमत आहे. संस्कृती व परंपरेच्या नावाखाली जालिकट्टूसारख्या अमानुष प्रथेचे समर्थन करणार्‍या आंधळ्या समर्थकांच्या डोळ्यात गिरीष कुबेरांनी झणझणीत अंजन घातले आहे. _________________________________________________________________________ मोदी आणि त्यांचा भाजप हा समान नागरी कायद्याची भाषा करतो. या कायद्यात विविध धर्म, पंथ आणि जाती यांचे वैयक्तिक कायदे बाजूस सारून एकचएक कायदा सर्वाना लागू होणे अभिप्रेत आहे. जलिकट्टूसारख्या मुद्दय़ावर संस्कृतीनामक अजागळ संकल्पनेसमोर मान तुकवणारे हे सरकार यापुढे कोणत्या तोंडाने समान नागरी कायद्याचा आग्रह धरणार? क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी जलिकट्टूसारख्या आदिम खेळाच्या पुनरुज्जीवनासाठी शहाणपणास तिलांजली देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाची तुलना राजकीय स्वार्थासाठी शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बाजूस सारणाऱ्या राजीव गांधी यांच्या निर्णयाशीच होऊ शकेल. राजीव गांधी यांनी राजकारणासाठी मानवी प्रतिष्ठा नाकारली. मोदी यांनी याच दळभद्री राजकारणासाठी प्राण्यांच्या जिवास काही किंमत असते हे नाकारले. या दोन निर्णयांची तुलना केल्यास मोदी यांचा निर्णय अधिक पापकारी ठरतो. याचे कारण शहाबानो यांच्या निर्णयाविरोधात बोलण्यासाठी महिलांना आवाज तरी होता. बैलांना तो नसतो. तेव्हा ज्याला आपले मत मांडण्याचा अधिकार नाही त्याचे अधिकार सर्रास तुडवण्याच्या सरंजामी प्रवृत्तीचे मोदी हे प्रतीक ठरतात. त्यामुळे त्यांचा निर्णय अधिक धिक्कारार्ह आणि सुसंस्कृत समाजास मान खाली घालावयास लागणारा आहे. अर्थात विविध कारणांवरील दंगलीच्या निमित्ताने जी राजकीय व्यवस्था मानवी आयुष्यालाच कस्पटासमान मानते त्या व्यवस्थेकडून प्राण्यांच्या अधिकार रक्षणाच्या सुसंस्कृतपणाची अपेक्षादेखील करणे व्यर्थ, हे मान्य. परंतु या निमित्ताने राज्य ते केंद्र अशा सर्वच पातळीवर जे काही विधिनिषेधशून्यतेचे दर्शन झाले ते भीतिदायक म्हणावे लागेल. कोणत्याही सकारात्मक निर्णयासाठी या देशातील व्यवस्था इतक्या कार्यक्षमतेने निर्णय घेऊ शकते याचे एकही उदाहरण स्वतंत्र भारताच्या इतिहासात नाही. परंतु कोणाच्या तरी.. त्यातही मतांचा अधिकार नसलेल्या प्राण्यांच्या.. जिवावर उठणाऱ्या खेळाचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी २४ तासांत चेन्नई ते दिल्ली सर्व यंत्रणा एका सुरात नंदीबैलासारख्या माना डोलावू लागल्या हे निश्चितच व्यवस्थेविषयी घृणा निर्माण करणारे आहे. यातून निर्माण होणारे संभाव्य धोके पाहता या साऱ्याचा सविस्तर समाचार घेणे अगत्याचे ठरते. त्यासाठी जलिकट्टूच्या समर्थनार्थ जे काही दाखले दिले गेले त्याचा आधी विचार करावा लागेल. जलिकट्टू हा खेळ आहे, त्यात बैलांना क्रूर वागणूक दिली जात नाही, बैलाचे देशी वाण जपण्यासाठी तो खेळला जाणे आवश्यक आहे, तो तामिळ संस्कृतीचे प्रतीक आहे आणि म्हणून तो आमचा हक्क आहे, हे या संदर्भातील प्रमुख युक्तिवाद. ते सर्वथा फोल ठरतात. याचे कारण कोणत्याही खेळात क्रौर्याचा आधार घ्यावा लागत असेल तर मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीत त्याचे महत्त्व कमी व्हायला हवे. खेळ हे जीवनशक्तींना आवाहन करणारे आणि आव्हान देणारे असतात. बैलांच्या या खेळाबाबत हे असंभव ठरते. याचे कारण शास्त्रीयदृष्टय़ा हे सिद्ध झाले आहे की जोपर्यंत जगण्यास आव्हान दिले जात नाही तोपर्यंत बैलासारखा शांतताप्रिय प्राणी कधीही संघर्षांचा मार्ग निवडत नाही. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील आपल्या निर्णयात बैलाच्या मानसिकतेचा शास्त्रीय दाखला दिला आहे. हे आव्हान निर्माण झाले की त्यावर मात करणे वा पळून जाणे हे पर्याय बैल निवडतो. म्हणजेच लढणे ही काही त्याची नैसर्गिक प्रवृत्ती नाही. याचाच अर्थ माणूस त्यास अनैसर्गिकपणे लढण्यास भाग पाडतो. त्यासाठी त्याच्या डोळ्यात तिखटाची पूड टाकणे, मद्य पाजणे वा शेपटी पिरगाळणे असे अनेक पर्याय निवडले जातात. तेव्हा यास अहिंसो परमो धर्म हे तत्त्व पाळणाऱ्याचा.. निदान तसा दावा करणाऱ्यचा.. खेळ म्हणावे काय याचे उत्तर मोदी यांनी द्यावे. दुसरा मुद्दा देशी वाणाचा. ते जपण्यासाठी हाच एक मार्ग उपलब्ध आहे काय? या मार्गाने बैलाची प्रजननक्षमता वाढते या युक्तिवादावर फक्त मूर्ख किंवा सरकारी भक्तच विश्वास ठेवू शकतात. तो मान्य केला तर उद्या स्त्री समागमात अत्याचाराचा मार्ग निवडल्यास लैंगिक उद्दीपन अधिक होते हा युक्तिवादही सरकारने मान्य करावा. तिसरा मुद्दा संस्कृतीचा. संस्कृती म्हणजे जगण्याचा उत्सव. हा जीवनाधिकार अमान्य करण्यालाच जर आपण संस्कृती म्हणणार असू तर बामियानचे पुतळे उद्ध्वस्त करणे ही आमची संस्कृती आहे या तालिबानी युक्तिवादाचे काय? अफगाणिस्तान आणि तत्सम मागास प्रदेशांत स्त्रीवर कोणालाही संशय घेण्याचा अधिकार असून तसे झाल्यास भर चौकात तिला दगडांनी ठेचून मारण्याची प्रथा आहे. ती आमची संस्कृतीच आहे, असे संबंधितांचे म्हणणे मोदी सरकार कोणत्या तोंडाने नाकारणार? यातील शेवटचा मुद्दा संस्कृती आहे म्हणून ती पाळण्याचा आमचा अधिकार आहे हा दावा. या इतका बिनडोक आणि आडमुठा युक्तिवाद दुसरा कोणताच असू शकत नाही. तो तसा आहे हे सिद्ध करण्यासाठी संबंधितांच्या निर्वात विचार पोकळीस हे समजावून द्यावे लागेल की संस्कृती ही प्रवाही असते. ती स्तब्ध नसते. तेव्हा कालानुसार संस्कृती ही उत्क्रांत होत असते आणि या बदलत्या संस्कृतीचा अंगीकार करीत आपली जीवनशैली बदलणे म्हणजे सुसंस्कृतता असते. तेव्हा संस्कृतीला दगड समजून कवटाळत बसण्याचा उद्योग फक्त उभा करीत असतात. पूर्वी याच संस्कृतीत पती निधनानंतर पत्नीने सती जाण्याची प्रथा होती. ही संस्कृती आता यथार्थ ठरते काय? त्यानंतर विधवेस पुनर्विवाह बंदी होती आणि तिला केशवपन करून आलवणात आयुष्य आणि भावभावना गुंडाळून ठेवाव्या लागत असत. ती संस्कृती आपण आताही मान्य करणार काय? संस्कृतीत ज्या वेळी मनोरंजनाची साधनेच नव्हती त्या वेळी राजेरजवाडे प्राण्यांच्या झुंजी लावत. या संस्कृतीचे पालन आपण या काळातही करणार काय? तेव्हा संस्कृती आणि ती पालनाचा हक्क हा दावा निखालस अप्रामाणिकपणाचा ठरतो. मोदी सरकारने या अप्रामाणिकपणाची तळी उचलली आहे. तसेच या संदर्भातील दुसरा मुद्दा न्यायिक आहे. या खेळावर बंदी आणावी अशी मागणी प्राण्यांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने नव्हे तर तामिळनाडू सरकारच्याच पशुकल्याण खात्याने केली होती, या बाबीकडे सध्या सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे. त्याचप्रमाणे सर्व क्रूरता वगळून या खेळाची प्रथा पाळली जाईल असे आश्वासन याआधी सर्वोच्च न्यायालयात तामिळनाडू सरकारने दिले होते आणि त्यानंतर नियमाधीन जलिकट्टूस न्यायालयाने मान्यता दिली होती. परंतु या कथित नियमाधीनतेतही नियमांचे सर्रास उल्लंघन झाले असाच निष्कर्ष न्यायालयाच्या समितीने काढला. मूळ जलिकट्टूत तो अभागी बैल आणि त्यास रोखण्याचा प्रयत्न करणारी एकच व्यक्ती अभिप्रेत असते. सध्याच्या जलिकट्टूत त्या अभागी बैलाला अनाडी जमावास तोंड द्यावे लागते. ते पाहून सर्वोच्च न्यायालयाने आपली मर्यादित परवानगी मागे घेतली आणि या ‘खेळा’वर बंदीचा निर्णय जाहीर केला. त्यास बगल देण्याचे पाप मोदी सरकारने केले. यास बिनकण्याच्या तामिळनाडू सरकारपेक्षा मोदी सरकार अधिक जबाबदार आहे. तामिळनाडूत शिरकाव करण्याच्या अतिक्षुद्र इच्छेपोटी त्यांनी हे केले उघड आहे. हाच विचार अन्य राजकीय पक्षांनीही केला. तसेच आपल्याकडील कचकडय़ाचे तृतीयपानी नाचरेही त्याच लायकीचे. त्यामुळे विश्वनाथन आनंद वा रजनीकांत वा कमल हसन यांच्या कृतीचे आश्चर्य नाही. विवेकाच्या आवाजास तोंड फोडणारी मेरिल स्ट्रीप यांच्या गावीही असणार नाही, हे उघड आहे. त्यामुळे हे बिनकण्याचे अन्य राजकीय पक्ष, व्यक्ती आणि मोदी यांचा भाजप यांत काहीही गुणात्मक फरक नाही, हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले. परंतु या त्यांच्या कृत्यामुळे काही अधिक गंभीर प्रश्न निर्माण होतात. ते मांडायला हवेत. भारतात अठरापगड धर्म आणि जाती आहेत. त्या प्रत्येकाच्या काही प्रथा, परंपरा आहेत आणि विविधतेतील एकता नामक भोंगळ संकल्पनेत त्या बांधल्या जातात. या संकल्पनांत हिंदू अविभक्त कुटुंब ही प्रथादेखील येते. या प्रथेचा आधार घेत या देशातील हिंदूंना प्रचंड प्रमाणावर करबचत करण्याची सोय आहे. या पाश्र्वभूमीवर मोदी आणि त्यांचा भाजप हा समान नागरी कायद्याची भाषा करतो. या समान नागरी कायद्यात विविध धर्म, पंथ आणि जाती यांचे वैयक्तिक कायदे बाजूस सारून एकचएक कायदा सर्वाना लागू होणे अभिप्रेत आहे. जलिकट्टूसारख्या मुद्दय़ावर संस्कृतीनामक अजागळ संकल्पनेसमोर मान तुकवणारे मोदी सरकार यापुढे कोणत्या तोंडाने समान नागरी कायद्याचा आग्रह धरणार? या देशातील मुसलमान, ख्रिश्चन आणि अर्थातच हिंदू हे आपापल्या संस्कृतीचे फणे काढून उभे राहिले तर फालतू खेळासमोर मान तुकवणाऱ्या मोदी सरकारला त्या प्रश्नांवरही माघारच घ्यावी लागेल. हा विचार या सरकारने केला असण्याची शक्यता नाही. क्षणिक राजकीय चमत्कारांसाठी दीर्घकालीन शहाणपणास तिलांजली देण्याचे आपले कसब या सरकारने वारंवार सिद्ध केले आहे. जलिकट्टू हे ताजे उदाहरण. परंतु या निमित्ताने संस्कृती की संविधान हा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो, हे भान सरकारला नाही. जे देश सुसंस्कृत संविधानापेक्षा संस्कृतीसमोर मान तुकवतात त्यांचे काय होते याचे अनेक दाखले आपल्या आसपास दिसतात. हे असेच सुरू राहिले तर आपलाही समावेश त्यांच्यात होण्याचा क्षण फार दूर नाही.

In reply to by श्रीगुरुजी

महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदीचा कायदा आला तेंव्हा कोणी काय खावे हा वैयक्तिक प्रश्न आहे वगैरे बाता मारत त्याच्यावर टीका केली होती या साहेबांनी. बैल मारुन खाल्ला तर ती भूतदया, जलिकट्टू मधे पळवला तर कौर्य असे काही असावे.

In reply to by अप्पा जोगळेकर

कुबेरांसारखे दुटप्पी चालून जातात कारण त्यांच्या तथाकथित उच्च विचारांना स्वतःच्या सोयीनुसार डोक्यावर मिरवणारे अस्तित्वात आहेत. सहसा रोज शिव्यादानासाठी प्रातःस्मरणीय असलेले कुबेर मग विचारवंत असल्याचा साक्षात्कार होतो आणि शब्दाशब्दाला सहमती दर्शवली जाते. संधिसाधू पत्रकार संधिसाधू चाहते/विरोधक. हेच सत्य आहे, उगा कुबेरांना शिव्या देऊन काय उपयोग, माल विकला जातोय म्हणुन दुकान सुरु आहे.

In reply to by फेदरवेट साहेब

+१. अंजन कसले? जिथे कुठे मोदी ह्या शब्दाचा संबंध असेल तिथे ते नेहमी जे लिहितात तसेच लिहिले आहे. प्राणी भूतदया वगैरे सगळा कांगावा. शाहबानो आणि जलिकट्टू - काहींच्या काही.

In reply to by श्रीगुरुजी

हा हा हा हा..
आंधळ्या समर्थकांच्या डोळ्यात गिरीष कुबेरांनी झणझणीत अंजन घातले आहे.
हे गुरुजी कुबेरांच्या लोकसत्तेतील अग्रलेखाबद्दल म्हणतायत ? हहपुवा. स्माइल्या लै मिसतोय राव.. :D

गुरुजी अडचणीचे प्रश्न सतत टाळत आहेत हे दिसतंय. फक्त जल्लीकटू मध्येच (कथित) अत्याचार होतो असे नाही. त्यामुळे खरोखर भूतदया दाखवायची असेल तर माणूस आणि इतर प्राणी यांच्यातले सर्वच्या सर्व संबंध संपुष्टात आणले पाहिजेत व त्याला विरोध केला पाहिजे. सिलेक्टीव विरोधाचे कारण? आधीही विचारले, परत विचारतो, तुमची भूतदयेची रेषा नक्की कुठे आहे?

In reply to by संदीप डांगे

जलीकट्टूच्या मागच्या १० किंवा पार ५० वर्षाच्या इतिहासात किती बैल मेलेत ते त्यांनी सांगावे (माणसे काय क्रूर जिव्हालौल्य असलेली खुनशी श्वापदे असतात त्यांच्या मरणाला ठेवा बाजूला) . खुद्द जलीकट्टू मध्ये मेलेल्या बैलांपेक्षा जास्त बैल रोज भारतीय राज्य/राष्ट्रीय महामार्गांवर किंवा लोहमार्गांवर अनुक्रमे ट्रक लॉरी अन रेल्वेला धडकुन मरत असतील, बरं रस्ते मोटारगाड्या अन लोहमार्ग मानवाने आपल्या मतलबाकरता आविष्कार केलेले आहेत हे ही सर्वमान्य आहे. त्यातही मुक्या जनावराला रस्त्यावर हुंदडू नये किंवा लोहमार्गांवर जाऊ नये अशी काय अक्कल असणार बिचाऱ्याला ? गाड्या थांबवायची अक्कल ट्रक/रेल्वे चालकांना असते तरी ते ती वापरत नाहीत, क्रूर कुठले. तेव्हा अश्या वाहन/लोहरथचालकांना काय शिक्षा करावी हे सुद्धा गुरुजींनी सांगावे.

In reply to by संदीप डांगे

जलीकट्टूच्या मागच्या १० किंवा पार ५० वर्षाच्या इतिहासात किती बैल मेलेत ते त्यांनी सांगावे (माणसे काय क्रूर जिव्हालौल्य असलेली खुनशी श्वापदे असतात त्यांच्या मरणाला ठेवा बाजूला) . खुद्द जलीकट्टू मध्ये मेलेल्या बैलांपेक्षा जास्त बैल रोज भारतीय राज्य/राष्ट्रीय महामार्गांवर किंवा लोहमार्गांवर अनुक्रमे ट्रक लॉरी अन रेल्वेला धडकुन मरत असतील, बरं रस्ते मोटारगाड्या अन लोहमार्ग मानवाने आपल्या मतलबाकरता आविष्कार केलेले आहेत हे ही सर्वमान्य आहे. त्यातही मुक्या जनावराला रस्त्यावर हुंदडू नये किंवा लोहमार्गांवर जाऊ नये अशी काय अक्कल असणार बिचाऱ्याला ? गाड्या थांबवायची अक्कल ट्रक/रेल्वे चालकांना असते तरी ते ती वापरत नाहीत, क्रूर कुठले. तेव्हा अश्या वाहन/लोहरथचालकांना काय शिक्षा करावी हे सुद्धा गुरुजींनी सांगावे.

In reply to by संदीप डांगे

गुरुजी उत्तरे टाळत आहेत हे पटण्यासारखे नाही. त्यांच्याकडे खरोखरच उत्तर नाही असे असू शकते. ते नेहमी बीजेपीचे समर्थन करत असतात तरीही त्यांनी येथे बीजेपी विरोधाची भूमिका घेतली आहे. यावरुन तरी ते भूमिकेची भलामण करत आहेत, पक्षाची नाही असे म्हणता येईल. निदान ते 'गिरीश कुबेर' यांच्यासारखे दुतोंडी नाहीत. या लेखातील त्यांच्या 'अतिरेकी भूतदये'शी मी सहमत नाही हे पुन्हा नोंदवतो.

In reply to by अप्पा जोगळेकर

सहसा उत्तरे नसल्यावर(च) उत्तरे देणे टाळले जाते, असा माझा आपला एक अदमास आहे. ह्यात काही उणेअधिक वाटल्यास कृपया आम्हाला दुरुस्त करावे ही विनंती.

In reply to by अप्पा जोगळेकर

उगाच चर्चेला नसलेला रंग देऊ नका, इथे भाजप समर्थन किंवा विरोध कुठून आला, आप्पासाहेब? धागालेखकाचे फक्त ह्या धाग्यावर व्यक्त केले जात असेलेले मत मी चर्चेसाठी विचारार्थ घेत आहे. यापूर्वी श्रीगुरुजी कोणाची भलामण करत होते वा नाही याचा काहीही संबंध नाही. इथे गुरुजी चक्क सिलेक्टीव विरोध करत आहेत. आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ भन्नाट मते प्रकटत आहेत. मात्र इतर प्रश्नांवर त्यांच्याकडे उत्तर नाही हेच न पटण्यासारखे आहे. त्यांच्या याच धाग्यावरच्या सर्व प्रतिसादांतून ते जल्लिकट्टूवर तुफान टिका करत आहेत, तर त्यांच्या याच धाग्यावरच्या सर्व प्रतिसादांतून व्यक्त झालेली मते (प्राण्यांच्या इच्छेशिवाय होणारे व्यवहार) इतर ठिकाणी होणार्‍या प्राण्यांच्या वापर-अत्याचारावर सुद्धा लागू करावीत की नको एवढा प्रश्न आहे ज्याला त्यांनी सोयिस्कर बगल दिली, उदा. गायीचे दूध. माझा मुद्दा एवढाच आहे की गायीचे दूध तर हवे, म्हणजे गायी गाभण राहायला हव्यात, परत देशी गायीही संवर्धित केल्या पाहिजेत. गायी गाभण राहिल्या म्हणजे त्यांना काहीतरी बाळ होईलच की नाही? आता बाळ झालं म्हणजे ते एकतर गाय असेल वा बैल. तर मग अशा बैलांचे नक्की काय करावे? त्यांना शेतीची कामे देऊ नये, खच्चीकरण करु नये, स्पर्धेत खेळवू नये, कसायालाही विकू नये. मग नेमके काय करणे अपेक्षित आहे?

In reply to by संदीप डांगे

हा धागा माझ्यावर नाही. हा धागा संस्कृती, परंपरा इ. च्या नावाखाली चालणार्‍या जालिकट्टू नामक प्रकारात बैलांवर कसा अत्याचार होतो व त्यामुळे त्यावरील बंदी कशी समर्थनीय आहे याविषयी आहे. माझी भूतदयेची रेषा नक्की कोठे आहे किंवा माझा विरोध सिलेक्टिव्ह आहे का अजून कसा हा या धाग्याचा विषय नाही. मी कसा आहे याविषयी आपले महनीय विचार प्रदर्शित करायचे असतील किंवा माझ्या विचारांची चिरफाड करायची असेल तर त्यासाठी एक वेगळा धागा काढण्याचा पर्याय वापरता येईल.

पेटाच्या जल्लिकटूच्या संदर्भातल्या ह्या इन्वेस्टिगेशन रिपोर्टचे एकायुजरने केलेले पोस्टमार्टमः https://www.youtube.com/watch?v=coZvTRHt2m4&spfreload=10 युजर: I'm From Madurai, Avaniyapuram 0:04. हा युजर अवनियपुरम चा रहिवासी आहे. ज्याबद्दल रिपोर्टमधे दाखवले आहे. पुढे प्रत्येक सेकंदाला विडियोत काय दाखवले आहे व त्याचे स्पष्टिकरण दिले आहे. This Videos shows that PeTA doesn't has any knowledge about real jallikattu and how Tamil peoples worship their bulls. This 3 mins stupid video is just portraying few stupid human errors. 0:25 He is not participant, He is the owner of that bull and he is trying to guide that bull into playing arena. . 0:49 WTF, Each and every bulls are undergoes alcoholic test just before enter Vaadi vaasal (Holding Area), These guys trying to give some water. प्रत्येक बैल हा दारू पाजलेली नाही ह्याचे परिक्षण करुनच पाठवतात. ह्याठिकाणी ती माणसे बैलाला पाणी पाजत आहेत (तर पेटाने दारू पाजत आहेत असे म्हटले आहे.) . 0:59 They are just forcing bull into playing arena, without touching it physically how the hell your are able to do that. . 1:25 Dumb F*ck, they are just cutting the controlling rope from the bull and let it play freely. . 1:56 participant only awarded if he hold one on one against the bull, And if you know Tamil just listen commentary. . 2:23 These scene are from very rural area without any basic arrangement for jallikattu, If you just ban jallikattu all formers around South TN just release their decorated bulls in roads. Coz they don't have any other choices. I Know PeTA is just doing these kind of things against jallikattu for Money, I'm posting these for some dumb fu*ks who thinks this stupid video is real and don't know anything about culture of Tamils.

In reply to by संदीप डांगे

शेतकरी बैलाला आसुडाचा फटका कसे मारतात हे सुद्धा बहुतेक लोकांना माहित नाही. त्यांना वाटते अत्याचारच केला बैलावर.

In reply to by विशुमित

एखाद्यावर अत्याचार होताहेत हे समजायला सारासार विवेकबुद्धी पुरेशी आहे. डोळ्यात माती किंवा तिखट फेकणे, शेपटी जोरात पिरगाळणे, शेपटी दातांनी चावणे, पायात खिळे ठोकून नाल ठोकणे, वृषण दांडक्याने ठेचून चेचून टाकणे किंवा वेदनादायी चाप लावणे इ. गोष्टी अत्याचार आहेत हे आसुडाचा फटका मारता येत नसला तरी समजते.

In reply to by संदीप डांगे

बैलांवर अत्याचार होतात हे अनेक चित्रफितीतून दिसत आहे. जालिकट्टू प्रकारामध्ये बैलांवर अत्याचार होतात हे सर्वोच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे व त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी घातली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सर्वोच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे व त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी घातली आहे.
सुप्रीम कोर्टने घेतलेले सगळेच निर्णय शिरोधार्य मानायचे का?

लोकहो,
शहाबानो यांच्या निर्णयाविरोधात बोलण्यासाठी महिलांना आवाज तरी होता. बैलांना तो नसतो.
म्हणूनंच जणू गिकु नामक बैलोबाने आपला आवाज देऊ केला आहे. ;-) एव्हढा विनोदी लेख उद्धृत केल्याबद्दल श्रीगुरुजींचे आभार. आ.न., -गा.पै.

एक पाकिस्तानी आहे हसन निसार तो तिथल्या काही लोकांबद्दल आणि राजकारण्यांबद्दल एक शब्द सतत वापरतो "भानामतीका कुनबा" शप्पथ खरय अगदी आपल्या देशाबद्दलही....

स्वार्थासाठी शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बाजूस सारणाऱ्या राजीव गांधी यांच्या निर्णयाशीच होऊ शकेल. राजीव गांधी यांनी राजकारणासाठी मानवी प्रतिष्ठा नाकारली. मोदी यांनी याच दळभद्री राजकारणासाठी प्राण्यांच्या जिवास काही किंमत असते हे नाकारले. या दोन निर्णयांची तुलना केल्यास मोदी यांचा निर्णय अधिक पापकारी ठरतो. याचे कारण शहाबानो यांच्या निर्णयाविरोधात बोलण्यासाठी महिलांना आवाज तरी होता. बैलांना तो नसतो. तेव्हा ज्याला आपले मत मांडण्याचा अधिकार नाही त्याचे अधिकार सर्रास तुडवण्याच्या सरंजामी प्रवृत्तीचे मोदी हे प्रतीक ठरतात.
मुस्लिम महिलांपेक्षा गोवंश श्रेष्ठ हे त्यांनी मान्य केल्याबद्दल खुश व्हा की राव. :)) (काही झालं तरी आपल्या विरोधातला (कोणीपण असु दे) म्हणून तो पापी/चूक अशी ओढून ताणून मांडणी करणार्‍यांचे खरंच कौतुक वाटते.) जल्लिकट्टू झाला न झाला आम्हाला कै फरक पडत नाही, पण त्यानिमित्ताने लोकांच्या कोलांट उड्या (कुबेरसाहेब धरुन) आणि वरुन 'काही विरोधाभासच नाही' अशी स्वतःचीच भलामण, असा डब्बलबार मनोरंजनाचा आनंद लाभला ब्वा.. :))

In reply to by अस्वस्थामा

लोकहो, गिरीश कुबेर बैलोबा असूनही अशा कोलांट्या उड्या मारतात की बातच नको. ज्याच्यात हिंमत आहे त्याने कुबेरांचं वशिंड धरून दाखवावं! ;-) आ.न., -गा.पै.

जल्लिकट्टू ला परवानगी मिळाल्यामुळे हापिसातल्या तमिळ सहकाऱ्याने कसलीशी फणस आणि खोबऱ्याची मिठाई आणली होती बनवून. मस्त होती चवीला, जरा जास्तचं गोड होती. बीफ बॅन आहे म्हणून नाय तर बैलचं आणणार होतो म्हणाला डब्यात :)

जालीकट्टूबद्दल अधिक वाचताना समजलेले: या खेळात सहभागी होण्याचा अधिकार केवळ तथाकथीत उच्च जातींनाच आहे. दलित कुटुंबांतील तरूण युवक यात सहभागी होऊन आपले शौर्य(?) दाखवू शकत नाहीत.

रोमन साम्राज्यातील गुलामांच्या झुंजीआणि जालीकट्टू यात साम्य आहे असे वाटते का?

In reply to by पुंबा

अज्जीबात साम्य वाटत नाही. जल्लीकट्टू मध्ये सामील होणारे पब्लिक स्वेच्छेने सहभागी होत असते, त्यांची तुलना गुलामाशी होऊ शकत नाही.

In reply to by पुंबा

रोमन साम्राज्यातील गुलामांच्या झुंजीआणि जालीकट्टू यात साम्य आहे असे वाटते का?
थोडेसे साम्य आहे. झुंजीत भाग घ्यायचा का नाही हे ठरविण्याचे गुलामांना स्वातंत्र्य नव्हते. तसेच जालिकट्टूत भाग घ्यायचा का नाही हे ठरविण्याचे बैलांना स्वातंत्र्य नाही.

In reply to by गणामास्तर

वेदनेची जाणीव, यातनेची जाणीव दोघांमध्येही समान आहे. दोघांनाही समान स्वरूपाच्या वेदना होतात.

काल टाईम्स नाऊ चॅनेलवर एक क्लिप दाखवली. त्यात जलिकट्टु समर्थक दंगेखोर रस्त्यावर दगडफेक आणि जाळपोळ करत होते. त्यांना पोलिस झोडून काढत होते. बातमीखाली कॅप्शन "why sarkari jalikattu" =)) =)) =))

In reply to by पैसा

काल मद्रासमध्ये राडा झाला होता म्हणे. माझा एक मित्र मद्रासमध्ये काम करतो. त्याला घरी परत येताना रस्ते बंद असल्याने खूप त्रास झाला. यावर्षी जयललितांचा मृत्यु, चक्रीवादळ आणि आता जालिकट्टू यामुळे मद्रासमध्ये वाट लागली आहे. जालिकट्टू समर्थकांवर तो भयंकर चिडला होता. त्यांचे वर्णन त्याने culture vultures असे केले.

समाज जसा सुसंस्कृत होत जातो तशी त्याची क्रौर्याची लेव्हल कमी होत जाते शंभर दोनशे वर्षांपुर्वी असलेली सतीची प्रथा जो धर्माचा भाग होता ती आता निर्विवादपणे क्रूर वाटते

'Jallikattu can't be played without torturing bulls' सर्वोच्च न्यायालयाने जालिकट्टूचा अभ्यास करून त्यात बैलांचा छळ होतो का नाही याचा वृत्तांत तयार करण्याची जबाबदारी मनोज ओसवाल यांच्यावर सोपविली होती. २०१०-२०१२ या तीन वर्षात तामिलनाडूतील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊन तिथे होत असलेल्या जालिकट्टूत सहभागी होऊन, प्रकाशचित्रे व चित्रफितींच्या सहाय्याने त्यांनी वृत्तांत तयार करून सर्वोच्च न्यायालयात सादर केला. या अमानुष प्रकारात बैलांचा छळ केला जातो असे स्पष्टपणे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी जे पाहिले ते अत्यंत धक्कादायक होते. त्यावरच खालील वृत्त आहे. या वृत्तातील मोजके महत्त्वाचे उतारे चोप्य पस्ते केले आहेत.

'Jallikattu can't be played without torturing bulls'

The Supreme Court passed an interim order stating that certain steps must be taken for the event. The apex court ordered that bulls must not be beaten, there should be more space on both side of the game arena, before and after the event bulls must get adequate rest, there should be no beating or biting of bulls, no alcohol or drugs must be given to them, etc. These were the key measures that were introduced by the Supreme Court in 2009 under the TNRJA. When bulls come for a Jallikattu event, they are put in queues. They are made to stand for long hours. There is no water for them, and that is cruelty. When a bull reaches the Vaadivaasal (the entrance to the arena), he sees some 20,000 people shouting and dancing, which is very scary for him. Now, a bull, which is just two years old, does not want to go into the arena. He will do everything possible not to go in front of the crowd. This is where the cruelty starts. The bull does not want to go in front of the crowd and then they have to put chillies on his private parts to make him enter the game arena. I have photographed this and this is mentioned in the Supreme Court judgment too. They also make the bull drink alcohol and attack him with a sickle so that he feels that it is worse to stay in the Vadivassal and better to go in front of the crowd. Jallikattu cannot be played without torturing bulls. There are two reasons for it. The first reason is that the bull is scared. He is in a catch-22 situation. He wonders whether to sit quietly in the Vaadivaasal or go into the crowd. He would prefer to stay in the Vaadivaasal instead of facing 20,000 people. He doesn't want to come out. To force him to move out, something more painful and torturous needs to be done, to make the bull uncomfortable in the Vaadivaasal. That is the crux of the cruelty. In the Vaadivaasal, the bull is constantly tortured and therefore it runs into the game arena. This arena is a limited space. Everyone here jumps on the bull to take away the prize from the horns of the bull. These 20,000 people have not come to see the game, but to participate in it. That is the second problem. In such a situation, a bull can fall into the village well or get injured because someone takes out their knife and injures the bull.

महाराष्ट्र सरकारने बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे. आता पुन्हा एकदा मुक्या जनावरांचा छळ सुरू होणार आणि विक्रुत मानसिकतेचे प्रेक्षक त्याचा आनंद घेणार. कर्जमाफीच्या मागणीची धार कमी करण्यासाठी तर हा निर्णय घेतला असेल का?

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरूजी, जालिकट्टू आणि बैलगाडा शर्यत या दोन्ही खेळांत समान छळ होतो का बैलांचा? माझ्यामते, नाही. शिवाय, बैलगाडा शर्यत ही सहभागी तरूणांसाठी धोकादायक नाही. जालीकट्टूत आजपावेतो शेकडो तरूण मृत्युमुखी पडलेत. जालिकट्टू ही मानसाच्या क्रूरतेची परिसीमा आहे. बैलगाडा शर्यतीचे तसे नाही.

In reply to by पुंबा

>> शिवाय, बैलगाडा शर्यत ही सहभागी तरूणांसाठी धोकादायक नाही. काही वर्षांपूर्वी आमच्या गावी शर्यतीतल्या बैलगाडीतून खाली पडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. तो तरूण पेशाने शिक्षक होता.

In reply to by सतिश गावडे

सरकारचा माझ्यासाठी चांगला निर्णय. कालच माझ्या एक खोंडाला ६५ हजार आणि दुसऱ्याला ४८ हजार रुपयाला मागितले आहेत. १.१५ लाखाचा उद्या सौदा होईल बहुतेक. बाकी सगळे प्राणी शर्यतीला जुंपलेलीच आहेत. चालायचं..!!

In reply to by पुंबा

बैलगाडी शर्यतीत बैलांची शेपूट पिरगाळणे, अणकुचीदार वस्तू लावलेल्या चाबकाने मारणे, दारू पाजणे, कानात मुंग्या सोडणे, गुदद्वारात तिखट घालणे इ. प्रकार होत असल्याचे उघडकीस आले होते. म्हणूनच त्यावर बंदी आली होती. जालिकट्टू असो वा बैलगाडी शर्यत्, दोन्हीत मुक्या जनावरांचा छळ होतो.

In reply to by पुंबा

जालिकट्टू ही मानसाच्या क्रूरतेची परिसीमा आहे.
हे जरा अतीच झाले असे मलाच परत एकदा प्रतिसाद वाचताना जाणवलं. बाकी, बैलगाडा शर्यत माणसांसाठी जालीकट्टूपेक्षा कमी धोकादायक निश्चितच कमी धोकादायक आहे. बैलगाडा शर्यतीत झालेले मृत्यू हे aberration आहेत, जालिकट्टू बाय नेचर सहभागी माणसांसाठी धोकादायक आहे.

In reply to by श्रीगुरुजी

कर्जमाफीच्या मागणीची धार कमी करण्यासाठी तर हा निर्णय घेतला असेल का? जर या निर्णयाने कर्जमाफीच्या फालतू मागणीची धार कमी होणार असेल तर चांगला निर्णय आहे. शिवाय जर शेतकरी कर्जाच्या ओझ्याने खरोखरच पिचले असतील तर ते बैलगाडी शर्यती सारख्या खेळात आपला वेळ फुकट घालवणार नाहीत.

क्रूर आणि आसूड ओढणारे प्रतिसाद संबंध महाराष्ट्राने वाचले तर हा क्रूर पणा थांबणारे नक्की असं मत नोंदवतो .

बैलगाड्याच्या शर्यतीवर टीका करताना किती जणां नी शर्यती प्रत्यक्षात पाहिल्या आहेत ? किती प्रकारच्या असतात ? कारण महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या भागात शर्यतीचे प्रकार वेगळे आहेत. मी मागील १५ वर्षे मावळातील शर्यती बघत आहे. यामधे सहसा कोणीही रायडर नसतो . बैले घाटातून पळवली जातात आणि पुढे घोडा असतो . १. sharyat1 २.sharyat2 पश्चिम महाराष्ट्रात छकडा वापरतात त्यामधे मागे सारथी असतो. sharyat3 १५ वर्षात ( किमान १०० शर्यती पाहून) मी स्वःत तरी "कानात मुंग्या सोडणे, गुदद्वारात तिखट घालणे " हे प्रकार कुठेही पाहिले वा ऐकले नाहीत किंवा वाचले नाहीत. चाबूक वापरणे हे मावळात होत नाही फक्त प.म. मधे होते. मावळातील शर्यतीमध्ये हिंसा नसते कारण बैलांना चालवणारे कोणी नसते. आणि तिखट , दारू याने बैल ट्रॅक सोडतात. पष्चिम महाराष्ट्रामधे चालवणारा असल्याने चाबूक , छडी , वापरतात पण बैलाला जखमा करत नाहीत कारण मग त्यावरचे उपचार गाडामालकाला करावे लागतात शर्यतीच्या बैलाला कामाला जुप्मत नाहीत आणि त्यांची वर्षभर काळजी वेगळ्या प्रकारे घेतले जाते. घोड्याच्या शर्यतीप्रमाणे या खेळामधे सूसूत्रता, नियमावली आणून हिंसेचा वापर कमी करण्यास वाव आहे. काही गाडामालक चुकीचे वागत असतीलही आणि बैलांना त्रास होत असेल पण सर्वांवर बंदी घालणे योग्य नाही.

माहितीये का ?? कानात मुंग्या सोडणे नक्की कुठे होते ?

बैल गाड्याच्या शर्यतीत कोणताही क्रूर प्रकार होत नाही. हवं तर तुमि येऊन पाहू शकता. ग्रामीण जीवनाचे अर्थ कारण या शर्यतीवर अवलंबुन आहे. मागील काही वर्षांपासून यात्रा ओस पडल्या होत्या. ज्या प्रमाणे आपण सर्व जण पट्टीचे धावपट्टू बानू शकत नाही, त्याप्रमाणे सर्व बैलांचा शर्यती मध्ये उतरवत नाहीत, बैलाचे वय, शारीरिक ठेवणं, त्याची क्ष मता तपासली जाते. त्याला विशेष खुराक दिला जातो, त्याच्या कडून योग्य सराव करून घेतला जातो. बैलांची किंमत 1 लाख पेक्षा जास्त असते. अशा बैलांचा छळ कोणी व का करेल? केवळ ग्रामीण जीवन व शेती विषयक अज्ञानातून आपले वरील लेखातील मत असावे. आपल्याला वस्तुस्थिती माहीत असावी म्हणून हा लेखन प्रपंच, कृपया गैरसमज नसावा.

माझे टंकनश्रम वाचवल्याबद्दल ...हेच सांगणार होतो गुरुजींना .

जर बैलगाडी शर्यतीत बैलांचा छळ होत नसता तर त्यावर न्यायालयाने बंदी का आणली असती? इथे त्याबद्दल सविस्तर माहिती आहे. Severe cruelty is inflicted upon the bulls. They are locked in dark rooms with red ants. They are given steroids and made to drink alcohol. They are whipped and poked in their private parts, and their tails are twisted and even bitten by humans. Not only do the bulls suffer and many die, but human spectators have been killed. खालील तूनळीवरील चित्रफीत पहा. त्यात एकापाठोपाठ एक अशा अनेक चित्रफिती आहेत. पहिली चित्रफीत १:४५ मिनिटानंतर पहा. बैलांना शर्यतीत पळविताना काठीने कसे बडवितात ते पहा. ती चित्रफीत संपल्यासंपल्या दुसरी चित्रफीत सुरू होते. त्यात बैलांच्या छळाचे अनेक प्रकार दाखविले आहेत. शर्यतीसाठी अनुत्सुक असलेल्या बैलाला शेपूट पिरगाळून उठविणे, काठीने मारणे, शर्यत सुरू असताना दाताने बैलाची शेपटी चावणे, शेपटी पिरगाळणे असे अनेक क्रूर प्रकार दिसतात. बैलाचा मानेवर जे जू ठेवले जाते त्याच्या दोन्ही बाजूला आतल्या बाजूने अणकुचीदार खिळे ठोकलेले दिसतात जे बैलांना जोरात पळताना टोचतात. https://www.youtube.com/watch?v=yyhhVJD0s-4 संस्कृती, परंपरा, ग्रामीण जीवनाचे अर्थकारण असा कितीही मुलामा दिला तर या प्रकारात मुक्या जनावरांना क्रूर पद्धतीने छळले जाते हे उघड सत्य आहे. मुक्या प्राण्यांवर अत्याचार करणारा हा क्रूर प्रकार पुन्हा सुरू केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचा तीव्र निषेध.