Skip to main content

कदंब

लेखक प्राजु यांनी सोमवार, 21/11/2016 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
सळसळणारी हिरवळ देही, विस्तीर्णाचे पान समांतराचा ध्यास उराशी, सममितीचे भान हिरवट पिवळे, तांबूस लोलक, नाजुक इवली फुले वार्‍यावरती सरसरणारे , गंधविभोरी झुले हिरवाईवर तांबूस हळदी, केसर भरले तुरे चेंडूवरती कशिदाकारी, रुणझुणती गोपुरे कृष्णासखा की म्हणू कदंब, रूप तुझे भरजरी पानोपानी जणू वाजते कान्हाची बासरी अवतीभवती पिंगा घालत भ्रमरांची लीला मोह वाटुनी सोडून येई आम्रतरु कोकिळा रुंद–अरुंदशा हिरवाईची दाट तुझी सावली शांत असा विश्रांत जीवाला, स्मरते मज माऊली - प्राजु सदर फोटो जालावरुन साभार.
लेखनविषय:

वाचने 20635
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

सुंदर कविता. झाडा-फुलांवरची कविता वाचली की मला इंदिरा संत यांची 'बाभळी' ही कविता आठवते. त्याच नादमय गेयतेत लिहिलेली ही कविता. आवडली.

लयीत सारं काही असल की कविता अजूनच खुलते आणि तशीच ती मला जास्त भावते. कविता आवडलेली आहे! Sandy

हिरवट पिवळे, तांबूस लोलक, नाजुक इवली फुले वार्‍यावरती सरसरणारे , गंधविभोरी झुले मस्त... कदंब म्हणजे संत्र्याला मोड आल्या सारखं दिसतं बाँ... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- haye mera dil - alfaaz ft honey singh - official full video

कदंबाचे झाड पुण्यात कुठे आहे ?

खूप छान कविता !

मस्तं. आवडली.

मस्त आहे कविता!! पुन्हा एकदा शाळेत गेल्यासारखं वाटलं!

खुप दिवसांनी वाचतोय प्राजुतै तुमची रचना.. व्वाह.. सुंदर
कृष्णासखा की म्हणू कदंब, रूप तुझे भरजरी पानोपानी जणू वाजते कान्हाची बासरी
हे तर.. मार डाला...

सुंदर, नादमय कविता. "ऐलतटावर पैलतटावर" सहज आठवली. इतकी सुरेख झाली आहे!

छान नादमय !! तुमची दुसरी कविता सुद्धा वाचली.... वाचून वाटलं की तुमच्याकडे शब्दसाठा खूप छान आहे. मला असल्या कविता आवडतात आणि मी माझ्या कविता सुद्धा अश्याच मांडायचा प्रयत्न करतो.