Skip to main content

अनुभव नोटा बदल आणि पैसे काढणे (आपल्याच खात्यातून)

लेखक नाखु यांनी सोमवार, 14/11/2016 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या ज्या मिपाकरांनी बँकेत जाऊन आपल्या(च) पाचशे -हजाराच्या नोटा बदलून आणल्या किंवा भरणा केल्या त्यांचे अनुभव इकडे तिकडे (प्रतिसादात) टाकण्यापेक्षा या धाग्यात द्याव्यात या करिता हे दालन खुले केले आहे. एटीम चालू नसल्याने किंवा चालू होताच अर्ध्या तासात रोकड संपल्याने काय हाल होत आहेत ते सांगावेत. नमनाचे तेल झाल्यावर माझे अनुभव. खाते स्टेट बँक ऑफ ईंडीयात माझे आणि लेकाचेही.घरात कन्येच्या पिगी बँक (आज्जी बटव्यातले ३ हजार) व माझे आपत्कालीन ३ हजार भरणा करण्यास व बदलून घेण्यास गेलो. लेकाच्या खात्यातच पिगी बँकेचे जमा करणार होतो त्यानुसार स्लिप वैगरे भरली होतीच.फक्त मला बदलायचे पैसे सविस्तर अर्ज आणि ओळख्पत्र वैगरेसहीत तयारीने गेलो होतो.(शुक्रवार दि.११). बँकेत बर्यापैकी गर्दी होतीच रांगेत किमान १००-१५० नंबर असावेत, मुख्य दारातून एकावेळी १०-१५ लोकांना सोडले जात होते,पण एकूणच बँक कर्मचारी या अचानक आलेल्या लोंढ्याला आणि कामाला तोंड द्यायच्या क्षमतेइतके नव्हते हे वारंवार जाणवत होते. शंका निराकरण करणारा कुठलाही फलक दर्शनी भागात व ठळक असा लावला नव्हता.सूचना ए टीम चा सुरक्षारक्षक देत होता त्याचा अवतार व शरीर यष्टी पहाता त्यालाच सुरक्षेची नितांत गरज होती.त्यातून तो बिचारा अमराठी (बहुधा उत्तर भारतीय) त्याला लोकांच्या शंकांना चौकशीला उत्तर देता येत नव्हते.त्यात रांगेतले लोकही एक्मेकांना अचूक माहीती देण्यापेक्षा नवीन च काहीतरी सांगत होते,प्र्त्येक भरणा रकमेसोबत ओळ्खपत्र (पॅनकार्‍ड ) लागेल असे त्यामुळे आणखीन्च गोंधळ. खरी गंम्मत माझा नंबर येऊन मी आणि मुलगा आत गेल्यावर आली. आम्ही दोघेही गेलो अश्यासाठी की जर आत दोन स्वतंत्र रांगा असतील्,बदलून घेण्यासाठी आणि भरणा करण्यासाठी तर सोयीचे व्हावे म्हणून (आणि तसेच होते स्वतंत्र रांगा होत्या). आत पहिल्यांदा मी भरणा करण्याच्या रांगेत उभा राहिलो आणि मुलाला नोटा बदलून घ्यायच्या रांगेत उभे केले.त्याचा नंबर अंदाजे २०-२५ वा असेल,आणि माझा माझ्या रांगेत फक्त १०-१२. माझ्या पुढील लोकांअध्ये काही संपुर्ण तपशील घेऊन आलेले होतेच पण : दाखला क्रं १ : एक मध्यमवयीन इसम (वय ४०-५०) :. प्र्त्येक भरणा करण्याला ओळ्खपत्र लागेल का? बँकेतल्या बाई (कर्मचारी) : नाही फक्त पन्नास हजाराच्या वर असेल तर लागेल.आणि त्याचे तपशील स्लिपवर लिहा. एक मध्यमवयीन इसम : मग मी या स्लिप बदलून वेगळ्या भरतो तिथेच भरायला सुरुवात वेगवेगळ्या खात्याच्या आणि बाईंकडे एक स्लिप देऊन रक्कम बहुधा ७०-७५ हजार दिले असावेत.बाईंनी पॅनचा तपशील मागताच त्याच स्लिप मध्ये खाडाखोड करून ४९ हजाराची स्लिप केली.उरलेली रक्कम तिथेच इतर स्लिप भरायला सुरुवात.एकूण वेळ सगळे निस्तरायला ३०-३५ मिनिटे. दाखला क्रं १ :रांगेत त्या नंतरचा ५-६ वा नंबर मारवाडी स्त्री तीशीतली(पेहरावावरून व दागिन्यांवरून अंदाज उगा गहजब नको) सोबत एक लहान मुलगा ३-४ वर्षाचा आणि त्या स्त्रीची बहुधा आई. नंबर येताच बँकेतल्या बाई (कर्मचारी) ने साम्गीतले रक्कम ५० हजार आहे तेंव्हा पॅनकार्ड लागेल. बाईम्नी तिथून्च फोन करून घरी चौकश्या सुरु केल्या दोन चार फोना फोनीनंतर , नंतर दिला पॅन नंबर तर चालेल का तेही चिआरून झाले.बँकेतल्या बाईंनी नकार दिल्यावर शेवटी पुन्हा फोन. बँकेतल्या बाई वैतागून तोडगा देतात ४९ हजार भरणा करा पॅनची गरज भासणार नाही,त्याच वेळी त्या आईसाहेब उवाच "हम अब इस हजार रुपये कब भरने आयेंगे" वगैरे जे काम ३-४ मिनिटात होणे होते त्याला वेळ १५-२० मिनिटांचा.माझा नंबर अग्दी २-३ वर येताच बँकेची घोषणा की नोटा बदलीच्या रांगेतल्या पुढच्या १० च लोकांना बदलून मिळतील (रोकड शिल्लक नसल्याने) उरलेल्यांनी उद्या येणे. बँकेच्या मॅनेजराला आधी अंदाज कसा आला नाही ते मलाही कळेना.(बँकेबाहेरील लोकाची चिडचिड/संताप स्वाभावीक होता,किमान टोकन पद्ध्त वापरून फक्त ५०-१०० लोकांनाच थांबण्यास सांगायला पाहिजे होते) शेवटी मुलाकाचा नंबर १५-२० मध्येच असल्याने त्याचे कडून नोटाबदलीचे पैसे घेऊन (आधीच पर्यायी स्लिप भरून ठेवल्याने भरणा करायचे ठरवले) आणि दोन्ही पसे भरणा केले. व्य्वहार होत असताना. नोटाबदलीच्या कौंटरवर २००० हजारच्या नोटा नकोत सगळ्या फक्त शंभरच्याच द्या असे सांगणारे २-४ महाभाग होतेच. थोडक्यात बेशिस्त अनागोंदी आणि पॅनीकता दोन्ही बाजूंनी आहे.(याच कारणामुळे १०-१५ व्य्वहारांना २-३ तास लागत आहेत)
लोक फक्त साक्षर झाले आहेत सुशिक्षीत होण्यास अजून बर्यापैकी मजल गाठावी लागेल.
त्या दिवशी चेक बुक बरोबर नेले नसल्याने काल चेक ने पैसे काढावे लागले मर्यादा १० हजाराची असूनही लगेच निकड नसल्याने ७ हजार काढले (पुन्हा ३ तास खर्ची करून) त्यात पहिली वहिली २ हजाराची नोट मिळाली त्यामुळे कन्या खूष आणि मुलालाही रांगेत थांबल्याचे चीज झाले असे वाटले.(सध्या नोट पिगि बँकेत्च राहिल असे फर्मान कन्येने दिले आहे) कुणाचे अनुभव असतील तर ते टंकावेत.

वाचने 46932
प्रतिक्रिया 218

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

त्यांच्या नाशकात असेल. :)) बाकी इथे पान नंबर ११३ वर त्यांची वोल्वो ९ नंबरला आहे. यश्टी ३ नंबरला आणि HDFC नामक बँक १ नंबरला आहे. (याहून काही वेगळे पॅरामीटर असतील तर वाचायला नक्की आवडेल.)

In reply to by मोदक

येगझकटली!!! नाशकात ग्राहक कमी आहेत बँकेचे पण सर्व्हिस एकदम हायफाय आहे! असो, आम्हाला स्वप्नवत सर्विस मिळते ती यष्टीत मिळत नाही, जे आहे ते आहे, अनुभव हवा तर घ्या स्वतः! यातही माझी खिल्ली उडवण्याची काय हतबलता आहे ते काही कळत नाही बॉ! ;)

In reply to by संदीप डांगे

तुम्ही जो अनुभव मांडला तो तुम्ही स्वत: अनुभवल्याने त्याच्या सत्यतेविषयी शंका नाही मात्र त्या अनुभवासोबत पुरवलेली अधिक माहिती चुकीची आहे इतकेच. (उदा. हाय प्रोफाईल बँक वगैरे.) मिपाधर्माप्रमाणे टवाळीचा सूर लागल्यास ते खिलाडूवृत्तीने घ्यावे. हतबलता वगैरे गोष्टींना येथे बहुतेक लोक्स फाट्यावर मारतात. (माझ्यासकट..!!)

In reply to by मोदक

जी उत्तम ट्रीटमेंट इथं मिळते इतर बँकांत मिळाली नाही, म्हणून तसे म्हटले, त्यात चुकीचे काय?

In reply to by संदीप डांगे

मग सर्व्हिस हायफाय आहे असे म्हणा...बँक हायफाय नाहीये रच्याकने याला जर मेगाबायटी उपप्रतिसाद आला तर त्यास फाट्यावर मारणेत येइल =))

In reply to by टवाळ कार्टा

बँक आणि सर्व्हिस वेगळं असतं काय? प्लिज एक्स्प्लेन! (आठ शब्द आहेत, किती बाईट्स झाले?)

In reply to by संदीप डांगे

ज्यांना जिथे सर्विस चांगली मिळते ती चांगली बँक . उद्या एसबीआय चांगली म्हणून मी बोलो कि ती चांगली पण तिथे सर्विस चे काही वेळा काय वांदे असतात माहित आहे . माझपण आहे एसबीआय ला अकाउंट माझ्यामते भारतात पूर्वीपासून व्यवहार करणाऱ्या बहुतेकांकडे असाव. बाकी आयसीआयसीआय आणि एचडीएफसी ह्यांचे व्यवहार लोकांनी पहिले आहेत त्यात आयसीआयसीआय बरी. माझी स्वतःची बहीण मॅनेजर असून मी एचडीएफसी च्या वाटेला जात नाही . तसं पहिला तर सहकारी बँकांमध्ये भारत बँक खूप चांगली आहे मंगलोर कर्नाटक ची आज खूप मोठी बँक आहे. माझ्या शेट्टी मित्रांची हॉटेल आहेत त्यामुळे मलापण आमच्या इथल्या ब्रान्चला चांगली सर्विस असते पण परत तेच ज्याला जे पटेल ती बँक चांगली. जस्ट प्रोफाइल आणि यावरून पाहण्यापेक्षा अनेक बँक चांगल्या सर्विस देत आहेत . माझ्यामते ऍक्सिस पण तिथे माझा अनुभव नाही ऐकून आहे .असो बाकी हाय प्रोफाइल म्हणजे डॉइशे आणि एचएसबीसी वैग्रे वैग्रे .त्यामुळे कोटक ऍक्सिस ने या वेळी चांगली सर्विस दिली आहे याबद्दल दुमत नसावे .

In reply to by टवाळ कार्टा

मला उलटप्रश्न विचारू नका, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तसेच, डोईश बँकेच्या नाशिक ब्रांचला अगदी घाणेरडी ट्रीटमेंट मिळाली तरी बँकेला हाय प्रोफाइल म्हणायचं का? रच्याकने, प्रत्येक शाखेचे अनुभव सारखेच आहेत माझे. 5 वर्ष अकौंट आहे, अनेक ब्रँच मध्ये गेलोय. जाहिरात नाही, अनुभव आहे.

In reply to by टवाळ कार्टा

बहुतेक मोठ्या बँकांची एक हाय प्रोफाइल बँकिंग डिव्हिजन असते ज्याला प्रायव्हेट बँकिंग म्हणतात. यात खातं उघडण्यासाठी कमीत कमी फक्त ५ मिलियन डॉलर्स लागतात. इथे असे खाते आहे का कोणाचे?

In reply to by ट्रेड मार्क

धन्यवाद ह्या माहितीबद्दल! खरंच ठाऊक नव्हतं! माझ्यासारख्याला हायप्रोफाईल म्हणजे रस्त्यावर उभे राहून वडापाव खाणाऱ्याला मॅकडी मध्ये बर्गर खाणे हायप्रोफाईलच वाटेल, पाच मिल्यां डॉलर म्हणजे रुपयात किती याचा हिशोब करतो आधी...

कॉसमॉस बँकेविषयी माझा १५ वर्षाचा अनुभव उत्तम . आज १ तास रांगेत उभा राहिलो. मध्यम वर्गीय माणूस डाम्बिस नाही याची पुनः खात्री पटली. लोक शिस्तीत होते. बॅक कर्मचारी तर पवित्र कर्म करण्याची संधी आली आहे असे वागत होते. मला वाटते या ऐतिहासिक बदलाचा मी साक्षीदार झालो याचा मला अभिमान वा॑टायला हवा. ५०० च्या नोटा आल्या की सगळी कोंडी फुटेल व उद्धव, मुलायम , मायावती, ममता यांच्या हाती उरेल फत्र्या. असाच अनुभव याच दिवशी एच डी एफ सी त आला. पत्नी सिनियर सिटीझन असल्याने प्रवेश लगेच मिळाला. ५ मिनिटात पैसे मिळाले ,पुन्हा लागले पुढच्या आठवड्यात ही मिळतील असा संदेश अधिकार्‍याने दिला. मी त्याला म्हणालो : आज बॅन्कानी देवालाही मगे टाकले अस्तिक व नास्तिक दोघेही लायनीत उभे आहेत. मोदीनी असाच थेट जनतेशी संपर्क ठेवून उमेदवार ,उपकृत कार्यकर्ते यांच्या मिलीभगत ला विराम देऊन एक नवी लोकशाही उभी करावी. पोलिट्कल कम्युनिटी ला आपण सर्वानी मग तिलांजली देउ. !

पैसे भरायचा फार छान अनुभव कल्याण जनता मध्ये आला.कोणीच नव्हते लाईनीत ठाणे-पाचपाखाडी शाखेत. फक्त भरणा चालु आहे. पैसे मिळत नाहीयेत.

पाच दिवस बँकांमध्ये जाण्याची हिम्मत केलीच नाही, केवळ दोन एटीएम ना भेट दिली तर त्यांचे शटर डाऊन होते. ९ तारखे पासून मेडिकलचे एक बील डॉक्टरांची दोन बिले असा होता होईतो चेकवर निभावण्याचा प्रयत्न केला, एका मेडीकल लॅबला अगदी १४० चा सुद्धा चेक दिला, १० तारखेस अडचण आली ती दूर कोरेगाव पार्क (पुण्यात) जाऊन विकिपीडिया संदर्भाने एक भेट उरकण्यासाठी रिक्षा शिवाय तरणोपाय नव्हता, सुट्यांचा ओळखीतून कुठूनच बंदोबस्त होतनाही म्हटल्यावर मुलींनी हळूच त्यांचा गल्ला मोकळा करून तात्पुरती सोय केली. वापस येतानाच्या रिक्षावाल्याने आमच्या मागच्या सिटवरच्या गप्पा ऐकुन नोटा रद्द केल्याने महागाई आणि भ्रष्टाचार कमी होईल का असे विचारले - त्याने मिटरच्यावर आगाऊ ३० रुपये मागितले होते त्यामुळे त्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना त्याचा खरपूस समाचार घेतला :) आमचा रिक्षा प्रवास संपेपर्यंत ओशाळून नंतर तो वरचे पैसे नको म्हणाला पण त्याला थोडी फळे विकत घेऊन देऊन उपकृत केले. महिन्याचे सामान दिवाळीमुळे आधीच आले होते, काम करणार्‍यांनाही दिवाळी बोनस दिला असल्यामुळे महिन्याच्या पगारासाठी आजपर्यंत त्यांनी तग धरला, त्यापैकी एक प्रवासास जाणार होत्या त्यांनी ५०० च्या नोटा स्विकारल्या उरलेल्या दोनांसाठी आज महाराष्ट्र बँके शाखेत जाऊन उभा राहीलो तर तेथे बाहेर आधी नावे लिहुन घेऊन नावांचा पुकारा चालू होता आत गेल्यावर पुन्हा लाईन होती, दहा काढावयाचे होते पण पाचा पेक्षा जास्त देत नाही म्हणाले त्यातही प्रत्येकी १०० च्या केवळ दहाच नोटा दिल्या जात होत्या उर्वरीत व्यवहार केवळ २००० च्या दोन नोटांनी ! डिमोनीटायझेशनच्या फायदे आणि मर्यादांची थेअरॉटीकल कल्पना होतीच पण २००० च्या नोटा न टाळता येणे हे एक, दुसरे घरकाम करणार्‍या स्त्रीया साक्षर नसल्यामुळे कोणतीही नकद-पर्यायी व्यवस्था भारतात अमलात येणे किती कठीण असू शकते शिवाय तिसरे ज्यांच्या साठी बँकेत जाऊन पैसे काढले त्या दोन्ही स्त्रीया पैसे नंतर भिशीतच लावणार हे पण नक्की म्हणजे अप्रत्यक्षपणे अधिकृत मार्गातला पैसा अनधिकृत-भिशी मार्गी लागणे अटळ. असो.

विजया बँकेत अगदी १० - १५ मिनीटात पैसे खात्यावर भरण्याचे काम झाले. काहीही त्रास झाला नाही. मी बँकेत पोहोचलो तेंव्हा नेमका लंच टाईम होता. नंतर लगेचच नंबर लागला आणि पैसे भरून घेतले. पैसे खात्यावर दिसल्याचा मेसेज आला, त्यात पॅन नंबर पण दिसत होता. तसेच, मी जाताना मुद्दाम पॅन कार्डची झेरॉक्स नेली होती. ५० हजार पेक्षा कमी रक्कम आहे तर पॅन कार्ड कशाला हवे, केवायसी आहे की वगैरे हुज्जत घालण्यात बँक कर्मचार्‍यांचा वेळ घेणे पटले नाही.

In reply to by मोदक

एसबीआय ला च काय वशाडी आलीय रांग ५ व्या दिवशी पण कायम आहे ,चिंचवड गावात शाखा उघ्डून अजून उणी पुरी ४ वर्षेच झालीले हैत.तरी इतकी गर्दी का तेच कळेना..काही गणंग पुन्हा पुन्हा येतायत का,पैसे बदलून घ्यायला ते शोधायला पाहिजे बँकेनी आणि शाईचं बूच मारायलाच हवे. गेली २५ वर्षे एस्बीयाशी एकनिष्ठ असलेला नाखु

In reply to by नाखु

काही लोक पुन्हा पुन्हा आपले नाही तर दुसर्‍याचे - बोलवित्या धन्याचे पैसे भरायला येत आहेत.पण अशापेक्षा असली ग्राहकांची सम्ख्या जास्त आहे. दरम्यान वाटस अ‍ॅप वर २०१९ पासून आयकर पूर्णपणे बंद तो पर्यंत ५ लाख करमुक्त असा मेसेज फिरू लागला आहे.

सकाळी ११ वा. आमच्या बँकेत गेलो. तिथे नोटा बदलण्यासाठी एक रांग आणि बँक अकाऊंट होल्डर साठी दुसरी अशा दोन रांगा होता. उन्हातान्हात लोक तापत होती. मॅनेजरला विचारले तर तो म्हणाला की शामियाना लावायला सांगितला आहे पण एक दोन दिवस लागतील. मग त्यालाच विचारुन काही मदत हवी आहे काय ते विचारले. सुरुवातीला तो नाही म्हणाला पण मी सांगितले की माझ्याकडे वेळ आहे. हवे तर मी रांगेला मॅनेज करुन देण्याचे काम करु शकतो, तुमची परवानगी असेल तर. मग तो तयार झाला. त्याच्याकडून बेसीक माहिती घेतली. साधारण ११ ते ३ अशी चार तास रांगेतल्या लोकांना फॉर्म वाटणे, त्यावर टोकन नंबर टाकणे, फॉर्म भरायला मदत करणे, मधे घुसणार्‍यांना परत मागे पिटाळणे इत्यादी कामे केली. ४ तासात साधारण १५० (बँकेच्या) ग्राहकांनी पैसे बदलले. ४ तासांतील काही निरीक्षणे : १. मी ठाणे घोडबंदर रोड येथे राहतो. बँक देखील ह्याच भागात. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर बंगाली भाषेतील मतदान ओळखपत्रे पाहिली. एवढ्या प्रमाणात बंगाली बांधव माझ्या आजुबाजुला राहतात याची मला कल्पनाच नव्हती. एकाकडेही पॅन कार्ड किंवा आधार कार्ड नव्हते. ओन्ली निवडणूक आयोगाचे ओळखपत्र ! २. एक गुंठामंत्री : अरे आमच्या जागेवर ही बॅंक उभी आहे तरी तुम्ही आम्हाला लायनीत उभे करता ? असे वारंवार सांगत होता. त्याला नम्र भाषेत सांगीतले की बाबारे, आपल्या कोणाच्याही कपाळावर आपण कोण आहो ते लिहिलेले नाही. त्यामुळे तुम्ही जागामालक आहात हे मला आणि सरकार दोघांनाही माहित नाही. त्यामुळे प्लीज रांगेत उभे राहा. यावर तो धुसपुसत का होईना पण रांगेत उभा राहिला. ३. एक रिक्षावाले यादव काका म्हणाले की सिनिअर सिटीझनला आणि बायकांना वेगळी लाईन का नाहीये ? मी सांगीतले की साहेब, या शाखेत मुळातच एक काऊंटर आहे. त्याला वाढवून सध्या दोन काऊंटर बनविली आहेत. सगळ्यांसाठी वेगळे वेगळे काऊंटर आता बनविणे शक्य नाही. त्यावर तो मला म्हणाला की मी सिनियर सिटीझन आहे मला पुढे सोडा. पुरावा विचारल्यावर त्याने मला त्याचे पांढरे केस दाखविले. उत्तरादाखल मी पण त्याला माझे रंगविलेले आणि त्याखाली लपलेले पांढरे केस दाखविले. आणि पॅनकार्ड बघीतले तर त्याचे वय ५२ होते. त्यामुळे त्याला पुढे सोडले नाही. अजुन काही वर्षांनंतर तुम्ही २००० ची नोट बदलायला याल तेव्हा तुम्ही सिनियर सिटीझन व्हाल तेव्हा नक्की सोडेन असे सांगीतले.. ४. एक युपीवाले काका टोकन देऊनही सावलीत बसायला तयार होईनात. त्यांचा टोकन नंबर ५१. पण अगदी सुरुवातीपासूनच रांगेत उभे राहिले. त्यांना वेळोवेळी समजावले पण त्यांनी ऐकलेच नाही. शेवटी प्रत्येकाने त्यांना आपापले टोकन क्रमांक दाखवत मागे ढकलत ढकलत योग्य क्रमांकावर आणून पैसे घ्यायला लावले. ५. एक शेटीया : हा आपल्या दुकानातील पुर्ण कामगारांची फौज घेऊन आला आणि प्रत्येकाला रांगेत उभे करुन पैसे बदलून घेतले. साधारण ८-१० कामगार. दोन तीन सिनियर आणि एक आजारी महिला यांना रांगेत उभे न राहता पुढे जाता आले. मधेच भाजपावाले येऊन दोन तीन बॉक्स पाण्याच्या बाटल्या वाटून गेले. आता निवडणूकीत पैशाची खोकी नाहित तर पाण्याची खोकी घ्या असे काहीजणांना सांगताच लोकांच्या तोंडावर हसू पसरले. आमच्या बाजुचा हुसेन गादीवाला पैसे काढायला आला तेव्हा त्याला सांगीतले की बाबारे आता तु थोडे दिवस बँकेत पैसे काढायला येऊ नकोस. त्याऐवजी लोकांच्या गाद्या भंगारात विकायला निघतात काय यावर लक्ष ठेव. न जाणे तुला मोठे घबाड सापडेल. एकंदरीत आज २००-३०० लोकांचा जवळून अनुभव घेतला पण कोणीही चुकुन राजकीय चर्चा किंवा ह्या निर्णयावर नाराजगी व्यक्त करणारे स्टेटमेंट केले नाही. शांततेत नोटा बदलून घरी गेले. एकंदरीत आज लष्कराच्या भाकर्‍या भाजण्यात मज्जा आली. मी पाहिलेला आकडा कदाचित फारच कमी आहे आणी शहरी विभागातील आहे. ह्या सँपल सेटवरुन "जनता अजिबातच नाराज नाहीच किंवा जनता फारच नाराज आहे" अशा कोठलयाही प्रकारचे निरि़क्षण मी येथे नोंदवत नाहीये याचा राजकीय दृष्टीकोनातून धागे / प्रतिसाद वाचणार्‍यांनी कृपया नोंद घ्यावी.

In reply to by धर्मराजमुटके

एक गुंठामंत्री : अरे आमच्या जागेवर ही बॅंक उभी आहे तरी तुम्ही आम्हाला लायनीत उभे करता ? असे वारंवार सांगत होता. त्याला नम्र भाषेत सांगीतले की बाबारे, आपल्या कोणाच्याही कपाळावर आपण कोण आहो ते लिहिलेले नाही. त्यामुळे तुम्ही जागामालक आहात हे मला आणि सरकार दोघांनाही माहित नाही. त्यामुळे प्लीज रांगेत उभे राहा. यावर तो धुसपुसत का होईना पण रांगेत उभा राहिला.
हे शाब्बास!

In reply to by धर्मराजमुटके

पुरावा विचारल्यावर त्याने मला त्याचे पांढरे केस दाखविले. उत्तरादाखल मी पण त्याला माझे रंगविलेले आणि त्याखाली लपलेले पांढरे केस दाखविले.>>>>> --- वाचून मज्जा आली.

In reply to by धनावडे

पहिल्या पासून शिवसेनेच्या नेत्रुत्वावर "डॉन असल्याचा आरोप फार जुन्या काळापासून आहेच. खाजगी माध्यमे नेहमी नकारात्म बाजू दाखवितात कारण तिला न्यूजचे मुल्य असते. आपण सुद्धा एखाद्या माणसाने रेलेवेखाली जीव दिला तर पुलावर आपली दुचाकी थांबवून डोकावून पहातो. पण कोणी उन्हाऴ्यात थंड पाणी वाटत असेल तर आपली दुचाकी तिथून चटकन पुढे सरकते.

In reply to by चौकटराजा

खाजगी माध्यमे नेहमी नकारात्म बाजू दाखवितात कारण तिला न्यूजचे मुल्य असते. आपण सुद्धा एखाद्या माणसाने रेलेवेखाली जीव दिला तर पुलावर आपली दुचाकी थांबवून डोकावून पहातो. पण कोणी उन्हाऴ्यात थंड पाणी वाटत असेल तर आपली दुचाकी तिथून चटकन पुढे सरकते. +१११

In reply to by धर्मराजमुटके

>>५. एक शेटीया : हा आपल्या दुकानातील पुर्ण कामगारांची फौज घेऊन आला आणि प्रत्येकाला रांगेत उभे करुन पैसे बदलून घेतले. साधारण ८-१० कामगार. विचार करा एखादा लेबर कॉन्ट्रॅक्टर दहा जणांना घेऊन रोज एका बँकेत जाऊन चार हजारच्या रेटने ४० हजार बदलून घेईल ४५ दिवसात १८,००,००० बदलता येऊ शकतील; पैसे बदलून घेणार्‍यांना निवडणूकवाली शाई लावण्याची गरज प्रथमदर्शनी पटली नव्हती पण आता समजली !

In reply to by संदीप डांगे

>>रोज 4500 बदलायची परवानगी आहे. बहुधा तसे नसावे. ४५०० एकदाच बदलण्याची परवानगी आहे. वेगवेगळ्या ब्रँच/बँकमधून एकाच व्यक्तीने पुन्हा पुन्हा बदलल्यास तसे होऊन नये म्हणून ट्रॅक करण्याची व्यवस्था उपलब्ध नाही म्हणून समस्या आहे. शाई लावलेली असल्यास बँक / पोस्ट कर्मचार्‍याच्या सहकार्या शिवाय उपद्व्याप करणे कठीण होऊ शकते हे खरे. अर्थात सामान्य जनतेची प्रतिक्रीया काय असेल हे सांगणे तुर्तास कठीण वाटते.

In reply to by माहितगार

मला ही शंका निर्णय जाहीर झाला तेव्हाच आली कि एक माणूस वेगवेगळ्या बँकामध्ये जाऊन दोन दोन हजार काढून आणू शकतो. पण मला वाटल कदाचित त्याच्या PAN कार्ड वर ट्रेस करणार असतील. हे शाई लावण आधीच सुचायला हव होत. आज न्यायालयाने ही पैसे काढण्यावर लावलेली लिमिट का आहे असा सरकारला प्रश्न विचारला आहे. न्यायालय कॉमन सेन्स वापरत नाहीत काय?

In reply to by सही रे सई

न्यायालयात जे काही बोललं जातं त्याची नोंद होते. त्यामुळे जरी उत्तर माहित असेल तरी प्रश्न विचारला जातो, त्यामुळे प्रश्न आणि उत्तर दोन्हीची नोंद होते. त्यामुळेअगदी बाळबोध वाटणारे किंवा "काय हे एवढं पण माहित नाही" असं वाटू शकणारे प्रश्न पण विचारले जातात. नंतर कोणी असं पण म्हणू शकतं ना की तुम्ही विचारलं नाही म्हणून मी सांगितलं नाही, त्यामुळे ही अवांतर काळजी घेतली जात असेल.

In reply to by ट्रेड मार्क

नोंद होण्यासाठी असा प्रश्न विचारला असेलही पण नकारघंटा वाजवणारे लोक याचे वेगळेच अर्थ काढून असाही अर्थ काढू शकतील कि बघा हे न्यायालयाला पण हे पसंत नाही किंवा न्यायालयाने पण या वर आक्षेप घेतला. त्यामुळे न्यायालयाने पण आपल्या वाक्यांचा काय अनर्थ काढला जाईल हे विचार करून काही वेळा बोलावे किंवा प्रश्न विचारावे असे वाटते.

In reply to by सही रे सई

सध्या अश्या नकारात्मक लोकांचं पेव फुटलंय. त्यातले बरेच पत्रकार आणि संपादक म्हणून मिरवत आहेत. पण त्यामुळे न्यायालय आपली प्रथा बदलेल असं वाटत नाही. जर कोणी असा न्यायाधीशाला काही कळतं की नाही किंवा अजून काही उलटसुलट अर्थ काढला तर "अदालत की तौहीन" अंतर्गत शिक्षा सुनावतील. अर्थात त्यावरूनही रान उठेलच. ;)

In reply to by धर्मराजमुटके

सुरुवातीला तो नाही म्हणाला पण मी सांगितले की माझ्याकडे वेळ आहे. हवे तर मी रांगेला मॅनेज करुन देण्याचे काम करु शकतो, तुमची परवानगी असेल तर. मग तो तयार झाला. त्याच्याकडून बेसीक माहिती घेतली. साधारण ११ ते ३ अशी चार तास रांगेतल्या लोकांना फॉर्म वाटणे, त्यावर टोकन नंबर टाकणे, फॉर्म भरायला मदत करणे, मधे घुसणार्‍यांना परत मागे पिटाळणे इत्यादी कामे केली.
हे फार आवडलं. सरकारला आणि बँकांना जसजशा प्रॅक्टिकल अडचणी कळत जातील तसतसे ते मार्ग काढत जातील. तो पर्यंत तुमच्यासारखे लोकं हे सोपं करण्याचा त्यांच्या परीने प्रयत्न करतायेत हे कौतुकास्पद आहे. इथले बरेच प्रतिसाद सकारात्मक आहेत, चांगले अनुभव आल्याचंच सांगतायेत. पण इतर थोडा नाराजीचा सूर लावणारे पण आहेतच. त्यातले राजकारणी सोडले तरी एकुणच मला वाटतं की खास करुन बँक कर्मचार्‍यांना, हे सगळं गणित सोडवायला थोडा तरी वेळ द्यायला हवा. त्यांच्यावर पण आपल्याबरोबरच ही बातमी आदळली आणि २ च दिवसांच्या अवधीत त्यांना कार्यवाही पण सुरु करावी लागली आहे. कदाचित त्यांच्याकडे ऐन वेळी स्टाफ नसणे, नोटा कमी पडणे, छोटी ब्रान्च असल्याने मुळातच एवढ्या गर्दीला हाताळण्यासाठी आवश्यक साधनं नसणे हे अगदी स्वाभाविक आहे. आणि कुणी सध्या तक्रार ही करत नाहीये. आज बातमी आलीये की सगळे टोल्स, आणि आंतरराष्ट्र्य विमानतळाची पार्किंग्ज २४ नोव्हेंबरपर्यंत फ्री असणार आहेत, तेवढीच कॅश कमी लागेल. माझ्या तुटपुंज्या का होईना पण एकुण अनुभवावरुन तरी असं माझ्या लक्षात आलंय की व्हॉल्युमला सांभाळायचं जे उपजत कौशल्य आपल्या व्यवस्थेकडे आहे, ते इतर अनेक ठिकाणांपेक्षा खुपच बरंय. आता पुढच्या भारतवारीत घरी येईपर्यंत कदाचित उधारीचं जीवन जगावं लागेल ;) पण हरकत नाही.

विश्वेश्वर बँक नव्यानेच शाखा सुरू झालीय. रविवारी दोनहजार मिळाले (शंभरीचे) अजमेरा, मासूळकर नेहरूनगर कोणतेही एटीएम उघडत नाहीत. आयसीआयसीआयचे रविवारी रात्री उघडले होते एक तास.

In reply to by विनटूविन

लाक्कीया! वापरून टाका सगळे शक्य असेल तिथे, तेवढीच चिल्लर फिरेल

हाफ़ीसतल्या बँकेत 4000 जमा केले. सेल्फ चेकने 7500 काढले. पाऊण तासात काम झाले. एटीएमवर जाण्याच्या भानगडीत पडलो नाही अजून. जवळच्या अकरा पाचशेच्या नोटा पेट्रोल पंपावर वापरत आहे, आठ गेल्या, तीन बाकी आहेत. भाजी सोडली तर सगळ्याच गोष्टी कार्डने भागत आहेत.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

सेल्फ चेकने जे पैसे काढलेत त्या नोटा कोणत्या डिनॉमिनेशन मध्ये? अजून आता सेल्फ चेकने इतक्यात पैसे काढले नाहीत, म्हणून विचारत आहे.

In reply to by यशोधरा

पण दोन हजाराच्या अनिवार्य करीत नाहीत्,अगदी दहा हजार काढणार असाल तर एक दोन नोटा दोन हजाराच्या घेतल्या तरी चालतील.मी ७००० काढताना एक २ हजाराची व उर्वरित १०० च्या ५० असे मिळाले. परिचयातील २-३ लोकांना ५०० उधार दिले आहेत. पोष्टात प्रयत्न करून पहा बदलायच्या असतील तर, आणि पैसे काढायचे असतील तर फक्त आपल्याच शाखेतून (जिथे खाते आहे तिथून्च काढता येतील) भरणा रक्कमेसाठी होम ब्रँच मध्ये खाते असेल तर कितीही भरू शकता पण इतरत्र (त्याच बँकेच्या इतर शाखेत खाते) असेल तर मर्यादा २५००० (पंचविस हजार) आहे हा एस्बीआयच नियम आहे बाकी बँकेत काय नियम आहे माहित नाही. खुलासेदार नाखु

In reply to by नाखु

ठीक आहे नाखु, धन्यवाद. पहिल्यांदा ४,००० आणले तेच पुरत आहेत अजून. बघू, पुढील आठवड्याच्या शेवटी वगैरे जावे लागेल.

In reply to by यशोधरा

जर बँकेकडे शंभर, पन्नास, वीस आणि दहाच्या नोटा उपलब्ध असतील तर थोड्या नोटा देतात. मी परवा बावीस हजार काढले मुलाची शाळेची फी भरायची आहे आणि घरखर्चासाठी म्हणून. माझ्या आधी रांगेत उभे होते त्यांना दोन हजाराच्याच नोटा देत होते. पण माझा नंबर येण्याआधी बँकेत नवीन रोख रक्कम आली. त्यात शंभर, पन्नास, वीस आणि दहाच्या नोटा होत्या. मला पाच दोन हजाराच्या नोटा दिल्या आणि पन्नासचे दोन बंडल आणि वीसचे एक असे दिले.

हाफ़ीसतल्या बँकेत 4000 जमा केले. सेल्फ चेकने 7500 काढले. पाऊण तासात काम झाले. एटीएमवर जाण्याच्या भानगडीत पडलो नाही अजून. जवळच्या अकरा पाचशेच्या नोटा पेट्रोल पंपावर वापरत आहे, आठ गेल्या, तीन बाकी आहेत. भाजी सोडली तर सगळ्याच गोष्टी कार्डने भागत आहेत.

हाफ़ीसतल्या बँकेत 4000 जमा केले. सेल्फ चेकने 7500 काढले. पाऊण तासात काम झाले. एटीएमवर जाण्याच्या भानगडीत पडलो नाही अजून. जवळच्या अकरा पाचशेच्या नोटा पेट्रोल पंपावर वापरत आहे, आठ गेल्या, तीन बाकी आहेत. भाजी सोडली तर सगळ्याच गोष्टी कार्डने भागत आहेत.

मी सुद्धा जवळच्या hdfc बँकेत गेलो. माझ्याकडे ७ हजार होते आणि तेही 100 च्या नोटा.. मला तूर्तास जास्त कॅश ची गरज नसल्याने ४ बँकेत भरले. ना जाणो कोणाला कामास येईल हा हेतू. बाकी उरलेले मित्रांना दिले आणि त्यांच्याकडून बँक ट्रान्सफर करून घेतले..

In reply to by DeepakMali

तुमच्यासारखे दोन पाऊलं जास्त पुढे जाऊन मदत करताहेत... वेल डन.

वाचकां पर्यंत माहिती पोहचावी म्हणुन दुसर्‍या धाग्यात दिलेली लिंक इथे सुद्धा देत आहे... The question that still need to be answered is; are the new Indian currency notes printed with the involvement of blacklisted Crown Agent companies who supplied and were the source of fake notes for Pakistan at the expense of India’s National Security? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- The Secret World Of Indian Currency Printers

व्हाट्सअप वर तर एक बहाद्दराने रु.६०, रु.७५, रु.१०० आणि रु.१५० चे फोटो टाकले आहेत... वर्तमान पत्रे चाळली पण विदा नाही मिळाली... कोणाला अधिक माहिती आहे का?

In reply to by विशुमित

असो..मला विदा मिळाली आहे ...ही स्मृत्यर्थ असलेली नाणी आहेत.. (वरच्या प्रतिसादात "नाणी" टाकण्याचे राहून गेले आहे) http://www.telangananewspaper.com/125-rs-coin-launched-modi/

bom (तेच ते चितळे समोरील) मधून सुदैवाने जास्त लायनीत थांबावे न लागता आणलेली २००० ची नोट बघत निवांत वाट पाहत आहे, बरेच atm बंदच आहेत, Icici मध्ये जास्तीचे असिस्टंट्स नेमले होते, ते सौजन्याने वागत, मदत करत होते, ज्यांचे तिथे अकाउंट्स आहेत त्यांचे काम लगेच होत होते, गर्दी असून मॅनेज होत होतं. रोज बँकांचे मेसेज न चुकता येतायत, असं करा तसं करा, आम्ही सेवेसी तत्पर आहोत :) गेल्या आठ दिवसांत जेमतेम दोन तीनशे रुपये खर्च केले असतील, बाकी लागेल तिथे कार्ड, कामे खोळंबलीयेत पण डोक्याला शांतता तेवढीच.

काल ज्या बँकेत सेवा केली तिथेच आज खात्यावरुन पाच हजार काढले. फार गर्दी नव्हती. १० मिनिटात काम झाले. एक माणूस नव्या २००० च्या नोटा भरणा करण्यासाठी आला तर कॅशीयरने नव्या नोटा आत्ता लगेच डिपॉजिट करता येणार नाही असे सांगीतले. काय कारण असावे बरे ?

In reply to by धर्मराजमुटके

आमच्या दूधवाल्याने पण नवी २००० ची नोट घ्यायला नकार दिला. बँकेत भरणा करून घेतील याची ग्यारंटी नाय, म्हणाला.

In reply to by धर्मराजमुटके

मी आज नव्या नोटा एच डी एफ सी बँकेत भरल्या.रांगेत बसून माझ्या कडे असलेल्या जुन्या नोटा हि भरल्या. दोन्हीला वेगळी स्लिप भरून दिली होती. काहीच प्रश्न नाही उद्भवला.

८ तारखेला ही घोषणा झाल्यापासून बँकेत / एटीएममध्ये गेलोच नव्हतो. हजारेक रुपये जवळ होते, त्यात भागवत होतो. तीन-चार दिवसांत सर्व काही मूळपदावर येईल असं वाटत होतं. मग आम्ही दोघांनी ८ तारखेपासून रवींद्र नाट्य मंदिरमधल्या पु.ल. कला महोत्सवाच्या कार्यक्रमांना शनिवार वगळता रोज हजेरी लावली. मस्त एन्जॉय केलं. पैसे वगैरे शब्दश: विसरून गेलो होतो. बस प्रवासाचा काय तो थोडा खर्च होत होता. पण इतके दिवस झाले, तरी बँका-एटीएमसमोरची गर्दी कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचं दिसत होतं. पैसेही संपत आले. शेवटी आठ दिवसांनी आज सकाळी ९ वाजता बँकेसमोर रांगेत नंबर लावला. सव्वाबारा वाजता नंबर लागला. ५००च्या नोटा खात्यात भरल्या. नोटा बदल होणार नाही, विड्रॉवल स्लिपद्वारे / स्वयंचेकद्वारे फक्त साडेचार हजार रुपये (त्यात २०००च्या दोन आणि शंभराच्या पाच नोटा) काढता येतील, असं ज्ञानामृत मिळालं. मग थोडं डोकं चालवून साडेतीन हजाराची मागणी केली, तेव्हा २०००ची एक, शंभराच्या दहा आणि पन्नासच्या दहा असे साडेतीन हजार मिळाले. बायकोला एका खाजगी बँकेमध्ये ५००च्या नोटा बदलून १००च्या नोटा मिळाल्या. एकूणच खाजगी बँकांमध्ये नम्र सेवा, राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये थोडा सरकारी खाक्या, तर सहकारी बँकांमध्ये परिस्थिती मॅनेज करणं अवघड... असं सर्वसाधारण निरीक्षण. या आठ दिवसांमध्ये सामान्य लोकांनी – रोख कमाईवर रोज अवलंबून असलेले दूधवाला, भाजीवाला या लोकांनी उधारी देण्याची तयारी दाखवली. हे लोक खरे असामान्य वाटले. आज एक गंमत – भरघोस वाढलेल्या माझ्या पांढर्‍या दाढीमुळे, पोलिसांनी मला ज्येष्ठ नागरिक समजून आत सोडायची तयारी दाखवली. पण मी ज्येष्ठ नागरिक नाही असं नम्रपणे म्हणून मी रांगेत उभा राहिलो. मग सव्वातीन तासांनी माझा नंबर आल्यावर ज्या आदराने, सन्मानाने पोलिसाने मला आत सोडलं, त्याचं समाधान मला नोटा मिळाल्याच्या समाधानापेक्षा जास्त वाटलं.