Skip to main content

अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ निकाल

लेखक गॅरी ट्रुमन यांनी सोमवार, 07/11/2016 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, अमेरिकेत मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी अध्यक्षीय निवडणुकांसाठी मतदान होईल. भाप्रवे सकाळी ५.३० पासून मतमोजणी सुरू होईल. दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडायच्या प्रायमरी सुरू झाल्यानंतर मिपावर त्याविषयी लिहायला सुरवात केली होती पण नंतर इतर काही कामांमुळे त्या धाग्यांवर पाहिजे तितक्या प्रमाणात लिखाण करता आले नव्हते. तेव्हा निदान भारतातील निवडणुकांच्या मतमोजणीप्रमाणे अमेरिकेतल्या या निवडणुकांच्या मतमोजणीवर लाईव्ह धागा काढावा हा मानस आहे. शक्य झाल्यास बुधवारी रजा घेऊन या धाग्यावर जसेजसे निकाल येतील त्याप्रमाणे लिहिणार आहे. जरी रजा घेता आली नाही तरी कल स्पष्ट होऊन कोण अध्यक्षपदी विराजमान होणार हे नक्की झाल्यावरच ऑफिसला जायला निघणार आहे :) अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये इलेक्टोरल कॉलेज हा महत्वाचा घटक असतो. याविषयी मी मिपावर पूर्वी इथे लिहिले आहे. या निवडणुकांसाठी इलेक्टोरल कॉलेजमध्ये पुढीलप्रमाणे मते आहेतः Electoral College सध्याच्या विविध मतदानपूर्व चाचण्यांमध्ये पुढीलप्रमाणे परिस्थिती असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे: Projections वरील चित्रात डेमॉक्रॅटिक पक्षाचे बालेकिल्ले असलेली राज्ये गडद निळ्या रंगाने तर रिपब्लिकन पक्षाचे बालेकिल्ले असलेली राज्ये गडद लाल रंगात दाखविली आहेत. तसेच डेमॉक्रॅटिक पक्षाच्या बाजूने झुकणारी राज्य फिक्या निळ्या रंगाने तर रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने झुकणारी राज्य फिक्या लाल रंगाने दाखविली आहेत. तर चुरस असलेली राज्ये पिवळ्या रंगाने दाखविली आहेत. नेब्रास्का आणि मेन राज्यात इलेक्टोरल कॉलेजमधील मते विभागली जातात तर इतर सर्व राज्यांमध्ये विजयी उमेदवाराला संबंधित राज्यातील सर्व मते मिळतात. नेब्रास्कामधील ५ मतांपैकी ४ मते रिपब्लिकन पक्षाला निश्चितपणे मिळतील तर पाचव्या मतासाठी चुरस असेल तसेच मेनमधील ४ मतांपैकी ३ मते डेमॉक्रॅटिक पक्षाला निश्चितपणे मिळतील तर एक मत रिपब्लिकन पक्षाकडे झुकणारे असेल असा चाचण्यांचा अंदाज आहे. सर्व आकडे एकत्र केल्यावर डेमॉक्रॅटिक पक्षाला निश्चितपणे २०० मते तर रिपब्लिकन पक्षाला निश्चितपणे १५७ मते मिळतील. तसेच ६८ मते डेमॉक्रॅटिक पक्षाकडे झुकणारी असतील तर ४७ मते रिपब्लिकन पक्षाकडे झुकणारी असतील. या राज्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे निकाल लागले तर हिलरींना २६८ तर ट्रम्प यांना २०४ मते मिळतील तर उरलेल्या ६६ मतांसाठी चुरस असेल. तेव्हा डॉनल्ड ट्रम्प यांना जिंकायचे असेल तर ही सगळी ६६ मते (अ‍ॅरिझोना, फ्लॉरीडा, न्यू हॅम्पशायर, नेवाडा, नॉर्थ कॅरोलायना आणि नेब्रास्कामधील चुरस असलेले एक) जिंकावी लागतील तर हिलरींना चुरस असलेल्या राज्यांपैकी एक राज्य जिंकले तरी चालणार्‍यातले असेल. तेव्हा सध्याचा अंदाज असा दिसत आहे की अध्यक्षपदी हिलरी क्लिंटन येतील. प्रत्यक्ष काय होते हे भाप्रवे प्रमाणे बुधवारी समजेलच.

वाचने 49960
प्रतिक्रिया 171

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन, कोणीही येवो, रिपब्लिकन मतदारांची निराशाच होणार आहे. ट्रंप नावापुरतेच रिपब्लिकन आहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ट्रंप नावापुरतेच रिपब्लिकन आहेत.
हो डॉनल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन असले तरी फ्री ट्रेडचा विरोध करत आहेत. तसेच इमिग्रेशनच्याही विरोधात आहेत. यापूर्वी रिचर्ड निक्सन हे मध्याच्या उजवीकडच्या लोकांच्या गळ्यातले ताईत होते. पण त्यांनीच किंमतींवर नियंत्रण लावण्यासारखे उजवे लोक कडाडून विरोध करतात ते निर्णय घेतले होते. ट्रम्प निवडून आले तरी रिपब्लिकनांपेक्षा अपेक्षित असलेले निर्णय ते घेणे कठिणच आहे. रॉनाल्ड रेगन यांची अफगाणिस्तानप्रकरणातील भूमिका कितीही पटत नसली तरी त्यांच्यानंतर हाडाचा रिपब्लिकन अध्यक्ष झाला नाही असेच म्हणायला हवे.

In reply to by गॅरी ट्रुमन

निक्सन हे प्रचंड भारतद्वेष्टे होते आणि त्यांच्या सगळ्या निर्णयांमध्ये या त्यांच्या वैयक्तीत द्वेषाची मोहोर उमटत असे. हिलरी देखील तशाच प्रतीच्या भारतद्वेष्ट्या असल्याने अमेरीकेतील हिंदू असोसिएशनने ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

गॅरी ट्रुमन यांच्या या धाग्याची अपेक्षा होतीच. प्रायमरीपासून घडलेल्या अनेक अनपेक्षित घटनांनी आणि उमेदवारांबद्दलच्या सतत येणार्‍या बर्‍यावाइट बातम्यांमुळे ही निवडणुक माध्यमांत सतत खळबळजनक राहिली आहे. प्रत्यक्षात काय घडते आहे (निकालाइतका मतदान-ते-निकाल हा प्रवासही इव्हेंटफुल असेल असा अंदाज आहे ;) ) ते बघायला पुढचे दोन-तीन दिवस (कायदेशीर पेचप्रसंग निर्माण झाल्यास अजून काही दिवस) माध्यमांना आणि या धाग्याला चिकटून न राहणे अशक्य आहे ! :)

एका अमेरिकन प्राध्यापकाने केलेले हे भाकित बहुतेक मिपाकरांनी वाचले असेल . त्याच्या मॉडेल प्रमाणे ट्रम्प विजयी व्हायला हवेत. त्याला स्वतःला हे आवडत नाही पण त्याचे मॉडेल गेल्या १०० वर्षांच्या निवडणुकीच्या बाबतीत खरे उतरले आहे. http://www.ndtv.com/world-news/this-election-keeps-me-sleepless-top-pol…

In reply to by रमेश आठवले

शंभर नाही ३०

जर विविध सर्वेक्षणे पाहीली तर हिलरी क्लिंटन निवडून येण्याची शक्यता अधिक आहे. पण जर मतदारांनी मनातले सांगितले नसले तर गोष्ट वेगळी आहे! आणि या वेळेस ती देखील एक शक्यता होऊ शकते कारण हिलरी आवडत नाही म्हणून भले ट्रंपना मत देयचे ठरवले तरी ते तसे जाहीर सांगणे हे ट्रंपच्या इतर वागणुकीमुळे अनेकांना लाजिरवाणे वाटत आहे. टिव्हीवर पाहीलेल्या रँडम कार्यक्रमात अलिप्त/स्वतंत्र "तज्ञांनी" हिलरीला २९० पासून ते ३२५ पर्यंत मते मिळतील म्हणून सांगितले आहे. ट्रंपच्या बाबतीत कुणालाच कुठलाच विश्वास नाही. म्हण जे ते निवडून येऊ शकतात पण का ते माहीत नाही. फक्त त्यांना निवडून येण्यासाठी हिलरीपेक्षा अधिक आव्हानात्मक परीस्थिती आहे हे नक्की!

या प्राध्यापकाने त्याचे मॉडेल तयार केल्या नन्तर मॉडेलच्या आधीच्या अध्यक्षीय निवडणुकांच्या बाबतीत वापरून पाहिले आणि त्यात ही ते खरे उतरले असे माझ्या वाचनात आले आहे.

धन्यवाद साहेब. तुमचे मेहनत आणि analysis छान आहे. निकाल 1 दिवसातच कळणार का? औपचारिक निकाल आणि अनौपचारिक असे काही असते का? म्हणजे मी असा वाचल्याचं ऐकलेल कि निकाल डिसेंबर मध्ये आहेत म्हणून.

In reply to by John McClain

  1. जर सगळे सुरळीत पार पडले तर मंगळवारच्या (नोव्हेंबर ८ च्या) रात्रीच्या बारापर्यंत (बॉस्टन टाईम) राष्ट्राध्यक्षिय निवडणुकीचा निकाल लागला असेल. काँग्रेस आणि सिनेटचे निकाल कळायला बुधवार सकाळ उजाडेल.
  2. पण जर का काही गडबड झाली: म्हणजे कुठल्याही राज्यात दोघांमधील इलेक्टोरल कॉलेज मधला फरक नगण्य असेल, तर निवडणुक प्रक्रीयात आपोआप फेरमोजणी करावी लागते. तसे झाले तर निकाल लागायला उशीर होऊ शकतो.
  3. त्याही पुढे जर कुठल्याही बाजूमुळे न्यायालयीन युद्ध सुरू झाले तर कितीही रेंगाळू शकते. कारण त्यामधे खालच्या कोर्टापासून सुरवात होऊन सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटला सरकत जाणार. तिथे रिपब्लिकन पक्षाने ओबामाला न्यायाधिश नेमून न दिल्याने ८ न्यायाधिश आहेत. त्यातील चार हे उजव्या विचारांचे अथवा रिपब्लिकन राष्ट्राध्यक्षांनी नेमलेले आहेत तर ४ डेमोक्रॅट राष्ट्राध्यक्षांनी. परीणामी जर त्यांच्यातले मत टाय झाले तर बोंब!
  4. ते काही झाले तरी घटनेनुसार २० जानेवारी २०१७ हा ओबामाचा राष्ट्राध्यक्ष म्हणून शेवटचा दिवस आहे. जर तो पर्यंत राष्ट्राध्यक्ष ठरला नाही, तर अमेरीकन काँग्रेसचा सभापती हा राष्ट्रध्यक्ष होतो. तो कोण असेल हे उद्याच्या निवडणुकीत बहुमत कुणाला मिळते यावर आणि पक्षांतर्गत राजकारणावर अवलंबून राहील!
यातील १ आणि २ इतकेच मुद्दे अपेक्षित आहेत. पण तसे काय ट्रंप राष्ट्राध्यक्षिय उमेदवार होणे पण अनपेक्षित होते आणि तरी झाले! तेंव्हा काही बोलता येत नाही! ;)

शक्य झाल्यास बुधवारी रजा घेऊन या धाग्यावर जसेजसे निकाल येतील त्याप्रमाणे लिहिणार आहे.
बाकी निवडणुकीच्या निकालाचं सोडा पण निवडणुकीवर लिहिण्यासाठी एक दिवस रजा घेणार आहे हे वाचून ड्वाले पानावले! :) इथं शिंदळीचं सर्कार मतदानाच्या दिवशीदेखील सुट्टी देत नाही. कामाअगोदर, नंतर, किंवा लंचटाईममध्ये मतदान करावं लागतं!! :( त्या पार्श्वभूमीवर मतदानावर लिहिण्यासाठी सुट्टी घेण्याचा बेत् वाचल्यामुळे मुद्दाम लॉग-इन होऊन प्रतिसाद दिला. लगे रहो..

In reply to by पिवळा डांबिस

आमचा एक दोस्त लोकांनी गेल्या वीकांतालापण मत दिलं असं म्हणत होता. ही काय भानगड आहे?

In reply to by अनुप ढेरे

अमेरिकन निवडणूकीत मतदानाचा दिवस म्हटला जाणारा दिवस (उदा, आताचा ८ नोव्हेंबर) हा खरेतर "मतदानाचा शेवटचा दिवस" असतो. तेथे मतदान एकाच दिवशी न होता या शेवटच्या दिवसाच्या अगोदरच्या काही दिवसांच्या कालखंडात करता येते. हा "अर्ली वोटींग" नावाने ओळखला जाणारा कालखंड दर राज्याने ठरवलेला असल्याने वेगवेगळा असू शकतो. यावेळच्या अर्ली वोटींग कालखंडाची काही राज्यांची उदाहरणे अशी आहेत : १. अरिझोन : १२ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर; २. अर्कान्सा : २४ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर (संघ्याकाळी ५ वाजेपर्यंत) ३. कॅलिफोर्निया : प्रत्येक विभागात वेगळे कालखंड आहेत (जागेवर चौकशी करा), पोस्टाने आलेल्या मतपत्रिका ११ नोव्हेंबरपर्यंत स्विकारल्या जातील; ४. कोलोराडो : २४ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर; ५. फ्लोरिडा : २९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर; ६. सेम डे रजिस्ट्रेशन अँड वोटींग : २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर; ७. नेवाडा : २२ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर; इत्यादी प्रत्येक राज्याची सविस्तर माहिती येथे मिळेल. भारतीय मतदाराला ही माहिती आश्चर्यकारक आणि मनोरंजक वाटेल ! :)

आज मुलाच्या शाळेतही काही पत्रकं वाटत होते. त्यावरुन कळालं की उद्या बर्‍याच निवडणुका एकदम असतात. लोकल लेव्हलच्या सुद्धा. मुलगा आज अचानक मला सांगत होता की उद्या आपण प्रेसिडेन्टला बघणार आहोत.. कोणे प्रेसेडेन्ट? तर म्हणे डोनाल्ड ट्रम्प! का तर त्याला ट्रंप नाव आवडलंय! पण म्हणजे शाळेतही आज ह्या निवडणुकीविषयी माहिती दिली असेल. एकंदरित इथं तेच सगळं वातावरण आहे! अगदी लहान पोरं पण सोडली नाहीत. हिलरी येईल असं वाटतंय.. इथे सगळी सोशल मिडीया पेजेस विकत घेतल्यासारखी तिची तारिफ करत आहेत. त्याही पेक्षा जास्त ट्रंपची बदनामी करत आहेत. अगदी चेपु वरच्या एका सायन्स पेजने सुद्धा "ट्रंप कोणकोणत्या वेज्ञानिक गोष्टी मानत नाही" असे आर्टिकल परवा टाकले. ह्युमन्स ऑफ न्युयॉर्कनेही एक मोठ्ठा उतारा टाकला होता की कसं वाटोळ्ळं होईल ट्रंप आला तर! हिलरीच्या टिव्हीवरच्या अ‍ॅड्स सुद्धा ट्रंप कसा वाईट आहे ह्यावर आहेत. ट्रंपच्या अ‍ॅड्स मला तुलनेनेन कमी दिसल्या सगलीकडेच. पण अर्थात त्याही मी कसा भारी आहे आणि हिलरी वाट लावेल तुमची अशाच आहेत. पण हिलरी मी काय करु शकते ह्यापेक्षा ट्रंप कशी बरबादी आणेल आणि तो कसा हुकलेला आहे हेच सांगत आहे. विकासाचे मुद्दे वगैरे फार ऐकायला मिळाले नाहीत. डिबेट्स मध्ये जे काही थोडं फार बोललं गेलं तेच. टिव्हीवरही बिल माहेर (असाच ना उच्चार?) आणि जॉन ऑलिव्हर उघडपणे हिलरीला सपोर्ट करत आहेत. लास्ट वीक्स टुनाईट मध्ये तर जॉन हात धुवुन ट्रंपच्या मागे लागलाय!! एकंदरित वातावरण पहाता हिलरी येईल असे वाटते.

मला अस वाटतय की मतदानाच्या प्रमाणात ७ ते ८ टक्के वाढ होईल व भल्याभल्यांचे अंदाज चुकतील. वाढते मतदान काय करू शकते याचा विचार फारसा झालेला नाही असे वाटते.

In reply to by शाम भागवत

मतदानाच्या प्रमाणात ७ ते ८ टक्के वाढ होईल व भल्याभल्यांचे अंदाज चुकतील.
मतदानाला सुरवात झाली आहे. सध्या मतदानाचा वेग किती आहे याविषयी माहिती नाही.तेव्हा त्याविषयी काही लिहित नाही. तरीही समजा मतदानाचे प्रमाण वाढले तरी भारतात किंवा इंग्लंडमध्ये जितका फायदा मिळाला असता तितका अमेरिकेत मिळेल असे नाही. याचे कारण इलेक्टोरल कॉलेज हा प्रकार. दोन्ही कोस्टवर तसेच मिशिगन आणि मिन्नेसोटा सारख्या राज्यांमध्ये अध्यक्षीय निवडणुकांमध्ये डेमॉक्रॅटिक पक्ष खूपच प्रबळ आहे. तर मधल्या राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्ष प्रबळ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हे ठळकपणे बघायला मिळाले आहे. रिपब्लिकन पक्षाने कॅलिफॉर्निया शेवटचे जिंकले होते ते १९८८ मध्ये थोरल्या बुशनी तर न्यू यॉर्क शेवटचे जिंकले होते १९८४ मध्ये रॉनाल्ड रेगन यांनी.तर अमेरिकेच्या मध्य भागातील कॅन्सस हे राज्य डेमॉक्रॅटिक पक्षाने शेवटचे जिंकले होते १९६४ मध्ये लिंडन जॉन्सन यांनी (आणि त्यापूर्वी १९३६ मध्ये फ्रॅन्कलीन रूझवेल्ट यांनी). एकंदरीत रिपब्लिकन पक्षाचे प्राबल्य असलेली राज्ये जिंकण्यात गेल्या काही निवडणुकांमध्ये डेमॉक्रॅटिक पक्ष अधिक यशस्वी झालेला आहे पण रिपब्लिकन पक्षाला मात्र डेमॉक्रॅटिक पक्षाच्या प्राबल्यक्षेत्राला खिंडार तितक्या सहजपणे पाडता आलेले नाही. उदाहरणार्थ १९९२ मध्ये बिल क्लिंटन यांनी रिपब्लिकन पक्षाचे प्राबल्य असलेली लुईझियाना, अरकॉन्सॉ, टेन्नीसी, मोन्टाना इत्यादी राज्ये जिंकली होती.पण कोस्टवरील राज्ये जिंकणे रिपब्लिकन पक्षाला गेल्या काही निवडणुकांमध्ये शक्य झालेले नाही. त्यातच इलेक्टोरल कॉलेजमुळे अजून गुंतागुंत वाढेल असे वाटते. अमेरिकेच्या मध्य भागातील परंपरावादी लोकांना एक स्त्री अध्यक्ष झालेली आवडेल असे वाटत नाही.तसेच ओबामांच्या ८ वर्षांच्या कारकिर्दीनंतर त्यांच्या 'व्हाईट सुप्रीमसी' ला काही प्रमाणावर तरी धक्का बसला असेल असे वाटते. त्यातून रिपब्लिकन पक्ष मुळात प्रबळ आहे अशा राज्यांमधून (टेक्सस,ओक्लाहोमा,कॅन्सस इत्यादी) ट्रम्पना जोरदार विजय मिळाला तरी त्यातून इलेक्टोरल कॉलेजमध्ये आणखी मते मिळणार नाहीत. मला वाटते की ट्रम्पची उघडपणे बाजू घेणे हे 'पोलिटिकली इनकरेक्ट' आहे. त्यामुळे अनेक मतदारांनी मतदानपूर्व चाचण्यांना आम्ही हिलरींना मत देऊ असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात ते ट्रम्पना मत देतील असे घडले तरच ट्रम्प जिंकतील. अन्यथा हिलरींचे पारडे जड आहे. असो. पुढील काही तासातच नक्की काय ते समजेल.

एकूणातच यावेळी अमेरिकी नागरिकांना 'चांगला उमेदवार' निवडण्यापेक्षा 'कमी वाईट' उमेदवार निवडायचा आहे.

लोकहो, हिलारीवर खटला दाखल करणार म्हणून एफबीआय संचालक कोमीने मोठा गाजावाजा केला खरा, पण ऐन वेळेस शेपूट घालून माघार घेतलीच. यावरून प्रस्थापितांना हिलरीची किती नितांत गरज आहे हे दिसून येतं. लोकांनी कशाला तिला मतं द्यायची? अशाने हिलरीची स्वीय सहायिका हुमा अबिदीन ही दहशतवादी बाई सेक्रेटरी ऑफ स्टेट होईल. युरोपात निर्वासितांनी जो उच्छाद मांडलाय त्याची अमेरिकेत पुनरावृत्ती होईल. शिवाय हिलरी = तिसरं महायुद्ध हे समीकरण आहेच. एकंदरीत मतं चोरण्यावाचून हिलरीकडे दुसरा मार्ग नाही. आता ही हिलरी खरी आहे की तेरेसा बार्नवेल आहे हा प्रश्न कृपया कोणी विचारू नका! ;-) आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

समर्थकः हिलरीचा समर्थक नाही पण आत्ता हिलरीच हवी ट्रंप नको असे अनेकांप्रमाणे वाटणारा आहे. अशाने हिलरीची स्वीय सहायिका हुमा अबिदीन ही दहशतवादी बाई सेक्रेटरी ऑफ स्टेट होईल. मला असलेली हुमा अबेदीनबद्दलची काळजी मी इतरत्र मिपावर व्यक्त केली आहेच. पण ती अजूनही दह्शतवादी ठरलेली नाही त्यामुळे तसे म्हणून उपयोग नाही. तसेच ती सेक्रेटरी ऑफ स्टेट होण्याची शक्यता नाही. पण ती जर चीफ ऑफ स्टाफ झाली तर अधिक काळजी करण्यासारखे राहील कारण ती प्रेसिडंटची अधुकृत सावली होईल. आय होप तसे होणार नाही. हिलारीवर खटला दाखल करणार म्हणून एफबीआय संचालक कोमीने मोठा गाजावाजा केला खरा, पण ऐन वेळेस शेपूट घालून माघार घेतलीच. हिलरीचे इमेल पुराण - म्हणजे खाजगी सर्वर वापरणे हे तो पर्यंत अधिकृत होते. त्यात तिने कुठलाही कायदा मोडला नव्हता. पॉवेल, राईस आदींनी पण कमी अधिक प्रमाणात असलेच प्रकार केले आहेत. चेनींच्या लाखावर इमेल्स या "गहाळ" झालेल्या होत्या... त्यामुळे ती काही सद्गुणाची पुतळी असली-नसली तरी तीने काहीतरी भयानक केले आहे असे ब्रँडींग झालेले आहे ते एकेरी आहे. एफबीआय ने जे काही ८-१० दिवसांपुर्वी केले, ते त्यांना दोन्ही पक्षांच्या सरकारांकडून असलेल्या अनेक दशकांच्या पायंड्याच्या विरुद्ध होते. एफबीआय ने गुप्तपणे विश्लेषण करून, खात्री करून मग जाहीरपणे अ‍ॅक्शन घेणे अपेक्षित असते. येथे काहीच माहीत नसताना आधी जाहीर केले आणि ते देखील अशा वेळेस जेंव्हा त्याचा निवडणुकीवर परीणाम होऊ शकतो तेंव्हा, जे त्यांच्या आचारसंहीतेच्या विरोधात गेले. दुसरे म्हणजे ट्रंप सपोर्टर आणि न्यूयॉर्कचे माजी महापौर रुडी ज्युलिआनी हे एफ बी आयच्या या निर्णयाच्या आधी दोन दिवस मुलाखतीत म्हणाले होते की दोन दिवसात काय गंमत होणार आहे ते पहा म्हणून. चौकशी होणार म्हणून जाहीर झाल्यावर पण स्वतःचा शहाणपणा दाखवायला म्हणून म्हणाले की मला एफबीआय एजंट्स नी हे आधीच सांगितले होते. जर तसे झाले असेल तर गोपनियतेचा भंग हा राष्ट्रीय गुन्हा आहे. त्यात एफबीआय मधील फूट दिसते तशीच जुलियानींनी (गुन्ह्याला) दिलेला पाठींबा पण दिसतो. त्यामुळे अमेरीकन काँग्रेस मधील काही डेमोक्रॅटीक सदस्यांनी लगेच आवाज उठवून त्याची चौकशी करायला हवी म्हणून जाहीर केले. हे प्रकरण जुलिआनी आणि एफबीआय मधील काही फुटीरांमुळे सगळ्यांना महागात जाण्याची शक्यता होती. त्यामुळे देखील असेल की तात्काळ एफबीआय ने जे होणारच नव्हते त्यातून माघार घेतली असेल... अर्थात त्याचा हिलरीला होयचा तो तोटा झाला कारण प्रचारातील शेवटचा आठवडा जेंव्हा मिलियन्स नी मते दिली तेंव्हाच त्यांची चौकशी होणार म्हणून जाहीर केले होते. शिवाय हिलरी = तिसरं महायुद्ध हे समीकरण आहेच. तसे होणार नाही. गेल्या दशकात अमेरीकेला युध्दाच्या खाईत रिपब्लिकन बूश नी लोटले होते. त्याआधी नव्वदच्या सुरवातीस मोठ्या बुशनी...बिल क्लिंटनच्या काळात युगोस्लावियामुळे अमेरीका युद्धात होती पण ते नेटो चा भाग म्हणून. ओबामाच्या काळात जे काही (युद्ध) चालले आहे ते बुशच्या काळातल्या गोष्टींचा परीणाम आहे. आता त्याने इराक-अफगाणिस्तानातून अमेरीकन सैन्य मागे घेयला हवे होते का? तसे घेतले नसते तर आयसीस तयार झाले नसते वगैरे वेगळ्या चर्चेचे आणि जर-तर चे मुद्दे आहेत. पण एकूण युद्धखोरीची भाषा सध्याच्या काळातले डेमोक्रॅट्स करत नाहीत. ट्रंप यांनी सरळ सरळ अण्वस्त्रे वापरीन म्हणून सांगितले आहे. ते होईल का नाही ते माहीत नाही. आय होप नॉट (जर ट्रंप अध्यक्ष झाले तर). मात्र, जी व्यक्ती सॅटरडे नाईट लाईव्ह मधे झालेल्या थट्टेला पहाटे तीन वाजता व्टिटरवर चिडून उत्तरे देत बसते आणि तेच इतरांच्या बाबतीत करते, इतके की त्याच्या सल्लागारांना त्याच्या व्टिटर वापरण्यावर बंदी आणावी लागली, त्या व्यक्तीकडे अण्वस्त्रांच्या चाव्या गेल्या तर काय होईल? अजून एक हिलरीविरोधातील मुद्दा - भारताशी आणि विशेष करून मोदी सरकारशी संबंध... मला ती दोन मुद्द्यांमुळे काळजी वाटत नाही. एक म्हणजे आपले सरकार आत्ता अधिक प्रबळ आणि धोरणी आहेत. (इथल्या काही जणांना ते पटणार नाही. पण त्यांच्याशी आदरपूर्वक असहमती...). दुसरा भाग म्हणजे हिलरीबद्दल बोलले जाते की ती चुकीतून शिकते. हे अगदी रिपब्लिकन्स पण बोलले आहेत. याचा अर्थ सगळे सुरळीत होईल असा नाही. पण त्याची काळजी करायची गरज नाही जितकी ट्रंपच्या हातात अण्वस्त्रांच्या चाव्या देण्याची गरज आहे - सगळ्या जगासाठीच.

आज माझ्या मित्राने सांगितलं कि स्पेस मध्ये असलेल्या माणसाने पण वोट केलं. हे खरा कि खोटं. जो नासा मध्ये कामाला आहे त्या माणसाने सांगितलं. बाकी ट्रम्प आणि हिलरी साठी भारतात यज्ञ केलं हे पाहून डोळे पाणावले. असो . लक्ष आहे धाग्यावर

मी पण महारष्ट्रातले किंवा देशातले निकाल असले कि सुट्टी घेतली आहे फक्त काही लिहायचा कंटाळा .

ही निवडणुक म्हणजे मुलायम वि. मायावती किंवा करूणानिधी वि. जयललिता अशा स्वरूपाची निवडणुक आहे. न्यू हँपशायर मधील निकाल जाहीर झाला असून हिलरीला ४ तर ट्रंपला २ मते मिळाली आहेत.

ह्यांच्याकडे फक्त दोनच पक्ष का ? प्रादेशिक, अपक्ष , धर्मावर आधारलेले?, युती केलेले असे पक्ष नसतात का ?

In reply to by मराठी_माणूस

तसे बरेच लहान पक्ष आहेत. त्यांचे अध्यक्षपदाचे उमेदवारही असतात. परंतु हेच दोन मुख्य पक्ष ९०% जास्त मते घेतात. काही अपक्ष सुद्धा अध्यपदाची निवडणुक लढवितात. युती वगैरे नसते. कोणत्याही विशिष्ट धर्माचे लांगूलचालन होत नसल्याने धम्रावर आधारीत पक्ष नसतात. अध्यक्षीय पद्धतीमुळे प्रादेशिक पक्ष (असल्यास) राष्ट्रीय राजकारणात हस्तक्षेप करू शकत नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

कोणत्याही विशिष्ट धर्माचे लांगूलचालन होत नसल्याने धम्रावर आधारीत पक्ष नसतात.
हे नक्की खरं आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

हिलरी आणि ट्रंप इतके नालायक आहेत तर मतदारांनी अपक्षांपैकी एकाला का निवडू नये? की त्यांना पैशाचे पाठबळ नसल्याने ते आव्हान निर्माण करू शकले नाहीत? जर बर्नी सँडर्स अपक्ष म्हणून लढले असते तर निकाल काय लागला असता?
अध्यक्षीय पद्धतीमुळे प्रादेशिक पक्ष (असल्यास) राष्ट्रीय राजकारणात हस्तक्षेप करू शकत नाहीत.
असा नियम आहे का?

In reply to by पुंबा

असा नियम आहे का?
असा नियम नाही. पण अध्यक्षीय निवडणुक असल्यामुळे निवडणुक व्यक्तिकेंद्रीत बनते. अशा परिस्थितीत पक्षाच्या पाठबळाशिवाय किंवा प्रादेशिक पक्षाच्या प्रादेशिक पाठबळावर पूर्ण देशात अध्यक्ष म्हणून निवडून जाता येणे कठिणच आहे. भारतातही देवेगौडा संसदीय पध्दत आहे म्हणून पंतप्रधान झाले. पण देवेगौडांनी अध्यक्षपदाची निवडणुक लढवली असती तर कर्नाटक वगळता इतर राज्यांमध्ये त्यांचे काय झाले असते याची कल्पना करणे फारसे अवघड नाही. तरीही एखादा तगडा उमेदवार असेल तर अध्यक्षीय निवडणुकांमध्ये बर्‍यापैकी मते घेऊ शकतो. पण अध्यक्षपदावर निवडून जाणे अर्थातच कठिण असते.उदाहरणार्थ १९९२ मध्ये रॉस पेरॉ यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढवून सुमारे १८-१९% मते घेतली. थोरल्या बुशचा १९९२ मध्ये पराभव झाला त्याला ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीबरोबरच रॉस पेरॉ हे पण जबाबदार होते. यापूर्वीचे उदाहरण घ्यायचे तर १९०१-१९०९ या काळात थिओडोर रूझवेल्ट अध्यक्ष होते.त्यानंतर १९०९-१९१३ या काळात विलिअम हॉवर्ड टाफ्ट हे अध्यक्ष होते. १९१२ च्या निवडणुकांमध्ये लढत होती रिपब्लिकन टाफ्ट आणि डेमॉक्रॅटिक वुड्रो विल्सन यांच्यात. पण माजी अध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांनी तिसर्‍या टर्मसाठी अपक्ष म्हणून निवडणुक लढवली आणि बर्‍यापैकी मते घेतली (किंबहुना टाफ्ट यांची मते फोडली). त्यातून टाफ्ट यांचा दणकून पराभव झाला. टाफ्ट यांनी केवळ युटा आणि व्हरमॉन्ट ही दोनच राज्ये जिंकली तर रूझवेल्ट यांनी सहा राज्ये जिंकली. विद्यमान अध्यक्षांचा निवडणुकीत इतका प्रचंड मोठा पराभव त्यानंतर झालेला नाही. तसेच १९६८ च्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन रिचर्ड निक्सन यांनी डेमॉक्रॅटिक हर्बर्ट हम्फ्रे यांचा पराभव केला. त्या निवडणुकांमध्ये जॉर्ज वॉलेस या तिसर्‍या उमेदवारानेही १२-१३% मते घेतली होती आणि ५ राज्ये जिंकली होती. इतर प्रतिसादांना वेळ मिळेल त्याप्रमाणे उत्तर देतोच.

In reply to by पुंबा

अमेरीकेतील कुठल्याही निवडणूकीत उभे रहायचे असेल तर आधी सह्या गोळा कराव्या लागतात. जशी निवडणू़क मोठ्या पदासाठी तशी ही पद्धत अतिशय क्लिष्ट होत जाते. तुर्तास राष्ट्राध्यक्षिय पद्धतीबद्दल बोलूयात. (त्यात आत्ताचे हिलरी आणि ट्रंप पण आले, पण त्यांचे पक्ष राष्ट्रीय असल्याने जरा सोपे-वेगळे होते त्यामुळे त्यांना वगळून इतरांचा विचार करूयात.. ) प्रत्येक इच्छूक उमेदवाराला सर्व (५०) राज्यांच्या विविध पद्धतींनुसार निवडणूक अर्ज भरावा लागतो. उदा. फ्लोरीडात रजिस्टर्ड व्होटर्सच्या १% सह्या गोळा कराव्या लागतात म्हणजे या वेळेस त्या जवळपास १२०००० इतक्या होत्या तर आयडॅहो मधे १००० अथवा न्यू जर्सी मधे ८०० कायम (% वगैरे नाही!). सर्व मिळून जवळपास ८ ते १० लाख सह्या गोळा कराव्या लागतात. त्यामुळे प्रत्येक राज्यात इच्छूक उमेदवाराची स्थानिक पातळीपर्यंत यंत्रणा लागते. ते अपक्षांना शक्य नसते अथवा लहान पार्ट्यांना पण शक्य नसते. आणि केले तरी नंतर प्रचार यंत्रणा आणि त्या साठी लागणारा पैसा नसतो. त्याही पुढे अनेकदा हे उमेदवार टोकाचे असतात. या वेळेस एक ग्रीन पार्टीची उमेदवार आहे (पार्टीच्या नावावरून समजले असेलच) तर दुसरीकडे लिबर्टेरीअन पक्ष (जरा जास्तच सामाजिक-आर्थिक कारणांसाठी उजवा) आहेत.

दोन्हीपैकी कुणीही निवडून आले तरी जगाला काही फरक पडत नाही. व्हाट्सअपवर एक मेसेज फिरतोय तो उद्बोधक आहे. Trump निवडून आलाय आणि ओव्हल ऑफिसमध्ये बसलाय; आपली सर्व वचने अंमलात आणण्यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देतोय. पण अधिकारी त्याला पटवून देतात की तो म्हणतोय त्यातील काहीच प्रत्यक्षात येऊ शकत नाही. कारण जे काही राडे करायचे ते कसे करायचे हे FBI, CBI, आदि खात्यांनी ठरवून टाकलेले आहे व प्रेसिडेंट म्हणजे नामधारी आहे. मग तो हताश होऊन विचारतो की मी करायचे तरी काय? उत्तर? Enjoy your time in white house! आणखी एक असाच मेसेज: Trump आणि हिलरी क्लिंटन ह्यातील निवड म्हणजे मायावती आणि मुलायम सिंग ह्यातील निवडीसारखीच आहे. अमेरिका हे विनाशाकडे निघालेले राष्ट्र आहे. त्याची फार चिंता करू नका. अर्थात, स्वतःबरोबर ते इतरांना खड्ड्यात घालताहेत हे दुःख. आपण कसे वाचतो हे पाहायचे जमले तर व तेव्हढे.

In reply to by रविकिरण फडके

प्रेसिडेंट म्हणजे नामधारी आहे
हं... शक्य आहे.. कारण ओबामा तसा भला माणूस. पण काही विशेष उजेड पाडलाय त्याने असं वाटत नाही. युद्धखोरी न करण्यासाठी / किंबहूना गप्प राहण्यासाठी शांततेचं नोबेल पदरात पडलंय.

अध्यक्षीय निवडणूक जिंकल्यावर माणणीय डोनाल्ड ट्रंप भाऊसाहेब विजयी भाषण करताना ... माझ्या प्रिय बंधू भगिणीणो, आज म्हंजी माझ्या आयुक्षातला एक लई म्हतवाचा दिवस हाय. जसा आणेक वर्सापूर्वी लांब तिकड भारतात रामान रावणाला बान मारून त्येच्याकडून विजय मिळवला तसाच विजय आज देवी यमाई कृपेन आमालाबी मिळाल्येला हाय. त्या हिलरी बाईनं मायंदाळ परयत्न क्येला आमाला हरविन्याचा पण त्येला ठाव नाय की आमी बी लाल मातीत लंगोट लावून कुस्ती खेळल्याल पैलवान हाये. असा पट काढून दीन व्हय सुखासुखी.... बर त्ये सम्द जाऊद्या. आज मी हित तुमा समद्यानचे आभार मानायला आलेलू हाय. तुमी समद्यानी माज्यासाठी आपलेपनान वोटिंग क्येलत, काहीकाही ठिकाणी दोनदोनदा तीनतीनदा बी क्येलत त्याबद्दल मी तुमचा लई आभारी हाय. मायला, आता बगा मी तुमचा गाव कसा बदलून टाकतो. आज हितच या शुभमुहूर्तावर तुमच्या गावासाठी मी पंधरा संडास मंजूर करतोय. आजपासून या गावातला येक बी मानूस रस्त्यावर बस्नार न्हाई म्हंजे न्हाई. थांबा थांबा, इतक्यात टाळ्या नका वाजवू. अजून बाकी हाय. आज रोजी खास तुमच्यासाठी मी येक धरन बी हितल्याहित शांक्शन करतूय. गावात नदी नसली तर काय झालं? धरन पायजेल म्हंजे पायजेल. फूडल्या येळी निवडून आलो की नाय गावात नदी आणली तर नाव बदलून दीन. बराय मंडळी आता रजा घ्येतो तुमची. असाच लोभ ठ्येवा गरिबावर. फूडच्या गावात जायचं हाय. तिथ बी लोक खोळंबलीयात......

देवा आकाशातल्या वडीला आमचे टृम्प_भौ बहुमताने इजयी होऊन पांढऱ्या घरात जाऊ दे रे महाराजा!! मी स्टेचूऑफलिबर्टी ला अकरा नारळाचा हार घालीन! लंडनच्या पवित्र थेम्स नदीच्या पाण्याने अभिषेक करिन रे महाराजा!! -आपला कॅलिफोर्निया (बुद्रुक)चा सरपंच

मतमोजणी सुरू झाली आहे. पुढील कल उपलब्धआहेतः १. केंटकी (८ मते): ११% मते मोजून झाली आहेत. ट्रम्प सुमारे ३५% मतांनी पुढे २. इंडियाना (११ मते):९% मते मोजून झाली आहेत. ट्रम्प सुमारे २७% मतांनी पुढे सी.एन.एन ने केंटकी आणि इंडियानामध्ये ट्रम्पना 'प्रोजेक्टेड विनर' म्हणून जाहिर केले आहे. तर व्हरमॉन्टमध्ये हिलरी क्लिंटनना 'प्रोजेक्टेड विनर' म्हणून जाहिर केले आहे. आताची प्रोजेक्शनः ट्रम्पः १९ क्लिंटनः ३ केंटकी आणि इंडियाना ही दोन्ही राज्ये रिपब्लिकन पक्षाचे बालेकिल्ले आहेत आणि तिथून ट्रम्प विजयी होणे अपेक्षित होते.

In reply to by गॅरी ट्रुमन

>>केंटकी आणि इंडियाना ही दोन्ही राज्ये रिपब्लिकन पक्षाचे बालेकिल्ले आहेत आणि तिथून ट्रम्प विजयी होणे अपेक्षित होते. हेच जाणून घ्यायचे होते. धन्यवाद.

फ्लॉरीडामधून (२९ मते) २% मते मोजून झाली आहेत. त्यात ट्रम्प पुढे आहेत.पण मते वकुला काऊंटी (टॅलाहास्सीजवळ) मधून मोजून झाली आहेत. तिथे रिपब्लिकन बालेकिल्ला आहे. त्यामुळे ट्रम्प २८% ने पुढे असले तरी ते अपेक्षितच आहे. व्हर्जिनिया (१३ मते): १% मते मोजून झाली आहेत. त्यात हिलरी क्लिंटन ४% मतांनी पुढे आहेत.

फ्लॉरीडामध्ये (२९ मते) ३१% मते मोजून झाली आहेत आणि त्यात हिलरी ०.५% मतांनी पुढे आहेत. हिलरींनी आपली स्ट्राँगहोल्ड असलेली राज्ये जिंकली आणि फ्लॉरीडासारखे मोठे रिपब्लिकनकडे झुकणारे राज्य जिंकले तर हिलरी अध्यक्षपदी नक्की. व्हर्जिनियामध्ये ३% मते मोजून झाली आहेत आणि त्यात ट्रम्प २०% ने पुढे आहेत. जॉर्जियामध्येही पहिल्या कलांमध्ये ट्रम्प पुढे आहेत. पण जॉर्जिया हा रिपब्लिकनांचा बालेकिल्ला आहे तेव्हा हे अनपेक्षित नाही.

सी.एन.एन ने वेस्ट व्हर्जिनिया (५ मते)मधून ट्रम्पना प्रोजेक्टेड विनर म्हणून जाहिर केले आहे. फ्लॉरीडामध्ये चुरस चालू आहे. ४३% मते मोजून झाली आहेत आणि आता ट्रम्प १% ने पुढे आहेत. फ्लॉरीडामधील चुरस २००० च्या निवडणुकांची आठवण करून देत आहे. फ्लॉरीडा जिंकल्याशिवाय ट्रम्पना व्हाईट हाऊस गाठणे कठिण आहे. सध्या-- ट्रम्पः २४ क्लिंटनः ३

फ्लॉरीडामध्ये (२९ मते) मतमोजणी जोरात चालू आहे. आता ४७% मते मोजून झाली आहेत आणि ट्रम्प २.५% मतांनी पुढे आहेत. व्हर्जिनिया (१३ मते) ट्रम्प पुढे आहेत. पण व्हर्जिनियाच्या रिपब्लिकन स्ट्राँगहोल्ड असलेल्या भागांमधून आकडे आले आहेत त्यामुळे त्यात अनपेक्षित काही नाही.

नॉर्थ कॅरोलायना (१५ मते): १०% मते मोजून झाली आहेत. ट्रम्प ११% ने पुढे. फ्लॉरीडा (२९ मते): ६५% मते मोजून झाली आहेत. आता हिलरी १.३% ने पुढे. न्यू हॅम्पशायर (४ मते): १% मते मोजून झाली आहेत. हिलरी क्लिंटन ४% ने पुढे ओहायो (१८ मते): ट्रम्प १०% ने पुढे फ्लॉरीडा खरोखरच २००० च्या निवडणुकांची आठवण करून देत आहे.

फ्लॉरीडा खूपच इंटरेस्टींग आहे. ७२% मते मोजून झाली आहेत. त्यात आता हिलरी क्लिंटन २.६ % मतांनी पुढे आहेत. उरलेल्या २९% मतांमधून ही पिछाडी ट्रम्पना भरून काढता आली नाही तर त्यांना व्हाईट हाऊस गाठणे कठिण आहे. आता नॉर्थ कॅरोलायनामधूनही हिलरी पुढे आहेत. फ्लॉरीडा आणि नॉर्थ कॅरोलायना जिंकले नाही तर ट्रम्पना व्हाईट हाऊस विसरायला हवे.

In reply to by गॅरी ट्रुमन

>>फ्लॉरीडा आणि नॉर्थ कॅरोलायना जिंकले नाही तर ट्रम्पना व्हाईट हाऊस विसरायला हवे. एनबीएसी वरच्या अनालिस्ट्सच्या मते फ्लॉरीडा जर ट्रम्प च्या हातातून गेले तर त्याला पेनसिल्व्हेनिया आणि मिशिगन हि दोन्ही राज्ये जिंकावी लागतील.

नॉर्थ कॅरोलायना (१५ मते): ३६% मते मोजून झाल्यावर आता हिलरी क्लिंटन ६% पुढे आहेत. पण सी.एन.एन वर असे म्हणत आहेत की शारलट या डेमॉक्रॅटिक पक्षाच्या बालेकिल्ल्याच्या भागातून मते मोजून झाली आहेत. मागच्या वेळी ओबामांनी या भागातून भरपूर मते घेऊनही हे राज्य गमावले होते. ओहायोमध्येही आता हिलरी पुढे आहेत. बहुतके ट्रम्पना व्हाईट हाऊस गाठता येणे कठिण आहे. सी.एन.एन ने मॅसॅचुसेट्स, मेरीलंड, र्‍होड आयलंड, इलिनॉय, डेलावेअर, डिस्ट्रीक्ट ऑफ कोलंबिया मधून हिलरी तर ओक्लाहोमा, टेनीसी, मिसीसीपी मधून ट्रम्प ना प्रोजेक्टेड विनर म्हणून जाहिर केले आहे. न्यू हॅम्पशायर, पेन्सिल्वेनिया मध्ये चुरस होईल अशी अपेक्षा आहे. आता-- हिलरी क्लिंटन-६८ डॉनल्ड ट्रम्प- ४८

फ्लॉरीडामध्ये ८२% मते मोजून झाली आहेत. आता हिलरी क्लिंटन १.४% मतांनी पुढे आहेत. त्यापेक्षाही हिलरींनी ओहायोमध्ये जवळपास ९% आघाडी घेतली आहे तर नॉर्थ कॅरोलायनामध्ये ६% आघाडी घेतली आहे. हिलरी अलाबामामध्ये आघाडीवर आहेत. तसे असेल तर ते खूपच आश्चर्यकारक असेल. बहुदा खूपच कमी मते मोजून झाली असावीत.

तुम्हाला धाग्यावर एकटे एकटे वाटायला नको म्हणून हा प्रतिसाद.

फ्लॉरीडामध्ये ८६% मते मोजून झाली आहेत. आता ट्रम्प ९१८ मतांनी (०.१% पेक्षा कमी) आघाडीवर आहेत. आणि हे पोस्ट करता करता हिलरींना ४,२९० मतांची आघाडी मिळाली आहे. हे राज्य म्हणजे रोलरकोस्टर आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

फ्लोरिडा मध्ये जो जिंकेल त्याला सगळे (म्हणजे 29 इलेकट्रोल मते) मिळतील का?

In reply to by अनन्त अवधुत

केवळ मेन आणि नेब्रास्कामध्ये इलेक्टोरल कॉलेजमधील मते स्प्लीट होतात. इतर सर्व राज्यांमध्ये 'विनर टेक्स ऑल'

फ्लॉरीडात ८८% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प अवघ्या २८ मतांनी आघाडीवर आहेत. फ्लॉरीडामध्ये पुनर्मतमोजणी होणार का?

फ्लॉरीडामध्ये आता ट्रम्प ०.२% मतांनी आघाडी घेतली आहे. तरीही सी.एन.एन वर दाखविले की मायामी या मोठ्या शहरात हिलरींनी २८% ची आघाडी घेतली आहे. तिथे अजूनही २०% मते मोजून व्हायची आहेत. त्यामुळे ही ०.२% ची आघाडी बदलू शकते. फ्लॉरीडातील निकाल छत्तिसगड विधानसभा निवडणुकांची आठवण करून देत आहेत.

टेक्ससमध्ये ४६% मते मोजून झाली आहेत आणि तिथे हिलरी क्लिंटन ०.५% ने आघाडीवर आहेत. तिथे जर ट्रम्प मागे असतील तर त्यांनी बॅग भरून परत जावे :)

सी.एन.एन ने साऊथ कॅरोलायना, ओक्लाहोमा, मिसीसीपीमध्ये डॉनल्ड ट्रम्पना प्रोजेक्टेड विनर म्हणून जाहिर केले आहे. आता-- हिलरी क्लिंटनः ६८ डॉनल्ड ट्रम्पः ६६

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला वाटते हिलरी जिंकतील-- इलेक्टोरल कॉलेजमध्ये साधारण ३०० मते घेऊन. एकदा न्यू यॉर्क आणि कॅलिफॉर्नियातील आकडे आले की हिलरींची आघाडी वाढलेली दिसेल. त्यातही ट्रम्प ओहायो आणि नॉर्थ कॅरोलायनामध्ये सध्या मागे आहेत. ही दोन राज्ये जिंकणे त्यांना महत्वाचे आहे.

व्हर्जिनियामध्ये ५३% मते मोजून झाली आहेत आणि ट्रम्प ६% ने आघाडीवर आहेत. या राज्यात हिलरी जिंकणे अपेक्षित होते. जर ट्रम्पनी व्हर्जिनिया जिंकले तर कदाचित नॉर्थ कॅरोलायनामधील पराभवाची भरपाई होईल. तरीही वॉशिंग्टन डी.सी पासून जवळ असलेल्या फेअरफॅक्स शहरात हिलरी पुढे आहेत आणि तिथून बरीच मते मोजून व्हायची आहेत. हे पोस्ट करता करता फ्लॉरीडामध्ये ट्रम्प १.१% मतांनी पुढे आहेत. आणि राज्यातील ९१% मते मोजून झाली आहेत.

टेक्ससमध्ये ५०% मते मोजून झाली आहेत आणि आता ट्रम्प २.३% मतांनी आघाडीवर आहेत.

अरकॉन्सॉमध्ये (६ मते) १५% मते मोजून झाली आहेत आणि तिथे डॉनल्ड ट्रम्प ९% ने पुढे आहेत. अध्यक्ष होण्यापूर्वी बिल क्लिंटन या राज्याचे गव्हर्नर होते. पण अध्यक्षीय निवडणुकांमध्ये हे राज्य रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला आहे. पूर्व किनार्‍यावरील न्यू जर्सी, डेलावेअर, मेरीलँड, डीसी, मॅसॅचुसेट्स या राज्यांमध्ये सी.एन.एन ने अपेक्षेप्रमाणे हिलरींना प्रोजेक्टेड विनर म्हणून जाहिर केले आहे. मिशिगनमध्ये ९% मते मोजून झाली आहेत आणि हिलरी ४.६% मतांनी पुढे आहेत. ओहायो आणि नॉर्थ कॅरोलायनामध्ये हिलरी अजूनही पुढे आहेत. पण आघाडी कमी झाली आहे. ६१% मते मोजून झाल्यानंतर हिलरी नॉर्थ कॅरोलायनामध्ये २.३% मतांनी तर ३५% मते मोजून झाल्यावर ओहायोमध्ये १.७% मतांनी पुढे आहेत. काही वेळापूर्वी हे आकडे ६% आणि ८% असे होते.

डॉनल्ड ट्रम्प नॉर्थ डॅकोटा (३ मते), साऊथ डॅकोटा (३ मते), कॅन्सस (६ मते) आणि नेब्रास्का (५ मते) यातून जिंकतील असे सी.एन.एन ने जाहिर केले आहे. तर हिलरी क्लिंटन त्यांच्या न्यू यॉर्क राज्यातून (२९ मते) जिंकतील असे जाहिर केले आहे. हे पोस्ट करता करता ३७% मते मोजून झाल्यावर डॉनल्ड ट्रम्प आता ०.१% मतांनी पुढे आहेत. आतापर्यंतचे आकडे: हिलरी क्लिंटनः ९७ डॉनल्ड ट्रम्पः ८४

ओहायो आणि नॉर्थ कॅरोलायना फ्लॉरीडाप्रमाणेच इंटरेस्टींग वाटत आहेत. ओहायो (१८ मते): ४०% मते मोजून झाल्यावर ट्रम्प २.६% मतांनी पुढे आहेत. नॉर्थ कॅरोलायना (१५ मते): ५९% मते मोजून झाल्यानंतर ट्रम्प ०.५% मतांनी पुढे आहेत.