✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अजय-अतुल लाईव्ह वगैरे...!

ख
खेडूत यांनी
Tue, 10/18/2016 - 12:04  ·  लेख
लेख
नुकताच अजिंठा महोत्सवात सुप्रसिद्ध गायक-संगीतकार जोडी, अजय-अतुल यांच्या लाईव्ह कार्यक्रमात गाणे सुरु असताना मधेच ट्रॅक बंद झाल्याने गाणे थांबले आणि ही जोडी फक्त ओठ हलवत गाण्याचा अभिनय करत असल्याचे प्रेक्षकांना पहायला मिळाले. प्रेक्षकांना हा धक्का होताच, पण मोठ्ठ्या रकमेचे तिकीट घेऊन असे झाल्याने फसवणुकीची भावना झाली, आणि बरेच प्रेक्षक उठून गेले असे बातम्यांवरून समजते. कांही वृत्तवाहिन्यांच्या बातमीप्रमाणे ट्रॅक बंद पडल्यावर गायक आणि वादकांनी खरेच गायला-वाजवायला सुरुवात केली तेव्हा एनर्जी लेव्हल मधे कमालीचा फरक पडून गाणे नीरस झाले. बातमी: या जोडीची सगळी नाही तरी अनेक गाणी आवडतात. कलाकार म्हणून ते पुढेही आवडत रहातीलच. पण त्यांच्या किंवा अन्य कुणाच्या लाईव्ह कार्यक्रमात जाणे आता नकोसे वाटेल. तुमचे मत काय? या निमित्ताने मनात आलेले कांही प्रश्न असे: १. तंत्रज्ञानाच्या मदतीने हा प्रकार नेहेमीच होत असतो का, आणि आपण आता त्याची सवय करायला हवी का? २. अन्य कलाकार असेच करत असतात का? ३. त्यांच्या नवनिर्मितीच्या मर्यादा संपल्याने नाव असेतो झटपट पैसे मिळवण्यासाठी असे कार्यक्रम घेतात का? ४. काल सर्व मराठी वृत्तपत्रांच्या संस्थळावर ही बातमी होती, ती का/ कशी हटवली गेली असेल? की असे कांही झालेच नाही? ५. नुकत्याच सैराट चित्रपटाच्या एका गाण्यासाठी त्यांनी हॉलीवूडचा कुठलासा स्टुडिओ वापरला आणि साठ का कैतरी लाख खर्च केले म्हणे. त्याची खरी गरज होती, की तेही प्रसिद्धीसाठी होते? ६. या कार्यक्रमात फजिती झाल्यावर मकरंद अनासपुरे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, ते योग्य होते का? ७. या निमित्ताने कांही सकारात्मक बदल होऊन अश्या कार्यक्रमांच्या जाहिरातींत डिस्क्लेमर टाकावा लागेल/ किंवा प्रेक्षकांना तिकीटाचे पैसे परत मागता येतील का?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
प्रतिसाद
माध्यमवेध
बातमी

प्रतिक्रिया द्या
24018 वाचन

💬 प्रतिसाद (76)

प्रतिक्रिया

माझे दोन पैसे

बोका-ए-आझम
Wed, 10/19/2016 - 09:42 नवीन
१. अजय-अतुल यांनी अल्पावधीत मिळवलेल्या यशामुळे वैतागलेल्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी ही बातमी तिखट-मीठ लावलेल्या स्वरूपात छापून आणलेली असण्याची दाट शक्यता आहे. या इंडस्ट्रीत अशा गोष्टी होत असतातच. २. अजय-अतुल जे lip sync करत होते ते त्यांच्या स्वतःच्याच गाण्यांचे ट्रॅक्स होते. इतर कोणाच्या गाण्यांचे नाहीत. म्हणजे मूळ मेहनत तर त्यांनी केलेली आहे. ३. प्रेक्षकांच्या फसवणूकीचा जो मुद्दा आहे - प्रेक्षकांची गाणं live ऐकायला मिळेल अशी अपेक्षा होती का? तसं असेल तर फसवणूक झाली असं म्हणू शकतो. पण जर तसं नसेल तर मग काय फरक पडतो? उद्या एखादा गायक live गातो म्हणून लोक जातील का? ते अजय-अतुल यांच्या नावामुळे जातील. मग ते ट्रॅकवर गाताहेत की live - याने काय फरक पडतो? ४. शास्त्रीय संगीत ऐकायला जाणारे श्रोते अाणि अजय-अतुल किंवा इतर कोणाच्याही concerts ऐकायला जाणारे प्रेक्षक यांच्यात फरक आहे. अशा concerts मध्ये प्रचंड गोंगाट असतो. एखाद्या गायकाने live गाणं म्हणणं हे त्याच्यासाठी त्याची कारकीर्द नष्ट करु शकतं. त्याचा आवाज पूर्णपणे निकामी होऊ शकतो. असं झालं तर प्रेक्षक त्याची जबाबदारी घेतील का? ५. स्टार्स appearance money म्हणून आयोजकांकडून पैसे घेतात. अजय-अतुल आज लोकप्रिय आहेत. आयोजक त्याच लोकप्रियतेचा फायदा उठवत आहेत. परत तोच मुद्दा येतो. उद्या एखादा गायक live गातो म्हणून लोक जातील का? ते अजय-अतुल यांच्या नावामुळे जातील. मग ते ट्रॅकवर गाताहेत की live - याने काय फरक पडतो?
  • Log in or register to post comments

यशामुळे वैतागलेल्या त्यांच्या

खेडूत
Wed, 10/19/2016 - 10:08 नवीन
यशामुळे वैतागलेल्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी
त्यांना कोण आहेत म्हणे प्रतिस्पर्धी? बिचारे निलेश मोहरीर/ सलील कुलकर्णी/ अवधूत (!) वगैरे हे आपापले मर्यादित स्थान टिकवून आहेत.
तसं असेल तर फसवणूक झाली असं म्हणू शकतो.
तसंच आहे, आणि असतं. अन्यत्र प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे लाईव्ह गाताना सूर हलले तरी लोक समजून घेतीलच. आवाज खराब व्हायचं काही कारण नाही, अति हळू आवाजात गायले तरी ११० डेसिबल्सला असह्य आवाज येतो!
मग ते ट्रॅकवर गाताहेत की live - याने काय फरक पडतो?
लोक ते लाईव्ह गातात असा समज करून घेऊन तिकीट काढतात आणि जातात. त्यांनी तसे सांगितले तर निम्मी तिकीटेही संपणार नाहीत. कदाचित या भीतीनेच तिकीटाचे दरही खूप जास्त ठेवतात. अन्यथा प्रायोजक आणि दूरचित्रवाहिन्यांचे हक्क विकूनही इतके महाग तिकीट का असावे? या साखळीत सगळेजण प्रामाणिकपणे कर भरत असतील तर ती एक आनंदाची बाब असेल. आता तुमचे स्पष्टीकरण मान्य करावे तर दुसरा प्रश्न येतो, की हे अजय-अतुल का बोलत नाहीत? ते तर सारवा सारव करताना दिसतायत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

बोक्या भाऊ

विशुमित
Wed, 10/19/2016 - 10:26 नवीन
प्रचंड सहमत... अगदी सेम विचार होते पण शब्द बद्द करता येत नव्हते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

त्यांना कोण आहेत म्हणे

बोका-ए-आझम
Wed, 10/19/2016 - 10:26 नवीन
त्यांना कोण आहेत म्हणे प्रतिस्पर्धी?
हिंदीत आहेत. मराठी कलाकारांविषयी हिंदी चित्रपटसृष्टीत आकस आहे ही वस्तुस्थिती आहे. अाणि त्यांचे मराठीतले प्रतिस्पर्धी असं करणार नाहीत असं तुम्हाला वाटतं का? सारेगम च्या एका भागात अजय-अतुल पाहुणे म्हणून आले होते. तेव्हा नटरंग चं संगीत गाजत होतं. त्यांचं कौतुक होत असताना जज सलील कुलकर्णींचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
तसंच आहे, आणि असतं.
एवढी ठाम खात्री असेल तर विषयच खुंटला.
लोक ते लाईव्ह गातात असा समज करून घेऊन तिकीट काढतात आणि जातात.
लोक enjoy करायला जातात. Live मुळे track पेक्षा जास्त मनोरंजन होतं असा विदा असल्यास द्यावा.
प्रायोजक आणि दूरचित्रवाहिन्यांचे हक्क विकूनही इतके महाग तिकीट का असावे?
जागेचं भाडं आणि करमणूक कर.
आता तुमचे स्पष्टीकरण मान्य करावे तर दुसरा प्रश्न येतो, की हे अजय-अतुल का बोलत नाहीत? ते तर सारवा सारव करताना दिसतायत.
तो त्यांचा मूर्खपणा/चांगुलपणा आहे. त्यांना एखादी गोष्ट चूक वाटू शकते. म्हणजे ती असेलच असं नाही. कितीतरी वेळा लोक न केलेल्या चुकांची क्षमा मागतात.
  • Log in or register to post comments

<<<लोक ते लाईव्ह गातात असा

विशुमित
Wed, 10/19/2016 - 11:24 नवीन
<<<लोक ते लाईव्ह गातात असा समज करून घेऊन तिकीट काढतात आणि जातात. लोक enjoy करायला जातात. Live मुळे track पेक्षा जास्त मनोरंजन होतं असा विदा असल्यास द्यावा. --- तिकीट काढून क्रिकेट म्याच पाहायला कोण जातं? फक्त एन्जॉयमेंटच असते ती. जे बुद्धिजीवी असतात ते एकतर शास्त्रीय आणि सुगम संगीत ऐकायला जातील नाहीतर घरात बसतील. असल्या शो मध्ये जाणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

१४ गाणी!

भाते
Wed, 10/19/2016 - 11:07 नवीन
एका वेळी सलग १४ गाणी प्रत्यक्ष म्हणणे अशक्य आहे. पूर्वी मी टीव्हीवर एमजेच्या कॉन्सर्टस बघायचो त्यावेळी मला हाच प्रश्न पडायचा. सलग २ तास इतकी सगळी गाणी म्हणणे कसे शक्य आहे? मग लक्षात आले कि तो काही मोजकी गाणी प्रत्यक्ष गातो आणि बाकीची सगळी लिपसिंकिंग असतात. तीन महिन्यांपूर्वी डोंबिवलीत मुग्धा वैशंपायनच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तीन तासाच्या कार्यक्रमात तिने दोन राग आणि चार गाणी म्हणाली. पण मध्ये गप्पा/मुलाखत आणि मध्ये गाणी असा कायर्क्रम असल्याने ते शक्य झाले. इथे तर बऱ्याच कलावंतांनी त्याचे समर्थन केले आहे.
  • Log in or register to post comments

बोका शेठ, तुमच्याशी सहमत आहे

संदीप डांगे
Wed, 10/19/2016 - 11:21 नवीन
बोका शेठ, तुमच्याशी सहमत आहे
  • Log in or register to post comments

प्रतिभा महत्वाची

हृषीकेश पालोदकर
Wed, 10/19/2016 - 11:34 नवीन
सर्व जाहीर कार्यक्रम असेच असतात कि काय ?
  • Log in or register to post comments

अजय-अतुल लाईव्ह वगैरे...!

दिलीप सावंत
Wed, 10/19/2016 - 11:46 नवीन
मराठीमधील सुप्रसिद्ध गायक-संगीतकार जोडी अजय-अतुल यांच्या लाईव्ह कार्यक्रमात असे पण होऊ शकते असे मला वाटले नव्हते. याला तिथले व्यवस्थापक जबाबदार आहेत असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

माझे चार आणे

प्रदीप
Wed, 10/19/2016 - 14:44 नवीन
प्रथम लेखातील काही प्रश्नांना माझी उत्तरे: १. तंत्रज्ञानाच्या मदतीने हा प्रकार नेहेमीच होत असतो का, आणि आपण आता त्याची सवय करायला हवी का? उ: नेहेमीच हे होते किंवा नाही, ह्याविषयी माहिती नाही. इथे तरी झाले असे दिसते. २. अन्य कलाकार असेच करत असतात का? उ: ठाऊक नाही. खरे तर अगदी व्यवस्थित माहिती असल्याशिवाय एकाद्या कलाकाराच्या अशा शोविषयी काहीही सांगणे चुकीचे आहे. सौरा ह्यांनी अगदी लता, आशा ह्या तसे करत आसल्याचे कुठेतरी वाचले आहे, असे लिहील आहे. तर त्याचा दुवा असल्यास द्यावा. मी स्वतः आमच्या शहरात लताचा शो १९९५ साली पाहिला, आशाचा अलिकडे सुमारे ५ वर्षांपूर्वी पाहिला. ह्या दोन्ही शोंचे (वेगवेगळे) आयोजक अथवा त्यात बॅकस्टेजशी संबंधित व्यक्ति माझ्या ओळखीच्या असल्याने मी हे ठामपणे येथे सांगू शकतो, की त्या दोन्ही शोजमधे असे काही केले गेले नाही. वास्तविक काराओकी मोडमधे गाणे त्या दोघींना नवे आहे, अपरिचीत नच्व्हे, कारण अलिकडील बहुतेक सर्वच रेकॉर्डिंग्सही जवळजवळ तशीच करावी लागतात आणि त्या दोघींनीही ते व्यवस्थित केलेलेही आहे. पण हे त्यांचे 'नेटिव्ह मोड' नव्हे. तसेच लता १९७४ पासून नियमित रूपाने असे शोज करते आहे. त्या अगोदर अधूनमधून काही ना काही निमीत्ताने असे शोज व्ह्यायचे (युद्धे, फिल्मफेयर अ‍ॅवॉर्ड्स वगैरे). ह्या सर्व वेळी आताचे टेक्निक उपलब्ध नव्हते. सर्व शोज त्यावेळी लाईव्हच व्हायचे. ते त्यांना जास्त जवळचे वाटावे- तेव्हा आणि आताही. ३. त्यांच्या नवनिर्मितीच्या मर्यादा संपल्याने नाव असेतो झटपट पैसे मिळवण्यासाठी असे कार्यक्रम घेतात का? उ: असे नसावे. दोन्ही गोष्टी एकाचवेळी करता येतात की! ५. नुकत्याच सैराट चित्रपटाच्या एका गाण्यासाठी त्यांनी हॉलीवूडचा कुठलासा स्टुडिओ वापरला आणि साठ का कैतरी लाख खर्च केले म्हणे. त्याची खरी गरज होती, की तेही प्रसिद्धीसाठी होते? उ: ह्या प्रश्नाला काय म्हणावे? चित्रपट हा व्यवसाय आहे. त्याच्या रेकॉर्डींगचा खर्च प्रोड्यूसर करतो, त्यावेळी तो त्यातील रीटर्न्सवर लक्ष ठेऊनच करतो. समजा अगादी अजय- अतुल ह्यांनी तो खर्च स्वतः केला, तरी तेव्हा त्यांनी त्याच्या रीटर्न्सवर लक्ष ठेवले असेलच. म्हणजे काही व्यावसायिक आडाखे कुणीतरी (प्रोड्यूसर अथवा संगीतकार) ह्यांनी बांधले, ते रीस्क त्यांनी घेतले. त्त्याबद्दल त्याची गरज होती किंवा नाही ह्याची उठाठेव आपणास कशाला असावी? ६. या कार्यक्रमात फजिती झाल्यावर मकरंद अनासपुरे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, ते योग्य होते का? उ: ते त्या शोचे एमसी असतील तर तशी सारसारव करणे हा त्यांच्या व्यवसायाचा भाग होता. वेळप्रसंग मारून नेणे हे त्या व्यक्तिपेक्षा इतर कुणीही ऑन- द- स्पॉट करेल असे वाटत नाही. तेव्हा उत्तर 'हो' असे आहे. ७. या निमित्ताने कांही सकारात्मक बदल होऊन अश्या कार्यक्रमांच्या जाहिरातींत डिस्क्लेमर टाकावा लागेल/ किंवा प्रेक्षकांना तिकीटाचे पैसे परत मागता येतील का? उ: एका अर्थी ही फसवणूक आहे. पण असा डिस्क्लेमर कुणीही देणार नाही. झालेल्या प्रसंगाची आता भरपूर शोभा माध्यमांतून झाल्याने प्रेक्षकांनी सजग व्ह्यावे! आता इतर काही टिपण्णी: मायनस ट्रॅकः हा काराओकीसाठी वापरतात तसा ट्रॅक. म्हणजे त्यात सर्व ऑर्केस्ट्रेशन व पर्क्युजन असते, फक्त गाणार्‍यांचे आवाज नसतात. तेव्हा काराओकीप्रमाणे, गायकांना त्या ट्रॅकवर गावे लागते. हा ट्रॅक अगोदर तयार केलेला असतो. मूळ रेकॉर्डिंगमधे आवश्यक तसे मल्टि- ट्रॅक्स असतील-- जसे ते अलिकडच्या सर्वच रेकॉर्डिंग्जमधे असतात- तर तांत्रिकदृष्ट्या, अशा रेकॉर्डिंगवरून मायनस ट्रॅक करणे अगदी सोपे आहे. जेव्हा मूळ रेकॉर्डिंगमधे हवे तसे मल्टी- ट्रॅक्स उपलब्ध नाहीत, तिथे (म्हणजे पूर्वीच्या सगळ्याच गाण्यांच्या रेकोर्डिंग्ज), अलिकडे सहज व स्वस्तात उपलब्ध असलेली काही सॉफ्टवेयर अ‍ॅप्लिकेशन्स वापरून असा ट्रॅक तयार करणे शक्य आहे. असे का करत असावेत? - तर तुम्हाला काही भव्यदिव्य दाखवायचे आहे, म्हणजे १५ - २० व्हायोलिन्स, अ‍ॅकॉर्डियन,,फ्लूट्स, सगळी पर्क्यूजन वाद्ये, ऑक्टोपॅड, सिंथेसायजर्स, सॅक्स इत्यादी-- तर ते तसेच्या तसे अ‍ॅकॉस्टिक्स फारसे नसलेल्या हॉलमधे, अथवा उघड्या प्रेक्षागृहात- व्यवस्थित प्रत्यक्ष वाजवून त्यांचा उचित मिक्स करून ते प्रेक्षकांपुढे पोहोचवणे, अतिशय जिकीरीचे आहे. ह्यात बरेच रिस्क आहे, मुळात इतके फॅक्टर्स आहेत (जसे वादकांना उपलब्ध असलेली जागा, त्यांची एकमेकांशी असलेली प्रॉक्झिमीटी, त्यांना मिळणारा 'फोल्डबॅक साऊंड', गायका- वादकांचे त्यांच्या माईक्सच्या समोरून हलणे इत्यादी ) की थोड्या वेळात हे सगळे तिथे मांडून, त्याची टेस्ट घेऊन, मग ते रीतसर कसलाही प्रॉब्लेम न येता (फीडबॅक-- जो 'कुंई.... ' असा आवाज कधीतरी येतो तो, एकाद्या वाद्याचा आवाजच येतो आहे, येत नाही...) प्रत्यक्ष सादर करणे जवळजवळ अवघड आहे. त्यासाठी अतिशय काटेकोर प्लॅनिंग करावे लागेल, सादरीकरण जिथे करायचे आहे, तेथील परिस्थिती लक्षात घेऊन त्यात आवश्यक ते फेरबदल करावे लागतील, ह्यात बराच वेळ व पैसा खर्चावा लागेल. इतके सगळे करण्यापेक्षा काराओकीचा मार्ग तुलनेने बराच सोपा. त्यात गाणेही प्रेक्षकांपर्यंत नीट पोहोचते, आणि ते सगळे दिसतेही भव्य- दिव्य. अजय अतुल ह्यांनी मटाच्या खुलाशाच्या बातमीत 'लाईव्ह कन्सर्टमधे बॅकग्राऊंडचा टेंपो कमीजास्त होत असतो म्हणून असे करावे लागते' असे म्हटले आहे, ते मलातरी अगम्य वाटते! तुम्ही लाईव्ह गाता आहात, सर्व म्युझिकही लाईव्हच आहे, मग टेंपो कमीजास्त झालाच तर प्रॉब्लेम काय आहे? हे काही पटत नाही. ही सारवासारव तर नव्हे? अशा तर्‍हेच्या सर्वच ऑर्केस्ट्रांच्या कार्यक्रमांतून हे असेच केले जाते का? मी अलिकडे यू- ट्यूबवर अनेक जुन्या हिंदी चित्रपट गीतांचे ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम पहात आहे. हे सर्व त्या त्या ऑर्केस्ट्राच्या चालक- मालकांनीच अपलोड केलेले आहेत, तेव्हा त्यात काही खोटे- चूक नसावे. माझे ह्यांविषयीचे एक सर्वसाधारण निरीक्षण असे आहे की, जिथे अगदी थोडी वाद्ये आहेत-- एक सिंथ, एक फ्ल्यूट, एकादी सतार, थोडे पर्क्त्या, थोडक्यात जिथे १५ ~ २० व्हायोलिन्स, चेल्लो, सॅक्स वगैरे नाहीत-- तिथे ते कार्यक्रम संपूर्ण लाईव्ह पेश केले गेले. हा माझा ढोबळ अंदाज आहे. आणि कुणास ह्याची काही उदाहरणे पहायची असतील तर माझ्याशी खरडीतून संपर्क साधावा, काही दुवे देता येतील.
  • Log in or register to post comments

सहमत. मला काय म्हणायचे ते आपण

खेडूत
Wed, 10/19/2016 - 15:29 नवीन
सहमत. मला काय म्हणायचे ते आपण नेमके आणि सविस्तर लिहीलेत. गेल्या वीस वर्षांत अनेक लाईव्ह कार्यक्रम पाहिले-ऐकले. आशाताईंचा 'नक्षत्रांचे देणे' हा त्यात सर्वांत आवडलेला कार्यक्रम! १९९३ च्या काळात मर्यादित तन्त्राच्या मदतीने किती सुंदर कार्यक्रम करायच्या त्या. अल्बर्ट हॉलचा लतादीदींचा कार्यक्रम आजही ऐकावासा वाटतो. पुढे बर्लिन, स्टुट्गार्ट, लिवरपूल आणि पुण्यात अजय-अतुल, शंकर महादेवन हे सगळे कार्यक्रम पहायला मिळाले, आणि आवडलेही. मात्र इतकय सराईतपणे अलिकडे ट्रॅक वापरत असतात हे नवीनच होते, म्हणून धक्का बसला इतकेच. व्यवसाय कुणी कसा करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला असे कार्यक्रम आवडणार नाहीत हे निश्चित. बाकी स्टुडिओची उठाठेव उत्सुकतेपोटी केली, कारण एकच गाणे कुठले ते वेगळे-विशेष असे कळले नाही, थेटरात बसूनही. मकरंद अनासपुरेंचे सामाजिक कामात योगदान आणि संवेदनशीलता पाहून तो प्रश्न पडला. अन्य कलाकार असता तर वाटले नसते. स्वतः अनासपुरेंनाही ते करताना वाईट वाटलेच असेल. निव्वळ एंजॉय करायला जाणार्‍यांनी तसे जावेच. नको कोण म्हणतंय! आम्हाला फरक पडतो इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

धक्का

प्रदीप
Wed, 10/19/2016 - 19:20 नवीन
मलाही बसला. ह्या प्रोग्राम्समधे असे वाजवले जाते हे मला माहिती नव्हते. बाकी स्टुडिओची उठाठेव उत्सुकतेपोटी केली, कारण एकच गाणे कुठले ते वेगळे-विशेष असे कळले नाही, थेटरात बसूनही. म्हणजे त्यांच्या त्या प्रचंड खर्चाचे जस्टिफिकेशन झालेले दिसत नाही. मी 'उठाठेव' वगैरे कडक शब्द वापरल्याबद्दल मात्र माफी मागतो, राहवले नाही म्हणून तसे लिहून गेलो. निव्वळ एंजॉय करायला जाणार्‍यांनी तसे जावेच. नको कोण म्हणतंय! आम्हाला फरक पडतो इतकेच. १००% सहमत. फरक मलाही पडलाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

सौरा ह्यांनी अगदी लता, आशा

मराठी_माणूस
Wed, 10/19/2016 - 17:47 नवीन
सौरा ह्यांनी अगदी लता, आशा ह्या तसे करत आसल्याचे कुठेतरी वाचले आहे, असे लिहील आहे. तर त्याचा दुवा असल्यास द्यावा.
मीही आशा, लता ही नावे वाचुन माझ्या वरच्या एका प्रतिसादात संदर्भ मागीतला आहे. कारण पुर्वी हे तंत्र जेंव्हा उपलब्ध नव्हते तेंव्हा ही असे लाइव्ह कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

मी असे फेबूवर, मुकेश माचकर

पुंबा
Wed, 10/19/2016 - 18:27 नवीन
मी असे फेबूवर, मुकेश माचकर यांनी एका कमेंटमध्ये, आणि बिपीन कुलकर्णी यांच्या याविषयीच्या पोस्ट्वरील कमेंट्समध्ये वाचले आहे. अर्थात माझ्याकडे याचा आणखी काही पुरावा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

हे दोघे कोण आहेत?

मराठी_माणूस
Wed, 10/19/2016 - 19:23 नवीन
हे दोघे कोण आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

मुकेश माचकर

प्रदीप
Wed, 10/19/2016 - 19:36 नवीन
मराठी दैनिकातील पत्रकार आहेत. दुसरे कोण आहेत, माहिती नाही. पूर्वी लताचे (आशाचे माहिती नाही, पण,ह्याबाबतीत फरक नसावा) दूरदर्शनवर कार्यक्रम कधीमधी व्ह्यायचे, (मदनमोहन १९७५ साली गेल्यावर तसा एक त्याच्यावरील कार्यक्रम झाला होता, ते मला आठवते) तेव्हा तेथील ध्वनियंत्रणेच्या व अ‍ॅकॉस्टिक्सच्या लिमीटेशनमुळे ती गाणी 'फोल्डबॅक' मधे चित्रीत केली गेली, असे मी तेथील काही कर्मचार्‍यांकडून ऐकले होते. म्हणजे गीत रेकॉर्डींग स्टुडियोत प्रथम ध्वनिमुद्रित केले गेले, व त्याचे चित्रीकरण लिप्सिंक करून केले गेले, असा तो प्रकार. हे असे असेल तर इतरही काही कलकारांच्या बाबतीत तसे केले गेले असण्याची शक्यता आहे. ह्यामागे जाबाबदारी त्या त्या कलाकारांची नव्हे, हे उघड आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

प्लस मायनस ट्रॅक विषयीची हि लिन्क

दुर्गविहारी
Wed, 10/19/2016 - 17:51 नवीन
प्लस मायनस ट्रॅक विषयीची हि लिन्क http://maharashtratimes.indiatimes.com/cine-news/marathi-singers/articleshow/54916503.cms
  • Log in or register to post comments

एकदा गायलेली गाणी त्यांचीच आहेत ना........

माम्लेदारचा पन्खा
Wed, 10/19/2016 - 18:12 नवीन
गणपतीचा साचा असला म्हणजे झालं....मग हव्या तितक्या मूर्ती...!
  • Log in or register to post comments

केवळ एक तानपुरा आणि एक तबला

सुबोध खरे
Wed, 10/19/2016 - 18:26 नवीन
केवळ एक तानपुरा आणि एक तबला असला तरी खरा गायक सप्तस्वरांचा स्वर्ग उभा करील. अन्यथा पन्नास वाद्यांचे कडबोळे करून जगणारे गायक संगीतकार कमी नाहीत अशा अर्थाचे श्री पु ल देशपान्डे यांचे वाक्य आठवले. भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर यांचे "शिवकल्याण राजा" हे गीत आजच (परत) ऐकले. केवळ मागे तानपुरा सोडला तर इतर कोणतेही वाद्य नसताना अंगावर काटा आणि डोळ्यात अश्रू उभे राहतील इतके भावपूर्ण गायन आहे.(किंवा श्री ज्ञानेश्वरांचे पसायदान ऐकून पहा) त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

मतामतांचा गलबला

प्रदीप
Wed, 10/19/2016 - 19:28 नवीन
पुल, जीए हे सगळे मला अतिशय माननीय, वंदनीय आहेत, पण म्हणून त्यांची सगळी मते, विधाने मान्य आहेत असे नव्हे. नाहीतर टाईट जीन्स घातलेली स्त्री पाहून ती 'ढुंगणावरचे रूधिराभिसरण' दाखवते आहे, असे मला वाटत रहिले असते. चित्रपट संगीत व शास्त्रीय अथवा सुगम संगीत ह्यांत काही मूलभूत फरक आहेत. त्यांनुसार त्यांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. हे लक्षात ठेऊन टिका करावी. अन्यथा, माझ्यासारख्या फिल्म संगीत (व तेही ६० - ७० जणांचा, ब्रास, विंड, पर्क्युजन अशांनी नटलेला भरजरी) गाण्यांच्या चाहत्याला 'काय ते तुमचे 'ओ ...' वगैरे अशी टिका करता येणे कठीण नाही. पण हे सगळे विषयाला सोडून झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

नाही.

सुबोध खरे
Wed, 10/19/2016 - 20:31 नवीन
नाही. एवढ्या मोठ्या ताफ्यामध्ये गायकाची गरज आहे का ? असे वाटले. कारण तो ही आवाज आता संगणकावर काढता येतो. आणि इथे लाईव्ह कार्यक्रम काही लोक त्यांच्या "दर्शनासाठी" गेले होते असे वाटत नाही. बाकी घरात "बोस" किंवा "हर्मन" सारखी उच्च दर्जाची होम थिएटर असणारी मंडळी भारतात कमी नाहीत. हे जर असे "रेकॉर्डेड" (ध्वनिमुद्रित) संगीत ऐकायला कोणी "लाईव्ह" कार्यक्रमाला भरपूर पैसे मोजून जात असतील असे वाटत नाही. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments

अजय अतुलला लाईव्ह बघण्यासाठी

रेवती
गुरुवार, 10/20/2016 - 19:02 नवीन
अजय अतुलला लाईव्ह बघण्यासाठी जातात वगैरे मान्य नाही. लाईव्ह कार्यक्रमात आणि रेकॉर्डेड कार्यक्रमात वेगळेपणा आहे आणि असायलाच हवा. हे प्रिरेकॉर्डेड असले तरी चालतय वगैरे न्यू नॉर्मल आहे. मुळात तसे नसावे. शास्त्रीय संगिताच्या मैफिली जर लाईव्ह होऊ शकतात तर हे कार्य्क्रम का नाही? शेकडो वादक घेऊन येणे (गरज आहे की नाही माहित नाही) किंवा आकाशातून धरणीवर पडणे, नाहीतर पृथ्वीवरून आकाशात झेप घेऊन गाणे वगैरे अचाट करण्यापेक्षा जी गाणी गायचीयेत ती रेकॉर्डेडपेक्षा वेगळी भासणार आहेत याची कल्पना प्रेक्षकांना असायला पाहिजे. मलातरी लाईव्ह कार्य्क्रम आवडत नाहीत. गाणे ऐकताना गाण्यावर लक्ष देता येत नाही तर झगमगीत कपडे, काहीतरी करामती पहाव्या लागतात. बरं, हे केलं नाही तर कार्यक्रम निरस वाटण्याचा धोका असतो हेही मान्य! परदेशातल्या कुठल्यातशी लाईव्ह शोमध्ये कविता कृष्णमूर्ती हिने इतकी साधी साडी नेसली होती की ते ही बरे वाटत नव्हते (तूनळीवर दिसले). एकंदरीतच विचित्र प्रकरण असतं असं वाटतय. कलाकारांसाठीही ते फारसं सोयिचं नसावं. एखादे दिवशी घसा बसलेला असला (खासकरून परदेशी बर्फाळ थंडी असताना, जास्त मैफिली करून पिट्टा पडलेला असताना), दमलेला आवाज, वादकांपैकी कोणाची तरी फ्लाईट उशिरा, लवकर येणे वगैरेतून जमवाजमव करायची हे सोपं असेल असं नाही. हिकडे राहूल देशपांडेच्या कार्य्क्रमालाही एकदा उशीर झाला होता (त्या कार्य्क्रमाला मी गेले होते). कारण फार सिरियस नसेल पण उशीर होऊ शकतो.
  • Log in or register to post comments

७. या निमित्ताने कांही

मार्मिक गोडसे
Fri, 10/21/2016 - 14:57 नवीन
७. या निमित्ताने कांही सकारात्मक बदल होऊन अश्या कार्यक्रमांच्या जाहिरातींत डिस्क्लेमर टाकावा लागेल
टाकावाच. त्यामुळे वादकांच्या ताफ्याचा खर्चही वाचेल व कमी दरात लोकांना आपल्या आवडत्या कलाकारांचा 'लाईव्ह' शो बघायला मिळेल.
  • Log in or register to post comments

मी डोंबिवलीत फुले नाट्यगृहात

विजय नरवडे
Sun, 10/23/2016 - 21:08 नवीन
मी डोंबिवलीत फुले नाट्यगृहात 'पुन्हा सही रे सही ' नाटकाचा रेकॉर्डेड प्रयोग पाहिलेला आहे साधारण वर्षभरापूर्वी.
  • Log in or register to post comments

नाटकाचा ?

खेडूत
Sun, 10/23/2016 - 21:26 नवीन
नाटकाचा ? तो कसा असतो? म्हणजे पात्रे अभिनय करतच असतील तर बोलत का नाहीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय नरवडे

त्यांच्या ओठांची हालचाल

विजय नरवडे
Sun, 10/23/2016 - 21:56 नवीन
त्यांच्या ओठांची हालचाल म्हणजे बोलण्याचा अभिनय आणि येणारा आवाज जुळत नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा