मक्केतील उठाव ५
याआधीचा भाग ४
उलेमा मंडळींनी सौदी सरकारला प्रतिहल्ला करायची परवानगी दिली खरी पण त्याकरता कुराणामधील एका परिच्छेदाचा संदर्भ त्यांनी वापरला त्यात असे म्हटले होते की "त्या पवित्र मशिदीत लढाई करू नका जोवर ते तुमच्याशी लढत नाहीत, पण त्यांनी सुरवात केली तर मात्र तुम्ही त्यांना सोडू नका, अश्रद्ध लोकांना असेच शासन मिळते." आता इथे असे सुचवले आहे की मशिदीत उपस्थित अतिरेकी हे अश्रद्ध असले पाहिजेत. आता ह्या अतिरेकी लोकांना अश्रद्ध, धर्मभ्रष्ट ठरवणे हे मोठेच आव्हान होते. कारण त्यांचे अतिरेकी धार्मिकपण सगळ्यांना व्यवस्थित माहीत होते. अशांना धर्मभ्रष्ट कसे ठरवायचे? पण उलेमा लोकांनी ती सर्कस केली खरी. पण नंतर ह्या चालूपणाचा बिन लादेन आणि अन्य अतिरेकी संघटनांनी उत्तम वापर करून घेतला. सौदी सरकार आणि अन्य पश्चिम धार्जिणी सरकारे ह्यांना धर्मभ्रष्ट (हराम) म्हणून घोषित करण्याचा मार्ग मोकळा करून दिला गेला. निव्वळ वरकरणी धार्मिक मुस्लिम असणे हे खरोखरच धार्मिक असल्याचे लक्षण नाही अशी पळवाट ह्या उलेमांनी काढली आणि ती नंतर त्यांच्यावरच शेकली. सर्व काही नियम हे कुराणाचा वा हदीसचा आधार घेऊन बनवलेले असले पाहिजेत हा अतिरेकी आग्रह असल्यामुळे अशा पळवाटा काढून हवा तो सोयीस्कर अर्थ लावून त्यानुसार काम करणे हे इस्लामी इतिहासात अनेकदा घडलेले आहे.
दोन हल्ले निष्फळ आणि पोलिसांची मोठी जीवित हानी झाल्यावर सौदी सरकार थोडे जागे झाले. आता सैन्याला पाचारण केलेच पाहिजे हे त्यांना जाणवले. त्यानुसार सैन्याच्या अनेक तुकड्या बोलावल्या गेल्या. सगळ्या आधुनिक अस्त्रांची सैन्याच्या अनुभवी अधिकाऱयांकरवी तपासणी केली गेली आणि कुठली हत्यारे वापरायची ह्याविषयी खल झाला. सर्वप्रथम त्या मिनारातील नेमबाज लोकांचा निकाल लावायचा असे ठरवले गेले. हे लोक मोक्याच्या जागेवरून अचूक गोळीबार करून मोठे नुकसान करत होते. TOW (Tube-mounted, Optically tracked, Wire guided) ह्या नावाने ओळखली जाणारी क्षेपणास्त्रे वापरून मिनारातील बंडखोरांचा निकाल लावायचे ठरले. तसेच सैन्याला मशिदीच्या आवारात घुसायला सोपे जावे म्हणून छोटे रणगाडे (armored personal carrier) वापरायचे ठरले. त्यानुसार प्रथम क्षेपणास्त्रे डागली गेली. त्यांनी आपले काम व्यवस्थित केले. मिनारांचे फार नुकसान न करता त्यांनी त्यावरील सर्व बंडखोरांना ठार केले. एक मोठा अडथळा दूर झाला.
नंतर एम-११३ ह्या नावाने ओळखले जाणारे छोटे रणगाडे मागवले गेले. त्यांच्या छोट्या आकारामुळे ते इथल्या परिस्थितीत जास्त योग्य असतील असे सैन्याच्या अधिकाऱ्यांनी ठरवले. चिलखती असल्यामुळे सुरक्षित आणि .५० कॅलिबर ची मशिनगन असल्यामुळे मारक अशी ह्या वाहनांची वैशिष्ट्ये. ओसामा बिन लादेनचा मोठा भाऊ आणि महम्मद बिन लादेनचा वारसदार ह्याला मशिदीचे नकाशे द्यायला सांगितले होते. पण त्यांचे ऑफिस जागा बदलत होते त्यामुळे कागदपत्रे कुठल्यातरी डब्यात बंद होती ती सापडत नव्हती. ती दोन चार दिवसांनी एकदाची सापडली आणि खुद्द सलीम ती घेऊन आला.
ह्या रणगाड्यांना चांगले यश मिळू लागले. चिलखतामुळे अभेद्य झालेले सैन्य जोरदार गोळीबार करून बंडखोरांचा निकाल लावत होते. एक रणगाडा मात्र एका गेटमध्ये अडकला. स्फोटाने ते गेट उध्वस्त केले होते पण त्या रणगाड्याचा अँटेना त्या गेटमध्ये अडकला आणि तो रणगाडा फसला. ते बघताच बंडखोर त्याच्यावर अल्ला हू अकबरच्या घोषणा करत तुटून पडले. मशिदीच्या आवारात झमझम नावाचा पवित्र झरा आहे. हिंदूंना गंगेविषयी जे वाटते तसेच मुस्लिमाना झमझम बद्दल वाटते त्याच्या आसपास यात्रेकरूंची रिकाम्या बाटल्या टाकून दिल्या होत्या. त्या बंडखोरांनी पेट्रोलने भरल्या. आणि ह्या मोलोटोव्ह कॉकटेलचा वापर करून त्यांनी त्या रणगाड्यावर हल्ला केला. वरचे झाकण उघडून आतील सैनिकांना त्या पेट्रोलने जाळून मारले. नंतर त्या रणगाड्याचा जाळून कोळसा केला. आणि ते धूड त्या फाटकात अडकून बाकी वाहनांना ये जा करू देईना. नंतर एका बुलडोझरच्या मदतीने कसेतरी त्या रणगाड्याला शनिवारी दुपारी ओढून बाहेर काढले. हे सोपे नव्हते कारण बंडखोर लोक नेम धरून गोळीबार करतच होते. पण तो अडथळा दूर झाल्यावर पुन्हा लढाई सुरु झाली.
ज्याला माहदी म्हणत होते तो महम्मद अब्दुल्ला स्वत:ला अमर समजत होता (नैनम छिन्दन्ति शस्त्राणि!). तो बिनधास्त कुठलीही भीती ना बाळगता हातघाईचे युद्ध करत होता. आश्चर्य म्हणजे अनेक दिवस तो काहीही दुखापत ना होता टिकून होता. त्यामुळे बंडखोरांना त्याच्या दैवी गुणांबद्दल खात्रीच होऊ लागली.
सौदीकरता एक मोठी अवघड समस्या म्हणजे काबाचा दगड. हा काळा दगड हा एक अत्यंत पवित्र स्थळ समजला जातो. बहुधा तो उल्केचा पाषाण असावा. हा तमाम मानवांची पापे शोषून घेतो म्हणून तो असा काळाकुट्ट झालेला आहे अशी मुस्लिमांची श्रद्धा आहे. तो एक मोठा ठोकळ्याच्या आकारात बांधलेला आहे. जर बंडखोरांनी त्याचा आडोसा घेऊन गोळीबार केला तर त्यावर उलट मोठा गोळीबार करणे अवघड होते. ह्या पाषाणाचे काही नुकसान झाले असते तर मोठीच पंचाईत झाली असती. सुदैवाने जुहेमान आणि त्याचे सहकारी ह्या पाषाणापासून दूर राहिले. त्यामुळे ते संकट टळले. शनिवारी संध्याकाळी सैन्याने मशिदीच्या वरच्या भागातून बंडखोरांचा बहुतेक निकाल लावला होता. मशिदीच्या भिंतींचे, जमिनीचे, खिडक्यांचे अफाट नुकसान झाले होते. पण निदान आतील आवारात बरीचशी मोकळीक झाली. बरेचसे बंडखोर मशिदीच्या प्रचंड मोठ्या तळघरात पळून गेले. तिथे शस्त्रे, अन्न आणि पाणी ह्यांचा मोठा साठा करून तेच हल्ल्याचे मुख्य ठाणे बनवले गेले होते. काही बंडखोर शरणही येत होते. पण एव्हाना सैन्याचा संताप इतका होता की कित्येकदा अशा शरण येणार्या लोकांनाही ते निर्दयपणे गोळ्या घालून ठार मारत होते. कित्येक यात्रेकरू आणि सैन्याचे लोक ज्यांना बंडखोरांनी बंदिस्त केले होते असेही लोक मारले गेले. सौदी राजाने असे जाहीर केले की अशा प्रकारे जे निष्पाप लोक इथे मरत आहेत ते थेट स्वर्गात जाणार आहेत त्यामुळे त्यांची फार पर्वा करू नका!
शनिवारी उशिरा आणि रविवारी सकाळी थोडी लढाई वरच्या भागात चालू होती. सौदी सैनिक हातबॉम्ब फेकून बंडखोरांना मारत होते. माहदी समजला जाणारा फारच पेटला होता. फेकलेले बॉम्ब उचलून तो उलटे सैन्यावर फेकत होता. त्याचे भाग्य थोर होते म्हणून अनेक बॉम्ब असे उलटे मारण्यात तो यशस्वी झालाही. पण सतत अशी विषाची परीक्षा केल्याचे फळ त्याला लवकरच मिळाले. एक बॉम्ब हातातच फुटला. त्याच्या कंबरेखालचा भाग स्फोटाने पार छिन्नविछिन्न झाला. सैन्याच्या आक्रमक गोळीबारामुळे बंडखोर सहकाऱयांना त्याला उचलून तळघरातही नेता आले नाही. तो इतका भयंकर जखमी होता की तो मेल्यातच जमा आहे असे मानून त्याचे साथीदार पळून गेले.
रविवारी सकाळी मशिदीचा वरचा भाग पूर्णपणे लष्कराच्या ताब्यात आला. आता पहिल्यांदा सौदी राजपुत्र मशिदीच्या आवारात आले. त्यांनी मशिदीचा नकाशा पाहिल्यावर त्यांना जाणवले की ही अर्धीच लढाई आहे. अजून अर्धी बाकी आहे. तळघरातल्या बंडखोरांचा निकाल लावणे फार सोपे नाही. बंदर बिन सुलतान हा एक राजपुत्र (जो नंतर अमेरिकेतील राजदूत बनला) तो त्या सुमारास अमेरिकन राजदूताला काहीशा गमतीने असे म्हणाला होता की "बिन लादेनला ही मशीद बांधल्याबद्दल एक मेडल दिले पाहिजे आणि नंतर गोळी घालून मारून टाकले पाहिजे!" (इतकी भक्कम मशीद बांधून त्यांनी सैन्याची पंचाईत केली होती!).
खाली तळघरात माहदी च्या मृत्यूमुळे खळबळ उडाली. सगळ्यांना ही बातमी ठाऊक नव्हती. पण ज्यांना कळली त्यातले काही फार निराश झाले. आपला नेताच गेला मग आता बाकी अर्थ काय? खरे तर त्यांचा म्होरक्या हा जुहेमान हाच होता. माहदी हा त्यानेच घडवलेला होता. महम्मद अब्दुल्लाला पटवून पटवून त्याला माहदी बनवले होते. जुहेमानाने मोठे प्रभावी भाषण करून पुन्हा त्यांना लढायला तयार केले. तुम्हाला शरण जायचे असेल तर जा पण मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ह्या धर्मभ्रष्ट लोकांशी लढणारच.
तथाकथित माहदी मरण पावल्यावरही सौदी सरकारला ह्याविषयीची नक्की माहिती नव्हती. ज्या बंडखोरांना जिवंत ताब्यात घेतले ते बरेचसे आपले नाव महम्मद अब्दुल्ला असेच सांगत होते. त्यामुळे नक्की माहदी कुठला ह्याबद्दल मोठाच गोंधळ होता. अशी एक अफवा होती की त्या माहदीच्या आईने सौदी राजाची गुप्तपणे भेट घेतली होती. त्या भेटीत ती त्याला असे म्हणाली की, "तो जर खरोखर माहदी असेल तर तो तुला नक्की ठार मारेल. पण तो जर माहदी नसेल तर मग तू त्याला खुशाल ठार मार!" हे खरे की खोटे ते अल्लाच जाणे!
आता सौदी सैन्य तळघरावर हल्ला करण्याची तयारी करू लागले. तळघरात ट्रक न्यायला एक दार होते. जुहेमानाच्या लोकांनी एक ट्रक तिथे उभा केला होता. शस्त्रे, अन्न, दारुगोळा भरून ट्रकने तो तळघरात पोचवला होता. लष्करी वाहने आत जाता यावीत म्हणून सैन्याने तो ट्रक हटवायचे ठरवले. एक छोटा रणगाडा आणला. त्याने त्या ट्रकला धडक मारून त्याला दुसरीकडे ढकलून जागा मोकळी करावी असे ठरले. त्याप्रमाणे धडक मारली. पण प्रचंड स्फोट झाला. असे काही होणार म्हणून जुहेमानाने तो ट्रक बॉम्बने भरलेला होता! प्रचंड स्फोट झाला. धुराने गुदमरलेले सैनिक रणगाड्याबाहेर पडून पळून जाऊ लागले. पण आत टपून बसलेल्या बंडखोरांनी अचूक गोळ्या मारून त्यातले बहुतेक सैनिक मारून टाकले. एकंदर तळघरातले अतिरकी डोईजड होत होते. दोन तीन दिवस झाले. बुधवार (२८ नोव्हे ) आला तरी परिस्थिती तशीच. सौदी सरकारला असे जाणवले की आता बाहेरून काहीतरी मदत मागवणे आवश्यक आहे. पण असे काही करायचे असल्यास कमालीची गुप्तता आवश्यक होती. इराणमधून नव्याने सत्तेवर आलेला उन्मत्त खोमेनी सौदी, मोरोक्को, जॉर्डन ह्या देशांच्या सरकारांवर जोरदार ताशेरे ओढत होता. "आपल्या संरक्षणाकरता पश्चिमी देशांचे पाय चाटणारे दुबळे राजे" अशी तो ह्यांची संभावना करत होता. रशिया शीतयुद्धातील डावपेच वापरून अपप्रचार करत होता. "सौदी अरेबियातील दारान (Dhahran) शहरात अमेरिकन कमांडोज दाखल झालेले आहेत जे ह्या मशिदीची मुक्तता करणार आहेत." सौदीने तात्काळ ह्याचा इन्कार केला. खरे म्हणजे त्या शहरात अमेरिकन मिलिटरी उपस्थित होती. पण त्यांचा मशिदीवरील हल्ल्याशी काहीही संबंध नव्हता. शेजारचा जॉर्डन हा एक देश ह्याकरता योग्य होता. जॉर्डनच्या राजाही मदत करायला उत्सुक होता. त्याने प्रयत्न करून सौदी राजाची भेट ठरवली.
Book traversal links for मक्केतील उठाव ५
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वाचतोय. ओघवते आणि विस्तृत.
वाचते आहे..
APC - म्हणजे छोटे रणगाडे
ओघवता झालाय हा भाग !
वाचते
हघतु
वाचतोय!
+1
थरारक!
छान- सविस्तर आणि रोचक माहिती!
छान लिहीताय. पुढील भाग पटापट
मस्त...
पाचही भाग सलग वाचले आज, छान
रोचक. सर्व भाग एकत्रित वाचले.
खूप कमी लोकसंख्या ?
लादेनच्या बापाला कोणत्याही
ओसामा बीन लादेनला एकूण ३५ मुले झाली.
महंमद बिन लादेन
डॉ. उज्वला दळवी आणि त्यांचे
"सोन्याच्या धुराचे ठसके" हे ही छान पुस्तक आहे.
सारे जहांसे अच्छा
होय, खूप कमी लोकसंख्या !
सुरेख लिहित आहात..!
छान सुरू आहे लेखमालिका.
छान लेखन!
मशीद म्हणायची की ....
धर्माचे काम
दुरुस्ती
पुभाआवाबआ.तोलयेअआकआ.तीससहो,हीईचप्रा.
अत्यंत रोमांचक मालिका + १००
पु भा प्र
पुढचा भाग कंदी लिवनार? लवकर
अतिशय उत्तम भाग